फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कोणत्या शब्दात मांडले की प्रामाणिक वाटते इथे समजत नाही. पण स्वानुभवातुन सांगावे वाटते खूप उपयुक्त , परिणामकारक पद्धत आहे वजन कमी करण्यासाठी तसेच मधुमेहमुक्त राहण्यासाठी .

मी पण हा diet plan चार महिन्यापासून करत आहे. माझ्या डायबेटीस गोळ्या पूर्ण बंद झाल्या आहेत. वजन कमी झाले आहे. आता कुणी माझ्या अती आवडिचे पदार्थ पुढे केले तरी मी नाही म्हणू शकते. इतका मनावर ताबा आला आहे.दिक्षित पोट फुटे पर्यंत खा असे कधीच सांगत नाहीत.

आपल्याला पटले तर करावेच. पण दुसऱ्या वर टोकाला जाऊन अन्धभक्तीचा झेंडा घेऊन बेछूट व सिम्प्लिफाईड विधाने करू नये.

मलाही या पद्धतीचा फायदा झाला आहे. अवांतर अनावश्यक खाण्यावर ताबा आला आहे. गेल्या चार महिन्यात मी अगणीत वेळेला, बिस्किट, वाढदिवासाचे केक, चॉकलेट्स, पेढे, विमानातली सँडविचेस, फ्रूटी सारखी पेय नाकारली आहेत. नाही म्हणण अशक्य असेल तर ठेउन घेतो आणि जेवताना खातो. त्याचा परिणाम वजनावर दिसत आहे. एक साईझ कमी झाला आहे. Happy

या पद्धतीच्या प्रचारामधे दिक्षितांचा काय फायदा मला अजून समजले नाही. ते हे सर्व नि:स्पृहपणे करत आहेत अशीच माझी समजूत आहे. यावर कोणी माहिती असल्यास प्रकाश टाकेल काय?

दीक्षित मेथड ही इंटरमिटंट फास्टिंगच्या भाषेत १६:८ मेथड होते.
म्हणजे १६ तास उपास आणि ८ तासात २ वेळा जेवण.
ते रात्री ८ आणि दुपारी १२ अशा वेळा देतात.
म्हणजेच १६ तास फास्टिंग होते.

माझ्या वरच्या धाग्यांमध्ये वेगवेगळ्या लिंक्स आहेतच. मी आहार तज्ञ नाही. माझं फक्त या विषयावर भरपूर वाचन झालेले आहे. हे सगळे वाचन या विषयावर काम करणाऱ्या डॉक्टरांनी लिहिले आहे. यातील काही नावे
१. रॉबर्ट लास्टिग (फॅट चान्स)
२. स्टीवन फीनी (लो कार्बोहायड्रेट लिविंग)
३. पीटर आटिया (टेड)
४. जॉन युडकीन (प्युअर व्हाईट अँड डेडली)

थोडक्यात सांगायचं झालं तर इन्शुलिन शरीरात स्रवत असेपर्यंत साठवलेले फॅट वापरले जात नाही. कारण इन्शुलिनच्या कामांपैकी एक फॅट स्टोर करणे आहे.
आणि विविध प्रकारच्या स्बस्ट्रेटचा अभ्यास केला असता सगळ्यात जास्त प्रमाणात इन्सुलिन हे कार्ब्स सेवनामुळे तयार होते. त्या खालोखाल प्रोटीन आणि सगळ्यात कमी फॅटमुळे.

