भाज्यांचे आणि फळांचे देठ, साली, बिया, उरलेले, नासलेले अन्न, अंड्यांची टरफले, मांसाहारी स्वैपाकातून उरणारे हाडांसारखे टाकाऊ पदार्थ ही नावे उच्चारली तर प्रथम काय डोळ्यासमोर येतं ? भरून वाहणारी कचराकुंडी आणि दुर्गंध, हो ना? पण या सगळ्या घटकांमध्ये फक्त अजून २ घटक मिसळा- जीवाणू आणि थोडीशी इच्छाशक्ती- मग पहा काय तयार होतं ? झाडांसाठी अत्यंत पोषक असं कंपोस्ट!
मार्च महिन्यात मला कंपोस्टिंग सुरू करून एक वर्ष पूर्ण झालं. या एका वर्षात मी माझ्या घरात तयार होणार्या ओल्या कचर्यापासून जवळजवळ पन्नासएक किलो कंपोस्ट खत तयार केलं. मी कुंडीत लावलेल्या झाडांसाठी तर ते खत वापरलंच, पण शिवाय सोसायटीतल्या अनेकांनी माझ्याकडून कंपोस्ट खरेदी केलं. शिवाय, माझं पाहून सोसायटीतल्या अजून दोघीजणी त्यांच्या घरी कंपोस्ट तयार करू लागल्या.
हे घरगुती कंपोस्ट वापरून आम्ही घरी कुंड्यांमध्ये टोमॅटो, अळू, पालक, गाजर, बीटरूट, कोथिंबीर, पुदिना अश्या भाज्या पिकवल्या.

हा आमच्या कुंडीतला पालक.

हे टोमॅटो!
मुळात कंपोस्ट म्हणजे काय?
कंपोस्ट म्हणजे ओल्या कचर्याचे विघटन होऊन तयार झालेले खत. कंपोस्टिंग ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती सतत निसर्गात चालू असते. जंगलात झाडांची पाने जमिनीवर पडल्यावर हळूहळू त्यांचे विघटन होते. या विघटन होत असलेल्या पानांमधील पोषक द्रव्ये झाडाच्या मुळांकडून शोषली जातात. असं हे नैसर्गिक रिसायक्लिंग आहे.
आता घरात कंपोस्ट तयार करायचे असेल तर काय करायचं?
आपल्या घरात तयार होणार्या कचर्यापैकी सुमारे ७०% कचरा हा जैवविघटनशील असतो. भाज्यांचे देठ, साली, उरलेले अन्न, वापरलेले टिश्यू पेपर्स, सुकलेली फुले, चहा/ कॉफी पावडर/ टीबॅग्स, अंड्याची टरफले, मांसातील हाडे, नारळाच्या शेंड्या हा सगळा कचरा कंपोस्टमध्ये रूपांतरित करता येतो. हा सगळा कचरा एका वेगळ्या टोपलीत/ प्लॅस्टिकच्या डस्ट्बिनमध्ये ठेवायचा. बाकी प्लॅस्टिकचा, रबराचा वगैरे कचरा यात मिसळायचा नाही. दिवसातून एकदा हा ओला कचरा कंपोस्टिंग बिनमध्ये घालायचा. ही कंपोस्ट बिन विकत मिळते किंवा घरीही तयार करता येईल. ( घरी तयार करायची असेल तर एखादा झाकण असलेला प्लॅस्टिकचा उभट डबा/ झाकणवाली बादली घ्या आणि त्याला खालपासून वरपर्यंत ठराविक अंतरावर छोटी छोटी छिद्रं पाडा. आत हवा खेळती राहण्यासाठी ही छिद्रं आवश्यक आहेत). मग या कचर्याचं विघटन होण्यासाठी त्यात ' विरजण’ किंवा कल्चर घालायचं. हेही विकत मिळतं. कचर्याचं विघटन करून त्याचं कंपोस्ट्मध्ये रूपांतर करणारे हे जीवाणू असतात. कोकोपीट ( नारळाच्या शेंड्यांची पावडर) आणि हे जीवाणू एकत्र करून आपल्या ओल्या कचर्यात घालायचे. वर एक वर्तमानपत्राचा कागद घालायचा आणि झाकण लावून टाकायचं. बास, रोज २ ते ३ मिनिटं लागतात फक्त हे सगळं करायला! एकदा आपलं कंपोस्ट तयार झालं की हे कल्चर विकत आणण्याचीही जरूर नाही. आपलं कंपोस्टच नव्या ओल्या कचर्यात मिसळायचं की झालं!
