लिझीकीचे जग

Submitted by मामी on 13 September, 2019 - 12:22

लीझीकी (Li Ziqi) - चीनच्या शेझुआन प्रांतातील एका गावात शांत, निसर्गरम्य परिसराच्या सोबतीत राहणारी एक गोडशी मुलगी. तिच्यापेक्षाही गोड असलेल्या आजीबरोबर ती राहते. आजूबाजूला केवळ एक भरभरून देणारा, डोळे निववणारा निसर्ग आहे. या सकस मातीतून पिकवलेल्या ताज्या भाज्या, धान्य, फळं यापासून ती मुलगी काय काय पदार्थ आणि प्रकार बनवते. वेलकम टु लिझीकी चॅनल - हा एक युट्युबवरचा आनंदाचा खजिना आहे आणि ती आहे या चॅनलची अनभिषिक्त राणी. लीझीकीचा एक एपिसोड बघा की तुम्ही तिचे चाहतेच होऊन जाता.

गेल्या दोन वर्षांपूर्वी युट्युबवर आलेली २९ वर्षांची लिझीकी आता खूप प्रसिद्ध युट्युबर आहे. आज तिच्या चॅनलचे ६० लाखांपेक्षाही जास्त चाहते आहेत. पण तिचं बालपण आणि युट्युबवर येण्याआधीचं जीवन खूप खडतर होतं. अगदी लहानपणीच आईवडिलांचा घटस्फोट पाहिलेली, १४व्या वर्षापासून शाळा सोडून देऊन नोकरीला लागलेली, वेळप्रसंगी भुकेली राहलेली, पुलाखाली झोपलेली, पडेल ते काम करणारी अशी ही लिझीकी आजीच्या आजारपणामुळे शहर सोडून गावात आली. तिच्या आजोबांकडून तिनं चीनचं पारंपारीक जेवण, बागकाम, मासेमारी, सुतारकाम, बुरुडकाम अश्या गोष्टी शिकल्या होत्याच. चीनमध्ये युट्युबचं प्रस्थ वाढायला लागल्यावर तिनं तिच्याकडे असलेल्या या खजिन्याचा उपयोग करून व्हिडिओ बनवायला सुरवात केले. हळू हळू तिचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागले आणि केवळ दोन वर्षांत ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसलीये. तिनं तिची एक स्टाईल निर्माण केलीये. इतकं असूनही तिनं तिची प्रायव्हसी जपलीये बरं. ती नक्की कुठे राहते हे नेटवर उपलब्ध नाहीये.

लिझीकी नेहमी पारंपारीक तिच्या प्रांतातील पोशाख करून व्हिडिओत दिसते. ते पोशाखही देखणे असतात. तिच्या प्रांतातील चार मोसम तिच्या व्हिडिओंतून बघायला मिळतात. तिच्या घरातील सर्व वस्तू, भांडी, तिची जेवण करण्याची पद्धत एकदम पारंपारीक आहेत. एका दृष्टीनं पाहिलं तर ती तिच्या या व्हिडियोंद्वारे या जुन्या चिनी परंपरांचं डॉक्युमेंटेशन करून एक भरीव कार्यही आपसुकच करत आहे. तिचं ऑनलाईन शॉपही आहे.

ती तिच्या व्हिडिओत सुंदर, नाजूक तर दिसतेच पण त्याचबरोबर काटक आणि मेहनतीही दिसते. जंगलातली, शेतातली, सुतारकामाची कामं करणं सोपं नाही. यामुळेच कदाचित तिला तिचे चाहते 'ब्रदर ली' असंही म्हणतात. तिचं त्या गावात खरंखुरं शेत आहे आणि त्यात ती मका आणि भुईमुग उगवते. शिवाय ती डुकरं आणि रेशमाचे कीडेही पाळते. हा तिचा पारंपारीक व्यवसाय आहे.

तिच्या घराबाहेरच भाज्या धुवायला एक डोणी आहे. त्यावर बांबूमधून पाणी पडतं. भांडी सगळी लाकडी किंवा बीडाची असावीत. बांबूचा तर उपयोग ठायी ठायी दिसतो. सगळं कसं नेटकं, देखणं. दिवस असो वा रात्र, कोणताही ऋतू असो, ही आपली टणटण उड्या मारत काय काय पटापट करत असते. घराच्या परसातल्या बागेतून, बाहेरच्या जंगलातून, तळ्यातून ती कायबाय चटचट तोडते, खुडते, गोळा करते. घरी येऊन लगेच झटपट कामाला लागते. ती फळं साठवते, पीठं करते, वाळवणं घालते, जॅम-जेली-वाईन करते. हे सगळे साठवणीचे पदार्थ. याबरोबरच ती जेवणंही करते. दोघीच तर जेवणार पण तरीही निदान चार प्रकार तर हवेच. सुंदर, सुबक, साधेच असे ते प्रकार असतात. छानश्या भांड्यांतून , प्लेटींतून ती जेवणाच्या लाकडी टेबलावर ते नेते. तिची आजी तिथे बसलेली असतेच. एका सुंदर पंख्यानं वारा घेत. मग दोघी मिळून हसतखेळत त्या जेवणाचा आस्वाद घेतात.

