ग्रेटा थन्बर्ग-पृथ्वीची वकील

Submitted by टोच्या on 22 September, 2019 - 01:27

ग्रेटा थन्बर्ग. एक अवघ्या सोळा वर्षांची चिमुकली. तिचे नाव जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी सुचविले गेले आहे. अगदी युरोपातील राजकारण्यांपासून ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांच्या पर्यावरणाबाबतच्या धोरणांतील चुकांवर तिने बोट ठेवले आहे. जगभरातील लाखो मुले आज तिच्या पाठिशी आहेत. कोण आहे ही ग्रेटा?
---

पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, ग्लोबल वॉर्मिंग वाढतेय, पृथ्वी धोक्यात आहे, अशी बोंब आपण नियमित मारत असतो. कधी सोशल मीडियातून तर कधी भाषणबाजीतून. पण, त्यासाठी नेमके काय करायचे आणि कोणी करायचे, याबाबतीत आपल्या कपाळावर मोठे प्रश्नचिन्ह असते. हे सर्व एक तर सरकारने करावे, किंवा शास्त्रज्ञांनी त्यावर काहीतरी मार्ग काढावा अशी आपली अपेक्षा असते. सोशल मीडियावर व्यक्त होणे, थोडीबहुत आंदोलने करणे याव्यतिरिक्त आपण भले आणि आपले काम भले या वृत्तीत आपण जगत असतो. पण, पृथ्वीवर आलेले हे संकट एका चिमुकलीला सहन झाले नाही. चोवीस तास ती त्याचाच विचार करू लागली. कोणी काही करेल याची वाट न पाहता तिने स्वत:पासून सुरुवात केली. तिचे हे आंदोलन इतके व्यापक बनले की आज जगभरातील लाखो मुले शाळा बुडवून तिच्या ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’मध्ये सहभागी होत आहेत. आज तिच्या आंदोलनाने जागतिक स्वरुप प्राप्त केले असून, जगभरातील देशांना, त्यातील राजकारणी, उद्योगपती, तज्ज्ञांना तिची दखल घेणे भाग पडले आहे. या चिमुकलीचे नाव आहे ग्रेटा थन्बर्ग.
स्वीडनमधील एका कलाकार दाम्पत्याची ही अवघी सोळा वर्षांची मुलगी. आई मलेना अर्नमान एक ऑपेरा सिंगर तर वडील लेखक, कलाकार आणि चित्रपट निर्माता. वयाच्या आठव्या वर्षी ग्रेटाने ‘हवामान बदल’ हा शब्द प्रथम ऐकला. मानव प्रगत झाला पण त्यासाठी त्याने अवलंबलेल्या मार्गांनी पर्यावरणाची अतोनात हानी सुरू केली. वेगवेगळे कारखाने, वाहने यांतून वातावरणात मोठ्या प्रमाणावर कार्बन डाय ऑक्साइड सोडला जातोय. त्याचे प्रमाण मर्यादेपलिकडे गेलेय. जंगलांना आगी लागताहेत. त्यात दुर्मिळ निसर्गसंपदा नष्ट होतेय, यामुळे निसर्गाचा समतोलच बिघडलाय. ती याबद्दल वाचन करीत गेली. तिने आई वडिलांना स्पष्ट बजावले की, घरातील कोणीही वाहन वापरायचे नाही. विमानाने प्रवास करायचा नाही. मांसाहारातून मिथेनचे उत्सर्जन होते, त्यामुळे मांसाहार वर्ज्य. संपूर्ण कुटुंब शाकाहारी बनले. आई-वडिलांना पायी-सायकलवर प्रवास करण्याचा तिने दंडकच घालून दिला. पण, तिच्या एका कुटुंबाने जीवनशैली बदलल्याने काही फरक पडणार नव्हता. त्यासाठी देशाचे धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या राजकारण्यांनी याची दखल घेणे गरजेचे होते.
ज्या वयात हसायचे, बागडायचे त्या वयात तिला पृथ्वीच्या भवितव्याच्या चिंतेने ग्रासले. बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजे २० ऑगस्ट २०१८ रोजी तिने यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. पण, एक नववीतील मुलगी काय करू शकणार होती? तिला कदाचित माहिती होते की आपण फेकलेला दगड आभाळाला भेदू शकणार नाही. पण, पूर्ण ताकदीनिशी दगड भिरकावण्यास काय हरकत आहे? पुढच्याच महिन्यात म्हणजे ९ सप्टेंबरला स्वीडनमधील निवडणुका होत्या. निवडणुका होईपर्यंत शाळेतच जायचे नाही, असा तिने निर्णय घेतला. ती रोज घरून निघायची आणि स्वीडिश संसदेसमोरील एका झाडाखाली येऊन बसायची. हातात ‘स्कूल स्ट्राइक फॉर क्लायमेट’ असा स्वत:च लिहिलेला फलक घेऊन ती शाळेच्या वेळेत संसदेबाहेर बसू लागली. आधी तिच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. मात्र, तिने हार मानली नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांना हस्तलिखित पत्रके वाटू लागली. ‘तुम्ही माझे भविष्य उद्ध्वस्त करीत आहात, म्हणून मला हे आंदोलन करावे लागतेय’ असा मजकूर त्यात लिहिलेला होता. जंगलांना लागलेल्या आगी आणि त्यामुळे वातावरणात वाढलेले कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण यामुळे गेल्या वर्षी स्वीडनमध्ये २६२ वर्षांतील सर्वाधिक तप्त उन्हाळा पडला. स्वीडिश सरकारने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत आणि पॅरिस कराराचे पालन करावे या तिच्या मागण्या होत्या.
