मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

'संन्याशाच्या डायरीतून' या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या आत्मवृत्ताचा मराठी अनुवाद इतक्यात आला आहे. वाचला. आवडला.
सुरूवातीचा थोडा भाग त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचा, तसेच कॉलेजवयीन जीवन, शैक्षणिक क्षेत्रातलं काम, कामगार चळवळीतलं योगदान याबद्दल आहे. संन्यासी जीवनाबद्दल त्यांनी जे लिहिलंय, तशा प्रांजळपणे क्वचितच कुणा संन्याशाने लिहिलं असेल.
नंतरचा बराचसा भाग हैदराबाद मुक्ती संग्रामाशी संबंधित आहे. वर्षानुवर्षे थंड गोळ्याप्रमाणे पडलेल्या लोकांमध्ये प्राण फुंकायचे, दमसांस राखत प्रदीर्घ काळ लोकलढे चालवायचे, अंती ते यशस्वी करायचे, त्यासाठी पडेल ती किंमत (तुरूंगवास, शारिरीक-मानसिक कष्ट) चुकवायची, हे काही साधारण माणसाचं काम नाही. लोकांच्या हाल अपेष्टांबद्दल खरीखुरी तळमळ असल्याशिवाय हे घडत नाही.

चिल्लर गोष्टींसाठी फ्लेक्सबाजी करणारे आजकालचे भामटे बघता, एवढ्या मोठ्या घटनाक्रमांना एकहाती तडीस नेणारे आणि कशाचंच श्रेय स्वतःकडे घ्यायला अनुत्सुक असणारे स्वामीजी चमत्कारच वाटतात. दुसऱ्याच कुणीतरी हे सगळं घडवून आणलंय असा एकंदरीत स्वर.! यादरम्यानची त्यांची गांधींसोबतची बोलणी/अनुभव रोचक आहेत.
एकूण हे एक विलक्षण रसायन आहे. बंडखोर विद्यार्थी, मृदू शिक्षक, उत्तम लोकसंग्राहक, उत्तम मुत्सद्दी, जिगरबाज नेता, आणि मुळात एक चांगला माणूस असे विविध रंग दिसतात स्वामीजींमध्ये.

'Late to the party, but' अश्या प्रकारात मोडेल असं गॅब्रिएल गार्सिया मार्केझचं १०० इयर्स ऑफ सॉलीट्युड वाचून संपवलं . त्यामुळे मी भारावलेली पण सुन्न अश्या मानसिक अवस्थेत आहे. हे परीक्षण नाही. माझ्याच मनातील नोंदी आहेत.
हे पुस्तक माझ्या हातात १० वर्षांपूर्वी आलेलं. १० वर्षे मी का वाचलं नसेल तर बहुतेक ह्यातल्या प्रत्येक पानावर एखादा तरी असा शब्द आहे ज्याचा अर्थ शोधायला dictionary लागली. convalescence वगैरे! कोण वापरतो यार असले शब्द.
पण तरीही अर्थ शोधायला कित्येकदा फोन घेतला , दरवेळी फोन घेऊन सुद्धा इंस्टाग्राम न उघडता परत पुस्तकात डोकं खुपसलं - कारण कथानक तेवढं जबरदस्त आहे.
मॅजिकल रिऍलिसम हा लेखन प्रकार नव्याने अनुभवला. प्रत्येक व्यक्तीचं चित्रण एवढं प्रभावशाली आहे कि जवळ जवळ १०० वर्षे आणि ६ पिढ्यांची हि गोष्ट वाचताना दमछाक होत नाही.
त्यातही अगदी जीवाला भिडलेल्या दोन गोष्टी आहेत - पहिली रेनेता रेमेडीओस उर्फ मेमे . मेमेचा character arc भारीच उंचीवर जातो. एवढा की शेवटी जेव्हा तिने बोलणं सोडून दिलं (कि धक्क्याने मूक झाली? ) तेव्हा लेखकाचा भयंकर संताप आला. यातच लेखकाचं श्रेय आहे का? काय माहित, पण ती भविष्यवाणी वाचून त्याचा अर्थ लावायची क्षमता मेमेत होती. आणि तरीही तिला ह्यापासून वंचित का ठेवलं , अशी अजून माझी चिडचिड आहे. ह्या पुस्तकाशी काहीही संबंध नसलेली गेम ऑफ थ्रोन्स मधली सेन्सा स्टार्क आठवली. तीही शेवटी राणी झाली नाही. आणि त्यात भर म्हणून दोन्हीकडे अगदी लायक नसलेली पुरुष पात्रं उगीचच असामान्य गुणवत्ता असल्यासारखी 'main character' होऊन गेली. माझ्यातली फेमिनिस्ट काही शांत होत नाहीये.

