भाग २ - नागभूमी

Submitted by माझेमन on 4 May, 2025 - 07:42

ही गोष्ट सुरु होते समुद्र मंथनापासून. म्हणजे असं पुराणकथेत लिहिलं आहे. समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या रत्नांपैकी एक रत्न -
अश्व उच्चैःश्रवा. कश्यप ऋषींच्या २ पत्नींमधे त्याच्या शेपटीचा रंग कोणता यावरून वाद झाला. विनता म्हणे त्याची शेपटी पांढरी
आहे तर कद्रू म्हणे ती काळी आहे. बहिणी असल्या म्हणून सवतीमत्सर नसतो असं थोडंच आहे. शेवटी त्यांनी पैज लावली.
जी पैज हरेल तिने दुसरीची दासी व्हायचं.

कद्रूच्या मनात विष होतं. तिने तिच्या पुत्रांना सांगितलं की तुम्ही त्याच्या शेपटीला जाऊन लपेटा. ही असली विचीत्र आज्ञा
मानण्याची नागांची तयारी नव्हती. पण कद्रूने शाप दिला की मातृआज्ञेकडे दूर्लक्ष केल्यामुळे तुमचा यज्ञात संहार होईल. शेवटी
घाबरून काहीशे काळे नाग उच्चैःश्रव्याच्या शेपटीला जाऊन लपेटले. दुसऱ्या दिवशी जंगलात फिरताना कद्रूने लांबून विनताला
उच्चैःश्रवा दाखवला. विनता पैज हरली व तिने कद्रूचं दास्यत्व स्वीकारलं. पुढे गरुडाने स्वर्गातून अमृत आणून विनतेची सुटका
केली खरी पण भाऊबंदकीचं बीज पेरलं गेलं होतं.

मातेची सुटका केल्यावर गरुडाने नागांचा विनाश सुरू केला. या संहाराला कंटाळून नागांनी विष्णुची याचना केली. विष्णूने त्यांना सतीसारात (प्रदेशात?/ तळ्यात?) रहायचा सल्ला दिला व त्या प्रदेशात त्यांना अभय दिले. त्यांना विष्णूकडे घेऊन गेलेल्या
नीलनागाला त्यांचा राजा केले. काश्मीरमधल्या नागवंशीय राजसत्तेची कदाचित ही सुरुवात होती.

दुसरी कहाणी अशी की सतीसार ड्रेन करून उरलेल्या जागेवर, पाणथळ ठिकाणी व झरे आणि नद्यांत वास्तव्य केल्यास नागांना अभय मिळेल असे वचन विष्णूने दिले. आजही काश्मीरमध्ये कित्येक जलस्त्रोतांना नाग म्हणतात.

जम्मूतील बिमलनाग किंवा दुदूजवळ असलेलं बासकुंड उर्फ वासुकीकुंड, युसमर्गमधला नीलनाग तलाव, गुज्जर मेंढपाळांची वस्ती असलेलं गंदरबाल (गांधारपाल?) जिल्ह्यातलं नारनाग (नरनाग), कोंबडीच्या पायांसारखे दिसणारे कुक्कुरनाग (कोकरनागचे) झरे, अमरनाथ यात्रेतला एक महत्वाचा टप्पा शेषनाग सरोवर, झेलम (वितस्ता) नदीचा उगम ज्या नीलकुंडातून होतो ते वेरीनाग
(विरहनाग - नीलनागाचं वास्तव्य इथे होतं म्हणतात) शम्मी कपूर सायराच्या ‘मेरे यार शब्बा खैर’चं शुटींग इथंच झालंय. शिवाय अनंतनाग जिल्हा. त्याला कुणी कितीही इस्लामाबाद म्हणा, पूर्वापार चालत आलेली ओळख पुसणं कठीण असतं. विशेषतः नवी ओळख लादली जाते तेव्हा तर अजूनच.

नुरीचं शुटींग झालेल्या भदेरवाह जिल्ह्याला तर नागभुमी म्हणतात. या नावाची व्युत्पत्ती भद्रकाशी किंवा भद्रावास अशीही करतात. वासुकी नागाची बहिण देवी भद्रकाली इथे येऊन राहिली ही कथा आहे. मेला पट म्हणजे आपली नाग पंचमी - या दिवशी इथल्या वासुकी नागाच्या देवळात उत्सव असतो. या मंदीरात राजा जमुतवाहनाची (जिमुतवाहनाची) मूर्ती आहे. आणि या राजावरून प्रदेशाचे नाव जम्मू पडले अशीही एक कथा आहे.

तर यातलाच एक राजवंश कर्कोटक...

भाग १ - एक उपेक्षित सम्राट
भाग २ – नागभूमी
भाग ३ - कर्कोटक वंश
भाग ४ – चंद्रापीड
भाग ५ - सम्राट ललितादित्य मुक्तापीड
भाग ६ - उत्तर विजय व राज्य
भाग ७ – दिग्विजय

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान माहिती.

शेषनाग सरोवर पाहिलंय. त्यामागची कथा आत्ता समजली.

तलाव व स्थानांना नागांची नावे पाहून खरोखरच त्याच्या नक्की काय कथा असाव्यात असे वाटून गेले.
अनंत हे शेषाचेही नाव आहे.