लिझीकीचे जग

Submitted by मामी on 13 September, 2019 - 12:22

लीझीकी (Li Ziqi) - चीनच्या शेझुआन प्रांतातील एका गावात शांत, निसर्गरम्य परिसराच्या सोबतीत राहणारी एक गोडशी मुलगी. तिच्यापेक्षाही गोड असलेल्या आजीबरोबर ती राहते. आजूबाजूला केवळ एक भरभरून देणारा, डोळे निववणारा निसर्ग आहे. या सकस मातीतून पिकवलेल्या ताज्या भाज्या, धान्य, फळं यापासून ती मुलगी काय काय पदार्थ आणि प्रकार बनवते. वेलकम टु लिझीकी चॅनल - हा एक युट्युबवरचा आनंदाचा खजिना आहे आणि ती आहे या चॅनलची अनभिषिक्त राणी. लीझीकीचा एक एपिसोड बघा की तुम्ही तिचे चाहतेच होऊन जाता.

गेल्या दोन वर्षांपूर्वी युट्युबवर आलेली २९ वर्षांची लिझीकी आता खूप प्रसिद्ध युट्युबर आहे. आज तिच्या चॅनलचे ६० लाखांपेक्षाही जास्त चाहते आहेत. पण तिचं बालपण आणि युट्युबवर येण्याआधीचं जीवन खूप खडतर होतं. अगदी लहानपणीच आईवडिलांचा घटस्फोट पाहिलेली, १४व्या वर्षापासून शाळा सोडून देऊन नोकरीला लागलेली, वेळप्रसंगी भुकेली राहलेली, पुलाखाली झोपलेली, पडेल ते काम करणारी अशी ही लिझीकी आजीच्या आजारपणामुळे शहर सोडून गावात आली. तिच्या आजोबांकडून तिनं चीनचं पारंपारीक जेवण, बागकाम, मासेमारी, सुतारकाम, बुरुडकाम अश्या गोष्टी शिकल्या होत्याच. चीनमध्ये युट्युबचं प्रस्थ वाढायला लागल्यावर तिनं तिच्याकडे असलेल्या या खजिन्याचा उपयोग करून व्हिडिओ बनवायला सुरवात केले. हळू हळू तिचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागले आणि केवळ दोन वर्षांत ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसलीये. तिनं तिची एक स्टाईल निर्माण केलीये. इतकं असूनही तिनं तिची प्रायव्हसी जपलीये बरं. ती नक्की कुठे राहते हे नेटवर उपलब्ध नाहीये.

लिझीकी नेहमी पारंपारीक तिच्या प्रांतातील पोशाख करून व्हिडिओत दिसते. ते पोशाखही देखणे असतात. तिच्या प्रांतातील चार मोसम तिच्या व्हिडिओंतून बघायला मिळतात. तिच्या घरातील सर्व वस्तू, भांडी, तिची जेवण करण्याची पद्धत एकदम पारंपारीक आहेत. एका दृष्टीनं पाहिलं तर ती तिच्या या व्हिडियोंद्वारे या जुन्या चिनी परंपरांचं डॉक्युमेंटेशन करून एक भरीव कार्यही आपसुकच करत आहे. तिचं ऑनलाईन शॉपही आहे.

ती तिच्या व्हिडिओत सुंदर, नाजूक तर दिसतेच पण त्याचबरोबर काटक आणि मेहनतीही दिसते. जंगलातली, शेतातली, सुतारकामाची कामं करणं सोपं नाही. यामुळेच कदाचित तिला तिचे चाहते 'ब्रदर ली' असंही म्हणतात. तिचं त्या गावात खरंखुरं शेत आहे आणि त्यात ती मका आणि भुईमुग उगवते. शिवाय ती डुकरं आणि रेशमाचे कीडेही पाळते. हा तिचा पारंपारीक व्यवसाय आहे.

तिच्या घराबाहेरच भाज्या धुवायला एक डोणी आहे. त्यावर बांबूमधून पाणी पडतं. भांडी सगळी लाकडी किंवा बीडाची असावीत. बांबूचा तर उपयोग ठायी ठायी दिसतो. सगळं कसं नेटकं, देखणं. दिवस असो वा रात्र, कोणताही ऋतू असो, ही आपली टणटण उड्या मारत काय काय पटापट करत असते. घराच्या परसातल्या बागेतून, बाहेरच्या जंगलातून, तळ्यातून ती कायबाय चटचट तोडते, खुडते, गोळा करते. घरी येऊन लगेच झटपट कामाला लागते. ती फळं साठवते, पीठं करते, वाळवणं घालते, जॅम-जेली-वाईन करते. हे सगळे साठवणीचे पदार्थ. याबरोबरच ती जेवणंही करते. दोघीच तर जेवणार पण तरीही निदान चार प्रकार तर हवेच. सुंदर, सुबक, साधेच असे ते प्रकार असतात. छानश्या भांड्यांतून , प्लेटींतून ती जेवणाच्या लाकडी टेबलावर ते नेते. तिची आजी तिथे बसलेली असतेच. एका सुंदर पंख्यानं वारा घेत. मग दोघी मिळून हसतखेळत त्या जेवणाचा आस्वाद घेतात.

