भाग ५ - सम्राट ललितादित्य मुक्तापीड

Submitted by माझेमन on 4 May, 2025 - 08:42

मुक्तापीड सत्तेवर आला तोवर हिंदू आणि बौद्ध प्रभाव असला तरी काबूल, झाबूल तुर्कांच्या सत्तेखाली गेले होते. तोखारिस्थान (बल्ख) प्रांतांवर अरबी वर्चस्व निर्माण झाले होते. बिन कासीम मेला असला तरी अरबांनी सिंधमध्ये भक्कम पाय रोवला होता.
काश्मीरच्या आश्रयाला आलेल्या जयसिंहाने परतल्यावर खलिफाचे वर्चस्व स्वीकारून धर्मांतर केले होते व तो सिंधवर राज्य करत होता. चीनपासून काबुलकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गांवर असणारी काश्मिरी सत्ता खिळखिळी झाली होती.

परंतु सिंधमधल्या अरबी सरदार जुनैदचे एवढ्याने समाधान झाले नव्हते. आजूबाजूच्या राज्यांवर हल्ला करणे, इस्लाम लादणे त्याने सुरु केले होते. त्यात ठिणगी पडली ती हुल्लीशाह (पूर्वाश्रमीच्या जयसिंहावर) हल्ला करून त्याला अटक करून ठार
मारण्याची. मुक्तापीडच्या लक्षात अरबांचे आक्रमणकारी धोरण लक्षात आल्यास नवल नाही. सिंधमध्ये अरबांच्या सत्तेचा भाग
झालेल्या हुल्लीशाहच्या हत्येने आजूबाजूच्या प्रदेशात असंतोष पसरला. अशा परिस्थितीत मुक्तापीडाचा खलिफाला खंडणी न
देण्याचा सल्ला सिंध व उत्तरेकडच्या राजांनी उचलून धरला.

जुनैदने आता काश्मीरला शरण येण्याची व खलिफाची काश्मीरवरील सत्ता मान्य करून इस्लाम स्वीकारण्याची आज्ञा दिली. याला उत्तर म्हणून मुक्तापीडाने चंद्रापीडचे धोरण स्वीकारत ससैन्य काश्मीरच्या सीमा ओलांडल्या. वेगवान हालचाली करत पंजाब
ओलांडून त्याने जुनैदचा पराभव केला.

तोपर्यंत पश्चिमेला सर्वत्र विजय मिळवलेल्या अरबांना हा मोठा धक्का होता. सिंध व आसपासच्या प्रदेशातील राजांकडून खंडणी
घेण्यास जुनैदला मनाई करून विजयी मुक्तापीड काश्मिरात परतला.
Lalitadity Sindh attack.png
(ललितादित्याची सिंध स्वारी)

चिडलेल्या जुनैदने कान्ग्र्यावर स्वारी करून ते जिंकले. जैसलमेर, जोधपूर करत तो भडोचपर्यंत पोहोचला. पुढे मात्र पुलकेशी व
गुर्जर प्रतिहाराने त्याला पळवून लावले. जुनैद तेथून उत्तरेकडे गेला त्याने कान्यकुब्ज प्रांतावर हल्ला केला. तिथे राज्य करत
असलेल्या यशोवर्मनने जुनैदचा कडवा प्रतिकार करून त्याला परतवून लावले.

Junaid.png
(जुनैदची हकालपट्टी)

आता जुनैदची सत्ता फक्त देबल बंदराच्या परिसरात उरली होती. त्यातही पूर्व मंडलिक राजांनी खंडणी द्यायचे नाकारल्यामुळे व सततच्या युद्धामुळे देबल बंदरातून होणाऱ्या व्यापाराला झळ लागली होती. याचा मोठा परिणाम या परिसरातून खलिफाला मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर झाला. अखेर खलिफाने जुनैदला हटवून त्याच्या जागी तामिमची नेमणूक केली.

परंतु ललितादित्य व यशोवर्मन हे चाणाक्ष राजे होते. भारताच्या इतिहासात दुर्मिळ असलेली इतर राजांशी सहकार्य करून परकीय आक्रमणांचा प्रतिकार करण्याची गरज त्यांनी ओळखली होती. सिंध, बलोचिस्तान व आसपासच्या राजांच्या सहकार्याने सयुंक्त
मोहीम चालवून त्यांनी तामिमला देवल बंदरावरची सत्ता सोडायला भाग पडले.

ललितादित्याने तामिमचा अफगाणिस्तानपर्यंत पाठलाग करून त्याला पळवून लावले. या पलायनातच तामिम मृत्यू पावला.

त्यानंतर अरबांनी इतका धसका घेतला होता की काही काळ अरब फौजांनी सिंध परिसरात परत येण्याचे साफ नाकारले.

ऋणनिर्देश :
1. कर्कोटक राजांची वंशावळ व ललितादित्याचा दिग्विजय इ. माहिती राजतरंगिणीच्या श्रीमती अरुणा ढेरे व श्री प्रशांत तळणीकर यांनी केलेल्या मराठी अनुवादातून घेतली आहे.
2. अत्यंत महत्वपूर्ण अशी या राजांचे कालखंड, वेगवेगळ्या मोहिमांची विस्तृत माहिती श्री. संजय सोनवणी यांच्या ‘काश्मीरचा सम्राट ललितादित्य’ या पुस्तकातून घेतलेली आहे.

भाग १ - एक उपेक्षित सम्राट
भाग २ – नागभूमी
भाग ३ - कर्कोटक वंश
भाग ४ – चंद्रापीड
भाग ५ - सम्राट ललितादित्य मुक्तापीड
भाग ६ - उत्तर विजय व राज्य
भाग ७ – दिग्विजय

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मेहनतपूर्ण लिखाण.
ही नोंद वाचत असल्याची. लिहीत रहा.
मालिका पूर्ण झाली कि येईन पुन्हा. Happy

हा लेखही आवडला.

इतर राजांशी सहकार्य करून परकीय आक्रमणांचा प्रतिकार करण्याची गरज त्यांनी ओळखली होती >>> हे शहाणपण नंतर हरवून गेलं की काय असं वाटतं.