फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ही पोस्ट व्हॉटसप वर वाचली होती, तुम्ही लिहीलेलीच बिना नावाची फिरत असेल.
या पद्धतीला काही दिवस अवलंबून पहायचे आहे, डायबिटीज नाही.

अनु काही दिवस नव्हे. नेहमी करा.

मी गेलं दिड वर्ष करतेय. वजनासाठी किंवा मधुमेहासाठी नाही तर भविष्यात त्रास होऊ नये म्हणुन.

जाईजुई म्हणताहेत ते खर आहे.

ही जिवनशैली आहे.
१०० किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे निरामय जिवन जगण्याची.
पण तरीही दिक्षितांचा व्हीडिओ पहा. समजावून घ्या. कोणतीही गोष्ट समजावून घेऊन मग करण्यातला आनंद वेगळाच असतो.
आपण आपल्यात होणारा बदल जास्त सजगपणे पाहू शकतो. जाणवू शकतो.
मुख्य म्हणजे आपण आपल्या जवळच्या माणसांना हा विषय समजावून सांगू शकतो.

बर्‍याच वेळेस असे होते की, नवरा करतोय पण बायकोचा पाठींबा नसतो. तर कधी उलट. जर विषय निट समजला असेल तर असे विरोध आपला निश्चय ढळू देत नाहीत.

शुभं भवतु.
_/\_

Whatsapp वर फिरत असलेली मूळ पोस्ट मी एका फेसबुक ग्रुप वर लिहिली होती. बऱ्याच ठिकाणी ती माझे नाव काढून टाकून forward करण्यात येत आहे. हीच पोस्ट नंतर https://www.facebook.com/weightlosseffortlessly/ या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या अभियानाच्या अधिकृत फेसबुक पेजवर आणि अभियानाच्या 127 Whatsapp ग्रुप्स मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सदानंद कुलकर्णी साहेब,
खूप मोठ्ठ काम केलेत आहेत बघा तुम्ही. तुमच्या त्या पोस्टमुळे माझ्या खूप मित्र मैत्रिणी विचार करायला लागल्या. पण एकाच मैत्रीणीने आत्तापर्यंत मनावर घेतले. मित्र अजूनही विचारच करताहेत.

काय असेल ते असो. पण व्हॉटअ‍ॅपवर आरोग्याच्या इतक्या पोस्ट फिरत असतात ना की हल्ली कोणी पूर्णपणे वाचतच नाही. आणि जर वाचल्याच तर फारशा गंभीरतेने घेत नाही. पण आता तुमची पोस्ट डॉक्टरांच्या पेजवर आल्यामुळे आता त्या पोस्टला लोक गंभीरतेने घेतील.

या एकाच कारणामुळे मी व्हॉटअ‍ॅप ऐवजी मनोगत, मिसळपाव व मायबोलीवर लेख लिहिला आहे. येथे अनेक तज्ञही आहेत. त्यामुळे चर्चा सुरूच राहील.

हो. एक सांगायचे राहिले. मला पण तुमचा मेसेज आला. मी पण संपूर्ण पणे वाचला. मस्त लिहले आहे. सगळेच मुद्देसूद व साध्या सोप्या ओघवती भाषेत लिहिले आहे.

असो. अवघे धरू सुपंथ.
__/\__

मिताहार ही संकल्पना या
3 Jul 2018 - 7:22 pm | शाम भागवत

मिताहार ही संकल्पना या जीवनशैलीत येत नाही. दिवसातून फक्त दोनदाच खा. कितीही खा.

^^^^ मिसळपाववरचे हे वरील विधान आपले आहे. . कृपया अशी बेफाट विधाने करत जाऊ नका. परिचितांपैकी एकाने असेच काहीतरी ऐकून 'दिक्षितांची पद्धत' फॉलो करतो म्हणून दोन वेळ कितीही व काही खायचा सपाटा लावला आणि आधी जो नव्हता तो डायबेटीस ओढवून घेतला.

दिक्षितांची पद्धत व त्यांचे समाजकार्य उत्तम चालू आहे, परंतु अधिकृत आहारतज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन घेतल्याशिवाय असे प्रयोग स्वतःचे स्वतः करणे घातक ठरु शकते.