अशा दोन तरी बिन्स आपल्याकडे पाहिजेत. म्हणजे एक बिन भरली की दुसरीत कचरा टाकायला सुरुवात करता येते. साधारणपणे २ महिन्यांनी कंपोस्ट तयार होतं. मधून मधून ते ढवळावं, म्हणजे सगळीकडे हवा लागते आणि कंपोस्टिंग चांगलं होतं.

गेल्या वर्षी सोसायटीत कंपोस्ट्चा स्टॉल लावला होता. तेव्हाचा हा फोटो. या फोटोत डावीकडे प्लॅस्टिकचा स्टॅक टाईपचा कंपोस्टर आहे आणि त्याच्या बाजूला स्टँड अलोन कंपोस्टर ( जो माझ्याकडे आहे)
बंगळूरमध्ये रहायला आल्यापासून आपणही घरी कंपोस्टिंग करावं असा विचार डोक्यात मधूनमधून घोळत असे. बंगळूरमध्ये डेली डंप ही कंपनी या कंपोस्ट बिन्स बनवण्यात आघाडीवर आहे. सुरुवातीला ते फक्त टेराकोटाचे कंपोस्टर विकत असत. बंगळुरात अगदी मध्यमवर्गीयांमध्येही स्वत:चं स्वतंत्र घर असणं आणि घराभोवती जागा असणं हे आत्ताआत्तापर्यंत कॉमन होतं, त्यामुळे टेराकोटाचे भलेमोठे जड कंपोस्टरही विकत घेणारी बरीच मंडळी होती.
यात टेराकोटाचा स्टॅक टाईप कंपोस्टर दिसतोय.
आम्ही मात्र फ्लॅटमध्ये राहणारे. त्यामुळे ते शक्यच नव्हतं. शिवाय, त्या कचर्याचा वास तर घरभर पसरणार नाही ना, मुलंही लहान आहेत, ती त्या कचर्याजवळ जाऊन त्यांना काही इन्फेक्शन वगैरे तर होणार नाही ना, अशा शंकाही मनात येत होत्याच. शेवटी गेल्या वर्षी या सगळ्या शंका बाजूला सारून कंपोस्टिंग सुरू करायचं ठरवलं. तोवर डेली डंपने प्लॅस्टिकचे कंपोस्टरही विकायला सुरुवात केली होतीच. त्यांच्या २ बिन्स आणल्या. चुकत माकत सुरुवात झाली. कचरा आणि कोकोपीटचं मिश्रण खूप ओलसर झालं तर त्यात भरपूर अळ्या (maggots ) होतात, दुर्गंधही येतो. मिश्रण खूप कोरडं झालं तर कचर्याचं विघटन होत नाही. अशा दोन्ही प्रकारच्या चुका करून हळूहळू आम्ही शिकत गेलो. आता मात्र हे काम अगदी अंगवळणी पडलं आहे. रोज सकाळी किंवा रात्री दिवसभराचा ओला कचरा बिनमध्ये टाकायचा, साधारणपणे ३ आठवड्यांनी दोन्ही बिन्स भरल्या की आधीच्या बिनमधलं अर्धवट तयार झालेलं कंपोस्ट दुसर्या एका मोठ्या बादलीत काढायचं, पूर्णपणे तयार झालं की चाळून ठेवून द्यायचं. तोपर्यंत सोसायटीतल्या मैत्रिणींचे ’ कंपोस्ट तयार आहे का?’ असं विचारणारे फोन येऊन गेलेलेच असतात. खरंतर कंपोस्ट जितकं जुनं (मुरलेलं) तितकं जास्त चांगलं. पण बाल्कनीत जागा मर्यादित. त्यामुळे मी फार काळ ते ठेवून देत नाही.
