भाग ७ - दिग्विजय

Submitted by माझेमन on 4 May, 2025 - 10:02

कान्यकुब्ज, मगध, गौड व वंग देशावर राज्य करणाऱ्या यशोवर्माच्या राज्याची पश्चिम उत्तर सीमा जालंधरजवळ होती. आणि त्याचा तळ हिस्सारजवळ स्थानेश्वर येथे पडला होता. स्थानेश्वर पूर्वापार काश्मीरच्या अधिपत्याखाली होते. कदाचित या सीमांवरून वाद होऊन ललितादित्य व यशोवर्मनमध्ये वादाची ठिणगी पडली व दिग्विजयासाठी ललितादित्याने आता यशोवर्मनच्या राज्याकडे नजर वळविली.

यशोवर्मनच्या पराभवाने त्याची अंकित सर्व राज्ये ललितादित्याच्या प्रभावाखाली आली. वंग देशानंतर ललितादित्याने आपला मोर्चा कलिंग देशाकडे वळवला व तो ही अंकित करून घेतला. तत्कालीन भारतातले हे सर्वात मोठे साम्राज्य बनले.

यशोवर्मनचा पाडाव करून परत जाताना त्याने त्याच्या दरबारातील अनेक विद्वानांना सोबत घेतले. त्यातल्याच अंतर्वेदीतून
आलेल्या एका विद्वानांच्या कुळात पुढे अभिनवगुप्ताचा जन्म झाला.

कल्हणाने पुढे म्हटले आहे की ललितादित्याने रट्ट राणीच्या सांगण्यावरून कर्नाट प्रदेश मलय प्रदेश व कावेरी तट ओलांडून
तामिळनाडू व समुद्र ओलांडून श्रीलंकेत प्रवेश केला व त्यानंतर ललितादित्याने आपला मोर्चा सप्तकोकणाकडे वळवला. कोकण विजयानंतर तो उज्जयिनीकडे गेला. परंतु याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही.

उज्जयिनीनंतर तो लाट देशाकडे वळला. लाट देश म्हणजे गुजरातमधील मही नदी ते उत्तर महाराष्ट्रातील पूर्णा नदी व पश्चिमेला
दमणपर्यंत असलेला असलेला प्रदेश. या प्रदेशातील कय्यराजा पूर्वी राष्ट्रकुटांचा मांडलिक होता व त्याने काश्मीरमध्ये कय्यविहार बनवला असे उल्लेख सापडतात.
bharat vijay.png
(ललितादित्याचे भारतातील मांडलिक)

यानंतर त्याने मृगजळासारखे सागराचा आभास निर्माण करणाऱ्या प्रदेशात प्रवेश केला. परंतु इथे विजयाचा उल्लेख नाही. कदाचित त्याचा परतीचा मार्ग कच्छ किंवा राजपुतान्यातून गेला असावा.

एवढ्या दीर्घकाळ चालणाऱ्या मोहिमेत काश्मीरमध्ये राज्यकारभारास अडचण येऊ नये म्हणून त्याने उत्तम व्यवस्था ठेवली होती.

बल्ख प्रांतातल्या लोकांना काश्गरचा उपद्रव होऊ लागला तेव्हा त्यांनी चीनच्या दरबारात दूत पाठवून मदत मागितली कारण
काशगर चीनचे मांडलिक होते. त्या दूताने ललितादित्याच्या घोडदळाच्या तारीफ करत चीनने काश्मीरची मदत मागावी हेही
सुचवले. त्याप्रमाणे चीनने बल्ख प्रांताला मदत करून काश्गरमधल्या राजाचा बीमोड केला. हे ललितादित्याच्या मदतीशिवाय झाले असण्याची शक्यता कमी आहे. कारण काश्मीरच्या मदतीशिवाय चीनला गिलगीटमधल्या तिबेटचा बंदोबस्त करता येत नव्हता.

यानंतर काही काळ त्याने फारशा मोहीम काढल्या नाहीत व राज्यकारभाराकडे लक्ष दिले.

मात्र आठव्या शतकाच्या मध्यास उम्मायद खलिफात जाऊन अब्बासिद खलिफात सत्तेवर आली होती. तिबेटने अब्बासिद
खलिफातीशी हातमिळवणी करून किर्गिझीस्तानमधल्या चीनच्या सत्तेला आव्हान दिले. किर्गिझीस्तानमधल्या तलस नदीजवळ अरब व चीनचे युद्ध झाले.