जेवण तरी किती मजेमजेशीर. एका कमळाच्या तळ्यातून तिनं कमळं, त्यांची पानं, त्यांचे देठ आणि त्यांची मूळं आणली आणि काय काय बनवलं. मूळांपासून पीठ केलं, त्या पीठाचं सूप केलं, देठ भाजीला वापरले, पानात गुंडाळून काहीतरी उकडलं आणि कमळाच्या गुलाबी पाकळ्यात काही भाज्या घालून ते रॅप्स बनवून खाल्ले. बघूनही मन तृप्त होतं अगदी. असंच एकदा भोपळ्यापासून अनेक प्रकार केले तिनं. त्यात भोपळ्याच्या मॅशला दोरे बांधून त्यांना मिनी भोपळ्यांचा आकार दिला. काय देखणं होतं ते. एकदा काय तर सगळे प्रकार मक्यापासून केलेले. असली गुणी मुलगी ना!

तिचं स्वयंपाकघर भारी मस्त. एक छोटुशी शेगडी तर दुसरं एक मोठं चुलाण आहे तिच्या स्वयंपाकघरात. चुलाणाला मागून लाकडं टाकायला जागा आहे. तिची आजी कधीकधी तिथे बसून लाकडं चुलीत सारत असते. त्या चुलाणावर एक भलं मोठं वोक म्हणजे कढई असते. त्यात ही सुगरण निगुतीनं जेवण बनवते. तिच्याकडे खूप खाद्यपदार्थ उकडलेलेही बनतात. त्यासाठी एक बांबूचा पारंपारीक स्टीमर आहे. तो ती त्याच वोकवर ठेऊन वापरते. तिच्याकडे घराबाहेर एक भट्टी/आवनही आहे. त्यातही काय काय भाजते ती.

तिच्या व्हिडिओजमधली अगदी प्रत्येक फ्रेम देखणी. सुर्योदय, सूर्यास्त, तार्‍यांनी खचाखच भरलेलं रात्रीचं आकाश, बर्फ, विविध झाडं, फळं, भाज्या, फुलं, प्राणी आणि स्वतः लिझीकी असं सगळं कसं मिळून आलेलं असतं. किती रंग असतात आणि ऋतुप्रमाणे बदलतातही. पण सगळं कसं आदब राखून, अजिबात उथळपणा नाही तिथं. मागे एक अत्यंत शांतवणारं हलकं संगीत सुरू असतं. तिच्या रोजच्या कामाच्या निमित्तानं होणार्‍या आवाजांनाही एक सुंदर नाद आहे. पाण्याचे, भांड्याचे, झाकणांचे आवाज, बांबूच्या गोल परातीत बिया सुकवायला टाकते, त्या सुकलेल्या बिया बरणीत ओतते ते आवाजही निव्वळ आनंददायी.

शिवाय आपल्याला न कळणारं आजी आणि नातीचं बोलणं, त्यांचं खळखळून हसणं इतकंच असतं. संवादांची गरज नाही, भाषांतराची गरज नाही. अगदी अलगदपणे त्या हृदयीचे आपल्या हृदयी पाझरत राहतं. एक विलक्षण अनुभव असतो हा. तिच्याच शब्दांत सांगायचं तर Life isn't easy, BUT YOU CAN LIVE WITH YOUR HEART!

*****************************************************
लिझीकी चॅनल : https://www.youtube.com/channel/UCoC47do520os_4DBMEFGg4A
लिझीकीची गोष्ट : https://raknife.com/li-zi-qi/
ऑनलाईन दुकान : https://liziqishop.com/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कारण ऑर्गॅनिक, कोल्ड प्रेस्ड खोबरेल मिळतं ते शुभ्र, ट्रान्सपरंट असतं ना. >>> गावाहून आलेलं पण पांढरं शुभ्र पारदर्शक होतं आमचं.

