भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1 तीळ भिजायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ ही गुप्तता राखता न येणे
>>>
+१ . कोश धुंडाळले असता 'तीळ' हा अल्पप्रमाणवाचक शब्दप्रयोग असे दिसते.
बाकी गुगलून हे जे सापडते ,

"तीळाचं आवरण स्निग्ध असल्याने त्याला तोंडात घेऊन लाळेत भिजवून मऊ करणे कठीण असते. जसे एखादं नवं गुपित मनात ठेवणं कठीण असतं तसं."

ते कितपत अधिकृत आहे याची कल्पना नाही.

कुमार धन्यवाद. षडयंत्र हा शब्द आता सरसकट कट या अर्थाने वापरला जातो, त्यात सहा प्रकार अंतर्भूत आहेत हे वाचून गंमत वाटली.

मुळवंद या शब्दाचा काय अर्थ असेल. गडदुवाडीचा अर्थ कळल्यावर मुळवंदवाडी कशावरून आली असेल हा प्रश्न पडलाय.

नांगरतास व नांगरवाक अशा दोन वाड्याही आहेत. नांगरतासवाडीला जमीन नांगरून काढल्यासारखा चिंचोळा धबधबा आहे म्हणून नाव पडले असेल. मग त्या वाडीपासून दूर असलेली वाडी नांगरवाक कशी? वाक हाही नांगराचा भाग आहे का?

मूग = मूक हे नव्हते माहित. आभार.

तीळ = अल्पप्रमाणवाचक हे ही पटेबल आहे.

आता तुरी आणि वाटण्याचे रहस्य उलगडले की झाले Happy

नांगरवाक हा आकारवाचक शब्द आहे. म्हणजे नांगराचा वाकडा आकार असतो तशी जमीन. तसाच रुमणवाक हा रुमण्याच्या आकाराचा असतो. म्हणजे L सारखा.

साधना,

मूळबांध = मूळबंद = शेतातील बंधारा
हे सापडले.
मग मुळवंद हा अपभ्रंश ??

वाटण्याच्या अ़क्षता लावणे
>>>
वाटाणे जर कपाळास लावले तर त्यातील एकही दाणा कपाळास चिकटून रहात नाही >>
यावरून-साफ नकार देणें
https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A...

उपयुक्त चर्चा व माहिती.

इथे मराठी शब्दांच्या व्युत्पत्तीची चर्चा चालू असताना , "संदर्भ", "पुरावा" म्हणुन हिंदी भाषेतील शब्द किंवा डिक्शनरी चर्चेला घेऊ नयेत.
लिपी व काही स्पेलिंग जरी "दिसायला" सारखे असले तरी हिंदी चा मराठीशी व्याकरणदृष्ट्या जवळचा असा काही संबंध नाही.
मागच्या पानावर कुमार१ यांनी एका हिंदी शब्दाचा संदर्भ देऊन हिंदीत तर असे असते असे म्हटले आहे.
उद्या इथे येऊन एखाद्याने, हिंदीत तर "व्यस्त" ची व्याख्या Busy अशी आहे तुम्ही तीच वापरा असे म्हटले तर चालेल का?
मराठीत व्यस्त ची व्याख्या वेगळी आहे. लिपी व स्पेलिंग सारखी "दिसत" असली तरी.
त्यामुळॅ ईथे फक्त मराठी, मराठीच्या बोलीभाषा , पाकृत, संस्कृत आणि व्याकरणदृष्ट्या/ऐतिहासीकदृष्ट्या मराठीशी संबंधीत असलेले संदर्भ व डिक्शनरी दिल्यास, मराठी शब्दांचे अर्थ योग्य पद्धतीने कळण्यास हातभार लागेल.

नियम आणि नेम -
नेम हा शब्दाचा अर्थ जसा लक्ष्य/रोख आहे तसाच तो नियम चा अपभ्रंश नेम या अर्थानेही योजला जातो. नियम म्हणजे एखादे व्रत, रूढी, संकेत या अर्थाने वापरतात तसाच नेम हा अपभ्रंशही त्यासाठी वापरात येतो. शिवाय नेम हा सम्भवनीयता किंवा भरवसा या अर्थानेही वापरतात येतो आजकाल जसेकी " नरुशेट काय करेल याचा नेम नाही. " पण इथे नेम म्हणजे भरवसा हा वरील नियम वरूनच आला आहे कारण जो काही नियम पाळत नाही म्हणजेच नेम पाळत नाही त्याचा भरवसा देता येत नाही अशा अर्थाने.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE

इंटरेस्टिंग विषय!

"तारांबळ" उडणे याचे मूळ लग्नसमारंभात गुरुजींनी मंगलाष्टके संपल्यावर "ताराबलं चंद्रबलं तदेव" असा श्लोक सुरू केला की जी गडबड सुरू होते त्यात आहे असं वाचलं होतं. Happy

नेम हा नियम अर्थाने वापरला जातोच. नित्यनेम, नेमेचि येतो मग पावसाळा, ह्यात नियम हाच अर्थ आहे. जसा नेम असतो, तसा विरुद्धार्थी अनेम पण असावा. कारण 'देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम' - असे शब्द आहेत.

तारांबळ, नेम व अनेम सर्व छान !

कोरडयास हा पण एक रोचक शब्द आहे. त्याचा अर्थ कालवण.

आता कालवण खरे तर ओले असते. त्यासाठी असा शब्द का वापरला आहे असे पटकन वाटते.
आपण पोळी, भाकरी हे कोरडे पदार्थ ज्याला लावून खातो ते कोरड्यास !
म्हणजे (पातळ) कालवण.

मांजरपाट हे हातमागाचे कापड पूर्वी प्रसिद्ध होते. ते जिथे तयार व्हायचे ते ठिकाण म्हणजे मद्रपल्लम.
>>> मादरपाट >>> मांजरपाट ( अपभ्रंश)
तसेच काही लोक म्हणायचे की हा शब्द Manchester वरून आलाय.

Pages