कंपोस्टिंगचे एक वर्ष

Submitted by वावे on 6 June, 2018 - 08:45

भाज्यांचे आणि फळांचे देठ, साली, बिया, उरलेले, नासलेले अन्न, अंड्यांची टरफले, मांसाहारी स्वैपाकातून उरणारे हाडांसारखे टाकाऊ पदार्थ ही नावे उच्चारली तर प्रथम काय डोळ्यासमोर येतं ? भरून वाहणारी कचराकुंडी आणि दुर्गंध, हो ना? पण या सगळ्या घटकांमध्ये फक्त अजून २ घटक मिसळा- जीवाणू आणि थोडीशी इच्छाशक्ती- मग पहा काय तयार होतं ? झाडांसाठी अत्यंत पोषक असं कंपोस्ट!

मार्च महिन्यात मला कंपोस्टिंग सुरू करून एक वर्ष पूर्ण झालं. या एका वर्षात मी माझ्या घरात तयार होणार्या ओल्या कचर्यापासून जवळजवळ पन्नासएक किलो कंपोस्ट खत तयार केलं. मी कुंडीत लावलेल्या झाडांसाठी तर ते खत वापरलंच, पण शिवाय सोसायटीतल्या अनेकांनी माझ्याकडून कंपोस्ट खरेदी केलं. शिवाय, माझं पाहून सोसायटीतल्या अजून दोघीजणी त्यांच्या घरी कंपोस्ट तयार करू लागल्या.
हे घरगुती कंपोस्ट वापरून आम्ही घरी कुंड्यांमध्ये टोमॅटो, अळू, पालक, गाजर, बीटरूट, कोथिंबीर, पुदिना अश्या भाज्या पिकवल्या.

21oct2017 977_0.jpeg

हा आमच्या कुंडीतला पालक.

phone photos 128.jpg

हे टोमॅटो!


मुळात कंपोस्ट म्हणजे काय?

कंपोस्ट म्हणजे ओल्या कचर्याचे विघटन होऊन तयार झालेले खत. कंपोस्टिंग ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती सतत निसर्गात चालू असते. जंगलात झाडांची पाने जमिनीवर पडल्यावर हळूहळू त्यांचे विघटन होते. या विघटन होत असलेल्या पानांमधील पोषक द्रव्ये झाडाच्या मुळांकडून शोषली जातात. असं हे नैसर्गिक रिसायक्लिंग आहे.

आता घरात कंपोस्ट तयार करायचे असेल तर काय करायचं?
आपल्या घरात तयार होणार्या कचर्यापैकी सुमारे ७०% कचरा हा जैवविघटनशील असतो. भाज्यांचे देठ, साली, उरलेले अन्न, वापरलेले टिश्यू पेपर्स, सुकलेली फुले, चहा/ कॉफी पावडर/ टीबॅग्स, अंड्याची टरफले, मांसातील हाडे, नारळाच्या शेंड्या हा सगळा कचरा कंपोस्टमध्ये रूपांतरित करता येतो. हा सगळा कचरा एका वेगळ्या टोपलीत/ प्लॅस्टिकच्या डस्ट्बिनमध्ये ठेवायचा. बाकी प्लॅस्टिकचा, रबराचा वगैरे कचरा यात मिसळायचा नाही. दिवसातून एकदा हा ओला कचरा कंपोस्टिंग बिनमध्ये घालायचा. ही कंपोस्ट बिन विकत मिळते किंवा घरीही तयार करता येईल. ( घरी तयार करायची असेल तर एखादा झाकण असलेला प्लॅस्टिकचा उभट डबा/ झाकणवाली बादली घ्या आणि त्याला खालपासून वरपर्यंत ठराविक अंतरावर छोटी छोटी छिद्रं पाडा. आत हवा खेळती राहण्यासाठी ही छिद्रं आवश्यक आहेत). मग या कचर्याचं विघटन होण्यासाठी त्यात ' विरजण’ किंवा कल्चर घालायचं. हेही विकत मिळतं. कचर्याचं विघटन करून त्याचं कंपोस्ट्मध्ये रूपांतर करणारे हे जीवाणू असतात. कोकोपीट ( नारळाच्या शेंड्यांची पावडर) आणि हे जीवाणू एकत्र करून आपल्या ओल्या कचर्यात घालायचे. वर एक वर्तमानपत्राचा कागद घालायचा आणि झाकण लावून टाकायचं. बास, रोज २ ते ३ मिनिटं लागतात फक्त हे सगळं करायला! एकदा आपलं कंपोस्ट तयार झालं की हे कल्चर विकत आणण्याचीही जरूर नाही. आपलं कंपोस्टच नव्या ओल्या कचर्यात मिसळायचं की झालं!
अशा दोन तरी बिन्स आपल्याकडे पाहिजेत. म्हणजे एक बिन भरली की दुसरीत कचरा टाकायला सुरुवात करता येते. साधारणपणे २ महिन्यांनी कंपोस्ट तयार होतं. मधून मधून ते ढवळावं, म्हणजे सगळीकडे हवा लागते आणि कंपोस्टिंग चांगलं होतं.