दुसरं म्हणजे बुंदिया हाऊस . हे घर समुद्रापासून काहीसं दूर एका गावात आहे. म्हणून घराची रचना, खासकरून पडवी, पडवीतल्या कुंड्या, सोपे, दमट हवा, घामेजलेली उन्हाळी दुपार, धो धो पडणारा पाऊस, हे सगळं मी गोव्यातली असल्यामुळे मला घरचं . बुंदीया हाऊस हे कथेतील एक जीवंत पात्र आहे. हे घर जन्म घेतं , वाढतं , म्हातारं होतं, १०० वर्षांच्या एकांताचा आणि एकाकीपणाचा एकमेव साक्षीदार होऊन राहतं . आपल्याला आपल्या ३ पिढ्यांपूर्वीच्या पूर्वजांची नावं सुद्धा माहित नसतात. माझ्या जुन्या घराला सगळं माहित असेल ना? नावं , स्वभाव, खेळ, श्रीमंती, गरिबी, कष्ट, सगळं . म्हणून जुनी घरं जिवंत वाटत असावीत.
' आता मुंग्या आणि वाळवी लागलेलं एकेकाळचं समृद्ध घर' हा एक uncomfortable दुवा असावा बहुतेक ज्याने जगभरात सगळ्या वाचकांना ह्या कथेशी जोडून ठेवलंय .

दिवाळीतील भुतावळ!!

वरील नाव वाचून जरा नवल वाटलं असेल ना? आत्ता कुठे ही भुते अवतरली? तर ही भुते आठवली नुकत्याच वाचलेल्या एका नवीन पुस्तकाच्या निमित्ताने!

चार्ल्स डिकन्स या प्रख्यात लेखकाची 'A Christmas Carol' ही जगप्रसिद्ध कादंबरी आहे. या कादंबरीचे भन्नाट रूपांतर भा रा भागवत यांनी केले आहे '*भटांच्या वाड्यातील भुतावळ*' या नावाने! मूळ कथेत Christmas च्या काळात एका चिक्कूमामाला धडा शिकवायला त्याच्या भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही काळांतून एक भुतावळ अवचित प्रकट होऊन त्याला वठणीवर आणते. भागवतांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हे कथानक रंगवले आहे. धनत्रयोदशीला सुरु होणाऱ्या या कथानकात चिक्कू चिटकोमामा भटाच्या वाड्यात प्रत्येक दिवशी एक भूत प्रकट होऊन त्याला एका वेगळ्याच सफरीवर नेतं, सण आणि नातेसंबंध याचा खरा अर्थ त्याला उमगतो!

मूळ कथानक सशक्त आणि भागवतांनी त्याचे रूपांतर एकदम रंजक आणि सफाईदार केले आहे. चिटकोमामाबरोबर आपणही त्या विलक्षण सफरीवर जातो आणि त्यात गुंतून जातो Happy

डिकन्सची कादंबरी मी वाचली होती पण त्याचे हे मराठी रूपांतर आहे हे नुकतेच कळलं. आणि एकदा कळल्यावर लगेच ते मिळवून वाचलं. आज दीपावलीच्या निमित्ताने याची आठवण होणे अपरिहार्य होतं आणि आठवण झाल्यावर लगेच त्यासंबंधी लिहिणंही Happy

फोकस, द ए एस एम एल वे
पूर्ण नाव - Focus: The ASML way - Inside the power struggle over the most complex machine on earth - Marc Hijink
कुणाकडे सेकंडहॅण्ड आहे का ? किंवा कुठे मिळेल हे कळवाल का ?
पुण्यात फक्त सागर आर्केडमधे शोधायचं राहीलंय.