जेवण तरी किती मजेमजेशीर. एका कमळाच्या तळ्यातून तिनं कमळं, त्यांची पानं, त्यांचे देठ आणि त्यांची मूळं आणली आणि काय काय बनवलं. मूळांपासून पीठ केलं, त्या पीठाचं सूप केलं, देठ भाजीला वापरले, पानात गुंडाळून काहीतरी उकडलं आणि कमळाच्या गुलाबी पाकळ्यात काही भाज्या घालून ते रॅप्स बनवून खाल्ले. बघूनही मन तृप्त होतं अगदी. असंच एकदा भोपळ्यापासून अनेक प्रकार केले तिनं. त्यात भोपळ्याच्या मॅशला दोरे बांधून त्यांना मिनी भोपळ्यांचा आकार दिला. काय देखणं होतं ते. एकदा काय तर सगळे प्रकार मक्यापासून केलेले. असली गुणी मुलगी ना!

तिचं स्वयंपाकघर भारी मस्त. एक छोटुशी शेगडी तर दुसरं एक मोठं चुलाण आहे तिच्या स्वयंपाकघरात. चुलाणाला मागून लाकडं टाकायला जागा आहे. तिची आजी कधीकधी तिथे बसून लाकडं चुलीत सारत असते. त्या चुलाणावर एक भलं मोठं वोक म्हणजे कढई असते. त्यात ही सुगरण निगुतीनं जेवण बनवते. तिच्याकडे खूप खाद्यपदार्थ उकडलेलेही बनतात. त्यासाठी एक बांबूचा पारंपारीक स्टीमर आहे. तो ती त्याच वोकवर ठेऊन वापरते. तिच्याकडे घराबाहेर एक भट्टी/आवनही आहे. त्यातही काय काय भाजते ती.

तिच्या व्हिडिओजमधली अगदी प्रत्येक फ्रेम देखणी. सुर्योदय, सूर्यास्त, तार्‍यांनी खचाखच भरलेलं रात्रीचं आकाश, बर्फ, विविध झाडं, फळं, भाज्या, फुलं, प्राणी आणि स्वतः लिझीकी असं सगळं कसं मिळून आलेलं असतं. किती रंग असतात आणि ऋतुप्रमाणे बदलतातही. पण सगळं कसं आदब राखून, अजिबात उथळपणा नाही तिथं. मागे एक अत्यंत शांतवणारं हलकं संगीत सुरू असतं. तिच्या रोजच्या कामाच्या निमित्तानं होणार्‍या आवाजांनाही एक सुंदर नाद आहे. पाण्याचे, भांड्याचे, झाकणांचे आवाज, बांबूच्या गोल परातीत बिया सुकवायला टाकते, त्या सुकलेल्या बिया बरणीत ओतते ते आवाजही निव्वळ आनंददायी.

शिवाय आपल्याला न कळणारं आजी आणि नातीचं बोलणं, त्यांचं खळखळून हसणं इतकंच असतं. संवादांची गरज नाही, भाषांतराची गरज नाही. अगदी अलगदपणे त्या हृदयीचे आपल्या हृदयी पाझरत राहतं. एक विलक्षण अनुभव असतो हा. तिच्याच शब्दांत सांगायचं तर Life isn't easy, BUT YOU CAN LIVE WITH YOUR HEART!

*****************************************************
लिझीकी चॅनल : https://www.youtube.com/channel/UCoC47do520os_4DBMEFGg4A
लिझीकीची गोष्ट : https://raknife.com/li-zi-qi/
ऑनलाईन दुकान : https://liziqishop.com/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ही एक अझरबैझानची स्त्री आहे. मस्त आहे हा व्हिडिओ. किती मिनिमॅलिस्टिक आहे जेवण ते बघा.

https://www.youtube.com/watch?v=Ga_2DQNeN5U

country life vlog azerbaijan असा सर्च दिला की हे मस्त मस्त व्हिडिओज बघायला मिळतील.