हे चाळून तयार झालेलं फायनल प्रॉडक्ट 
खरंतर अगदी साधी सोपी अशी ही पद्धत आहे. त्यात खूप वेळही जात नाही. आपण रोज जो ओला कचरा महानगरपालिकेच्या ताब्यात देतो, तो जर घरीच कंपोस्ट केला तर तब्बल ३०० किलो कचरा ( हा आकडा चौघांच्या कुटुंबासाठी आहे ) आपण लॅन्ड्फिलमध्ये जाण्यापासून वाचवतो. पण कंपोस्टिंगबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका असतात, दुर्गंध येईल याची धास्ती असते, वेळखाऊ प्रकरण असेल असं वाटत असतं. त्यामुळे सहजासहजी कुणी कंपोस्टिंग करू धजत नाही. हे काम वाटतं तितकं कठीण आणि वेळखाऊ नाही हे सांगावं आणि कंपोस्टचं १ वर्ष पूर्ण झाल्याचं ’ सेलिब्रेट’ करावं असं वाटलं म्हणून हे लिहावंसं वाटलं!
ते काळे रेषा वाले किडे काही
ते काळे रेषा वाले किडे काही करत नाहीत. फक्त बाहेर येऊ नाही द्यायचे. (नाहीतर सरपटत जमिनीवर येऊन इतरांना किळस वाटते.) ते कंपोस्ट प्रोसेस फास्ट करतात.
पाणी कंटेंट शून्य होईल तसे हळूहळू मरुन जातात.
कंपोस्ट वाल्या माठाला खालून छोटे छिद्र असेल तर पाणी वाहून जाईल.(हे पाणी दहा भाग साध्या पाण्यात घालून कंपोस्ट टी म्हणून वापरता येईल.)
अधून मधून रद्दी पेपर आणि वापरलेले टिश्यू तुकडे करुन टाकत रहा. सॉ डस्ट मिळाल्यास उत्तम. लवकर कोरडे होईल कंपोस्ट.
Mi_anu छिद्र तर नाहीये..उद्या
Mi_anu छिद्र तर नाहीये..उद्या करून टाकावं अस वाटतं आहे. म्हणजे अधिकच पाणी बाहेर निघून जाईल. ते सरपटणारे किडे (अळ्या) नाहीत असे वळवळणारे किडे आहेत..
मला नीट सांगताच येत नाहीये..कदाचित..
उद्या फोटो टाकते..
अतिरिक्त पाण्याने खराब झालं असणार का आता ते कंपोस्ट?
या अश्या असतील
या अश्या असतील

कुंडीच्या खालचे ताट माठाखाली ठेवून पाणी गोळा करता येईल आणि नंतर 1:10 साधे पाणी घालून झाडांना घालता येईल.
कडक ऊन असल्यास 2-3 दिवस उघडे ठेवले तर वाळेल(फक्त किडे कदाचित बाहेर येतील.एखादी उपयोगात नसलेली मेटल चाळणी झाकण म्हणून ठेवून माठ उन्हात ठेवता येईल.कोरडे करायची प्रोसेस फास्ट व्हायला रद्दी कागदाचे कपटे करून टाका.टीव्ही पाहताना घरातल्या सर्वाना हा उद्योग द्या.हे कपटे टाकून एकदा दांडी किंवा कोयत्याने वर खाली हलवून घ्या कंपोस्ट.
कंपोस्ट बाद होत नाही.फारतर quality थोडी कमी असेल इतकंच.
हो असलाच काहीतरी प्रकार आहे..
हो असलाच काहीतरी प्रकार आहे.. मी उद्या टाकते त्यात न्यूजपेपर..
आणि पाणी निघून जायला छिद्र पण पाडते. दुर्गंध अजूनतरी येत नाहीये उद्या ढवळून टाकेल तेव्हाच समजेल नक्की काय झालंय त्याच तर..
