अभियांत्रिकीचे दिवस - भाग ५

Submitted by पाचपाटील on 27 May, 2020 - 02:55

भाग १
https://www.maayboli.com/node/74581
भाग २
https://www.maayboli.com/node/74585
भाग ३
https://www.maayboli.com/node/74605
भाग ४
https://www.maayboli.com/node/74799

ओरल्सचं टाईमटेबल लागलं की नैराश्याचा भलामोठ्ठा काळाकुट्ट ढग सगळा कॅंपस व्यापून टाकायचा.
ओरल्सच्या तयारीमध्ये मुख्य म्हणजे चेहऱ्यावर, डोक्यावर स्टाईल म्हणून मोठ्या प्रेमानं लागवड केलेल्या, विषुववृत्तीय जंगलाची सफाई करून, शक्य तितकं 'गोंडस बाळ' दिसण्याचा प्रयत्न करणे आणि सकाळी- सकाळी दारोदार युनिफॉर्म उसना मागत फिरणे, या दोन गोष्टी महत्त्वाच्या....
बाकी देवाक काळजी..!

काळ : आणीबाणीचा
वेळ : ओढवलेली
प्रसंग : ठासलेला
पात्रे : फेस आलेली

डिपार्टमेंटच्या पॅसेजमध्ये तीस-चाळीस पोरं/पोरी फायलींमध्ये माना घालून वेगवेगळ्या पोजमध्ये बसलेली.
वाचता वाचता भीतीनं पोटात उठणारे सूक्ष्म खड्डे आणि सशासारखं पिटपिटणारं काळीज एकमेकांना कळू न देण्याचा प्रयत्न.

डिपार्टमेंच्या पुढच्या मोकळ्या जागेत प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्सचे सेट-अप लावून ठेवलेले.
आधी प्रॅक्टिकल करायचे आणि मग ओरल द्यायची अशी सिस्टीम.

निअँडरथल मानव ज्या मेंदुहीन आणि दगडी चेहऱ्यानं iPhone कडे बघेल, डिट्टो तसाच बथ्थड भाव रीडिंग घेणाऱ्यांच्या चेहऱ्यांवर.
कशाचा कशाला संबंध नाय !

मग उगाच आपलं ट्रायपॉड हलवून बघा.
इंस्ट्रुमेन्टचा एखादा स्क्रू फिरवून बघा.
टेलीस्कोपशी खुटपूट करत, काय दिसतंय का ते बघा.
असले येडे चाळे करत टाईम किल करणारी जनता.

एखादा खाटीक कोंबड्यांच्या खुराड्याजवळ आला की कोंबड्यांमध्ये प्राणभयानं हलकल्लोळ माजतो.
एक्सटर्नल एक्झॅमिनरची डिपार्टमेंटला एन्ट्री झाली की पॅसेजमधल्या पोरांमध्ये सेम तशीच भयग्रस्त चुळबुळीची लाट पसरत जायची.

तिकडे इंटर्नलच्या केबिनमध्ये सामुदायिक कत्तलीची पूर्वतयारी पूर्णत्वास.
चहा ब्रेकफास्ट आटपून दोन्ही एक्झॅमिनर्स हत्यारांना तेल लावून भूमिकेत ऐसपैस शिरलेले.

"चला sss पयले चार नंबर आत चलाsss" प्यूनची उद्ग्घोषणा.

त्या पहिल्या चार कोंबडा/कोंबडींच्या डोळ्यांत साक्षात काळाशार आणि थंडगार मृत्यू गोठलेला !!
त्यांना बाहेर यायला जसजसा उशीर होईल तसतशी बाहेरच्या कोंबड्यांची वाढती फडफड.
आणि भीतीने तुटेपर्यंत ताणलेल्या नाजूक धाग्यावर भावनांचे वर-खाली हेलकावे...

आतले बाहेर आले की त्यांच्याभोवती गराडा घालून प्रश्न जाणून घ्यायचा प्रयत्न.
पण त्यांचे रंग उडालेले चेहरे आणि नुकत्याच बसलेल्या जबरदस्त मानसिक धक्क्यातून सावरत सावरत तोंडातून कसेनुसे ओघळणारे शब्द, मॅच व्हायचे नाहीत बऱ्याचदा.
मग ते नुसतेच आक्षेपार्ह हातवारे करत भावना पोचवायचे.