भारतीय लोकांना स्वतःचे आरोग्य विशेषतः वजनाचा प्रश्न फारच कॅज्युअल वाटतो. त्यामुळे एखाद्या आहारतज्ञाकडे जाऊन चार पैसे देऊन योग्य मार्गदर्शन घेणे जिवावर येते. एखादा गंभीर आजार झाल्यावर लाखो रुपये कर्जाऊ घेऊन उपचार करतील परंतु वजनाचा विषय मात्र फुकटात कसा निपटता येईल ह्याकडेच सर्वाधिक कल असतो. तुमच्या लेखाच्या शिर्षकाचा पहिलाच शब्द ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

हे मान्यच आहे की आजकाल बाजारात वेटलॉससाठी शंभर प्रकारची औषधे आणि उत्पादने निघाली आहेत. काहीच्या काही पैसे घेतल्या जातात व त्याचे म्हणावे तसे परिणाम दिसत नाहीत. फसवणूक होते. हर्बलजीवन नावाची फसवणूक संस्था देशाच्या कानाकोपर्‍यात पोचून लोकांच्या आरोग्याशी अतिशय घातक खेळ खेळत आहे. ऑनलाइनवरुन जाहिरातींना फशी पडून चक्क उपराष्ट्रपतीसारखी व्यक्ती गोळ्या विकत घेऊन फसते. डॉक्टर व मेडिकल प्रोफेशनबद्दल सातत्याने नकारात्मक बातम्या व अफवा पसरत असतात. अशा सर्व वातावरणात फुकट ते पौष्टिक असा काही विचार मूळ धरु लागणे सहजशक्य आहे. त्यात मग दुधीचा रस, भाज्यांचा रस, केटोजेनिक डायट, तमुक डायट, तमक्या सेलीब्रीटी न्युट्रीशनिस्टच्या शेंडाबुडखा नसलेल्या जनरल टिप्स ह्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ लागतो.

परंतु. फसवणूक ते फुकट ह्याच्याव्यतिरिक्तही काही महत्त्वाचे व फायदेशीर जगात आहे. कोणतीही गोष्ट तशी फुकट नसते, प्रत्येक गोष्टीची किंमत कुठे न कुठे चुकवावी लागते. कोणी मोफत समाजसेवा करतो आहे म्हणून तो मसिहा वगैरे समजणे भारतीय समाजाला नेहमीचेच आहे. परंतु ह्या समाजसेवेमागे आपला गिनिपिग म्हणजे प्रयोगाचा उंदीर म्हणून तर वापर होत नाही आहे ना याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. सेलीब्रीटीं ग्राहक असणे एवढेच कर्तृत्व असल्याने वर्ल्डफेमस झालेले लोक आहेत म्हणून त्यांच्या जनरल टिप्स आपल्या आयुष्यात जशाच्या तशा लागू करणे घातक ठरु शकते.

सरतेशेवटी एवढेच सांगेन, की वजन, डायबेटीस व इतर आरोग्यसमस्या ह्या आरोग्यसमस्या आहेत. त्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक पातळीवर होणे आवश्यक असते.

कितीही खा हे शब्द मिताहार या शब्दासाठी वापरले होते.
पण ते लक्षात न घेतल्यास कितीही खा याने वेगळाच संदेश जातो आहे हे लक्षात आले नाही. त्यामुळे ती शब्द योजना चुकीचीच म्हटली पाहिजे
डॉ. दिक्षितांच्या म्हणण्या प्रमाणे भूक भागे पर्यंत खा. अर्धा भाग अन्न, पाव भाग पाणी व पाव भाग हवा असाही उल्लेख त्यांनी केलेला आहे.
असो.
आपण ती दोन्ही भाषणे संपूर्ण पणे ऐकली आहेत का?

बर्‍याच जणांना मधुमेह झाल्यावरच लक्षात येते. तुमच्या त्या परिचितांनी दिक्षितांची पध्दत चालू करण्यापूर्वी मधुमेह नसल्याची खात्री करून घेतली होती का?

"कोणतीही गोष्ट तशी फुकट नसते, प्रत्येक गोष्टीची किंमत कुठे न कुठे चुकवावी लागते." हे तुमचे विधान मला मान्य आहे.
डॉ. दिक्षीतांच्या योजनेतही किंमत चुकवायलाच लागते. आणि भल्याभल्यांना ती चुकवताना नाकीनऊ येते.

दोन जेवणाच्या मधे काहीही खायचे नाही. तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी व पाणी पिण्यासाठी ही अट पाळण्याची किंमत चुकवायला लागते. कारण यासाठी लागणारा मनावरचा ताबा कितीही पैसे मोजून बाजारात विकत मिळत नाही.
असो.

