ग्रेटा थन्बर्ग-पृथ्वीची वकील

Submitted by टोच्या on 22 September, 2019 - 01:27

ग्रेटा थन्बर्ग. एक अवघ्या सोळा वर्षांची चिमुकली. तिचे नाव जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी सुचविले गेले आहे. अगदी युरोपातील राजकारण्यांपासून ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांच्या पर्यावरणाबाबतच्या धोरणांतील चुकांवर तिने बोट ठेवले आहे. जगभरातील लाखो मुले आज तिच्या पाठिशी आहेत. कोण आहे ही ग्रेटा?
---

पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, ग्लोबल वॉर्मिंग वाढतेय, पृथ्वी धोक्यात आहे, अशी बोंब आपण नियमित मारत असतो. कधी सोशल मीडियातून तर कधी भाषणबाजीतून. पण, त्यासाठी नेमके काय करायचे आणि कोणी करायचे, याबाबतीत आपल्या कपाळावर मोठे प्रश्नचिन्ह असते. हे सर्व एक तर सरकारने करावे, किंवा शास्त्रज्ञांनी त्यावर काहीतरी मार्ग काढावा अशी आपली अपेक्षा असते. सोशल मीडियावर व्यक्त होणे, थोडीबहुत आंदोलने करणे याव्यतिरिक्त आपण भले आणि आपले काम भले या वृत्तीत आपण जगत असतो. पण, पृथ्वीवर आलेले हे संकट एका चिमुकलीला सहन झाले नाही. चोवीस तास ती त्याचाच विचार करू लागली. कोणी काही करेल याची वाट न पाहता तिने स्वत:पासून सुरुवात केली. तिचे हे आंदोलन इतके व्यापक बनले की आज जगभरातील लाखो मुले शाळा बुडवून तिच्या ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’मध्ये सहभागी होत आहेत. आज तिच्या आंदोलनाने जागतिक स्वरुप प्राप्त केले असून, जगभरातील देशांना, त्यातील राजकारणी, उद्योगपती, तज्ज्ञांना तिची दखल घेणे भाग पडले आहे. या चिमुकलीचे नाव आहे ग्रेटा थन्बर्ग.
स्वीडनमधील एका कलाकार दाम्पत्याची ही अवघी सोळा वर्षांची मुलगी. आई मलेना अर्नमान एक ऑपेरा सिंगर तर वडील लेखक, कलाकार आणि चित्रपट निर्माता. वयाच्या आठव्या वर्षी ग्रेटाने ‘हवामान बदल’ हा शब्द प्रथम ऐकला. मानव प्रगत झाला पण त्यासाठी त्याने अवलंबलेल्या मार्गांनी पर्यावरणाची अतोनात हानी सुरू केली. वेगवेगळे कारखाने, वाहने यांतून वातावरणात मोठ्या प्रमाणावर कार्बन डाय ऑक्साइड सोडला जातोय. त्याचे प्रमाण मर्यादेपलिकडे गेलेय. जंगलांना आगी लागताहेत. त्यात दुर्मिळ निसर्गसंपदा नष्ट होतेय, यामुळे निसर्गाचा समतोलच बिघडलाय. ती याबद्दल वाचन करीत गेली. तिने आई वडिलांना स्पष्ट बजावले की, घरातील कोणीही वाहन वापरायचे नाही. विमानाने प्रवास करायचा नाही. मांसाहारातून मिथेनचे उत्सर्जन होते, त्यामुळे मांसाहार वर्ज्य. संपूर्ण कुटुंब शाकाहारी बनले. आई-वडिलांना पायी-सायकलवर प्रवास करण्याचा तिने दंडकच घालून दिला. पण, तिच्या एका कुटुंबाने जीवनशैली बदलल्याने काही फरक पडणार नव्हता. त्यासाठी देशाचे धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या राजकारण्यांनी याची दखल घेणे गरजेचे होते.
ज्या वयात हसायचे, बागडायचे त्या वयात तिला पृथ्वीच्या भवितव्याच्या चिंतेने ग्रासले. बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजे २० ऑगस्ट २०१८ रोजी तिने यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. पण, एक नववीतील मुलगी काय करू शकणार होती? तिला कदाचित माहिती होते की आपण फेकलेला दगड आभाळाला भेदू शकणार नाही. पण, पूर्ण ताकदीनिशी दगड भिरकावण्यास काय हरकत आहे? पुढच्याच महिन्यात म्हणजे ९ सप्टेंबरला स्वीडनमधील निवडणुका होत्या. निवडणुका होईपर्यंत शाळेतच जायचे नाही, असा तिने निर्णय घेतला. ती रोज घरून निघायची आणि स्वीडिश संसदेसमोरील एका झाडाखाली येऊन बसायची. हातात ‘स्कूल स्ट्राइक फॉर क्लायमेट’ असा स्वत:च लिहिलेला फलक घेऊन ती शाळेच्या वेळेत संसदेबाहेर बसू लागली. आधी तिच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. मात्र, तिने हार मानली नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांना हस्तलिखित पत्रके वाटू लागली. ‘तुम्ही माझे भविष्य उद्ध्वस्त करीत आहात, म्हणून मला हे आंदोलन करावे लागतेय’ असा मजकूर त्यात लिहिलेला होता. जंगलांना लागलेल्या आगी आणि त्यामुळे वातावरणात वाढलेले कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण यामुळे गेल्या वर्षी स्वीडनमध्ये २६२ वर्षांतील सर्वाधिक तप्त उन्हाळा पडला. स्वीडिश सरकारने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत आणि पॅरिस कराराचे पालन करावे या तिच्या मागण्या होत्या.