उरलेल्या कोंबड्याही खाटकांच्या तावडीत सापडत राहतात.
चार-चार जण जात राहतात...
आणि आयुष्यातून ऊठल्यासारखे बाहेर येत राहतात.

अशीच एक ओरल.
असाच आमचा नंबर.
नुकताच बाथरूममधून एकाशी युनिफॉर्म एक्सचेंज करून आलेला मी,
केबीनच्या दाराशी उसनं हासू आणत केविलवाणा उभा.

"काय व्हायचंय ते होऊन जाऊ दे एकदाचं!"
अशा निराश खच्ची अवस्थेत शरीर आपोआप आत ढकललं जातं.
पण मन मात्र कसल्यातरी चमत्काराच्या आशेत.

आत चार स्टूल्स... बसलो.
डाव्या बाजूला मुलगी...क्लास टॉपर वगैरे कॅटेगरी..!!
तिचा काही प्रश्नच नाही..!
प्रश्न आमचाच होता..!
कारण उजव्या बाजूचे दोघेजण माझ्याहून दळींदर आणि ओवाळून टाकलेले.

इंटर्नलशी दीदार-ए-यार !!
"तुझं सरलं गड्या !!" असा खुनशी भाव त्यांच्या डोळ्यांत.

थरथरत्या मांड्यांवर फाईल घट्ट धरून बसलेला मी.

"ट्रसची bending moment किती असते?? तू सांग रेsss"
पहिला बाण सणसणत माझ्या दिशेनं.
माझ्या कानशिलांमधून गरमागरम लाव्हारस ओघळायला सुरुवात.
त्याचवेळी घशाला कोरड आणि पाठीच्या मणक्यातून थंड शिरशिरी.

"क्.. क्.. कमी असते सर" माझा बचावात्मक पवित्रा..!

ऊजवीकडच्या दोन्ही दळींदरांच्या खरखरत्या घशांमधूनही माझ्याच गंडलेल्या उत्तराचा हुबेहूब प्रतिध्वनी.
मग एकतर्फी प्रश्न येत राहिले आणि आम्हा तिघांच्या ठार मठ्ठ चेहऱ्यांवर आदळून बाउन्स होत राहिले.

"एवढं साधं साधं आणि बेसिक विचारतोय...ते पण तुम्हाला सांगता येत नाय."
"काय उपयोग आहे तुमचा ?"
असं म्हणत म्हणत मध्येच आमच्या फायली बघायला सुरुवात.

"बाप रे..! हे काय लिहिलंय !! कसं लिहिलंय !!
अरे राजाsss...हा रिडींग्जचा टेबल आहे ...
And this reading should be '0.1'
But you have written 'oil'.
एखादं रिडींग 'oil' कसं काय असू शकतं?? एवढी पण अक्कल लावता येत नाय का कॉप्या करताना ?"

आश्चर्याचा धक्का बसल्याचं एक्सप्रेशन आणायचा माझा प्रयत्न होता, पण ते काय जमलं नाही.
चेहऱ्यानं ऐनवेळी दगा दिला.
तो कंट्रोलच्या बाहेर जाऊन आपोआपच छिन्नविछिन्न आणि खिन्नमनस्क व्हायला लागला.

आमची घेता घेताच, दोन्ही एक्झामिनर्सची एकमेकांच्या कानांत अधूनमधून फुसफुस आणि नंतर फिदीफिदी... नंतर गडगडाट...!

आता आमची शेजारीणसुध्दा रिलॅक्स होऊन त्या कुजकट हसण्यात सामील व्हायला लागली.

तेव्हा उरली सुरली आब्रू वाचवणं आवश्यक होतं.
म्हणून मी समोरच्या रफ वर्कसाठीच्या चिठोरीवर, विचारलेल्या प्रश्नाचं calculation करण्यात गुंग झाल्याचं ढोंग चालू केलं.

शेजारच्या येड्याला वाटलं की त्याला चिठोरी दिलीय ती अटेंडन्स मार्क करण्यासाठीच.

'आला कोरा कागद की भरा त्याच्यावर अटेंडन्स', अशी त्याची आयुष्यभराची तपश्र्चर्या..!

