शब्दवेध व शब्दरंग (५)

Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे

मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'उधळणे' ला इंग्रजी शब्द काय?
काल मी मुलीला म्हटलं. निसर्ग मुक्तहस्ते सौंदर्याची लयलूट करत असतो, उधळण करत असतो. कोणी बघो न बघो.

तर उधळण च्या अनुवादाला अडखळले.
शॉवर नाही. शॉवर वरुन खाली येतो. आपण हाताली गुलाल कसा 'उधळतो.'

खैरात च्या विरूद्ध जकात.
मशिदीत येणाऱ्यानी ऐपतीप्रमाणे अंथरलेल्या चादरीवर जे काही दिले असते ती जकात.
साठलेली जकात गरजू गरीबांना वाटणे म्हणजे खैरात.

गोलंकारी/गोळंकारी
<<<<< (गोळा+आकार)
१. मोघम; गुळगुळीत
(सबगोलंकारी भूमिका)

२. वाकलेला; पोक आलेला

चांगभलं
("चांगले व्हावे”)
हा शब्द एका वेगळ्या अर्थी रुजवायचे काम रामदास फुटाणे यांनी केली 50 वर्षे केले आहे.

सामूहिक मद्यपानाच्या सुरुवातीस जे चिअर्स म्हटले जाते त्याला मराठीत चांगभलं म्हणावं असा त्यांचा आग्रह आहे !

( त्यांच्या बीबीसी वरील मुलाखतीतून).

चांगभले हा मूळ शब्द कानडी आहे.
कन्नड चांगुभला म्हणजे जोरजोरात घोषणा देणे, जयजयकार.
चांगु म्हणजे शाबास!
ज्याचे खोबरे त्याचे चांगभले! अशी एक म्हण आहे.
चीअर्स साठी मराठी शब्द म्हणून चपखल आहे.

कन्नडात कधी ऐकला नाही, पण तेलुगूत चांगुभळा असा शब्द आहे आणि तसं एक गाणं पण आहे. गुगल केल्यावर त्याचा अर्थ "wow, fantastic" वगैरे दाखवतोय. कदाचित आंध्र कर्नाटक सीमेवरील कन्नडात तुम्ही म्हणताय तसा शब्द आला असण्याची शक्यता आहे.

शक्य आहे हपा.
प्रॉब्लेम असा आहे की हा शब्द खंडोबा ह्या दैवताशी संबंधित आहे. खंडोबाच्या पालखीत/ जत्रेत हा वापरतात. आता तो शब्द चीअर्स साठी म्हणजे जरा ,,,

बातमी = बात + मी
अशी मजेदार शब्दफोड लेखक व गीतकार क्षितिज पटवर्धन यांनी एका कार्यक्रमात सांगितली.

पत्रकारांना शिक्षणादरम्यान हे सांगितले जाते की, बातमी देताना त्यात ‘बात’ जास्तीत जास्त हवी आणि ‘मी’ शक्यतो नको. परंतु सध्याचे वास्तव मात्र उलटे आहे.
बातमीतील बात कमी होत चालली असून ‘मी’पणा वाढत चालला आहे !

जीवन प्रत्याशा

एका policy document मधे (मराठीत भाषांतर केलेले) Life expectancy ला “जीवन प्रत्याशा” असा शब्द वापरलेला दिसला.

चुकीचा वाटला नाही पण स्वतः कधी वापरेन असे नाही वाटत.

दुसरा एखादा अधिक योग्य पर्याय सुचवा.

जीवनमान हा शब्द life quality साठी जास्त वापरलेला बघतो, उदा. अमुक कारणाने लोकांचे जीवनमान उंचावले वगैरे.

अपेक्षित आयुर्मान ? May be.

ग्रेस यांच्या एका कवितेत बेसर हा शब्द वाचला. या शब्दाचा अर्थ काय?

संन्याशाच्या घरात बेसर
सापडली तर काय भले?
टोचून घ्यावी कानामध्ये
आपण अपुली गवतफुले

बेसर = नथ

कानामध्ये गवतफुले टोचून घ्यावी हा संदर्भ नाही लागला.

Happy
मला असे वाटते की संन्याशाच्या घरात सापडलेली बेसर त्यालाच लखलाभ असो.
( म्हणजे अशी सापडणे नैतिक की अनैतिक ह्याचा विचार करूच नये!)
आपण आपल्याला आवडणारी गोष्ट करत रहावी

‘बेसर’ला अनेक सांस्कृतिक संदर्भ आहेत.
आपण तो आता दागिना समजतो, पण मुळात ती स्त्रीवरील मालकीची खूण - गुरांच्या नाकातील वेसणीसारखीच.
संन्याशाकडे ती का आहे? तो सध्या कोणाला चोरून भेटतो आहे का? की त्याने ती कोणाची आठवण म्हणून जपली आहे?
मग त्याच्या सर्वसंगपरित्यागाचं काय? म्हणजे त्याच्या संन्यासात कसर आहे का? असा संन्यास काय कामाचा?! (काय भले?!)

त्यापेक्षा सहज एखाद्या गवतफुलाच्याही सौंदर्याने हरखावं, ते क्षणभंगुर आहे, लवकरच म्लान होऊन जाणार आहे - आणि आपणही - हे समजून उमजून ते कानांत धारण करावं, आणि नंतर तितक्याच सहजतेने ती आसक्ती विरूनविसरूनही जावी हा खरा संन्यास नाही का?

संन्यासी त्याच्या मानवी क्षमतेपलीकडचं, आणि मुख्य म्हणजे इतर कोणाचंतरी तत्त्वज्ञान अंगिकारू पाहातो आहे, आणि विफल होतो आहे.
पण आपलं तत्त्वज्ञान, आपलं अध्यात्म हे आपल्या सदसद्विवेकातून आलेलं, आपलं आपल्यासाठी असावं. सोनाराकडून कान टोचून घ्यायची वेळच न आली तर अधिक उत्तम नाही का?

ज्याला पाहायची दृष्टी आहे, त्याला देव चराचरात दिसतो.
माज्यासाटी पांडुरंगा तुजं गीता भागवत
पावसात समावतं, माटीमंदी उगवतं’

म्हणणाऱ्या बहिणाबाईंसारखं!

आमचा साहिरही असंच काहीसं म्हणाला होता.

ये भोग भी एक तपस्या है, तुम त्याग के मारे क्या जानो
अपमान रचयिता का होगा रचना को अगर ठुकराओगे
संसार से भागे फिरते हो…

स्वाती, कविता उलगडून दाखवल्याबद्दल आभार 🙏

ग्रेस, बहिणाबाई, साहिर… कसली अफाट रेंज आहे !

भोग भी एक तपस्या है हे तर मान्य आहेच, पोहोचले.

सुंदर उलगडून सांगितलेस, स्वाती.
मुख्य म्हणजे गवतफुला च्या नाश्वरतेची संगती अजिबात समजली नव्हती..ते किती छान लिहिलेस !!!
Happy

Pages