21oct2017 979.jpg

गेल्या वर्षी सोसायटीत कंपोस्ट्चा स्टॉल लावला होता. तेव्हाचा हा फोटो. या फोटोत डावीकडे प्लॅस्टिकचा स्टॅक टाईपचा कंपोस्टर आहे आणि त्याच्या बाजूला स्टँड अलोन कंपोस्टर ( जो माझ्याकडे आहे)

बंगळूरमध्ये रहायला आल्यापासून आपणही घरी कंपोस्टिंग करावं असा विचार डोक्यात मधूनमधून घोळत असे. बंगळूरमध्ये डेली डंप ही कंपनी या कंपोस्ट बिन्स बनवण्यात आघाडीवर आहे. सुरुवातीला ते फक्त टेराकोटाचे कंपोस्टर विकत असत. बंगळुरात अगदी मध्यमवर्गीयांमध्येही स्वत:चं स्वतंत्र घर असणं आणि घराभोवती जागा असणं हे आत्ताआत्तापर्यंत कॉमन होतं, त्यामुळे टेराकोटाचे भलेमोठे जड कंपोस्टरही विकत घेणारी बरीच मंडळी होती.
21oct2017 1041.jpg

यात टेराकोटाचा स्टॅक टाईप कंपोस्टर दिसतोय.

आम्ही मात्र फ्लॅटमध्ये राहणारे. त्यामुळे ते शक्यच नव्हतं. शिवाय, त्या कचर्याचा वास तर घरभर पसरणार नाही ना, मुलंही लहान आहेत, ती त्या कचर्याजवळ जाऊन त्यांना काही इन्फेक्शन वगैरे तर होणार नाही ना, अशा शंकाही मनात येत होत्याच. शेवटी गेल्या वर्षी या सगळ्या शंका बाजूला सारून कंपोस्टिंग सुरू करायचं ठरवलं. तोवर डेली डंपने प्लॅस्टिकचे कंपोस्टरही विकायला सुरुवात केली होतीच. त्यांच्या २ बिन्स आणल्या. चुकत माकत सुरुवात झाली. कचरा आणि कोकोपीटचं मिश्रण खूप ओलसर झालं तर त्यात भरपूर अळ्या (maggots ) होतात, दुर्गंधही येतो. मिश्रण खूप कोरडं झालं तर कचर्याचं विघटन होत नाही. अशा दोन्ही प्रकारच्या चुका करून हळूहळू आम्ही शिकत गेलो. आता मात्र हे काम अगदी अंगवळणी पडलं आहे. रोज सकाळी किंवा रात्री दिवसभराचा ओला कचरा बिनमध्ये टाकायचा, साधारणपणे ३ आठवड्यांनी दोन्ही बिन्स भरल्या की आधीच्या बिनमधलं अर्धवट तयार झालेलं कंपोस्ट दुसर्या एका मोठ्या बादलीत काढायचं, पूर्णपणे तयार झालं की चाळून ठेवून द्यायचं. तोपर्यंत सोसायटीतल्या मैत्रिणींचे ’ कंपोस्ट तयार आहे का?’ असं विचारणारे फोन येऊन गेलेलेच असतात. खरंतर कंपोस्ट जितकं जुनं (मुरलेलं) तितकं जास्त चांगलं. पण बाल्कनीत जागा मर्यादित. त्यामुळे मी फार काळ ते ठेवून देत नाही.
21oct2017 902.jpg

