भाज्यांचे आणि फळांचे देठ, साली, बिया, उरलेले, नासलेले अन्न, अंड्यांची टरफले, मांसाहारी स्वैपाकातून उरणारे हाडांसारखे टाकाऊ पदार्थ ही नावे उच्चारली तर प्रथम काय डोळ्यासमोर येतं ? भरून वाहणारी कचराकुंडी आणि दुर्गंध, हो ना? पण या सगळ्या घटकांमध्ये फक्त अजून २ घटक मिसळा- जीवाणू आणि थोडीशी इच्छाशक्ती- मग पहा काय तयार होतं ? झाडांसाठी अत्यंत पोषक असं कंपोस्ट!
मार्च महिन्यात मला कंपोस्टिंग सुरू करून एक वर्ष पूर्ण झालं. या एका वर्षात मी माझ्या घरात तयार होणार्या ओल्या कचर्यापासून जवळजवळ पन्नासएक किलो कंपोस्ट खत तयार केलं. मी कुंडीत लावलेल्या झाडांसाठी तर ते खत वापरलंच, पण शिवाय सोसायटीतल्या अनेकांनी माझ्याकडून कंपोस्ट खरेदी केलं. शिवाय, माझं पाहून सोसायटीतल्या अजून दोघीजणी त्यांच्या घरी कंपोस्ट तयार करू लागल्या.
हे घरगुती कंपोस्ट वापरून आम्ही घरी कुंड्यांमध्ये टोमॅटो, अळू, पालक, गाजर, बीटरूट, कोथिंबीर, पुदिना अश्या भाज्या पिकवल्या.
हा आमच्या कुंडीतला पालक.
हे टोमॅटो!
मुळात कंपोस्ट म्हणजे काय?
कंपोस्ट म्हणजे ओल्या कचर्याचे विघटन होऊन तयार झालेले खत. कंपोस्टिंग ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती सतत निसर्गात चालू असते. जंगलात झाडांची पाने जमिनीवर पडल्यावर हळूहळू त्यांचे विघटन होते. या विघटन होत असलेल्या पानांमधील पोषक द्रव्ये झाडाच्या मुळांकडून शोषली जातात. असं हे नैसर्गिक रिसायक्लिंग आहे.
आता घरात कंपोस्ट तयार करायचे असेल तर काय करायचं?
आपल्या घरात तयार होणार्या कचर्यापैकी सुमारे ७०% कचरा हा जैवविघटनशील असतो. भाज्यांचे देठ, साली, उरलेले अन्न, वापरलेले टिश्यू पेपर्स, सुकलेली फुले, चहा/ कॉफी पावडर/ टीबॅग्स, अंड्याची टरफले, मांसातील हाडे, नारळाच्या शेंड्या हा सगळा कचरा कंपोस्टमध्ये रूपांतरित करता येतो. हा सगळा कचरा एका वेगळ्या टोपलीत/ प्लॅस्टिकच्या डस्ट्बिनमध्ये ठेवायचा. बाकी प्लॅस्टिकचा, रबराचा वगैरे कचरा यात मिसळायचा नाही. दिवसातून एकदा हा ओला कचरा कंपोस्टिंग बिनमध्ये घालायचा. ही कंपोस्ट बिन विकत मिळते किंवा घरीही तयार करता येईल. ( घरी तयार करायची असेल तर एखादा झाकण असलेला प्लॅस्टिकचा उभट डबा/ झाकणवाली बादली घ्या आणि त्याला खालपासून वरपर्यंत ठराविक अंतरावर छोटी छोटी छिद्रं पाडा. आत हवा खेळती राहण्यासाठी ही छिद्रं आवश्यक आहेत). मग या कचर्याचं विघटन होण्यासाठी त्यात ' विरजण’ किंवा कल्चर घालायचं. हेही विकत मिळतं. कचर्याचं विघटन करून त्याचं कंपोस्ट्मध्ये रूपांतर करणारे हे जीवाणू असतात. कोकोपीट ( नारळाच्या शेंड्यांची पावडर) आणि हे जीवाणू एकत्र करून आपल्या ओल्या कचर्यात घालायचे. वर एक वर्तमानपत्राचा कागद घालायचा आणि झाकण लावून टाकायचं. बास, रोज २ ते ३ मिनिटं लागतात फक्त हे सगळं करायला! एकदा आपलं कंपोस्ट तयार झालं की हे कल्चर विकत आणण्याचीही जरूर नाही. आपलं कंपोस्टच नव्या ओल्या कचर्यात मिसळायचं की झालं!
