मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छन्दिफन्दि, मूळ पुस्तक वाचाच.
स्टोरी आता तुम्हाला माहिती आहेच. आता पुस्तकातल्या नरेशनचा, भाषेचा लहेजा यांचा आस्वाद घेण्यासाठी वाचा, असं म्हणेन.

. आता पुस्तकातल्या नरेशनचा, भाषेचा लहेजा यांचा आस्वाद घेण्यासाठी वाचा, >>> हम्म खर आहे. पुस्तक वाचल्यावर मलाही ते जाणवलं की मूळ पुस्तक वाचायला पाहिजे. अजून चांगला/ समृद्ध अनुभव मिळेल.

खंडाळ्याच्या घाटासाठी

नारायण नावाचा मुलगा रेल्वेच्या भायखळा वर्कशॉपमध्ये कामाला लागतो. पुढे तो खंडाळा खोपिवली जोडणाऱ्या बोरघाटाच्या रूळ टाकण्याच्या कामावर लागतो. त्याची कथा कादंबरी आणि त्याचबरोबर घाटाचे काम करण्यात काय अडचणी आल्या त्याचे उत्सुकता वाढवणारे वर्णन.
चांगले पुस्तक.
त्या काळची समाजव्यवस्था, जाती पातींचे व्यवहार आणि वागणूक, इंग्रजांशी संबंध यांचे वर्णन आहे. नवी पिढी बदलायला तयार होती पण जुनी पिढी त्यांच्या समजुतींना चिकटून राहिलेली. रेल्वे येणार म्हटल्यावर खूप विरोध झाला. एकीकडे त्यांचे महत्त्व पटलेले तर दुसरीकडे अंधश्रद्धा आणि जाती व्यवस्था आड येत होती.
मला हे पुस्तक आवडले. सामाजिक इतिहास नोंदणाऱ्या मराठी पुस्तकांत गारंबिचा बापू, शामची आई, कोसला ही आहेत. पण हे त्याहूनही चांगले आहे असे वाटते.
लेखिका -शुभदा गोगटे
शुभदा -सारस्वत प्रकाशन,१९९२.
पाने ३५०
ISBN 81-85239-73-8
अमोझोनवरही आहे. https://www.amazon.in/Khandalyachya-Ghatasathi-Shubhada-Gogate/dp/938357...
Kindle unlimited मध्ये नाही.

१९९२ सालची म्हणजे ३३ वर्षे जुनी कादंबरी आहे. कधी नाव ऐकले नव्हते. लेखिकेचेही नाव ऐकले नव्हते. मिळवून नक्की वाचेन.

>>
सामाजिक इतिहास नोंदणाऱ्या मराठी पुस्तकांत गारंबिचा बापू, शामची आई, कोसला ही आहेत.
>>
हे विधान काही झेपले नाही. या तिन्हीमधले एकही पुस्तक हे सामाजिक इतिहास नोंदवण्यासाठी प्रसिद्ध नाही. आसूद मध्ये घडणार्‍या एका गावातली एका काल्पनिक नायकाची कादंबरी, उत्तर महाराष्ट्रातून पुण्यात शिकायला आलेल्या एका मनस्वी तरुणाची हॉस्टेलमध्ये घालवलेली काल्पनिक चार-पाच वर्षे आणि एका कोकणातल्या लहान मुलाच्या नजरेतून दिसलेली त्याची आई- यात नेमके कोणते सामाजिक इतिहास तुम्हाला दिसले?
६०च्या दशकातल्या संवेदनशील तरुणांना शंकर जयकिशनचे म्युझिक "झनझन छिनछिन" वाटायचे आणि सैगल आवडायचा हाच काय तो कोसलातून आलेला सामाजिक इतिहास.

शामची आई वाचल्याला दशके झाली. अस्पृश्यता, खोती, त्याकाळाची व्रतवैकल्ये इ.चे वर्णन आहे. शिक्षणासाठी उचललेले कष्ट आहेत. याला सामाजिक इतिहास म्हणता येईल ना?

