अभियांत्रिकीचे दिवस - भाग ३

Submitted by पाचपाटील on 15 May, 2020 - 01:39

भाग १
https://www.maayboli.com/node/74581
भाग २
https://www.maayboli.com/node/74585

उदाहरणार्थ जुन्या कुठल्यातरी हिंदी मूव्हीमधला एखादा फ्लॅशबॅक दाखवण्याचा घिसापीटा सीन.
अंधारलेल्या खोलीत एक म्हातारा मफलर गुंडाळून गंभीर चेहरा करून एकटाच बसलेला असतो.
बाहेर वीजा कडकडत असतात.
अचानक खिडकीतून जोरात वारा येऊन भिंतीवरची फ्रेम वाकडी-तिकडी होत खाली पडून फुटते.
आणि त्याचवेळी कडाडलेल्या वीजेचा प्रकाश खिडकीतून डायरेक्ट म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर..!!
म्हातारा चमकून फ्रेमकडे बघतो.
त्याला कायतरी गहन वगैरे आठवतं.
आणि तो सगळ्या गावाला ऐकू जातील, अशा पद्धतीनं उसासे टाकायला लागतो.

आणि मग वैतागलेला डायरेक्टर येऊन त्याला जबरदस्तीनं फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जातो.

तसंच इथं..
इसवी सन २००७ -०८..

मेन गेटच्या पुढची एक टपरी. कॉलेज म्हटलं की हे एक आवश्यक असतंच. पण हा टपरीवाला दिवसभर फक्त कॉलेजच्या पोरांच्या घोळक्यातच असल्यामुळे कधी कधी थोडासा पिसाटपणाकडे झुकलेला असायचा.

उदाहरणार्थ डोनेट मागितल्यावर चहा पिणाऱ्याच्या तोंडापुढं डोनेट धरणे आणि
"पायजे का? ", " धर की"
असे सूचक उद्गार काढणे, यासारख्या कृतींतून त्याला कसलातरी खोलवरचा आनंद झाल्यासारखा दिसायचा.
आणि विशेष म्हणजे डोनेट मागणाऱ्यानेसुद्धा त्या कृतींतून आनंद वाटून घ्यायला पाहिजे, अशी त्याची अपेक्षा असायची.

वेगवेगळ्या कॉलेजेसची पोरं, रस्त्यावरून, गेटमधून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक सजीवांचं सूक्ष्म निरीक्षण करत त्या टपरीवर 'क्लॉक अवर बेसिसवर' बसलेली असायची.
किंवा त्यातले काहीजण नेहमीच कसल्यातरी कॉलेज- इलेक्शनच्या प्लँनिंगमध्ये असायचे.
त्यामुळेच..
"भावा...तू काय टेन्शन घिऊ नगो. मी हाय जित्ता अजून"
"बुधवारातनं पोरं आणू आपण"
"कुणाच्या बापाला भेत नाय आपन..... वरात काडू त्याची "
अशा प्रकारच्या क्रांतिकारी, वल्गनायुक्त आणि घाऊक स्वरूपातल्या थापेबाजीला तिथं महामूर ऊत आलेला असायचा.
आणि त्या गजबजाटातच हा स्पिरीच्युअल मास्टर हातात डोनेट घेऊन पुढे उभा !
रोज रोज असला जिव्हाळा कोण सहन करणार !

त्यामुळे मग हळू हळू बॅकगेटच्या एका टपरी कम् हॉटेलमध्ये जाणं येणं.
ते होस्टेलच्या जवळ आणि रात्री इमरजन्सीला चालू असायचं हे एक महत्वाचं कारण.
आणि दुसरं म्हणजे चविष्ट भजी तळत-तळत तो ठराविक वेळानं, वेगवेगळ्या कारणांनी, कुणावरही खेकसायचा, तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे थुलथुलीत स्नायू जरा विचित्र पद्धतीने हालचाल करायचे.
त्याची खेकसायची नेक्स्ट वेळ कधी येतेय, ह्याची चहा भजी खात खात अधूनमधून नोंद घेत राहणं, हा एक बसल्या बसल्या फावल्या वेळातला चांगला उद्योग असायचा.

"स्वतःचा प्रकाश, स्वतःच शोध" या तत्वाला अनुसरून त्याच टपरीवर माचिसच्या प्रकाशात सिग्रेटची पहिली मशाल पेटवली जायची.
तिथपासून हजारो छोट्या-मोठ्या गोल्डफ्लेकी घसा खरवडून धूर धूर होत जायच्या, पण एका झटक्यात फुफुसं कोंडणाऱ्या त्या पहिल्या सिग्रेटची चव एकीलाही नसायची.

शेवटी शेवटी चेंज म्हणून तिथल्याच शेजारच्या अजून एका टपरीत जाणं येणं.
पण हा कार्यकर्ता गिऱ्हाईकांच्या बाबतीत हा खूपच पझेसीव्ह, हळवा भाबडा वगैरे !
आम्हाला दुसऱ्या टपरीवर पहिले की हा इनसीक्यूअर होऊन इमोशनल पंचेस वगैरे टाकायचा.
हे एकवेळ ठीक.