ली झिकी चा नवा गुलाबांचा एपिसोड बघितला का? सुरेखच आहेत फुले. ती जे काय गुलकंद जॅम जेली बनवते चॉकोलेट्स पक्षी बदाम घातलेल्या कँडीज त्या पण सुरेख आहेत. व बाटल्या एकदम युनिक डिझायनर. झाकण म्हणून फक्त एक लाकडी बॉल आहे. ती बाटली नक्की बघा.

लिझिकी बघायला आवडतेच.
हल्ली सलील जमादार चे व्हिडीओज बघतेय.हुशार मुलगा आहे.हे सगळं(खुले आम इंडस्ट्री मधल्या वाईट गोष्टींवर गाणी लिहिणे) फार अतिशयोक्त पुढे नेलं नाही तर स्वतः पुढे जाईल.आणि मग ज्या गोष्टींबद्दल तो आता बोलतो त्याच नाईलाजाने त्यालाही कराव्या लागतील.
हल्ली ज्या खुलेपणाने व्हिडिओ मध्ये काही शब्द बोलले जातात ते बघून मला जरा मेंटली शॉक व्हायला होतं.शिवाय 'इतक्या गोष्टी करतात/बघतात आजकालची मुलं' म्हणून माझ्या मुलीसाठी नव्याने चिंताग्रस्त व्हायला होतं.(बनेगी अपनी बात पालकां समोर पाहिलं तर निर्लज्ज आणि 'मिल्स अँड बून' मधले प्रणय प्रसंग किंवा जत्रा मधले जोक वाचणे म्हणजे पराकोटीचे पॉर्न वाचणे अश्या रिस्ट्रीक्षन वाल्या युगात मी आणि आजूबाजूच्या 90% मुली वाढल्या.बरोबरची मुलं यापेक्षा थोडी पुढे असली तरी तीही जंगली जवानी वगैरे इतक्याच लेव्हल ची पुढे होती.)
आताच्या बॉईज ना किती आकर्षणांपासून,किती पिअर प्रेशर पासून जपून राहायचं आहे,स्वतःला विधायक गोष्टींकडे वळवायचं आहे हे नव्याने जाणवलं.
लिंक मुद्दाम दिल्या नाहीयेत.स्वतः शोधा.

या लिझीकीच्या प्रेमात बरीच लोकं अहेत बहुधा. एक 'गावरान एक खरी चव' नावाचा चॅनल आहे यूट्यूबवर. त्यात त्या आजी आणि काकू मस्त शेतात बसून पदार्थ करायच्या आणि त्यांच्या बोली भाषेत नीट कृती समजावून द्यायच्या. पण गेल्या काही व्हिडीओंपासून त्यांच्यात लिझीकीसारखा बदल झाला आहे. एक म्हणजे मागे अगदी लिझीकी टाइप म्युझिक चालू असतं आणि आजी, काकूंचं बोलणं कमी झालं आहे. अ‍ॅडीशनली त्या स्लोमोशनमधे रेसिपी दाखवायला लागल्या आहेत आणि व्हिडीओमधे रेसिपीव्यतिरिक्त इतर पानं, फुलं, झाडं वगैरे जास्त येतात. अगदीच सगळं खटकतंय असं मी म्हणणार नाही. पण त्यांनी त्यांच्या व्हिडिओजचा गावरान गोडवा जपावा असं मला वाटतं. इतर गोष्टी जरूर दाखवाव्यात पण त्याच सोबत त्या आजी आणि काकूंचं बोलणं, प्रेमाने रेसिपी टिपांसहित समजावणं हे ही दाखवावं.

हो का? मी त्या आजी आणि काकूंचे भरपूर व्हिडिओज बघितले आहेत. त्यांनी त्या लिझीकीची कॉपी करायला जाऊ नये ह्याच्याशी सहमत.

रमड, खरंच की! आजीबाई लिझिकीच्या धर्तीवर व्हिडिओ करायला लागल्यात. मागे अगदी सेम म्युझिक. टोमॅटो बांबूच्या नळीतून आलेल्या पाण्यानं धुतायत की लिझिकीसारखे. क्लोज अँगलनं घेतलेले शॉट्स , लसूण सोलून मातीच्या प्लेटमध्ये आवाज करत टाकले ....

मूळ गोडवा जातो अशानं कोणाचीतरी कॉपी केल्यानं. लोकांनी फीडबॅक दिले की येतील पुन्हा आपल्याजागी. याव्यात!