हे चाळून तयार झालेलं फायनल प्रॉडक्ट Happy

खरंतर अगदी साधी सोपी अशी ही पद्धत आहे. त्यात खूप वेळही जात नाही. आपण रोज जो ओला कचरा महानगरपालिकेच्या ताब्यात देतो, तो जर घरीच कंपोस्ट केला तर तब्बल ३०० किलो कचरा ( हा आकडा चौघांच्या कुटुंबासाठी आहे ) आपण लॅन्ड्फिलमध्ये जाण्यापासून वाचवतो. पण कंपोस्टिंगबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका असतात, दुर्गंध येईल याची धास्ती असते, वेळखाऊ प्रकरण असेल असं वाटत असतं. त्यामुळे सहजासहजी कुणी कंपोस्टिंग करू धजत नाही. हे काम वाटतं तितकं कठीण आणि वेळखाऊ नाही हे सांगावं आणि कंपोस्टचं १ वर्ष पूर्ण झाल्याचं ’ सेलिब्रेट’ करावं असं वाटलं म्हणून हे लिहावंसं वाटलं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागच्या वेळी कल्चर वगैरे न वापरता अगदी मस्त खत झालं. यावेळी जरा धाकधूक होती - beginner's luck संपलं असेल म्हणून. आणि तसंच झालं - यावेळी कचरा खूप ओला झालाय - तळाशी पाणी झालंय. काय करावे?? खरंतर कचरा ढवळण्याचं योग्य साधन नसल्याने मी कसलासा लांब पाइप वापरतेय, पण कचरा नीट ढवळला जात नाही असं वाटतंय. शिवाय पावसाने जरा जास्तच कृपा केलेली असल्याने ऊन पण नाही. यावेळी मी कल्चर म्हणून एक eazymix नावाची पावडर घातलीय मधे मधे.

मी जर कचरा नीट ढवळला, आणि कोकोपीट वगैरे घातलं तर अजूनही आशा आहे का? का सगळं मुसळ केरात म्हणून टाकून द्यावं लागेल?

लाकडाचा भुसा घे सुतारांकडून.शिवाय वापरलेले टिश्यू बारीक तुकडे करून, रद्दी बारीक तुकडे करून घातली तर कोरडं होईल.
ओलं राहिल्यावर त्यात पांढऱ्या सोल्जर फ्लाय अळया होतात.या अळ्या कंपोस्टिंग चा वेग वाढवतात आणि त्यांचं खाणं संपलं, उष्णता वाढली की आपोआपच मरून जातात.कोकोपीट/नीम पावडर पण टाकता येईल.
कंपोस्ट वर खाली करायला बागकामाचं तीन दाते वालं वाकलेल्या त्रिशूल सारखं अवजार विकत घेऊन वापर.नारळ फोडायचा कोयता पण चालेल, नंतर स्वच्छ धुवावं लागेल.

धन्यवाद अनु! रद्दी टाकलीय तुकडे करून.. भुसा मिळतोय का बघते. नारळाची शेंडी पण घातलीय थोडी. ते ३ दाते वालं अवजार घ्यायचं कधीपासून म्हणतेय. आता घेऊनच टाकते.

अनु +१
दुसरा एखादा डबा असेल तर निम्मा निम्मा करा कचरा दोन्ही डब्यात. नीट ढवळत रहा रोज, पाऊस नसेल तेव्हा डबे उघडे ठेवा.

जीवामृत वापरून कंपोस्टिंग प्रोसेस फ़ास्ट झालेली अनुभवलंय. आणि म्हणूनच कंपोस्ट करताना रूटीन प्रॅक्टीस म्हणून इतर काही कल्चर न वापरता हेच फक्त वापरतोय. छान रिझल्ट्स आहेत.
__________________

कचऱ्याने पाणी सोडले तर त्या कंटेनरला २ स्टेपचा रैक बनवून त्यावर ठेवून बारीक होल केले आणि त्याच्या खाली अजुन एक ट्रे ठेवून त्या पाण्याच्या डायल्यूशन मध्ये अझोला कल्चर केले तर फार चांगला रिझल्ट मिळेल.

