पहिल्या वर्षाच्या शेवटच्या परीक्षेच्या तडाख्यात सापडून निम्मी-अर्धी जनता जबर जखमी व्हायची. पण कसंतरी करून, रडत खडत पुढच्या वर्षाचा जुगाड लागायचा. उरलेली जी जनता गचका खायची त्यांची व्हॅकन्सी डिप्लोमाच्या पोरांनी भरून काढायची शासनाची पॉलिसी असायची.
ज्याप्रमाणे नवीन लग्न होऊन आलेल्या सुनेला तिची सासू वेगवेगळ्या आयडिया काढून, घरात मिसळून घ्यायची टाळाटाळ करते, त्याच प्रकाराची एक आवृत्ती रेग्युलरची पोरं ह्या डिप्लोमाच्या पोरांच्या बाबतीत सादर करायची.
"आम्ही तुमच्या आधीपासून इथं आहोत. त्यामुळं इथल्या 'सगळ्या' रिसोर्सेसचा लाभ घेताना आधी आम्हाला विचारलं गेलं पाहिजे", असा ह्या रेग्युलर पोरांचा दावा असायचा.
पण डिप्लोमाची पोरं 'बारा गावचं पाणी' पिऊन आलेली असल्यामुळं ह्या चाळ्यांकडे दुर्लक्ष करून, सबमिशनच्या वेळी कळेल कोण सासू आणि कोण सून ते, म्हणून त्यांचं त्यांचं चालू ठेवायची.
त्यामुळं हे फ्रिक्शन जास्त वेळ टिकायचं नाही.
दिवस आपोआप जात राहायचे.
पण हा आळसावलेल्या गोगलगायीसारखा निवांतपणा सदैवच असायचा असं नाही.
मढ्यासारखं सुस्त पडलेल्या हॉस्टेलला सेमिस्टरच्या शेवटी हळू हळू जाग यायला लागायची.
अंगाला लागलेली वाळवी खरवडायला आणखी थोडा वेळ जायचा.
तोपर्यंत सबमिशन्सच्या महापूराचे पाणी गळ्याशी आलेलं असायचं. मग सगळ्यांची जीवाच्या आकांतानं हातपाय झाडायला सुरुवात व्हायची.
भांडवल-कॉपी शोधणं, ही पहिली आणि तातडीची टास्क.
गर्ल्स होस्टेलवर सगळ्याच विषयांच्या भांडवल कॉप्या नेहमीच तयार असायच्या. मग त्यांच्याशी सलोख्याचे संबंध असलेल्या एका मध्यस्थाला त्या मोहिमेवर पाठवलं जायचं किंवा हौसेखातर तो स्वतःच जायचा.
तिथं जाऊन तो
'' वाढा वो sss माय '' '' काय शिळं- पाकं सबमिशन आसलं तर द्या वो माय sss ''
अशा पद्धतीनं मन लावून भीका मागायचा.
आणि ते रेडीमेड फायलींचं बोचकं पाठीवर बांधून होस्टेलवर आणायचा.
तोपर्यंत होस्टेलवर सगळीकडे बुभूक्षित आदिमानव त्याची वाटच बघत बसलेले असायचे.
मग जे काही आपल्याला सुरुवातीला झेपेल, ते उष्टे खरकटे हातात घेऊन सगळे जीव तोडून लिहित सुटायचे. कारण टर्म एन्ड आठवड्यावर आलेली असायची.
अशाच काळात लोकल पोरांचा होस्टेलवर बाजार उठायला सुरुवात व्हायची.
'' भावाsss तूच आहेस!! '' ''भावाsss तूच आहेस!! ''
असे किंवा वेगवेगळ्या बाइक्सचे आवाज अहोरात्र, होस्टेलच्या कॉरिडॉरमधून घुमायला लागायचे.
आणि मागचं सगळं विसरून तात्पुरते गळ्यात गळे घातले जायचे.
गर्ल्स होस्टेलवरून सबमिशन आणायला गेलेल्या मध्यस्ताबरोबर खंडीभर गाईडलाईन्सही आलेल्या असायच्या.
या गाईडलाईन्स मुख्यतः काळजीयुक्त, नाजूक आणि किनऱ्या आवाजातल्या असायच्या.
उदारणार्थ.
"असाइन्मेंट्स चुरगाळू नकोस हं "
"फाईलवर डाग पडू नकोस हं"
" मला किनईsss उद्या सरांना फाईल सबमिट करायची आहे."
