कुछ याद इन्हे भी कर लो - गायक-गायिका

Submitted by prashant_the_one on 20 July, 2011 - 22:48

जुन्या हिंदी सिनेमातील गाणी म्हटले की कोणत्याही सर्वसाधारण रसिकाच्या डोळ्यासमोर पटकन ही नावे येतात - लता, आशा, किशोर, रफी, मुकेश. नंतर थोडा ताण दिला की मग मन्ना डे, तलत, सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर अशी नावे आठवतात आणि अजून मागे जाण्यासाठी तुम्ही चांगलेच रसिक लागता उदा. सुरैय्या, नूरजहान, सुरेंद्र, सी.एच. आत्मा, सायगल वगैरे. पण तरीसुद्धा त्या त्या काळातील - म्हणजे ४०-५०-६० अश्या दशकातील - ही सगळी प्रसिद्ध नावे आहेत.

हिंदी सिनेमात या प्रत्येक दशकांमध्ये इतर अनेक गायक-गायिका गाउन गेले की ज्यांची दाखल त्या काही गाण्यांपूर्ती घेतली गेली पण त्यांना पुढे फारसे यश मिळाले नाही किंवा त्यांनी पुढे हिंदी मध्ये गायले नाही. त्याची कारणमीमांसा करणे हा या लेखाचा हेतू नाही. किंबहुना त्यांची आठवण काढणे एवढाच आहे कारण जेव्हा ही गाणी अधून मधून रेडिओ वर लागतात तेव्हा आपल्याला ती नक्कीच आवडतात पण काही गाणी कुणी गायली हे आठवेल याची खात्री नसते. आणि नंतर सवडीने शोधण्याचे राहून पण जाते कित्येकवेळा. अश्या काही माहिती असलेल्या नसलेल्या कलाकारांची ही काही गाणी - आजकालच्या कलाकारांची अशी यादी करायची असेल तर ती फारच मोठी होईल कारण आजकाल गायक-गायिका खंडीभर आहेत पण टिकाऊ पण २-३ लोकांनाच लाभतो. म्हणून लता आशा किशोर रफी यांच्या काळापासून ते मार्केट खुले होण्याच्या कालापर्यन्तच (८९-९०) याचा आढावा घेणे योग्य होईल.