अमुक एक काळात समाजातले विविध जाती धर्मांचे लोक, स्त्री पुरूष काय करत होते, कसे वागत होते, त्यांचे आदर्श काय होते इत्यादी एका कादंबरीत आणून मांडली जाते त्याला मीसामाजिक इतिहास म्हणतो. दुसरा योग्य शब्द काय ? इतिहास हा शब्द आला की त्यास घटनांचे पुरावे देणारी कागदपत्रे लागतात. परंतू घटना घडलेल्या असतात तेव्हा त्याचे पडसाद लोकांत काय होतात प्रतिक्रिया काय असतात हे कादंबरीकार लिहित जातो त्यांना पुरावे नसतातही. त्या अर्थी इतिहास नाहीच.

Srd+1
मी गारंबीचा बापू वाचलेली नाही अजून. शामची आई वाचून कित्येक वर्षे झाली. पण तुमचा मुद्दा बरोबर आहे. तुंबाडचे खोत, शाळा ही चटकन आठवलेली अजून दोन उदाहरणे.

गरीबांचा बापू नावाचा काशिनाथ घाणेकर यांचा पिक्चर होता. तो काही पाहिला नाही पण या कादंबरीवरच असेल.
"अजब सोहळा माती मिळते आभाळा" असं गाणं ऐकलंय म्हणून लक्षात आहे.

१८५३ एप्रिलमध्ये पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे धावली आणि थोड्याच महिन्यांत काही नियमीत फेऱ्या सुरू झाल्या. डब्यांमध्ये तीन वर्ग असत. पहिला फक्त ब्रिटिशांना, दुसरा ब्रिटिश अधिक एतद्देशिय श्रीमंत, तिसरा इतर सर्वांसाठी. बाकड्यावर मिळेल ती जागा पकडायची आणि बसायचे. समाजात शिवाशिव होती. चिकटून बसणार कसे वेगवेगळे जातीचे लोक? ब्रिटिश लोक या गोष्टीचा का विचार करतील? ( त्यांच्यासाठी वेगळा डबा राखीव ठेवायचे ते सोडा!)
तर रेल्वेच्या, राखीव डब्यांच्या नोंदी सापडतील पुरावे म्हणून. पण सर्वांनी जवळच बसायचे हे कादंबरीकार लिहिणार. शाळांतही खालच्या जातींच्या विद्यार्थ्यांना वेगळे बसवत. त्यांचे फोटोबिटो कुठे मिळणार? पण हे सगळं घडत होतं आणि लेखक यांची नोंद घेत होते.
खंडाळ्याच्या घाटासाठी कादंबरीतील नायक नारायण बंड वगैरे करून उठत नाही पण प्रत्यक्ष सामोरे जातो. घरातून विरोध करत असतात पण तो सर्वांच्यात मिसळतो. अण्णा ( वडील) नाना शंकरशेटांकडे चांगल्या नोकरीत असतात. पण ते आजारी पडू लागतात आणि घरी बसू लागतात. शेट नारायणाला दहा रुपयांवर ठेवायला तयार असतात . खरं म्हणजे ते रेल्वे बोर्डावर डायरेक्टर आहेत. एक काका मिळवता पण खर्चही बराच. नारायणाने पंधराव्या वर्षीच कमवायची निकड भासू लागते. हा गुणी मुलगा भायखळा रेल्वे वर्कशॉपमध्ये काम बघता बघता ते मिळवतो. शेट म्हणतात की तुला कारकून म्हणूनही लावू शकतो पण नारायणाचा खर्डेघाशी करत बसण्यात आनंद नसतो. वर्कशॉपमधलेच काम करीन म्हणतो . साहेब लोक खुश असतात पण नशीब आड येते . १८५७ त्या भडक्यानंतर इंग्रज लोक एतद्दैशियांशी फटकून वागू लागतात. नोकरी जाते. पण पुन्हा नशिब जोरावर असते. बोरघाट रेल्वेच्या कामाला मुकादम म्हणून निवड होते. कारण याला इंग्रजी येत असते. पगार पस्तीस रुपये. ....पुढे वाचा पुस्तकात. एवढी चांगली मराठी कादंबरी गाजली कशी नाही?

