पारंपारिक बेसन लाडू - besan ladoo

Submitted by मेधा on 2 November, 2010 - 11:21
besan ladoo
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

बेसन, साखर, तूप, दूध, वेलची पूड , केशर, सुका मेवा

क्रमवार पाककृती: 

ही स्वातीने पार्ल्यात टाकलेली कृती

शोनूसाठी बेसनाच्या लाडवांची माझी कृती :

हमखास बेसन लाडू :

प्रमाण - बेसनाच्या (वजनी) अर्ध्या पटीत तूप आणि पाऊण पटीत साखर लागते सहसा.

बेसन थोड्या तुपावर भाजायला घ्यायचं. सगळं तूप एकदम घालायचं नाही, नाहीतर मिश्रण फसफसतं. थोडं थोडं तूप घालत बेसन पूर्ण भिजेल इतकं व्हायला हवं. मग मध्यम आचेवर कंटाळा येईपर्यंत किंवा हात भरून येईपर्यंत (यातलं जे शेवटी होईल ते.) बेसन भाजायचं. रंग अगदी चांगला पालटला पाहिजे आणि खमंग वास सुटला पाहिजे. बेसन जसं भाजू तसं परतायला हाताला हलकं लागायला लागतं.

हे होत असतांनाच एकीकडे थोडंसं दूध तापवायचं. उदा. एक किलो बेसनाला पाऊण कप दूध. थोडं जास्त झालं तरी चालेल, कमी नको.मी या दुधातच केशर घालते म्हणजे छान मिसळतं आणि लाडवांना मस्त रंग येतो. दूध घालतांना जरा जपून कारण बेसन एकदम आनंदाने फुलून येतं. आणि एव्हाना परतायला हलकं लागत असतं ते पुन्हा जड लागायला लागल्यामुळे आपण वैतागतो. पण आता दिल्ली जवळ आलेली असते. (हत्ती भाजून झालेला असतो, शेपूट राहिलेलं असतं - असं म्हणणार होते पण ते कसंतरीच वाटलं लिहितांना!)

मग अजून एक ४-५ मिनिटं परतून गॅस बंद करून टाकायचा. वेलचीची पूड बेसनात नीट मिसळून घ्यायची. आता जितकं बेसन घेतलं होतं त्याच्या पाऊण पट साखर, आणि आवडीनुसार सुकामेवा - बेदाणे, काजू, बदाम वगैरे जे काही घालायचे असतील ते - ही जमवाजमव करायची. बेसन निवलं की त्यात साखर मिसळायची आणि दुखर्‍या हाताचा राग काढल्यासारखं ते मिश्रण मळून घ्यायचं. त्याने हात आणखी भरून येतो, पण निदान राग निघतो. आता मिश्रणातच सुकामेवा मिसळता येतो. पण मग ’मुखी कुणाच्या पडतो काजू.. कुणामुखी बादाम..’ असं होऊ शकतं. हा अन्याय टाळण्यासाठी सुक्या मेव्याच्या वाट्या हाताशी ठेवून प्रत्येक लाडू वळताना त्यात तो सारख्या प्रमाणात घालणं हा एक उपाय मी करते.

लाडू वळून ताटात किंवा परातीत ठेवतांना अगदी चिकटून ठेवायचे नाहीत - जरा सुटे सुटे ठेवायचे. नाहीतर नंतर दुनियाकी कोईभी ताकत उन्हें फोडेबगैरे एक दूसरे से अलग नहीं कर सकती.

कधीकधी परिस्थितीच्या उष्ण झळांनी वळलेले लाडू बसल्याजागी बसतात! असे बसलेले लाडू निरखून पाहिले तर पारंपारिक भारतीय नवर्‍यांप्रमाणे दिसतात असं माझं एक आपलं मत आहे. अशा वेळी दोन पर्याय असतात. टूथपिक्‌ने त्यांच्यावर सोंडबिंड कोरून त्यांची त्या सपाट बुडानिशी देव्हार्‍यात प्रतिष्ठापना करून इहपरलोकी कल्याण करून घेता येऊ शकतं (म्हणजे दुसर्‍या शब्दांत वाढीव काम टाळता येऊ शकतं) किंवा हौस असेल तर ते जन्मजात वळण मोडून डब्यात भरण्याआधी त्यांना पुन्हा आपल्या मनासारखा गोल आकार देता येऊ शकतो. (हा प्रयोग पा.भा. नवर्‍यांच्या बाबतीत करण्यात आलेला नाही. इच्छा जरूर आहे. असो.)

