अभियांत्रिकीचे दिवस भाग - ४

Submitted by पाचपाटील on 25 May, 2020 - 10:54

भाग १
https://www.maayboli.com/node/74581

भाग २
https://www.maayboli.com/node/74585

भाग ३
https://www.maayboli.com/node/74605

DP च्या जवळच 'शाही गार्डन' म्हणून एक प्रकार असायचा.
फर्स्ट इयरला असताना सुरूवातीला एकदा मेसमध्ये सिनिअर्सनी फर्मान काढलं की "जेवून लगेच शाही गार्डनला या".

फॉर्मल शर्ट-पॅण्ट वगैरे घालून, एका छत्रीत दोघं भिजत, शोधत-विचारत,
कावरा-बावरा मोड ऑन करून तिथं गेल्यावर पाहतो, तर मेसची 'महत्त्वाची' वगैरे मीटिंग चाललेली.

तर मेस-मिटींगच्या नावाखाली तिथं एकत्र जमण्याचे तीन हेतू असायचे.
एक म्हणजे मेसच्या गंडलेल्या हिशोबांचे दोष एकमेकांवर किंवा पास आऊट झालेल्या अज्ञात सिनीअरवर ढकलणे,
दुसरं म्हणजे मंडईत जाऊन बाजार आणायचा नंबर चुकवणे.

आणि दहा मिनिटांत ही रेटारेटी उरकून मग आंबटशौकीन सीनीअर्स तिथंच 'इंट्रो'चे आणि
"मैं *** अगले चार साल तक अपने सिनीअर्स के **** छत्रछाया में **** करता रहूंगा"
अशा सुरू होणा-या 'इंजिनीयरींग प्रतिज्ञेचे' अजून एक-दोन राऊंड पार पाडायचे.

त्यांचं पुरेसं मनोरंजन होऊन सगळं आटोपलं की मग सर्वांना १/२ च्या हिशोबानं कॉफी मिळायची. पण तिची चव नक्की कशी आहे, हे चेक करायच्या आतच ती खलास व्हायची.

फर्स्ट इयरला असताना 'शाही गार्डन' मध्ये बर्थडे वगैरे सेलिब्रेट करायची पद्धत होती.
पण हे सुरुवातीचे बर्थडे साजूक तुपातले, निरागस आणि संस्कारक्षम वगैरे असायचे.
म्हणजे सगळे इज्जतीत पाच-पाच रुपये 'काँट्री' काढायचे आणि केक घेऊन 'शाही गार्डन'ला जमा व्हायचे.

मग "ज्याचं वय आपोआपच एका वर्षानं वाढलेलं असायचं" तो लाजत लाजत केक कापायचा.
सगळे जण इज्जतीत एकाच वेळी टाळ्या वगैरे वाजवायचे.
लगेच त्यातलाच समाजसेवेची आवड असलेला एक जण केकचे पीस करून सगळ्यांना वाटायचा.

मग सगळेजण "ज्याचं वय आपोआपच एका वर्षानं वाढलेलं असायचं" त्याला शुभेच्छा देऊन, त्याची माफक प्रमाणात चेष्टा मस्करी करून वातावरण हलकं फुलकं करण्याचा आपापल्या पद्धतीनं प्रयत्न वगैरे करायचे, जे अर्थातच फुसके असायचे.

आणि शेवटी होस्टेलला जाऊन "लय मजा आली" अशी स्वतःचीच समजूत काढत झोपायचे.

पण जसजसे दिवस पुढं सरकायला लागले तसतसे संस्कारांचे एकेक पापुद्रे जवळच्याच नदीच्या पुलाखालून वाहून जायला लागले.
आणि एकेकाचं अस्सल रूप ढुश्या देऊन देऊन बाहेर पडायला लागलं.
मग बर्थडे सेलिब्रेशनमध्ये, एक्साइटमेन्टची जी आदिम आणि मूलभूत चाह असते, ती जोर पकडू लागली.

आणि या प्रकारात आदिमानवांच्या टोळीला तोडीस तोड असा एक हिंस्र रानटीपणा येत गेला.
घोळका-पद्धतीनं शिकार करण्याचं तंत्र विकसित करण्याचं श्रेय निर्विवादपणे ह्या पोरांकडेच जातं.

तर त्यांची एक विचारपूर्वक डिझाईन केलेली मेथडॉलॉजी असायची.

उदाहरणार्थ..

१. "ज्याचं वय आपोआपच एका वर्षानं वाढलेलं असायचं", तो रात्री १२ वाजता जिथं कुठं असेल त्याचा शोध घेऊन, तिथं दबा धरून धाड घातली जायची.

त्याच्या शरणागत विनंती-अर्जांकडे निष्ठुरपणे दुर्लक्ष करून त्याला मध्ये घोळक्यात घेतलं जायचं.
आणि त्याच्या देहरूपी अस्तित्वाचा जो कुठला भाग डोळ्यांपुढे येईल त्याच्यावर हेलिकॉप्टर स्टाईलने हाता-पायांचा धुंवाधार वापर व्हायचा.

