भाग ३ - कर्कोटक वंश

Submitted by माझेमन on 4 May, 2025 - 07:51

काश्मीरचा पुढचा उल्लेख येतो तो नीलमत पुराणातल्या जनमेजय आणि वैशंपायन यांच्या संवादात. महाभारताच्या युद्धात
दूरदूरच्या प्रदेशातील राजे आले पण काश्मीरचा राजा आला नाही.

काश्मीरचा राजा गोनंद हा जरासंधाचा नातेवाईक. यादवांबरोबरच्या युद्धात तो बलरामाकडून मारला गेला. पुढे कृष्ण गांधारात एका स्वयंवरासाठी गेला असताना गोनंदाचा पुत्र दामोदराने कृष्णावर हल्ला केला. पण या हल्ल्यात दामोदर मरण पावला.
त्या वेळी दामोदराची पत्नी यशोमती गर्भवती होती. कृष्णाने तिच्या होणाऱ्या बालकाचा राज्याभिषेक करवला व यशोमती
राजसिंहासनावर बसली. पुढे तिला पुत्र झाला आणि तो मोठा होईपर्यंत यशोमती त्याच्या नावाने राज्यकारभार करत होती. तो
पुत्र गोनंद द्वितीय. महाभारत युद्धकाळात गोनंद द्वितीय लहान होता. युद्धाच्या नियमाप्रमाणे राजा लहान असेल तर युद्धात भाग न घेण्याची अनुमती होती.

या गोनंदाच्या वंशातील राजा बालादित्य याला पुत्र नव्हता. त्याची कन्या अनंगलेखा हिच्या पतीकडे राज्य जाणे निश्चित होते.
नावातच अनंग असलेली ही राजकन्या अप्रतिम देखणी होती. आपले राज्य इतर राजवंशाकडे जाऊ नये अशी बालादित्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने आपल्या पदरी असलेल्या दुर्लभवर्धनाशी तिचा विवाह करवला. दुर्लभवर्धन हा राजदरबारी कायस्थ म्हणजे
हिशेबनीस होता. त्याचा पिता कर्कोटक नाग (वंशीय?) होता असा उल्लेख राजतरंगिणीत आढळतो.

इसवी सन ६२५ च्या दरम्यान दुर्लभवर्धन सत्तेवर आला. सत्तेवर आल्यावर त्याने प्रज्ञादित्य ही पदवी घेतली. सामान्य कुळातील असला तरी दुर्लभवर्धन पराक्रमी होता. काश्मीर राज्याच्या बाहेर पडून सीमा विस्तारणारा तो पहिला काश्मिरी राजा. ह्यू एन त्संगने त्याच्या प्रवासवर्णनात लिहिले आहे की दुर्लभवर्धनाच्या काळात ओरसा (हाजरा), काम्बोज प्रदेश - राजधानी कपिशा (काबुल), तक्षशिला, सिंहपुरा, राजौरी, पुंछ ही राज्ये त्याची मांडलिक होती. तत्कालीन चिनी कागदपत्रे सांगतात की चीन ते काबूलपर्यंतच्या रस्त्यांवर दुर्लभवर्धनाचे वर्चस्व होते.

vassals of Durlabhvardhan.png
(दुर्लभवर्धनाचे मांडलिक )

दुर्लभवर्धनानंतर त्याचा पुत्र दुर्लभ गादीवर आला. त्याने प्रतापदित्य उपाधी धारण केली. त्याच्या ५० वर्षाच्या राज्यकाळात
काश्मीरमध्ये शांतता व सुबत्ता नांदत होती.
pratapadity friends.png
(प्रतापदित्याची मित्र राष्ट्रे)

प्रतापदित्याला ३ पुत्र होते. चंद्रापीड. तारापीड आणि मुक्तापीड.

प्रतापदित्याच्या काळात अरबस्थानात इस्लामचा उदय झाला.

भाग १ - एक उपेक्षित सम्राट
भाग २ – नागभूमी
भाग ३ - कर्कोटक वंश
भाग ४ – चंद्रापीड
भाग ५ - सम्राट ललितादित्य मुक्तापीड
भाग ६ - उत्तर विजय व राज्य
भाग ७ – दिग्विजय

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रोचक
हा चंद्रापीड म्हणजेच कादंबरी मधील नायक का?
का तो वेगळा?