सुरुवातीला तिने इन्स्टाग्राम, ट्विटरवर तिच्या आंदोलनाचा फोटो टाकला. हळूहळू तिच्याकडे सगळ्यांचे लक्ष जाऊ लागले. तिच्या विषयाचे गांभीर्य लोकांना पटू लागले. पर्यावरण रक्षण या विषयावर काम करणारी सोशल मीडिया कंपनी ‘वुई डोन्ट हॅव टाइम’चा फोटोग्राफर इंगमर रेन्टझॉग याने तिचे फोटो त्याच्या कंपनीच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केले. त्याला हजारो व्ह्यूज मिळाल्या. नंतर त्याने तिचे व्हिडीओ यूट्यूब चॅनलवर चालवले. लोकांमध्ये तिच्या आंदोलनाची चर्चा होऊ लागली. वृत्तपत्रे आणि चॅनलने तिच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आणि तिची ही मोहीम व्यापक बनली. स्वीडनच्या निवडणुका झाल्यानंतरही तिने दर शुक्रवारी आंदोलन सुरू ठेवले. सुरुवातीला तिला वेड्यात काढणारे तिचे मित्र-मैत्रिणी या आंदोलनामध्ये भाग घेऊ लागले. देशोदेशीच्या माध्यमांनी तिची दखल घेतली. शाळांमध्ये चर्चा होऊ लागली. तिच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो मुले दर शुक्रवारी ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’मध्ये सहभाग घेऊ लागली. गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत २७० शहरांतील सुमारे २० हजार मुलांनी तिच्या आंदोलनाला पाठिंबा देत ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’मध्ये सहभाग घेतला. त्यानंतरही युरोपपासून ते जपानपर्यंत लाखो मुले पर्यावरण रक्षणासाठी रस्त्यावर उतरली. भारतातही काही शाळांमधील मुले तिच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
ग्रेटा काही दिवसांतच अघोषित लीडर बनली. संपूर्ण युरोपात तिची कीर्ती पोहोचली. तिला मोठमोठ्या परिषदांमध्ये भाषणांसाठी निमंत्रणे येऊ लागली. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी फॉलोवर वाढले. ग्रेटाच्या म्हणण्यानुसार ग्लोबल वॉर्मिंगने आता इतके गंभीर रूप धारण केले आहे की मानवजातीला त्याचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. तिच्या वयाच्या पिढीचे भविष्य बरबाद करण्यासाठी तिच्या पालकांच्या वयाची पिढीच जबाबदार आहे, असा तिचा स्पष्ट आरोप आहे. लंडनच्या संसदेत बोलताना तिने परखडपणे आपला मुद्दा मांडला. ‘तुम्ही आमच्याशी खोटे बोलता. तुम्ही आमच्या पिढीला खोटा विश्वास देता. आमचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगता. पण, वास्तव फार निराळे आहे. आमच्या पिढीचे भविष्य तुम्ही अंध:कारात ढकलत आहात.’
ती म्हणते, ‘आपल्याला आता खडबडून जागे होण्याची आणि आपल्या सवयी तत्काळ बदलण्याची गरज आहे. कारण अगदी लहान लहान गोष्टींतूनच मोठमोठ्या समस्यांवर उत्तर मिळू शकते. राजकारणी आणि धोरणे बनविणाऱ्यांनी आता शास्त्रज्ञांचे ऐकण्याची गरज आहे. ‘इंटर गव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज’च्या अहवालानुसार आपल्याकडे चुका सुधारण्यासाठी केवळ बारा वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यानंतर परिस्थिती इतकी हाताबाहेर जाईल की आपले कोणतेच उपाय कामी येणार नाहीत.’
तिने हेही निदर्शनास आणून दिले की, पॅरिस करारानुसार विविध देशांनी मान्य केलेली ग्लोबल वॉर्मिंग रोखण्याची मर्यादा दरवर्षी १.५ सेल्सिअस आहे. ती अपुरी आहे. त्यात वाढ करण्याची गरज आहे. २०२० पर्यंत ग्रीन हाऊस गॅसेस निर्मिती पूर्णपणे थांबली पाहिजे. ब्रिटिश संसदेत बोलताना तिने सरकारला अक्षरशः शब्दांत पकडले. ब्रिटनने ‘उत्सर्जन कमी करणे’ (lowering emmissions)असा शब्द वापरला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याऐवजी ते पूर्णपणे थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे तिने सुनावले. ‘युरोपियन इकॉनॉमिक अँड सोशल कमिटी’पुढे बोलताना तिने युरोपियन युनियनने कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण २०३० पर्यंत ८० टक्क्यांपर्यंत रोखण्याचा मुद्दा मांडला.