सुधा मल्होत्रा - लता-अशा च्या प्रचंड प्रभावाच्या काळात सुद्धा स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली. मला तिची काही गाणी फारच आवडतात - तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको (दीदी), कश्ती का खामोश सफर है (गर्ल फ्रेंड - किशोर बरोबर), सलामे हसरत कबूल करलो (बाबर), शुक्रतारा मंद वारा आणि विसरशील खास मला ही गाणी सुधा मल्होत्रानीच गायली आहेत. नंतर अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी अनुक्रमे ती गायली.
मुबारक बेगम - एक दोन गाण्यासाठीच लक्षात राहते - मुख्य म्हणजे - कभी तनहाईयो मे यू हमारी याद आयेगी
द्विजेन मुखर्जी - कुणाला ऐ दिल कहां तेरी मंझील हे माया सिनेमातले गाणे आठवते का? कित्येक लोकं ठाम पणे सांगतील की ते हेमंत कुमार चे गाणे आहे म्हणून. पण तो द्विजेन आहे! मला वाटते त्याचे एवढे एकाच गाणे हिंदी मधले.
सुबीर सेन- अजून एक हेमंतदा सारखा आवाज. यांनी मात्र काही गाणी गायली हिंदी मध्ये आणि गाजली पण - मै रंगीला प्यार का राही , दिल मेरा एक आस का पंछी , आणि मंझील वो ही है प्यार की राही बदल गये. पण मला वाटते की क्लोन लोकांच्या नशिबी फारसे यश नसते कधी. नियमाला अपवाद सुमार सानू.
येसुदास- काही लोकांच्या मते येसुदास या यादीत येणे योग्य होणार नाही कारण त्याची गाणी खूप गाजली पण इथे करिअर किती झाले हिंदी मध्ये हा मुद्दा आहे. येसुदास १९७० च्या दशकात गायला आणि काही छान गाणी आपल्याला देऊन गेला. मला वाटते की त्याचे ठीक-ठाक किंवा कंटाळवाणे असे गाणे नसावेच. सगळीच सुंदर गाणी. जब दीप जले आना, आज से पहेले, सुनयना, मना हो तुम बेहद हसीं, तुम इतनी सुंदर हो,काली घोडी द्वार खडी, कहां से आये बदरा, चांद जैसे मुखडे पे बिंदिया सितारा, मधुबन खुशबू देता है अशी छान आणि अवीट गाणी देणारा हा कलाकार.
जसपाल सिंग - रफी किशोर च्या जमान्यात स्वतंत्र आवाजाचा हा एक गायक १-२ सिनेमा पुरता येऊन गेला. गीत गाता चल आणि सावन को अने दो हे त्याचे लक्षात राहणारे (आणि बहुतेक तेवढेच) सिनेमे. पण मला स्वत:ला त्याचा खडा आवाज खूपच आवडतो. मोकळा आणि खडा आवाज असूनही भावपूर्ण होता.
मंगल सिंग - मला फक्त याचे एकच गाणे आठवते - काली तेरी चोटी है परांदा तेरा लाल नी. एकदम रफी सारखा सणसणीत आवाज. काही किरकोळ गाणी नंतर त्याला मिळाली. शब्बीर, मुन्ना सारख्या बिभीषण (बी ग्रेड आणि भीषण दोन्ही एकदम) लोकांपेक्षा कितीतरी चांगला होता.
हेमंती शुक्ला - कहां से आये बदरा गाणारी ही गायिका! छान होता आवाज. काही बंगाली आणि दोन चार हिंदी सिनेमात गायली.
छाया गांगुली आप की याद आती राही रात भर - गमन मधले हे गाणे खतरनाक गाउन राष्ट्रीय पारितोषिक घेऊन गेली.. नंतर एक एका सिनेमात ऐकलं - थोडासा रूमानी हो जाये. पुढे काहीच कळले नाही. बहूतेक ती गजल मध्ये गेली नंतर.
आरती मुखर्जी - दो नैना और एक कहानी (मासूम) साठी राष्ट्रीय पारितोषिक घेणारी गुणी गायिका. तसे ब-या पैकी सिनेमात गायली. अगदी १९५८ पासून हिंदी सिनेमात थोडेफार गायली आहे !! पण हिंदी पेक्षा बंगाली मध्ये जास्त काम केले.