मी आजच बघितला त्यांचा व्हिडिओ. मागे पक्षांचा नॅचरल आवाज असताना सुदिंग म्युझिकची काहीही गरज नव्हती. उगीच कशाला कॉपी वगैरे? त्यांच्याकडे आता नवीन लाकडाची भांडीम्पण दिसली. त्यांच्या खेड्यातल्या आयुष्यात ती अगदीच मिसफिट वाटली.

बरेच दिवसाच्या गॅपनंतर जेव्हा त्यांनी व्हिडिओ टाकला तेव्हा तर अगदीच कॉपी टो कॉपी ट्रॅडीशनल गर्ल सारखा होता. जराही बोलणं नाही आणि अगदी कृत्रिम वाटत होत सगळं. नंतरचे व्हिडिओ मग परत पुर्वी सारखे रेग्युलर होत चाललेत. आता परवा टाकलेला बराच पुर्वीसारखा होता. सो होईल परत पुर्वी सारखं.
ते पाणि झर्‍यासारख येण वगैरे दाखविण अगदीच आउट ऑफ प्लेस आहे. ते जे मोटेच किंवा स्किमच पाणी दाखविलय ते बरोबर दाखवित होते. घर पण तस बांधून का ठेवलय काय माहित. आणि भाकरी मातीच्या तव्यापेक्षा लोखंडी तव्यात दाखवित होते तेच बरोबर वाटत. सगळीकडे उगाच मातीची भांडी दाखवायचा अट्टाहास का चालला आहे काय माहित. Sad प्लॅस्टीकची वापरू नका. पण स्टील , पीतळ वगैरे मध्ये भाजी केली कि त्याला रेटींग मिळणार नाही अस वाटत कि काय माहित.
मला त्यांचा नदिच्या पाण्याजवळ बसून मसाले भाताचा विडिओ फार आवडतो . तो अगदी टिपिकल आणि जराही कृत्रिम वाटत नाही. भाज्या थोड्या ढिगाने घेतल्या आहेत पण तरी ठिक आहे.
जो कोणी हा नविन आयडियाबाज आहे त्याच्या आयडियाची गरज नाही आहे खरतर. आजी आणि ताई इनफ आहेत.हे म्हणजे चांगल्या चाललेल्या प्रोजेक्ट/रिपोर्टचे दुसरी टिम काही तरी नविन टुल वापरती आहे म्हणुन व्हिपी तेच टुल वापरा म्हणुन सांगतो आणि प्रोजेक्टची वाट लागते तस वाटतय. Lol

मातीची भांडी वापरणं खूप वाढलं आहे हे लक्षात आलं आहेच. पण एका व्हिडिओत लाकडाचीही दिसली जी अगदीच बरोबर दिसत नाहीयेत.

करेक्ट. आता परवा सगळे टोमॅटो एका मोठ्या पातेल्यात पाणी भरून त्यात टाकले होते. ते अगदीच कृत्रिम वाटलं. उलट त्यांचं आधीचं जरूरीपुरतं सामान, मसाले वगैरे द्रोणात घेणं, निगुतीने स्वयंपाक करणं बघायला जास्त आवडत होतं.

हो का? मी त्या आजी आणि काकूंचे भरपूर व्हिडिओज बघितले आहेत. त्यांनी त्या लिझीकीची कॉपी करायला जाऊ नये ह्याच्याशी सहमत. >>> अगदी अगदी. मी सध्याचे त्यांचे नाही बघितले पण आधीचे फार छान आहेत.

आज बऱ्याच दिवसांनी यु ट्यूब उघडले आणि ट्रॅडिशनल मी चा विडिओ बघितला.

https://youtu.be/TjXKOiszi-4

मस्त वाटले बघून.

कैरी व कोळंबीचे सुके, ताज्या पावासोबत. बारीक साबुदाण्याची घट्ट खीर, आंबा व किवीच्या तुकड्यांसोबत एकत्रित करून. संध्याकाळी चहासोबत आंब्याचे लाडू. मला चाहसोबत तिखट खायला आवडले असते काहीतरी पण तिच्या खादाड माहीला असलेच काहितरी भन्नाट आवडते. त्यांचा चहा अर्थात दूध विरहित होता.

युट्युबनं मला आज हे सुनील डीमेलोचं चॅनेल सुचवलं.
Sunil D'Mello : https://www.youtube.com/c/dmellosunny/videos

छान आहे हे. वसई आणि परिसरातील भाजीपाल्याची शेती, तेथे राहणारे इस्ट इंडियन्स, त्यांची संस्कृती, रहाणी, खानपान, सण उत्सव आणि वसई जवळील प्रेक्षणीय स्थळं असं काय काय दिसतंय.