मग इन्सुलिनला आटोक्यात ठेवण्याचे ३ मार्ग आहेत.
१. दिवसातून ३ वेळा किंवा अधिक जेवणे (पण प्रत्येक जेवणात मिताहारी असणे). जेणेकरून तुमच्या खाण्यामुळे कमी इन्सुलिन स्रवले. पण यातही झोपेत फास्टिंग होते. आणि असे डाएट असेल तेव्हासुद्धा डाएटिशियन ७ च्या आत जेवायचा सल्ला देतात. त्यामुळे कमीत कमी १२ तास फास्टिंग होते.
२. इन्सुलिन रिलीज होईल असे पदार्थच खायचे नाहीत किंवा कमी खायचे. यामध्ये मॉडरेट लो कार्ब्स ते कीटोजेनीक असे सगळे खाण्याचे प्रकार येतात. तुम्ही दिवसाला १०० ग्रॅम च्या आत कार्ब्स ठेवले तर तुम्ही लो कार्ब्स झोन मध्ये येता (https://www.dietdoctor.com/low-carb/20-50-how-much). काहीजण ५० ग्रॅमच्या आत असतात आणि काही २०. २० ग्रॅमच्या आत "न्यूट्रीशनल किटोसिस" सुरु होतो. म्हणजे दिवसाला २० ग्रॅमच्या आत कार्ब्सचे सेवन असेल तर शरीर सतत फॅटच्या इंधनावरच चालते. फॅट ब्रेकडाउन केले कि त्याचे किटोन्स होतात. पण २० ग्रॅमच्या आत कार्ब्स खाणारे लोक प्रोटिनही आटोक्यात ठेवून (कारण प्रोटीनने सुद्धा इन्सुलिन स्रवते) ८०% फॅट खातात. हीसुद्धा एक लाइफस्टाइल आहे. लो कार्ब्स खाऊन तुम्ही ३ वेळा जेऊ शकता. फक्त कार्ब्स आणि प्रोटीनचे अचूक मोजमाप करावे लागते.
३. बऱ्याच वेळ काहीही न खाणे (१६ तासांच्या पेक्षा जास्त). इन्सुलिनने त्याचे काम केले (म्हणजे अतिरिक्त साखर आधी ग्लायकोजेन आणि मग मेद पेशींकडे मेद म्हणून पाठवली) की त्याची बेसलाईन येते. म्हणजे पुन्हा खाईपर्यंत इन्सुलिन रिलीज होत नाही. या काळात शरीराला ऊर्जेसाठी आधी ग्लायकोजेन वापरावे लागते (हे लिव्हरमध्ये तयार करून ठेवलेले रेडी टु युज इंधन असते). लिव्हर रिकामे झाले की मग मेद पेशींमधून फॅट घेऊन शरीर चालू राहते. हे असे शरीर तुम्ही पुन्हा खाईपर्यंत व्यवस्थित चालू राहते. पण तेव्हा इंधनाचा फॉर्म ग्लुकोज नसून केटोन्स असतो. याचाच अर्थ, कीटोजेनीक स्टेट येण्यासाठी फास्टिंग सुद्धा करता येते. तुम्ही पुन्हा ग्लुकोज खाईपर्यंत किटोन्स वापरले जातात. या सगळ्याला १४ ते १६ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे १६ तास फास्टिंग केले की रोज थोडे थोडे मेद वापरले जाते.

यामध्ये ओघानी हे आलेच की २ जेवणे तुम्ही जितकी हेल्दी घ्याल तितका फायदा अधिक होतो. कारण तुम्ही खूप कार्ब्स खाल्ले तर लिव्हरमध्ये ग्लायकोजेन गच्च भरले जाणार आणि ते जाळून किटोन्स पर्यंत यायला तुम्हाला अधिक वेळ लागणार. म्हणून कमीत कमी पोळी, भात, भरपूर कोशिंबीर आणि बेताचा मांसाहार असे जेवण ठेवल्यास कमी फास्टिंगसुद्धा चांगले रिझल्ट्स देऊ शकते.

मग इन्सुलिनला आटोक्यात ठेवण्याचे ३ मार्ग आहेत.
१. दिवसातून ३ वेळा किंवा अधिक जेवणे (पण प्रत्येक जेवणात मिताहारी असणे). >>> दीक्षितांच्या म्हणण्याप्रमाणे हा इन्सुलिनला आटोक्यात ठेवण्याचा मार्ग नाही, उलट जास्ती वेळा खाल्याने इन्सुलिनरेसिस्टनन्स वाढत जातो व डायबेटिस होतो.