अझोलाचे फायदे ―
१) उत्तम सेंद्रिय नत्र खत
२) मल्चिंगसारखे वापरता येते
३) रोपांना पाणी कमी लागते
४) पालेभाज्या आणि तुळशीसाठी ( जेथे पानांची वाढ अपेक्षित आहे अश्या ठिकाणी) खुप जबरदस्त इफेक्ट मिळाला आहे.
५) बदकासारखे पेट्स आवडीने खातात (गावरान पोल्ट्रीमध्ये आणि म्हैशीना तर अतिशय उत्तम पूरक खाद्य)

मी 2 वेळा unsuccessful प्रयत्न केले आहेत. शेती कॉलेजमध्ये जे कल्चर मिळतं ते कुणी वापरलं आहे का?

सध्या माय ग्रीन बिन चे 2 डबे आहेत कंपोस्ट ला.एकातले बरेच कुंड्या भरायला वापरले.दुसरा आता भरला आहे तो ठेवून देऊन पहिला जवळ जवळ रिकामा वापरायला काढायचा आहे.
स्टार बझार च्या ब्राऊन पिशव्या पण कपटे करून टाकते.
रोज किमान अर्धा किलो कचरा कंपोस्ट ला जातो.बाकी प्लास्टिक पिशव्या पॅक ग्रोसरी च्या कचऱ्यात जातात.तो 3-4 दिवसातून एकदा भरला की टाकता येतो वास नसल्याने.
IMG_20200615_101740.jpg
(पाय मनिक्युअर वगैरे केलेले नाहीत बघू नका,कचरा बघा ☺️☺️)
IMG_20200206_074556_0.jpg
ही त्या कंपोस्ट ने भरलेली कुंडी आणि कोथिंबीर. हा पहिला लॉट आम्ही ओरबाडून संपवल्यावर दुसरे धने टाकले आहेत.ते अजून उगवले नाहीत.एकंदर संपवण्याचा रेट उगवण्याच्या रेट च्या 50:1 आहे असे आढळून आले.

@अनु,
थोडे या धाग्याला अवांतर (), तुम्ही हे ग्रीन बीन कुठे ठेवता? आपल्याला जरी त्याचा वास येत नसला तरी किटकांना तो वास जाणवतो आणि खाद्यासाठी आकर्षित होतात, प्रथम बारीक किटक व नंतर पाली.
अवांतर मोड ऑफ()

@पाथफाइंडर, अनु तिचा अनुभव सांगेलच, पण माझाही सांगते.
मी आधी प्लॅस्टिकचे, भोकं भोकं असणारे डेली डंप कंपनीचे डबे जेव्हा कंपोस्टिंगसाठी वापरत होते, तेव्हा maggots सोडून इतर कुठलेही जीव मला त्यात आढळायचे नाहीत.
पण नंतर मी डेली डंप कंपनीचीच, एकावर एक ठेवण्याची मातीची भांडी आणली. मातीची असल्यामुळे ओल्या कचऱ्यातलं पाणी लवकर कमी व्हायला लागलं. हा फायदाच आहे. कचरा ओला राहून दुर्गंध येणे वगैरे अजिबात कमी झालं. पण इतर जीव भरपूर वाढले. कंपोस्टमधले टोककिड्यांसारखे, पण मोठे मोठे किडे हा सध्या मला ताप झालाय.
मी परत प्लॅस्टिकच्या डब्यांकडे वळण्याचा विचार करतेय.

अनु, कोथिंबीर मस्तच. सध्या माझ्याकडे अंबाडी उगवली आहे भरपूर. आज भाजी करण्याचा विचार आहे.

अनु , कोथिंबीर छान दिसतेय.
या lockdown मध्ये एक प्रयत्न मी ही केलायं कंपोस्टचा.
अजून काय बनत नाहीये. 2 महिने झालेत.
मी फक्त कच्च्या भाज्यांंचा कचरा वापरतेय. खरकटं वगैरे वास येईल म्हणून वापरत नाही.