इरू - द रिमार्केबल लाईफ ऑफ इरावती कर्वे.
डॉ. इरावती कर्व्यांचं हे चरित्र. त्यांची नात (गौरी देशपांडे यांची मुलगी उर्मिला) आणि ब्राझीलियन मानववंशशास्त्रज्ञ थिआगो पिंटो बार्बोसा यांनी लिहिलेलं.
इरावती कर्वे हे एक बुद्धिमान, कर्तृत्ववान, वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून महाराष्ट्राला माहिती आहे. त्या मानववंशशास्त्रज्ञ होत्या, त्याचप्रमाणे उत्तम लेखिका होत्या. युगांत, परिपूर्ती यासारखी त्यांची पुस्तकं खूप लोकप्रिय आहेत. पण शास्त्रज्ञ म्हणून त्यांच्या कामगिरीचं महत्त्व नेमकं काय आहे, त्या जगात त्यांचं स्थान काय आहे, याची आपल्यासारख्या सर्वसामान्य वाचकाला फारशी माहिती नसते. या पुस्तकात इरावतीबाईंची शास्त्रज्ञ म्हणून आणि व्यक्ती म्हणून, अशी दोन्ही प्रकारे ओळख करून देण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न केलेला आहे. पुस्तकाचं स्वरूप एरवीच्या चरित्रांसारखं, चरित्रनायिकेच्या आयुष्यातल्या घटनांची कालानुक्रमे सविस्तर माहिती देणं, असं नाही. पुस्तकाची सुरुवात १९२७ मध्ये होते, जेव्हा २२ वर्षांची इरावती
पीएचडी करण्यासाठी जर्मनीला निघाली होती. जर्मनीतलं इरावतीबाईंचं हे वास्तव्य फार मोठं नसलं, तरीही या काळाचा मोठा प्रभाव त्यांच्या आयुष्यभराच्या कामावर राहिला. या काळातल्या आणि एकूणच त्यांच्या आयुष्यातील घटनांची खूप सविस्तर माहिती जरी लेखकांकडे उपलब्ध नसली, तरी इरावतीबाईंच्या लेखनातून, इतर संदर्भांतून जेवढी मिळेल तेवढी माहिती गोळा करून, त्यातल्या फटी आपल्या कल्पनाशक्तीने भरून एक सलग कथन निर्माण करण्यात लेखकद्वय यशस्वी झालं आहे. या लेखनप्रकाराला ' Critical fabulation' असं म्हणतात, हेही मला नव्याने समजलं. सैदिया हार्टमन या अमेरिकन लेखिकेने ही संज्ञा प्रचारात आणली, हे गूगल करून समजलं.
इरावतींचा जन्म १९०५ मध्ये, तत्कालीन ब्रह्मदेशात झाला. त्यांचे वडील, गणेश करमरकर, हे ब्रिटिश कॉटन कंपनीतल्या आपल्या नोकरीसाठी पत्नीसह ब्रह्मदेशातल्या म्यिंग्यान या ठिकाणी स्थायिक झाले होते. गावाजवळून वाहणाऱ्या इरावती नदीवरून त्यांनी आपल्या मुलीचं नाव ठेवलं. इरावतींना चार मोठे भाऊ होते आणि एक धाकटा भाऊ होता. आपल्या या एकुलत्या एका मुलीला, ती सहा वर्षांची असतानाच गणेश करमरकरांनी शिकण्यासाठी पुण्याला हुजूरपागेच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं. या शाळेत त्यांची वर्गमैत्रीण होती शकुंतला परांजपे, रँग्लर परांजपे या पुण्यातल्या एका असामान्य व्यक्तीची मुलगी. शकुंतलाची आई (सईताई) यांच्या आग्रहामुळे रँग्लर परांजप्यांनी हुजुरपागा शाळेशी बोलणी करून इरावतीला आपल्या घरी रहायला आणलं आणि त्यानंतर शकुंतला परांजपे आणि इरावती करमरकर या एकत्रच, एका घरात वाढल्या. इरावतींचं मास्टर्सपर्यंत शिकणं गणेश करमरकरांना मान्य नव्हतं, पण रँग्लर परांजप्यांचा खंबीर पाठिंबा असल्यामुळे इरावतीबाई शिकत राहिल्या.
महर्षी धोंडो केशव कर्वे आणि रँग्लर परांजपे ही आतेमामे भावंडं. त्यांचं एकमेकांकडे जाणंयेणं असल्यामुळे कर्वे कुटुंबाशी इरावतीबाईंचा चांगला परिचय होता आणि त्यातूनच दिनकर कर्व्यांशी त्यांचं लग्न झालं. हे लग्नही गणेश करमरकरांना आवडलं नव्हतं ( कारण कर्वे कुटुंब हे गरीब आणि समाजाचा रोष पत्करून समाजाची सेवा करणारं).
लग्नानंतर वर्षभरात जर्मनीला जाऊन पीएचडी ( त्याआधी काही वर्षे दिनकर कर्व्यांनीही जर्मनीतच जाऊन पीएचडी केली होती), नंतर १९३९ पासून पुढे शेवटपर्यंत डेक्कन कॉलेजमध्ये आधी समाजशास्त्र आणि मग मानववंशशास्त्र या विषयांवर संशोधन आणि अध्यापन इरावतीबाईंनी केलं. या काळात प्रचंड फील्डवर्क त्यांनी केलं. समाजशास्त्रात आणि मानववंशशास्त्रात त्यांनी केलेल्या संशोधनाचं महत्त्व अद्वितीय आहे. डॉ. सांकलिया हे त्यांचे डेक्कन कॉलेजमधले सहकारी होते. या दोघांमध्ये खूप फरक होते, तरीही त्यांचं एकमेकांशी कायमच अतिशय उत्तम जमलं.

