मायबोली वर्षाविहार आणि मी

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

माझा मायबोलीवरचा वावर हा १० वर्षापेक्षा अधिक आहे, हळूहळू ती आयुष्याचा अविभाज्य घटक कधी बनली हे मलाही सांगता येणार नाही. इथे नेट वर लिहिताना लोक अतिशय मोकळेपणी बोलतात. पण वर्षाविहाराला येताना त्यांची रोडावलेली संख्या पाहून मला वाईट वाटते. मी ही मधले अनेक ववि मिस केलेत, पण त्यानंतर संयोजन समितीत कधी खेचले गेले कळलंच नाही. फक्त संयोजनाचे काम बदलते,कधी ववी, कधी सांस कधी टिशर्ट. पुण्यातून खंदे असे मयुरेश, योकु, मल्लि आणि मुंबईचे हमखास कलाकार म्हणजे विनय भिडे, घारू, नील, आणि मुग्धा. मुग्धा तर तशी बर्‍यापैकी नविन असल्यापासूनच माबोच्या वविसंयोजनात दाखल झाली.
खास करून पुण्याहून येणार्‍यांची संख्या एका वर्षाविहारालाच मला वाटतंय ३०-३२ होती बाकी वेळेला त्यापेक्षा कमीच. त्याविरूद्ध मुंबईची लोकसंख्या बर्‍यापैकी असते.

वर्षाविहाराला येणं आणि तिथे येण्यातली मजा ह्या फक्त अनुभवायच्या गोष्टी आहेत. काही लोक अत्यंत छोट्या अडचणी मोठ्या मानून या आनंदाला मुकतात. मला नेहमी वाटते की आंतरजालावर आम्ही म्हणजे कट्टेकर, कोपुकर आणि मिक्स असे जेव्हा वविला भेटतो तेव्हाचा आनंद अवर्णनीय असतो. एका दिवसात भरलेलं हे पेट्रोल वर्षभर पुरतं. मी माझ्यापुरती तरी निदान ववीची वाट आतुरतेने पहात असते.

पण तुमच्यापैकी ज्यांनी माबोवर रेग्युलर वावर असुनही ववी एकदा पण अटेंड केला नाहिये त्यांच्या मनात ववीचं नक्की चित्र काय आहे? किंवा त्यांच्या वविला येण्याचा नक्की अडचणी काय आहेत?

मला जाणून घ्यायला आवडेल. सर्वात कॉमन अडचण मी ऐकली आहे ती म्हणजे "मी कधीच कुणाला प्रत्यक्ष भेटले/लो नाहिये, ओळख नसताना कसं येणार?
सर्वात पहिला ववी जो मी अटेंड केला होता त्याचं नाव अंबा (इंग्रजीत AMBA) अखिल मायबोली... पुढे काय होतं विसरले. २ सुमो भरून लोक सिंहगडावर गेलो होतो. त्यातले काही लोक मला आठवतायत मयुरेश, दिनेश, अजय गल्लेवाले, संपदा (डॅफोडिल), सत्यजित इ. माझी सुद्धा कुण्णाशी ओळख नव्हती. आणि मला एक अनामिक भिती सुद्धा होती की बाप रे आपण जातोय खरे...
पण अनुभव प्रचंड वेगळा आणि सुरेख होता. वविच असं नाही पण इथे सुद्धा आंतरजालावर विविध लोकांबरोबर पहिल्यांदा बोलताना कधीच मला परकेपणाची भावना झाली नाही.
असे अनेक लोक आहेत ज्यांना मी अजून भेटले नाहीये, पण त्यांच्याशी रेग्युलर टच मध्ये असते फोन किंवा ईमेल (पैकी एक वेका) कट्टेकर तर माझे जन्माचे सोबती झालेत आता.

एका व्यक्तीचं खास कौतुक करीन इथे - लिंबू.... हा माणूस कितीही अडचणी असल्या तरिही प्रत्येक ववीला हजेरी लावतोच ते ही स्वतः ड्राईव्ह करत.