बिन बाल्कनीतच.
हो बरोबर आहे.या किड्यांमुळे पाली आकर्षित होतात.आमच्या मागे शेत असल्याने आम्हाला धामण, सरडे, पाली, खारी, घारी, घुबड,मुंगूस यांची हिस्टरी आहेच.
बिन frp चा आहे.त्यामुळे जड झाकण बंद करतो.खाली कंपोस्ट टी जमवायला जागा आहे.तो मध्ये मध्ये काढून 10 भाग पाणी टाकून झाडांना टाकतो.तो काढला नाही तर एकंदर पाणी जास्त होऊन सोल्जर फ्लाय च्या अळ्या वाढतात.अर्थात त्या वाढल्या की त्या काम फास्ट करतात.मग पाणी काढत राहून कोरडे केले की त्या परत आपोआप कमी होतात/मरतात. बिन चे झाकण घट्ट असल्याने बाहेर येत नाहीत.

स्वस्ति, कंपोस्ट दीड महिन्यात माती सारखा बनायला त्यात ओल्या कचऱ्याचे बारीक तुकडे लागतात.आपण रोजच्या कामात इतके बारीक तुकडे करत नाही.शिवाय कधी उरलेली भाजी/आमटी अगदी थोडी टाकत असल्यास, कलिंगड साली 2 इंच तुकडे टाकत असल्यास एकंदर आर्द्रता आणि नायट्रोजन वाढून क्रिया मंदावते.
जितके बारीक तुकडे तितके फास्ट कंपोस्ट.
आमच्याकडे एकंदर ओला कचरा,उरलेलं खाणं टाकणं व्यापक असल्याने सहा महिन्यात माती सदृश ऐवज तयार होतो.एक बिन भरला की तो बाजूला ठेवून दुसरा बिन वापरायला काढतो.
हे सर्व जुन्या कुंडी/बादलीत पण होतं.पण घरात लोक जास्त आणि भाज्या जास्त बनत असल्यास कुंडी एका आठवड्यात भरते.त्यामुळे थोडी गुंतवणूक करून बिन घेऊन टाकले.
या बिन चा इथला दाक्षिणात्य माणूस(तो कोणत्या तरी साऊथ इंडियन हिरो सारखा दिसतो, आठवत नाही कोणासारखा) दिसतो तो दर 2 महिन्यांनी पाहणी करायला येऊन आम्ही किती मूर्खांसारखे त्यांचे बिन वापरतोय हे सिद्ध करून जातो. (कायम काहीतरी जोरदार स्वयंपाकाची घाई असताना येतो.मी होहो म्हणत माझं काम करत त्याची 25 मिनिटांची बडबड पूर्ण कानाबाहेर जाऊ देते)त्यांचे कल्चर घेऊन फंगल कंपोस्ट करणे अपेक्षित.आम्ही शेताच्या दुकानातून इनोरा कंपोस्ट कल्चर आणून दुसऱ्या प्रकारचे कंपोस्ट करतो आणि त्यांचे बिन त्यांना पाहिले तसे न वापरता आमच्या प्रोसेस साठी डबे म्हणून वापरतो.

स्वस्ति, कंपोस्ट दीड महिन्यात माती सारखा बनायला त्यात ओल्या कचऱ्याचे बारीक तुकडे लागतात. >>> ह्म्म्म्म . पण तो कचरा सुकुन काळा तरी पडायला पाहिजे . ते ही होईना . आता त्यात दह्याच पाणी शिंपडलं दोन-तीन वेळा बघू काही फरक पडतोय का .
तोपर्यन्त नविन कचरा वेगळ्या पिशवीत गोळा करायला सुरुवात केली आहे . आता तो यात मिक्स नाही करणार .

कचरा वाळायला पुरेशी उष्णता/ऊन आहे का?निदान 3-4 दिवसांनी तो पूर्ण खालीवर करायला जमतो का?(नारळ फोडायचा कोयता किंवा बागकामाचे त्रिशूळ सारखे दिसणारे उपकरण(खुरपं ना) याला चांगलं उपयोगी पडतं.)
आता पावसाळ्यात वेग मंदावणार थोडा.

कचरा वाळायला पुरेशी उष्णता/ऊन आहे का?निदान 3-4 दिवसांनी तो पूर्ण खालीवर करायला जमतो का? >>> हो खिडकीत ठेवलयं. . १ वाजेपयन्त कडक उन असायच . आता अर्थातच पावसाळी हवा आहे .

