तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याकडे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत विधवा केशवपन केलेल्या बायका चोळी घालीत नसत. नंतर केशवपनाची प्रथा कमी होऊ लागली तरी चोळी न घालता समोरून पदर घट्ट घेऊन डोक्यावरून कानामागून खांद्यावरून पुढे आणून पुढचा भाग झाकून एक टोक डाव्या कमरेला घट्ट खोचण्याची पद्धत काही काळ ( त्या बायका हयात असेपर्यंत) कायम राहिली. मी अशा बायका बघितल्या आहेत. चित्रपट नाटकांतून अनेकांनी अशी पात्रे पाहिली असतील. लुगडे पायघोळ नसे तर ओचा खोचून पोटरीपर्यंत असे. आगरकरांच्या आणि इतर अनेकांच्या लिखाणात ह्याचे उल्लेख आहेत.
ठाणे पालघर जिल्ह्यांत सामवेदी ब्राह्मण अशी एक जमात आहे.त्यांना हलो बामन म्हणत. त्यात सुमारे १९८० सालापर्यंत त्या आधी पूर्वी कधीतरी केशवपन झालेल्या, चोळी न घातलेल्या बायका दृष्टीस पडत असत. त्यांना बोडक्याच म्हणत. आमच्याच सोसायटीत पिंटो आडनावाच्या एका कोंकणी क्रिस्टीयन कुटुंबातल्या गोऱ्यापान आजी असे चोळीशिवाय नेसू नेसत असत. अवांतर: ( त्या कुटुंबातली तीनही मुले अत्यंत हुशार आणि कर्तबगार निघाली. त्या वेळच्या शालांत बोर्डात आणि विद्यापीठातही उत्तम rank मिळवून पुढे कंपनी प्रेसिडेंट वगैरे पदांवर जगभर कार्यरत आहेत).
ह्या मागचे कारण विधवा महिला येता जाता छेड छाड करण्यासाठी सहज उपलब्ध असावी हे असेल असा माझा अंदाज आहे. ह्यावर वाद विवाद होऊ शकेल.
तरुण केशवपित महिलांना लाल आलवण नेसण्यास दिले जाई. नंतर त्या सफेद लुगडे नेसू शकत. ( अर्थ उघड आहे.) माझी स्वत:ची आत्ते आजी ( आजोबांची बहीण ) नऊ दहाव्या वर्षी विधवा होऊन माघारी आली होती. तिच्या उतार वयात ती सुरकुतलेली आणि कमरेतून वाकलेली, शुभ्र वस्त्र नेसून बसलेली गोरीपान आजी मी लहानपणी पाहिल्याचे मला चांगले आठवते. दर महिन्याला कोणी एक माणूस एक पेटी घेऊन येई. आजीसोबत तो मागील दारी जाई. काही वेळाने काम आटोपले की तो काही बिदागी घेऊन निघून जाई. आजीला न्हाणीघरात कोणी गरम पाणी काढून देई आणि ती आंघोळ करून घरात येई. तो काय करीत असे ह्याविषयी कुतूहल असे. ते काय असे हे नंतर कळले.
हे इतके सविस्तर लिहिले कारण आता अशी प्रत्यक्षदर्शी माणसे फार कमी असतील. हे एक प्रकारचे दस्तऐवजीकरण समजावे.

केशवपनच्या बाबतीत माझी आजी (बाबांची आई) सुदैवी होती, कोकणात खेडेगावातच आयुष्यभर राहिलेली. माझे आजोबा १९३६ साली गेले पण माहेरचे नातेवाईक पुढारलेलेच म्हणायला हवं त्या काळात, आजूबाजूला चुलत सर्व आमच्याच आडनावाचे, सर्वांनी केशवपन करायचं नाही तिचं हेच ठरवलं.

हीरा छान प्रतिसाद. तुम्ही अनेक जुन्या प्रथांचे दाखले देता. त्याचे साक्षीदार देखील आहात तर पुस्तक लिहून डॉक्युमेंटेशन करा की.
पोस्टमधे रहस्य ठेवलेत ते आता नाही सांगितले तर चुट्पुट लागेल.