धन्यवाद..Mi_anu आणि वावे ..
इकडे अजिबात ऊन नाहीये सारखा
इकडे अजिबात ऊन नाहीये सारखा पाऊस चालू आहे
हे अस झालंय..फोटो टाकू की नको
हे अस झालंय..फोटो टाकू की नको असं वाटतं होत पण पहिल्यांदाच बनवलेलं कंपोस्ट फेकून द्यायच जीवावर आलंय म्हणून त्याला वाचवायचे उपाय शोधतेय.


काही आशा आहेत का?
हं.. खूपच ओलसर आहे, पण
हं.. खूपच ओलसर आहे, पण डिकंपोज झालेलं आहे असं वाटतंय. नारळाच्या करवंटीने किंवा कशाने तरी यातलं थोडं थोडं पाणी काढून ते डायल्यूट करून झाडांना घाला. शक्य तितकं पाणी काढून टाका.लाकडाचा भुसा, वर्तमानपत्राचे कपटे, कोकोपीट, सुका पालापाचोळा यापैकी काहीतरी त्यात रोज घालत रहा आणि ढवळा. उघडंच, किंवा अनुने लिहिलंय तसं जाळीने झाकून ठेवा. पण पाऊस पडत असेल तर मात्र नीटच पूर्ण झाकून ठेवा.
कंपोस्ट फुकट नाही जात शक्यतो. काही तरी दुरुस्ती करता येईलच.
ते चकचकीत काय आहे? औषधाच्या गोळ्यांचा कागद आहे का? त्याचं विघटन होणार नाही. तो काढून टाका.
वावे खरचं thank u..
वावे खरचं thank u..
तुम्ही आणि अनु ने सांगितलंय त्याप्रमाणे करून पाहते.
ते चकचकीत काय आहे मला पण माहीत नाही..मी टाकलेलं नव्हत.
काढून टाकलय ते आता..आणि ते ब्लॅक किडे उपयुक्त आहेत की खराब आहेत?
ते आपोआप त्यांचं काम झालं की
ते आपोआप त्यांचं काम झालं की मरतील.तोवर त्यांचा कंपोस्ट ला काही त्रास नाही.आपल्या डोळ्यांना आहे फक्त
कंपोस्ट कोरडं कर फक्त.हळूहळू व्यवस्थित होईल ते.
ब्लॅक किडे उपयुक्तच आहेत.
ब्लॅक किडे उपयुक्तच आहेत. अनुने लिहिलंय तसं ते काम झालं की मरून जातात. माश्या होऊन उडूनही जातात काही.
तुमचे प्रतिसाद वाचून बरं
तुमचे प्रतिसाद वाचून बरं वाटलं..करते आता चांगलं
माझ्या कंपोस्टची गाडी परत
माझ्या कंपोस्टची गाडी परत रूळावर आली
मातीच्या कुंडीपेक्षा प्लास्टिकचे डबेच जास्त चांगले असं माझं मत झालं आहे आता. डेली डंपच्या मातीच्या (टेराकोटा) कंपोस्टरमधे कचरा लवकर कोरडा होतो, आकारानेही कमी होतो हे फायदे होतात, पण लवकर कोरडा झाल्यामुळे throughput कमी होतं. चाळून झाल्यावर जाड राहिलेले तुकडे बरेच शिल्लक राहतात.
शिवाय, टोककिड्यांसारखे पण गलेलठ्ठ काळे किडे, त्यांना खायला कोळी, त्यांंना खायला पाली अशी एक अन्नसाखळीच तयार झाली होती बाल्कनीत.
शेवटी वैतागून ती मातीची तिन्ही भांडी सरळ काढून टाकली. आधीचे प्लास्टिकचे डबे परत वापरायला लागले आणि हे सगळे त्रास गेले. कचऱ्यात जास्त काळ ओलसरपणा राहतो खरा, पण throuput खूप जास्त आहे. जवळजवळ चौदा पंधरा किलो छान मातीसारखं कंपोस्ट तयार झालं आणि चाळून उरलेला माल फार तर एकदीड किलो असेल.