पुस्तक जालावर योग्य ठिकाणी फ्री मिळत आहे. शोधा म्हणजे सापडेल.
गूगल सर्चमध्ये सापडणार नाही.
_________________________
अशीच एक चिप बनवणारी दुसरी एक कंपनी TSMC ( TAIWAN semiconductor manufacturing company) जोरात आहे.

गूगल सर्चमध्ये सापडणार नाही > कुठे शोधू मग?
अशीच एक चिप बनवणारी दुसरी एक कंपनी >>> ही कंपनी चिप बनवत नाही. ती जे काही बनवते ती मशीन ज्यांच्याकडे आहे ते चिपच्या व्यापारात सम्राट आहेत. ही मशीन बनवणारी कंपनी ठरवणार कोणरा देश सुपरपावर राहील ते.

ए एस एम एल कंपनी ही लॅम रिसर्च, ऑन्टू इनोवेशन, के एल ए , आयकॉर या कंपन्या मशिनरी बनवतात ज्या टीएसएमसी, सॅमसंग, हायनिक्स सारख्या चिप बनवणार्‍या कंपन्यांच्या प्रॉडक्शन लाइनवर वापरतात.

हे पुस्तक वाचायला घेतले आहे. झाइस zeiss प्रकरणानंतर रंगत वाढत आहे.
..........
सध्या अंटार्क्टिक खंडावरचे गटग या विषयाने माबोवर बऱ्यापैकी जोर पकडला आहे. मी map उघडून अभ्यास करत आहे.

हा धागा एक ट्रोलिंग धागा आहे असं काहींना वाटेल पण तसं नाही. माबोकर सर्व जगात पोहोचले आहेत परंतू अंटार्क्टिक ( आर्क्टिकसुद्धा)वरच्या भारतीय किंवा अमेरिकन कँपांत नाहीत. २०९९ मध्ये बहुतेकअंटार्क्टिक/आर्क्टिकवरचे मायबोलीकर हे वाहते पान मायबोलीवर दिसू लागेल.

शाळेत असताना कॅप्टन स्कॉटची दक्षिण धृवावरची मोहीम असा धडा होता ते आठवलं. तो प्रथम तिथे पोहोचला नाही पण त्याच्या डायरीतील वर्णन चांगली आहेत म्हणतात.
आर्क्टिक खंड आणि तिथले एस्किमो लोक आणि त्यांची घरं इग्लू यांबद्दलही भूगोलात माहिती होती. ( आता एस्किमो म्हणायचं नाही, इन्यूईट म्हणतात.) तर जो भाग कॅनडात आहे त्यांनाही कित्येक वर्षं त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. मग १९०० पासून तिकडे संशोधक जाऊ लागले. त्यातील एक जण म्हणजे Farley Mowat. त्याने तिकडे जाऊन बरीच माहिती गोळा केली आणि पुस्तकं लिहिली.( १९५० ते २०१२ पर्यंत बरीच पुस्तकं आहेत) दोन तीन फार गाजली. People of the Deer वाचायला घेतले आहे. तर हे लोक कसे स्वतंत्रपणे जगतात, तिथली हरणे आणि कुत्रे आणि कोल्हे तसेच तिथला निसर्ग यांची माहिती आहे. खूप छान पुस्तक. यानंतर Never cry Wolf हे वाचेन. ( दोन्ही पुस्तकांची भाषांतरे मराठीत झाली आहेत.) उत्तरधृवावरचे हरीण पारधी_ जगदिश गोडबोले, आणि लांडगा आला रे_ माडगूळकर.

मिळवलंत आणि वाचलं सुद्धा. कमाल आहे.
मला मोबाईलवर वाचायला जमत नाही, तरीही उत्सुकता म्हणून शोध घेतला. पण नाही सापडलं.
डार्क वेब वगैरेशी संबंध नाही येत. त्यामुळं राजमार्ग सोडून सर्च देणं जमणे नाही.

