पारंपारिक बेसन लाडू - besan ladoo

Submitted by मेधा on 2 November, 2010 - 11:21
besan ladoo
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

बेसन, साखर, तूप, दूध, वेलची पूड , केशर, सुका मेवा

क्रमवार पाककृती: 

ही स्वातीने पार्ल्यात टाकलेली कृती

शोनूसाठी बेसनाच्या लाडवांची माझी कृती :

हमखास बेसन लाडू :

प्रमाण - बेसनाच्या (वजनी) अर्ध्या पटीत तूप आणि पाऊण पटीत साखर लागते सहसा.

बेसन थोड्या तुपावर भाजायला घ्यायचं. सगळं तूप एकदम घालायचं नाही, नाहीतर मिश्रण फसफसतं. थोडं थोडं तूप घालत बेसन पूर्ण भिजेल इतकं व्हायला हवं. मग मध्यम आचेवर कंटाळा येईपर्यंत किंवा हात भरून येईपर्यंत (यातलं जे शेवटी होईल ते.) बेसन भाजायचं. रंग अगदी चांगला पालटला पाहिजे आणि खमंग वास सुटला पाहिजे. बेसन जसं भाजू तसं परतायला हाताला हलकं लागायला लागतं.

हे होत असतांनाच एकीकडे थोडंसं दूध तापवायचं. उदा. एक किलो बेसनाला पाऊण कप दूध. थोडं जास्त झालं तरी चालेल, कमी नको.मी या दुधातच केशर घालते म्हणजे छान मिसळतं आणि लाडवांना मस्त रंग येतो. दूध घालतांना जरा जपून कारण बेसन एकदम आनंदाने फुलून येतं. आणि एव्हाना परतायला हलकं लागत असतं ते पुन्हा जड लागायला लागल्यामुळे आपण वैतागतो. पण आता दिल्ली जवळ आलेली असते. (हत्ती भाजून झालेला असतो, शेपूट राहिलेलं असतं - असं म्हणणार होते पण ते कसंतरीच वाटलं लिहितांना!)

मग अजून एक ४-५ मिनिटं परतून गॅस बंद करून टाकायचा. वेलचीची पूड बेसनात नीट मिसळून घ्यायची. आता जितकं बेसन घेतलं होतं त्याच्या पाऊण पट साखर, आणि आवडीनुसार सुकामेवा - बेदाणे, काजू, बदाम वगैरे जे काही घालायचे असतील ते - ही जमवाजमव करायची. बेसन निवलं की त्यात साखर मिसळायची आणि दुखर्‍या हाताचा राग काढल्यासारखं ते मिश्रण मळून घ्यायचं. त्याने हात आणखी भरून येतो, पण निदान राग निघतो. आता मिश्रणातच सुकामेवा मिसळता येतो. पण मग ’मुखी कुणाच्या पडतो काजू.. कुणामुखी बादाम..’ असं होऊ शकतं. हा अन्याय टाळण्यासाठी सुक्या मेव्याच्या वाट्या हाताशी ठेवून प्रत्येक लाडू वळताना त्यात तो सारख्या प्रमाणात घालणं हा एक उपाय मी करते.

लाडू वळून ताटात किंवा परातीत ठेवतांना अगदी चिकटून ठेवायचे नाहीत - जरा सुटे सुटे ठेवायचे. नाहीतर नंतर दुनियाकी कोईभी ताकत उन्हें फोडेबगैरे एक दूसरे से अलग नहीं कर सकती.

कधीकधी परिस्थितीच्या उष्ण झळांनी वळलेले लाडू बसल्याजागी बसतात! असे बसलेले लाडू निरखून पाहिले तर पारंपारिक भारतीय नवर्‍यांप्रमाणे दिसतात असं माझं एक आपलं मत आहे. अशा वेळी दोन पर्याय असतात. टूथपिक्‌ने त्यांच्यावर सोंडबिंड कोरून त्यांची त्या सपाट बुडानिशी देव्हार्‍यात प्रतिष्ठापना करून इहपरलोकी कल्याण करून घेता येऊ शकतं (म्हणजे दुसर्‍या शब्दांत वाढीव काम टाळता येऊ शकतं) किंवा हौस असेल तर ते जन्मजात वळण मोडून डब्यात भरण्याआधी त्यांना पुन्हा आपल्या मनासारखा गोल आकार देता येऊ शकतो. (हा प्रयोग पा.भा. नवर्‍यांच्या बाबतीत करण्यात आलेला नाही. इच्छा जरूर आहे. असो.)