पण नंतर नंतर आमच्या प्लेसमेंट्च्या पार्ट्यांमध्ये आम्ही त्यालापण सामील करून 'आनंदी' व्हायची संधी दिली पाहिजे, हा प्रस्ताव त्याच्याकडून वारंवार यायला लागल्यावर जड अंतःकरणाने आम्हाला तिथला मुक्काम आवरता घेणं भाग पडलं.

आता ही सगळी शोधाशोध करावी लागण्याचं कारण म्हणजे कॅन्टीन. म्हणजे नावालाच कॅन्टीन !
टेबलांवर, फरश्यांवर जागोजागी पडलेले, धुण्याच्या पलीकडे जाऊन दगडासारखे घट्ट झालेले चहाचे डाग, "लोकांना नीट बसता नाय आलं पायजे" अशी धमकी सुताराला देऊनच बनवून घेतलेले डुगूडुगू टेबल्स, डुगूडुगू बाकडी- स्टूल्स, ह्या सर्व गोष्टी तिथल्या रसिक माणसांनी पन्नासेक वर्षांपासून आत्यंतिक निष्ठेने जपून ठेवल्या होत्या.

तिथे, ज्याची चव तुम्ही बापजन्मी विसरू शकणार नाही, असे 'एक विशिष्ट प्रकारचे दूध काळजीपूर्वक नासवून बनवलेले' गढूळ कोमट पाणी फक्त मिळायचे, ज्याला ते लोक प्रेमाने ‘चहा’ असं म्हणायचे.
चार- पाच टेबल्सवर पसरलेले न्यूजपेपरचे अवशेष वारा घ्यायच्या लायकीचे सुध्दा उरलेले नसायचे. मग त्यात, थेटरात नवीन पिच्चर कुठला लागलाय, हे पाहायची इच्छा होणं, तर लय लांबची गोष्ट.
आणि हे कमी पडलं तर ती अँटीक़ बाकडी डुगडुगत डुगडुगत तुमच्या एकूणच अस्थिर अशा भविष्यकाळाबद्दल अभद्र इशारे द्यायची.
तर अशा ठिकाणी 'वेळ जात नाही' या कारणासाठी तरी कोण कशाला जाईल..!!

पण..!! पण.. !! पण..!!
या सर्वांसाठी तरीही सर्वांपेक्षा सर्वार्थाने वेगळे असे एक चौक-टाईप ठिकाण तिथे जवळच होते, ज्याला फार प्राचीन काळापासूनच लोक "DP" म्हणायचे.

दिवसभरातल्या सगळ्या सुस्ताडलेल्या, रिकामटेकड्या, बिनकामाच्या ऍक्टिव्हीटीजमुळे 'मानसिक थकवा' आलेली कॉलेजची सगळी जनता संध्याकाळी हवा खायला आणि सोडायला तिथं गोळा व्हायची.
आणि आल्या आल्या ताबडतोब एकमेकांच्या, अजूनही शिल्लक राहिलेल्या, उखाळ्या-पाखाळ्या काढायला सुरुवात करायची.

बौद्धिक थकवा वगैरे यायचं तेंव्हा कुणाला काही कारणच नसायचं..!! काय संबंध ??
शिवाय दिवसभर बसून बसून आणि 'चॅलेंज' सारख्या गेम्स खेळून खेळून 'शारीरिक थकवा' तरी कसा काय येणार बरे !

हां! काही जणांना अध्यात्मिक थकवा आलेला असेल तर "DP" वरून येणाऱ्या जाणाऱ्या आकर्षणबिंदूंवरून उभ्या उभ्या नुसती दृष्टी फिरवत राहिलं तरी तेवढ्यापुरतं बरं वाटायचं .

काहीतरी निमित्त काढून, कुणालातरी फशी पाडून येनकेनप्रकारे पिण्याचा काही जुगाड होतोय का, याची व्याकूळ वाट पाहायला लावणाऱ्या संध्याकाळीही तिथं रेंगाळत असायच्या..!

आणि नाहीच काही जुळणी झाली तर नशिबाला किंवा दुनियेला दोष देत देत, निराश हृदय-फाटलेल्या अवस्थेत, मेसच्या दिशेने पाय खुरडत खुरडत चालायला लावणारे रस्ते पण "DP" पासूनच सुरू व्हायचे..!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नागेशचे पोहे, रवीचा वडापाव होस्टेलमागच्या मिठ्ठू, डिपी, सुर्या बार, महाराजा हे सगळं आठवलं. शिवाय कोसा, सांगली, नागपूर, सोलापूर, ओएमेच, मराठवाडा, निपाणी, खानदेश, मुंबै, आमची फलटण ह्या सगळ्या ग्रुप्सच्या कोऑपरेटिव्ह मेसा, त्यांच्या मावश्या, मेसचे बर्थ्डेज, हॉस्टेलमधल्या जिट्यांच्या रात्री सगळं पुन्हा आठवायला लागलं. कराड म्हटलं तरी मला पुन्हा २००९ मध्ये जावसं वाटतं. एवढी मजा आयुष्यात कधीच केली नसेल.
मजा आली पाटील!