>>>दीक्षितांच्या म्हणण्याप्रमाणे हा इन्सुलिनला आटोक्यात ठेवण्याचा मार्ग नाही, उलट जास्ती वेळा खाल्याने इन्सुलिनरेसिस्टनन्स वाढत जातो व डायबेटिस होतो.

जेव्हा आपण "डाएट वर" जातो, तेव्हा जे खायला देतात त्याने इन्सुलिन कमी रिलीज होते. ऋजुता दिवेकरचे प्लॅन बघा. साधारण असे असतात.
१. उठल्या उठल्या -- १ छोटे केळे
२. ब्रेफा -- अर्धी वाटी व्हेज पोहे (इथे अर्धीच वाटी खाणे हा चॅलेंज असतो)
३. १० वाजता -- १ स्लाइस चीज (पुन्हा इथे ओव्हरीटिंग होण्याची शक्यता जास्त असते)/ १ ग्लास ताक (ताक, चीज लोकार्ब्स आहे)
४. १ वाजता -- १ फुलका भाजी, पनीर/ एग (पुन्हा १च फुलका खाणे अवघड जाते)
५. ३ वाजता -- मूठभर फुटाणे +ग्रीन टी
६. ५ वाजता -- क्लिअर सूप (१ वाटी)
७. ७ वाजता -- अर्धी वाटी भात आणि फिशकरी (अर्धी वाटी भात खाणे चॅलेंजिंग असते परत ओव्हर इटिंग होते.

वरील मेन्यू तुम्ही आयुष्यभर फॉलो करू शकत नाही. कारण यात फोकस कॅलरीवर आहे. आणि त्यामुळे सगळेच खूप कमी प्रमाणात खावे लागते. असे डाएट प्लॅन्स बऱ्याच वेळी आपली मिनिमम कॅलरीचा निकष (८०० पेक्षा अधिक) पार करू शकत नाहीत. त्यामुळे असे खाणे नंतर अंसस्टेनेबल होते. किंवा, प्रत्येक जेवणात थोडे थोडे जास्त खाल्ल्याने डाएटचा उपयोग होत नाही. आणि पोट भरल्याचे फीलिंग येत नाही.

दीक्षितांच्या एका विडिओमधे त्यांनी नाव न घेता दिवेकर यांच्या प्लॅन वर टिका केली आहे. एक म्हणजे तुम्ही म्हणल्याप्रमाणे दिवेकरांचा प्लॅन सस्टेनेबल नाही. आणि दुसर म्हणजे कितीही थोड खाल्ल तरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इन्सुलिन स्त्रवत जात व रेझिस्टन्स वाढत जातो.

दीक्षित पद्धती आचरण्यात आणल्यावर माझी रक्तातील साखर कमी झालेली आहे हे सत्य आहे.

मी कुणाचा भक्त नाही की प्रचारक नाही. पण सत्य जाणून घ्यायला आवडेल. हे तर शास्त्र आहे. खर किंवा खोटे. साखर आटोक्यात येते का? येत असली तर का?.