मनात कोणतीही शंका असेल तर इथे मोकळेपणी बोला, मला तुमची अडचण जाणून घ्यायला आवडेल. ववीला रेग्युलर येणार्‍या लोकांना जो आनंद मिळतो तो आनंद अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचावा असे मनापासून वाटते. पण घोड्याला पाण्यापर्यंत आणणे आपले काम, पिणे पिणे हे त्याचे ....

तेव्हा घोडे हो... आपलं लोकहो, जरा पाऊल पुढे टाका, अडचणी सांगा, आमच्या ताकदीत असेल तर त्यांचं निवारण करून आपल्याला ववी मध्ये सहभागी करून घ्यायला अत्यंत आनंद होईल.

विषय: 
प्रकार: 

वर कित्येकांनी लिहिलेय की त्यांना मिक्स व्हायला प्रॉईब्लेम येतो त्यामुळे ववीला गेल्यावर कोप-यात उभे राहावे लागेल याची भीती वगैरे वगिरे. त्याना एकच सांगावेसे वाटते की मी ही सेम त्यांच्यासारखीच आहे. मलाही चटकन कोणाशी स्वतः ओळख वगैरे काढुन बोलायला जमत नाही. कोणी उत्साही ओळख काढुन आला/लीच बोलायला तर त्याच्या/तिच्याशी सुरवातीचे हाय हॅलो आणि पाउस पाणी बोलुन झाले की पुढे काय बोलायचे हा प्रश्न पडतो. त्या उत्साही प्राण्याकडे पुढेही बोलत बसण्याइतके भांडार असेल तर मी हं हं इतकेच बोलत राहुन काम चालवते. Happy Happy या भानगडीत कधी कधी सामायिक विषय येतात आणि मस्त गप्पा मारुन होतात. तितकीही माणुसघाणी मी नसावी. Happy पण बहुतेक वेळा सुरवातीचे हाय हॅलो बोल्लुन झाले मी माझे तोंड बंद होते.

पण तरीही मला ववि आवडतो. इतर जण मजा करतात ते बघायला आवडते. मी स्वतः त्या पाण्यात बिण्यात उतरत नाही पण उतरणा-यांची गम्मत बघायल आवडते. मी आजवर ३ वविना हजेरी लावलीय. ववि चुकला तर नंतर वृत्तांत वाचताना हळहळ वाटते.

(मला फक्त ते दुपारचे सांस झेपत नाही. यावेळेस सांस् जरा कमी आहे असे कानावर आलेय. बघु. Happy )

तस्मात तुम्ही रिझर्व्ड आहात म्हणुन ववि चुकवु नका.

दक्षिणा.. तुझी कळकळ आवडली. मी माझ्यापुरते सांगते.

अतीवैयक्तीक कारणः

मी रीझर्व्ड नाही. पण माझा नवरा आहे. त्यामुळे त्याला एकटे पडल्यासारखे होईल का अशी भिती वाटते. किंवा त्याला बोर होऊ नये म्हणून मला त्याला एंटरटेन करतांना मला नीट एंजॉय करता येईल का अशी भिती वाटते. ज्यांनी कधी एकाच वेळी एकमेकांशी प्रचंड अनोळखी असलेले दोन ग्रुप्स असणारी पार्टी होस्ट केली आहे आणि दोन्ही ग्रुप्सना बोर होऊ नये म्हणून दोघांशी अर्धा अर्धा वेळ वेगवेगळ्या विषयांवर बोलण्याची कसरत केली आहे त्यांना माझी भिती कळेल. कोणी असे रिझर्व्ड किंवा मायबोली अज्जिबात माहित नसणार्‍या किंवा न आवडणार्‍या (आपला जोडीदार त्यावर जास्त वेळ घालवतो/ते म्हणून), आभासी जग फसवं इत्यादी वाटणार्‍या जोडीदाराला वविला घेऊन येण्याचा अनुभव सांगेल का? तो अज्जिबातच तयार झाला नाही तर एकटीने येण्याचा ऑप्शन आहेच. पण तसं करायला गिल्टी वाटतं जरा. Sad

वैयक्तीक कारणः

का ते पुन्हा पुन्हा सांगत बसणार नाही. पण सध्या मायबोलीपासूनच मनाने थोडी थोडी दूर जाते आहे. पुर्वी तासंतास मायबोलीवर पडीक असणारी मी आजकाल तितक्या फ्रीक्वेंटली आणि तितक्या ओढीने मायबोलीवर येतेच असं नाही. त्यामुळे आपसूकच वविला यायची ओढ वाटत नाही. मला २ वर्षांपासून वविला यायची खूप इच्छा होती पण नवरा रमेल का या विचाराने आले नाही. आणि या वर्षी मायबोलीवरच येणं कमी झाल्याने वविला यायची इच्छाच ज..रा कमी झाली आहे.

