बाजरीच्या पीठाचे गोड दिवे

Submitted by मनीमोहोर on 27 July, 2017 - 15:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आषाढ अमावस्या ही हल्ली जास्त करून श्रावण महिन्याची पूर्व संध्या म्हणून 'गटारी' या नावाने ओळखली जाते पण हीला खरं तर 'दिव्यांची अमावस्या' असं म्हटलं जातं . ह्या दिवशी दिव्यांची पूजा करतात . आषाढातला धुवाधार पाऊस, भर दिवसा भरून आलेली काळोखी, अपुरा प्रकाश अशा वातावरणात दीप पूजन करण्याची , दिव्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा खरोखरच कौतुकास्पद आहे . ह्या दिवशीचा नैवेद्य ही 'दिवे' हाच असतो . दरवर्षी मी कणकेचे दिवे करते पण ह्या वर्षी घरच्या बाजरीचं ताजं पीठ घरात होतं म्हणून बाजरीचे केले . ते चवीला खूपच सुंदर झाले होते म्हणून कृती लिहीत आहे . कृती खूपच सोपी आहे .

साहित्य : बाजरीचं पीठ एक वाटी , गूळ बारीक चिरून एक वाटी पेक्षा थोडा कमी , तेल एक चमचा, चिमूटभर मीठ, आणि दूध

क्रमवार पाककृती: 

प्रथम एका बोल मध्ये दूध सोडून इतर सर्व जिन्नस नीट मिक्स करून घ्यावेत . नंतर त्यात दूध मिसळून आपण पोळ्याना भिजवतो तसे पीठ भिजवावे . नंतर त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून त्यांना फोटोत दाखवल्या प्रमाणे दिव्याचा आकार द्यावा . चाळणीला तेलाचा हात लावून त्यात हे सर्व दिवे ठेवावेत आणि कुकर ची शिट्टी काढून दहा ते पंधरा मिनिटं वाफवावेत . बाजरीचे गोड दिवे तयार आहेत.

वाढणी/प्रमाण: 
तीन ते चार प्रत्येकी
अधिक टिपा: 

१ ) पीठ भिजवायला दूधच वापरावे. पाणी नको. दुधाने खुसखुशीत आणि हलके होतात. पीठ जुनं असेल, विरी गेलेली असेल तर दूध थोडं गरम करुन घ्यावे .
2) दिवे करताना पिठाची गोळी अंगठ्याने दाबुन तिला उभट खोलगट आकार द्यावा आणि मग त्याच आकारात मोठी करावी म्हणजे दिवे सुंदर आकाराचे होतात . पसरट होत नाहीत .
3) हे अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट होतात . गूळ आणि बाजरीची एकत्रित चव फारच छान लागते .
4) खाताना ह्यावर तूप घेतले तर चव अजून खुलते .
5) मुलांना डब्यासाठी किंवा दुपारच्या खाण्यासाठी हा एक हेल्दी आणि टेस्टी ऑप्शन आहे .
6) कोणी पाव्हणे येणार असतील तर गोड म्हणून ही हे करता येतील .
7) मी कडेला घातलेली मुरड ऐच्छिक आहे , जमत नसेल तर नाही घातली तरी चालेल .
8) ग्लूटेन फ्री डाएट साठी हे नक्कीच चालतील .

हा फोटो
IMG_20170723_125213.jpg

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा! मस्त! Happy
आई भोगीच्या वेळी बाजरीच्या दशम्या करते उसाच्या रसातल्या - त्यांची चव आली जिभेवर.

दिवे भारी लागतात एकदम !
आम्ही दिव्याच्या आवसेला अगदी दरवर्षी न चुकता करतो. फक्त कणकेचे करतो. आत्ता परवा पण केले होते.
फोटो छान आहेत. आम्ही एव्हडी मुरड वगैरे नाही घालत. Happy

मी लहान असताना आई हे पुराणाचे दिवे करायची ते आठवले.
ह्या दिव्यांमध्ये तूप भरून त्यात वात पेटवायचो.
तूप संपून ज्योत विझली कि जळलेली वात काढून टाकायची आणि ते दिवे खायचे. ज्योतीच्या आजूबाजूचा भाग छान भाजला जायचा आणि त्या मुळे खरपूस लागायचा.

Good old days ...... rather .... Good young days ... huh...