विक्रमसिंह. सत्य हेच आहे की इनुलिन आणि साखरेचे नाते आहे असे विज्ञान आता तरी मानत आहे. इन्सुलिन रझिस्टंस ही एक अवस्था आहेच. आणि फास्टींग ने इन्सुलिन सीक्रीशन कंट्रोल होतं. फास्टींगमध्ये अतिरिक्त कार्ब्स जात नसल्याने शुगर कंट्रोल मध्ये राहते, बाकी बर्‍याच गुंतागुंतीच्या बायोकेमिकल रिअ‍ॅक्शन्स आहेत. पण थोडक्यात सांगायचे तर हे विज्ञानच आहे. त्यात कोणतीही बुवाबाजी नाही. महत्त्वाचे म्हणजे हा दिक्षितांचा एकट्याचा शोध नाही (तसा त्यांचा दावासुद्धा नाही पण मेसेंजरलाच गॉड म्हणायचा मनुष्यस्वभाव आहे) जगात अनेक शास्त्रज्ञ वैज्ञानिक आणि डॉक्टर्स ह्यावर संशोधन करत आहेतच. फास्टींगशी संबंधीत ऑटोफॅजी ह्या संशोधनाला तर चक्क नोबेल मिळाले आहे. वर जे भागवत सांगत होते की ह्या पद्धतीमुळे सुरकूत्या येत नाहीत वगैरे ते ऑटोफॅजी ह्या अवस्थेमुळे शक्य होतं. शरीराला बाहेरुन अन्न मिळण्याच्या शक्यता संपल्यावर ऑटोफॅजी सुरु होते व यात शरीराची यंत्रणा मेलेल्या पेशी, विषारी घटक व इतर बिनकामाचे घटक यांचा वापर करुन शक्ती मिळवते.

फास्टींगचे अनेक प्रकार आहेत. ४० दिवसांचे वॉटर फास्टींग आहे. (आपल्याकडे जैन लोकही अशा प्रकारचे उपवास करण्यात तरबेज आहेत.) ७ दिवसांचे वॉटर फास्टींग आहे. आठवड्यातून दोन दिवस पूर्ण उपाशी आणि इतर दिवशी नेहमीसारखे तीन वेळा जेवण असाही प्रकार आहे. १०-१४, १२-१२, १६-८, १८-६ २०-४ आणि वन-मील-अ-डे अशा फास्टींगच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. दिक्षितांची पद्धत त्यातल्या "१०-१४ > टू मील अ डे" मध्ये येते. (सईंनी १६-८ म्हटलंय)

ही पद्धत शास्त्रीयच आहे. परंतु परंतु परंतु. कोणत्याही लोकशाही पद्धतीचे होते तसे ह्याही पद्धतीचे लोक आपल्या पर्सनल लेवलवर सिम्प्लिफिकेशन करुन मनाप्रमाणे फॉलो करायला लागतात. जसे देवासाठी उपास करतात ते उपास पाचशे हजार वर्षांआधी जसे कडक होते तसे आजकाल कोणी करत नाही, उपासाला काय चालतं काय नाही ह्याच्या प्रत्येकाच्या मनाप्रमाणे याद्या आहेत. म्हणजे शुद्ध स्वरुपातली ती पद्धत राहीली नाही. तसेच दिक्षितांच्या पद्धतीचे होऊ नये इतकेच माझे म्हणणे आहे.

इंटरमिटंट फास्टींग इज नोट रॉकेट सायन्स. साधी सोपी जीवनपद्धत आहे. परंतु तुमच्या माझ्या सारख्या एज्युकेटेट लोकांना अधिक माहिती घेऊन शहानिशा करुन गोष्टी अंगिकारायची सवय असते. ती व्हॉट्सप हाताळणार्‍या प्रत्येकाला असतेच असे नाही. त्यामुळे असे कोणतेही उपचार व त्याबद्दलचे अनुभव शेअर करतांना जरा सावध असावे इतकेच

मला ह्या पद्ध्तीमध्ये काही लॉन्ग टर्म दुष्परिणाम आहेत का हे हवे आहे. कोणी सांगू शकेल का?

मी सरांना विचारू शकतेच पण मला तिसर्‍या माणसाच्या नजरेतून हवे आहे.

बहुतेक डाएट प्लॅन्सचा एक दीर्घकाळ दुष्परिणाम म्हणजे, आपण काही sacrifice करत आहोत, आपण कशापासून तरी वंचित राहत आहोत ही भावना मनात बळावणे. ही भावना वेळीच आटोक्यात आली नाहीतर वर्षो न वर्षे / दशके सुद्धा टिकते, आणि मग दिसून येतो, आता बस झालं, "now I deserve it" attitude आणि मग लोक भोपळ्या सारखे सुटतात. बरेच सिने नट नटी याचे उदाहरण आहेत.