तयार कंपोस्ट चाळलं नाही तर?
तयार कंपोस्ट चाळलं नाही तर? आय मीन, चाळण्यामागे काही शास्त्रीय कारण असतं का? खत बनण्याचा अंतिम टप्पा वगैरे असं काही?
मी ३-४/३-४ किलोच्या दोन बॅचेस केल्या, पण चाळल्या नाहीत. घरच्या कुंड्यांमध्ये तेच खत वापरते आहे.
चाळलं नाही तरी चालतं.. पण मी
चाळलं नाही तरी चालतं.. पण मी मैत्रिणींंना, ओळखीच्यांंना वगैरे विकते. त्यामुळे तसं नुसतंच द्यायला बरोबर नाही वाटत. घरातच वापरायचं असेल तर ठीक आहे. ( म्हणजे समजा आपल्या कंपोस्टमधे शेवग्याच्या शेंगेच्या सालाचा तुकडा किंवा अंड्याचं टरफल राहिलं असेल तर ते परक्या माणसाला हाताळायला नको वाटेल, आपल्याला चालेल, कारण आपल्याच घरातला कचरा असतो)
चाळून उरलेलं परत पुढच्या बॅचला विरजण म्हणून जातं.
कश्याने चाळतेस वावे?
कश्याने चाळतेस वावे?
आपली अशी जाळीची थोडी विरळ चाळणी का?
वावे, ह्या नव्या प्ला डब्याचा
वावे, ह्या नव्या प्ला डब्याचा एखादं दुसरा फोटो टाकाल का?
लेख वर आला की परत वाचते , पण जमत नाहीये मग नाद सोडून देते. जुने लेखातील फोटो मला दिसत नाहीयेत. खूप ओला कचरा वेस्ट होतोय खरं तर.
कश्याने चाळतेस वावे?>>
कश्याने चाळतेस वावे?>>
जुनी प्लास्टिकची बास्केट आहे घरात. जाळी असलेली. आधी फळं ठेवण्यासाठी वापरत होतो. ती आता कंपोस्ट चाळण्यासाठी ठेवली आहे. सगळ्या बाजूंनी जाळी आहे त्यामुळे भराभर चाळून खाली पडतं.
@ वर्णिता माझ्याकडे डेलीडंप या कंपनीचे असे दोन प्लास्टिकचे डबे आहेत. तीन साडेतीन वर्षं झाली ते घेऊन.
https://www.amazon.in/Daily-Dump-Chomp-Double-Converting/dp/B01NAZ84IU/r...
ही अवाढव्य लिंक चालली नाही तर amazon वर daily dump सर्च कर
ओके ओके.मला वाटलं घरच्या गहू
ओके ओके.मला वाटलं घरच्या गहू वगैरे चाळायच्या चाळणीने.
माझ्यात अजिबात इतका पेशन्स नाही.
शिवाय हल्ली 100% कंपोस्ट करत असल्याने त्यात खूप ऐवज साठला आहे.परवा स्टार बझार मधून आलेल्या भाजीच्या तपकिरी पिशव्या बारीक तुकडे करून टाकल्या. त्यावर अगदी बारीक प्लास्टिक लेयर असावा असा अंदाज आहे.कंपोस्ट टी तळाला असलेल्या नळातून काढून झाडांना टाकला.
2 बिन आलटून पालटून वापरतो.दुसऱ्यात तयार झालाय पण उघडलं तर आत एक झुरळ होतं.त्यामुळे घाबरून त्यात हिट फवारून बिन बंद करुन ठेवलाय झुरळ मरेल या आशेने. अर्थात यामुळे आता 'नैसर्गिक कंपोस्ट खत' या कल्पनेचा सरफेस 2 इंच खतासाठी तरी बँड वाजला असेल.वरचे वरचे लेयर काढून खालचे वापरावे लागेल.
खरं तर व्यवस्थित नियमित ब्राऊन्स टाकत राहिलं तर अस होत नाही.पण मध्ये मध्ये फार दुर्लक्ष झालं.