तुम्ही दोन्ही भाषणे ऐकली असतील तर तुमच्या प्रतिसादाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.

मला त्या बोकीलबाबांची आठवण येते आहे.
कोणत्याही प्रश्नाच्या, आक्षेपाच्या उत्तरार्थ "तुम्ही त्यांची मुलाखत पूर्ण पाहिलीत का?" असा प्रतिप्रश्न यायचा.
बहुतेक मोदींनी पण त्यांची मुलाखत पूर्ण पाहिली नव्हती, नाहीतर नोटाबंदीचं असं झालं नसतं.
जर धागाकर्ता स्वतः इथे काही लिहिणार नसेल , आपण त्यातले तज्ज्ञ नाही म्हणून जबाबदारीने कोणतेही विधान करणार नसेल, तर हा धागा त्या डॉक्टरांचं मार्केटिंग करण्यासाठी आहे, असं समजावं का?

भरत +१
लेख जाहिरात (डॉक्टरांची) करण्यबद्दल आहे की जागरूकता (आहारपद्धतीविषयी) निर्माण करण्यबद्दल.
मला पहिला प्रकार वाटला.

शाम भागवत. तुम्ही आहारशास्त्र ह्या विषयातले तज्ञ आहात काय? तसे असाल तर तुमच्या प्रतिसादांना काहीतरी किंमत देण्याचा प्रयत्न करीन.

अजिबात नाही. मी लेखात तसे स्पष्ट केले आहे.
माझा हा लेख लिहिण्याचा हेतू स्पष्ट करणारी माझी ती ओळ परत लिहितो.

"मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे."

"मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे." >> हो पण तुम्ही विषयाला अगदीच ओझरता स्पर्श करून लेख डॉ. दिक्षितांच्या कार्यावरच फोकस केला आहे.
पुन्हा चर्चा करायची ईच्छा असल्यास भाषणे, विडिओ बघा आणि मगच ईथे लिहा (जे बरोबर आहे) पण असे ऊंटावर बसून का?
तुम्हाला विषय कळाला आहे .. पटला आहे तुम्हीच डॉ. रांचे म्हणणे लेख रूपाने लिहा... ईंटमिटंट फास्टिंग करणारे अनेक लोक आहेत ईथे.. मग ते ही लिहितील...

शाम भागवत. तसे असेल तर मग जे एखाद्या तज्ञाच्या आविर्भावात जे उत्तर देइन म्हणाला त्या तुमच्या हौसबाज (संभाव्य) उत्तराचे मी काय करावे अशी अपेक्षा धरत आहात?

हे इंटरमिटंट फास्टिंगच ना? सईचा धागा होता त्यावर.
हे वरचं इतकं प्रचारकी स्टाईल मध्ये/ WA स्टाईल मध्ये लिहिलंय की मी हे खोटंच आहे हेच स्पष्ट करुन लिहिलंय असं वाटतंय.

@हेला
माझी अपेक्षा अगदी साधी सुधी आहे.
तुम्ही तज्ञ असाल तर दिक्षीतांच्या व्हिडिओतील विधाने कशी अवैज्ञानिक आहेत हे मला व त्याचबरोबर मायबोलीच्या वाचकांना समजावून सांगा. म्हणजे आमच्या सारखे सामान्य लोक जागृत होऊन त्या पध्दतीपासून लांब राहतील.

@ अमितव साहेब,
सई यांचा धाग्याची लिंक द्याल का. मला खरच माहिती मिळवायचीय.

एक वर्ष इंटरमिटंट फास्टिंगचे https://www.maayboli.com/node/62405
इंटरमिटन्ट फास्टिंग/ अनुसूचित लंघन https://www.maayboli.com/node/60322
वजन कमी करताना/आरोग्याची काळजी घेताना https://www.maayboli.com/node/60365
हे चटकन सापडले.

दिक्षीतांच्या व्हिडिओतील विधाने कशी अवैज्ञानिक आहेत

..०००.. लो कल्लो बात... ये मै कब बोल्या जरा बतायेंगे क्या भै?