मी हा भाजीच्या शेतीचा व्हिडिओ पाहिला. मस्त आहे.
वसईतील भाजी शेती | Vegetable farming in Vasai : https://www.youtube.com/watch?v=bmP8We3_hII

मामी सुनील डिमेलोचे छान असतात व्हिडीओज. बरेच बघितलेत मी. त्याने वसई आसपासचा प्राचीन इतिहास पण छान सांगितला आहे, त्याचा दुसरा भाग बघायचा आहे.

त्याने त्याच्या मोठ्या मुलीबरोबर सलील कुलकर्णी, संदीप खरेची एक कविता म्हटली आहे ( आयुष्यावर बोलू काही) , तो ही व्हिडीओ छान आहे.

तिथल्या शेतीला, समुद्राला इतकं रिलेट करतेना मी की बास रे बास, तिथली गावं आणि शेती बघण्यासाठी मुद्दाम गावागावातून फिरून जाणाऱ्या बसने फिरायचो आम्ही. कधी कधी शेतीच्या आजूबाजूंनी चालतही जायचो, समुद्र मला आणि सार्थकला प्रचंड आवडतो म्हणून समुद्रावर जायचो कधी कधी. मला तेव्हा डोंबिवलीत आमच्या चाळीच्या आसपास भातशेती व्हायची ते लख्ख आठवायचं, आता काँक्रीट जंगल झालं आहे सर्व.

मी बघते ली झिकी अधून मधून फारच रिलेक्सिन्ग व्हिडीओ असतात. लाइफ ऑफ रोज वगैरे छान आहेत. शांघाय मधील लॉक डाउन व सरकारी दमन शाहीचे खरे व्हिडीओ व हे सरकारने बनवलेले प्रचारकी स्वप्नाळू व्हि डीओ ह्यात फार फरक आहे. श्रीलंकेतही तसेच. त्यामुळे ट्रॅडिशनल मी बघतानाही तसेच वाटते. सद्य परिस्थितीत जनता पेट्रोल तांदूळ साठी धावत आहे.

ली झिकी मध्ये नेहमी नवनवे पपीज दाखवतात . पेट डॉग नाही. पपीज चे क क्युट फसवे शॉट्स आहेत. मग मारून खात असेल सटवी. व्याख्याविख्ही वुख्हू.

अंजू, मीही पाहिले आहेत ते व्हिडियो.मस्त आहेत.
पण आताशा सगळ्याजणी व्हिडियो करायला लागल्या की आधीपासून होत्या ते माहीत नाहीपण तोच तोच पणा आला आहे.

हो तोच तोच पणा आलाय हे खरं आहे, मी actually रेसिपीसाठी बघितला हा व्हिडिओ. करेन असं नाही.

त्या मराठी आजी आणि सुनेचे शेतात रेसिपी करायचे व्हिडिओ आधी आवडायचे, तिथेही थोडं इतरांचे बघून कॉपी करून मोठे करतात व्हीडीओज, त्यामुळे कृत्रिमपणा वाटतो.

बापरे ती लिझीकी फार मेहनत घेते. ही जड कामे करू नाही शकणार. बाकी आत्ताच मागच्या आठवड्यात एकंदरीत चार दिवस कोकणात माहेरी (संगमेश्वर तालुका) आणि सासरी (देवगड तालुका) मिळून जाऊन आल्याने निसर्ग रिलेट केला. अनेक फुलं वेचली, काढली (बहिणीने जास्त प्राजक्ताची फुलं वेचली). पेरू, पपई काढले. एरवी काही vlogs बघताना असं होतं की अरे हे जरा वेगळं आपल्या कोकणात आहे पण आपण जातच नाही (खरं म्हणजे मला वैयक्तिक काही कारणं आहेत म्हणून जाता येत नाही), यावेळी निसर्ग बघताना मात्र अरे आपण आत्ताच अनुभवून आलो असं वाटलं. तिथे जड कामे करायला मात्र अजूनही बोलावल्यावर मदतनीस (गडीमाणसे) येतात. लाकडे फोडून दे, असोले नारळ सोलून दे अशी सर्व कामे करतात.

लिझिकी परत आली.छान झालं.
नेमके आताच भारत चीन संबंधही सुधारताहेत. सब पैसे का खेल. चीनी मदतीशिवाय आपले उद्योगधंदे चालणार नाहीत, ही जाणीव झाली. त्यामुळे
चीनी लिझिकीचे व्हिडियो कोणत्याही अपराधभावनेशिवाय पाहता येतील. किंवा तसा दिखावा तरी करायला लागणार नाही.
आता टिक्टॉक पण दिसू दे.

Pages