त्या पिशव्यांंचं होतं का
त्या पिशव्यांंचं होतं का नक्की कंपोस्ट? मागे एकदा मी दीवीच्या (Deivee- मिलिंद सोमण) टीशर्टची प्लास्टिकसदृश पिशवी टाकली होती कंपोस्टरमधे तुकडे करून. पण कित्येक महिन्यांंनंतरही ते जसेच्या तसेच. शेवटी काढून टाकले. त्या पिशवीवर लिहिलं होतं कंपोस्टिबल आहे असं. पण बहुतेक मोठ्या, प्रोफेशनल कंपोस्टरमधेच होत असणार.
अगं ती ब्राऊन पेपर बॅग आहे
अगं ती ब्राऊन पेपर बॅग आहे.तशी फाटते.पण किंचित चमक आहे तर स्ट्रेंथ यावी म्हणून अगदी थोडे प्लास्टिक कण ऍड केले असणार.
आता कंपोस्ट मध्ये भिजलेत तुकडे.म्हणजे बराच कागद असणार.
दैवी ची पिशवी पोटॅटो स्टार्च चे पांढरे प्लास्टिक असेल.स्टार बझार मध्ये पूर्वी भाज्यांना पिशव्या असायच्या तशी.ते कंपोस्ट मध्ये अत्यंत कुरूप दिसतं.शिवाय खूप बारीक तुकडे लागतात नाहीतर सगळ्यात अडकतं.
एकंदर नो प्लास्टिक हा प्रकार लोकांनी प्लास्टिक चे पर्याय आणून आजारापेक्षा इलाज भयंकर असे बनवून ठेवले आहे.त्या कापड सदृश प्लास्टिक च्या पिशव्या तर भयंकर.धड भिजत नाहीत त्यामुळे फडके म्हणून वापरता येत नाहीत.दणकट नाहीत त्यामुळे वजन घेत नाहीत, फाटतात.आणि कंपोस्ट करता येत नाहीत.जळल्या तर अत्यंत घाण विषारी वास येतो.स्विगी बरोबर वगैरे मिळतात त्या नाकारता पण येत नाहीत.
सामाना बरोबर दणकट प्लास्टिक ची पिशवी दिली तर लोक न फेकता आपोआपच वापरतात.साडीच्या पिशव्या जपून ठेवायचे तसं.
पण या निमित्ताने आता बरेच लोक कापडी पिशवी गाडीत किंवा पर्स मध्ये ठेवायला लागले हेही बरेच आहे.
अगं ती ब्राऊन पेपर बॅग आहे
अगं ती ब्राऊन पेपर बॅग आहे.तशी फाटते.पण किंचित चमक आहे°>> अच्छा अच्छा आलं लक्षात.
दैवी ची पिशवी पोटॅटो स्टार्च चे पांढरे प्लास्टिक असेल.>> पारदर्शक होती. कसली होती काय माहिती! त्या तुकड्यांचा व्याप झाल्यावर, पिशवीचे अजून बारीक तुकडे न केल्याबद्दल मी स्वतःचेच आभार मानले होते.
कापड सदृश प्लास्टिक च्या पिशव्या तर भयंकर.>>
खरं आहे.
मोअरमध्ये पांढऱ्या कागदी पिशव्या देतात तांदूळ वगैरे सुटे घेतले तर. पण त्या पिशवीला बंद करण्यासाठी ते इतकी सेलोटेप लावतात की बघवत नाही.
हो.ती सेलोटेप काढणे अजून
हो.ती सेलोटेप काढणे अजून व्याप होतो
सुपरडेली वाले तर फुल प्लॅस्टिक महोत्सव करतात.
वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून वस्तू येतात, त्या एका पिशवीत. फळभाजी मोठी असेल तर त्या भाजीला स्वतंत्र लॅमीनेशन.त्यांना त्यांच्या वाहतुकीत टिकायला करावे लागत असेल.