डॉक्यूमेंटेशन्स अनेक ठिकाणी आहेत. अलीकडच्या सर्वसाधारण वाचनात ती येत नाहीत इतकेच. कदाचित नेटवर नसावी म्हणून लोकांच्या वाचनात येत नसावीत

तरुण केशवपित महिलांना लाल आलवण नेसण्यास दिले जाई. नंतर त्या सफेद लुगडे नेसू शकत.
Submitted by हीरा on 11 May, 2022 - 08:37>>>

नंतर म्हणजे कधी? रजोनिवृत्ती (मेनोपॉज) नंतरका?
परंतु गेल्या काही वर्षात पाहिलेल्या अनेक चित्रपट / मालिकेत मात्र वयस्कर विधवा स्त्रियादेखील 'लाल आलवणात' दाखवल्या आहेत.
उदा. उंच माझा झोका, काकस्पर्श, आनंदी गोपाळ इ.

चित्रपटातले आणि टीवी मालिकांमधले नेपथ्य, वेशभूषा, भाषा त्या काळाचा सूक्ष्म अभ्यास करून सज्जड अभ्यासपूर्वक आणि काळजीपूर्वक निवडलेली असते म्हणून तीच योग्य असते असे मानायचे असेल तर तसेही मानता येईल.

हीरांनी लिहीलेलं तसं मी माझ्या आत्याच्या सासूबाईंना बघितलंय कर्नाटकातल्या होत्या ' अव्वा ' म्हणायचे सगळे त्यांना. ह ना आपट्यांच्या कांदबर्यात अशा बोडख्या बायकांची वर्णने वाचायलामिळतात....

चोळ्या घालायला परवानगी नव्हती ती उघड छेडछाडीसाठी नाही तर बायकानी अन्गभर नीट पदर घ्यावा यासाठी. अंगात चोळी नाही, आपले अन्ग चुकुन कोणाला दिसेल का हा विचार बाईच्या डोक्यात कायम राहिल व त्या भितीने ती पदर सुतभरही घसरायला देणार नाही.

पांढरे आलवण कधी ऐकले नाही पण माझ्या ऐकण्याबाहेर प्रचंड मोठे जग आहे. त्यामुळे असेलही.

केशवपन केल्यावर डोके विद्रूप दिसे. असे भयाण व अशुभ दर्शन इतरांना होत राहू नये म्हणून मस्तक घट्ट झाकायचे.. पुढून घेतलेल्या आधीच्या शेवावर डोक्या खांद्यावरून आलेला शेव पुढे घेऊन डाव्या बाजूला घट्ट खोचायचा. म्हणजे पुन्हा पुन्हा कपाळपट्टीवर घट्ट सारायला लागू नये. पुढची बाजू आणि खांदे दंड पुरेपूर झाकले जावेत हा उद्देश होताच पण अभद्र माथा इतरांना दिसू नये हा मुख्य उद्देश होता. इतरांची तीच अट आणि कठोर अपेक्षा असे.

वयस्कर विधवा स्त्रियादेखील 'लाल आलवणात' दाखवल्या आहेत.
उदा. उंच माझा झोका, काकस्पर्श, आनंदी गोपाळ इ.>>>>>
विमु- तेव्हा मुलींची लौकर होणारी लग्न, आणि लौकर होणारी मुले वगैरे पाहता, चित्रपटात आजी म्हणून आलेल्या पात्राचे 45- 48 वर्षाचे देखील असू शकते.

पण वर हिरा म्हणतात ते जास्त सयुक्तिक आहे, वेशभूषा ठरवताना खूप खोलात रिसर्च झाला असेलच असे नाही ( विशेषतः तुम्ही ज्या चित्रपटांचा उल्लेख केला आहे त्यांच्या बाबतीत)

?

अलवान हा अरेबिक शब्द आहे. अर्थ रंगीत शाल.
दाते कर्वे मध्ये एक प्रकारचे वस्त्र, लाल वस्त्र , प्राकृत आल्लवण
असा अर्थ दिलेला आहे.शुभ्र वस्त्र म्हणजे आलवण नव्हे पण रूढीने तसा अर्थ चिकटलेला असू शकतो.
शिवाय शुभ्र वस्त्र नेसलेच पाहिजे ही सक्ती नव्हती. आमरण लाल वस्त्र नेसणाऱ्याही असत. माझ्या पहिल्या प्रतिसादात मी ' नेसू शकत ' हे शब्द वापरले आहेत.

विकेशा विधवा म्हणजे रक्तवस्त्रधारीच असे जनमानसात ठसलेले आहे. म्हणून तेच प्रतीक वापरणे सोयीचे असते.