काही तळटिपा :
काहींच्यात लाडवांसाठी सरसरीत बेसन वापरतात. इथेही इन्ग्रोमधे 'लाडू बेसन' म्हणून निराळं मिळतं. पण इतर काहींना बारीक दळलेलं बेसनच आवडतं. ('काही' ही गाळलेली जागा समजून आवडीनुसार भरावी.) बेसन सरसरीत वापरलं तर पिठीसाखर वापरावी. फाइन बेसन वापरलं तर इथली साखर (जी पुळणच असते) तशीच घालते मी, म्हणजे लाडू जरा रवाळ लागतो खातांना. रवाळ लाडू आवडत असेल तर यातच थोडा रवाही तुपावर भाजून मिसळता येतो.

तर अशा रीतीने ही बेसनाच्या लाडवांची पाचा उत्तरांची कहाणी साठा उत्तरांत सुफळ संपूर्ण!

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यांवर अवलंबून
अधिक टिपा: 

ही स्वातीची कृती , तिने पार्ल्यात टाकलेली. वाहून जाऊ नये म्हणून अन या कृतीने लाडू केल्यावर फोटो काढून इथे लावता येतील म्हणून हा प्रपंच
besan ladoo recipe in marathi

माहितीचा स्रोत: 
लाडवाक्का :-)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टाळ्या ला असं पाहीजे. Happy
माझं कन्फ्य्जन व्हायचं म्हणुन मी म्हण लक्षात ठेवतो उचलली जीभ लावली टाळ्याला Lol

>>>आम्हीही टाळू च म्हणतो. डोक्यावर असतो तो ही आणि तोंडात असतो तो ही. चुकीचं आहे का ते?
हो
जर सेम म्हणत असशील तर डीफरंशीएट कसे करतेस? नॉर्थ साउथ ? Proud

>> जर सेम म्हणत असशील तर डीफरंशीएट कसे करतेस? नॉर्थ साउथ ?

संदर्भाने Happy

त्या "उचलली जीभ लावली 'टाळ्या'ला" मध्ये विभक्ती प्रत्यय लागल्यामुळे टाळू चं टाळ्याला होतं असा समज होता माझा.

(बहुतेक ) रुचिरा मधे दुधाऐवजी फ्रेश क्रीम लिहिलं आहे. नक्की माहित नाही, कुठे वाचलं होतं, पण आम्ही गेले कित्येक वर्ष अर्धा वाटी साया घालतो. खराब वगैरे काही होत नाहीत ( म्हणजे तेवढे उरतच नाहीत), शिवाय एक मस्त खमंग वेगळीच टेस्ट असते.

हाताचा गुण (आणि लायटींग चा गुण) असावा. मला ती ब्राऊनीश शेड यायला हवी असते पण कधीच येत नाही.

कमी आचेवर भाजणे आणि/किंवा केशर हे ही कारण असू शकतं?

Hi girls, totally nailed this in first attempt. I didn't have milk.so sprinkled bit of water. Do I have to put the tin in fridge? Taking it to pune on Monday. Thanks a lot for the recipe. It is similar to nishamadhulika video on YouTube. Remembered my aaibaba and hubby. They would have loved the laadu.

Yes perfect uniform brown shade. Like cardboard colour somewhat. And perfect texture.

या रेसिपीने बेसन लाडू केले काल. अप्रतिम झाले आहेत. लेकाला खूप आवडले. इतक्या परफेक्ट रेसिपीसाठी खूप धन्यवाद Happy

F8210EB8-7059-4FFE-A71B-0B004A5C50A7.jpeg

आई ग्ग!!! मी सुद्धा करणार आहे. हे वाचून आणि फोटो पाहून, खतरनाक उर्मी आलेली आहे. मुलीला व तिच्या मैत्रिणींना हॉस्टेलवर देउन टाकेन.
______________
@हझारो ख्वाहीशे ऐसी - वाह!!! काय मस्त दिसतायत लाडू. एकेक बाळसेदार गोंडुला.

वा वा. कृती वर काढल्याबद्द्ल धन्यवाद.
सालाबाद प्रमाणे मुखी कुण्याच्या पडती काजू वर हसुन घेतलं. Proud हजारो ख्वाईशेचे लाडू बघुन करनाईच मंगता फीलिंग आलंय.
करणार किंवा मग नानकांचे आणणार! Wink

हो घरी बाकी काही नाही केले तरी बेसन लाडू मस्ट! ते काही केल्या विकत चे आवडत नाहीत मला. त्याला आपण घरी साजूक तुपात बेसन खमंग भा़जून केलेल्या बेताची साखर घातलेल्या लाडवाची सर येत नाही. नानक चे नाही ट्राय केलेत.

Pages