आपण आणतो ते तेल दाबून काढलेले असते. श्रीलंकन पद्धतीत तिने खोबरे उकडून, कुटून त्याचा लगदा उकळून तेल काढले, जसे आपण लोणी उकळून तूप काढतो तसे. त्यामुळे बहुतेक पिवळसर रंग आला.

केसांना लावण्यासाठी तिने त्यात ब्राम्ही, अनंतमूळ, एक्झॉरा, माका, नीळ आणि कंचरी वापरले. यातले कंचरी हे मी पहिल्यांदा बघितले व ऐकले. बाकीची ओळखीची होती.

ही अजून एक श्रीलंकन. पूर्णा - द नेचर गर्ल.

मी बघितले पुर्णाचे काही व्हिडीओज, मला फार नाही आवडले.

https://www.youtube.com/watch?v=mwV8UATbBjg

सुनिल डीमेलोने केलेला वसईचा केळेवाला व्हिडीओ. वसईत केळीच्या घडाला लोंगर म्हणतात (ह्यात कादोडी भाषा आहे). हे ७४ वर्षाचे आजोबा केवढी मेहनत करतात, हॅटस ऑफ.

https://www.youtube.com/watch?v=WWQPTM8ecW0 दिडशे वर्ष जुना तेंडोलकर वाडा, सुनील डीमेलो.

सुनील डीमोलेची ओळख करुन देणाऱ्यांचे धन्यवाद. छान आहेत त्यांचे माहितीपूर्ण vlogs आणि भाषेवर प्रभुत्व आहे प्लस त्यांची जी भाषा आहे त्यातले शब्द पण समजतात.

>>हे ७४ वर्षाचे आजोबा केवढी मेहनत करतात, हॅटस ऑफ.
सिरियसली. सलाम त्यांना. एवढी मेहनत करुन ते माल घेऊन येतात आणि त्यात तीन्तीन मजले चढून अगदी हातात माल ठेवतात. इतक्या अनेक वर्षांच्या त्या बांधलेल्या गिर्हाईकांनी निदान थोडं खाली उतरुन स्वतः माल घ्यायला काय हरकत आहे असं वाटलं. आय होप त्यांना चहापाणी तरी विचारत असतील अशी आशा.

इतक्या अनेक वर्षांच्या त्या बांधलेल्या गिर्हाईकांनी निदान थोडं खाली उतरुन स्वतः माल घ्यायला काय हरकत आहे असं वाटलं. >>> सेम हेच मी नवऱ्याला म्हणाले.

चहापाणी विचारत असावेत बहुतेक.

पण अति मेहनत करतायेत या वयात असं वाटतं मला. आता लोकल बंद असल्याने त्यांना आराम मिळत असेल आपोआप.

>>पण अति मेहनत करतायेत या वयात असं वाटतं मला. आता लोकल बंद असल्याने त्यांना आराम मिळत असेल आपोआप.

+१ हो ना.
सुनिल डिमेलोचा चॅनल भारीय. त्याची मुलगी अलीन तिच्या नावाइतकीच गोड आहे.

इथले वाचून काल ट्रॅडिशनल मी , नदीचे श्रीलंकेचे व्हिडीओ बघायला सुरूवात केली आहे. मला फारच आवडले. एस्थेटिक, भांडी पातेली, आजी भाउ मुलगी सर्व छान आहे. पदार्थ पण सुरेख . पद्धती पण अगदी आपल्या सारख्या आहेत. पण वेगळ्या. पण बेस्ट म्हण जे इन्ग्रेडिअंट. एक एक अगदी जीव ओवाळून टाकण्याजोगे आहेत. ती सुकवलेले मासे प्रॉन्स वगैरे हर भाजीत टाकते. आपल्याकडे असे कोनते पर्याय उपलब्ध आहेत? वेगळा बाफ काढते तिथे लिहा. खोबरेल तेलाचा पण पाहिला.

धन्यवाद मामी व साधना. तुमच्या मुळे हे चॅनेल माहिती पडले. सर्व जरा केरळी टाइप वाटतात. मला तर भाउ बहीण न नाते फार गोड वाटले. तो पण तिचे सर्व ऐकतो. ती मुलगी व्यवस्थितच सेक्सी अशी आहे तिच्या नैसर्गिक चार्म अनुसार पण ते काही अंगावर येत नाही. एकदा फक्त तिने स्किन कलर( आपली भारतीय गव्हाळ स्किन ) चा फ्रिल वाला फ्रॉक घातला आहे. त्यात एकदम चमकायला होते. पण पूर्ण फोकस
अन्न रेसीपी भाज्या फळे ह्यावरच आहे. किती खोबरे वापरतात. काय लक्षरी. मला तर एक नारळ फोडले की ब्यांक लॉकर उघडल्याचे फील येते. ( शेवटी आम्ही...)