ग्रेटाच्या या कार्याबद्दल तिला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. शालेय पुरस्कारांबरोबरच विविध संस्थांनी तिच्या कार्याची दाखल घेतली. प्रतिष्ठित ‘टाइम’ मासिकाने जगातील २५ सर्वात प्रभावी टीनएजरमध्ये तिची निवड केली. गेल्या मार्चमध्ये महिला दिनी तिला स्वीडनमधील ‘सर्वात महत्त्वाची महिला’ हा बहुमान प्राप्त झाला. यासह विविध पर्यावरण संस्था, वृत्तपत्रांनीही तिला गौरविले. तिच्या कार्याची सर्वात मोठी दखल म्हणजे स्वीडिश संसद आणि नॉर्वेतील तीन पदाधिकाऱ्यांनी तिची शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली. याबाबत तिने कृतज्ञता व्यक्त केली. एप्रिल २०१९ मध्ये ‘टाइम’ मासिकाने तिचा जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केला. ब्रिटिश व्होग मासिकाच्या सप्टेंबर २०१९च्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या १५ महिलांमध्येही तिचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रेटाच्या आंदोलनाने प्रभावित होऊन अनेक शाळकरी मुलांमध्ये पर्यावरण जागृती तर झालीच पण जगभरातील राजकारणी, धोरणी मंडळीलाही आपल्या चुका कळल्या आणि त्यांनी त्या मान्यही केल्या. याला ‘ग्रेटा इफेक्ट’ म्हटले जात आहे. ज्या-ज्या माध्यमातून कार्बन उत्सर्जन होईल, त्याचा वापर टाळण्याच्या तिच्या आग्रहामुळे अनेकांनी सायकली, रेल्वेचा वापर सुरू केला. ग्रेटाला २३ जानेवारी रोजी डावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात बोलावण्यात आले होते. ती तब्बल ३२ तासांचा रेल्वे प्रवास करून या ठिकाणी पोहोचली. मात्र, येथे आलेले विविध देशांचे प्रतिनिधी तब्बल १५०० चार्टर्ड विमानांनी येथे दाखल झाले होते. हा विरोधाभास लक्षात आल्यावर तिने तेथेच सर्वांना करणी आणि कथनीतील फरक लक्षात आणून दिला. प्रसिद्ध टॉक शो टेडएक्स स्टॉकहोमद्वारे तिने आपले विचार जगभर पोहचविले. बर्लिनमध्ये तिला २५ हजार लोकांसमोर आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळाली. तिला जर्मनीतील वार्षिक चित्रपट महोत्सवात ‘गोल्डन कॅमेरा’ हा विशेष पुरस्कार देण्यात आला. युरोपिअन पार्लमेंट, ऑस्ट्रेलियन वर्ल्ड समिट आर ट्वेंटीमध्येही तिला सन्मानाने निमंत्रित करण्यात आले. गेल्या महिन्यात न्यूयॉर्क आणि चिली देशांत होणाऱ्या पर्यावरण परिषदेसाठी तिला निमंत्रण देण्यात आले होते. यासाठी तिने खास सोलर पॅनलवर चालणाऱ्या तराफ्यातून तब्बल १४ दिवसांचा प्रवास करीत अॅटलांटिक समुद्र पार केला, पण विमान किंवा मोटरबोट वापरली नाही.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवे तिने एक व्हिडीओ पोस्ट करीत भविष्यातील धोक्यांची कल्पना दिली. ‘प्रिय मोदी, पर्यावरणीय समस्यांवर तुम्ही आताच ठोस पावले उचलण्याची गरज आहे, नुसते बोलण्याची नाही. तुम्ही बोलता खूप पण प्रत्यक्ष परिणाम खूपच कमी दिसून येतो. तुम्ही पर्यावरण रक्षणात अपयशी होत आहात. असेच राहिले तर तुम्ही या जगातील सर्वात दुष्ट खलनायक ठराल, जे तुम्हाला कधीच नको असेल,’ अशा स्पष्ट शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ग्रेटाने बुधवारी, दि. १८ सप्टेंबरला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा यांची भेट घेतली. ओबामांना तिने आपल्या कार्याची माहिती दिली. यावेळी ओबांनी तिच्यासाठी उच्चारलेले शब्द अत्यंत महत्त्वाचे होते. ते म्हणाले, तुझ्यासारख्या नेतृत्वाची गरज आता गरज आहे. तू या पृथ्वीसाठी लढणारी सर्वश्रेष्ठ वकील आहेस. यातच तिच्या सर्व कार्याचा सार आला. ग्रेटाची ही लढाई चालूच आहे. आपणही आपल्या जीवनशैलीत बदल करून आपल्या पृथ्वीला वाचविण्याच्या लढाईत सहभागी होण्याची गरज आहे.
(महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीत दि. २२ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिने आई वडिलांना स्पष्ट बजावले की, घरातील कोणीही वाहन वापरायचे नाही. विमानाने प्रवास करायचा नाही. मांसाहारातून मिथेनचे उत्सर्जन होते, त्यामुळे मांसाहार वर्ज्य. संपूर्ण कुटुंब शाकाहारी बनले. आई-वडिलांना पायी-सायकलवर प्रवास करण्याचा तिने दंडकच घालून दिला. पण, तिच्या एका कुटुंबाने जीवनशैली बदलल्याने काही फरक पडणार नव्हता. त्यासाठी देशाचे धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या राजकारण्यांनी याची दखल घेणे गरजेचे होते.
>>