त्यानं लगेच त्यावर इज्जतीत नाव, सीट नंबर आणि सही करून त्याच्या शेजाऱ्याला पास केली.
त्यानं पण तेच केलं.
मग अजून बेअब्रू...बेअब्रू स्क्वेअर...बेअब्रू क्यूब.!

शेवटी शेवटी आमच्यासारख्या निगरगठ्ठयांकडून काहीही अपेक्षा करण्यात अर्थ नाही, हे समजल्यामुळे ते स्वतःच कुठलातरी कन्सेप्ट समजावून सांगायला लागले.

"बेडूक कशा झिगझॅग उड्या मारतो ते बघितलंय का तुम्ही कधी ? एक उडी मारतो.. मग थोडा वेळ थांबतो.. इकडं तिकडं बघतो.. मग पुन्हा उडी मारतो.. थोडा वेळ थांबतो.. मग पुन्हा उडी मारतो...अगदी तसंच ह्या प्रोसेसमधला इलेक्ट्रॉनपण करतो.. आता तरी कळलं का तुला ?"

"........"

"हं... मग सांग बघू आताss"

"........"

"बोल कीsss''

"गुडबुडबुडगुडफुसफडुस"

"मोठ्यानं बोल sss...काय तोंडातल्या तोंडात पुटपुटतोय ?"

आमचा शेजारी म्हणजे आधीच फ्यूज्ड बल्ब !
पण प्रकरण अगदीच हातघाईवर आल्यावर त्याला 'शरम' या‌ भावनेचा स्पर्श झाला.
आणि तो लाजत मुरकत कबूल करत बोलला.

"सर... ते बेडकाचं कळलं... पण हे इलेक्ट्रॉनचं काय नाय कळलं वो !!"

आणि ह्या उत्तरासोबतच एक्सटर्नलचा पेशन्स संपला आणि तिथं एक मोठा स्फोट होऊन तातडीनं आमची बाहेरच्या दिशेनं रवानगी करण्यात आली.

" सबमिशन जपून ठेवा sss.... पुढच्या वेळी लागेलच !!"

असा एक्सटर्नलचा दाट खर्जातला आवाज लगेचच मागून आला आणि त्याचबरोबर निकालसुध्दा समजला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त लिहिलंय Lol

वाचता वाचता भीतीनं पोटात उठणारे सूक्ष्म खड्डे आणि सशासारखं पिटपिटणारं काळीज एकमेकांना कळू न देण्याचा प्रयत्न. >>>

सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. Happy

आमची घेता घेताच, दोन्ही एक्झामिनर्सची एकमेकांच्या कानांत अधूनमधून फुसफुस आणि नंतर फिदीफिदी... नंतर गडगडाट...! >>

तंतोतंत वर्णन केलंय.. मी कोंबडी आणि खाटीक दोन्ही भूमिका बजावल्यामुळे वाचताना खूपच मजा आली Happy

तंतोतंत वर्णन केलंय.. मी कोंबडी आणि खाटीक दोन्ही भूमिका बजावल्यामुळे वाचताना खूपच मजा आली >>>>
धन्यवाद मॅडम..!! D Lol Lol

खल्लास ! आमचे दिवस आठवले! अजूनही तीच परंपरा चालू आहे, Happy
आमचे HOD आम्हाला बैल म्हणायचे आणि आम्ही सर्व जण माना हलवायचो, त्यांनी शेवटी हात टेकले होते आमच्या समोर पण आम्हा कुणात काही बदल नाही. त्यात आमचे इंग्लिश म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी!
सदाशिव गडावरील सर्वे पण असेच.
रम्य दे दिवस!

धन्यवाद मॅडम..!! >>> मॅडम म्हणू नका. मी एकदम साधारण व्यक्ती आहे. इथे सगळे सारखेच. खूप छान लिहिताय पण. Happy