डाएट प्लॅन व्यवस्थित समजून तो नक्की आपल्याला सूट होतो की नाही, हवी असलेली पोषके मिळणार की नाहीत याची सर्वतोपरी खात्री करून, आपण तो सुरू करताना , केल्यावर sacrifice करण्याची भावना तर निर्माण होत नाहीय ना याची खात्री करून घ्यावी.

बाकी त्या डाएट मध्ये तुम्ही नक्की काय काय आणि किती खात आहात यावरून आहारतज्ज्ञ दुष्परिणाम आहेत की नाही सांगू शकतील, आहारात योग्य बदल करू शकतील.

मला ह्या पद्ध्तीमध्ये काही लॉन्ग टर्म दुष्परिणाम आहेत का हे हवे आहे. कोणी सांगू शकेल का?

- मानव यांच्याप्रमाणेच मीही म्हणेन की काय खाता किती खाता यावर दुष्परिणाम अवलंबुन आहेत.

ह्या पद्धतीबद्द्लच नाही तर जगातल्या कोणत्याही आहारपद्धतीमध्ये आवश्यक ते सर्व अन्नघटक योग्य त्या प्रमाणात शरीराला मिळाले नाहीत तरच दुष्परिणाम उद्भवतात. आदिवासींमध्ये कुपोषण, शहरी-गावातल्या स्त्रियांमध्ये वेगवेगळे आजार हे शरीराचे योग्य प्रकारे सर्व अन्नघटक मिळून पोषण झाले नसल्याने उद्भवतात.

हेला, मानव,

माझा आहार कार्ब्स सकटच आहे, मी माझ्या आहारात बदल केला नसुन केवळ आहाराच्या फ्रिक्वेन्सी आणि वेळात केला आहे. अर्थत ह्यामुळॅ बाष्कळ खादाडी कमी झालीये ही जमेची बाजू.

गोड पदार्थ, मांसाहार, कार्ब्स, कडधान्ये, भाज्या पुर्वीएवढ्याच घेते. एकादशी नि दुप्पट खाशी करत नाही.

दुष्परिणाम म्हणजे जेंव्हा (आणि जर कधी) म धुमेहाची औषधं घ्यावी लागली तर स्ट्रॉन्ग घ्यावी लागतील का? अशाप्रकारचे.

जाईजुई. ह्याच प्रकारच्या प्रश्नांसाठी व्यावसायिक तज्ञांकडून योग्य तो वैयक्तिक सल्ला घ्यायची गरज असते.
मी असे सुचवेन की आपण थेट डॉ. दिक्षितांनाच विचारा किंवा सेकंड ओपिनियन म्हणून डायबेटॉलॉजिस्ट/क्लिनिकल डायटीशियन्स यांना संपर्क करा. जालावर आपल्या कोणत्याही व्यक्तिगत माहितीशिवाय असे जनरल सल्ले देणे योग्य नाही.

हेला आणि सई स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.

मी दिवेकरांचे पुस्तक वाचले होते. एका डायेटिशियन कडे गेलो होतो, त्याही दिवेकरांसारखाच प्लॅन सांगायच्या. शिवाय त्यापूर्वी "Burn the fat feed the muscule " हे Tom Venuto नावाच्या जागतीक पातळीवरील शररीर सौष्ठव विजेत्याचे पुस्तक वाचले होते. सर्वांचा एकमुखी सल्ला. सतत २ किंवा जास्तीत जास्त ३ तासांच्या आत खा. Tom Venuto तर म्हणतो स्पर्धे आधी कितीतरी स्पर्धक हे इतक टोकाला नेतात की रात्री गजर लाऊन उठतात व खातात. या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे वजन व चरबी कमी करण्यासाठी सतत खाणे आवश्यक आहे.
दीक्षित पद्धत याच्या अगदी विरुद्ध आहे. दोन्ही बाजू खर्‍या वाटतात. म्हणून मला संभ्रम.
शेवटी कितीही सुशिक्षित असलो तरी योग्य मार्गाच्या शोधात असलेल मीही एक गुबगुबीत मेंढरूच. Happy

अवांतर : "Burn the fat feed the muscule " हे Tom Venuto हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे. पहिल प्रकरण goal setting वर आहे. ते तर अत्यंत उपयोगी आहे. केवळ त्यासाठी तरी वाचावे असे आवर्जून सांगावेसे वाटते. कुणाला पाहिजे असल्यास माझ्याकडे सॉफ्ट कॉपी आहे.