फक्त या एका गोष्टीसाठी तिचं तोंडभरून कौतुक करावंसं वाटतं. बाकीच्यांच्या डोळ्यांत घालायचं अंजन तिनं आधी स्वतःच्या डोळ्यात घातलं. नाहीतर सोशल मीडियात ऑनलाईन सह्या गोळा करत फिरणारे क्रांतिवीर पैशाला पायलीभर सापडतील.
बाकी पब्लिसिटी, नोबेल देणं यासारखे प्रकार म्हणजे निव्वळ तिच्या आयत्या प्रसिद्धीवर डल्ला मारण्याचे धंदे आहेत. फक्त जगात "पृथ्वीची काळजी आम्हालाही तेवढीच आहे", हे दाखवण्याचा केविलवाणा आटापिटा.

ती तब्बल ३२ तासांचा रेल्वे प्रवास करून या ठिकाणी पोहोचली. मात्र, येथे आलेले विविध देशांचे प्रतिनिधी तब्बल १५०० चार्टर्ड विमानांनी येथे दाखल झाले होते. हा विरोधाभास लक्षात आल्यावर तिने तेथेच सर्वांना करणी आणि कथनीतील फरक लक्षात आणून दिला.

>>

पाहिलं एकच वाक्य सगळे निसर्गाची किती "काळजी" करतात, हे दाखवायला पुरेसं आहे. आपल्या सोयी हळूहळू आपल्या गरजा कशा बनत जातात, याचं हे एक मस्त उदाहरण. वीसेक वर्षांपूर्वी टेलिफोन गरज होती, मोबाईल सोय.लँडलाईनच्या त्या साम्राज्यात मोबाईल वापरणारा औषधालापण सापडत नसे. पण काळाचा महिमा कसा असतो पहा. तिथून दहा वर्ष पुढं या, मध्यमवर्गी घरात किमान एकतरी मोबाईल असणं अगदीच सवयीचं झालं. महिन्याच्या महिन्याला नाक्यावरच्या दुकानात किराणा मालाबरोबर मोबाईल रिचार्ज मारणं अगदी अंगवळणी पडलं होतं.

आज कित्येकजण खिशात २-२ मोबाईल असतानाही, तिसऱ्या लेटेस्ट स्मार्टफोनची चातकासारखी वाट बघत असतात. १० वर्षांपूर्वी सोय असणारा स्मार्टफोन शहरातल्या प्रत्येकाची गरज बनलाय, तोही व्यसन लागण्याइतका. उद्या ना जाणो मोबाईलसारखं कुठलं दुसरं डिवाइस आलं, तेही हळूहळू असाच माणसाच्या सोयींकडून त्याच्या गरजेकडे प्रवास करेल.

त्यावेळी आपल्या ह्या सोयी/गरजा भागवायला निसर्गातली किती ऊर्जा खर्ची पडली, किती प्रदूषण झालं, किती जंगलं आडवी झाली, अशा फालतू चिंता आपल्याला पडत नाहीत. तेव्हा आपले निसर्गप्रेम मनातल्या कुठल्याशा कानोड्यात दुर्लक्षित म्हातारीसारखं पडून असतं. एके दिवशी मग अमेझॉनमधली कुठलीशी आग भडकल्याची बातमी आली, का आपल्या निसर्गप्रेमाला काय बहर येतो ! कुठल्याशा चिमुरडीचं भाषण ऐकून एकेकाला असं काय स्फुरण चढतं, जणू समस्त पृथ्वीची जबाबदारी शेषनागाकडून त्याच्याकडे ट्रान्सफर झालीय.

जागतिक क्रांतीच्या या आंदोलनात आपला सहभाग असावा म्हणून हा क्रांतिवीर, धडाधड आपल्या फेसबुकची वॉल 'Save the earth' , 'लिव्ह अँड लेट लिव्ह' अशा 'धगधगत्या' पोस्टींनी भरून टाकतो. कुणी बहाद्दर ऑनलाईन सह्यांची मोहीम चालवून 'आता पहाच कसा सरकारला वठणीवर आणतो' च्या थाटात कमेंटबॉक्स गाजवत असतो. आठवडाभर मग प्रत्येकजण रस्त्यावर कचरा न टाकणं, वृक्षारोपण, कापडी पिशव्या सारख्या जुन्याच मोहिमा हाती घेऊन निसर्गरक्षणात खारीचा वाटा घेतल्याचं समाधान मिळवतो. हळूहळू हा निसर्गप्रेमी कीर्तन सप्ताह सोहळा संपला, की परत कालचीच गाडी सुरु. कालचा तंबाकू आज पुन्हा, तीच सुपारी अन तोच चुना.

विकास आणि पर्यावरण रक्षण हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत असं सध्या वाटायला लागलंय. कारण आपल्या विकासात फक्त आपल्या सोयी आणि आपल्या चैनी येतात, दुसऱ्याच्या (यात दुसरी माणसं, प्राणी, पक्षी, जंगलं सगळं आलं ) गरजांसाठी आपण आपल्या चैनींना कधीही आवर घालत नाही.

