फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गालफडांबाबत जे लिहीलेय ते दिक्षीत सर जे म्हणतात त्यावर आधारीत आहे. >> तुम्ही दिक्षितांचा हवाला देता तेव्हा त्यांच्या अभ्यासाचे दाखले देणे तुम्हाला बंधनकारक नसले तरी जरूरी आणि कर्तव्यासारखे आहे. गालफडं बसण्याबाबत आणि नैराश्य येण्याबाबतीत दाखले देणार का जे तुम्हालाही ऊपयोगीच पडतील. नुसते दिक्षित म्हणत आहेत ला काही अर्थ नाही.

तुम्ही तुमची मते मांडा की. >> माझी मते मी मांडलीच आहेत. क्लेम तुम्ही करता आहात तर पुरावे/दाखलेही तुम्हालाच द्यावे लागतील ना.

क्षितांची स्टेटमेंट्स इथे तुम्ही अ‍ॅडव्होकेट करत आहात का की बातमीदाराच्या भुमिकेत आहात की त्यांचे दूत म्हणून इथे लिहित आहात हे लै कन्फुझिंग आहे. >> हेला +१
तुम्ही ह्या डाएट प्लॅनबद्दलच्या ज्ञानवर्धनासाठी (रिसर्च, माहिती जमवणे) लिहित आहात की त्याच्या ज्ञानप्रसारासाठी (मार्केटिंग) तेच मागच्या शंभर प्रतिसादातून स्पष्टं होत नाहीये.

माझ्या एका जवळच्या मित्राचा मुलगा आहे. घरात सगळेच खवय्ये. गोड पदार्थ म्हणजे घराचा जीव की प्राण. मधून मधून तोंडात टाकायला घरात बरेच पदार्थ तयार असायचे. त्यातून मुलाची आई सुग्रण. या मुलाने एम.एस्सी. व एक कोर्स केला व २४ व्या वर्षी नोकरीला लागला. तेव्हा त्याचे वजन ९० च्या पुढे गेलेले होते. व्यायामाचा अभाव व झोप खूप प्रिय. उंची ५'४" म्हणजे ६० किलो हे योग्य वजन. मुलगा सुस्वभावी. गोरापान व देखणा. त्यामुळे सगळ्यांना त्याच्या वाढत्या वजनाची काळजी वाटायची.

नोकरी सुरू झाली व त्याचे वजन कमी व्हायला लागले. सात महिन्यात १८ किलो वजन कमी झाले. डाएट करतो आहेस का? व्यायाम करतो आहेस का? अस आम्ही परिचीत विचारायचो. पण तो तसे काही करत नव्हता. वजन अजूनही १०-१२ किलो जास्तच असल्याने आम्हालाही काळजी वाटत नव्हती तर जे होतय ते चांगलेच होतय असेच वाटत राहिले होते.

मी जेव्हा माझ्या परिचितांना डॉ. दिक्षीतांच्या व्हिडिओबद्दल सांगायला सुरवात केली तेव्हा या मुलानेही तो आवर्जून पाहिला व लागलीच फोन करून तो मला भेटायला आला व म्हणाला,

"काका, डॉ. दिक्षीत जे म्हणताहेत ते खरे असले पाहिजे. मला वारंवार खायची सवय होती. भूकच लागायची हो. पण नोकरी सुरू झाली आणि मी आता फक्त ३ वेळाच खातोय. सकाळी नाश्ता दुपारी जेवण व रात्री घरी यायला इतका उशीर होतो की लागलीच जेवायलाच बसायला लागते. मी जर व्यायाम केला असता तर वजन आणखीनच कमी झाले असते. पण व्यायाम करायला वेळच नव्हता हो."

Anecdotal evidence is not research data.

Happy This smiley is connected to a special word on maayboli.

बाकी, डॉक्टरांना चुकीचे शिकवले गेले आहे, हे इतिहास चुकीचा आहे च्या चालीवरचे भोंगळ विधान वाचून करमणूक झाली.

< मुलगा सुस्वभावी. गोरापान व देखणा. त्यामुळे सगळ्यांना त्याच्या वाढत्या वजनाची काळजी वाटायची.>

बऽऽऽऽरं.

मुलगा सुस्वभावी. गोरापान व देखणा. त्यामुळे सगळ्यांना त्याच्या वाढत्या वजनाची काळजी वाटायची. >> Lol
लग्नाळू मुलामुलींसाठी टार्गेट मार्केटींग म्हणायचे का हे.

किती वितन्डवाद प्रत्येक गोष्टीत!
ऐ़का. पटले तर करा नाहीतर सोडून द्या.
श न्का असे ल तर सगळे चे क करा before after, every 3 months.
Let us know of contradictions, if u find them

नानबा,
अहो अस काय करताय? ते त्यांचं काम करताहेत. करु द्या त्यांना.

जो एकच वेळा जेवतो तो योगी,
जो दोन वेळा जेवतो तो भोगी,
आणि जो दोन पेक्षा जास्त वेळा जेवतो तो रोगी.

यावर साजेसे अनुभव शेअर करावे.