रवी आमले ह्यांनी लिहिलेलं "रॉ: भारतीय गुप्तचर संस्थेची गूढथाथा" हे पुस्तक वाचलं. स्पेशल ऑप्स आणि तत्सम मालिकांमधून हल्ली भारतीय गुप्तचर खात्याच्या सुरस गोष्टी दाखवल्या जातात. त्या अतिरंजीत असतील हे बघताना जाणवतच. ह्या पुस्तकातल्या 'रॉ'च्या जन्मकथेपासून ते बाकी बर्‍याच गोष्टी मात्र खरच सुरस आहेत. अगदी थेट "युध्यस्य" नसल्या तरी सगळ्या कथा रम्य आहेत!
सुरूवातीच्या काही प्रकरणांमध्ये जरा तोचतोचपणा जाणवतो पण साधारण मध्यापासून पुढे पुस्तक एकदम पकड घेतं. नुकतच 'पाकिस्तान: अस्मितेच्या शोधात' हे पुस्तक वाचलेलं असल्याने तिथल्या त्यावेळच्या राजकारणाची थोडीफार तरी तोंडओळख होती अआणि त्याचे संदर्भ हे पुस्तक वाचताना लागले. इंदिरा गांधी ह्या फारच कणखर आणि मुत्सद्दी नेत्या होत्या आणि त्या अजून काही वर्ष पदावर रहायला हव्या होत्या हे पुन्हा जाणवलं! (फक्त सिमला कराराच्याच वेळी काय माशी शिंकली काय माहीत). मात्र... राजकीय घटनांबद्दल आपण इतक्या तावातावाने चर्चा करत बसतो, लोकशाही नांदणार्‍या देशांचं कौतूक करतो पण राजकीय स्थित्यंतरे, विविध देशीय संबंध ह्यामागचे खरे कर्ते करविते नक्की कोण? आपल्या सांगितली गेलेली कहाणी आणि पुराव्यांनिशी कधीच समोर न आलेलं सत्य ह्यातलं खरं काय, खोटं काय? नक्की कोणावर विश्वास ठेवायचं हेच कळेनासं झालं. Happy

बाकी लेखकाला त्याच्या राजकीय निष्ठा लपवता आलेल्या नाहीत हे खरं. सुरूवातीला समतोल लिहिण्याचा आव आणून नंतर कॉंग्रेस सरकारांच्या काळातल्या फक्त चांगल्या घटना आणि काँग्रेसेतर सरकारच्या काळातल्या केवळ यशस्वी न झालेल्या योजना ठरवून लिहिल्या सारखं वाटतं. त्याचबरोबर डाँ. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाच्या १० वर्षात "रॉ"ची काम बंद होती की काय असा प्रश्न पडावा इतका त्या वर्षांचा अनुल्लेख केलेला आहे.

ह्या धाग्यावर पाहिलेलं लेखकाचं "परकीय हात" हे पुस्तकही मिळवून वाचेन.

>>उत्सुकता म्हणून शोध घेतला. पण नाही सापडलं. >>

- Dark web चा काही संबंध नाही. Bing search मध्ये "pdf books free download " शोधा. साईट नक्की सापडेल. या ठिकाणी मात्र साईटचे नाव देणे योग्य होणार नाही. इतरही बरीच पुस्तके सापडतील. साईटमध्ये वायरस वगैरे अजिबात नाही. पाच वर्षे वापरत आहे.

>>रवी आमले ह्यांनी लिहिलेलं "रॉ: भारतीय गुप्तचर संस्थेची गूढथाथा">> हे आहे वाचनालयात पण कधी घेतलं नाही. बघेन.
.........

सत्यमेव जयते
शोध राजीव- हत्येचा
लेखक - डी. आर. कार्तिकेयन
राधाविनोद राजू
अनुवाद - सारंग दर्शने

वरचे पुस्तक ग्रंथालयातून उत्सुकतेने वाचायला घेतले... कारण त्याआधी ' इंदिरा गांधी' हे पुपुल जयकर यांनी लिहिलेले पुस्तक वाचल्याने गांधी घराण्याच्या राजकारणाची थोडी फार ओळख झाली होती.