माझंही एक वर्ष पूर्ण झालं कंपोस्ट चं. अर्थात वावे कडून प्रेरणा.
पण ह्या आठवड्यात जरा जास्तच ओलं राहतंय मिश्रण. कोकोपीट किती घालावे? कोरडवाहू होईपर्यंत का?
आणि या नादात एक कधीही न केलेले (गिळगिळीत) धाडस केले. बाल्कनीत गांडूळ पहुडलं होतं. एरव्ही मी उडी वगैरे मारून दूर पळाले असते. पण यावेळी कंपोस्ट मॅनिया मुळे चक्क अलगदपणे उचलून त्या गांडुळास खाऊच्या (त्याच्या) डब्यात सोडलं. डोमा:

प्राचीन, वर्षपूर्तीबद्दल अभिनंदन Happy

कोकोपीट किती घालावे? >> मिश्रण दमट तर राहिलं पाहिजे पण खूप ओलं व्हायला नको एवढं कोकोपीट घालायचं.
मिश्रण खूप ओलं झालं तर फारसं बिघडत नाही, पण maggots जास्त होतात आणि मग त्या इकडेतिकडे फिरायला बाहेर पडतात कधीकधी Proud
पण जर वाजवीपेक्षा जात कोरडं पडलं, तर मात्र कंपोस्टिंगचा वेग मंदावतो.
मला कंपोस्टमधल्या टोककिड्यांसारख्या प्राण्यांनी भयंकर वैताग आणला होता/ आहे. आता मी माझ्याकडचे मूळचे डेलीडंपचे प्लास्टिकचे डबे स्वच्छ धुवून वाळवून त्यात नव्याने कंपोस्टिंग सुरू केलंय. मध्यंतरी घेतलेला टेराकोटाचा डेलीडंप कंपोस्टर आहे त्यात ते किडेयुक्त कंपोस्ट आहे शिल्लक. एकदा त्याची काही तरी विल्हेवाट लावायची आहे.
सध्या मला कोकोपीट नाही मिळालं म्हणून सॉ मिलमधून सॉ डस्ट आणली आहे. आणि Amazon वरून कल्चर विकत घेतलं.

मला पण मागवायचंय
आम्ही इनोरा वापरतो.पण त्यात कोळसा पूड खूप जास्त आहे.
यावेळी लॉकडाऊन, कलिंगड खरबूज वगैरे बऱ्याच ओल्या फळांची सालं आणि कमी ऊन यामुळे भरपूर मॅगॉट झाले आहेत.
आता थोडा वेळ मिळाला की रद्दी पेपर आणि थोडी कोरडी सालं टाकते.
नर्सरी लाईव्ह वरून स्ट्रॉबेरी रोपं मागवली होती.त्याना एकदा स्ट्रॉबेरी आल्या.पण आता किड्यानी कुरतडून भोकं पडली आहेत.
एकंदर लॉकडाऊन मुळे घरी असताना कंपोस्ट कडे जास्त लक्ष, टर्न करणे वगैरे अपेक्षित होतं ते उलट कमी होतंय.
थोडं कडक ऊन पडल्यावर सर्व लायनीवर यायला चालू होईल.

धन्यवाद वावे. खरंच ऊन व कोरडी हवा असताना मस्त भुसभुशीत झालेलं मिश्रण. तोवर प्रयत्न करते कोकोपीट चा. किडे मागच्या वर्षी नव्हते पण थोडी मंडळी दिसू लागली आहेत यंदा. डब्याच्या कडेने लक्ष्मणरेषा ओढून ठेवलीय.

वावे, मस्तच लेख. लेख वाचून मी डेलीडंपची साईट बघितली. त्यांची प्लास्टिकची तीन किंवा चार भांड्यांची सिस्टीम छान वाटतेय. आतापर्यंत मी कुंड्यामधून सुकी पाने, हिरवा ओला कचरा असे भरून रोपे लावली आहेत. त्यात फक्त रोपांची माती आणि वरचा एक थर मातीचा असे असते. तेही रोपांना मानवते चांगलेच.

रासायनिक खते अजिबात वापरत नाही.

