अभियांत्रिकीचे दिवस भाग- ७

Submitted by पाचपाटील on 16 November, 2020 - 13:23

भाग १
https://www.maayboli.com/node/74581
भाग २
https://www.maayboli.com/node/74585
भाग ३
https://www.maayboli.com/node/74605
भाग ४
https://www.maayboli.com/node/74799
भाग ५
https://www.maayboli.com/node/74833
भाग ६
https://www.maayboli.com/node/76712

१. होस्टेलमध्ये प्रायव्हसीचं सुख मिळण्याचा काहीच स्कोप नव्हता. कारण स्वत:ची रूम सोडून कुणाच्याही रूममध्ये अनंत काळ ढुंगण वर करून लोळत पडायची पूर्वापार परंपरा.. शिवाय धाडकन दार उघडून कुठंही घुसण्यात काही गैर आहे, असं कुणाच्या डोक्यातही येणं अशक्य.

असाच कधीतरी मी एका रूममध्ये प्रवेश करतोय..
नेहमीची रिकामटेकडी जनता तिथं अस्ताव्यस्त पसरलेल्या अवस्थेत, एका लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहून लाळ गाळते आहे..
स्क्रीनवर एक रोमॅंटिक सीन ऐन रंगात आलेला आहे.
परंतु त्या हिरो आणि हिरोईनला तो रोमान्स करताना
कसलाही आनंद होताना दिसत नाहीये..
काय कारण असावे बरे??
निव्वळ पैशांसाठी ते असले फालतू धंदे करत आहेत की काय ??
आणि कोण महापुरुष असेल बरं ह्या फिल्मचा निर्माता?? आणि दिग्दर्शक कोण दिग्गज असेल?? अशा अर्थाचं आमचं शेंडाबुडखा नसलेलं मुक्त चिंतन चाललेलं आहे.

"ह्यात काय मजा नाय रांडीच्या ! दुसरं लाव कायतरी"
श्री. प्रवीण पाटील कोल्हापूरकर, यांचा तीव्र रसभंग झाल्याने त्यांनी केलेली फर्माईश ऐकू येतेय.

मग तो दुसरा कुठलातरी मूव्ही पाहत पाहत, ती दुष्काळी भाबडी जनता, किमान मानसिक पातळीवर का होईना, पण एका रम्य आणि गरमागरम प्रदेशात शिरलेली दिसते आहे.

२. एकविसाव्या शतकातसुद्धा यशस्वी प्रेमप्रकरण करणं, ही काही तिथं सहजशक्य गोष्ट नव्हती...
समजा प्रयत्नांती आणि ईश्वरकृपेकरून ते घडलं, तरी ते फार काळ लपवून ठेवणं निव्वळ अशक्य.
कारण वरती सांगितलेलंच आहे की तिथं प्रायव्हसी वगैरे काही कन्सेप्टच नव्हता.. त्यामुळं आज ना उद्या ते प्रकरण सगळ्या होस्टेलभर व्हायचंच.

मग इतर नैराश्यग्रस्त होस्टेलाईट्सच्या कुजकट शेरेबाजीला ऊत यायचा.
उदाहरणार्थ..
"कोण रं ही वैशाली?? तीच का ती ढापणी ?? कालच त्या अमक्या तमक्याबरोबर फिरत व्हती"
अशा वरवर निरूपद्रवी वाटणाऱ्या प्रश्नोत्तरांपासून सुरुवात होऊन, शेवटी शेवटी तो उदाहरणार्थ काळसर गावठी
रोमिओ लाजून गोरामोरा होईपर्यंत,
अचकट विचकट कमेंट्स ऐकायला त्याला भाग पाडले जायचे.

३. कुमारी 'सांगलीवाली' ह्या काल्पनिक एकतर्फी प्रेयसीचा नाद सोडून श्री. औरंगाबादकर नेहमीप्रमाणे टप्पे टाकत इकडं तिकडं फिरत आहेत..!

श्री. औरंगाबादकर ह्यांची सौंदर्यदृष्टी किती कुचकामी होती, हे तुम्ही त्या 'सांगलीवाली'ला पाहिले असता, लगेच लक्षात येईल..!
पण मुलीचा चेहरा, रंग, रूप, बांधा वगैरे गोष्टी
श्री. औरंगाबादकर ह्यांच्या दृष्टीने अगदीच गौण..!
'जे पदरी पडले ते पवित्र झाले', अशी श्री. औरंगाबादकर ह्यांची जीवनदृष्टी..!

तर असे हे श्री. औरंगाबादकर एखादी क्वार्टर मद्य प्राशन केल्यानंतर, ह्या क्षेत्रातले त्यांचे विशेष थिओरेटीकल ज्ञान आणखी मुक्तपणे प्रकट करू लागतात...!