सुरुवातीला तिने इन्स्टाग्राम, ट्विटरवर तिच्या आंदोलनाचा फोटो टाकला. हळूहळू तिच्याकडे सगळ्यांचे लक्ष जाऊ लागले. तिच्या विषयाचे गांभीर्य लोकांना पटू लागले. पर्यावरण रक्षण या विषयावर काम करणारी सोशल मीडिया कंपनी ‘वुई डोन्ट हॅव टाइम’चा फोटोग्राफर इंगमर रेन्टझॉग याने तिचे फोटो त्याच्या कंपनीच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केले. त्याला हजारो व्ह्यूज मिळाल्या. नंतर त्याने तिचे व्हिडीओ यूट्यूब चॅनलवर चालवले. लोकांमध्ये तिच्या आंदोलनाची चर्चा होऊ लागली. वृत्तपत्रे आणि चॅनलने तिच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आणि तिची ही मोहीम व्यापक बनली. स्वीडनच्या निवडणुका झाल्यानंतरही तिने दर शुक्रवारी आंदोलन सुरू ठेवले. सुरुवातीला तिला वेड्यात काढणारे तिचे मित्र-मैत्रिणी या आंदोलनामध्ये भाग घेऊ लागले. देशोदेशीच्या माध्यमांनी तिची दखल घेतली. शाळांमध्ये चर्चा होऊ लागली. तिच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो मुले दर शुक्रवारी ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’मध्ये सहभाग घेऊ लागली. गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत २७० शहरांतील सुमारे २० हजार मुलांनी तिच्या आंदोलनाला पाठिंबा देत ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’मध्ये सहभाग घेतला. त्यानंतरही युरोपपासून ते जपानपर्यंत लाखो मुले पर्यावरण रक्षणासाठी रस्त्यावर उतरली. भारतातही काही शाळांमधील मुले तिच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
ग्रेटा काही दिवसांतच अघोषित लीडर बनली. संपूर्ण युरोपात तिची कीर्ती पोहोचली. तिला मोठमोठ्या परिषदांमध्ये भाषणांसाठी निमंत्रणे येऊ लागली. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी फॉलोवर वाढले. ग्रेटाच्या म्हणण्यानुसार ग्लोबल वॉर्मिंगने आता इतके गंभीर रूप धारण केले आहे की मानवजातीला त्याचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. तिच्या वयाच्या पिढीचे भविष्य बरबाद करण्यासाठी तिच्या पालकांच्या वयाची पिढीच जबाबदार आहे, असा तिचा स्पष्ट आरोप आहे. लंडनच्या संसदेत बोलताना तिने परखडपणे आपला मुद्दा मांडला. ‘तुम्ही आमच्याशी खोटे बोलता. तुम्ही आमच्या पिढीला खोटा विश्वास देता. आमचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगता. पण, वास्तव फार निराळे आहे. आमच्या पिढीचे भविष्य तुम्ही अंध:कारात ढकलत आहात.’
ती म्हणते, ‘आपल्याला आता खडबडून जागे होण्याची आणि आपल्या सवयी तत्काळ बदलण्याची गरज आहे. कारण अगदी लहान लहान गोष्टींतूनच मोठमोठ्या समस्यांवर उत्तर मिळू शकते. राजकारणी आणि धोरणे बनविणाऱ्यांनी आता शास्त्रज्ञांचे ऐकण्याची गरज आहे. ‘इंटर गव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज’च्या अहवालानुसार आपल्याकडे चुका सुधारण्यासाठी केवळ बारा वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यानंतर परिस्थिती इतकी हाताबाहेर जाईल की आपले कोणतेच उपाय कामी येणार नाहीत.’
तिने हेही निदर्शनास आणून दिले की, पॅरिस करारानुसार विविध देशांनी मान्य केलेली ग्लोबल वॉर्मिंग रोखण्याची मर्यादा दरवर्षी १.५ सेल्सिअस आहे. ती अपुरी आहे. त्यात वाढ करण्याची गरज आहे. २०२० पर्यंत ग्रीन हाऊस गॅसेस निर्मिती पूर्णपणे थांबली पाहिजे. ब्रिटिश संसदेत बोलताना तिने सरकारला अक्षरशः शब्दांत पकडले. ब्रिटनने ‘उत्सर्जन कमी करणे’ (lowering emmissions)असा शब्द वापरला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याऐवजी ते पूर्णपणे थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे तिने सुनावले. ‘युरोपियन इकॉनॉमिक अँड सोशल कमिटी’पुढे बोलताना तिने युरोपियन युनियनने कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण २०३० पर्यंत ८० टक्क्यांपर्यंत रोखण्याचा मुद्दा मांडला.