हेमलता - ७० च्या दशकात रवींद्र जैन सारखे स्वतंत्र वृत्तीचे संगीतकार आणि राजश्री पिक्चर्स सारखे नवीन कलाकारांना घेऊन काम करणारी संस्था यामुळे अनेक लोकांना कामाची संधी मिळाली आणि नवीन चेहरे आणि आवाज ऐकू आले. त्यातलाच हा एक. एक मला वाटते की उषा खन्नाचा एक आप तो ऐसे ना थे (तू इस तरह से मेरी जिंदगी मे )चा अपवाद वगळता ती फक्त रवींद्र जैन कडेच गायली असावी. अगदीच साधारण गायिका असूनही तिची गाणी रवींद्र जैन च्या संगीतामुळे खूपच गाजली (जब दीप जले आना, अखियोंके झरोको से, कई दिन से मुझे इत्यादी). तू इस तरह वरून आठवले - मला वाटते की एक गाणे दोघांनी गायल्याची बरीच उदा. आहेत पण हे एकमेव गाणे असावे जे ३ वेग-वेगळ्या लोकांनी एकाच सिनेमात गायले - हेमलता, रफी आणि मनहर उधास आणि प्रत्येकाचे गाणे वेग-वेगळ्या मूड मध्ये नेते एकच चाल असून !!
मनहर उधास - मुकेश नंतर त्याच्या सारखा आवाज म्हणून काही गाणी यांनी गायली. मुकेश असताना सुद्धा अभिमान सारखा त्याला चित्रपट एस.डी. कडे मिळाला होता. पण मुकेश च्या आवाजाची जादू नव्हती. श्रीखंड संपल्यावर उरलेले भांडे विसळून पियुष करतात तसे काहीतर मला वाटते याचे गाणे ऐकल्यावर ..ना धड श्रीखंड ना पेय !! असाच अजून एक क्लोन १-२ गाणी मुकेश नंतर गाउन गेला - कमलेश अवस्थी. मुकेश नंतर त्याच्या मुलांनी नितीन-मुकेशनी प्रयत्न करून बघितला पण एकतर जमाना बदलत होता आणि त्याचे गाणे वडिलांचा वारसा चालवू शकत नव्हते त्यामुळे काही फारसे झाले नाही पुढे.
दिलराज कौर - अशा भोसले क्लोन. अशा भोसले नंतर ओ पी कडे कुणाला घ्यायचे हा प्रश्न होता त्यामुळे त्यांनी दिलराज ला घेऊन काही गाणी केली. आवाज काही वाईट नव्हता. आशा ची आठवण यायची. हिरा मोती नावाचा एक पडेल सिनेमा होता पण त्यातले - होठ है तेरे दो लाल हिरे हे पंजाबी ठसक्याचे गाणे रफी बरोर तिने झकासच गायले आहे.
प्रीती सागर - ज्युली मधले इंग्रजी गाणे माय हार्ट ईज बीटिंग, प्रीतीला प्रसिद्धी देऊन गेले.मस्त गायले आहे. मंथन मधले एकदम वेगळे गुजराती लोकसंगीतावरील म्हारो गाम काठा पाडे पण भन्नाटच होते... पण का कुणास ठाऊक काही फारसे घडले नाही मात्र.
शैलेंद्र सिंग - ऋषी कपूर मुळे शैलेंद्र ला ब-यापैकी संधी मिळाली होती पण तसा साधारणच गायक असल्यामुळे ( आणि बहुतेक नंतर ऋषी बरोबर न जमल्यामुळे) स्वतंत्र गाणी दुस-यांसाठी फारशी मिळाली नाहीत. थोड्या प्रमाणात अभिनय पण केला (अग्रीमेंट नावाचा एक सिनेमा चक्क रेखा बरोबर केला आणि बरे केले काम). सध्या TV सिरिअल्स मध्ये असतो.
चंद्राणी मुखर्जी - चंद्राणीनी ब-यापैकी गाणी हिंदी मध्ये गायली पण नाव कधी झाले नाही. मला आवडणारी काही गाणी म्हणजे सोनिक-ओमीने केलेले "इस इश्क मुहब्बत की कुछ है अजीब रस्मे", आणि अनु मलिक चा पहिला हिट सिनेमा पूनम - मुहब्बत रंग लायेगी जनाब आहिस्ता आहिस्ता. मोहम्मद रफी बरोबरचे हे गाणी.. अक्षरश: खरे वाटत नाही की हे अन्नू मलिक चे गाणे आहे.

