रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर

Submitted by कुमार१ on 2 December, 2017 - 01:39

ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू असतोच हे तर मूलभूत सत्य. पण हा मृत्यू निरोगी अवस्थेत शांत झोपेत किती जणांच्या वाट्याला येतो? फारच थोड्या. आयुष्यात मानवी शरीर हे कुठल्या ना कुठल्या रोगाची शिकार बनतेच. मग हा रोग शरीर पोखरत रुग्णास मृत्यूस नेतो. आज विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८० लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत.

आपल्याला कर्करोग का होतो? ढोबळ मानाने त्याची तीन कारणे आहेत:
१. विविध किरणोत्सर्ग (रेडीएशन)
२. अनेक प्रकारची रसायने, आणि
३. काही विषाणूंचा संसर्ग

आपल्याला होणाऱ्या एकूण कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात. हादरलात ना हा आकडा ऐकून? पण ते वास्तव आहे. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! या रसायनांशी आपला अनेक प्रकारे संपर्क येतो. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि कर्करोग हा त्यापैकीच एक. रसायनांचे विविध स्त्रोत, त्यांच्यामुळे कर्करोग का होतो, कोणती रसायने जास्त घातक आहेत आणि त्यापासून वाचण्यासाठी आपण कोणते प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो यांचा आढावा या लेखात घेत आहे.

या विषयाची व्याप्ती मोठी असल्याने पुढील मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतो:
१. रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
२. रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
३. कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे आणि
४. प्रतिबंधात्मक उपाय

रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
रसायने आपल्या शरीरात हवा, पाणी, अन्न अथवा त्वचेमार्फत शिरू शकतात. त्यांचे स्त्रोत हे खालीलप्रमाणे असू शकतात:
१. अन्नातील नैसर्गिक घटक : उदा. Aflatoxin हे दाणे, मका व सोयाबीन यांच्यात असते.
२. रासायनिक शेतीतील पिके : या विषयावर गेल्या दहा वर्षात अनेक माध्यमांतून भरपूर दळण दळले गेले आहे. अधिक लिहिणे नलगे.
३. अन्न-प्रक्रिया : एखादे उकळलेले खाद्यतेल तळणासाठी वारंवार वापरुन त्यात aromatic hydrocarbons तयार होतात. हा प्रकार कनिष्ठ दर्जाच्या खानावळीत हमखास होतो.
४. व्यसने : उदा. तंबाकूतील अनेक रसायने आणि अल्कोहोल
५. हवा व पाण्याचे प्रदूषण : कारखान्यांतून सोडली जाणारी अनेक रसायने.
६. विशिष्ट उद्योगधंदे : उदा. Asbestos हे वाहन आणि बांधकाम उद्योगात वापरले जाते, तर aromatic amines ही रबर उद्योगात वापरतात.
७. रोगोपचारासाठी वापरलेली औषधे : उदा. cyclophosphamide हे काही कर्करोगांच्या उपचारासाठी वापरलेले औषध अन्य काही कर्करोग निर्माण करू शकते! आहे की नाही हा विरोधाभास?

रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
कर्करोगकारक रसायने ही आपल्या पेशींमध्ये शिरून थेट DNA वर हल्ला चढवतात. परिणामी काही जनुकीय बदल होतात. मग विशिष्ट प्रथिनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते आणि त्यांच्या प्रभावाखाली पेशींची अनियंत्रित वाढ होते. हाच तो कर्करोग. अर्थात अशा प्रकारे होऊ शकणारा कर्करोग खालील घटकांवर अवलंबून असतो:

१. रसायनाचे शरीरात जाणारे प्रमाण
२. रसायन-संपर्काचा दीर्घ कालावधी
३. कर्करोग होण्यासाठीची जनुकीय अनुकुलता आणि
४. शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती

ह्या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून कर्करोग होतो (multifactorial disease). काही वेळेस गप्पांच्या अड्ड्यात आपल्याला “अहो, आमचे ते काका रोज पन्नासेक तरी सिगारेटी फुंकायचे, तरी वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत कसे ठणठणीत होते” अशा छापाची विधाने कधीमधी ऐकायला मिळतात. याचे स्पष्टीकरण वरील चार कारणांमध्ये दडलेले असते. अर्थात अशी उदाहरणे ही अपवाद म्हणून सोडून द्यायची असतात. एखादे रसायन जर ९५% लोकांना घातक ठरले असेल तर त्याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे.

कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे
या संदर्भात अनेक रसायनांकडे ‘संशयित’ म्हणून बघितले गेले आहे. साधारणपणे त्यांचे दोन गटात वर्गीकरण करता येईल:
१. कर्करोगकारक (carcinogenic)
२. कर्करोगपूरक (co-carcinogenic)
त्यापैकी सुमारे १०० रसायने ही आतापर्यंत माणसासाठी ‘कर्करोगकारक’ म्हणून सिद्ध झालेली आहेत. यातील एकेक रसायन हे स्वतंत्र प्रबंधाचा विषय होऊ शकेल. काही रसायनांचा संपर्क हा विशिष्ट व्यावसायिकांपुरता मर्यादित असतो. याउलट धूम्रपान आणि मद्यपान हे समाजातील खूप मोठ्या समूहांशी संबंधित विषय आहेत. त्यामुळे या लेखाच्या मर्यादेत या दोनच स्त्रोतांमधील रसायनांचा विचार आपण करणार आहोत.

तंबाकूचे धूम्रपान
जागतिक स्तरावर फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्याचे सर्वात महत्वाचे कारण आहे अर्थातच धूम्रपान. या रोगाने जे मृत्यू होतात त्यापैकी ८०% लोक हे दीर्घकाळ धूम्रपान करणारे असतात. धूर ओढणे हे स्वतःसाठी आणि धूर सोडणे हे आजूबाजूला असणाऱ्यांना घातक असते!
या धुरातील रसायनांचा तपशील असा आहे :
• एकूण रसायने ७०००
• त्यापैकी घातक २५० आणि
• कर्करोगकारक ६९
• कर्करोगकारक रसायनांमध्ये Acetaldehyde, Aromatic amines, Benzo[α]pyrene ही काही उदाहरणे.

तंबाकूतील निकोटीन हे एक बहुचर्चित रसायन आहे. ते जबरदस्त व्यसनकारी आहे पण ते माणसात कर्करोगकारक असल्याचे अद्याप निर्विवाद सिद्ध झालेले नाही. तूर्तास त्याला कर्करोगपूरक म्हणता येईल.
तंबाकू खाणे हा प्रकार आपल्याकडे भरपूर आहे. त्यातील nitrosamines हे तोंडाच्या कर्करोगास कारण ठरतात. भारतात हा कर्करोग पुरुषांमधील कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.

अल्कोहोलचे सेवन अर्थात मद्यपान
हे शीर्षक वाचताक्षणीच अनेकांच्या भुवया उंचावतील कारण हा अतिशय संवेदनशील विषय आहे ! जगभरातील सुशिक्षित समाजावर नजर टाकता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अनेकांनी धूम्रपानाला आयुष्यातून हद्दपार केलेले आहे पण त्यांना मद्यपानाची संगत मात्र सोडवत नाही. संशोधकांचाही हा लाडका विषय! त्यामुळे बहुसंशोधित आणि बहुचर्चित. फक्त कर्करोगच नव्हे तर इतर अनेक आजारांशीही त्याचा कार्यकारणभाव जोडलेला आहे. त्यावरील भरपूर उलटसुलट माहिती माध्यमांतून उपलब्ध आहे.
एक दशकापूर्वी अल्कोहोलला ‘कर्करोगपूरक’ इतपत लेबल लावलेले होते. आता मात्र ते ‘कर्करोगकारक’ च्या यादीत जाऊन बसले आहे. काही संशोधक त्याला ‘risk factor’ असे सुरक्षित लेबल लावणे पसंत करतात.