अशा दोन तरी बिन्स आपल्याकडे पाहिजेत. म्हणजे एक बिन भरली की दुसरीत कचरा टाकायला सुरुवात करता येते. साधारणपणे २ महिन्यांनी कंपोस्ट तयार होतं. मधून मधून ते ढवळावं, म्हणजे सगळीकडे हवा लागते आणि कंपोस्टिंग चांगलं होतं.
गेल्या वर्षी सोसायटीत कंपोस्ट्चा स्टॉल लावला होता. तेव्हाचा हा फोटो. या फोटोत डावीकडे प्लॅस्टिकचा स्टॅक टाईपचा कंपोस्टर आहे आणि त्याच्या बाजूला स्टँड अलोन कंपोस्टर ( जो माझ्याकडे आहे)
बंगळूरमध्ये रहायला आल्यापासून आपणही घरी कंपोस्टिंग करावं असा विचार डोक्यात मधूनमधून घोळत असे. बंगळूरमध्ये डेली डंप ही कंपनी या कंपोस्ट बिन्स बनवण्यात आघाडीवर आहे. सुरुवातीला ते फक्त टेराकोटाचे कंपोस्टर विकत असत. बंगळुरात अगदी मध्यमवर्गीयांमध्येही स्वत:चं स्वतंत्र घर असणं आणि घराभोवती जागा असणं हे आत्ताआत्तापर्यंत कॉमन होतं, त्यामुळे टेराकोटाचे भलेमोठे जड कंपोस्टरही विकत घेणारी बरीच मंडळी होती.
यात टेराकोटाचा स्टॅक टाईप कंपोस्टर दिसतोय.
आम्ही मात्र फ्लॅटमध्ये राहणारे. त्यामुळे ते शक्यच नव्हतं. शिवाय, त्या कचर्याचा वास तर घरभर पसरणार नाही ना, मुलंही लहान आहेत, ती त्या कचर्याजवळ जाऊन त्यांना काही इन्फेक्शन वगैरे तर होणार नाही ना, अशा शंकाही मनात येत होत्याच. शेवटी गेल्या वर्षी या सगळ्या शंका बाजूला सारून कंपोस्टिंग सुरू करायचं ठरवलं. तोवर डेली डंपने प्लॅस्टिकचे कंपोस्टरही विकायला सुरुवात केली होतीच. त्यांच्या २ बिन्स आणल्या. चुकत माकत सुरुवात झाली. कचरा आणि कोकोपीटचं मिश्रण खूप ओलसर झालं तर त्यात भरपूर अळ्या (maggots ) होतात, दुर्गंधही येतो. मिश्रण खूप कोरडं झालं तर कचर्याचं विघटन होत नाही. अशा दोन्ही प्रकारच्या चुका करून हळूहळू आम्ही शिकत गेलो. आता मात्र हे काम अगदी अंगवळणी पडलं आहे. रोज सकाळी किंवा रात्री दिवसभराचा ओला कचरा बिनमध्ये टाकायचा, साधारणपणे ३ आठवड्यांनी दोन्ही बिन्स भरल्या की आधीच्या बिनमधलं अर्धवट तयार झालेलं कंपोस्ट दुसर्या एका मोठ्या बादलीत काढायचं, पूर्णपणे तयार झालं की चाळून ठेवून द्यायचं. तोपर्यंत सोसायटीतल्या मैत्रिणींचे ’ कंपोस्ट तयार आहे का?’ असं विचारणारे फोन येऊन गेलेलेच असतात. खरंतर कंपोस्ट जितकं जुनं (मुरलेलं) तितकं जास्त चांगलं. पण बाल्कनीत जागा मर्यादित. त्यामुळे मी फार काळ ते ठेवून देत नाही.
हे चाळून तयार झालेलं फायनल प्रॉडक्ट
खरंतर अगदी साधी सोपी अशी ही पद्धत आहे. त्यात खूप वेळही जात नाही. आपण रोज जो ओला कचरा महानगरपालिकेच्या ताब्यात देतो, तो जर घरीच कंपोस्ट केला तर तब्बल ३०० किलो कचरा ( हा आकडा चौघांच्या कुटुंबासाठी आहे ) आपण लॅन्ड्फिलमध्ये जाण्यापासून वाचवतो. पण कंपोस्टिंगबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका असतात, दुर्गंध येईल याची धास्ती असते, वेळखाऊ प्रकरण असेल असं वाटत असतं. त्यामुळे सहजासहजी कुणी कंपोस्टिंग करू धजत नाही. हे काम वाटतं तितकं कठीण आणि वेळखाऊ नाही हे सांगावं आणि कंपोस्टचं १ वर्ष पूर्ण झाल्याचं ’ सेलिब्रेट’ करावं असं वाटलं म्हणून हे लिहावंसं वाटलं!