हाहाहा Lol मजा आली वाचायला!! खाटीक आणि कोंबड्यांंची उपमा परफेक्ट.
एकदा अशाच एका ओरलला मजा झाली होती. आदल्या दिवशी ज्यांची ओरल झाली होती त्यांनी सांगितलं की एक्स्टर्नल तर फाडाफाडी करतायतच, वर आपल्या इंटर्नल mam पण फाडतायत. एकंदर कत्तल चालू आहे. मी आदल्या रात्री जेमतेम पहिला chapter वाचला आणि जी काही झोप आली, बाकीचं उद्या सकाळी लवकर उठून वाचू म्हटलं. पण अशा वेळी सकाळी जाग येत नाही Sad सकाळी उठून जेमतेम आवरून ओरलला. Practical चा प्रश्न नव्हता, भीती ओरलचीच होती. पाच जणींना आत बोलावलं. मनाचा धडा करून आत गेलो. एकीला उत्तर आलं नाही, की तोच प्रश्न दुसरीला. असं करत करत सगळे प्रश्न माझ्यापर्यंत येत गेले आणि मला सगळी उत्तरं येत गेली कारण सगळेच प्रश्न बेसिक (मी वाचलेल्यातलेच) होते. शेवटी एक्झामिनर माझ्यावर खूष होऊन म्हणाल्या, तू जा.
कत्तलीच्या अपेक्षेने गेल्यामुळे तरंगतच बाहेर आले Lol

ओरलचा माहौल सहीये एकदम
माझा एक ओरल पार्टनर गाॅगल घालून आला होता आणि external ना डोळे आले आहेत असे सांगितले. त्याला लगेच बाहेर काढले आणि शेवटच्या बॅचला बोलावले. त्याने दोन दिवस रट्टा मारून ओरल काढली होती.

आबाबा नको त्या आठवणी.एमटीव्ही रोडीज ऑडिशन ची आयडिया अश्याच एखाद्या ओरल्स 'राहिलेल्या' अभाग्याने जगावर वचपा काढायला आणलेली असणार.(ते दोन्ही रघु आता एकदम भेंडीची भाजी झालेत का?कुठे काही आरडाओरडा ऐकू येत नाही.)

Very aptly written.
The carnage. The terror.
The sheer disappointing feeling of complete uselessness.

पण जगलो, वाचलो आणि पुढे गेलो ☺️

छान लिहीताय. येऊ दे अजून.

भारी लिहिलंय!

माझाही एक असाच अनुभव आहे. मॅन्युफॅक्चरींग इंजिनियरिंग ( की वर्कशॉप टेक्नॉलॉजि) असा काहीतरी विषय होता. त्याची ओरल वर्कशॉपमध्ये होत असे. वावेप्रमाणेच 'दुसर्‍या दिवशी लवकर उठून करू' म्हणून ठरवलेला अभ्यास कुंभकर्णाच्या कृपेने काही झाला नाही. त्यात वर्कशॉपचं पुस्तक एरवी कोण वाचतो? जर्नल पण मागच्या वर्षाच्या कुणाचं तरी बघून उतरवून काढलेलं. सगळाच आनंद होता. ओरलमध्ये मी आणि माझ्या पुढचा रोलनंबर सुमित, दोघांना एकदम बोलावलं. मास्तरच्या एकाही प्रश्नाला आम्हाला धड उत्तर देता येईना. मग वेगवेगळ्या टूल्स्ना काय काय म्हणतात, प्रोसेसेस ची नावे - सगळं नव्याने मास्तरच सांगत होता आणि आमची प्रत्येक बॉलला दांडी उडत होती. शेवटी वैतागून तो म्हणाला की आता शेवटचा एकच प्रश्न विचारतो, तो आला नाही तर तुमची व्हायवा ठेवणार. आम्ही मेल्याहून मेल्यासारखे झालो. मग त्या मास्तरने सुमितचं जर्नल उघडलं, एक रँडम पान उघडून तिथे त्याने काढलेल्या डायग्रॅमवर बोट ठेऊन म्हणाला, "ह्यात काय चूक झाली आहे ते सांगा". मी पाहिलं आणि लगेचच माझ्या ओठावर आलं होतं की 'व्ह्यु फर्स्ट अँगलचा आहे आणि सिंबॉल थर्ड अँगलचं काढलंय'. पण माझा आविर्भाव बघून मास्तर म्हणे - "तू थांब. ह्याला सांगू देत". सुम्याने थोडा विचार केला आणि काहीतरी वेगळंच उत्तर दिलं. मी मनातल्या मनात सुम्याला लय शिव्या घातल्या. तर त्यावर मास्तर म्हणे, 'बरोबर, नशीब, हे तरी लक्षात आलं!' ..... इथे मी मास्तरचे, मला उत्तर देऊ न दिल्याबद्दल, किती आभार मानले असतील, सांगणं अवघड आहे!