आमच्या एका ओडिया स्नेहयांकडे त्यांच्या मूळ ठिकाणी, ढेंकानाल (ओडिशामधील जिल्ह्याचे ठिकाण आहे) लग्नाला गेलो होतो. त्यांनी लग्न आटोपल्यानंतर आमची जगन्नाथपुरी, कोणार्क, व भुबनेश्वर हयाठिकाणांची भेट घडवून आणली, त्यामध्ये पॅसेंजर ट्रेनने बहुतांश प्रवास केला होता जी सर्व स्थानकांवर थांबत असे. विशेषत: छोट्या छोट्या स्थानकांहून ट्रेन जात असताना अनेक स्त्रिया चोळीबिना साडीसारखे नेसु घालुन (तथापि अंगावर अनेक पारंपरिक दागिने होते) बिनदिक्कत प्रवास करताना दिसायच्या. तेव्हापर्यंत स्नेहयांकडून केवळ ऐकिवातच होते पण प्रत्यक्ष बघितलयावर मात्र धक्का बसला होता, आणि आम्हालाच फार अवघडल्यासारखे झाले होते (ओडिशात प्रचंड गरीबी असल्याने प्रामुख्याने समाजातील निम्न वर्ग अजूनही केवळ अंग झाकण्यापूरतेच वस्त्र नेसतात असे आमचे स्नेही अनेकदा सांगायचे).

आज एका (बिहारी) सहकाऱ्याने लंच टाईम मध्ये मला एक फळ (लिची) देऊ केले. तोपर्यंत मी ते फळं पाहिलेलं नव्हतं.
हा त्याच्यासाठी शॉक होता.

<<<चोळ्या घालायला परवानगी नव्हती ती उघड छेडछाडीसाठी नाही तर बायकानी अन्गभर नीट पदर घ्यावा यासाठी. अंगात चोळी नाही, आपले अन्ग चुकुन कोणाला दिसेल का हा विचार बाईच्या डोक्यात कायम राहिल व त्या भितीने ती पदर सुतभरही घसरायला देणार नाही.>>>
हे अगदी योग्य वाटत आहे.

माझ्या आईची आई होती सोवळी झालेली. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्य आले. तिचे दिर "वहिनी, सोवळ्या होऊ नका " असे सांगत असून ही ती हट्टाने सोवळी झाली होती. वर्षातले बरेच दिवस ती आमच्याकडेच राहत असल्याने तिचा सहवास आम्हाला खूप मिळाला.

सगळं आयुष्य बंधनात गेलं. निजायला गादी नाही, स्नानाला गरम पाणी नाही. थंडी, वारा ,पाऊस ,सर्दी ताप खोकला काही ही असो सकाळी अंधारातच गार पाण्याने अंघोळ व्हायलाच हवी आजीची. लाल आलवण नेसायला, पण कधी तरी पांढरं लुगडं ही नसत असे. बाकी मनाला सुखवणाऱ्या भौतिक गोष्टी शून्य होत्या तिच्या आयुष्यात तिच्या तिशी पासूनच. आज विचार केला तरी मनात कालवा कालव होते. चांगले कपडे, दाग दागिने, फुलं वेण्या, अत्तर अश्या कोणत्याही गोष्टी निषिद्ध होत्या तिला. हळदी कुंकू , लग्न कार्य, नाटक सिनेमा काही ही नाही. कधीतरी दुपारी वनिता मंडळ मात्र ऐकत असे रेडिओवर. जेवायची ही ती एकदाच . आणि इतर वेळी खरकट खाणं म्हणजे बिनउपासाच खाणं वर्ज्य होत तिला. जे काय खायचं असेल लाडू चिवडा किंवा इतर काही ते फक्त दुपारी जेवताना पानावरच घेत असे. विकत च्या गोष्टी तर स्वप्नातही ती अशक्य होतं खाणं . रात्री कॉफी, केळं , साबुदाण्याचे खिमट अस काही तरी थोडंच घेत असे.

महिना दोन महिन्यांनी तो नकोसा वाटणारा केशवपनाचा कार्यक्रम होत असे. त्या दिवशी मात्र ती बेचैन असे आता जाणवतंय. कायम डोक्यावरून घट्ट पदर घेऊन तो डावीकडे खोचलेला ...कधी कधी तिला ही असह्य होत असेल... दुपारी झोपताना खोलीत कोणी नसेल तर मात्र क्वचित डोक्यावरचा पदर ती काढून टाकत असे. असो.