अजून एक श्रीलंकन. निलूपुली

श्रीलंकेचा निसर्ग कोकण + केरळ एकत्र घोटून बनवला आहे. गळ्याला, हाताला व खाली घेराला फ्रिल लावलेले फ्रॉक हा तिथल्या स्त्रियांचा राष्ट्रीय पोशाख असावा असे वाटतेय Happy Happy

निलूपुली अगदी साधी आहे, तिचा आजचा विडिओ आवडला. गोकर्नाची फुले वापरून निळा भात बनवला हे आहेच पण तिचे बाबा ज्या पद्धतीने पाणी शेंदून सुपारी व त्याच्यावर चढवलेल्या मिरीचा मळा शिंपत होते ते बघून लहानपणी कोकणात बघितलेली ही दृश्ये आठवली.

व्हिडिओच्या सुरवातीला ती जंगलात आहे. (चप्पल न घालता फिरतेय जंगलात). फिरताना काजु रुजून आलेला दिसतो, आपण जो काजू खातो तो हिरवा होऊन त्यातून रोप आलेले दिसते. तो काजू तोडून ती खाते. कोकणा/गोव्यात एक पाऊस पडून गेला की असे काजू रुजून येतात, त्या हिरव्या काजूची भाजी करतात.

ही आधी कोणी इथे मेनशन केलीये का आठवत नाहीये. श्रीलंकेचीच आहे ही. नविनच दिसतेय पण. सुंदर आहे पूर्णा.
Poorna - The nature girl : https://www.youtube.com/channel/UCtVDQNGBmS8DTP5fPzM_GmQ

मी पूर्णाचा हा वांग्याचा व्हिडिओ बघतेय आत्ता. सेम लिझिकीची कॉपी मारतेय. तसाच वोक पण आहे. सुराही तसाच भलामोठा आहे. तशीच फुलं फुलदाणीत सजवतेय. या व्हिडिओत बहुतेक सगळे शॉट्स फार टाईट आहेत. नाव पूर्णा असलं तरी कोणत्याही शॉटमध्ये ती जे काही करतेय ते पूर्ण दाखवत नाही. अर्धवट किंवा ऑफ फोकस चालतं सगळं.

वांग्याची भजी करताना तिनं सोया सॉस पण टाकला पीठात. भात डाळ करताना लिझिकीसारखेच एकामागोमाग एक पदार्थ कच्च्या तांदळाअत आणि भातात टाकले. फोडणी वगैरे काही नाही. फ्युजन कुझिन करतेय बहुतेक कारण या व्हिडिओच्या वर्णनात ती म्हणते : Today I made Sri Lankan, modern traditional meals and enjoying with my family. It's Wambotu moju, yellow rice, Dhal curry herbal salad , called Gotukola salad and fried wambotu.

श्रीलंकेत चिन्यांचं प्रस्थ वाढत चाललंय ते असं. Lol

निलुपुलीच्या गोकर्ण भाताच्या व्हिडिओत मागे सुंदर बासरी सुरू आहे. बाकीचे तिचे व्हिडिओ अजून पाहिले नाहीयेत.

https://www.youtube.com/watch?v=TbtuJEdKKN0

ही एक पोलीन सापडली. काजुफळं कसली कातील कलरची आहेत, हा रंग मी नाही बघितला, केशरी बघितला आहे जास्त करुन, मला वाटलं काहीतरी वेज सॅलड दाखवेल पण कसलं काय. बाकी ते रांजण आवडलं मला.

निलुपुलीचा https://www.youtube.com/watch?v=LMmoKNYmpi4 हा व्हिडीओ बघितला. आवडला, काजू जरा अति भाजलेत पण बाकी बरेच रेसिपी प्रकार कोकण ते केरळ याच्या जवळ जाणारे आहेत.

लिझीकीचा गव्हाचा व्हिडिओ पाहिला का नवीन? मस्तच आहे.>> अगदी अगदी हेच लिहायला इथे आले होते. फार छान आहे. मी तिला खूप दिवसांनी बघितले त्यामुळे एकदम छान वाटले. सर्व पदार्थ उत्तम आहेत. तिने चीक करून ठेव्ल्यावर मला एकद म टडोपा झाले. बाकी पदार्थही सुरेख गह्वाच्या सत्वाची गुलाब पाकळ्यग/ गुलकंद घालून केलेली बर्फी यम्मी होती.