डॉ. जगन्नाथ दिक्षित यांचे याच विषयावर व्याख्यान आहे- ८ जुलै, सकाळी १० वाजता, टिळक स्मारक मंदिर, पुणे इथे. प्रवेश विनामूल्य आहे, पण प्रवेशिका आवश्यक आहेत. त्या अक्षरधारा बुक गॅलरी, बाजीराव रस्ता इथे मिळणार आहेत. ही जाहिरात आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आलेली आहे. इथे माहितीकरता दिली. पुण्यातले इच्छुक लोक जाऊ शकतील, म्हणून.

@ विक्रमसिंह

दर दोन तासांनी खाण्याने वजन कमी होत नाही हे विधान चुकीचे आहे असे माझे नम्र मत आहे.
दर दोन तासांनी "काय" खाल्ल्याने वजन कमी होते हा प्रश्न आहे.

ती प्रणाली उपयुक्त नाही हेदेखील बरोबर नाही. कारण दिवसातून ७-८ वेळा खाऊन वजन कमी केल्याचीही खूप उदाहरणे मिळतील.
पण ती प्रणाली केव्हा फसते? जेव्हा दर दोन तासांनी जे खाल्ले जाते ते वजन वाढीला कारणीभूत ठरते. यात व्हॉल्युम आणि कन्टेन्ट दोन्ही आहे.
२ चमचे दूध घातलेला १ कप पाण्याचा चहा आणि संबंध दुधामध्ये उकळला १ कप चहा यात व्हॉल्यूमचा फरक नाहीये पण कन्टेन्टचा आहे. दोन्ही चहा बिनसाखरेचे असले तरी. आणि जिथे १ फुलका खायला सांगितलं आहे तिथे अजून थोडा अजून थोडा असे करत त्याचे २ होणे हा व्हॉल्युमचा फरक आहे. व्हॉल्युम आणि कन्टेन्ट दोन्ही काटेकोरपणे पाळले तर वजन कमी होणे शक्य आहे.

दिवेकर बाई त्यांच्या ओपन लेक्चरमध्ये नेहमी डायबेटीस वाल्यांना आंबा खा, फणस खा वगैरे सांगताना दिसतात. आणि त्या फळांचा भारतीयपणा आणि लोकल असणे यावर भर देतात. पण कुठल्याही लेक्चर मध्ये निक्षून किती आंबा खावा हे सांगत नाहीत. "किती खायचा?" याला उत्तर, तुमचं शरीर तुम्हाला सांगेल किती खायचा, असे असते. पण त्या सगळ्या वेटलॉस प्रणालीचे यश हे कडकडीत "पोर्शन" कंट्रोल मध्येच आहे. रोज १ आंबा कुणीही खाऊ शकतं. पण आंबा सोडल्यास त्या जेवणात दुसरे काहीही घेतले नाही तरच. आपण आंबा कसा खातो? मँगो मिल्कशेक, आमरस पुरी (नंतर २ तासांची वामकुक्षी).
त्यामुळे सामान्य माणसांनी पोर्शन कंट्रोल आणि मील स्किपींग दोन्हींच्या मागचे लॉजिक समजून घेतले पाहिजे. आणि एक पद्धत अवलंबणार्यांनी दुसरी चूक आहे असे सिद्ध करायचा अट्टाहाच करू नये.