ग्रेटाचे विचार मला पटले. मी आज ऑफिसमध्ये सायकलवरून आलो. आल्या आल्या ग्रेटाचा लेख सगळ्यांना वाचून दाखवला तर सगळेच खूप प्रभावित झाले. बॉसपण उद्या सायकलवर येणार आहे. बॉसने प्रदूषण नको व्हायला म्हणून ऑफिसचे ac बंद केले. पक्षांना त्रास होतो म्हणून टॉवर बंद करण्यासाठी आजूबाजूच्या मोबाईल टॉवर्सना नोटीस पाठवली आहे. झाडं कापली जातात म्हणून पेमेंट स्लिप देणार नाही. संध्याकाळी वायू प्रदूषण खूप असल्याने कंपनीची वेळ वाढवली आहे. सगळे आता रात्री उशिरा सुटणार. आमचे डोळे खराब नको व्हायला म्हणून pc इंटरनेट बंद करत होता तर त्याला बोललो थांब जरा मला हा शेवटचा प्रतिसाद डकवूदे . आमचा बॉस आमची खूप काळजी घेतो. थँक यू ग्रेटा तू खूप ग्रेट आहेस. मी लाभार्थी हि माझी कंपनी.

>>राज, एकाच पोस्ट मध्ये उद्देशाबद्दल शंका नाही आणि is she eyeing for the Nobel अशी विरोधाभासी विधानं का बरं?<<
कारण प्रसिद्धिच्या हव्यासापोटी "समाजकार्य" करणारे, आणि याउलट ध्येयाने झपाटुन, निस्वार्थीपणे काम करणारे कुठल्याहि पुरस्काराची, मदतीची अपेक्षा न बाळगणारे लोक माझ्या पहाण्यात आहेत. ग्रेटा/मलेला आर जस्ट पार्ट ऑफ ए बिगर आप्टिक्स, बाकि काहि नाहि...

हर्पेन, उदय, जिज्ञासा, राजेश १८८, राज, विलभ विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
बोकलत,
बदल घडविण्यासाठी कुठून तरी सुरुवात करावीच लागते. ग्रेटाने आंदोलन केले म्हणजे एका रात्रीत जग बदलेल असे नाहीच. पण, किमान या प्रश्नाचे गांभीर्य धोरणकर्त्यांना समजते आहे, त्यावर चर्चा होते आहे, हेही नसे थोडके.

सगळं हसण्यावारी नेलं तर तुमच्या पुढच्या पिढीवर रडायची वेळ येणार आहे. कदाचित तुमच्या पिढीवरच येईल.

अगदी सर्व चक्र उलटी फिरवा असे कोण्ही म्हणणार नाही .
आणि ते शक्य सुद्धा नाही .
शहरी करण मुळे खूप लोकांचे जीवन हे इंडस्ट्री वरच अवलंबून आहे .
पण काही प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो .
विद्युत निर्मिती साठी कोळसा विपुल प्रमाणात वापरला जातो त्याच्या ज्वालनाने कार्बनडाय ऑक्साईड हा वायू हवेत सोडला जातो तो ग्रीन हाऊस इफेक्ट ला जबाबदार आहे .
सूर्य ऊर्जा आणि पवन ऊर्जा ह्यांचा वापर वीज निर्मिती साठी आपण करू शकतो आणि पर्यावरणाला हातभार लावू शकतो .
डिझेल ,पेट्रोल वर चालणारी वाहने विजे वर चालवू शकतो.
कारखान्यांमधून जे विषारी रासायनिक पाणी नदी नाल्यात सोडले जाते त्यावर ट्रीटमेंट करून विषारी रसायने बाजूला काढण्याचे तंत्र अजुन प्रगत करू शकतो .
झाडे ही हवेतील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात आणि त्या वायूचे प्रमाण संतुलित ठेवतात .
शहरात जागा नाही मान्य .
पण आपल्या राज्याचा विचार केला तरी डोंगर बोडके आहेत .
किती तरी मोकळ्या जागा आहेत तिथे सक्षम पने झाडे लावून ती वाढवू शकतो.
शेवटी पृथ्वी चे वातावरण सजीवाला पोषक ठेवण्याची जबाबदारी हुशार प्राणी म्हणून माणसा वरच आहे .
सजीवाला राहण्यास लायक नाही हा ठप्पा पृथ्वी वर मारणारे सुद्धा आपणच आहोत .
पृथ्वी सजीवांना पोसण्यासाठी अनुकूल आहे हे ठरवणारे सुधा आपणच आहोत .
आणि योग्य पोषक,रम्य,प्रदूषण विरहित वातावरणाचा उपभोग घेणारे सुद्धा आपणच आहोत .
मग आपणच ठरवूया आपल्या ला काय हवंय ते

चांगली ओळख. ग्रेटाच्या पुढील यशाला शुभेच्छा.
जिज्ञासा, जग गाफील नाहीये, सगळ्यांनाच माहीत आहे, सामान्य लोक आपापल्या परीने प्रयत्न पण करत असतील. पण जगाकडुन हे करण्यासाठी प्रयत्न पुरेसे नसतील, अजुन जास्त प्रयत्न करायला हवेत. ग्रेटामुळे भरत म्हणतात तसे पुढील पिढीला जास्त लवकर जाणीव होतीये ती खुप चांगली गोष्ट आहे. (कन्येला ओळख करुन देते आता हिच्या कामाची).