लेख खूपच भारी झालाय.. ओरल च्या मनस्थितीचे अचूक वर्णन केलेय..वावे तुमचा आणि शंतनूचा किस्सा पण भारीच

जबरदस्त Lol !
आम्हाला सर है के पत्थर है म्हणाले होते सर Lol , अगदी योग्य वर्णन. स्वतःच नीट शिकवत नाहीत आणि आम्हाला पत्थर म्हणतात असे बोलत बोलत स्ट्रेस हलका करण्यासाठी पाणी पुरी खायला गेलो होतो !! आजतागायत कधीही आत्मविश्वास आला नाही पास झाले की चमत्कार किंवा अपघात वाटायचा Happy
लिहीत रहा.
धन्यवाद Happy

असुफ, mi_anu, अथेना >>> धन्यवाद Happy

खाटीक आणि कोंबड्यांंची उपमा परफेक्ट.>>> धन्यवाद वावे Proud

धनवंती>> ओरलचा माहौल सहीये एकदम>>>:) धन्यवाद

किस्सा भारीय शंतनू >>>:G

मी_ अस्मिता >>" स्वतःच नीट शिकवत नाहीत आणि आम्हाला पत्थर म्हणतात" >>> तुम्ही अगदीच मूलभूत मुद्याला स्पर्श केला. :G:G... पण तो अजून एक विषय होईल.

तसा मी काही लिहिण्याच्या वगैरे भानगडीत पडलो नव्हतो कधी. Wink
पण 'जमतंय का बघू' म्हणून सुरुवात केलीय अलीकडेच आणि इथेच. Happy
त्यामुळे फीडबॅकसाठी सर्वांचे पुन्हा एकदा आभार...!!

मस्तच एकदम. खूप हसलो.

आम्हाला बी एम सी सी ला कॉस्टिंगला प्रकाश भोंडे (ह्यांना जास्त रस सांस्कृतिक प्रोग्रॅममध्ये होता) म्हणून एक मास्तर होते. व्हायवाला एक्स्टर्नल बरोबर ते पण होते. मॅन्युफॅक्चरिंग युनिटला व्हीसीट असलं काहीतरी भिकार असाईनमेंट होतं. अर्थात 90% मुलांनी स्वस्तिक रबर, खडकी या कम्पनीला 'भेट' दिली होती. मी पण त्यातला एक. आमची व्हायवा पूर्ण वर्गासमोर व्हायची:) माझा नंबर आला भोंडे नि विचारले कुठे व्हिजिट दिली? म्हटलं 'स्वस्तिक रबर'. कुठे आहे? खडकीला? कसा गेला? आता माझी टरकली. थोडं थांबून म्हटलं लोकल ने. मग पुढचा प्रश्न, ओके लोकल ने गेला , खडकीला उतरल्यावर ही कम्पनी कुठल्या बाजूला आणि साधारण कुठे आहे? झालं .. मी एकदम ट्रान्स मधेयच गेलो. Happy मग त्याने अशी काही इज्जत काढली बाप रे बाप. आणि वर ह्याला मी 0/20 देत आहे हे बघा आणि सर्वाना तो भोपळा दाखवला. पुढे 2 दिवस त्याच्या नाकदुऱ्या काढल्या, एकडाव मापी द्या मायबाप अशी विनवणी केली आणि भोपळ्याचे 8 करून घेतले. Happy

अशीच व्हायवा लॉची असायची. महा डेंजर प्रकरण. फर्स्ट इयर का थर्ड इयरला एक केस फॉलो करयची होती पूर्ण वर्षभर आणि जर्नल मध्ये एन्ट्री करायची होती. नेहेमीप्रमाणे कॉपी केली. व्हायवाला नीलिमा भडभडे होत्या. त्या आम्हाला मूट कोर्टला पण होत्या. त्यांनी विचारलं कोणती केस फॉलो केली ? कुठल्या कोर्टात? समोर त्यांना बघून आणि मागचा बी एम चा अनुभव गाठीशी असल्याने लगेच सांगितलं की मी हे कॉपी केलंय:) ओके म्हणून त्यांनी इतर प्रश्न विचारले.