सायो, योकु, पराग, मेधा, असुफ, स्वाती2,
अंजू, साधना, चामुंडराय आणि फार एन्ड खूप खूप आभार .

मुरड आवडली थँक्स. मुरडण्यात मी एक्स्पर्ट आहेच
(स्मित )
@पराग, मी पण इतके वर्ष कणकेचेच करत असे आणि ते ही आवडत असतंच पण हे त्या पेक्षा कैक पटीने सुंदर लागत होते . कणकेमध्ये ग्लूटेन असल्याने थोडे चिकट होतात कणकेचे असं मला वाटतय . बाजरी मध्ये ग्लूटेन नाही म्हणून खुसखुशीत झाले . ते इतके आवडले की मी लागोपाठ दोन वेळा केले . जेवण झाल्यावर एक दिवा डेझर्ट सारखा खाल्ला. बाजरीचं पीठ मिळालं तर नक्की करून बघा .

पाकृ आणी फोटो दोन्ही छान आहेत.
मी हे दिवे करताना पीठाचे न करता बाजरीची भरड वापरते. दुधात न भिजवता भरड आणि मीठ पाण्यात भिजवून घेते. याला दिव्यांचा आकार न देता लाडवा सारखे गोल वळते. मग पातेल्यात पाणी ठेवून त्यावर चाळणी ठेवून अथवा कुकरच्या डब्यात वाफवून घेते. मग गरम गरम वाफाळता गोळा खायला घेऊन तो फोडून त्यात साजूक तुपाची धार घालून आणि वरून हवा तितका चवीनुसार गुळ घालून खायला देते.
कणकेचे दिवे करताना मी तुमची पाकृ वापरते. दोन्ही माझे आवडते प्रकार आहेत.

आम्ही उसाच्या रसात करतो. तांदूळाच्या पीठात हळद, रस, मीठ घालून. ओळखीच्या दुकानातून आधीच ताजा रस काढून आणून पीठ मळून दिवे बनवायचे.
मुसळधार पावसात , माजघरातील कोनाड्यात ठेवलेला दिवा आधी शांत तेवायचा आणि मग तूप(साजूक) जळले की, एक सुगंध यायचा. रस आणि पीठ खरपूस भाजल्याचा.

पावसाळी दुपार किंवा सांज हि कोकणात अनुभवण्यासारखी मजा नाही.

बाजरी हि फक्त खास सणाला म्हणजे भोगीच्या वेळी, दशमी हि बाजरीच्या पीठात /तांदूळाच्या पीठात उसाचा रस घालून करतात. ती अतिशय चवीष्ट लागते. उसाच्या रसातले बनवून पहा दिवे.
दिवाळीला कणकेचे दिवे करतो दूध घालून.
मनीमोहोर, मस्त आठवण काढून दिलीत.

खूप मस्त!
आम्ही दिव्याच्या अवसेला दिव्यांच्या पूजेनंतर नैवेद्यासाठा गोड काहीतरी करतो. बाकी कणकेचे किंवा पुरणाचे दिवे दरवेळी करतोच असं नाही. पुरणाचे दिवे श्रावणी शुक्रवारी लहान मुलांच्या औक्षणाला केले जातात.

बाकी पवसाळी वर्णन नेहमीप्रमाणे मस्त! Happy आमच्याकडचा पाऊस वेड लावतो!

शशांक, जाई निर्झरा,अनघा, नरेश माने,देवीका, अंकु, प्रज्ञा९, शोभा, झेलम अदिती .. सगळ्यांचे मनापासून आभार .

@निर्झरा, मी पण आता तुम्ही लिहीलय तसे करून बघेन . छानच लागत असतील तसे ही .

@ देवीका, फार सुंदर प्रतिसाद . उसाच्या रसात हे करतात हे माहीतच नव्हते . करून बघायला हवं .

@ प्रज्ञा ,प्रतिसाद आवडलाय .

मस्त आणि इंटरेस्टींग... खायचे दिवे हे नवीनच आहे माझ्यासाठी.. म्हणजे आमच्याकडे कधी असला प्रकार झाला नाही.
आता दिवाळीला फराळ कम पणत्या म्हणूनही बेस्ट आहे.
ती म्हण आहे ना गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली...
बाजरीचे दिवे, पेटले तर पेटले, नाहीतर पोटात टाकले Happy

Mast!

Pages