'सत्यमेव जयते - शोध राजीव- हत्येचा' पुस्तक उत्साहाने वाचायला घेतले .. मात्र पुस्तकाची सुरुवात वाचताना मनात खिन्नता दाटून आली. बरेच दिवस पुस्तकाला हात लावावा असं वाटलं नाही. काही दिवसांनी पुस्तक चाळताना पुस्तकात छापलेले फोटो पाहिले आणि पुस्तक वाचायला घेतले.

हे पुस्तक म्हणजे राजीव गांधी यांच्या हत्याकांडाची मन गोठवणारी संवेदनशील कहाणी आहे .. शोकांतिका आहे.. कहाणी आहे थरारक मात्र मन उदास करणारी आहे.

लहानपणी दूरदर्शनवर राजीव गांधींचे अंत्यसंस्कार पाहिलेले आठवतात.. टिव्ही पाहताना घरातला हॉल गच्च माणसांनी भरलेला आठवतो.

राजीव गांधीना कोणी व का मारलं?

हे गूढ उकलण्यासाठी भारत सरकारने पाचारण केलं , ते डी. आर. कार्तिकेयन यांना.. सरकारने सोपवलेली हि भगीरथ कामगिरी त्यांनी योग्यरित्या हाताळली .. हे पुस्तकात जाणवते.

त्यांच्या अथक परिश्रमाची आणि हत्याकाडांचे धागेदोरे उकलणाऱ्या प्रवासाची कथा म्हणजे हे पुस्तक..!

राजीव गांधी यांची मानवी बॉम्बद्वारे दुर्दैवी हत्या झाली त्याच दिवशी - २१ मे रोजी - दुपारी ४ वाजता म्हणजे हत्या होण्याच्या आधी ६ तास कोलंबोतल्या भारतीय दूतावासात एक अज्ञात फोन आला होता, ' राजीव गांधी जिवंत आहेत का..?' अशी विचारणा एका अज्ञात माणसानं केली होती. ही माहिती तातडीनं भारतात योग्य त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली असती तर? कदाचित राजीव गांधीची सुरक्षा - व्यवस्था आणखी मजबूत झाली असती. पुस्तक वाचताना ह्या गोष्टीची हळहळ शेवटपर्यंत मनाला लागून राहते.

राजीव गांधीची हत्या झाली, तेव्हा हात बॉम्बची कवचं आणि छर्रे तयार करणारे कारखाने श्रीलंकेच्या तामिळी वाघांची संघटना असलेली एल. टी. टी. ई. भारतात राजरोस चालवत होती. काश्मीर व पंजाबसारखा तामिळनाडूसुद्धा पोखरल्यागत झाला होता. राजीव गांधीच्या हत्येच्या तपासात हे सारं उघड झालं. पुस्तकात ते ओघाने येतेच. एल. टी. टी. ई. चा तामिळनाडूनला पाया उखडून टाकण्यासाठीही राजीव गांधींची हत्या व्हावी लागली. स्वतःचं बलिदान त्यांना द्यावं लागलं.

भारतासारखे बलाढ्य लोकशाही असलेले राष्ट्र एकसंध रहावे .. त्यासाठी घडणारी प्रक्रिया किती वेळखाऊ आणि गुंतागुंतीची आहे, ह्याचे आकलन ' राजीव गांधी' यांच्या शोकांतिकेची तपास कथा वाचताना आपल्याला होते.

गुन्हा घडवताना कुठलाही पुरावा मागे सोडायचा नाही ही एल. टी. टी. ई. ची गुन्हा करण्याची पद्धत... गुन्हा घडवताना त्याचे फोटो काढायचे आणि ते त्यांच्या म्होरक्याला म्हणजे प्रभाकरनला दाखवायचे.. राजीव गांधी यांची हत्या करताना हरिबाबू नामक फोटोग्राफरला ह्या हत्येत सहभागी करून घेतलेले.. त्याच्या कॅमेरातून राजीव गांधी यांचे सभेला येईपर्यंत ते मानवी बॉम्ब द्वारे हत्या होईपर्यंतचे दहा फोटो पुस्तकात आहेत.. ते फोटो एल. टी.टी. ई. ह्या संघटनेनेच हे हत्याकांड घडवलेले आहे ह्याचे पुरावे होते.. कारण त्यांनी ह्या हत्याकाडांत आपण सहभागी नाही असं म्हटलं होतं. हरिबाबू स्फोटात मरण पावला मात्र कॅमेरा न बिघडता महत्वाचा पुरावा म्हणून समोर आला. पुस्तक वाचताना ते दहा फोटो पाहताना हळहळ वाटते.

