पारंपारिक बेसन लाडू - besan ladoo

Submitted by मेधा on 2 November, 2010 - 11:21
besan ladoo
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

बेसन, साखर, तूप, दूध, वेलची पूड , केशर, सुका मेवा

क्रमवार पाककृती: 

ही स्वातीने पार्ल्यात टाकलेली कृती

शोनूसाठी बेसनाच्या लाडवांची माझी कृती :

हमखास बेसन लाडू :

प्रमाण - बेसनाच्या (वजनी) अर्ध्या पटीत तूप आणि पाऊण पटीत साखर लागते सहसा.

बेसन थोड्या तुपावर भाजायला घ्यायचं. सगळं तूप एकदम घालायचं नाही, नाहीतर मिश्रण फसफसतं. थोडं थोडं तूप घालत बेसन पूर्ण भिजेल इतकं व्हायला हवं. मग मध्यम आचेवर कंटाळा येईपर्यंत किंवा हात भरून येईपर्यंत (यातलं जे शेवटी होईल ते.) बेसन भाजायचं. रंग अगदी चांगला पालटला पाहिजे आणि खमंग वास सुटला पाहिजे. बेसन जसं भाजू तसं परतायला हाताला हलकं लागायला लागतं.

हे होत असतांनाच एकीकडे थोडंसं दूध तापवायचं. उदा. एक किलो बेसनाला पाऊण कप दूध. थोडं जास्त झालं तरी चालेल, कमी नको.मी या दुधातच केशर घालते म्हणजे छान मिसळतं आणि लाडवांना मस्त रंग येतो. दूध घालतांना जरा जपून कारण बेसन एकदम आनंदाने फुलून येतं. आणि एव्हाना परतायला हलकं लागत असतं ते पुन्हा जड लागायला लागल्यामुळे आपण वैतागतो. पण आता दिल्ली जवळ आलेली असते. (हत्ती भाजून झालेला असतो, शेपूट राहिलेलं असतं - असं म्हणणार होते पण ते कसंतरीच वाटलं लिहितांना!)

मग अजून एक ४-५ मिनिटं परतून गॅस बंद करून टाकायचा. वेलचीची पूड बेसनात नीट मिसळून घ्यायची. आता जितकं बेसन घेतलं होतं त्याच्या पाऊण पट साखर, आणि आवडीनुसार सुकामेवा - बेदाणे, काजू, बदाम वगैरे जे काही घालायचे असतील ते - ही जमवाजमव करायची. बेसन निवलं की त्यात साखर मिसळायची आणि दुखर्‍या हाताचा राग काढल्यासारखं ते मिश्रण मळून घ्यायचं. त्याने हात आणखी भरून येतो, पण निदान राग निघतो. आता मिश्रणातच सुकामेवा मिसळता येतो. पण मग ’मुखी कुणाच्या पडतो काजू.. कुणामुखी बादाम..’ असं होऊ शकतं. हा अन्याय टाळण्यासाठी सुक्या मेव्याच्या वाट्या हाताशी ठेवून प्रत्येक लाडू वळताना त्यात तो सारख्या प्रमाणात घालणं हा एक उपाय मी करते.

लाडू वळून ताटात किंवा परातीत ठेवतांना अगदी चिकटून ठेवायचे नाहीत - जरा सुटे सुटे ठेवायचे. नाहीतर नंतर दुनियाकी कोईभी ताकत उन्हें फोडेबगैरे एक दूसरे से अलग नहीं कर सकती.

कधीकधी परिस्थितीच्या उष्ण झळांनी वळलेले लाडू बसल्याजागी बसतात! असे बसलेले लाडू निरखून पाहिले तर पारंपारिक भारतीय नवर्‍यांप्रमाणे दिसतात असं माझं एक आपलं मत आहे. अशा वेळी दोन पर्याय असतात. टूथपिक्‌ने त्यांच्यावर सोंडबिंड कोरून त्यांची त्या सपाट बुडानिशी देव्हार्‍यात प्रतिष्ठापना करून इहपरलोकी कल्याण करून घेता येऊ शकतं (म्हणजे दुसर्‍या शब्दांत वाढीव काम टाळता येऊ शकतं) किंवा हौस असेल तर ते जन्मजात वळण मोडून डब्यात भरण्याआधी त्यांना पुन्हा आपल्या मनासारखा गोल आकार देता येऊ शकतो. (हा प्रयोग पा.भा. नवर्‍यांच्या बाबतीत करण्यात आलेला नाही. इच्छा जरूर आहे. असो.)