लॉ कोर्सची मूट कोर्ट प्रकरण असंच डेंजर. 3 मूट 30 मार्क प्रत्येकी. ऑड नंबर वादि इव्हन प्रतिवादी. तर कधी उलटं. केसेस वर्षाच्या सुरुवातीला लागत. भडभडे बाई मूटला. आय एल एस चे मूटचे काही क्लासरूम आहेत समोर कोर्ट (पक्षी प्रोफेसर) आणि वर्गाच्या बरोबर मध्ये एक लाकडी बॉक्स टाईप टेबल ज्याच्या मागे उभे राहून अर्ग्युमेंट करायचं. भडभडे बाईंचे प्रश्न इतके टू द पॉईंट असायचे की सपशेल माघार घ्यावी लागे. प्रचंड हुशार. आय एल एसचा त्या वेळचा स्टाफ फारच भारी होता (२००1 ते 2004/05). तेंव्हा लॉसाठी कायम पहिलं किंवा दुसरं रँक होतं कॉलेजचं पूर्ण भारतात.
अजून खूप गमती आहेत लिहिण्यासारख्या कारण लॉ कोर्स ला असाईनमेंट आणि प्रॅक्टिकल लय म्हंजे लय असायची. तुमच्या लेखामुळे आज हे सारे आठवले. धन्यवाद:)

अर्थात 90% मुलांनी स्वस्तिक रबर, खडकी या कम्पनीला 'भेट' दिली होती. >>>> P Proud Proud

माझा नंबर आला भोंडे नि विचारले कुठे व्हिजिट दिली? म्हटलं 'स्वस्तिक रबर'. कुठे आहे? खडकीला? कसा गेला? आता माझी टरकली. थोडं थांबून म्हटलं लोकल ने. मग पुढचा प्रश्न, ओके लोकल ने गेला , खडकीला उतरल्यावर ही कम्पनी कुठल्या बाजूला आणि साधारण कुठे आहे?>>>>> हे भारीय.. D Lol Lol

अशीच एक ह्रद्य आठवण लॉ थर्ड इयर drafting, pleading and conveyancing च्या व्हायवाची . आम्हाला कानिटकर म्हणून मास्तर होते. व्हिजिटिंग फॅकल्टी. पुण्यातले प्रसिद्ध वकील आहेत हे. ह्यांचं लेक्चर सकाळी 7.10 ला असायचं. 100 एक मुलं एवढया सकाळी बरोबर हजर असायची. कारण ह्या विषयाचं जर्नल लाईव्ह असायचं म्हणजे 30 draft / ऍग्रिमेंट पूर्ण वर्षभरात त्या जर्नल मध्ये लिहायची, एक draft 3 मार्कना आणि 10 मार्क व्हायवा. मास्तर सांगणार आणि आम्ही ते उतरवायचे. आणि लेक्चर झालं की जर्नल सबमिट करायचं लगेच. What? Can you repeat? Wait.. last sentence please.. come again please..Pardon me. असं करतच लेक्चर अन draft आटपत. ह्या शब्दांची इतकी सवय असे की वाक्य लिहून झालं तरी मी कित्येकदा can you please repeat? असं म्हटलंय आणि त्यांनी रिपीट केल्यावर त्यांच्याकडे बघत बसायचं Happy त्यांचं इंग्रजी एकदम तर्खडकरी . कित्येकदा त्यांना चपखल शब्दच सापडत नसे तेंव्हा ते चक्क एकटिंग करून दाखवत Happy तर व्हायवाच्या आदल्या दिवशी एका क्लासमेटचे वडील गेले आणि तरी ही मुलगी व्हायवाला आली. सरांना ते समजलं, ते इतके हळवे होते की ते प्रचंड अस्वस्थ झाले. अशा परिस्थितीत ती मुलगी आली हे त्यांना खूपच बोचलं. त्या मुलीशी ते बोलले आणि चक्क डोळे पुसत इतर मुलांच्या व्हायवा न घेता निघून गेले. आमची व्हायवा दुसऱ्या दिवशी झाली.. Happy