ह्या धुमश्चक्रीचा आवाज ऐकून आसपासच्या गुहांमधले समाधिस्त आदिमानवही सुपरफास्ट वेगानं घटनास्थळी दाखल व्हायचे.
आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आव आणत स्वत:ही हात धुवून घ्यायचे.

बड्डे बम्प्सच्या ह्या प्रकाराला त्या वेळच्या आदिमानवांमध्ये
''अगायाया ! लई वाईट तुडवला!''
"बेक्कार हाणला त्येला !"
असं लाडानं म्हणायची पद्धत होती.

२. मग दुसऱ्या दिवशी सकाळपासून निगोसिएशनचे राऊंड चालू व्हायचे.
मुद्दा तोच- "कुठं बसायचं संध्याकाळी ?"

मग संध्याकाळपर्यंत 'रिलॅक्स'सारख्या चांगल्या बारपासून पासून निगोशिएट करत करत शेवटी संध्याकाळपर्यंत सगळेजण आपापल्या 'औकाती'वर यायचे.
आणि 'जिव्हाळा'सारखी आपापलं पार्सल आणून मनसोक्त 'बसून' मग जेवू देण्याची स्वस्त ठिकाणं गाठली जायची.

३. हळू हळू चढत जाणाऱ्या मैफिलींमध्ये कधीतरी एक तरल भावनिक अवस्था सामुदायिकरीत्या यायची.
आणि सगळेजण 'एकमेकांची लाल करण्याच्या' मूडमध्ये अलगद प्रवेश करायचे.

"तू पण चांगला. मी पण चांगला. आपण सगळेच चांगले." अशी तत्वज्ञान्यांना अभिप्रेत असलेली वैश्विक बंधुभावाची भावना तिथं ओतप्रोत होऊन ग्लासमधून सांडायला-लवंडायला लागायची.

आणि "ज्याचं वय आपोआपच एका वर्षानं वाढलेलं असायचं" त्याला 'त्या क्षणी' बिलाचं काही वाटायचं नाही.

कारण आठव्या नवव्या स्वर्गात तरंगणारं त्याचं मन पैशांसारख्या क्षुद्र वगैरे गोष्टींच्या फार फार पलीकडे गेलेलं असायचं.
ते पार पाघळून मायाळू मायाळू झालेलं असायचं....

मग हळूहळू कधीतरी मध्यरात्रीनंतर सगळ्यांची तरंगणारी हेलिकॉप्टर्स खुष्कीच्या मार्गानं होस्टेलच्या 'चायनागेट'वरून उड्या मारून चाचपडत कुठल्यातरी रूममध्ये लँड व्हायची.

तसे काही अस्सल नमुनेही होते त्या काळात, नाही असं नाही.
उदाहरणार्थ आमचे फोकनाडशेठजीच घ्या!!

'होस्टेल ब्लॉक-C' नामक मठातली एक रूम म्हणजे आद्यगुरू फोकनाडशेठजींचं मूळ स्थान.
शेठजी, तिथं नेहमीच भरणा-या दरबारात ढगांतूनच बोलत असायचे.
आणि समोर जबरदस्तीने बसवून घेतलेले भक्तगण.

"मीच कसा अर्जुनासारखा खराखुरा श्रेष्ठ आणि एकमेव पुरूष! आणि तुम्ही सगळे नालायक!!''
"ह्या परिसरातल्या सर्व सौंदर्यस्थळांवर प्रेम करणं, हा माझा ईश्वरदत्त अधिकारच आहे."
"आणि असा हा मी, सर्वश्रेष्ठ असल्यामुळे, सौंदर्यस्थळं मला आपोआपच वश होतात, हे तुम्हा दळींदरांना कुठून समजणार?"

अशा अर्थाच्या थापांची रसरशीत मांडणी भक्तांपुढं चाललेली.

शेठजींनी सुरूवातीलाच सगळ्यांचं नेतृत्व स्वत:च स्वत:कडे घेतलेलं.
ह्यांचा एक SWAG होता.
हे रोज स्वस्तातली दारू प्राशन करायचे.
धुंद होऊन आंबटशौकीन भक्तांच्या शंकांचे निरसन करायचे.
'उतरली' की दिवसभर परिसरात वासूगीरी करत फिरायचे.

'तुझे डोळे खूपच सुंदर आहेत !'
'तुझे केस खूप सुंदर आहेत !'
'तू किती क्यूट हसतेस !'

असं रोज नियमितपणे दहाजणींना म्हणून यायचे.

मग दहातल्या पाच प्रकरणात फटके !
दोन प्रकरणात यशस्वी पलायन !
दोन प्रकरणात माफी मागून सुटका !

आणि चुकून एखाद्या प्रकरणात जो काय तुटपुंजा मेळ लागेल, त्याची स्वत:च गावभर दवंडी !

ऐसा ह्या शेठजींचा ढिला कारभार...!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंय... Potential खूप आहे यात. पण आळस नडतो... आणि या आळसाची मूळं सुद्धा त्याच कॉलेजच्या दिवसांत रूजलेली आहेत खोलवर... D Lol

मस्त... खुसखुशीत !
आळस झटकून लिहा, वाटल्यास तुमचं सबमिशन्स समजा Happy