चीनच्या प्रभावाखालील काही तुर्की टोळ्या फितूर झाल्याने चीनचा पराभव झाला. त्या भागातले चीनचे मांडलिक राजे स्वतंत्र झाले किंवा अरबांच्या प्रभावाखाली गेले. इथूनच या प्रदेशातील तुर्कांचे (हिंदू व बौद्ध शाह्यांचे) इस्लामीकरण सुरु झाले. त्यातच
चीनमधील अंतर्गत बंडाळीमुळे चीनने सगळे लक्ष राजधानीकडे वळवले. तारीम खोऱ्यावरचे चीनचे नियंत्रण संपले.

या दरम्यान तिबेटच्या राजाचे निधन होऊन त्याचा पुत्र सत्तेवर आला. त्याने शांततेचे धोरण ठेवल्याने गिलगिट भागातला तिबेटचा उपद्रव थांबला.

ललितादित्यासारख्या विजिगिषु राजाने ही संधी साधली नसेल तर नवल. तो आता उत्तरापथ दिग्विजयाला निघाला.

गिलगीटमधून पामीरचे पठार उतरून तो तिबेटमध्ये पोहोचला. त्याने तारीम नदीच्या खोऱ्यातील निया व केरिया राज्ये ताब्यात
घेतली. रेशीम मार्गावरची ही अत्यंत महत्वाची ठाणी होती.
Srinagar Gilgit Pamir.png
(श्रीनगर --> गिलगिट --> पामीर पठार --> काशगर --> तारीम खोरे)

त्यानंतर वाट चुकल्यामुळे तो तक्लामाकनच्या वाळवंटात प्रवेश करता झाला. तिथे पाण्याविना सैन्याचे हाल झाले. पण त्यांनी हाल अपेष्टांत का होईना वाळवंट पार केले.

खूप दिवस राजा परतला नाही तेव्हा काश्मीरच्या मंत्रिमंडळाने दूत पाठवला. त्या दूताला भेटल्यावर ललितादित्याने राज्यकारभार सुरळीत चालावा यासाठी तसेच उत्तराधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल काही सूचना केल्या. राज्य सुरळीत चालू असताना स्वतः तिथे
राहायची गरज त्याला वाटली नव्हती तर अधिकाधिक प्रदेश काबीज करायची त्याची इच्छा होती.

tarim basin to xinjiyang.png
( तारीम खोरे --> शिंजियांग प्रांत)

काही इतिहासकारांच्या मते त्याने शिंजियांग प्रांतातल्या कुछा व तुर्फानपर्यंत मजल मारली. तर काही इतिहासकार याच्याशी सहमत नाहीत. परंतु आत्तापर्यंतच्या कुठल्याही सम्राटाने जिंकला नव्हता एवढा प्रदेश ललितादित्याच्या ताब्यात आला होता.

यानंतर कल्हणाच्या मते आर्याजीक प्रदेशातील तुषार वर्षावात त्याचा मृत्यू झाला तर इतरांच्या मते त्याला व त्याच्या सैन्याला भूमीने पोटात गडप केले. काही जण असे म्हणतात की एवढा प्रदेश जिंकल्यावर पुढे एखादे संकट येईल या कल्पनेने त्याने स्वतःला अग्नीत झोकून दिले.

एक मात्र खरे की त्याच्या कारकिर्दीएवढ्याच अकल्पित अखेरीला तो सामोरा गेला.

ऋणनिर्देश :
1. कर्कोटक राजांची वंशावळ व ललितादित्याचा दिग्विजय इ. माहिती राजतरंगिणीच्या श्रीमती अरुणा ढेरे व श्री प्रशांत तळणीकर यांनी केलेल्या मराठी अनुवादातून घेतली आहे.
2. अत्यंत महत्वपूर्ण अशी या राजांचे कालखंड, वेगवेगळ्या मोहिमांची विस्तृत माहिती श्री. संजय सोनवणी यांच्या ‘काश्मीरचा सम्राट ललितादित्य’ या पुस्तकातून घेतलेली आहे.

अनुक्रमणिका:

भाग १ - एक उपेक्षित सम्राट
भाग २ – नागभूमी
भाग ३ - कर्कोटक वंश
भाग ४ – चंद्रापीड
भाग ५ - सम्राट ललितादित्य मुक्तापीड
भाग ६ - उत्तर विजय व राज्य
भाग ७ – दिग्विजय

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

समाधानी व धनि आभार.

@धनि >>> ललितादित्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. राजतरंगिणीमधल्या सगळ्या माहितीबद्दल ऐतिहासिक पुरावे नाहीत. अजून माहिती लिहायची झाल्यास श्री. संजय सोनवणी यांच्या पुस्तकातील सगळी माहिती घ्यावी लागेल. त्यांनी खूप पुरावे शोधून त्यांचे विश्लेषण करून मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे अधिक माहितीसाठी मी त्यांचे पुस्तक 'काश्मीरचा सम्राट ललितादित्य' रेकमेंड करेन.