काही तळटिपा :
काहींच्यात लाडवांसाठी सरसरीत बेसन वापरतात. इथेही इन्ग्रोमधे 'लाडू बेसन' म्हणून निराळं मिळतं. पण इतर काहींना बारीक दळलेलं बेसनच आवडतं. ('काही' ही गाळलेली जागा समजून आवडीनुसार भरावी.) बेसन सरसरीत वापरलं तर पिठीसाखर वापरावी. फाइन बेसन वापरलं तर इथली साखर (जी पुळणच असते) तशीच घालते मी, म्हणजे लाडू जरा रवाळ लागतो खातांना. रवाळ लाडू आवडत असेल तर यातच थोडा रवाही तुपावर भाजून मिसळता येतो.

तर अशा रीतीने ही बेसनाच्या लाडवांची पाचा उत्तरांची कहाणी साठा उत्तरांत सुफळ संपूर्ण!

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यांवर अवलंबून
अधिक टिपा: 

ही स्वातीची कृती , तिने पार्ल्यात टाकलेली. वाहून जाऊ नये म्हणून अन या कृतीने लाडू केल्यावर फोटो काढून इथे लावता येतील म्हणून हा प्रपंच
besan ladoo recipe in marathi

माहितीचा स्रोत: 
लाडवाक्का :-)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ही बेसन लाडु केले...

माझी कमी कष्टाची कॄती :

१/२ कीलो बेसन
१/२ किलो पीठीसाखर
३ टे.स्पुन साजुक तुप
१ कप दुध
२ चमचे वेलची पावडर
४ चमचे केशरी दुध मसाला पावडर

मायक्रोव्हेव सेफ भांड्यात तुप घातले. जरा विरघळल्यावर त्यात बेसन घालुन २ मिनिटे ठेवले. दर दोन मिनिटांनंतर पीठ हलवुन घेतले. आणि परत २ मिनिटे ठेवले. बेसनचा वास सुटेस्तोवर आणि फुलेपर्यंत करत राहिले.

जेव्हा बेसन छान फुललेले दिसले तेव्हा थंड होऊ दिले. थंड झाल्यावर वेलची पावडर आणि केशरी दुध मसाला पावडर घालुन मिक्सरमध्ये फिरवुन गुठळ्या मोडुन घेतल्या.

मग परत एकदा २ मिनिटांसाठी मावे मध्ये ठेवले. १ कप दुध गरम करुन घेतले आणि बेसनावर घातले. मिक्स करुन परत मिक्सर मधुन काढले. अजिबात गुठळ्या राहिल्या नाहीत. मग पीठीसाखर घालुन मिक्स करुन लाडु वळले. अतिशय छान झाले. एकदम सोप्पे. फोटो नंतर टाकेन.

मला जरा एक प्रश्न आहे... आता हे लाडु बाहेर ठेवले तर चालतील का (दुध घातलं आहे म्हणून शंका....)?

खुपच मस्त आणि खमंग झाली आहे लाडवाची कृती. Happy

लेखनाची स्टाइल पण भारी आहे. आवडली..

बाकीच्यांचे फोटोतले लाडु पण चविष्ट दिसत आहेत.. :):)

केले लाडु. पहिल्यांदाच दुध घालुन केले. एकदम भगराळ झालेले ते मिश्रण बघुन पोटात गोळाच आला होत.
पण मळल्यावर छान वळले गेले. खुसखुशीत झाले आहेत. धन्यवाद स्वाती.

बे.ला.- एक दीर्घ कादंब्री
केले, केले बरं या कृतीने लाडू. आमची गूळपाकवाली परंपरा मोडून पुळण साखर घालून बे.ला. केले. (कुठलाही पदार्थ करायला घेतला की अतीशहाणपणा करून एक तरी जिन्नस कमी-जास्त करायची अती वाईट सवय मासाहेबांना आहे. यंदा त्यांनी तूप कमी घातलं. बरं कृतीत म्हणे पाऊण कप दूध घालायचं. आता कप म्हणजे कोणता कप? मेझरिंग कप की देसस्थांकडचा 'चा'चा कप की ल्हान बाळाचा दुधाचा कप? अशानं जे व्हायचं ते झालंच. मांसाहेब गोंधळल्या, त्यांच्या हृदयात धडधडलं, पोटात पाकपुकलं, त्यांचे पाय लटपटले आणि शेवटी बेसन सगळं कोरडं पडलं. मग त्यांनी लाडवाक्कांना फोन लावला. मग पुन्यांदा दूध-तूप घालून बेसनाला चटका दिला. तेव्हा कुठं बेसन ठिकाण्यावर आलं.) तीन वाटी बेसनास पावणे दोन वाटीच साखर घातली तरी व्यवस्थित गोड झालेत. दोन्ही हातांनी वळावे लागले तरी छान बांधले गेलेत. घास घेताना भुगा होत नाही. हा फोटो-