"फाईल कुणाला देऊ नकोस हं"
"संध्याकाळी लगेच परत आणून दे हं"
ह्या सूचनांकडे ताबडतोब दुर्लक्ष व्हायचं. कारण त्या फाईलीतली पानं सतरा ठिकाणी फिरत राहायची.
कोण कंट्रोल ठेवणार ? आणि एवढा वेळ कुणाकडे असायचा ?
कुणालातरी लिहिता लिहिता त्यावर डुलकी लागू शकते, कुणाच्या वडापावचा डाग पडू शकतो.
कुणी लिहिता लिहिता बसल्या जागेवरून खिडकीच्या दिशेनं तोंड करून मारलेली पिचकारी त्या पानांवर रिटर्न उडू शकते.
कधी कधी त्यातली गहाळ झालेले ग्राफ्स सहा- सात महिन्यांनी कुणाच्यातरी गादीच्या किंवा कपाटाच्या कोपच्यात सापडलेले आढळू शकतात.
अशा हजारो शक्यता..
आपण काय काय बघणार ? आपलं आपलं सबमिशन झाल्याशी मतलब.
अशी जबाबदारी झटकण्याची ट्रेनिंग तिथं सगळ्यांनाच आपोआप मिळालेली असायची.
"कंझ्युमर्स स्टोअर उघडलंय काय बे ?" असा एक लाखमोलाचा रोकडा सवाल याच काळात उपस्थित व्हायचा.
मग एकजण एका स्कूटीवरून कोऱ्या फायली, इंडेक्स, पेजेस, ग्राफ्स, शीट्स सगळ्यांसाठी आणायचा.
ती फेमस मुघलकालीन ऐतिहासिक खटारा स्कूटी ताशी १० किलोमीटर वेगानं सरपटत रांगत होस्टेलकडे हेलपाटे घालताना बऱ्याच वेळा दिसायची.
सबमिशन लिहिताना " काय लिहितोय " कशासाठी लिहितोय" "कुठल्या प्रॅक्टिकलचे रीडींग्ज लिहितोय" असले फालतू प्रश्न कुणालाच पडायचे नाहीत.
कारण ते कागद ऑल-रेडी सतरा ठिकाणांवरून झिरपत झिरपत त्याच्याकडे आलेले असायचे.
आणि प्रत्येकाने आपापल्या परीने त्यातला मजकूर गाळून गाळून आणि हक्कानं १५-२० चुका करूनच पुढच्यांपर्यंत पोचवलेला असायचा.
आणि चुकून एखाद्याला समजा डाउट आलाच तर "मरू दे च्यायला !! चेकिंगच्या टायमाला पकडलंच तर बघू पुढच्या पुढं!! " असं म्हणायची पद्धत होती.
स्वतः उठून रेफरन्स बुक्स शोधून करेक्शन करायचा दम कुणातच नसायचा.
कारण उघड आहे !! त्यावेळेपर्यंत त्या सेमिस्टरला " नेमके विषय कुठले कुठले आहेत" ह्याचाच पत्ता नसायचा.
याच काळात काही मोक्याच्या ठिकाणी GT चा (ग्लास ट्रेसिंगचा) सेट लावून ठेवलेला असायचा.
ते लोक जाडजूड रेफरन्स बुक्सचा उपयोग फक्त GT च्या ग्लासला दोन्ही बाजूला सपोर्ट लावायला करायचे.
शेकडो जणांच्या शीट्सची भेंडोळी जोपर्यंत ट्रेस होऊन बाहेर पडत नाहीत तोपर्यंत ही GT ची भट्टी दिवसरात्र सेवा देत राहायची.
शेवटी शेवटी दिवसरात्र GT मारून मारून तारवटलेले, झिंगलेले डोळे, दाढीचे अस्ताव्यस्त वाढलेले खुंट, आंघोळ न केलेले आठवडेच्या आठवडे गेल्यामुळे सगळ्यांनाच येणारा सूक्ष्म वास, तो वास दडवण्यासाठी मारलेल्या डिओच्या वास, सिगरेटींचा वास त्यात मिक्स झाल्यामुळं तयार होणारं एक "डेडली कॉम्बिनेशन"... असा सगळा किचकिच माहौल सबमिशन्समध्ये असायचा..