उदाहरणार्थ हे वाक्य घ्या.. ''एखादी मुलगी पटू शकते किंवा नाही, हे मला अंतर्ज्ञानाने आपोआपच समजते''
आता त्यांच्या ह्या वाक्यावर सगळ्या श्रोत्यांनी आदराने उभं राहून टाळ्या वगैरे वाजवायला हव्यात, अशी त्यांची अपेक्षा असते.. पण बधिर झालेले श्रोते फक्त निर्विकारपणे डास मारत राहू शकतात.. किंवा फोन आल्याच्या निमित्ताने तिथून
शिताफीने पळ काढू शकतात..!

तर उदाहरणार्थ अशाच एका दुर्देवी वेळी, अशीच एक कुमारी 'सातारावाली', श्री. औरंगाबादकर महोदयांच्या
स्नेहपूर्ण नजरेस पडलेली आहे...!

परंतु श्री. औरंगाबादकर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे कुमारी 'सातारावाली' ही स्वत:हूनच त्यांच्या प्रेमात घायाळ झालेली होती...
आणि त्यामुळेच, ती प्रेमात व्याकुळ होऊन,
श्री. औरंगाबादकर महोदयांना वारंवार फोन करून भेटीसाठी आग्रह करत होती...!

अर्थात, काही काळानंतर त्या कुमारी सातारावाली हीचे काही रांगडे टणक नातेवाईक, औरंगाबादकरांची 'चौकशी'
करण्यासाठी थेट आमच्या रूमवर येऊन धडकले..
आणि त्यांच्या तावडीत आमचे बिच्चारे रूममेट
श्री. सोलापूरकर एकटेच सापडले..!

चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी उपस्थित असणे, हाच काय तो श्री. सोलापूरकर ह्यांचा दोष..!
माफक दमबाजी केल्यानंतर, ते आडदांड नातेवाईक श्री. सोलापूरकर, ह्या अतिसज्जन मनुष्यास उचलून, त्यांस हॉटेल डीपी येथे पुढील वाटाघाटींसाठी तारण म्हणून घेऊन गेले.

अर्थात, श्री. सोलापूरकर बिच्चारे ह्यांना, अशा पद्धतीच्या आडदांड मनुष्यांसोबत संवाद साधण्याचा काहीच अनुभव नव्हता..! त्यामुळे ते डीपी मध्ये बसून, त्या आडदांड मनुष्यांपुढे फक्त आणि फक्त गयावया करत राहिले..!
पण आम्ही त्या सज्जन सोलापूरकरास दोष देऊ शकत नाही.
मध्यमवर्गीय सुसंस्कृत कुटुंबात साजूक तुपात वाढलेले असे श्री. सोलापूरकर, दुसरे काय करू शकणार होते बरे??

परंतु शेवटी शेवटी ''हा जो कुणी औरंगाबादकर नावाचा
मनुष्य आहे, त्यास आमच्यापुढे हजर केले नाही, तर आम्ही तुझ्या तंगड्या कंबरेतून बाजूला काढू'', अशी धमकी दिली गेल्यानंतर, श्री. सोलापूरकर सज्जन, ह्यांचे सशासारखे
नाजूक ह्रदय लपकन् खालीवर होऊ लागले..!
पण शेवटी ईश्वरकृपेकरून बिच्चाऱ्या सोलापूरकरांच्या
तंगड्या सलामत राहिल्या..!

कारण कुठूनतरी खबर लागल्यानंतर बराच वेळ भूमिगत होऊन बसलेले श्री.औरंगाबादकर,
थेट क्लायमॅक्सला घटनास्थळी प्रकट झाले.

सारांश:

नेहमीप्रमाणेच, ह्या सगळ्या प्रकरणाकडे बघण्याचा श्री.औरंगाबादकरांचा दृष्टिकोन,
आमच्या दृष्टीकोनाहून फारच भिन्न असतो.

श्री. औरंगाबादकर अत्यंत धीरगंभीर आणि प्रगल्भ
दृष्टिकोनातून ह्या सगळ्याकडे बघतात..!

उदाहरणार्थ..
श्री. औरंगाबादकर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे, ते स्वत: अत्यंत जबरदस्त धैर्याने ह्या सगळ्या प्रकरणाला सामोरे गेले..!

तसेच त्या आडदांड नातेवाईकांनी, झालेल्या मनस्तापाबद्दल श्री. औरंगाबादकरांची बिनशर्त माफीही मागितली आहे, असे श्री. औरंगाबादकर ह्यांनी, स्वत:च तोंड वर करून आम्हांस सांगितले..!
आणि विशेष म्हणजे आम्ही त्यावर विश्वास ठेवावा,
अशी अपेक्षाही श्री. औरंगाबादकर ह्यांनी त्याठिकाणी व्यक्त केली..!

परंतु सदर प्रकरणात, श्री.औरंगाबादकर ह्यांनी सपशेल माती खाल्लेली आहे,
तसेच चारदोन फटके मुस्कुटात वगैरे आणि
माफक शिव्यांचा आहेरही श्री. जावईबापू औरंगाबादकर
ह्यांनी सासुरवाडीकडून स्वीकारलेला असणार, हे आमच्या ताबडतोब लक्षात आलं आहे..!

Group content visibility: 
Public - accessible to all site users