belaa.JPG

ह्या दिवाळीला बायको भारतात गेली. विकतच्या फराळापेक्षा काही केलं तर.. असा विचार करुन हा धागा पाहिला. आणि लाडू झाले सुद्धा.. पाककृतीसाठी आभार Happy
हा फोटो..

डीडी, देखणे लाडू.

डीडींच्या लाडवांचा सरफेस लीना चंदावरकरच्या चेहर्‍याची, तर
सिंडरेलाचे लाडू माधुरी दिक्षितची आठवण करून देतात! Proud

मृ Lol

स्वाती, झक्कास झालेत लाडू तुझ्या पद्धतीने. पा.भा. सासू बाईंनी देखील कौतुक केले म्हणजे नक्कीच छान झाले असावेत.

पा. भा. नसलेले ऑफिसातले सहकारी - त्यांनीही मिटक्या मारत खाल्लेत. डबा भरुन आणलेले लाडु लंच अवरच्या आधीच साफ झालेत. चिन्यांना गोड आवडत नाही असे आज माझ्या ऑफिसात कोणीच म्हणु शकत नाही Happy हो, साखर प्रमाणापेक्षा किंचित कमी घातली होती मात्र.

धन्यवाद Happy

मी ह्या रेसिपीने गेले दोन-तीनदा लाडू केले .. छान होतात ..

पहिल्यांदा रुचिरात दिलेलेया मापाप्रमाणे केले होते ते दोन्ही वेळेला बिघडले .. बहुतेक तूप जास्ती झाल्यामुळे .. म्हणून मेधाने पहिल्या पानावर जे प्रमाण दिलंय साधारण ते वापरून लाडो केले .. ते छान झाले .. आता पुढच्या वेळी तूपाचं प्रमाण वाढवेन .. तोंडात विरघळणारा लाडू मिळण्यासाठी ..

हे मागच्या वर्षीचे ..

Besan ladu 2014.jpg

आणि हे काल केलेले ..

besan ladu 2015.JPG

धन्यवाद मेधा आणि स्वाती! Happy

मस्त दिसताहेत, चवीलाही असतीलच.
गोड पदर्थांमधला माझा सगळ्यात आवडता पदार्थ आहे हा.

हे फारच कॉम्पक्ट आहेत हो. माझ्या मते भरड आणि किंचित ओलसर असले पाहिजेत . यात चावायला काहीच नसते. अन टाळूला चिकटतात ...

टाळुला तिकटू नयेत म्हणून तर दुधाचा शिबका मारायचा ना.

सशलचे लाडू एकदम फाउंडेशन लावल्यासारखे दिसत आहेत तुकतुकीत. गेल्या वर्षीचे तर जास्तच Happy

मी नेहमीप्रमाणे हेमट्या हातानं दोन वाटी बेसनाचे केले. साखर अर्ध्यापटीच्या २-३ चमचे फार्तर जास्त घातली ती पुरेशी वाटली मला. बाकी गेल्यावेळी आणि यावेळी सुद्धा लाडू दोन्ही हातांनी बांधावे लागले. दूध किंवा तूप कमी पडतय का?

सिंडी, बेसनाचे लाडू दोन्ही हाताने बांधावे लागताहेत म्हणजे माझ्यामते तरी तुप खुप कमी पडतय.
सशल, कित्ती सुरेख केले आहेस लाडु. एकसारखे, सुरेख सोनेरी रंग.

सशल त्वाडा जवाब नहीं. मी आजवर लाडू वळता येत नाहीत म्हणून घरी लाडू करायचं पाहात नाही. पण मला हे बेसन्लाडू अतिशय आवडतात.एकदा बाकी निवांत असताना करून पाहायला हवेत. ही रेसिपी वाचणं म्हणजे एक मस्त टीपी आहे Wink

Pages