माझ्या माहितीतल्या बऱ्याच लोकांनी दीक्षित पद्धतीचा विपर्यास केला आहे.
हे डाएट टाईप २ डायबेटिक लोकांमध्ये, तेही साठीच्या पुढच्या, अत्यंत लोकप्रिय आहे. आणि यातील काही लोक ५५ मिनटात "काहीही खा" याचा अर्थ अगदीच लिटरली घेताना दिसतात. जसे की डायबेटिक असूनही इटिंग विंडोमध्ये आंबे, गोड किंवा भरपूर भात, भाकरी पोळ्या असा आहार घेणे.
इतर डाएट्स मध्ये जे सॅलड/ फायबर खाणे कंपलसरी असते त्याला पूर्णपणे काट मारणे. इतर आहार पद्धतीत प्रोटीनवर जसा भर दिला जातो तसा तो न ठेवणे.

आणि असे टाईप २ वाले लोक रोजच्या रोज फास्टिंग आणि पीपी बघतातच असे नाही. घरी ग्लुकोमीटर असतो पण तो वापरला जाईलच असे नाही. ओळखीतल्या काही लोकांनी मेटफॉर्मिनसुद्धा मनानेच बंद केल्याचेही कबूल केले आहे.
वजन कमी करणे हा एकच उद्देश असला (आणि इतर बाबतीत निरोगी असाल) तर असे खपून जाऊ शकते. पण तिथेही आहार संतुलित असावा खास करून प्रोटीनसाठी. पण साखरेवर नियंत्रणासाठी ही पद्धत वापरात असेल तर ज्यांनी साखर वाढते (पोळी, भाकरी, गोड पदार्थ, भात) असे पदार्थ कमीच खाल्ले पाहिजेत. आणि तसे नसेल तर रोज साखर मोजली पाहिजे. कारण वजन जास्ती असण्यापेक्षा सतत रक्तातली साखर जास्ती असणे अधिक धोक्याचे आहे. त्यामुळे तुमची हृदयविकाराची आणि स्ट्रोकची रिस्कदेखील वाढत असते.

मी या पोस्टच्या लेखकांना उद्देशून हे लिहीत नसून टाईप २ वाले जे दीक्षित पद्धती फॉलो करतात त्यांना उद्देशून लिहिते आहे. कृपया गैरसमज करून घेऊ नये.

सई केसकर,
१०० टक्के सहमत.
"काहीही खा" हे बी २ टाईप मधुमेही लोकांसाठी अजिबात नाही.
ही जीवनशैली स्विकारताना लोक त्यांच्या मनाने काय गोंधळ घालतील, चुकीचा अर्थ कसा लावतील हे सांगता येत नाही. चर्चेच्या निमित्ताने अशा सर्व गोष्टी या धाग्यावर उजेडात आणल्या जाऊन सर्वांचे योग्य ते प्रबोधन होईल हा हेतू हळूहळू साध्य होतोय असे वाटतेय. _/\_

मी परत एकदा ह्या लेखाच्या शेवटी दिलेल्या दोन गोष्टींवर सर्वांचे आवर्जून लक्ष वेधत आहे.

१. मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

२. एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

शेवटचे वाक्य परत लिहितोय.
परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

सई केसकर,
धन्यवाद.
तुमच्याकडून अशाच मार्गदर्शनाची अपेक्षा होती.
_/\_

ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. >>>>>

HbA1C ही चाचणी मागील तीन महिन्यातील सरासरी रक्तशर्करा प्रमाण दर्शविते.

पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.
<<
तज्ञांनी काही लिहिले की खाली दात वेंगाडणारी स्मायली टाकणे, वा "डॉक्टरांना चुकीचे शिकवले गेले आहे" असले डायलॉग मारणे, हे साधकाचे लक्षण आहे, की बाधक आहे?

अरे हे काय शामराव? वरच तर लिहिले तुम्ही की तज्ञांकडे जायला लागणार नाही..? आणी आता हे?
बेशरमपणाची हद्द झाली की स्मायल्या टाकून टाकून.

{२. तज्ञाकडे जायला लागणार नाही.
.
.
.
१.मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.}

डाएटसाठी तज्ञाची गरज नाही म्हणून ही बेस्ट पद्धत.
पण चर्चेसाठी तज्ञ हवा?

वर मी तज्ञ नाही हा डिस्क्लेमर कशाला?

डॉ.नी अन्य पद्धतीतले दोष सांगितले. त्याचं स्पष्टीकरण विचालरलं, तर तुम्ही डॉक्टरांच्या पद्धतीतले दोष शोधा.

एकदाच ऐकून भाषणातले सगळे मुद्दे लक्षात राहणे शक्य नसते. परत दोन तास देणे कंटाळवाणे होऊ शकते किंवा नंतर बघू अस म्हणत लांबणीवर पडते.

यासाठी एक लिंक देत आहे. तो VDO आहे. डॉ. दिक्षीतांनीच सारांश रुपात सगळे सांगितले आहे. नुसते ऐकूनही उजळणी करता येऊ शकेल. तसेच डॉक्टरांनी बरेच तक्ते बनवलेले असून त्यातले दोन महत्वाचे दाखवले जातात. त्यांचे screenshot घेऊन ठेवल्यास सर्व संदर्भ अगदी हाताशी राहू शकतील. कोणालाही थोडक्यात सांगायचे असल्यास खूप उपयोगाला येतात.

हा VDO फक्त ६ मिनीटे २ सेकंदाचा आहे.

Pages