जाई, आनंद आणि गौरी ही इरावतीबाईंची तीन मुलं. गौरीचा जन्म झाला तेव्हा या सावळ्या मुलीला पाहून इरावतीबाईंच्या सासूबाई, बाया कर्वे यांनी शेरा मारला की या मुलीचं नाव 'कृष्णा' ठेवा. यावर प्रतिक्रिया म्हणून इरावतीबाईंनी मुलीला बरोब्बर विरुद्ध अर्थाचं, 'गौरी' हे नाव ठेवलं Proud
पुलंचा इरावतीबाईंवरचा 'दीपमाळ' नावाचा, एक अर्थातच उत्तम लेख आहे. त्यातून इरावतीबाईंची 'व्यक्ती' म्हणून ओळख झाली होती. परिपूर्ती आणि युगांत ही इरावती कर्व्यांची पुस्तकंही मी वाचली आहेत. त्यापलीकडे जाऊन, थोडं अधिक खोलात जाऊन या विदुषीची ओळख झाली याचा मला अतिशय आनंद झाला आहे! Happy

सुंदर ओळख वावे! परांजपे आणि कर्वे हे एकमेकांच्या नात्यातले होते हे माहीत नव्हते.

त्या काळात इतक्या लांब ठेवणे म्हणजे अवघड असावे. रेल्वेने २-३ दिवस तरी लागत असतील पोहोचायला.