यात नसलेले इतर कुणी गायक-गायिका असतील तर जरुर लिहा ..

गुलमोहर: 

मस्त धागा सापडला हा. Happy
प्रतिसादांनी सुद्धा रंगत आणली आहे. पण यात काही यशस्वी गायकांची नावे पण आहेत. कदाचित हा धागा आला तेव्हां तसा समज असेल.
या अशा चर्चा किंवा युट्यूब वरचे व्हिडीओज यांत वेळ मस्त जातो. Proud

अमितकुमार चांगला होता कि. त्याच्या पेक्षा किती तरी डाव्या गायकांना त्याच्या पेक्षा मोठं यश मिळालं.
सोनू, उदीत, अभिजित यांच्या तुलनेत तो फिका आहे हे कबूल पण कुमार सानू आणि विनोद राठोड ( अजून काही गायक आहेत पण आठवत नाहीत नावं) यांच्या पेक्षा अमित कुमारचा आवाज मस्तच आहे.
त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगात पित्याप्रमाणेच लय आहे. आता तो पित्याचे किस्से सांगत असतो हे पाहून वाईट वाटतं.
माझ्या मते किशोर कुमारचं १९८७ साली अकाली निधन आणि १९९४ ला आर डी गेल्याने अमितकुमारला कुणी गॉडफादर उरला नाही.

तो कुमार गौरवचा आवाज बनला होता पण कुमार गौरवच फेल झाला.
असंच आणखी दोन गायकांसोबत झालं.

गीत गाता चल या गाण्याचे गायक जसपालसिंग. या गाण्यामुळे त्यांची इमेज व्हॉईस ऑफ सचिन अशी झाली. पण सचिनचे लीड रोल असलेले सिनेमे पुढे चालले नाहीत. नंतर तो दुय्यम भूमिकेत असायचा. अधून मधून राजश्री च्या सिनेमात यायचा पण त्याने वेगवेगळे गायक ट्राय केले आणि जसपालसिंग वर सचिनचा आवाज असा शिक्का बसल्याने दुसर्या कुणावरही त्याचा आवाज वापरून पाहिला गेला नाही.

शैलेंद्र सिंग वर व्हॉईस ऑफ ऋषी कपूर असा शिक्का बसला. हा ही नेजल होता. फ्रेश आवाज होता.
पण नंतर ऋषी कपूरनेच मो. रफी आणि किशोर कुमार यांचा आवाज वापरणे जास्त सुरक्षित समजले. शैलेंद्र सिंग चा आवाज मस्तंच आहे.
पण बरेचदा त्याच्या मर्यादा पण उघड होतात. कपूर घराण्याला संगीताचा चांग ला कान असल्याने बहुतेक ऋषी कपूरने नंतर फक्त त्याच्या आवाजावर अवलंबून राहण्याचा पर्याय स्विकारला नसेल.

शैलेंद्र सिंग आणि आरडी हे काँबिनेशन सुद्धा भारीच. आर डी गेल्याने अशा गायकांचं करीयर संपलं असावं. त्याच्या पेक्षा उदीत नारायणचा आवाज आणि त्याची गायकी संगीतकारांना आवडली असावी.

@मित - तुम्ही उल्लेख केलेला रेमो फर्नांडीस माझाही आवडता आहे.
त्याची गाणी नेटवर सहज मिळत नाहीत.

त्याचे चार मित्र होते. हे एकत्रच कुठेही परफॉर्म करायचे. त्यांचा बॅण्ड होता. रेमो या मित्रांवर खूपच अवलंबून होता.
एकदा कुठल्या तरी कॉन्सर्ट ला यांना एकत्र जायचे होते. पण रेमोची अडचण निघाली आणि चौघेच पुढे गेले.
दुसर्‍या दिवशी ते चारही जण अपघातात गेल्याची बातमी आली. त्याने रेमोला धक्का बसला.
त्यातून तो कधीच सावरला नाही. त्याने गाणं सोडलं आणि पोर्तुगालला कायमचा स्थायिक झाला.
त्याच्या अचानक गायब होण्याबद्दल हीच माहिती मिळते. खखोदेजा.