अर्थात.. मी कोणीही टिकोजीराव आयडी नाही लागून गेले कि कोणी मला काय वाटतं याची दखल घेतली जावी. तरीही दक्षिणाने मला हि संधी दिल्याबद्दल तिचे आभार. ___/\___

अवांतरः मायबोलीवर दिसणारा नव्याच नावाचा आयडी, नक्की कोणाचा डुआयडी आहे हे जुजा माबोकरांना ओळखता येते आणि मला ओळखता येत नाही तेव्हा आपण माबोपासून खूप लांब गेलोय असं वाटतं. Sad

मी तब्बेतीच्या कारणास्तव पावसात भिजू शकत नाही. तेव्हा वविला यायचे व रेनकोट घालून वेगळे बसायचे यात अर्थ नाही. इतर मोसमात न भिजण्याची सहल काढल्यास यायचे आहे नक्की.

मी तब्बेतीच्या कारणास्तव पावसात भिजू शकत नाही. तेव्हा वविला यायचे व रेनकोट घालून वेगळे बसायचे यात अर्थ नाही. इतर मोसमात न भिजण्याची सहल काढल्यास यायचे आहे नक्की...>>> कुमार्,तुमच्यासारखीच छत्री डोक्यावर घेऊन न भिजणारी लोकं पण असतात हो वविला. ते पाण्यात न भिजताही ववि एंजॉय करतात हो. तेव्हा तुम्हाला काही वेगळं वाटायचं कारण नाही. Happy

अय्यो!
आम्ही असं काही म्हटलं की लोक म्हणतात ' डॉक्टरला काय सर्दी होते का?'

तर कुमारजी तुम्ही तब्बेतीच्या कारणाने वविला येत नाही यावर आमचा विश्वास नाही हां!
Wink

रोखठोक धागा दक्षिणा, मस्त काम केलेस. Happy
वविमधे सगळे जण एंजाॅय करू शकतील असेच वातावरण असते. ज्यांना शंका असेल त्यांनी एकदा येऊन खात्री तर करून घ्या.
काही जण न येऊ शकण्याचे कारण मुलांच्या परीक्षा हे ऐकल्याचे आठवतेय.

इथे मला मुद्दाम सांगावेसे वाटतेय, मायबोलीवरचे प्रतिसाद आणि ती व्यक्ती यांची गल्लत करु नका.. फार वेगवेगळे असतात ते !

एखादा मायबोलीकर, भले तूम्हाला मायबोलीवर प्रतिसाद देत नसेल, पण तो तूमचे सर्व प्रतिसाद वाचणारा असू शकतो.

सांस्कृतिक कार्यक्रमात सर्वाना सहभागी होणे शक्य नसते, पण त्याना प्रेक्षक हवेतच ना ?

शिवाय काहि वेळ, फ्री टाईम म्हणून ठेवावा. त्या वेळात कुणाला आडवे व्हावेसे वाटेल तर कुणाला जरा आजूबाजूला फेरी माराविशी वाटेल. अमु़क एका काळात सर्वानी मडबाथ घेतलीच पाहिजे, असे नको.