धन्यवाद फारएण्ड! Happy
हो, तीन दिवस लागायचे असा उल्लेख आहे.
पुस्तकात इरावतीबाईंच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा त्यांच्या बौध्दिक पातळीवरच्या व्यक्तिमत्त्वाची जास्त चर्चा आहे आणि ते योग्यच आहे. त्यांचे हिंदू आणि एकूणच भारतीय समाजाविषयीचे, देव, धर्म, परंपरा याविषयीचे विचार, त्यात काही बाबतीत होत गेलेला बदल, त्या बाबतीतला त्यांचा विचारांचा खुलेपणा ( open mind), यावर खूप इंटरेस्टिंग चर्चा आहे. पंढरपूरच्या विठोबाशी त्यांचं खास नातं होतं.
दिनकर कर्वे हे पूर्णपणे नास्तिक. Militant atheist. Happy इरावतींचे विचार थोडे वेगळे होते. पण या पतीपत्नीचं नातं फार सखोल, पक्कं होतं.

बघतो मिळते का पुस्तक. दुर्गाबाई आणि इरावती यांचे पीएचडीचे गाईड एकच होते, त्यांच्यांत काही वाद झाला होता असे वाचल्याचे आठवते.

सुंदर ओळख.
परत नाव वाचलं तर हे इंग्रजीत असणार याचा साक्षात्कार झाला. Lol मिळेल मग इथे. वाचतो.
हे प्रथम पुरुषी लिहिलंय का तृतीयपुरुषी?

असंच अल्लादिया खाँ यांचे प्रथम पुरुषी निवेदनात्मक आत्मचरित्र, अश्विनी भिडे देशपांडे यांनी लिहिलं आहे. त्यांच्या बद्दलच्या उपलब्ध माहिती, चरित्र, लिखाणातून, त्यांना भेटलेल्या व्यक्तीच्या मुलाखतीतून तो काळाचा पट उलगडून गाळलेल्या जागा भरा असं लिहिलंय. त्याबाबतचे त्यांचे वाचनाचे काही व्हिडिओ बघितले आहेत आणि ते ही वाचायची उत्सुकता आहे. कोणी वाचलत तर नक्की लिहा.

वावे, पुस्तक परिचय आवडला. इरावतीबाई, गौरी देशपांडे ह्या अगदी आवडत्या लेखिका. त्यामुळे त्यांनी लिहीलेलं किंवा त्यांच्या बद्दल लिहीलेलं वाचायला फार आवडतं. हे पुस्तक नक्की वाचेन.
पुणे ते ब्रह्मदेश प्रवास खूपच दूरचा आणि कष्टाचा असणार. इरावतीबाईंच्या (बहुतेक) भोवरा पुस्तकात त्याबद्दलचा उल्लेख आहे. त्या बऱ्याच वर्षांनी तिकडे सुट्टीत गेल्यावर काही दिवसांनी कंटाळल्या. परत पुण्यात येणं तेवढं सोपं नव्हतं. पण कोणीतरी सोबत मिळाल्याने आल्या. तो आनंद बघून त्यांच्या आईला वाईट वाटलं होतं, असं काहीतरी आहे.

धन्यवाद सगळ्यांना.
अमित, हो, इंग्रजीतच वाचलं मी. प्रथमपुरुषी नाही, तृतीयपुरुषीच निवेदन आहे. ( हल्ली शाळेत संस्कृत शिकवताना तरी आपण ज्याला प्रथम पुरुष म्हणतो त्याला उत्तम पुरुष आणि आपण ज्याला तृतीय पुरुष म्हणतो त्याला प्रथम म्हणतात Lol )
Srd, बरोबर असावं तुम्ही म्हणताय ते. (वादाविषयी मला कल्पना नाही). प्रा. घुर्ये हे इरावतीबाईंचे मास्टर्ससाठीचे मार्गदर्शक होते. दुर्गाबाईंचे पीएचडी मार्गदर्शक प्रा. घुर्ये हे तेच असावेत. तेव्हा समाजशास्त्रात पीएचडी केलेल्यांची संख्या खूपच कमी असणार.
अनया, हो, याही पुस्तकात तो उल्लेख आहे ( सुट्टीत तिकडे जाऊन कंटाळल्याचा) Happy