काही तळटिपा :
काहींच्यात लाडवांसाठी सरसरीत बेसन वापरतात. इथेही इन्ग्रोमधे 'लाडू बेसन' म्हणून निराळं मिळतं. पण इतर काहींना बारीक दळलेलं बेसनच आवडतं. ('काही' ही गाळलेली जागा समजून आवडीनुसार भरावी.) बेसन सरसरीत वापरलं तर पिठीसाखर वापरावी. फाइन बेसन वापरलं तर इथली साखर (जी पुळणच असते) तशीच घालते मी, म्हणजे लाडू जरा रवाळ लागतो खातांना. रवाळ लाडू आवडत असेल तर यातच थोडा रवाही तुपावर भाजून मिसळता येतो.

तर अशा रीतीने ही बेसनाच्या लाडवांची पाचा उत्तरांची कहाणी साठा उत्तरांत सुफळ संपूर्ण!

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यांवर अवलंबून
अधिक टिपा: 

ही स्वातीची कृती , तिने पार्ल्यात टाकलेली. वाहून जाऊ नये म्हणून अन या कृतीने लाडू केल्यावर फोटो काढून इथे लावता येतील म्हणून हा प्रपंच
besan ladoo recipe in marathi

माहितीचा स्रोत: 
लाडवाक्का :-)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी यंदा पाकातले रव्याबेसनाचे केलेत लाडू. जमलेत, पण हे बहुधा बिगिनर्स लक!
अजून चार वेळा करून त्यातल्या निदान दोन वेळा बिघडवून सुधारल्याशिवाय हातखंडा बसायचा नाही. Proud Happy

818ca527-7599-4ad6-9a4b-bd8635b3669e.jpeg

छान दिसतायत लाडू स्वाती. नारळ घोवायचा कंटाळा आला की मी करत असे हे लाडू बरेच वेळा. प्लस रवा नारळ लाडू पेक्षा ह्याचा पाक थोडा इकडे तिकडे झाला तरी चालतो, लाडू बिघडत नाहीत. असो.

हे माझे ह्या वर्षीचे बेसन लाडू ,

20231112_082027.jpg

काल लाडू करायच्या आधी ही रेसिपी बघितली आणि तशीच वापरली.
छान आहे . लाडू छान झालेत ( खणाऱ्यांच्या मते). रेसिपी साठी धन्यवाद!

ही कृती वाचून बेला करायची इच्छा झाली तर ‘बेसन लाडू
टाळू/ळ्याला चिकटतात म्हणून मला आवडत नाहीत’ असा बाणेदारपणा दाखवून नवर्याने बेसन आणलेच नाही. मग चिवडा करणार नाही अशी धमकी देऊन त्याला लाडू बेसन आणायला पाठवले. तर म्हणे ‘हे काय असतं?’ मग बारीक बेसन, जाड बेसन व लाडू बेसन यावर एक मिनी परीसंवाद होऊन शेवटी नाहीच समजलं तर वाण्याला ‘लड्डू के लिए बेसन दे दो’ असं सांग यावर मांडवली झाली.
बेसन येईस्तोवर हात भरून येईपर्यंत बेसन भाजायचे हे आठवून ‘सिदन्ति मम गात्राणि…’ अशी अवस्था आली. तेवढ्यात मदतनीस अस्मिताने ‘ताई, मी आधी जिथे काम करायचे त्या ताई लाडूची ऑर्डर घ्यायच्या. त्या काय गॅसवर भाजायच्या नाहीत. मायक्रोवेव्हमधे भाजायच्या’ हे सांगून धीर वाढवला.
बेसन घरी येऊन पडलं पण दोन दिवस काही ना काही निमित्ताने लाडू राहूनच जात होते. शेवटी काल तड लावून लाडू करायचेच असं ठरवलं. अर्धा किलो बेसन दोन भागात विभागून पहिला भाग मावेत १ मिनीट भाजून चेक/गार करणे असं ६ वेळा केल्यावर बेसन भाजल्याचा वास यायला लागला. दुसरा भाग जरा कॉन्फिडन्सने २ मिनीटे असा २ वेळा भाजल्यावर खमंग वास आणि रंग आला. पहिल्या स्लॉटचा रंग जरा फिकट वाटल्याने परत एक मिनीटे भाजून दोन्ही स्लॉट मिक्स केले. त्यात बेसनाच्या १/४ तूप घालून परत २ मिनीटे भाजले. छान रंग आला व भगरा तयार झाला. बेसनाची मुठ वळली जात होती. आधी चहाचा एक कप व नंतर अर्धा कप असे दूध टाकले. व २ मिनीट मावे केले. त्यामुळे बेसनात गुठळ्या झाल्या. पण फोडता येत होत्या.
हे मिश्रण कोमट झाल्यावर त्यात बेसनाच्या साधारण (मोजून नाही) अर्धा पट पिठी साखर घातली. ती मिसळून उरलेले १/४ तूप गरम करून घातले. व लाडू वळले.
थोडे अगोड आहेत पण नवर्याला लाडू भरवल्यावर (प्रेमाने नाही, बेला बघून नाकारू नये म्हणून) त्याने तो खाल्ला व चांगला झालाय ही पावती दिली.
तर बेसन लाडवांना घाबरणार्या ताया-बायांनो, दादांनो स्वाती विरचीत या कृतीचा लाभ घ्या. बिनधास्त बेला बनवा व खाऊ घाला. ती दूध घालायची टीप बेसन लाडू बनवणार्यांसाठी व खाणार्यांसाठी वरदान आहे.
॥इति बेला पुराण संपन्नम्॥

