भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

akShNo: परं.
पहिला शब्द देवनागरीत लिहिता येईना म्हणून रोमन लिपीत लिहिला.

हो, हा समास जरी असला, तरी त्यात ओ कुठून आला हे कळायला हवं. समासांतर्गत संधीनियम असतातच की.

मनोरंजन , यशोधन, तजोपुंज या विसर्ग संधी आहेत. यात अवग्रह पाहिल्याचे आठवत नाही.
-------

ओह. आलं लक्षात अकारांत विसर्गापुढे लुप्त झालेला अ स्वर असेल तर अवग्रह येईल. म्हणुन वरच्या शब्दात येणार नाही.

परोऽक्ष paro'kṣa [ noun m f[parokṣā] n ] mf(ā)n. (°ró-) beyond the range of sight, invisible, absent, unknown, unintelligible AV. etc. etc.

परोऽक्ष <-- हे कॉपी पेस्ट करुन गुगलवर शोधल्यास काही सर्च रिझल्ट्स दिसतील. तेव्हा पर: + अक्ष अशी संधी असून पुढे त्यात अवग्रह वापरणे बंद केले असावे असे वाटते.

तेव्हा पर: + अक्ष अशी संधी असून पुढे त्यात अवग्रह वापरणे बंद केले असावे असे वाटते. >> ह्म्म्. असंच असावं. धन्यवाद.

अपरोक्ष हा जसा आपण उलट अर्थाने स्वीकारला आहे, तसाच 'विलायत'देखिल आहे. मूळ अरबी/फारसी विलायेतचा अर्थ स्वदेश, राज्य, प्रांत, आपल्या राज्यव्यवस्थेतर्फे चालवला जाणारा प्रदेश - ह्यापैकी होतो. आता आपल्याकडे आलेले पर्शियनादी राज्यकर्ते हे अधून मधून 'विलायतेस' म्हणजे स्वदेशास जात असत. म्हणून आपण पण त्यांच्या देशाला विलायत आणि एकंदरीतच परदेशी लोकांच्या देशाला विलायत म्हणू लागलो. (परदेशात गेल्यावरही तिथे राहणार्‍या लोकांना 'फॉरेनर' म्हणणं असंच आहे. तिथे खरं तर आपण फॉरेनर / फॉरेनारी असतो Wink ).

(परदेशात गेल्यावरही तिथे राहणार्‍या लोकांना 'फॉरेनर' म्हणणं असंच आहे. तिथे खरं तर आपण फॉरेनर / फॉरेनारी असतो Wink ).
यावरून एक आठवलं. इथे न्यू जर्सीत आमच्या कॉलनीत १००% भारतीय आणी एखाद दुसरे चिनि कुटुंबे आहेत. भारतातून आलेले एक रिटायर्ड काका रोज वॉकिंग ला जात असत. एके दिवशी ते वॉकिंग वरून अगदी एक्साईट होउन घरी आले व मुलीला म्हणाले, "आज मैने एक फॉरिनर को देखा !"

स्वागत !
भाषेकडे बघताना...’, ‘मराठी भाषेकडे बघताना...’ आणि ‘बहुभाषिकतेकडून भाषांतराकडे...’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन.
https://www.aksharnama.com/client/article_detail/5909

आज मैने एक फॉरिनर को देखा !">>> या जोकवर आता बंदी घालण्यात यावी प्लीज. बे एरिया ते न्यू जर्सी पर्यंत प्रत्येक देसी घेटो बद्दल ऐकून झालाय.
रंगबिरंगी चे आपण मराठी लोकांनी रंगी'बेरंगी' करून टाकलंय त्यावर काय मत आहे?

'द काश्मिर फाइल्स' नावाच्या धाग्यावरून हा प्रश्न इकडे विचारतो आहे. एका भाषेचे लोक दुसर्‍या भाषेतील नावे उच्चारता येत नाहीत तेव्हा सोयीस्कर आणि मूळ उच्चाराच्या त्यातल्या त्यात जवळ जाणारे उच्चार शोधतात हे समजू शकतो. म्हणजे 'बाळ गंगाधर टिळक' नावाचे 'बाल गंगाधर तिलक' करणे वगैरे (इथेही ट चा त करायची गरज नव्हती, पण अर्थाच्या दृष्टीने त्यांना टिलकपेक्षा तिलक जास्त परिचयाचे वाटत असावे). अगदी अलप्पुळा (मराठीत नसलेला दुसरा ळ पाहिजे इथे - देवनागरीत तो नाही) नावाचे अलप्पुला किंवा अलप्पुझा (त्यांनी केलेल्या इंग्रजी/रोमन स्पेलिंगनुसार) हे ही ठीक आहे. पण जे उच्चार आपल्या भाषेत आहेत, ते असतानाही का बदलावेसे वाटतात? ह्यामागे काही कारण असू शकेल का? खालील उदाहरणे पहा -