सई,

मी दिवेकर पद्धत चूक आहे असे मुळीच म्हणलेले नाही, किंवा फक्त दीक्षित पद्धत योग्य आहे असेही म्हणले नाही. तेवढा माझा वकूब नाही.

पण मला एकंदरीत समजलेले असे.
- दिवेकर किंवा वेनुटो पद्ध्तीत वजन कमी होते. पण १. अलवंबायला व टिकवायला अवघड असते. २. जी मंडळी डायबेटीस प्रोन असतात (अनुवंशीक वगैरे) त्यांच्या साठी यापद्धतीमुळे एन्सुलिन रेस्सिस्टन्स वाढण्याचा धोका निर्माण होउ शकतो.
- दीक्षित पद्धत माझ्यासाठी तरी सोपी ठरलेली आहे.

>>>जी मंडळी डायबेटीस प्रोन असतात (अनुवंशीक वगैरे) त्यांच्या साठी यापद्धतीमुळे एन्सुलिन रेस्सिस्टन्स वाढण्याचा धोका निर्माण होउ शकतो.

सहमत

डायबेटिक लोकांसाठी, खासकरून टाईप २ लोकांसाठी दीक्षित पद्धत उत्तम आहे.
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग असू शकतात.
पण डायबेटीस कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर लो कार्बोहायड्रेट डाएट आणि/किंवा इंटरमिटंट फास्टिंग जास्त उपयोगी आहे.

वरती काही लोकांनी याचे दुष्परिणाम आहेत का असे विचारले होते. मलाही हा प्रश्न पडला होता म्हणून मी माझ्यापुरत्या काही चाचण्या करून घेते
६ महिन्यातून एकदा एचबीए १ सी. (ग्लायकेटेड हिमोग्लोबिन मध्ये मागील ३ महिन्यांची सरासरी रक्तशर्करा दिसते. हा रेशो ५.७ च्या आत असल्यास आपण नॉन डायबेटिक आहोत. आणि त्या पुढे बॉर्डरलाईन आणि डायबेटिक (त्याचे आकडे मी विसरले).
वर्षातून एकदा: सीबीसी (अनेमिया साठी)
लिपिड प्रोफाइल
थायरॉईड
व्हिटॅमिन बी आणि डी.

माझा डाएट कॉम्प्लायन्स ज्या तिमाहीत उत्तम असतो त्या तिमाहीत माझा एचबी रेशो ४ च्या आत असतो. पण अधे मध्ये खंड पडला की पुन्हा पाचच्या वर जातो.
वैद्यकीय चाचण्यांमधून मी डायबेटिक आहे असे सिद्ध होत नाही. पण अधून मधून जेव्हा माझे डाएट बिघडते तेव्हा माझ्या फास्टिंग शुगरवरून मी डाएट केले नाही तर मी नक्कीच टाईप २ मध्ये जाणार हे दिसून येते. त्यामुळे मीदेखील फास्टिंगबद्दल कन्व्हिन्स्ड आहे.

दिक्षितांची पद्धत मधुमेही होण्याचे टाळणे व झाल्यास तो आटोक्यात ठेवणे यावर भर देते. त्यांचे टार्गेट मधुमेहापासून मुक्तता हे आहे. आणि 2 वेळा जेवणे व 45 मिनिटे चालणे आयुष्यभर करायचे आहे. टाइप 2 मधुमेही व तो होण्याची शक्यता असलेले लोक यांनी ही पद्धत वापरा हे ते आधीच स्पष्ट करतात. निरोगी लोकांनी वापरण्यास हरकत नाही पण काही विशिष्ट स्थितीत वापरू नका हे ते सांगतात. भविष्यात मधुमेही होऊ शकता का हे जाणण्यासाठी इन्सुलिन व hba1c चेक सांगतात. टाइप 1 मधुमेह असेल तर ही पद्धत वापरू नकाच हेही ते सांगतात.

दिवेकर यांचे टार्गेट जनरल वेट लॉस आहे. अमुक आजार असेल तर करू नका किंवा कराच वगैरे सल्ले त्या देत नाहीत.