तर आता जाणून घेऊयात याबाबतीतली ताजी घडामोड. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी American Society of Clinical Oncology (ASCO) ने अल्कोहोल आणि कर्करोग याबाबत नियतकालिकात जाहीर निवेदन दिलेले आहे. ‘First-time Statement’ अशा विशेषणासह त्याला ठळक प्रसिद्धी दिलेली आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे असे आहेत:
१. अल्कोहोल हे पुढील सात अवयवांच्या कर्करोगास कारणीभूत ठरते (causal relationship) : तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका, यकृत, स्तन आणि मोठे आतडे.
२. तर जठर आणि स्वादुपिंडाच्या बाबतीत मात्र ते ‘कर्करोगपूरक’ आहे.
३. दीर्घकाळ अतिरिक्त मद्यपानाने कर्करोगाचा खूप धोका संभवतो आणि प्रमाणात (moderate) पिणे सुद्धा सुरक्षित नाही.
४. वैधानिक इशारा : “ तुम्हाला जर कर्करोगाचा धोका कमी करायचा असेल, तर खूप कमी ‘प्या’ आणि जर तुम्ही ‘पित’च नसाल तर अल्कोहोलच्या नादीच लागू नका !”

तर हे होते धूम्रपान आणि मद्यपानाशी संबंधित रसायनांचे विवेचन. अन्य रसायनांचा विचार विस्तारभयास्तव करीत नाही.

प्रतिबंधात्मक उपाय
संशोधनातील प्रगतीमुळे कर्करोगाच्या नवनव्या उपचारपद्धती विकसित होत आहेत. त्यामुळे जरी बऱ्याच कर्करोगांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असले तरीही रोगप्रतिबंध हा कधीही श्रेष्ठ उपाय ठरतो. याबाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या लेखाच्या विषयालाही ती लागू आहेत. त्यानुसार काही कर्करोग-प्रतिबंधक उपाय असे आहेत :
१. तंबाकूसेवन वर्ज्य
२. अल्कोहोलसेवन अत्यल्प
३. आहारात ‘अ’, ‘इ’ व ‘क’ जीवनसत्वांचा भरपूर वापर. तेव्हा गाजर, पालेभाज्या आणि लिंबू दणकून खात रहा.
४. शरीराच्या वजनावर नियंत्रण, कारण अतिरिक्त चरबी ही पेशींमध्ये कर्करोगपूरक परिस्थिती निर्माण करते. आणि,
५. विविध वैद्यकिय ‘चाळणी परीक्षा’ (screening tests) नियमित करून घेणे.

समारोप
एकूण मानवी कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात हे कटू सत्य आहे. आपण निर्माण केलेल्या रसायनांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्यांचा वापर आणि संपर्क शक्य तेवढा कमी केला पाहिजे. अन्नातून शरीरात जाणारी रसायने कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार वेगाने झाला पाहिजे. व्यसनांपासून दूर राहणे हे तर सर्वस्वी आपल्याच हातात आहे. औद्योगिक-प्रदूषण नियंत्रण कठोरपणे झाले पाहिजे. रसायनांमुळे होणारा कर्करोग हा गंभीर सामाजिक आरोग्यविषय विषय आहे. तो रोखण्यासाठी विविध स्तरांवर युद्धपातळीवर अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा कर्करोगाचा भस्मासुर हळूहळू मानवजातीला गिळंकृत करण्यासाठी टपून बसलेला आहे.
******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रशासक,
हा धागा चुकून दोनदा पडला आहे. त्यातील एकच ठेवावा
धन्यवाद

मस्त लेख.
माहिती सोप्या शब्दात सांगितली आहे.

चांगली परंतु खूप त्रोटक माहिती!

लोकांमध्ये जागृती येण्यासाठी गांभिर्य जास्त विषद करायला हवे! कारण ह्या विषयाचा आवाका खूपच मोठा आहे!

डॉ. कुमार ही लेखमाला आपण सुरु केलीत हे छान केले.
कर्करोगाच्या Initiation, Promotion आणि Progression या स्टेजेस विषयी अधिक माहिती मिळेल का?

मी अनु, कृष्णा व मानव आभार !
कृष्णा, संस्थळांवरील शास्त्रीय लेखन आटोपशीर असावे असे मला वाटते.
मानव, सवडीने लिहीन पण ते सर्व शास्त्रीय निबंध लिहिल्यासारखे होईल. तसेच काही शब्दांचे मराठी करण करणे अवघड आहे

कुमार ही लेखमाला आपण सुरु केलीत हे छान केले.>>> +११
नेहमी प्रमाणेच हाही लेख उत्तम आहे. सिगारेट बद्द्ल बरेच माहीत होते पण मदिरे बद्दल नवीन माहिती समजली.
असेच लेख येत राहू दे !

