भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वप्रथम, परदेसाई म्हणतात त्याप्रमाणे तो शब्द वाङमय अस नसून वाङ्मय असा आहे. म्हणजे ङ अर्धा आहे त्यात.

वाङ्मय ह्या शब्दात 'ग' नाही. शिवाय त्यात अनुस्वारही नाही. त्यामुळे मुळात वाङ्मय आणि वांगे ह्या दोन्ही शब्दात खूप फरक आहे.

वाङ्मय = वाक् + मय, असा बनतो. ह्यात म च्या आधी आलेल्या क् चा ञम्त्व संधीमुळे ङ् होतो. ह्या प्रकारच्या संधीत म च्या आधी आलेल्या वर्णाचं रूपांतर त्या वर्गाच्या सानुनासिक वर्णात होतं. इथे क आल्यामुळे क-वर्गाचा सानुनासिक वर्ण ङ होतो. त्या ऐवजी त किंवा द आला असता तर त्याचा न झाला असता. उदाहरणार्थ, चित् + मय = चिन्मय. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या ङ् किंवा न् चा अनुस्वार होत नाही.

अनुस्वाराचा उच्चार कसा करावा? तर अनुस्वारापुढे येणारा वर्ण जो आहे, त्याच्या वर्गाच्या सानुनासिकाप्रमाणे. म्हणजे अंक चा उच्चार अङ्क असा होतो. तर संजय चा उच्चार सञ्जय असा, घंटा चा उच्चार घण्टा असा. संबंध चा उच्चार सम्बन्ध असा. आता वरच्या उदाहरणात तुम्ही त्या अर्ध्या सानुनासिक वर्णाचा अनुस्वार केलात तर उच्चार बदलेल; कारण त्यापुढे येणारा वर्ण 'म' आहे. त्यामुळे वांमय असं लिहिलं तर त्याचा उच्चार वाम्मय असा होईल, जो बरोबर नाही. (अवांतर टीपः श ष स ह च्या आधी येणारा अनुस्वार जरा वेगळाच उच्चारला जातो; उच्चारून पहा: हंस, अंश, सिंह - हिंदीत तो न् सारखा उच्चारतात, पण मराठीत नाही).

आता मूळ प्रश्नाकडे येतो. वांगे असे का लिहितात? वांगे ह्या शब्दात (माझ्या माहितीप्रमाणे) ज्यामुळे तिथे ङ यावा अशी कुठली संधी नाही. केवळ ग च्या आधी आलेला अनुस्वार म्हणून त्याचा उच्चार वाङ्गे असा होतो. उच्चारानुसार हे लिहिणं मला चूक वाटत नाही, परंतु व्याकरणानुसार तो शब्द तसा लिहिल्यास काही अर्थबोध होत नाही किंवा त्यास अनुकूल व्युत्पत्तीदेखिल दर्शवित नाही. सबब, 'वांगे' असं लिहिणंच योग्य ठरेल.

फारच मस्त समजावले आहे. वर्णमालेतील शेवटचे अक्षर अनुस्वारात उच्चार नियम मला माहीतच न्हवता. धन्यवाद.

ह पा
चांगले समजावलेत.
छान चर्चा. माझा इतका मूलभूत अभ्यास नाही. पण चर्चेसाठी म्हणून काही अंदाज व्यक्त करतो.

वाङ्मय व वांगे या दोन्ही शब्दांच्या लिहिण्याची पद्धत त्यांच्या मूळ संस्कृत व्युत्पत्तीशी निगडीत आहे का ?

वांगे शब्दाची शब्दरत्नाकर मधली नोंद अशी आहे :
संस्कृत, वृंताक = वायंगण, एक फळभाजी

ह पा मनापासुन धन्यवाद.

वान्ग्मयात (शब्द् लिहिता येत नाहिये) ग नााही हे ध्याानात आले नाही.

वांग्याना मालवणीत वायंगी म्हणतात पण ऊच्चारात यं अगदी ओझरता येतो.

अजून एक रंजक अक्षर पाहू.

मराठीत आपण ‘शारंगपाणी’ असे व्यवस्थित सुटे लिहितो. परंतु माझ्या माहितीतील या आडनावाचे एक गृहस्थ त्यांचे आडनाव ‘शार्ङ पाणी’ अशा प्रकारे लिहितात.

सहज शब्दकोशात डोकावले आणि ते मूळ रूप पाहायला मिळाले :
शारंगपाणी
न. विवाहस्थळ तीर्थाचें ठिकाणीं अस- ल्यास वरानें एका नवपरिणीत जोडप्यासह तीर्थावर जाऊन खालीं न ठेवतां आणलेलें पाणी. -लविसो ५१. [सं. शृंग- शार्ङ + पाणी]

दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%...

शार्ङ्गपाणि म्हणजे श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण.
शार्ङ्गधरा रे अडवू नको माझी वाट. किंवा सांग यमुने पाहिला का तू कुठे शार्ङ्गपाणि.
शार्ङ्ग म्हणजे धनुष्य आणि पाणि म्हणजे हात. शार्ङ्ग हातात धारण करणारा म्हणजे शार्ङ्गपाणि म्हणजे श्री विष्णू. एका परीने शार्ङ्ग हे विष्णूच्या धनुष्याचे नाव.