प्रथम पुरुष म्हणतो त्याला उत्तम पुरुष आणि आपण ज्याला तृतीय पुरुष म्हणतो त्याला प्रथम म्हणतात>> ओह्ह! हे काय नवीन आता! Lol

वावे, परिचय आवडला. इरू आलं तेव्हा त्याबद्दल इंडियन एक्स्प्रेस की लोकसत्तामध्ये वाचलं होतं. इरावती कर्व्यांचा परिपूर्ती हा लेख मला शाळेत होता. तो उपरो धाने लिहिला आहे हे इरुच्या पुस्तक परिचय की त्यातल्या वेच्यात आलं होतं. त्यांचं एवढं काम असताना पाठ्यपुस्तकात घ्यायला हाच लेख निवडला गेला आणि त्याचा अर्थही पूर्ण बदलून टाकला होता. परिपूर्ती नेटवर आहे .

त्यांच्या मानववंशशास्त्रातील संशोधनापैकी हिटलरच्या जर्मनीत जाऊन केलेल्या कामाबद्दलचा एक लेख नेटवर दिसत असतो.

शकुंतला की सई परांजप्यांच्या लेखनात परांजपे - कर्वे संबंधांबद्दल वाचलं होतं.

धन्यवाद भरत. मीही 'हिंदू'मध्ये वाचलं होतं या पुस्तकाबद्दल. एका मित्राला तिसऱ्याच मैत्रिणीने हे पुस्तक भेट दिलं आणि त्याने वाचायच्या आधी मी वाचलं Proud पण मी विकतही घेईन स्वतःसाठी एक प्रत आता.
हो, 'परिपूर्ती' उपरोधाने लिहिला होता असंच आहे याही पुस्तकात. शिवाय बहुतेक 'आहे मनोहर तरी' मध्येही असा उल्लेख आहे.
आम्हाला अकरावी किंवा बारावीला मराठीच्या पुस्तकात इरावती कर्व्यांचा 'वेड लागलेले घर' होता. तो मस्त होता.

जर्मनीत केलेल्या कामाबद्दल- इरावतीबाई जर्मनीत गेल्या, ते पहिल्या महायुद्धाचे परिणाम भोगणाऱ्या देशात, १९२७ मध्ये. त्या तिथे असतानाच ज्यूंबद्दलचा द्वेष लक्षात येण्याइतपत वाढायला लागलेला होता. त्यांचे जे पीएचडीचे मार्गदर्शक होते, त्यांचा हायपोथिसिस असा होता की युरोपियन आणि नॉन-युरोपियन लोकांच्या कवट्यांमध्ये युरोपियनांच्या कवट्या या asymmetric असल्या पाहिजेत कारण त्यांच्या मेंदूची उजवी बाजू ही जास्त विकसित झालेली असली पाहिजे (eugenics). हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी इरावतीबाईंना कवट्यांची मोजमापं घेऊन अभ्यास करण्याचं काम दिलं. मात्र इरावतीबाईंनी आपल्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढला की कवट्यांमधली asymmetry ही वंशावर अवलंबून नाही. दोन्ही (युरोपियन आणि नॉन-युरोपियन) प्रकारच्या कवट्यांमध्ये ही asymmetry आढळते!

इरावती हे नाव त्या आधी कुणाचे नव्हते का? ब्रह्मदेशावरील वा ब्रह्मदेशात घड्णार्‍या कथानक असलेल्या पुस्तकात इरावती नदी येतेच येते. पण इरावती कर्वे हे नाव डोक्यात एव्हडे फिट्ट आहे की ते भारतात कॉमन होते असेच वाटत होते मला.

छान परिचय, वावे.
पुस्तक विशलिस्टला टाकलं.

टवणे सर +१

Pages