जाई, आभार व सहमती.
भीती वाटावी अशीच परिस्थिती आहे! अन्न प्रक्रिया उदयोग, सौंदर्य प्रसाधने अशा अनेक स्रोता तून कित्येक रसायने शरीरात जात आहेत. त्यातून इतर अनेक आजारही वाढत आहेत. विशेषतः हॉर्मोन्स शी संबंधित.
मधुमेहाची घोडदौड तर अशक्य वेगाने चालू आहे

डॉ. कुमार लेखमाला सुरू केल्याबद्दल धन्यवाद..
खुप मोलाची माहिती देत आहात. आपल्या पैकी कित्येक लोकांनी आपले नातलग या रोगामुळे गमावले असतील, त्यामुळे या रोगाबद्दल कमालीची ऊत्सुकता आणि भिती आहे. तसेच या बद्दल काही मिथ्स देखील आहेत, त्या बद्दल ही चर्चा करू या का?

मनीष, जरूर करुयात.
सर्वांच्या सहभागानेच उपयुक्त चर्चा होईल
आभार

खूप छान आणि सरसकट सगळ्यांना समजेल अशी माहिती.
मला एक विचारायचं होतं की अल्युमिनिअम च्या भांड्यात स्वयंपाक केल्यास कर्करोग व्हायची शक्यता असते का ? प्लास्टिक आपण बरेचदा टाळतोच पण मायक्रो मध्ये दररोज केलेला एखादा पदार्थ रोजच्या आहारात असेल तर त्याचे काही दुषपरिणाम होतात का?

ननि, आभार !
'अल्युमिनिअम व कर्करोग ' हा तसा घोळदार आणि वादग्रस्त विषय आहे. कर्करोगकारक रसायनांच्या यादीत ''Aluminium" हा शब्द नाही पण "Aluminium production" असा उल्लेख आहे. थोडक्यात, घरगुती वापरातून (non- occupational exposure) जे अल्युमिनिअम पोटात जाईल ते कर्करोगकारक नसेल. पण, अल्युमिनिअम उत्पादन आणि वेल्डिंगमध्ये काम करणार्‍या (occupational exposure) व्यक्तींना कर्करोगाचा धोका संभवतो.

सर्वांना एक विनंती
लेखाचा विषय हा वैद्यकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांच्या सीमेवरचा आहे. त्यामुळे "एखादे रसायन नक्की कर्करोगकारक असते का?" या प्रश्नाचे उत्तर फक्त एका अभ्यासशाखेतील व्यक्तीस देणे अवघड असते.
निव्वळ गुगलून मिळालेली माहिती अधिकृत असेलच असे नाही.
तेव्हा आपल्यातील कोणी रसायनशास्त्रज्ञ असल्यास जरूर आपले अनुभवी मत द्या.
आभार
.

प्लास्टिक आपण बरेचदा टाळतोच पण मायक्रो मध्ये दररोज केलेला एखादा पदार्थ रोजच्या आहारात असेल तर त्याचे काही दुषपरिणाम होतात का? >> हेच मी नेहमी ऐकत असतो. त्या मुळे आँफिसचा लंच box सुद्धा काचेचा वापरायला सुरवात केली.

१००% सहमत. छान लेख. मी फार वर्शां पासून धूम्रपाना च्या विरोधात आहे. प्रसाधने व माणसांनी घरात वापरायच्या उत्पादनांसाठी आता खूप रेगुलेशन्स आहेत. जी फर्स्ट वर्ल्ड मध्ये तरी फॉलो करावी लागतात.