अरे लोकहो, मलाही पावसात किंवा पाण्यात भिजायचे वावडे आहे. जरा भिजले की सर्दी, शिंका, खोकला हात-पाय धुवून मागे लागतात. पण तरी मी सपे संस्कृतीला जागून रेनकोट / जर्किन, छत्री, स्वेटर, स्कार्फ वगैरे कडेकोट बंदोबस्तात वविला येते. Wink तसेच सोबत आणलेल्या आलेपाकापासून ते आवळकाठीपर्यंतच्या तऱ्हेतऱ्हेच्या अजब औषधींनी सहप्रवाशांचे किती मनोरंजन करते ते मल्ल्या, दक्षी व मयूरेश सांगतीलच!! Lol पाऊसपाण्यात भिजण्याचे अजीर्ण असले तरी मला वविला यायला सॉलिड धमाल येते. पावसाळी धुक्याची हवा, मजेमजेचा प्रवास, गाणी, गप्पा, हशा, मनोरंजन, निसर्गसौंदर्य, बाळगोपाळांच्या गमतीजमती, निवांतपणा, नव्या-जुन्या माबोकरांच्या भेटीगाठी एवढं बास असतं. त्यात पावसात, पाण्यात हुंदडणं हा बोनस असतो. Happy

तसेच सोबत आणलेल्या आलेपाकापासून ते आवळकाठीपर्यंतच्या तऱ्हेतऱ्हेच्या अजब औषधींनी सहप्रवाशांचे किती मनोरंजन करते ते मल्ल्या, दक्षी व मयूरेश सांगतीलच!!...>>> अकु,आजीबाईंची पोतडी Happy

मागे कोणीतरी ग्रूपिझम होतो म्हणून लोक येत नसावेत असं लिहिलं आहे. खरंतर गेम्स असतात म्हणूनच ग्रुपिझम होत नाही, कारण गेम्स सर्वांना सामावणारे असतात. मड बाथ, स्विमिंग पूल यासाठी भरपूर वेळ दिलेला असतो. दुपारी जेवणानंतर काहीच कार्यक्रमच नसेल तर आपणहोऊन नव्या ओळखी करून किती जण गप्पा मारतील? लोक त्यापेक्षा डुलकी काढणे नाहीतर आपले ओळखीचे ग्रूप करून गप्पा मारणंच आपसूक प्रीफर करतील. गेम्समुळे लोक एका ठिकाणी जमतात. तेव्हा फार काही गप्पा झाल्या नाहीत तरी आयडी कळतात. त्या गप्पा नंतर माबोवर व्हर्च्युअली पुढे नेता येतातच. बर रिजिड किंवा सर्वांना कम्पल्सरी असं काहीच नसतं. तुम्हाला कधीही कुठेही जायची, फिरायची मुभाही असते. फक्त रिसॉर्टच्या काही वेळेच्या अटी असतील तर त्या पाळाव्या अशी अपेक्षा असते आणि त्यात गैर काहीच नाही. त्यामुळे सर्वांना बांधून ठेवण्यासाठी गेम्स फार चांगलं काम करतात असं मला वाटतं.

विविध कारणांमुळे गेले काही ववि अटेन्ड करू शकले नाहीये. या वर्षीही नाही जमत आहे. पण काही वर्षांपूर्वी सर्व समित्यांमध्ये काम केलेलं असल्याने ववि स्पिरिट काय असतं याच्याशी चांगलीच परिचित आहे Happy

दक्षिणा,
खूप छान धागा आणी एक से एक प्रतिक्रीया आणी अनुभव सुद्धा एकेकाचे Happy

मी सुद्धा मागचे ३ ववि लागोपाठ हजर होतो आणी खरच खूप छान अनुभव होता.
विशेष म्हणजे मी सकुसप होतो तीनही वेळा पण बायको किंवा मुलीने सुद्धा काही कंप्लेंट केली नाही Happy जरी ती माबोवर नसते तरी -काही अपवाद सोडले तर Happy
(फक्त एका ववि ला माझी पिल्लू बस मधल्या अंताक्ष्ररी आणी दंग्याला घाबरली होती Happy )
असो. मी तर नक्की नक्की सूचवेल कि एकदा जाउनच बघा- तुम्हाला आवडले नाही तर सल्ला परत Happy

मागे मी एक सुचना केली होती की इथे माबोकरांनी जे काही उत्तम उत्तम लिहिले आहे त्यातील काहींचे वाचन करा. ह्याला फक्त १च तास द्या.

चहा फ्री फ्लो ठेवा. कारण पावसाळ्यात चहा हवाच असतो.