धन्यवाद वावे.. बरेच पाय
धन्यवाद वावे.. बरेच पाय असलेल्या अळ्या आहेत.. वेटोळ करून बसणाऱ्या.. कळत नाहीये नक्की कुठल्या आहेत.. थोडं बाहेर काढून बघते म्हणजे अंदाज येईल कितपत आहेत ते..
बॅक्यार्ड मध्ये कोपऱ्यात आहे बिन.. सो अगदी घरात नाही फिरतेत.. पण thanks for idea.. वर खाली करीन.. आणि हळद पसरून बघते.
मुंग्या लागल्यात म्हणजे
मुंग्या लागल्यात म्हणजे त्यांचे खाद्य प्रचण्ड प्रमाणात असणार आहे हे नक्कीच. गेल्या काही दिवसात काय टाकलेले कंपोस्ट मध्ये त्याचा आढावा घेतल्यास पुढील वेळी उचित दक्षता ठेवता येईल.
कंपोस्टबिनचे पाय पाण्यात ठेवले तर मुंग्या हां प्रॉब्लेम राहणार नाही कधीच.
नसेल शक्य तर पठाणी आहेच.
धन्यवाद अज्ञानी.. किचन waste
धन्यवाद अज्ञानी.. किचन waste च टाकलंय शक्यतो.. बिन गार्डन मध्ये जमिवराच आहे.. सगळ्यात खालच्या layer ला existing कंपोस्ट टाकलंय.. त्यावर किचन चा कचरा.. अधे मध्ये परत एकदा कंपोस्ट layer.. एखादे वेळेस फुलाचे बुके.. एवढंच आहे ऐवज. कल्चर नाही टाकलं कुठलं.. वास ही नाही आला फार कधी घाणेरडा..
सुन्देर माहीती!
सुन्देर माहीती!
वेटोळं करून बसणाऱ्या, मग
वेटोळं करून बसणाऱ्या, मग सोल्जर फ्लाईज नसाव्या.
डब्यात जुन्या कागदांचे छोटे कपटे टाकून ढवळा.
पार्सल चं लेबल, काही वेळा फळ भाज्यांच्या पेपर बॅग, घरातली रद्दी, येणारे प्रॉडक्ट कॅटलॉग असा बराच कागद घरात असतो.बिन कागड टाकून थोडा कोरडा झाला की उष्णता वाढेल.प्रोसेस लवकर होईल आणि किडयाना खायला योग्य अवस्थेतले अन्न न राहिल्याने त्यांचा पोपट होईल.
कम्पोस्टमध्ये पोपट झाले तर
कम्पोस्टमध्ये पोपट झाले तर परिस्थिती आणखी बिघडेल ना.
हेहे, कोणालातरी या जोक चा लाभ
हेहे, कोणालातरी या जोक चा लाभ मिळावा हाच उद्देश होता.
पुढच्या वेळी कंपोस्ट टाकायला झाकण उघडलं की पोपट उडून जातील
मधल्या काळात कंपोस्ट पूर्ण
मधल्या काळात कंपोस्ट पूर्ण सोडले होते.कारणं अनेक: डबा उघडा राहून त्यात झुरळं झाली, एकदा पाल दिसली.कंपोस्ट मध्ये खजूर बिया जास्त झाल्याने त्याची छोटी झाडं रोपं पण उगवली होती(ती बाहेर काढून कुंडीत लावल्यावर जगली नाहीत).
शिवाय कागदी कपटे, पानं, कार्डबोर्ड तुकडे टाकून कार्बन समतोल आणि कोरडे करणे अजिबात जमले नाही.दुर्लक्ष झाले.पपई, कलिंगड साले अश्या बऱ्याच ओल्या वस्तू टाकल्याने पांढऱ्या शिपाई माश्या अळ्या झाल्या, आणि त्या घरात यायला लागल्या.
मग गेली 2-3 वर्षं त्या डब्यात जे आहे ते तसंच ठेवून घरातला कचरा वेगळ्या ओला कचरा डब्यात टाकून नेहमीच्या कचऱ्याबरोबर दिला.रोज त्या कंपोस्ट पाशी जाण्याचा कंटाळा असल्याने आता 4-5 दिवसाचा ओला कचरा गोळा करून ठेवून कंपोस्ट डब्यात टाकते.डेली डम्प चं कंपोस्ट मागवलं आहे.आणि सर्व वाया गेलेली कागदं, वाळकी पानं गोळा करून टाकणं नीट ठेवलं आहे.अळ्या झाल्या तरी हरकत नाही, त्याने कंपोस्ट चा वेग वाढतो.फक्त घरात येऊ नयेत इतकंच.(डब्याचं झाकण बंद असतं, पण त्याला खाली कंपोस्ट टी काढायला नळ आहे त्यातून येतात.(तोही बंद करावा लागेल.)