देवाचं पोथ्या पुराणं , कीर्तन, काकड आरत्या , जप ह्यातच तिने स्वतःला जाणीव पूर्वक गुंतवून घेतलं होतं. पुराणातल्या गोष्टींचा तिच्याकडे अफाट स्टॉक होता. आम्ही खूप ऐकल्या आहेत . स्तोत्र श्लोक भजनं ही खूप पाठ होती तिला. पहाटे तिची देव पूजा चालू असताना ती रोज हळू आवाजात म्हणत असे. आम्ही अर्धवट झोपेत असायचो आणि ते स्वर तेव्हा ही खूप सूदिंग वाटायचे.

सगळा भरी भार देवावर टाकून ती मोकळी झाली होती. सगळ्या मोह मायेतून संसारातून मुक्त झाली होती. म्हणूनच पुढे तिची मुलं सुस्थितीत आल्यावर ही तिच्या लाईफ style मध्ये तिने काही ही फरक केला नव्हता. वेळ मिळाला की सतत लुगड्याच्या ओच्यात माळ लपवून ती जप करत असे. म्हणूनच गोरा रंग, लहान चण, लाल आलवण किंवा पांढरं लुगडं, डोक्यावरून पदर , अंगावर शाल किंवा दाभळी आणि चेहऱ्यावर निर्मोही पणाच तेज असणारी आमची आजी एखाद्या साध्वी स्त्री सारखी दिसत असे.

आज हिरा यांची पोस्ट वाचून आजीच्या आठवणी मनात दाटुन आल्या म्हणून पोस्ट लांबली.

Ok

ओहह हेमाताई काटा आला अंगावर. अशा कितीजणी असतील त्यावेळी.

माझी आजीही ३४ वर्षाची होती, तिने केलं नाही केशवपन, सर्वांचं ऐकलं, हे कित्ती बरं झालं, असं वाटलं वाचून, बाबा तर खूप लहान होते. वाचनाची प्रचंड आवड होती, पोथ्या पुराणं थोडा वेळ वाचून, बाकी अनेक मासिकं, कथा, कादंबऱ्या वाचन होतं (कोकणात माळ्यावर खजिना होता, मुलं मुलीही तिला पुस्तकं भेट देत, अगदी खोल डोळे गेल्यावर पण पुस्तक समोर, ऐंशी वर्षांची असतानाही) आणि स्वयंपाक तीच करायची जास्त करून, नैवेद्य रोज पाच असायचे माहेरी.

गावी एका घरात शेजारी एक नातेवाईक आजी बघितल्या आहेत आलवणात असायच्या (असं का आहे हा प्रश्न लहानपणीही सतावत होता पण ती आजी झोपाळ्यावर बसायची, सर्वांत मिक्स व्हायची, अगदी स्वत:ला मिटून घेतलं नव्हतं, आम्ही आजीच म्हणायचो) पण त्या माझ्या चुलतकाकुच्या माहेरकडून होत्या. माझी दुसरी चुलत आजीपण माझ्या आजीसारखीच केशवपन न झालेली होती.

दगडी पाटा वरवंटावर टाके घालणार्या पाथरवट जमातीतील स्त्रीया चोळी घालत नाहीत हे लहानपणी पाहिले होते , राहुरीत असतांना.
अन यामागे असही कारण ऐकले होते, कि सीतामाईने वनवासात असतांना हरीणाच्या कातड्याच्या चोळीचा हट्ट धरला.. अन पुढे इत्के रामायण झाले. याची आठवण म्हणुन या स्त्रीया चोळी घालत नाहीत. खखोदेजा.

लहानपणी वाल्या कोळीची गोष्ट ऐकली होती. मरा मरा असा जप करता करता तो राम राम म्हणू लागला आणि त्याचा वाल्मिकी झाला, अशी काहीतरी गोष्ट होती. पुढे जेव्हा लक्षात आलं की मरा हा शब्द असलेली आपली मराठी भाषा त्या काळी (कोणता काळ तेही निश्चित नाही) नसणार, तेव्हा मला सांस्कृतिक धक्का बसला.

दगडी पाटा वरवंटावर टाके घालणार्या पाथरवट जमातीतील स्त्रीया चोळी घालत नाहीत हे लहानपणी पाहिले होते , राहुरीत असतांना. >>> इथेही बघितलं आहे पूर्वी पण स्टोरी माहिती नव्हती.

माझी ३ वर्षाची मुलगी तिच्या nanny ला "तू रोज रोज साडी का नेसतेस , फ्रॉक का घालत नाहीस? " अस विचारत होती. दोघींनाही सांस्कृतिक धक्के बसलेले जाणवलं Lol

Pages