इतिहास नेहमी रक्तानं घडला / घडवला गेल्याचे अनेक पुरावे आपल्याला सापडतात. कायदेशीर आणि वैध मार्गांवर विश्वास नसणारे राजकिय ध्येयप्राप्तीसाठी हिंसक मार्गाची वाट धरतात. सत्तेचं गणित सोडवताना निष्ठूर, निर्दयी साधनांचा वापर करतात.

तामिळी वाघांच्या एल. टी. टी. ई. नामक संघटनेने तामिळनाडूत आपली पाळंमुळं कश्यारितीने रोवली होती.. त्यासाठी हिंसक मार्गाचा वापर करताना भारतासारख्या प्रचंड मोठ्या लोकशाही राष्ट्रातल्या एका लोकप्रिय, प्रभावशील, स्वप्नाळू नेतृत्वाला कसा सुरुंग लावला.. त्याची सत्यकथा म्हणजे हे पुस्तक..!

वाचायला हवं.
श्रीलंकेतील एलटीटीची सरकारविरोधी चळवळ का सुरू झाली हे अगोदर वाचलं होतं इंडिया टुडे मासिकात. नंतर राजीव गांधींनी म्हणजे भारत सरकारतर्फे ती चळवळ दडपण्यासाठी श्रीलंका सरकारला मदत करण्यासाठी सैन्य पाठवण्यात आले. मग पुढच्या गोष्टी कशा घडल्या हे त्या वेळी मासिकात सविस्तर वाचले आहे.
हत्येमागे धागेदोरे उलगडणे यावर हे पुस्तक आहे. गुन्हा अन्वेषण. राजकारण नाही.
घातकी संघटना आणि आत्मघातकी संघटनांच्या कामकाजात खूप भेद असतो.

रुपाली हे मुळ इंग्लिश पुस्तक वाचलं आहे.

तुमच्या नोंदीमुळे सर्व आठवलं. मीही याचा रेको देते.

तमिळ ईलमची चळवळ का सुरू झाली यामागे बरीच कारणं आहेत पण राजीव हत्येच्या संदर्भात मात्र हे पुस्तक अतिशय कॉंप्रिहेन्सिव्ह आहे.

राजीव गांधी हत्या प्रकरणाबाबतचं मोसादवर ठपका ठेवणारं पुस्तक दहा एक वर्षापूर्वी वाचलेलं. मराठीत अनुवाद होता बहुतेक. ते हे नाही.
त्यातली वर्णने वाचून काही नेत्यांबद्दलचं मत खूप वाईट झाले आहे. नंतर अशा पुस्तकात सगळे खरे नसते हे समजत गेले पण त्या निमित्ताने त्याबद्दलच मत सुधारले नाही. First impression.
पुस्तकाचे नाव लक्षात नाही जर मराठीत असेल तर शोधायला जमेल. डोंगरे नावाचे लेखक असावेत.
किंवा मग आमच्या वाचनालयात अशा विशेष घटनेबद्दलचे वीकली / मंथली प्ररणाचे विशेषांक जपून ठेवलेले असत. त्यात असेल. अवधूत डोंगरे नावचे असावेत.

एक पंतप्रधान, एक तांत्रिक, पक्षांतर्गत कट अशी वेगवेगळी प्रकरणे होती. बऱ्याच थेअऱ्या. ते समजण्याचं वय नसल्याने खर वाटत होत.

Anna's Archive site पाहिली. चार पुस्तकं डाऊनलोड केली.
( अशा ठिकाणांहून पुस्तकं घ्यावीत का हा वेगळा प्रश्न आहे.) fast download साठी मेंबर शिप लागतेय. पण slow download #1 मधून काम होतंय.