मूळ उच्चार : अन्यभाषकांचे उच्चार
कश्मीर : काश्मीर (मराठी भाषक)
रावलपिंडी : रावळपिंडी (मराठी भाषक) - (आता ह्यात मुळात पंजाबी उच्चार रावळपिंडीच आहे का ते माहीत नाही.)
पुणे : पूना (हिंदी भाषक. इंग्रजांच्या 'पूना' उच्चाराने प्रभावित???)
सोलापूर : शोलापूर (हिंदी भाषक)
कन्नडा : कानडी (मराठी भाषक), कन्नड (हिंदी भाषक)

अजून असे कुठले शब्द आठवतील का (बरेच असतील) - ज्यांचे मूळ उच्चार करता येणे शक्य असूनही चुकीचा उच्चार लोक करतात? त्यामागे काय कारणे असतील?

हपा
चांगला मुद्दा.
ळ, ण ही मराठीची खासियत आहे.
बंगालीत 'व' नसल्याने ते लोक त्याचा ब करून टाकतात.
(बाजपेयी).

Europe चा उच्चार प्रत्येक युरोपीय भाषेत वेगळा आहे असे मला एका जर्मनीस्थित व्यक्तीने सांगितले होते.
त्याने मला जर्मन उच्चार करून दाखवला होता.

'युरोप' हे मराठीकरण असावे

बंगाल/ओरीसात V चा उच्चार भी करतात. म्हणजे abcd शिकवतानाच V आला की भी शिकवतात मुलांना.
त्यामुळे V असलेले शब्द ते तसेच उच्चारतात. Very-भेरी, Valve-भाल्भ, Vajpeyi-भाजपेयी.

काही लोक र चा ड करतात. क्या कडते हो?

मराठीत जशी गावांची नावे आपण बदलतो (मेरठ - मीरत, वगैरे) तसे जर्मन्स सुद्धा बदलतात. जर्मनीत इंडियाला इंडियन (Indien) म्हणतात, आणि इंडियनला इंडियनर. तसे इतर काही जागांच्या बाबतीतही.

हा सगळाच प्रकार जसे ग्रामीण लोक कुठलाही शब्द आपल्या पद्धतीने उच्चारतात (वेगवेगळ्या ग्रामीण भागातील वेगवेगळे उच्चारत असतील) तसे वाटते. पण कमी प्रमाणात. उदा. सिमेंट हा उच्चारायला सरळ साधा शब्द ते सिमीट आणि खास टच देऊन शिमीट असा उच्चारतील, शहरात येऊन सिमेंट म्हणतील, गावी जाऊन शिमिट.

जर्मनी आणि काही युरोपियन देशात V चा उच्चार फाऊ होतो.
Volkswagen चा मूळ उच्चार फोक्सवागन.

जर्मनीतील शहरांचे मूळ उच्चार वेगळे असतात.
बेर्लिन, फ्रांकफुर्ट, हांबुर्ग यांचे उच्चार स्पेलिंग मध्ये बदल केला नसून बर्लिन फ्रॅंकफर्ट, हँबर्ग असे इंग्रजी शिकलेले सर्व करतात. तर München (म्युन्शेन) चे Munich, Köln
(क्योल्न) चे Cologne असे स्पेलिंग सकट उच्चार बदललेली नावेही आहेत.

Europe चा उच्चार प्रत्येक युरोपीय भाषेत वेगळा आहे असे मला एका जर्मनीस्थित व्यक्तीने सांगितले होते. >> त्याला त्याने जर्मन टच दिला असेल. जर्मन्स जसे लिहिले तसे शब्द उच्चारतात. Euro या चलनाचा उच्चार ते "ए आणि उ" ची संधी करून उच्चार होईल असा एउरो सारखा करतात, Europe ते Europa असे लिहितात आणि उच्चार एउरोपा.
ए आणि उ चा एकत्र उच्चार ए्यु असा काही ऐकू येतो.

मानव बरोबर.
जगातील कुठल्याही एका खंडावर वैयक्तिक देशाची भाषिक मालकी नाही. मग मुळात प्रत्येक खंडाचे नाव ठरवले कुणी ? एकट्या ब्रिटिशांनी की आंतरराष्ट्रीय समितीने?

जे देश कधीच ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली नव्हते ते त्यांच्या खंडाच्या नावाचा उच्चार कसा करत असतील? कुतूहल वाटते. तसेच त्या नावाची मूळ लिपी कुठली मानायची?

चंडीगड / चंदीगड/ चंडीगढ /चंदीगढ
नक्की कुठले मूळ ?
(garh तर चर्चेत घ्यायलाच नको !)