माझं कंपोस्टिंग बंद झालं दोन
माझं कंपोस्टिंग बंद झालं दोन-अडीच वर्षांपूर्वी. नवीन घरात रहायला आलो, तिथे सोसायटीचा कॉमन कंपोस्टर आहे. त्यामुळे मी घरी करणं बंद केलं. कधीकधी मोह होतो परत सुरू करण्याचा. बघूया.
अनु, डेली डंपची ती पावडर मिळते (रिमिक्स पावडर -कोकोपीट आणि कल्चर) तिचा चांगला उपयोग होतो. नवीन डब्यात सुरुवातीला खाली पावडरचा एक जाड थर, वर ओला कचरा आणि वर परत कचरा झाकेल असा पावडरचा थर. वर वर्तमानपत्राचा कागद. कागद रोज उचलून वर ओला कचरा टाकून पावडर टाकली की झालं.
डब्यात खाली: डॅट शिप सेल्ड 1
डब्यात खाली: डॅट शिप सेल्ड 1 वीक ऍगो
पण आता डम्प झालेल्या 6 इंच थरात डेली डम्प मिसळून मग तू सांगितले त्याप्रमाणे पुढच्या थरांना चालू करते.
बरं झालं धागा वरती आला. आता
बरं झालं धागा वरती आला. आता उन्हाळा आहे तर बिन झाकून ठेवायची आवश्यकता आहे का? मागे मी तसा झाकलेला पण आता नव्याने कंपोस्टिंग सुरू केलं आहे.
बिन झाकला नाही तर पावसाळ्यात
बिन झाकला नाही तर पावसाळ्यात पाणी जाईल, आणि कंपोस्ट क्रिया थंडावेल.शिवाय झुरळं/पाली आत गेल्या तर काढणं कठीण.
धन्सं अनु. आता झाकण ठेवते.
धन्सं अनु. आता झाकण ठेवते.
पावसाळ्यात हल्ली मी कंपोस्टिंग बंदच करते. कितीही प्रयत्न केला तरी गिच्च होतोच.झड डायरेक्ट न लागेल अशी व सहज accessible जागा उपलब्ध नाहीये.
पाल झुरळ जाऊ नये म्हणून झाकून
पाल झुरळ जाऊ नये म्हणून झाकून ठेवणे शेडींग नेट सारख्या सच्छिद्र आवरणाने सुध्दा शक्य आहे तरीही हे झाकून ठेवणे फक्त झाकणाशी संबंधित नसते कारण आपण जो बॅक्टेरिया वापरला आहे तो एरोबिक आहे की अनेरोबिक ह्यानुसार ठरेल. (वास येऊ नये ह्यासाठी एरोबिक पर्याय वापरतात.)
हो खरं आहे.कंपोस्ट नुसत्या
हो खरं आहे.कंपोस्ट नुसत्या बागेतील खड्ड्यात पण करतात.पण आपल्या इथे उंदीर बेडूक साप घूस यांची भीती.गॅलरीत केलं तर पाल झुरळं कोळी.त्यामुळे झाकण ठेवल्यावर जरा सुरक्षित वाटतं.
(ही पोस्ट वाचून यक वाटू शकेल,
(ही पोस्ट वाचून यक वाटू शकेल, खूप संवेदनशील असल्यास आताच वाचणे थांबवा)
स्वयंपाकघरात ओट्याखाली कपाटात 2 डबे आहेत, कोरडा प्लास्टिक कचरा आणि ओला कचरा. ओल्या कचऱ्यात डेली डंप चे कल्चर टाकतेच आहे अधून मधून.पण बहुतेक कचऱ्यात काही गोष्टींची चुकीची प्रक्रिया झाली असावी.चक्क मानवी वेस्ट सारखा वास येत होता कंपोस्ट च्या पाण्याला.आज सर्व मुख्य कंपोस्ट बिन मध्ये(जो उन्हात आहे) टाकले, परत ढवळले, मग बिन स्वच्छ धुतला, थोडं पाणी त्या कपाटात गळलं होतं ते पुसून घेतलं(या बिन मध्ये एकदा राखेचा कचरा ओल्या कचऱ्यात टाकला होता, तेव्हा बिन ला ठिणगी ने भोक पडले आहे खाली छोटे, त्यातून पाणी गळले.)
परत हात धुतो.