पियू तू विचार करत आहेस तो बरोबर आहे, पण एक दा नवर्याला ववि ला घेऊन गेलीस कि तुझीच प्रतिक्रिया वाचून हसशील. पहिल्यांदाच ववि ला मी आणि नवरा एकत्र गेलो होतो, त्याने तर माबोचे होमपेज ही बघितले न्हवते. बस मधून उतरल्यावर तो आणि मी फक्त जेवताना एकत्र बसलो असू. सगळ्या माबोकरांना पहिल्यांदा भेटुन सुद्धा तो आधीच ओळख असल्यासारखा कधी मिक्स झाला हे त्याला ही कळले नाही. महत्वाचे म्हणजे इतरांनी सुद्धा आम्हाला छान इन्वॉल्व करुन घेतले. माझे ही ते पहिलेच एन्काऊंटर होते मायबोलीकरांसोबत तरीही अजिबात ऑकवर्ड वाट्ले नाही आणि कंटाळा ही आला नाही. बिन्धास्त जा ग Happy

मी मायबोलीची गेल्या २ वर्श्यापासुन वाचक आहे, क्वचित प्रतिक्रिया देणे वगैरे. पण मायबोलीचे आयडी आता वाचुन वाचुन माहीती झालेत.(मायबोलीचे आयडी लक्श्यात आहेत), त्यामुळे भेटायला आवडेल. पण ओळ्ख नसल्याने एकटे पडु का ही भिती वाट्ते आहे.नवरा रीझर्व्ड आहे. नातेवाइकामध्येही मिसळत नाही. त्यामुळे लेकाला घेउन यायचा विचार आहे.

मी माझ्या पहिल्या वविला सह कुटुंब गेलो होतो! सर्वांनी धमाल केलेली.. माझी धाकटी कन्या तेंव्हा ३ एक वर्षाची असेल ती आम्हाला सोडून नंदिनी बरोबरच आख्खा दिवसभर आणि परतीच्या वेळी गाडीत पण सगळे माबोकर पेंगुळलेले आणि ती त्यांना त्रास देत बसलेली! Happy

हा धागा जेव्हा मी वाचला तेव्हाच जर प्रतिसाद दिला असता तर पहिला प्रतिसाद माझाच असता पण काय आणि कसं लिहु, मुळात इथे लिहु का याच विवंचनेत अडकुन मी प्रतिसाद देणे टाळलं. पण आता मला जे वाटतय ते सेम इथल्या काही आयडींना वाटतयं म्हणुन आता लिहतेय.

माबोवर मी रोमात आणि आयडी घेऊन जवळजवळ ४.५ वर्षे आहे या दरम्यान मी २-३ वेळा माझ्या काही समस्यांवर मदत मागितली होती आणि त्यात मला माबोकरांची खुप मदतही झाली आहे पण एव्हढच. प्रत्यक्षात किंवा फोनवर सोडाच पण साधं विपुमध्येही मी कोणाशी जास्त बोलले नाही, एक हाय, हॅलोही नाही. असे नाही की मला हे आवडत नाही पण तेव्हढा आत्मविश्वासच नाही. मला नीट लिहता येत नाही, नीट व्यक्त होता येत नाही हा न्युनगंड, त्यामुळे तुम्हाला माझी सोबत आवडेल की नाही असं वाटतं राहते. Sad

माबोवर जास्त वेळ उपस्थित असलेल्या सदस्यांची जर सरासरी काढली तर मी टॉप १० मध्ये येईल Proud पण माझ्या उपस्थितीची जाणिव कोणालाच नसते कारण मी फक्त वाचनमात्र. नविन लेखन, जुन्या लेखनावरचे प्रतिसाद, प्रतिसादावरचे प्रतिसाद, मध्येच एखादा विपु उचकपाचक या सगळ्यामधुन मी माझी करमणुक करत असते. इथल्या काही सदस्यांबद्दल बोलताना (नवर्‍यासोबत काही विषय आला तर ) तर मी जणु माझी खुप जुनी ओळख असल्यासारखी बोलत असते. सगळ्यांना भेटायला मला खुप आवडेल.