जर चंडी हा अंश देवीच्या नावावरून आला असेल तर त्याचा द करायची काय आवश्यकता होती ?

सिंधी लोक र चा ड करतात. माझा सिंधी कलीग मला भडत म्हणायचा. आणि बंगाली बॉसने माझे आडनाव MICR करून टाकले होते. तेव्हा Non-MICR चेक्स प्रचलनातून जाऊन MICR चेक्स प्रचलित व्हायची प्रक्रिया सुरू होती

इतर प्रांतात कशाला जा! खडकीचं स्पेलिंग के आय आर के ई ई आहे. बरोडा बडोदा वडोदरा वगैरे सारखे गोंधळ आपल्याकडेही सापडतील. पण मी अभारतीय लोक आणि त्यांचे भारतीय उच्चार - इतकी टोकाची तुलना करत नाहीये. भारतीयच लोक, त्यांच्या भाषेत असणारेच उच्चार (म्हणजे व्ही-भी, व-ब चा गोंधळ पण ज्यांच्या भाषेत नाही, ण - ळ वगैरेचा गोंधळ नाही) असे असूनही चुकीचे उच्चार का करतात? कश्मीर-काश्मीर ह्यात काय लॉजिक आहे?

*कश्मीर-काश्मीर ह्यात काय लॉजिक आहे? >>>

ह पा सहमत.
विकिपीडियामध्ये दिलेल्या दोन व्युत्पत्तीनुसार ते कश्मीरच ठेवायला पाहिजे होतं.
https://en.m.wikipedia.org/wiki/Kashmir

मराठीत अ ने सुरु होणारे बरेच शब्द पुढे अपभ्रंश होऊन आ ने सुरू झाले. त्यातलाच हा प्रकार असावा.
(अंघोळ >>> आंघोळ)

बरोबर. आपल्या पद्धतीने शब्द उच्चारण्याची सवय याने झाले असावे. दक्षिण भारतात शब्द आकारांत / उकारांत करण्याची सवय आहे. माधव, अरविंद हे माझे मावस भाऊ, त्यांचे माधवा, अरविंदा होते. राम चे रामा होते. (रामा राव). विठ्ठलु, वेधू वगैरे. इतर भाषेतून शब्द घेतानाच नव्हे तर त्यातील नामे वापरतानाही जशीच्या तशी न वापरता आपापल्या पध्दतीने वापरण्यात येतात. काश्मीर मीरत, पाटणा, कलकत्ता, हे आपल्या पद्धतीने.

मानव - सहमत. मराठीत काही शब्दांची शेवटची अक्षरे आपण पूर्ण 'अ' सहित उच्चारतो. उदा. अनिरुद्ध मध्ये शेवटचा ध पूर्ण उच्चारला जातो, ध् असा अर्धा नाही. दक्षिणेत शेवटचं अक्षर अ पूर्ण उच्चारायच्या ऐवजी आ किंवा उ (कन्नडात स्पष्ट उ, तमिळ आणि मलयाळमात घशातला उ) उच्चारतात. त्यामुळे अनिरुद्धचा अनिरुद्धा होतो. त्याउलट उत्तरेत अनेकदा शेवटचं अक्षर अकारान्त न करता व्यंजन अर्धवट सोडतात. उदा. अनिरुद्ध चा उच्चार अनिरुद्ध् किंवा नुसतं अनिरुध् असं करतात.

आता हे स्वर पूर्ण न उच्चारायचं पेव मराठीतही फार आहे. माझंच वरचं वाक्य (त्याउलट उत्तरेत अनेकदा शेवटचं अक्षर अकारान्त न करता व्यंजन अर्धवट सोडतात) हे उच्चाराप्रमाणे लिहायचं झाल्यास 'त्याउलट् उत्तरेत् अनेक्दा शेवट्चं अक्षर् अकारान्त न कर्ता व्यंजन् अर्धवट् सोड्तात' असं झालं असतं.

'मराठीत आपण बोलतो त्याप्रमाणेच लिहितो' - हा एक वृथा अभिमान आणि चुकीचं विधान आहे असं वाटतं.

सुधीर बेडेकर यांचा ४८ वर्षांपूर्वीचा लेख..
‘समाजवादी शिव्यांचा शोध’

https://www.aksharnama.com/client/article_detail/5943

"मुख्य प्रश्न हा आहे की, शिव्या निघाल्या कुठून व त्या परिणामकारक कशामुळे होतात. भाषेतील सर्व शब्दांप्रमाणेच त्या समाजजीवनाच्या उकडहंडीतून निघतात. विशिष्ट जीवनपद्धती व तिच्याशी निगडीत सांस्कृतिक जाणीवांच्या क्षेत्रातील, विशिष्ट बिंदू वा उंचवटे (वा खड्डे म्हणा) म्हणजे अपशब्द. "

Pages