ग्रेटाच्या या कार्याबद्दल तिला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. शालेय पुरस्कारांबरोबरच विविध संस्थांनी तिच्या कार्याची दाखल घेतली. प्रतिष्ठित ‘टाइम’ मासिकाने जगातील २५ सर्वात प्रभावी टीनएजरमध्ये तिची निवड केली. गेल्या मार्चमध्ये महिला दिनी तिला स्वीडनमधील ‘सर्वात महत्त्वाची महिला’ हा बहुमान प्राप्त झाला. यासह विविध पर्यावरण संस्था, वृत्तपत्रांनीही तिला गौरविले. तिच्या कार्याची सर्वात मोठी दखल म्हणजे स्वीडिश संसद आणि नॉर्वेतील तीन पदाधिकाऱ्यांनी तिची शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली. याबाबत तिने कृतज्ञता व्यक्त केली. एप्रिल २०१९ मध्ये ‘टाइम’ मासिकाने तिचा जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केला. ब्रिटिश व्होग मासिकाच्या सप्टेंबर २०१९च्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या १५ महिलांमध्येही तिचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रेटाच्या आंदोलनाने प्रभावित होऊन अनेक शाळकरी मुलांमध्ये पर्यावरण जागृती तर झालीच पण जगभरातील राजकारणी, धोरणी मंडळीलाही आपल्या चुका कळल्या आणि त्यांनी त्या मान्यही केल्या. याला ‘ग्रेटा इफेक्ट’ म्हटले जात आहे. ज्या-ज्या माध्यमातून कार्बन उत्सर्जन होईल, त्याचा वापर टाळण्याच्या तिच्या आग्रहामुळे अनेकांनी सायकली, रेल्वेचा वापर सुरू केला. ग्रेटाला २३ जानेवारी रोजी डावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात बोलावण्यात आले होते. ती तब्बल ३२ तासांचा रेल्वे प्रवास करून या ठिकाणी पोहोचली. मात्र, येथे आलेले विविध देशांचे प्रतिनिधी तब्बल १५०० चार्टर्ड विमानांनी येथे दाखल झाले होते. हा विरोधाभास लक्षात आल्यावर तिने तेथेच सर्वांना करणी आणि कथनीतील फरक लक्षात आणून दिला. प्रसिद्ध टॉक शो टेडएक्स स्टॉकहोमद्वारे तिने आपले विचार जगभर पोहचविले. बर्लिनमध्ये तिला २५ हजार लोकांसमोर आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळाली. तिला जर्मनीतील वार्षिक चित्रपट महोत्सवात ‘गोल्डन कॅमेरा’ हा विशेष पुरस्कार देण्यात आला. युरोपिअन पार्लमेंट, ऑस्ट्रेलियन वर्ल्ड समिट आर ट्वेंटीमध्येही तिला सन्मानाने निमंत्रित करण्यात आले. गेल्या महिन्यात न्यूयॉर्क आणि चिली देशांत होणाऱ्या पर्यावरण परिषदेसाठी तिला निमंत्रण देण्यात आले होते. यासाठी तिने खास सोलर पॅनलवर चालणाऱ्या तराफ्यातून तब्बल १४ दिवसांचा प्रवास करीत अॅटलांटिक समुद्र पार केला, पण विमान किंवा मोटरबोट वापरली नाही.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवे तिने एक व्हिडीओ पोस्ट करीत भविष्यातील धोक्यांची कल्पना दिली. ‘प्रिय मोदी, पर्यावरणीय समस्यांवर तुम्ही आताच ठोस पावले उचलण्याची गरज आहे, नुसते बोलण्याची नाही. तुम्ही बोलता खूप पण प्रत्यक्ष परिणाम खूपच कमी दिसून येतो. तुम्ही पर्यावरण रक्षणात अपयशी होत आहात. असेच राहिले तर तुम्ही या जगातील सर्वात दुष्ट खलनायक ठराल, जे तुम्हाला कधीच नको असेल,’ अशा स्पष्ट शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ग्रेटाने बुधवारी, दि. १८ सप्टेंबरला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा यांची भेट घेतली. ओबामांना तिने आपल्या कार्याची माहिती दिली. यावेळी ओबांनी तिच्यासाठी उच्चारलेले शब्द अत्यंत महत्त्वाचे होते. ते म्हणाले, तुझ्यासारख्या नेतृत्वाची गरज आता गरज आहे. तू या पृथ्वीसाठी लढणारी सर्वश्रेष्ठ वकील आहेस. यातच तिच्या सर्व कार्याचा सार आला. ग्रेटाची ही लढाई चालूच आहे. आपणही आपल्या जीवनशैलीत बदल करून आपल्या पृथ्वीला वाचविण्याच्या लढाईत सहभागी होण्याची गरज आहे.
(महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीत दि. २२ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप कौतुक वाटते ग्रेटाचे.

