अभियांत्रिकीचे दिवस - भाग १

Submitted by पाचपाटील on 13 May, 2020 - 15:39

अभियांत्रिकीचे दिवस - भाग १

आता यात मुख्यतः 'महाराजा'च्या टेरेसवर सुरुवात केलेल्या माफक बीअरपासून घपाघप खंबे पालथे घालण्यापर्यंत सुसाट वेगानं झालेल्या प्रवासाबद्दलच लिहावं लागेल. आणि तो विषय हार्ड होईल. तर असो.

तर अभियांत्रिकीच्या दिवसांबद्दल लिहायचं तर लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स सोडून बाकीच्या गोष्टींबद्दलच लिहावं लागतं.

कारण प्रत्येक सेमिस्टरच्या शेवटी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सामुदायिक थापेबाजीचा, किंवा तोंडात सामूहिक गुळणी धरून इज्जत काढून घेण्याचा एक महोत्सव भरायचा, ज्याला ते लोक 'ओरल्स' म्हणायचे आणि ड्रॉईंग हॉलमध्ये उकाड्यात दहा-बारा दिवस चालणाऱ्या तीन तासांच्या 'काहीतरी लिहून काढायच्या प्रकिया', ज्याला ते लोक 'परीक्षा' म्हणायचे, हे सोडलं तर तुम्ही इतर कुठल्या कारणांसाठी कॉलेजात जावं, अशी काही पद्धत नव्हती तेंव्हा.

कारण तशी काही कुणाची अपेक्षाच नसायची.

तर सगळीकडे चिरेबंद सिस्टीम सेट असायच्या आधीपासूनच.

उदारणार्थ कॉपरेटिव्ह मेस हा एक प्रकार. जिल्ह्यानुसार ग्रुप असायचे आणि ते ग्रुप ह्या मेस चालवायचे. फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेली आपापल्या जिल्ह्यातली बावरलेली पोरं शोधणं आणि त्यांना गंडवून ग्रुपमध्ये भरती करून घेणं, हे सेकंड थर्ड इयरच्या सिनिअर्सचं काम.

ग्रुपमुळे आपल्याला प्रोटेक्शन मिळेल आणि ह्या थोर सिनिअर्सच्या मार्गदर्शनाखाली आपले भविष्य उजळून निघेल, अशा भ्रमात असलेल्या ह्या कोवळ्या पोरांचा भ्रमनिरास व्हायला फार वेळ लागायचा नाही.

काही ग्रुप्समध्ये सिनिअर्सना 'सर' म्हणण्याची सिस्टिम होती तर काहींमध्ये उगाच कौटुंबिक फील यावा म्हणून 'भैय्या' वगैरे म्हणावे लागायचे.

ह्या ज्युनिअर्सच्या सेवाशर्तींचा काही भाग असायचा. उदाहरणार्थ ..

१. हे सर किंवा भैय्या वगैरे मेसमध्ये जेवायला बसलेले असताना त्यांचे हरप्रकारे मनोरंजन करणे

२. जेवताना कुणी सिनिअर आला तर सगळ्या ज्युनिअर्सनी एकाच वेळी ताडकन उठून उभं राहून त्याला सलामी देणे

३. त्यांची सबमिशन्स पूर्ण करून देऊन त्यांच्याप्रती नसलेला आदर व्यक्त करणे

४. मंडईतून भाज्या वगैरे आणायची हमाली कामं करताना नेमकं कुणी ओळखीच्या पोरीनं पाहून फिदीफिदी हसत जाऊन लाजल्यासारखं होऊ नये, ह्याची काळजी घेणे

५. आणि अधून मधून आदेश आल्यावर त्यांच्या हॉस्टेल ब्लॉकमध्ये जाऊन 'इंट्रो' च्या नावाखाली ह्या आंबटशौकीन किंवा ठर्की सिनिअर्सचे उर्वरीत मनोरंजन करणे, ज्याला अश्लील असा एक सुंदर शब्द होता. पण असो.

सेवाशर्तींचा भंग केल्यास 'ग्रुपधून काढून टाकायची' क्रूर धमकी मिळायची. ह्या धमकीमध्ये मूळातच काही दम नाही, हे त्या वेळी समजलेलं नसायचं. म्हणून ह्या धमक्यांना घाबरायची ज्युनिअर्समध्ये पद्धत असायची.

तशीच लोकल आणि नॉन लोकल अशी एक स्पष्ट विभागणी तिथे असायची.

आणि 'नॉन-लोकल पोरांनी लोकल पोरांना घाबरायचं' अशी एक पद्धत त्याच शहरातल्या काही चॅप्टर पोरांनी तिथे आधीच सेट करून ठेवली होती.

पण तो आणखी एक विषय..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तचं

आम्ही लोकल प्रकारामध्ये मोडायचो. Wink

मेसमध्ये फॉर्मल ड्रेस घालून जायचं, सकाळी नौला, संध्याकाळी ७:३० ला, नमस्ते मावशी म्हणून हात धुवायचे, जेऊन सिनियर्सच्या उलटसुलट प्रश्नांना उत्तरे द्यायची, इंट्रो द्यायचे, गाणी म्हणायची, कधी कधी त्यांची सबमिशनं करायची, ८-९ महिने हे टिकलं की मग फ्रेशर्स पार्टी. काय वाट्टेल तो प्रकार होता ग्रुपच्या कॉऑपरेटिव्ह मेस म्हणजे.