वाचतोय.... मजा असते कॉलेज
वाचतोय.... मजा असते कॉलेज लाईफ...
हो...!!
हो...!!
'' वाढा वो sss माय '' '' काय
'' वाढा वो sss माय '' '' काय शिळं- पाकं सबमिशन आसलं तर द्या वो माय sss '' >>>> हसून हसून मेले.
हा हा... अगदी असाच प्रकार
हा हा... अगदी असाच प्रकार असायचा तो...!!!
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
ते लोक जाडजूड रेफरन्स बुक्सचा
ते लोक जाडजूड रेफरन्स बुक्सचा उपयोग फक्त GT च्या ग्लासला दोन्ही बाजूला सपोर्ट लावायला करायचे. >>>
धमाल आहे हे. दोन्ही भाग वाचले. येउ द्या अजून. लिहीण्याची स्टाइल मस्त आहे तुमची.
मस्त लिहिले .. स्कुटीच्या
मस्त लिहिले .. स्कुटीच्या फेर्या आठवल्या..सबमिशन, व्हायवा वेडे दिवस .
(No subject)
सगळं आठवलं
सगळं आठवलं
मुलींकडून फायली आणणं, याचा दुसरा भाग एखादी मुलगी आपल्या 'बहुत अच्छा दोस्त' ला भावनिक अपील करून त्याच्याकडून 10-12 पानं लिहून घेणारी पण असायची.
ज्यांना ही पानं दिली त्या शिक्षकांनी त्यावर हॅरी पॉटर उतरवलं असतं तरी पानांची संख्या आणि मध्ये आकृत्या पाहून पास चा शिक्का मारला असता.त्यांनाही अजिबात वेळ नसायचा.
हाहाहा! मस्त लिहिलंय!
हाहाहा! मस्त लिहिलंय!
(बरं झालं) गेले ते दिन गेले (सबमिशनचे)
ओव्यांची मूळ कवयित्री कोण? या प्रश्नाइतका गहन प्रश्न म्हणजे सबमिशनच्या राईट-अप्सचे मूळ लेखक/लेखिका कोण? कानगोष्टींच्या खेळात जसं मूळ वाक्य बदलत बदलत शेवटी भलतंच वाक्य तयार होतं, तसं या राईट-अप्समधली काही काही वाक्यं प्रचंड निरर्थक असायची. त्याला खरंतर निरर्थक म्हणणंही चूक आहे. 'It's so bad that it isn't even wrong' टाईप असायची.
@ maitreyee >>> धन्यवाद..!!
@ maitreyee >>> धन्यवाद..!!
@ फारएण्ड >>>>." ते लोक जाडजूड रेफरन्स बुक्सचा उपयोग फक्त GT च्या ग्लासला दोन्ही बाजूला सपोर्ट लावायला करायचे". >>>
सबमिशन होईपर्यंत त्या पर्टिक्यूलर सेमिस्टरला नेमके विषय कुठले कुठले आहेत ह्याचाच पत्ता नसायचा तर बुक्स उघडून वाचणार कोण आणि कधी ??
@ आदिश्री >>> सबमिशन वाहून न्यायला स्कुटी बेस्ट.. ! आणि आमच्या त्या मित्राला तर त्याच्या घरच्यांनी, त्यांच्या खानदानात पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक खटारा मंद स्कुटी गिफ्ट दिली होती... सुसाट जाऊन आपल्या वंशाच्या दिवट्यानं कुठं हातपाय मोडून घेऊ नयेत अशी प्रेमाची भावना त्यापाठीमागं होती...
@ वावे >>>ओव्यांची मूळ
@ वावे >>>ओव्यांची मूळ कवयित्री कोण?>>>
>>>'It's so bad that it isn't even wrong'>>>>:D
@ mi_anu >>>> एखादी मुलगी आपल्या 'बहुत अच्छा दोस्त' ला भावनिक अपील करून त्याच्याकडून 10-12 पानं लिहून घेणारी पण असायची.>>>>
होय... खरंय... :हाहा:.. पण ती गोष्ट गुपचूप उरकून टाकण्याकडे त्या 'बहुत अच्छा दोस्त'चा विशेष कल असायचा... कारण ते उघड झालं तर त्याच्या नावाने सगळीकडे टोमण्यांचा बाजार उठायचा...
हाहा .मस्त. मजा आली वाचताना.