ज्वलंत विषय आहे, येथे टाकल्याबद्दल धन्यवाद.

<< ते म्हणाले, तुझ्यासारख्या नेतृत्वाची गरज आता गरज आहे. तू या पृथ्वीसाठी लढणारी सर्वश्रेष्ठ वकील आहेस. यातच तिच्या सर्व कार्याचा सार आला. ग्रेटाची ही लढाई चालूच आहे. आपणही आपल्या जीवनशैलीत बदल करून आपल्या पृथ्वीला वाचविण्याच्या लढाईत सहभागी होण्याची गरज आहे.>>
------- ग्रेटाच्या कार्याला वंदन. आत्यंतिक गरज आहे.

छान परीचय.

आपणही आपल्या जीवनशैलीत बदल करून आपल्या पृथ्वीला वाचविण्याच्या लढाईत सहभागी होण्याची गरज आहे. >>> +१

ग्रेटा ग्रेट आहे.
"म्ही आमच्याशी खोटे बोलता. तुम्ही आमच्या पिढीला खोटा विश्वास देता. आमचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगता. पण, वास्तव फार निराळे आहे. आमच्या पिढीचे भविष्य तुम्ही अंध:कारात ढकलत आहात.’
ती म्हणते, ‘आपल्याला आता खडबडून जागे होण्याची आणि आपल्या सवयी तत्काळ बदलण्याची गरज आहे. कारण अगदी लहान लहान गोष्टींतूनच मोठमोठ्या समस्यांवर उत्तर मिळू शकते. राजकारणी आणि धोरणे बनविणाऱ्यांनी आता शास्त्रज्ञांचे ऐकण्याची गरज आहे. "

हे अगदी खरंय. पुढली पिढी सजग झाली तरच काही आशा आहे.