या साईटवर FOCUS The ASML way पुस्तक डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
.......
@ उपाशी बोका, धन्यवाद. इंग्रजी पुस्तकं शोधून शोधून आवडीने वाचणारे फारच थोडे वाचक असतात.
...........
(पुस्तक pdf /epub मिळाल्यावर त्यांचे .mobi करण्यासाठी बऱ्याच ( ओनलाइन साईट्स किंवा apps) मार्गाने बदलून घ्यायचे. नंतर ती फाईल open with Kindle करायचे. किंवा फोन/टॅबच्या kindle app मध्ये settings>> open files from this folder>> करायचे. त्या फोल्डरात ठेवलेली पुस्तके आपोआपच app library मध्ये येतात. फायदा हा की dictionary मिळते.)

मी प्रयत्न केला नवा धागा काढायचा तर मलाही निरोप दिसला " cannot access this ..."
मग मी "हितगुज विषयाप्रमाणे" या यादीत "वाचून आनंदें" शोधून "नवीन लेखनाचा धागा" यावर टोकल्यावर एक धागा काढता आला. तो एक चाचणी धागा आहे. संपादक मंडळाने रद्द केला तरी चालेल.

Cakes & Ale - सॉमरसेट मॉम.
जालावर पीडीएफ स्वरूपात वाचली. या कादंबरीसह त्यांच्या एकूण चार पुस्तकांचा एकत्रित परिचय इथे स्वतंत्र लेखात करून दिलेला आहे :
https://www.maayboli.com/node/87466#new

टू किल अ मॉकिंग बर्ड - हार्पर ली

हे खरं तर जुनं, गाजलेलं, पुलित्झर (Pulitzer ) पारितोषिक विजेत पुस्तक- त्या काळातील सामाजिक व्यवस्थेवर, विषमतेवर प्रकाश टाकणारं. बऱ्याच शाळांमध्ये (मिडल / हायस्कुल च्या मुलांना’) असतं.
मी दोन-तीन वर्षांपूर्वी हे पुस्तक वाचायला घेतलं. पहिली तीन चार पानं जेमतेम वाचली. पण काही पकड घेतली नाही मग सोडून दिलं.

गेल्या आठवड्यात एका वर्गात ह्या पुस्तकाची ग्राफिक (सचित्र) प्रत दिसली. सहज चाळलं तर ह्यावेळी त्या पात्रांनी, गोष्टीने उत्सुकता वाढवली. मग वाचनालयातून ते सचित्र ई-पुस्तक घेतले. आता ते थोडं लाडवाचे तयार मिश्रण घरी आणून, वरून नुसतेच तूप घालून घरी लाडू वळल्यासारखे झाले असे तुम्ही म्हणाल पण लाडू खायला तर मिळाले. तसेच ग्राफिक का होईना पण पुस्तक वाचून झाले. कथा, पात्र, गाभा, त्या काळातील अमेरिकेतील दक्षिणेकडील राज्यांच्या समाज जीवनाचा (१९३३-३५) अंदाज आला असे कितीतरी हेतू सफल झाले. असो!