इथे वैयक्तीक कोण काय प्रयत्न करते ते ही लिहा म्हणजे इतरांना शिकता येईल. मध्यंतरी वाचले होते की भारतात विजेवर चालणार्‍या गाड्या जास्तीतजास्त आणायचा प्रयत्न होत आहे. अमेरिकेत टेसला आता खुपजणांकडे पहायला मिळते. आशा आहे, पेट्रोल गाड्यांचे भाग बदलुन त्यांचेही विजेवर चालणार्‍या गाड्यांमधे रुपांतर करायचा मार्ग हुशार लोक शोधतील. (सध्यातरी हायब्रीड गाडी वापरतोय, थोडीशी तरी हवेला मदत).
रीसायकल वगैरेची किती मदत होते माहिती नाही पण घरातले सगळे रिसायकल करतो. प्लास्टिक पिशव्या पण.

सुनिधी. अगं लोकांना अगदी जुजबी माहिती आहे. आणि विषयाचं गांभीर्य तर अजून कळलेलंच नाही. ग्लोबल वॉर्मिंग झूठ आहे म्हणणारे, ॲमेझॉनच्या वणव्यांचं समर्थन करणारे नेते आज राष्ट्रपती आहेत.
भारतात लोकसभा निवडणुकीत ६१ कोटी मतदारांनी मतदान केले. कोणत्याही पक्षाच्या प्रचारात वातावरणबदल हा मुद्दा नव्हता. लोकांनी काही प्रश्न देखील विचारले नाहीत. पुण्यात एक उमेदवार उभे होते ज्यांच्या अजेंड्यावर हा विषय होता. ते सायकलवरून प्रचार करायचे. ही सगळी ऐकीव माहिती. माझ्या विशीतल्या भाच्यानी सांगितलेली. मला म्हणाला मी त्यांनाच मत द्यायचा विचार करतोय कारण ते हा महत्त्वाचा मुद्दा मांडत आहेत.
आताही विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा कोणाच्या गावीही नसेल. जे दूरगामी परिणाम करणारे निर्णय प्रशासन एका फटक्यात घेऊ शकतं त्या पातळीवर सर्वसामान्य जनतेचे प्रयत्न पोचू शकत नाहीत. या प्रश्नाकडे गांभीर्याने बघणारी राजकीय इच्छाशक्ती आज अस्तित्वात नाही. त्यामुळे आपले प्रयत्न फार तोकडे पडत आहेत.

ग्रेटाविषयी लोकांना काय वाटतं.. या व्हिडीओ खालच्या कॉमेंट्स मध्ये बहुतेक लोकांनी ग्लोबल वॉर्मिंग hoax वाटतं असं लिहिलंय.
मी या व्हिडीओमधील मतांचं समर्थन करत नाहीये पण लोकांना काय वाटतं हे कळावं म्हणून ही लिंक देते आहे.

https://youtu.be/DticpNH3a2Q

<इथे वैयक्तीक कोण काय प्रयत्न करते ते ही लिहा म्हणजे इतरांना शिकता येईल. मध्यंतरी वाचले होते की भारतात विजेवर चालणार्‍या गाड्या जास्तीतजास्त आणायचा प्रयत्न होत आहे>
सुनिधी, नाशिकमध्ये महापालिकेने प्रत्येक चौकात अतिशय स्वस्त दरात भाडेतत्त्वावर सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याला खूप रिस्पॉन्स आहे. नाशिक सायकल सिटी होऊ पाहत आहे.

<प्रश्नाकडे गांभीर्याने बघणारी राजकीय इच्छाशक्ती आज अस्तित्वात नाही. त्यामुळे आपले प्रयत्न फार तोकडे पडत आहेत.>
जिज्ञासा, तुमच्या सर्व मुद्द्यांशी सहमत. अद्याप आपल्या राजकारण्यांना भविष्यातील धोक्यांचं गांभीर्य कळलेलं नाही.

नाशिकमध्ये महापालिकेने प्रत्येक चौकात अतिशय स्वस्त दरात भाडेतत्त्वावर सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत. >>> हे ठाण्यात पण आहे. लोकंच जास्त वापरत नाहीत ती गोष्ट वेगळी. पण इथे सगळे सायकलने जाऊ लागले तर ऑफिसला दुपारी पोहोचायला होईल. सकाळी साडेसातच्या सुमाराला निघूनही बसने पावणे दोन - दोन तास जातात. अर्थात, ठाणे शहरातल्या शहरात सायकल वापरायला काहीच हरकत नाहिये. रिस्पॉन्स उत्तम मिळाला तर जास्त हब्ज करतील. माझ्या काही मैत्रिणी वापरत आहेत ह्या सायकली.

कार्बन एमिशन पूर्ण आणि ताबडतोब थांबवणं practically शक्य नाही पण कमीतकमी कसं करता येईल ते पाहायलाच हवं. ह्यावर हिरिरीने बोलणारे किती जण ऑफिस, घर व वाहनात AC avoid करत आहेत? मी वाहन जाणूनबुजून घेतले नाही. public transport or pooling. घरी एकच AC लावून घेतला आहे अगदी AC नसेल तर जीव जाणार्‍या पाहुण्यांसाठी. मी स्वतः भर उन्हाळ्यातही थोडावेळही AC लावत नाही नैसर्गिक वातावरणाला आपलं शरील जुळवून घेत असतं आणि त्याची सवय बिघडवून नये म्हणून. स्वतःचंच नुकसान करणारे भलते लाड नकोत. फ्रीज आज बेसिक गरज झाली आहे त्यामुळे तो आहे. मांसाहार करत नाही त्यामुळे निदान माझ्यासाठी त्या कारणाने होणारं कार्बन उत्सर्जन नाही. ऑफिसातही माझं काम अ‍ॅक्रोबॅट वगैरे वापरून जवळजवळ पेपरलेस केलं आहे. पुर्वीपेक्षा फक्त ५% पेपर वापरते.