४ वर्षे झाली मी वविची घोषणा, गटगची तयारी बघते प्रत्येकवेळीस मला यावसे वाटते पण मी वृतांत वाचुनच समाधान मानते. यावेळेस नवर्‍याला विचारले जाऊया का तर तो हो म्हणाला पण वर म्हंटल्याप्रमाणे मलाच कॉन्फिडन्सची कमी आहे. विपुमधुन जरी बोलणे सुरु असले तर थोडीतर ओळख असते पण इथे तर मी अगदीच नवखी वाटेल. : )
पियु आणि अश्विनी सारखा माझापण प्रॉब्लेम आहे की नवर्‍याला हे जग फसवं वाटतं, तो कुणात पटकन मिक्स होत नाही. कदाचित त्याने यंदा होकार दिला कारण तुमची मला झालेली मदत. पण तो तिथे मिक्स होईल का याबाबत शंका आहे.

<<माबोवर जास्त वेळ उपस्थित असलेल्या सदस्यांची जर सरासरी काढली तर मी टॉप १० मध्ये येईल फिदीफिदी पण माझ्या उपस्थितीची जाणिव कोणालाच नसते कारण मी फक्त वाचनमात्र. नविन लेखन, जुन्या लेखनावरचे प्रतिसाद, प्रतिसादावरचे प्रतिसाद, मध्येच एखादा विपु उचकपाचक या सगळ्यामधुन मी माझी करमणुक करत असते. >>

निल्सन अहो हे मीच लिहिलय की काय असं वाट्लं क्षणभर Happy

निल्सन,

पहिले काही वर्ष मी ही तुमच्या सारखा वाचक च होतो. २००९ ला विन्याने फोन केलेला. मल्ल्या, काहीही कर आणि वविला ये. विन्या सोडला तर कोणीच ओळखीचं नव्हतं. कट्ट्यावरची काही टाळकी, कट्ट्यावरच्या गप्पा एवढंच. पण तो दिवस आणि आजचा दिवस, विन्याला अजुन कोसतोय मी. पण त्याच्यामुळे एक एक अवली आणि नमुने माबोकर जिवलग झालेत. इथे टाकलेल्या पोस्ट वरुन माणसे जज करणे ही मोठी चुक आहे हे त्या पहिल्या वविमध्ये कळालं. इथे वचा वचा भांडणारी माणसे, हक्कानी बोलायला लागली. हे सर्व कधी झालं हे लक्षात सुध्दा आलं नाही. इतर वेळेत माबोवर यायला जमत नाही, पण ववी..... सोडायचं नाही.

एकच दिवस असतो, पण फुल्ल धमाल. एवढी कि पुढच्या वविची ओढ ठेउन जातो.

खर सांगू का? मला पहिला ववि वगैरे काहीही आठवत नाही करण मी प्रत्येक ववि मधेतितकीच धमाल केलीये.
मुळात मला कधीच वाटलं नाही की आपण या ग्रूपमधे एकटे पडू, बोअर होऊ! का ते माहीत नाही.
पण प्रत्येक ववि ऑसम होता.

ववि म्हणजे खरचच स्ट्रेस बस्टर आहे लोकहो! मागच्या वर्षी माझ्या घरात मोठं आजारपण सुरू होतं तरीही मी आणी बहिण आवर्जुन वविला गेलेलो. कारण मला माहीत होतं इट वॉज वर्थ!

ज्यांना ज्यांना जराही शंका आहे की ग्रूपिझम होईल का? मला बोअर होईल का? या लोकांना मी ओळखत नाही त्यांच्या बरोबर मला करमेल का वगैरे वगैरे वगैरे त्यांना एवढंच सांगते एकदा जाऊन तर बघा. नाही आवडलं अगदीच तर हजार रुपये दान केले असं समजा पण जाऊन तर बघा