थर्ड इयरला इलेक्ट्रॉनिक डिझाइन नावाचा विषय होता. दोन्ही सेमिस्टरला. पण पेपर नाही, फक्त व्हायवा. तर त्या सबमिशनमधे शेवटशेवटच्या एका डिझाइनमधे एक महत्त्वाचं calculation होतं जे मी केलं होतं आणि बाकी सर्वांनी ते माझ्याकडून कॉपी केलेलं. आणि वाईट म्हणजे ते चुकलेलं होतं. Lol माझा रोल नंबर बराच नंतर होता. तोपर्यंत सगळ्यांची सेम चुकीची उत्तरं बघून सर भंजाळले. शेवटी त्यांनी विचारलंच, कुणाचं कॉपी केलंय? मलाही बाहेर ही बातमी कळलीच. ओरलला गेल्यावर सर हसत हसत म्हणाले, so you are the culprit Happy पण ते चांगले होते. काय चुकलंय ते नीट समजावून सांगितलं त्यांनी.

Lol Lol

जबराट Happy
Clg चे दिवस आठवले
Prac च्या ह्या एका दिवसासाठी internal शी पंगा घ्यायचा नसतो म्हणे..
ते out of syllabus प्रश्न विचारऱ्यांचं काय केलंत तेही लिहा Lol

माझ्या prof friends कडून ऐकलंय की आता परिस्थिती उलटी आहे, prof लोक students ना घाबरतात
ख खो दे जा

out of syllabus प्रश्न विचारऱ्यांचं काय केलंत तेही लिहा >>>>> out of syllabus काय आहे हे कळायला आधी syllabus तर माहिती असायला हवा ना!! Lol

सगळा भाग :हहपुवा: आहे>>>> Happy एन्जॉय..!

झकास लिहिलंय! मजा आली वाचायला.
०.1 - oil , बेडकाच्या उड्या, बेअब्रू...बेअब्रू स्क्वेअर...बेअब्रू क्यूब >>>तर कहर आहे! डोळ्यातून पाणी आले हसून हसून!! ( पण नंतर खाटीक आणि कोंबडी संदर्भाने विचार करताना कोंबड्यांची तितकीच दयाही आली. )
वावे, शंतनू आणि लंपन यांचे प्रतिसाद पण भारीच!

पाचही भाग वाचले. कॉलेजमध्ये असल्यासारखेच वाटतंय. तंतोतंत वर्णन. लेखनशैली उत्तम आहे तुमची. खूप मजेशीर प्रसंग तुमच्या लेखनामुळे पुन्हा आठवले. पुढील लेख मालिकेसाठी हार्दिक शुभेच्छा.

prof लोक students ना घाबरतात
ख खो दे जा >> हो. होते असेही. मी नवीनच जॉईन झाले होते. माझी एक विद्यार्थिनी होती. तिला नेहमी उशीर व्हायचा. एक दिवस मी लेक्चर ला बसू दिले नाही तर तिने एका "वजनदार" व्यक्तीला फोन केला. त्या व्यक्तीने hod ला. मग मला "समजावले" गेले. तिथून पुढे मीच फार काळजी करणे सोडून दिले. Happy

पाचही भाग वाचले. कॉलेजमध्ये असल्यासारखेच वाटतंय. तंतोतंत वर्णन. लेखनशैली उत्तम आहे तुमची. खूप मजेशीर प्रसंग तुमच्या लेखनामुळे पुन्हा आठवले. पुढील लेख मालिकेसाठी हार्दिक शुभेच्छा.>>>>> धन्यवाद किशोर मुंढे Happy Happy

नवीनच जॉईन झाले होते. माझी एक विद्यार्थिनी होती. तिला नेहमी उशीर व्हायचा. एक दिवस मी लेक्चर ला बसू दिले नाही >>>>> एवढ्या सकाळी पळत पळत जाऊन अटेंड करण्याएवढं त्या लेक्चर्समध्ये असतं तरी काय, असा आमचा प्रश्न होता त्या काळात.. कृ ह घ्या. Happy Happy

एवढ्या सकाळी पळत पळत जाऊन अटेंड करण्याएवढं त्या लेक्चर्समध्ये असतं तरी काय, असा आमचा प्रश्न होता त्या काळात.. >> अहो पण माझी नोकरी नवीन होती ना.. विद्यार्थ्यांपेक्षा मला जास्त टेन्शन यायचं Lol

अरे हो...! त्या परस्पेक्टीव्हने पण बघायला हवं. Lol

Pages