ही गोष्ट अलाबामा तल्या एका गावात घडते’. एका शाळकरी मुलीच्या माध्यमातून ती आपल्यासमोर उलगडत जाते.
मुख्य घर आणि त्यातील तीन महत्वाची पात्रं - स्काऊट ( कथेच्या सुरुवातीस ६ वर्षांची असते), तिचा मोठा भाऊ जेमी, त्यांचे सत्शील व्यवसायाने वकील असलेले वडील ऍफिकस.
त्या गावाने वाळीत टाकलेलं एक घर - त्यातील मुलगा बो, घरात मुलांना मायेन वाढवणारी आफ्रिकन (काळी) स्वयंपाकीण, गावाबाहेरच्या कुसावर राहणारी अशिक्षित, गरीब गोरी कुटुंबे, आणि सगळ्यात बाहेरच्या वेशीवर राहणारी काळ्या लोकांची वस्ती, आणि त्यातून भेटणारी पात्र असा एकंदर आवाका आहे.
ऍफिकस हा एक संवेदनशील आणि तत्वनिष्ठ वकील असतो त्यामुळे तो काळ्या लोकांच्या बाजूने तेव्हढ्याच हिरीरीने लढतो. एका काळ्या मुलाला, गावकुसाबाहेरच्या वस्तीतील एका गोऱ्या मुलीवर बलात्कार प्रकरणी अटक होते. त्याची ती केस चालू असताना, गावातील सगळ्या लोकांनी एकत्र येऊन एकजुटीने त्या काळ्या मुलाला दोषी ठरविणे, आरोप प्रत्यारोपां नंतर जेव्हा तो निर्दोष असल्याची वाचकांना ही खात्री पटते, त्यावेळी सर्व ज्युरींनी मिळून त्याला दोषी ठरवणे - वर्णद्वेषाचे भीषण रूप आपल्यासमोर उलगडते. पुढे त्या केसमधील फिर्यादीचे वडील जेव्हा स्काऊट आणि जेम वर प्राणघातक हल्ला करतात तेव्हा इतकी वर्ष गावाने वाळीत टाकलेला मुलगा, बो च त्याचा मदतीला धावून येतो.

मला आवडलेल्या काही गोष्टी-
ती पात्रं इतकी छान रंगवली आहेत, त्यांच्या छटाही येत जातात. जशी स्काऊट - अवखळ, बिनधास्त, धीट, स्वतंत्र आणि तल्लख बुद्धीची तरीही हळुवार, वडिलांचा विचार करणारी, प्रेमळ मुलगी. तर ऍफिकस - हुशार, तत्वनिष्ठ, सच्चा, न्यायाची कास धरणारा वकील, प्रेमळ आणि जबाबदार बाप.
गावकरी आणि त्यांचे आपसातील संबंध, त्यांची सचोटी, भावंडांमधील माया, नातेवाईकांमधील संबंध, गावाचे एकंदर वर्णन, त्या काळातील शाळा, विद्यार्थी - शिक्षक संबंध, परंपरावादी विचार, स्त्रियांवर असलेली बंधने अशा अनेक पातळ्यांवर त्या काळातील समाजदर्शन घडते.

निमूटपणे सर्व सहन करणारे शोषित आणि शोषण करणारा समाज, या शोषणाला वाचा फोडणारी, विरोध करणारी त्या शोषण करणाऱ्या समाजातील मूठभर, ऍफिकससारखी, मंडळी ही त्या ठराविक काळात फक्त अमेरिकेतच नाही पण जगाच्या इत्तर अनेक भागांमध्ये होती. आणि या मूठभर मंडळींच्या योगदानानेच (पुढे झालेल्या) बदलाचा मुळात पाय रचला.

पुस्तकात एके ठिकाण येते की मॉकिन्ग बर्ड हा अत्यंत निरुपद्रवी पक्षी तर आहेच पण उलट तो आपल्या सुंदर आवाजाने तो इतरांना आनंद देतो, त्याला मारणे म्हणजे एक पाप आहे.
गोष्टीत एका दृष्टीने गावकरी, निरपराधी असणाऱ्या रॉब आणि बो वर अन्याय करतात. त्या दोघांच्याही आयुष्यावर त्यामुळे गंभीर परिणाम होतात त्यांचं आयुष्य उध्वस्थ होतं अगदी त्या निष्पाप पक्षाला मारल्यासारखाच.

स्काऊट आणि जेम हे दोघेही वयाने लहान, निष्पाप तरीही त्यांच्या वडिलांवरच्या रोषापायी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणे हेही त्या निष्पाप पक्षाला मारण्याचा एव्हढेच पापकर्म म्हणता येईल.

विचार करायला लावणारं, मनात रेंगाळणारं, मन अस्वस्थ करणारं असं हे पुस्तक आहे. त्यामुळे आता मूळ पुस्तक वाचायची / ऐकायची ईच्छा आहे. त्या काळातील अजून काही पुस्तके जमली तर वाचायचा प्रयत्न करीन म्हणते.

Pages