माझ्या मते किशोर कुमारचं १९८७ साली अकाली निधन आणि १९९४ ला आर डी गेल्याने अमितकुमारला कुणी गॉडफादर उरला नाही. >> तो त्या आधिच बाहेर फेकला गेला होता. आरडी ने त्याला बालिका बधु मधे ब्रेक दिला (बडे अच्छे लगते है ) . आणि नंतर मग लव्ह स्टोरी मधे देखिल तो हीट झाला. पण नंतर त्याच्या डोक्यात स्वत:ची वेगळी स्टाइल करावी असं खूळ आलं , आणि हादसा टाइप गाणी करायला लागला. तोपर्यंत पंचम देखिल बाहेर फेकला गेला होता , आणि किशोर गेल्यावर एलपी ने shabbir /मुन्ना अशा भयाण गायकांना आपल्या डोक्यावर आपटले होते . ( लक्ष्मीकांत म्हणालाही होता की एलपी जे आवाज घेतील ते हीट होतीलच). असो

मराठीत उत्तमोत्तम भावगीते गाणारे ह्रुदयनाथ, हिंदीत फ़क्त एकच गाणे >> नौशाद च्या आत्मचरीत्रात त्याने हृदयनाथला एक गाणे दिले होते असा उल्लेख आहे. 'अगदी कोवळा, मुलीसारखा आवाज' असे वर्णन केले आहे

अनुपमा देशपांडे यांचा उल्लेख वर आलेला आहे.
सोनी चेनाब के किनारे या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्या पायलट सिंगर म्हणून काम करायच्या.
म्हणजे लीड सिंगर्सला वेळ नसल्याने मुख्य गायकासोबत त्यांचं गाणं व्हायचं. किंवा आधी त्यांच्या आवाजात गाऊन घेतलं जायचं मग लीड सिंगर फायनल रेकॉर्डिंगच्या वेळी ते ऐकून स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करत असत.
काश फिल्मच्या वेळी किशोर कुमार यांनी महेश भट्ट आणि एलपींना आता या गायिकेला पुरस्कार मिळाल्यानंतर सुद्धा ही ट्रीटमेंट मिळतेय हे मला आवडले नाही असे सांगून यांच्या आवाजात गाणं होणार असेल तरच मी गाईन असा पवित्रा घेतल्याने त्यांना महेश भट्टचे काश आणि कब्जा असे दोन सिनेमे करता आले. किशोर कुमार यांच्या या स्पष्ट बोलण्याने आता आपल्याला डमी म्हणून सुद्धा बोलवणार नाहीत अशी त्यांना भीती वाटत होती असे एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते.
माझ्या काका कडे राम तेरी गंगा मैली ची एक कॅसेट होती, त्यात अनुपमा देशपांडे यांच्या आवाजातली दोन गाणी होती. एक अनरिलीज्ड आणि एक नंतर लताजींनी गायलेलं. मराठीत बरीच गाणी गायलीत.

पार्श्वगायकाला वेळ नाही आणि चित्रीकरण करायचंय अशा वेळी इतर गायकांकडून ते गाणं रेकॉर्ड करून घेतलं जायचं. अनुपमा देशपांडे प्रमाणेच कविता कृष्णमूर्तीही अशी गाणी डब करायच्या.
सोनी महिवालमधलं गाणं आशामुळे अनुपमा देशपांडेंच्या आवाजात कायम राहिलं.

सोहनी महिवालच्या या गाण्याबाबत दुसरा किस्सा पण आहे.
आशा भोसले यांना दुसर्‍या स्टुडीओत जायचे असल्याने एक कि दोन गाणी झाल्यानंतर उरलेली गाणी आपण नंतर रेकॉर्ड करू असे म्हणाल्या. पण ती वेळ नंतर आलीच नाही. त्यामुळं हेच गाणं कायम राहीलं.

कविता कृष्णमूर्ती यांनी मात्र अनेकदा टीव्हीवर सांगितलेलं आहे कि लता मंगेशकर यांनी माझंच (कविताजींचं ) गाणं राहू द्या असं सांगितल्याने त्यांना ब्रेक मिळाला. त्यामुळं ते ऑथेंटिक वाटतं.

Pages