परत हात धुते.
आता सर्व कपाट जमीन डेटॉल ने पुसून आत पाल स्प्रे मारला आहे.त्याला छान सिट्रस वास आहे.पण हातांचा वास जायलाच तयार नाही
हा जो विष्ठा सदृश वास येतो त्याला कारण पुठ्ठा बॉक्स चे तुकडे करून टाकले जे असू शकेल, कधीकधी हे बॉक्स घोड्याच्या लिद चे असतात.शिवाय एकदोन वेळा अगदी पातळ, नॉ फॅट दुधावरची साय पण टाकली गेली.
आता जरा नीट लक्ष देऊन सर्व जास्त कोरडे ठेवेन.हे डेली डंप कल्चर ने झाले नसेल ना?म्हणजे शेण पावडर इत्यादी असेल आणि ते नुसते 'शेण' नसेल.
हे लिहितानाही तो वास मनात घोळतो आहे
असं कशामुळे झाले माहित नाही,
असं कशामुळे झाले माहित नाही, पण वासाचा त्रास समजू शकते ..
घरातला वास जाण्यासाठी आम्ही उदबत्या लाऊन ठेवतो. किंवा मेणबत्या सुद्धा (बिनवासाच्या) किंवा Make a Lamp from an Orange in 1 minute. हे youtube search कर व तसे दिवे बनव संत्री असतील सहज उपलब्ध तर. छान मंद वास येतो संत्र्याचा
हाताला डिसइन्फेकशन स्प्रे लावून बघ.. करोनाच्या वेळी लावायचो ते.त्याने जाईल वास. इथून पुढे असं काम करताना strictly gloves घालत जा गं plz
हो गं.उदबत्त्या लावल्या भरपूर
हो गं.उदबत्त्या लावल्या भरपूर.ग्लोव्हज वापरत जाईन.
आता गेला वास.
कार्डबोर्डच्या खोक्यांना
कार्डबोर्डच्या खोक्यांना (इन्स्टामार्टवर जे फळांचे खोके येतात तशा) एरवीही थोडा घाण वास येतो. मला कसलाही सूक्ष्म वासही लगेच जाणवतो त्यामुळे 'कसला वास येतोय?' म्हणत जरा इकडेतिकडे बघितलं की लक्षात येतो खोका. त्याचे तुकडे कंपोस्टमध्ये टाकल्यामुळे आणखी वाईट वास आला असणं शक्य आहे.
डेली डंप कल्चरने नसेल झालं. त्यात कोकोपीट आणि पांढरी पावडर असते कल्चरची. शेण वगैरे नसतं!
ओके.ती खोकी घोड्याच्या लिदेची
ओके.ती खोकी घोड्याच्या लिदेची बनतात असं।आम्हाला एका चंदेरी साडी दुकानदाराने सांगितलं होतं. डेली डंप ने नसेल झालं.बहुधा ओल पण जास्त झाली.कलिंगड सालं छोटे तुकडे करून टाकली होती.
हाताला लिम्बू आणि मीठ चोळून
हाताला लिम्बू आणि मीठ चोळून बघा.
एक स्टील सोपपण मिळतो.
कॉफी बिन्स आणि news paper odour neutralizer आहेत.
बिनपशी कॉफी बिन्स उघड्या पात्रात ठेवा.
आम्ही कचरा बिनच्या तळाशी नेहमी news paper ठेवतो. चुकून कधी गळालं तर पाणी शोषलं जातं आणि वासपण रहात नाही. बदलणंपण सोपं.
ओके, हो पेपर मी पण ठेवला होता
ओके, हो पेपर मी पण ठेवला होता.कागदाचे कपटे पण.कॉफी बीन्स नाहीयेत, न्यूज पेपर लेयर वाढवेन.इथून तिथून आलेली पॅम्प्लेट, अमेझॉन ची बिलं, जुनी इ कॉपी असलेली लाईट बिलं, वह्यांची भरलेली कागदं पण टाकते.
होय काही खोक्यांचे वास भयंकर
होय काही खोक्यांचे वास भयंकर असतात अक्षरशः गपकन मला टीलउ होईल असे वाटते.
mi_anu तुम्ही कॉफीविक्या ना? आणि coffee beans नाहीत ? श्या !!
just गम्मत..
शिवाय ते छोटं hole पण कशाने तरी बुजवून टाका सील केल्यासारखं
(कंपोस्ट न करता किती सूचना !!! )
हेहेहे
हेहेहे
कॉफी आणि बीन्स महाग आहेत खूप
भोक वाला बिन राहूदे, सोसायटीने दिलाय. भोक बुजवते.
Pages