ती ते व्हीट जर्म चे काही काही बनवते ते पण छान असणार. व्हीट जर्म आरोग्यदायक आहे. खरेतर हा भाग परत बघायला हवा. फार फास्ट फास्ट तिने सर्व बनवले आहे. गव्हाच्या तुसा पासून हॅ ट बास्केट बनव्ले ते राहिलेच आहे नीट बघायचे.

लीझिकी जग आज बटाटामय झाले होते. मजा आली बघायला. ह्या चिनी लोकांचे कापणीशास्त्र प्रचंड प्रगत आहे. कुठल्याही कंदाच्या/भाजीच्या सळ्या अगदी एकसारख्या कापतात. झिकीचे बोट कापले गेले Happy

आजी नात मिळून इतके जेवण का बनवतात? 10 माणसे खातील इतके जेवण असते. डियांशीच्या घरात तितकी माणसे दिसतात तरी. झिकीची सगळी फौज बिहाइंड द कॅमेरा काम करते आणि शूटिंग संपले की जेवते बहुतेक.

ती अधून मधून शेजारी जेवण देते. आजही दिले. पण देऊनही जेवणाच्या टेबलावर ढिगांनी अन्न होते. बटाटे भाजलेले, उकडलेले. मी नुसते भाजके खाल्ले असते तरी बाकी काही खाता आले नसते. लॉबस्टरसारखे दिसणारे क्रेफिश चे दोन प्रकार, बटाट्याचे अनंत प्रकार... एका वेळेस किती खाणार...

हो, साधना माझ्या मनातही कायम हेच येतं,. एवढे पदार्थ खाउ कसे शकतात एका वेळेस? आजी पण जोडीने खात असते. बाकी आजचा व्हिडिओ मस्तच होता. बटाटा आणि जांभळं कोनफळ आहे का ते?
लॉबस्टर सारखं जे काही होतं ते फिश च्या पेक्षा मला झूरळांसारखं वाटत होतं (त्यामुळे कसं तरी झालं) Sad

जांभळा पण बटाटाच.

आणि ते क्रेय फिश. गोड्या पाण्यात असतात असे वाचले. हे लोक सरळ वरच्या कवचासकट शिजवतात आणि मग सोलून खातात.

गेल्या आठवड्यात डियांशीकडेही हीच डिश होती, बहुतेक या दिवसात मिळत असावेत. तिला बहुतेक भेट म्हणून मिळाले होते. तिने शेपूट काढली आणि कात्रीने पाठीचे कवच कापून आतला दोरा काढला. खूप वेळ जिवंत होते तिचे क्रेय फिश, लिझिकीचे पण Sad

सगळेच कवचधारी जीव मरायला जरा कठीण. हल्ली त्रास होतो असले काही बघायला. खेकडे वगैरे कवचधारी कधी कधी कढीत सोडेपर्यंत जिवंत असतात.

ती हत्तीणीची बातमी बघितल्यापासून खूप अस्वस्थ वाटतेय, प्राण्यांना माणसाने किती त्रास द्यावा ह्याला मर्यादा नाहीच का?

त्यामुळे मांसाहार नकोच किंवा करायचाच तर निदान प्राण्यांना कमीत कमी त्रास होईल असे मारून तरी खावे असे आता वाटायला लागलेय. हलाल मिट तर अजिबात नकोच असे ठरवलंय. त्यामुळे बाहेर खाण्यावर खूप मर्यादा येणार, विकत घेऊन करायलाही मर्यादा येणार माहीत आहे पण आता नकोच असे वाटतेय.

बटाट्याचा विडू मस्तच आहे. ५०% प्रकार तरी व्हेजी होते यात. तो पांढरा + जांभळा कीस कसला सुरेख दिसत होता!

एका जेवणात सगळेच्या सगळे पदार्थ बटाट्याचेच Uhoh
तिची ती काचेची किटली कसली मस्त आहे. मोगर्‍याच्या कळ्या टाकून चहा बनवते मस्त.

मोगर्‍याच्या कळ्या टाकून चहा बनवते मस्त.>>>
सुरवातीला मोगरा तोडताना पाहूनच मी उडी मारली. म्हटले अरे, आपला मोगराही आहे तिकडे. अर्धवट फुललेली फुले अशी सुकवायचा प्रयत्न केला नाही कधी. करून बघायला हवा. मलाही आवडला चहा व किटली. बटाटा किस पॅटिस बघून रोष्टीची आठवण झाली. तिच्या कालच्या काही डिश करून बघणेबल आहेत. ओव्हनमध्ये भाजून केलेल्या बटाटे चकत्या पण छान दिसत होत्या. ती खाताना हावरटासारखी खाते असे मला वाटते Happy

Pages