छान माहिती.
वाङ्‌मय आणि साहित्य यामध्ये फरक काय असतो?

** वाङ्‌मय आणि साहित्य यामध्ये फरक काय असतो?

>>> या मुद्द्यावर अनेकदा अनेक ठिकाणी चर्चा होत असतात. मला खालील संदर्भात लिहिलेले समर्पक वाटते :

( https://vishwakosh.marathi.gov.in/25690/)

“साहित्य व वाङ्‌मय ह्या संज्ञा सामान्यतः जरी समानार्थी वापरल्या जात असल्या, तरी त्यांच्या अर्थात व उपयोजनात भेद करावा, असे काही समीक्षकांनी सुचविले आहे. वाङ्‌मय हा शब्द अधिक व्यापक अर्थाने वापरावा, असे रा. श्री. जोग यांनी सुचविले आहे. डॉ. अशोक रा. केळकरांच्या मते ललित वाङ्‌मयालाच ‘साहित्य’ म्हणावे”.

(खाण्याचा पदार्थ) सांबार हा शब्द कशाचा अपभ्रंश आहे याबद्दल मजेदार माहिती वाचण्यात आली.
एकूण तीन कथा आहेत :

१. तंजावरमध्ये एकेकाळी संभाजी राजांसाठी केलेला पदार्थ म्हणून संभार

२. कन्नड मध्ये सांबारु पदार्थ हे मूळचे वर्णन

३. मूळ तामिळ शब्द असा आहे : champaaram (சம்பாரம்).

अपभ्रंश कशाचाही असो, साम्बार चवदार असतो खरा !

(https://www.sambarstories.com/blogs/recipes/the-story-of-sambar) आणि
विकी.

साधना
शब्दरत्नाकरनुसार :
हुत = ज्यात आहुती टाकली असा अग्नी
किंवा
जळून रक्षा झालेला.
......
गेले 48 तास बृहदकोश ऑनलाईन संस्थळ बंद आहे. त्यामुळे अधिक बघता येत नाही.

फोड हुत + आत्मा अशी बरोबर आहे.

संस्कृतात हु धातूचा अर्थ इंग्रजीत 'टु सॅक्रिफाईस' असा दिला आहे. म्हणजे बळी देणे, (अग्नीत) अर्पण करणे इत्यादी अर्थ लाऊ शकतो. हु धातूचं क्तांत (कभूधावि - कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण) रूप (हु + त) 'हुत' असं होतं. म्हणजे बळी दिलेला किंवा अग्नीत (समराग्नीत?) अर्पण झालेला. 'हुत आहे असा आत्मा' - असा कदाचित कर्मधारय तत्पुरुष समास सोडवल्यास, '(समराग्नीत) अर्पण झाला आहे असा आत्मा' म्हणजे हुतात्मा असा अर्थ लागतो.

(हु ह्या धातूवरूनच 'हवन' शब्द आला असेल काय? जे अर्पण केले ते हुत आणि ज्यात अर्पण झाले ते हवन?)

हु ह्या धातूवरून
>>>
हुताश , हुताशन , हुतास = अग्नी.
हुताशनी = होळी
..
मोल्सवर्थचा कोशही >> आभार !

(हु ह्या धातूवरूनच 'हवन' शब्द आला असेल काय? जे अर्पण केले ते हुत आणि ज्यात अर्पण झाले ते हवन?)>>>
संस्कृत फार रोचक भाषा आहे. आहूती शब्दही हुत वरूनच आला असेल का , ज्याने जन्मभूमीसाठी आत्म्याची सुद्धा आहूती दिली तो हुतात्मा..असं काही! (पण 'हुती' र्हस्व आहे 'आहूती' दीर्घ)
हर्पाणिनी Happy प्रतिसाद आवडला.

तंजावरमध्ये एकेकाळी संभाजी राजांसाठी केलेला पदार्थ म्हणून संभार>>>> हे बहुधा एपिकवर 'राजा रसोई और अन्य कहानियांमधे' बघितलेले आठवते. Happy

अन्नम् वै प्राणा: ह्या मायबोलीवरच्या एपिक सिरीज मध्ये संभार, सांबार, सांबर ह्या सगळ्याचा उगम, आणि इतिहास दिलेला आहे.

सुधारणा :
गेले 48 तास बृहदकोश ऑनलाईन संस्थळ बंद आहे. >>> ते आजपासून चालू झालेले आहे. इच्छुक लोक लाभ घेऊ शकतात.
.............
ते चालू झाल्यानंतर प्रथम एक अपभ्रंश ( जो गेले दोन दिवस मनात घोळत होता तो) त्यात बघून टाकला.
कोजागरी हा योग्य शब्द आहे.
त्याचा कोजागिरी हा अर्थाच्या दृष्टीने चुकीचा अपभ्रंश रुढ झालेला आहे.
तिन्ही शब्दकोश बघून खात्री केली.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BE%...)

'को .. जागर्ती' असं मूळ संस्कृत असल्याचे शाळेत शिकवले होते.
गिरी (पर्वत) याचा इथे काहीच संबंध नाही.

Pages