अमा, आभार आणि सहमती.
आपल्याकडे अंमलब्जावणी...... ! जाउद्यात झालं...
Palstic carrybags जरी पूर्ण बंद झाल्या तरी मी पेढे वाटीन . Bw

कधी कधी आपण निर्व्यसनी असणारी माणसे ही कर्करोगाचे बळी ठरताना पहातो. त्यावेळी ती उरलेल्या वीस टक्क्यांत म्हणजे कारण नं १ व ३ मधे जातात.
अवांतर- एखाद्या जीववरच्या मोठ्या शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकांना सांगतात की की काही काळजी करु नका. हल्ली विज्ञान व तंत्रज्ञानामुळे ही ऑपरेशन्स सोपी झाली आहेत. ९९ टक्के ही यशस्वी होतात. तरी अर्थात कागदपत्रावर धोक्याची संमती साठी सही घेतात. त्यांच संख्याशास्त्र खरही असत. फक्त ते तुम्ही ९९ टक्क्यांमधे आहात की उरलेल्या १ टक्क्यांमधे आहात हे सांगू शकत नाहीत. ऑपरेशन अयशस्वी झाले तर तुम्ही उरलेल्या १ टक्क्यात. ते स्टॅटिस्टिकली खर असत फक्त ते अपयश तुमच्यासाठी १०० टक्के असत. ज्योतिषी मात्र इथे १०१ टक्के खात्री देतो. तुमचे ग्रहबल चांगले आहे. काही काळजी करु नका हो. देवाची प्रार्थना करा सगळ ठीक होईल.

मला एक प्रश्न पडला आहे:

हृदयविकार किंवा कर्करोग होणाऱ्यांचं वय 'शक्यतो' काय असतं? माणसाने जेवढे जगायला हवे त्याच्यापेक्षा जास्त जगू लागल्याने हे विकार होत आहेेत का?

हृदयविकार किंवा कर्करोग होणाऱ्यांचं वय 'शक्यतो' काय असतं? >>> लाखमोलाचा प्रश्न पण.... अवघड उत्तर !

१. १९८० च्या दशकात मी जेव्हा एम बी बी एस चा विद्यार्थी होतो, तेव्हा याचे उत्तर बहुतेक कर्करोगांना "साधारण ६० च्या आसपास" असे होते. आमच्या पुस्तकात कर्करोगाचे पहिले कारण 'वय' (ageing) असे दिले होते. जसे वय वाढते तसे errors in cell division वाढत जातात म्हणून.
अर्थात मुलांच्या वयातील कर्करोग हे वेगळे असतातच. त्याची कारणे वेगळी.

२. आता जो रेडिएशन व रसायन- धुमाकूळ माजला आहे त्याने जनुकांवर विपरित परिणाम केला आहे. त्याने वरील कल्पना मोडीत निघाली आहे.
३. आता 'वयात येण्याच्या वया' पासूनही हा रोग आढळेल.

माहितीपूर्ण लेख ! _/\_
भारताबाहेर रहात असल्याने खालील गोष्टी दीर्घ काळ वापरात आहेत. या धाग्याच्या अनुशंगाने, यांचा शरीरावर , रोगप्रतिकारक शक्तीवर कितपत परिणाम होतो. त्यावर उपाय काय?
१. बाटलीबंद पाणी , रिफिल वाले मोठे गॅलन्स तसंच १-२ लीटरच्या बाटल्या.
२. बाटलीबंद ताजे दूध (३-४ दिवसांची मुदत असलेले), तसेच टेट्रापॅक मधले साधारण महिनाभराची मुदत असलेले दूध .
३. फ्रोजन भाज्या

मित, आभार
निसर्गस्नेही राहायचे असेल तर ते तीनही वाईटच आहे !!
अधिक काय लिहू ? ☺

अमा, बरोबर.
स्तन आणि दृष्टीपटला चा कर्करोग ही त्याची महत्वाची उदाहरणे.

'भस्मासुर' शब्द अतिशयोक्ती वाटू शकेल. पण तो का वापरला ते सांगतो.
या रोगाच्या जागतिक मृत्युंची आकडेवारी मी एका आंतरराष्ट्रीय पाठय पुस्तकातून घेतली आहे. याची दर अडीच वर्षांनी आवृत्ती निघते. गेल्या दोनमधील फरक बघा:
2013 : ६५ लाख मृ.
2015 : ८० लाख
आता 2018 मध्ये..............?

दूधातील केसिन हे प्रथिन काही प्रकारच्या कॅन्सरना promote करते (म्हणजे कुठल्याही प्रकारे तो कॅन्सर आधी इनिशिएट झाला असल्यास), हे कितपत खरे आहे?

Pages