माझी चेकलिस्ट:
१. घरात ac बसवला नाही.
२. शक्य तितक्या वेळा चालत जातो, जवळपास जायचं असेल तर. एरवी बस किंवा कारपुल, bikepool करते.
3. मांसाहार कधीच केला नाही, करणार नाही
4. नेहमी जवळ कापडी पिशवी बाळगते, प्लास्टिक carrybag घेण्यास नकार देते
५. कचऱ्याचे वर्गीकरण करते. पण त्याचा फायदा होत नाही. Socity शेवटी एकत्र करूनच कचऱ्याच्या गाडीत देते असं पाहिलंय. कंपोस्ट वगैरे करता येईल, पण सध्या मला त्यासाठी वेळ काढता येणं कठीण आहे
6.घरात 4-5झाडे लावली आहेत, कुंडीमध्ये
आणखी इतर जागी झाडे लावण्याची आणि जगवण्याची इच्छा आहे, बघू कधी जमतंय
7. सगळी काम paperless आहेत. Soft copy जिंदाबाद. Govt ची कागदपत्रे सोडल्यास
8. Purifier मधलं वाया जाणार पाणी गोळा करून भांडी घासायला वापरण्यासाठी ठेवते
9. Single use plastic चा वापर बंद कसा करता येईल ह्यावर विचार सुरू आहे, कोणी काहीं सुचवले तर स्वागत आहे

माझे झाडं वर पहिल्या पासूनच प्रेम आहे.
मी जेव्हा 9th, होतो तेव्हा मी माझ्या शेताच्या बांधावर 5 आंब्याची झाडे लावली होती .
उन्हाळा मध्ये सायकल वरून पाणी आणून त्यांना घालून त्यांना मोठे केलं त्यांची खूप काळजी घेतली .
आता त्या झाडांचे डेरेदार वृक्ष मध्ये रूपांतर झाले आहे .
जेव्हा मी गावी जातो तेव्हा त्यांचा सहवासात खूप वेळ घालवतो आनंद मिळतो .
आता तीच शेती बागायती झाली सावली मुळे पीक धोक्यात येतात पण त्यांना मी कधीच कुऱ्हाड लावणार नाही .
मुंबई मध्ये सर्व प्रवास ट्रेन चा असतो त्या मुळे माझ्या करून प्रदूषण होण्याचं प्रश्न नाही .
Ac चा वापर खूप कमी करतो .
थोड्या अंतरावर जायला गाडीचा वापर न करता चालणे मला खूप आवडते

अश्विनी के, किल्ली, राजेश १८८ खूप छान. प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली तरच काहितरी बदल होणे शक्य आहे.

<पुण्यात बरेच लोक मेलेत कालच्या पावसात. ढगफुटी>
चिडकू, निसर्गाचा समतोल बिघडतोय हे खरे असले तरी लोकांना सूचना देऊनही पूररेषेत राहणे हेही चुकीचे आहे.

ग्रेटा अन तिची चळवळ खरच ग्रेट आहे. आपण आपल्या मुलांसाठीतरी काही कराया हवंय हे जाणावून येतंय.

मी माझ्यावतीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग रोज ऑफिसला जाण्यायेण्यासाठी करतो! सायकलन जाणं धोकादायक असल्याने, तो पर्याय नाही Wink

बाकी अजून काही पर्याय असतील तर सुचवा!

बाकी लिफ्टचा वापर कमी केलाय त्यांच्यापान वाचतच असेल काहीतरी!

>>कार्बन एमिशन पूर्ण आणि ताबडतोब थांबवणं practically शक्य नाही पण कमीतकमी कसं करता येईल ते पाहायलाच हवं. <<
अ‍ॅबसोलुटली. आणि हे करताना लोकांना दैनंदिन जीवनात अगदि रॅडिकल तडजोडी करु लागु नयेत या दृष्टिने अनेक प्रयत्न चालु आहेत, काहि तर पुर्णत्वास आलेले आहेत. आणि हे केवळ नविन तंत्रज्ञान्/संशोधनाने साध्य झालं/होत आहे. अमेरिकेतच नुक्लियर पावर जनरेशन मध्ये इतकि प्रगती झालेली आहे कि नविन नुक्लियर पावर प्लँट ट्रडिशनल पावर प्लँटपेक्षा शतपटिने सुरक्षित असणार आहेत. शिवाय या प्लँट्स करता लागणारं नुक्लियर वेस्ट इतक्या प्रमाणात उपलब्ध आहे कि पुढची १०० वर्ष अमेरिकेला वीजेचा तुटवडा भासणार नाहि.

थोडक्यात मुद्दा काय, तर ग्लोबल वार्मिंगचा इशु कधीच अ‍ॅकनालेज झालेला आहे. याला राजकिय पाठिंबा मिळो अथवा ना मिळो, या प्रश्नाविषयी खरी आस्था/कळकळ असणारे लोक लिपसर्विस न करता फिजीबल सोलुशन शोधण्यात गुंतले आहेत. सुदैवाने त्यांना मिळालेलं यश आता दृष्टिपथात येत आहे...