मला व्यक्तिशः दर दोन तासांनी खाण्यापेक्षा फक्त दोनदा खाऊन बाकी तोंड बंद ठेवणे जास्त चांगले जमले. एक आठवड्यात भुकेच्या वेळा फिक्स झाल्या. या आधी भूक नसतानाही फक्त वेळ झाली किंवा कंटाळा आला किंवा समोर दिसले किंवा आवडते किंवा ग्रुपमध्ये मागवले म्हणून खाल्ले असे दिवसभर होत राही व त्यामुळे कडकडून भूक अशी लागतंच नसे.

दिक्षितांची पद्धत मधुमेही होण्याचे टाळणे व झाल्यास तो आटोक्यात ठेवणे यावर भर देते. त्यांचे टार्गेट मधुमेहापासून मुक्तता हे आहे>>>

मला वाटते "विनासायास वेटलॉस" हे डॉ. दिक्षीतांचे टार्गेट आहे. त्यांच्या पुस्तकाचेही तेच नाव आहे. मधुमेह होऊच नये हे त्यांना साधायचे आहे. म्हणून ते त्याला मघुमेह प्रतिबंध अशी संज्ञा वापरतात. स्थूलता टाळता आली तर बरेच आजार दूर ठेवता येतात असे त्यांचे म्हणणे असते.
http://www.akshardhara.com/imgupload/imgupload21april/DIXIT%20PROGRAM%20...

2 वेळा जेवणे व 45 मिनिटे चालणे आयुष्यभर करायचे आहे. टाइप 2 मधुमेही व तो होण्याची शक्यता असलेले लोक यांनी ही पद्धत वापरा हे ते आधीच स्पष्ट करतात. निरोगी लोकांनी वापरण्यास हरकत नाही पण काही विशिष्ट स्थितीत वापरू नका हे ते सांगतात. भविष्यात मधुमेही होऊ शकता का हे जाणण्यासाठी इन्सुलिन व hba1c चेक सांगतात. टाइप 1 मधुमेह असेल तर ही पद्धत वापरू नकाच हेही ते सांगतात. >>> + १०० म्हणुनच मला ही पद्धत आवडते आहे.

मला व्यक्तिशः दर दोन तासांनी खाण्यापेक्षा फक्त दोनदा खाऊन बाकी तोंड बंद ठेवणे जास्त चांगले जमले. एक आठवड्यात भुकेच्या वेळा फिक्स झाल्या. >> +१०००

या आधी भूक नसतानाही फक्त वेळ झाली किंवा कंटाळा आला किंवा समोर दिसले किंवा आवडते किंवा ग्रुपमध्ये मागवले म्हणून खाल्ले असे दिवसभर होत राही >>> हे माझं कधीही होत असे आणि त्याशिवाय जेवायच्या वेळी जेवण पण जेवत असे. Uhoh

मला ही लॉन्गटर्म मेन्टेनेबल पद्धत आवडली आहे.

दुष्परिणामांची विचारणा हे रिकामी डोक्यातल्या विचारांचं काम आहे. :स्मितः

जाई-जुई डॉ. दीक्षितांचा पूर्ण व्हिडीओ आज परत पाहिला.
त्यांनी काहीही कितीही खा सांगितले नाहीय, साखर टाळण्यास, प्रथिने योग्य प्रमाणात खाण्यास भर दिला आहे. या व्यतिरिक्त आहारात फार मोठा बदल सांगितला नाहीय. तेव्हा दीर्घकाळ दुष्परिणामांची शक्यता कमी वाटते अथवा असे म्हणता येईल की तेवढीच आहे जेवढी आधी काय खात होतात(साखर वगळता) तेव्हा होती. थोडक्यात तुम्ही या दोन वेळात योग्य तो आहार घेत असाल तर दुष्परिणामांची या दोन वेळा खाण्याच्या बदलामुळे चिंता करण्याचे कारण नसावे.

Pages