तुम्ही खूपच चांगला लेख लिहिला आहे.

"How dare you.... " आज मला तिचा प्रत्येक शब्द आवडला. क्लायमेट चेंज बद्दल आत्यंतिक तळमळीने बोलत आहे, आणि जोडीला पर्यावरण विज्ञानाची चांगलीच जाण आहे.

https://www.youtube.com/watch?v=TMrtLsQbaok

<छान परीचय.> धन्यवाद माधव
<तुम्ही खूपच चांगला लेख लिहिला आहे.> धन्यवाद भरत
<"How dare you.... " आज मला तिचा प्रत्येक शब्द आवडला. क्लायमेट चेंज बद्दल आत्यंतिक तळमळीने बोलत आहे, आणि जोडीला पर्यावरण विज्ञानाची चांगलीच जाण आहे.>
हो उदय, हे सर्व बोलताना तिच्या डोळ्यांना धारा लागलेल्या होत्या.

खूप चांगला लेख. ग्रेटाचे आणि तिच्या पालकांचेही कौतुक आहे.
आपणही आपल्या जीवनशैलीत बदल करून आपल्या पृथ्वीला वाचविण्याच्या लढाईत सहभागी होण्याची गरज आहे. >>> +१

उत्तम लेख!
ग्रेटाचं कालचं भाषण ऐकून फार उदास वाटलं Sad तिने पहीलंच वाक्य उच्चारलं we will be watching you आणि समोर बसलेली मंडळी हसली Sad हाच सगळ्यात मोठा दैवदुर्विलास आहे! बेडकाच्या भोवतीचं तापमान हळूहळू वाढत असेल तर ते उत्कलन बिंदू गाठेपर्यंत बेडूक जसा गाफील असतो अक्षरशः तसेच आपण सगळे गाफील आहोत.

<खूप चांगला लेख. ग्रेटाचे आणि तिच्या पालकांचेही कौतुक आहे.> धन्यवाद हर्पेन. पालकांचेही कौतुक आहेच.

<ग्रेटाचं कालचं भाषण ऐकून फार उदास वाटलं Sad तिने पहीलंच वाक्य उच्चारलं we will be watching you आणि समोर बसलेली मंडळी हसली Sad हाच सगळ्यात मोठा दैवदुर्विलास आहे! बेडकाच्या भोवतीचं तापमान हळूहळू वाढत असेल तर ते उत्कलन बिंदू गाठेपर्यंत बेडूक जसा गाफील असतो अक्षरशः तसेच आपण सगळे गाफील आहोत.>
जिज्ञासा,
अगदी खरंय

ऐश
आराम,सर्व न सपणारी भौतिक सुख जिथे उपलब्ध असतील त्या स्वप्ना मधील गावात जाण्यासाठी हे विकासाची गाडी जोरात धावत आहे .
प्रवासी सुद्धा खुश आहेत स्वप्नं मधील गावात पोचायला .
पण ह्या सुसाट गाडीचा ब्रेक सुद्धा आपल्या हातात नाही accelator
कमी होत नाही उलट जास्तच दिला जात आहे .
प्रवाशी मंडळी ना आता जाणीव झाली आहे आपली विकासाची गाडी काय स्वप्नं मधील गावात पोचत नाही ती आपल्याला मृत्यू कडे विनाश कडे घेवून चालली आहे .
आणि इच्या असून सुधा ही विकासाची (की विनाशाची) गाडी कोण्ही थांबवू शकत नाही .
करचून ब्रेक मारून थांबवली तरी प्रवाशांच्या जीव धोक्यात च आहे .
तिचे स्पीड कमी करण्यासाठी लहान लहान अडथळे तयार करूनच तिला सुरक्षित थांबवत येईल .
पण ते खूप कष्टाचे आहे.
अखंड प्रयत्न करणे गरजेचे आहे .
अवघड आहे वेळ निघून गेली आहे