आता अधिक चांगल्यापैकी कंपोस्ट बनवायला डेलीडंप कडून त्यांचे युनिट मागवावे म्हणते. तुमच्या लेखामुळे डेलीडंपची माहिती कळली, त्यासाठी तुमचे आभार!

बाल्कनीत गांडूळ पहुडलं होतं. एरव्ही मी उडी वगैरे मारून दूर पळाले असते. पण यावेळी कंपोस्ट मॅनिया मुळे चक्क अलगदपणे उचलून त्या गांडुळास खाऊच्या (त्याच्या) डब्यात सोडलं. >>> मी वाट बघतेय कुठे मिळतय का गांडूळ Happy . खाली फिरणं होत नाही नाहीतर पावसात सापडलच असतं एखादं .
मी जमा केलेला कचरा फारच ओला झालायं. सध्या त्यात टाकायला सुका कचरा पण नाही . थोड कोकोपीट टाकेन . २-३ दिवस अजिबात उन नाही .

माझं प्लास्टिकच्या डब्यात केलेलं कंपोस्ट एकदम छान झालं यावेळेस. Maggots आधी खूप होते पण नंतर कमी झाले. मातीच्या भांड्यांमधे मिश्रण लवकर कोरडं पडत होतं. पण शेवटी कंपोस्ट तयार झाल्यावर चाळलं की वर जाड तुकडे बरेच उरायचे. आत्ता प्लास्टिकच्या डब्यात केलेल्या कंपोस्टमध्ये मात्र खूपच कमी जाड तुकडे उरलेत चाळल्यानंतर. म्हणजे कार्यक्षमता जास्त आहे. शिवाय टोककिड्यांना अजून तरी पत्ता लागलेला नाहीये Happy
सॉ डस्टचाही चांगला उपयोग होतोय. शिवाय ती फुकट मिळते सॉ मिलमध्ये Wink

शैलजा, धन्यवाद Happy

मी तीन चार महिन्या आधी हा लेख वाचून एका जुन्या माठात कंपोस्ट करायला चालू केलं. त्यानंतर 15 20 दिवस मी नियमित त्याला वर खाली करणे नवीन पान वगैरे टाकणे करायची. पण मग घराचं रेनोवेशन च काम निघालं आणि आम्ही काकूंकडे शिफ्ट झालो तीन महिने त्या माठाकडे कुणाचं लक्षच गेलं नाही. त्यात पावसाळा सुरू होता आणि माठावर मी वरून एक पाण्याचा गुंड उलटा झाकून ठेवलेला होता पण तरी कसं काय माहिती त्यात पाणी जात राहील वाटते.
काल मी तो गुंड उचलून कंपोस्ट च काय झालं पाहायला गेली तर तो पाण्याने थोडा भरून होता आणि माठ पूर्ण काळा दिसत होता त्यात थोडे काळे किडे वळवळताना दिसले.. दुर्गंधी मात्र अजिबात नव्हती.
हे काय झालंय काहीच समजले नाही. त्याला हलवुन बघायचं काही धाडस झालं नाही..
आयुष्यात पहिल्यांदाच कंपोस्ट बनवत होते त्यामुळे असा प्रकार घडलाय. असे काळे किडे होत असतात का कंपोस्ट मधे..?
त्या कंपोस्ट च ( ? ) आता काय करावं..?
जाणकारांनी कृपया मदत करावी

किडे म्हणजे soldier fly maggots आहेत का? गुगलवर soldier fly maggots सर्च करून पहा. तेच असतील तर हे नॉर्मल आहे.
कंपोस्टमधे पाणी नाहीये ना?
नसेल तर माठ उघडाच ठेवा. soldier fly maggots असतील तर त्यांच्या मोठ्या माश्या होऊन उडून जातील.

Maggots च आहेत वाटतं..तशेच काळे आहेत ते किडे.
मी उद्या दिवसा पाहते..रात्री अंधारात काही इतकं लक्षात आले नाही पण आधी अर्धा भरलेला माठ आता फुलं दिसतोय. पाण्याने च तो भरला असेल अशी शंका आहे. उद्या थोड ढवळून पाहते. वाटल्यास फोटो काढून इथे टाकते.

Pages