या प्लँट्स करता लागणारं नुक्लियर वेस्ट इतक्या प्रमाणात उपलब्ध आहे कि पुढची १०० वर्ष अमेरिकेला वीजेचा तुटवडा भासणार नाहि. >> चांगली माहिती राज. यामुळे वीजेवरच्या गाड्या घेतल्या तरी विजेचा तुटवडा येऊ नये. भारतात येऊ का शकेल अडचण?

<प्रश्नाकडे गांभीर्याने बघणारी राजकीय इच्छाशक्ती आज अस्तित्वात नाही. त्यामुळे आपले प्रयत्न फार तोकडे पडत आहेत.>

भारतात घरोघर LPGच domestic इंधन म्हणून वापरला जावा ह्यासाठी गेली काही वर्षं भरपूर प्रयास चालू आहेत आणि ते बऱ्यापैकी यशस्वीही होत आहेत. Low carbon fuel असल्यामुळे LPG चे carbon footprints लाकूडफाटा किंवा इतर तेलस्वरूप इंधनांपेक्षा खूप कमी आहेत. LPG चा commercial वापर देखील वाढवण्यावर भर द्यायला हवा.

वाटपासाठी किंवा सर्व्हेसाठी ठाणे / पालघर जिल्ह्याच्या आदिवासी भागात फिरताना आढळून आलं की ज्या पाड्यांवर अजिबात वीज नव्हती तिथे पाड्यातून जाणाऱ्या मातीच्या रस्त्याच्या कडेला सरकारकडून सोलर पॅनेलचे खांब लावले गेले आहेत. त्यातून गेल्यावर्षीपर्यंत घरटी एक दिव्याचं कनेक्शन दिलं गेलं होतं. ह्या वर्षी कनेक्शन वाढवली आहेत का ह्याची चौकशी करायचे राहून गेले. सौरऊर्जा शक्य तिथे वापरली गेल्यास वीजनिर्मितीसाठी लागणारा इंधन वापर कमी करता येईल.

मला तर भारतातच सामान्य माणूस अमेरिकन काउंटरपार्ट च्या तुलनेत अतिशय सजग वाटतो निदान पांढरपेशा/शहरी तरी. (ग्रामिण भागातील तसेच पांढरपेशा नसलेले लोकही सजग असतील पण माझे निरीक्षण कमी पडते.)
अमेरिकेत तरी सामान्य माणसाला गाड्या उडविण्यात, भारंभार वस्तू घेउन कचरा व स्वतःची कार्बन फुट प्रिंट वाढविण्यात काही चूक आहे असे वाटताना दिसत नाही.
भारतात वृक्ष लागवड होते, फोरम्सवरती चर्चा घडतात. एकंदरच सामान्य माणसांत निसर्गरक्षण करण्याबद्दल किमान गुन्हेगारीची भावना, चाड दिसून येते. काही जण ते गांडूळ खत का कंपोस्ट खत वगैरेही करत असतात.
____________
पाश्चात्य लोक फक्त भारत, चायना कडे बोट दाखवताना दिसतात, गायींना मारण्यास बंदी कशी चूकीची आहे आणि त्यामुळे पर्यावरणास कशी हानी होते वगैरे लेख वाचलेले आहेत. लोकसंख्या हा तर यांच्या फिंगर पॉइन्टिंगकरता आवडीचा विषय आहे. एकंदर स्वतःच्या डोळ्यातील मुसळ सोडून दुसर्‍याच्या ( विकसनशील देश) डोळ्यातील कुसळ शोधणे. चक्क बुलिंग वाटतं मला ते.

<तर ग्लोबल वार्मिंगचा इशु कधीच अ‍ॅकनालेज झालेला आहे. याला राजकिय पाठिंबा मिळो अथवा ना मिळो, या प्रश्नाविषयी खरी आस्था/कळकळ असणारे लोक लिपसर्विस न करता फिजीबल सोलुशन शोधण्यात गुंतले आहेत. सुदैवाने त्यांना मिळालेलं यश आता दृष्टिपथात येत आहे.>
राज, अगदी खरंय.

<भारतात घरोघर LPGच domestic इंधन म्हणून वापरला जावा ह्यासाठी गेली काही वर्षं भरपूर प्रयास चालू आहेत आणि ते बऱ्यापैकी यशस्वीही होत आहेत. Low carbon fuel असल्यामुळे LPG चे carbon footprints लाकूडफाटा किंवा इतर तेलस्वरूप इंधनांपेक्षा खूप कमी आहेत. LPG चा commercial वापर देखील वाढवण्यावर भर द्यायला हवा.>
अश्विनी के, कदाचित सरकारच्या उज्ज्वला योजनेचा अंतस्थ हेतू हाच असावा.

<पाश्चात्य लोक फक्त भारत, चायना कडे बोट दाखवताना दिसतात, गायींना मारण्यास बंदी कशी चूकीची आहे आणि त्यामुळे पर्यावरणास कशी हानी होते वगैरे लेख वाचलेले आहेत. लोकसंख्या हा तर यांच्या फिंगर पॉइन्टिंगकरता आवडीचा विषय आहे. एकंदर स्वतःच्या डोळ्यातील मुसळ सोडून दुसर्‍याच्या ( विकसनशील देश) डोळ्यातील कुसळ शोधणे. चक्क बुलिंग वाटतं मला ते.>

सामो....अगदी

Pages