खूप चांगला लेख. ग्रेटाचे आणि तिच्या पालकांचेही कौतुक आहे.
आपणही आपल्या जीवनशैलीत बदल करून आपल्या पृथ्वीला वाचविण्याच्या लढाईत सहभागी होण्याची गरज आहे. >>> +१

राजेश १८८, प्रतिसाद चुकीच्या धाग्यावर पडलाय…
<आरेचं काय करायचं शेवटी> चिडकू, मायबाप सरकार ठरवील ते…
मंजूताई, धन्यवाद

राजेश १८८, प्रतिसाद चुकीच्या धाग्यावर पडलाय… >> राजेश एवढंच करु शकतो. लंबेचौडे प्रतिसाद नको तिथे ठोकून देणे.

ग्लोबल वॉर्मिंग, ग्लोबल टेररिझम हे दोन प्रश्न मानव जातीच्या अस्तित्वाला धोका निर्माण करत आहेत यांत शंका नाहि. बट सिरियस्ली गाय्ज, डु वी नीड टीनेजर्स लाइक ग्रेटाज अँड मलेलाज ऑफ दि वर्ल्ड टु शोव इट डाउन अवर थ्रोट? दोघींच्या उद्देश्याबद्दल शंका नाहि, लेट्स होप देर ड्रमॅटिक अग्रेशन डझंट टर्न इंटु फेकलेस मनुवं. झिरो कार्बन फुटप्रिंट अचिव करणं हे काहि स्विच ऑन्/ऑफ करण्या इतकं सोप्प नाहि. स्विडनचाच गोल आहे २५ वर्षांनंतरचा. सो इफ स्विडन नीड्स २५ इयर्स, बिगर कंट्रीज लाइक चायना, इंडिया, अमेरिका वुड टेक ५० पर देर रोडमॅप. मग का एव्हढी हाराकिरी? इज शी आयिंग फॉर ए नोबेल? यु विल नेवर नो... Wink

https://www.cnn.com/2019/09/24/politics/trump-greta-thunberg-climate-cha...

क्लायमेट चेंजला होक्स मानणारे लोक सर्वोच्च सत्ताधारी असताना ग्रेटाच्या वयाच्या मुलांना आवाज उठवावा लागणं याचं नवल वाटत नाही.

<इज शी आयिंग फॉर ए नोबेल? यु विल नेवर नो... >
राज, तिने आंदोलन सुरू केले तेव्हा ते एवढे मोठे होईल याची तिने कल्पनाही केली नसेल. त्यामुळे नोबेलसाठी तिने एवढी उठाठेव केल्याची शक्यता नाही. आता जरी तिच्या अपेक्षा जागृत झाल्या असतील तरी त्यात गैर काही वाटत नाही. कारण तिने जगाला दखल घ्यायला भाग पाडलंय.

<क्लायमेट चेंजला होक्स मानणारे लोक सर्वोच्च सत्ताधारी असताना ग्रेटाच्या वयाच्या मुलांना आवाज उठवावा लागणं याचं नवल वाटत नाही.>
सहमत भरत

राज, एकाच पोस्ट मध्ये उद्देशाबद्दल शंका नाही आणि is she eyeing for the Nobel अशी विरोधाभासी विधानं का बरं?
I think you are diverting from the real issue. She is objecting to the very targets for carbon emissions set by the countries. We have reached a point where reducing emissions is not an option. We must act to completely stop the carbon emissions. For achieving such a seemingly impossible target, it is the government that has to take action. सर्वसामान्य जनतेचे प्रयत्न हे शेवटी रामाच्या सेतूला खारीची मदत या पातळीवरचे असणार आहेत.
शून्य कार्बन उत्सर्जन हेच आणि केवळ हेच लक्ष्य ठेवून काम केले तरच मानवजातीला काही तरी भविष्य आहे.
ग्रेटावर टिका करुन तुम्ही मूळ मुद्द्याला बगल देत आहात. ग्रेटा महत्त्वाची नाहीये ती मांडते आहे तो प्रश्न महत्त्वाचा आहे. Please do not let this thread lose its focus.