अमितव. हे इंटरमिटंट फास्टींगच आहे. दिक्षितांनी दिवसातून सकाळ व संध्याकाळ दोनदा जेवण अशी सुटसुटीत पद्धत केली आहे. त्यावर त्यांनी काही व्यक्तींवर काही काळापर्यंत प्रयोग करुन (बहुतेक पिअर रिव्युड जर्नलमध्ये) पेपरसुद्धा प्रसिद्ध केला आहे. सो व्हाट दिक्षित इज सेयिंग इज ट्रुथ... बट व्हाट पीपल मेक आउट ऑफ इट इज माय कन्सर्न.... आणि हे भागवतकाका भक्तीचा झेंडा घेऊन उगा डॉक्टर डॉक्टर करत विषय भलतीकडे नेत आहेत..

असो.

@अमितव
तिन्ही लिंका वाचल्या. यातील "इंटरमिटन्ट फास्टिंग/ अनुसूचित लंघन https://www.maayboli.com/node/60322" ही लिंक महत्वाची वाटली कारण त्यात शास्त्रिय माहिती दिली आहे. ही माहिती जिचकार व दिक्षितांनी दिलेल्या माहितीशी जुळत आहे.

मात्र खालील परिच्छेदात जे दिले आहे त्यापेक्षा डॉ. जिचकार व डॉ. दिक्षीत वेगळे सांगत आहेत. आणि त्यामुळेच दोन्ही पध्दतीत मूलभूत फरक पडतोय. तो परिच्छेद असा आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"कुठलंही यशस्वी डाएट (वेट वॉचर्स, ऍटकिन, केटोजेनीक) कर्बोदकांचे प्रमाण कमी करूनच यशस्वी झालेले असते. कारण कर्बोदकांना इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे जेवणात ब्रेड, पास्ता, पोळी, भात, साखर याचे प्रमाण जितके जास्त तितके जास्त इन्सुलिन बनते. आणि दिवसातून जितक्यावेळा यांचे सेवन केले जाईल तितक्या वेळा इन्सुलिनची मात्रा वर जाईल. यातच दर दोन तासाने थोडं थोडं खाण्याच्या पद्धतीचा पराभव लिहिला आहे. जेव्हा आपण कुठल्याही व्यावसायिक मदतीविना डाएट करतो तेव्हा नकळत हळू हळू प्रत्येक छोट्या जेवणात कर्बोदकांचे प्रमाण वाढू लागते. आणि ऋजुता दिवेकर प्रणालीने दिवसातून ७-८ वेळा खाल्लं तर जास्त कर्बोदके खाल्ली जातात. त्यात हाताशी मदतीला कोणी नसेल तर मोठ्या मोठ्या चुका होतात. परिणामी वजन कमी होत नाही."
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

याबाबत डॉ. जिचकारांनी प्रथम जो क्रांतिकारक विचार मांडला तो असा की, आपण जेव्हा काही खातो ते पचविण्यासाठी खालेल्या पदार्थाच्या प्रमाणात शरीरात पाचक द्रव तयार होतात. मात्र इन्शूलीन त्याला अपवाद आहे. पदार्थाचे प्रमाणात स्वादुपिंड इन्शुलीन तयार करत नाही. तर जेव्हा जेव्हा आपण खातो तेव्हा तेव्हा एका ठरावीक प्रमाणातच नेहमी इन्शूलीन तयार केले जाते. जितक्या वेळा खातो तितक्या वेळा इन्शूलीन तयार केले जाते.

जेव्हा आपण जास्त वेळा खातो (जास्त खाल्ले का कमी खाल्ले हे महत्वाचे नाही.) तेव्हा अर्थातच जास्त इन्शूलीन तयार केले जाते. दोन वेळेला जेवणामुळे जेवढे इन्शूलीन तयार होते ते प्रमाण योग्य आहे. मात्र वारंवार खाल्याने जे अतिरिक्त इन्शूलीन तयार होते ते सर्व रोगांचे कारण आहे. या अतिरिक्त इन्शूलीनची सवय शरीरातील पेशींना नसते. त्यामुळे त्या इन्शूलिनला विरोध करायला लागतात. त्यावर उपाय म्हणून स्वादुपींड काही खाल्यावर किती इन्शूलीन तयार करायचे याचे ठरलेले प्रमाण वाढवते. त्यामुळे अतिरिक्त इन्शूलीनचे प्रमाण वाढतच जाते. हे दुष्टचक्र सुरू झाले की त्यातून माणसाचा स्थूलत्व, मधुमेह, कोलेस्टेरॉल, रक्तदाब, अंजोग्राफी, अंजोप्लास्टी,बायपास असा प्रवास सुरू होतो.