हाहा .मस्त. मजा आली वाचताना. जिंदगी का एक ही मिशन - 'सब'मिशन . गेले ते दिवस.
खूप रिफ्रेशींग. मैत्रिणींंना
खूप रिफ्रेशींग. मैत्रिणींंना लिंक पाठवली. आम्ही मुली असल्याने एकाला दोघी बऱ्या म्हणून सगळीकडे स्कुटी वर दोघी जायचो. Xerox च्या दुकानात किती फेर्या मारल्या देव जाणे.
माझे अक्षर चांगले म्हणून कितीदा न्यायची पोरं. आता कळालं कुठे कुठे जायचे .
मी फार्मासिस्ट. पहिल्या सेमला
मी फार्मासिस्ट. पहिल्या सेमला इमानेइतबारे जर्नल लिहायचा विचार होता, पण मला लिहायचा कंटाळा इतका की exam मध्ये सुद्धा येतंय तेवढं पासिंगपुरता लिहून निघून यायचो. हॉस्टेलमधला माझा रूम त्यातल्या त्यात हवेशीर आणि प्रशस्त होता म्हणून सगळेच आमच्या रूममध्ये जर्नल लिहायचे रात्र रात्र! पद्धत अशी की हेमाचं जर्नल मी मागून आणणार, मग रूमवर टेबले जोडून कधी बारा तर कधी पंधरा पोरं बसायची आणि एकाच वेळी लिहायची! त्यात जर साखळीतला एखादा चुकला तर त्याच्यापुढची पोरं त्याला बेक्कार शिव्या घालायची.. पुढं पुढं मग चुकलं तर चुकलंय असं बोलायचं नाही, मास्तरपेक्षा शिव्यांचा धाक जास्त होता. साखळीतली शेवटची कडी असलेला मी, २,४ पाने लिहून काहीतरी फालतुगिरी करत बसायचो. एकंदर मजा असायची! पहिल्या सेमला 4 पैकी एकच जर्नल पूर्ण होते.. दुसऱ्या सेम पासून मात्र
एकही नाही!
मस्त लिहिलय
मस्त लिहिलय
Gt चा धागा कोणता लोकहो?
Gt चा धागा कोणता लोकहो?
काल फेबुवर इंजिनियर्स डे
काल फेबुवर इंजिनियर्स डे वगैरे बद्दल वाचल्यावर पहिली हीच लेखमाला आठवली
लय स्कोप हाय दिनाच्या हार्दिक
लय स्कोप हाय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मस्त मस्त लिहिलंय... आमचे एम
मस्त मस्त लिहिलंय... आमचे एम एस्सीचे हॉस्टेलवरचे दिवस आठवले.
(No subject)
१ला भाग मलाच दिसत नाहीये का ?
१ला भाग मलाच दिसत नाहीये का ? की उडवला गेलाय ! मजकूर इकडे प्रतिसादात लिहा म्हणजे सुरुवात कळेल
@ अनंतनी, पहिला भाग हा
@ अनंतनी, पहिला भाग हा 'विनोदी लेखन' ह्या ग्रुपच्या सभासदांसाठीच accessible आहे... ते सेटींग मला आता काही चेंज करता येत नाहीये. तुम्ही जर 'विनोदी लेखन' हा ग्रुप subscribe केलात, तर तुम्हाला तो भाग वाचता येईल.. अर्थात एका भागावर दुसरा भाग अवलंबून नाही आहे.. बरचसं आठवेल तसं विस्कळीत स्वरूपाचं लिहिलेलं आहे हे...
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
परिक्षेच्या आधी "कंटाळा, चालढकल, इत्यादी करण्यासाठी आणि त्या इत्यादीचा गिल्ट येण्यासाठी" म्हणून जी सुट्टी असायची अर्थात PL, ती सुट्टी म्हणजे, नोट्सच्या २५ पैसे प्रति पान या दराने काढलेल्या केरोसीनच्या झेरॉक्सच्या वासाने डबडबलेले दिवस असे समीकरणच व्हायचे. बॅग, लायब्ररी, कँटीन, ड्रॉईंग हॉल, लॅब, कुठेही गेले तरी हा दरवळ असेच. मला नंतरही कितीक वर्षे PL असे कानावर आले की मेंदूतील कोणत्याश्या केंद्रातून त्या केरोसीनच्या झेरॉक्सचा वासच सर्वप्रथम उसळी मारून वर येई.