ग्रेटा महत्वाची आहे कारण ती मांडत असलेला मुद्दा, तिला नोबेल पारितोषिक मिळाले म्हणजे त्या मुद्द्याकडे अधिकाधिक माणसे अधिक गंभीरपणे पाहण्याचे प्रमाण वाढण्याचा संभव आहे त्यामुळे तिला नोबेल पुरस्कार मिळाला तर चांगलेच आहे

<< ग्रेटा महत्त्वाची नाहीये ती मांडते आहे तो प्रश्न महत्त्वाचा आहे. >>

------ ग्रेटामुळे लाखो / कोटी तरुण पिढीला या प्रश्नाचे गांभिर्य समजत आहे... आणि आता ते त्यांचा खारीचा वाटा उचलत आहे आणि म्हणून प्रत्येक देशात राजकारणी / धोरणे ठरवणार्‍यांना या प्रश्नाची दखल घेणे जरुरीचे वाटते आहे.

मला "प्रश्न" माहित होता, तोंडओळखही होती... पण ग्रेटामुळे माहित असलेल्या प्रश्वाचे गांभिर्य वाढले आहे. आता मी, एक व्यक्ती, काय बदल घडवू शकतो यावर विचार करतो. लोक आता चर्चा करत आहेत... हा बदल स्वागतार्ह आहे. माझ्यासाठी प्रश्नाचे गांभिर्य सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्याचे ग्रेटाचे कार्य खरोखरच ग्रेट आहे...

Okay. I'll clarify more. The person, the person getting the Nobel.. All these things will not matter if nobody takes an action. एखाद्या लढा देणाऱ्या व्यक्तीला नोबेल दिले की काम झाले काय?
या आंदोलनाला व्यक्तीकेंद्रीत बनवू नका. ग्रेटाचे कौतुक वगैरे सगळे ठिक आहे पण केवळ तेवढेच करून काहीही साध्य होणार नाहीये. त्यामुळे मूळ उद्देशाला हरताळ फासला जात नाहीये ना याकडे लक्ष द्यायला हवे.

काल एका मित्राने विचारलेला प्रश्न :

यावर्षी मुंबैतल्या पावसाने ६५ वर्षांचा रेकॉर्ड तोडला. पण म्हणजेच ६५ वर्षांपूर्वी इतका पाउस पडला होताच. तेंव्हा तर इतक्या प्रमाणात कार्बन एमिशन नव्हते. इतिहासात पण अनेक अतिवृष्टी आणि दुष्काळांची नोंद आहेच. मग कार्बन एमिशन आणि ग्लोबल वॉर्मिंग यांच्या संबंधाला ठोस पुरावा काय?

कार्बन चे उस्तर्ज न आणि तापमान ह्याचा घनिष्ट संबंध आहे ह्या विषयी जगातील संशोधकांना मध्ये बिलकुल मतभेद नाहीत सर्वांना ते मान्य आहे .
कार्बन emmision मुळे तापमान वाढ होतेच ह्या बध्दल दुमत असायचे कारण नाही .
तापमान वाढी काय काय हाहाकार होईल त्या विषयी संशोधक लोकांनी जे अंदाज सांगितले आहेत त्याच्या विरुध्द मत कोणत्याच संशोधकांनी व्यक्त केले नाही .
प्रश्न तो नाहीच आहे .
प्रश्न आहे कार्बन emmision थांबवायचे असेल तर अनेक उद्योग धंदे बंद करावे लागतील त्या मुळे आर्थिक व्यवस्था कोलमडून पडेल .
बेरोजगारी वाढेल .
आता जग अशा ठिकाणी उभे आहे तेथून मागे फिरण्याचा रस्ता जवळ जवळ बंद झालेलं आहे .
दलदलीत अडकलेल्या माणसा सारखा .
जीव वाचवण्ासाठी हातपाय हलवले तरी जीव जाणार आणि काहीच प्रयत्न जीव वाचवण्या साठी नाही केले तरी जीव जाणार कोण्ही तिसराच व्यक्ती दलदलीत अडकलेल्या व्यक्तीला वाचवू शकतो .
ही पृथ्वी आता माणसाला वाचवू शकणार नाही दुसरा ग्रह शोधा.
मंगल ग्रह सुधा पहिला habitable च होता ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे त्याची अवस्था अशी झाली आहे असे काही संशोधक चे मत आहे

Pages