वारंवार खाल्याने अतिरिक्त इन्शूलीन कसे तयार होते हा विचार मांडून मधुमेह रक्तदाब वगैरे साठी अतिरिक्त इन्शूलीन कारणीभूत आहे हे प्रभावीपणे जिचकारांनी सांगितले एक वेगळाच दृष्टिकोन १९९७ साली दिला हेच जिचकारांचे मोलाचे योगदान आहे.

डॉ. दिक्षीतांनी ह्या विचारावर स्वतःवर अनेक प्रयोग करून तसेच अस्तित्वात असलेल्या अनेक आहारयोजना स्वतः वापरून त्यातला फोलपणाचा अनुभव घेऊन डॉ. जितकारांचा हाच विचार जास्ती स्पष्ट करून सांगितला आहे. पुढे नेला आहे.

ते सांगतात की, स्वादुपिडाची इन्शूलीन तयार करण्याचे चक्र पच्चावन्न मिनिटांचे आहे. म्हणजे एकदा इन्शूलीन शरीरात सोडले की त्यानंतर पुढची पंच्चावन्न मिनिटे स्वादुपिंड शरीरात नव्याने इन्शूलीन सोडत नाही. तसेच प्रत्येक माणसामधे एकावेळी किती इन्शूलीन तयार करायचे हे ठरलेले असते. हे प्रमाण प्रत्येक माणसामधे वेगळे वेगळे जरूर असेल पण त्या माणसाचा विचार केल्यास हे प्रमाण कधीही बदलत नाही. थोडक्यात या पच्चावन्न मिनिटात तुम्ही एकदा खा किंवा दहा वेळा खा. कमी खा किंवा जास्त खा. त्याचा काहीही संबंध इन्शूलीन च्या प्रमाणावर होत नाही.

असे समजू की काही खाल्यावर स्वादुपींड प्रत्येक वेळेस पाच युनीट इन्शूलीन तयार करते. (हा पाच आकडा उदाहरणासाठी घेतला आहे. तोही विषय समजावा म्हणून) जर एखाद्याने पंच्चावन्न मिनिटात दोन बिस्किटे खाल्ली किंवा दहा बिस्किटे खाल्ली तरी पाच युनीटच इन्शूलीन तयार होइल. इतकेच नव्हे तर दर पाच मिनिटाला एक बिस्कीट या वेगाने दहा बिस्किटे खाल्ली तरीही पाचच युनिट इन्शूलीन स्वादुपींड सोडेल. कारण अजून पंच्चावन्न मिनिटे पूर्ण झालेली नाहीत.

मात्र त्याने दर तासाला दोन बिस्किटे याप्रकारे दहा बिस्किटे खाल्ली. तर मात्र स्वादुपिंड पाचपट म्हणजे पंचवीस युनीट इन्शूलीन तयार करील. कारण स्वादुपिडाची इन्शूलीन तयार करण्याचे चक्र पच्चावन्न मिनिटांचे आहे. म्हणजेच स्वादुपींड ५ युनीटचे इन्शुलीनचे माप पाच वेळेस टाकेल. जे दोन वेळच्या जेवणाच्या १० युनिटपेक्षा अतिरिक्त असेल. आणि हे अतिरिक्त इन्शूलीन डॉ. जिचकारांनी सांगितल्याप्रमाणे शरीरात रोग तयार करते.
(दोन वेळच्या जेवणाचे १० युनीट हे उदाहरण म्हणून घेतले आहे.)

डॉ. दिक्षीतांनी हेही स्पष्ट केले आहे की, मी सर्व पध्दती वापरून पाहिल्या शरीर उपाशी ठेवायच्या पध्दतीपण वापरल्या. यात वजन नक्कीच कमी होते पण गालफड बसण्याची शक्यता असते. शरीरावर सुरकुत्या येण्याची शक्यता असते. मनुष्य आजारी असल्यासारखा किंवा त्रासल्यासारखा दिसायला लागतो. परिचित तसे बोलूनही दाखवतात.

मात्र दिक्षितांनी सुचवलेल्या पध्दतीचे हे वैशिष्ट्य आहे की, वजन कमी होत असतानाही गालफड कधीही बसत नाहीत. किंवा सुरकुत्या पण येत नाहीत.

मी यातला तज्ञ नाही हे सांगून झालेले आहे. त्यामुळे मला झालेल्या आकलनानुसार व कुवतीनुसार मी हे सर्व मांडले आहे हे लक्षात घ्यावे.
असो.

लिंक दिल्या बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

Pages