सुपरडेलीतून 5 वस्तू घेतल्या की ते सर्व प्लास्टिक काढताना मन खायला लागतं.
मागे एक व्हिडिओ आला होता.मोठ्या प्लास्टिक बाटल्या आपण टाकत असू तर या छोट्या मोठ्या प्लास्टिक पिशव्या त्यात गुंडाळी करून पूर्ण पॅक करायच्या.पिशव्या उडत नाही, कचरा गोळा करणाऱ्या लोकांना सोपे जाते आणि रियुज वाले अश्या पॅक बाटल्या बेंच किंवा कट्टा बनवताना सिमेंट बांधकामात घालू शकतात पूर्ण घट्ट पिशव्या पॅक बाटली असेल तर.
धनवाद वावे, दिसले लिंकवर.
धनवाद वावे, दिसले लिंकवर.
मोठ्या प्लास्टिक बाटल्या आपण
मोठ्या प्लास्टिक बाटल्या आपण टाकत असू तर या छोट्या मोठ्या प्लास्टिक पिशव्या त्यात गुंडाळी करून पूर्ण पॅक करायच्या.>>
ओके. लक्षात ठेवलं पाहिजे.
सुपरडेली आम्ही नाही वापरत अजून तरी. इथे एक नामधारी अशा नावाची दुकानांची चेन आहे. तिथेही फार वापरतात प्लास्टिक पिशव्या. भाज्या छान असतात त्यांच्या, पण प्लास्टिक नको वाटतं एवढं.
@वर्णिता, कंपोस्टिंग सुरू करणार असलीस तर शुभेच्छा
डेली डंपची रिमिक्स पावडरच वापरली पाहिजे असं नाही त्यांच्या बिनबरोबर. सॉ डस्ट पण चालते. मी गेले अनेक महिने तीच वापरतेय. सॉ मिलमध्ये सहज देतात. फुकटात.
कंपोस्ट कल्चर नसेल तर प्रोसेस
कंपोस्ट कल्चर नसेल तर प्रोसेस चालू करणारं काहीही चालतं.
) जमल्यास मोजे वापरावे.
शेण नसेल तरी पतंजली दुकानात मिळणारं रामदेव गोमूत्र, थोडा गूळ आंबट ताक आणि बेसन हे मिसळून कंपोस्ट म्हणून वापरता येईल(या मिश्रणात शेण घातल्यास अत्यंत घाण वास येतो.खूप वेळ हात लागल्यास तो वास स्वप्नात पण येतो
हे वापरण्यास योग्य झालंय का?
हे वापरण्यास योग्य झालंय का? या कंपोस्ट ला आता एक वर्ष झालंय..
वापरण्या योग्य आहे, पण चाळून
वापरण्या योग्य आहे, पण चाळून घेतलं तर स्वतःला बघायला चांगलं वाटेल.
असं खूप वेगवेगळ्या पोताचं कंपोस्ट कुंडीत खालचा लेयर म्हणून बरं पडतं.वर कोकोपीट अधिक माती. म्हणजे कोकोपीट अधिक माती कमी लागते.
वरवर सुकलय पण खाली थोडस ओलसर
वरवर सुकलय पण खाली थोडस ओलसर वाटतं आहे..उन्हात वाळू देऊ का..?
फावडं किंवा खुरपं कोयता असेल
फावडं किंवा खुरपं कोयता असेल तर वरपासून खालपर्यंत एकदा हलवून घे.म्हणजे ओला थर वर येऊन लवकर वाळेल.
थोडं हाताळण्यालायक कोरडं झालं की कुंडी भरताना तळाला वापरता येईल.
3,4 महिन्यात होतं ना कम्पोस्ट
3,4 महिन्यात होतं ना कम्पोस्ट, फारच वेळ लागला एक माठ भर कम्पोस्ट तयार व्हायला. धागा शीर्षक तंतोतंत लागू पडले आहे अमृताक्षर च्या कम्पोस्ट ला. माझं मागे करायचा प्रयत्न फेल गेलाय. आता पुन्हा करून बघणार आहे.
Pages