अरे, नुसते ऐकून सरळ मावेवर करायला घेणे हे धाडसाचे काम आहे आणि ते तडीस नेणे कौशल्याचे, जिकरीचे.
वाचत असताना दुध घालून मावे केल्यावर गुठळ्या झाला हे वाचे पर्यंत मी मनात "हे तर आपल्याला पण जमेल" असे म्हणत होतो पण नंतर जरा डगमगलो.
कधी कुठलेच लाडु केले नसल्याने (वळले मात्र आहेत) आधी दुसरे जरा सोपे करून पहावे मग हे मावेतले बेला असा विचार करतोय. नाहीतर उगाच बेला के fool मध्ये गणती व्हायची.

वा वा! लाडू जमल्याच्या पावत्या बघून छान वाटलं. Happy
ही पूर्णपणे पारंपरिक कृती आहे, लिखाणातल्या वात्रटपणापलीकडे माझं काही श्रेय नाही यात. Happy

मायक्रोवेव्हमध्ये करायचा माझा धीर झालेला नाही अजून, बेसन एकसारखं भाजलं जाईल की नाही अशी धाकधूक वाटते. पण माझेमनची पोस्ट वाचल्यावर करून बघेन म्हणते.

एकदा बेलाचे मिश्रण खूप कडक झालेले त्यामुळे मी नादच सोडला.
यावेळेस बेडेकर बेसन लाडू मिक्स आणले. त्यात तूप गरम करून मिसळले आणि १५ मिनिटात लाडू तयार!
पारंपारिक पाककृतीच्या धाग्यावर इंस्टंट पाकृ लिहून मी पळते आता Proud

मावसबहिणीचे ऐकून मीही मावेत बेसन भाजले होते.फक्त माझा मावे ओट्यावर नसून एका वेगळ्या कप्प्यात असल्याने मला दर 1- 2 मिनिटांनी उघडा,भांडे ओट्यावर ठेऊन ढवळा या प्रकाराचा कंटाळा आला होता.पण करावे लागत होते (कारण यापूर्वी 2 वाटीभर बेसन का होईना घरच्या तूपासकट करपले होते.) नेहमीपेक्षा कमी तूपात बेला चांगले झाले.पण मनापासून मला नाही आवडले.कारण बेलाचा एक सुगंध दरवळतो घरात तो मिसिंग होता. खातानाही ते जाणवले.कदाचित मी जास्त चूझी असेन.

माझेमन, दीड कप दूध जास्त होता नाही का? पुढल्यावर्षी नक्की मावेमधूंच बेसन भाजणार.

माझेमन, दीड कप दूध जास्त होता नाही का >>> प्रॉपर मेजरींग कप नाही. चहाचा कप होता साधारण १००-१२० मिली असावे.

मलाही पहिला स्लॉट सतत चेक करावा लागला कारण पहिल्यांदाच भाजत होते. मी बेसन कोरडे भाजले तेव्हाही भाजल्याचा वास आलाच. पण तूप टाकल्यावर आपल्याला हवा तसा खमंग वास आला. रंग मात्र ब्राउनिश नाही झाला. डार्क यलोच राहिला.

इतरांसाठी धागा वर काढतेय.
याही वर्षी हीच रेसिपी + मावे वापरून लाडू केले. यावेळी सर्वच तूप बेसन भाजताना वापरल्याने थोडे ड्राय वाटताहेत पण लाडू वळायला काहीच अडचण आली नाही.
रेसिपी झिंदाबाद…

एक्स्पर्ट्स येईपर्यंत नाइट वॉचमन म्हणून उत्तर देतो.
थोडे बेसन कोरडे भाजून ते + पिठीसाखर मिसळा.
मिल्क पावडर मिसळा.
काजू बदाम भाजून त्याची फाइन पावडर करून ती मिसळा.

मीही मायक्रोवेव्हमध्ये बेसन भाजून लाडू केलेत, पण 'तो' रंग येत नाही.
इथली स्वातींची कृती तंतोतंत पाळून एकदाच लाडू केले. ते परफेक्ट होते.

ही कृती वाचणं हा खमंग अनुभव दर वर्षी घ्यायला आवडतो.

ladu.jpg

ही कृती वाचणं हा खमंग अनुभव दर वर्षी घ्यायला आवडतो. >> अगदी Happy

Pages