>>> मुद्दाम होऊन तुमचा कंफर्ट झोन कोणी डिस्टर्ब करायला जात नाही. <<<<
हे अगदी पटलं. मलाही गर्दीचा भाग होता येत नाही, खुप जवळून ओळखीचे असल्याशिवाय बोलता येत नाही, वगैरे वगैरे..... पण तरीही जेव्हा शक्य असेल, तेव्हा मी वविला जातोच जातो.
अशी कल्पना करतो की बसने/रेल्वेने प्रवास करतोय, आजुबाजुला एकही ओळखिचे नाहीये, तर प्रवास करणे आपण टाळतो का? नाही..... अन ती बस्/रेल्वे काहि कारणाने बंद पडली/रस्त्यावरच तासनतास अडकुन पडायला झाले, की आपोआप बाकिच्यांशी बोलणेचालणे सुरु होते, होते ना? माझा तरी तसाच अनुभव आहे.
अन मग तितका काळ, आपण आपोआप त्या "गर्दीचा" भाग होऊन जातो.
वर्षातले ३६४ दिवस आपापल्या कंफर्टझोनला कुरवाळत जगतच असतो, पण कधीतरी, क्वचित येऊ शकणार्‍या वरीलसारख्या प्रसंगाची सवय असावी, हाडामासाच्या माणसांशी संवाद साधण्यात आपण कुठे कमी पडु नये इत्यादि अनेक कारणांनी मी ववि च्या गर्दीत सहभागी होतो. वय झालय, तरी बाकीच्यांचि तरुणाई बघुन हरखतो, त्यांच्यासारखे वागताबोलता उधळता येणार नसले, तरी त्यांचा दंगामस्ती हास्यविनोद दुरुनच गालातल्या गालात हसत बघत रहातो. मला कित्येक गोष्टी करता येत नाहीत तब्येतीमुळे, थंड पाण्यात उतरता येत नाही, पोहता येत नाही, आरडाओरडा करता येत नाही, पण इतरांना तसे करताना बघुन मला "दु:खही" होत नाही, आनंदच होतो. ढोल लेझिम चा गजर दुमदुमू लागला की आपलेही हात पाय आपसुक ताल धरतात, तितका ताल मी वविमधे धरतोच धरतो. Happy

कोणीही माझा "कंफर्ट झोन" बिघडवायला येत नाही. होय, अगदी "माझा तो पुरातन शत्रुपक्षही" तसे काहि करीत नाही. Proud

दुसरे असे की "मी म्हणजे कोणी मोठा/विशेष" अशी कणभरही भावना मनात ठेवत नसल्याने, तिथे येणारे सर्वच जण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात/बाबीत/कौशल्यात्/परिस्थितीत माझ्यापेक्षा कितीतरी उजवे/श्रेष्ठ आहेतच हे ज्ञात असल्याने, तिथे येणार्‍यांची ती ती वैशिष्ट्ये अजमावणे, बघणे, अनुकरणास काही कण गोळा करणे हे प्रत्यही होत रहाते. तिथे येणारे सगळेच जण मला सिनियर असतात अन मी त्यांच्यापुढे लिंबुटिंबु असतो, त्यामुळे माझ्या कोणत्याच स्वरुपाच्या "अहं" ला तिथे धक्का लागणार नसतो. त्यामुळे वविला जाणे मला आंतरिक रित्या सुखकारकच होते.
समोरच्या लहानथोर स्त्रीपुरुष प्रत्येक व्यक्तिमत्वाचा "आदरच" ठेवावा हे शिकण्याकरता मी वर्षादोनवर्षातुन एकदा तरी वविला हजेरि लावतोच. व ती शिकवण बाकी काळ उपयोगात आणतो. Happy

वाह.. मस्तच प्रतिसाद, सगळ्यांचेच...
मी ही प्रथम वविला असाच विचार करत होते. पण माझ्या साबा पण एका ववि ला जाऊन येऊन सुध्धा आता विचारतायेत कि ववि कधी म्हणुन.
लेक वय वर्षे साडे तीन तरिही तिच्या मायबोली हे नाव आणि मायबोली चा स्विमिंग पुल लक्षात राहिलाय. मे बी वयाच्या ५ व्या महिन्यात पण ववि एन्जॉय केल्यामुळे असेल. :लाजः
असो. लवकरात लवकर नोंदणी करा. नंतर वृतांत वाचुन खुप हळहळ होते... स्वानुभव.. Happy

निल्सन नेकी और पुछ्पुछ? प्लिज या वविला येच. मि तुला सांगते तुला पश्चाताप होणार नाही.
आणि हे जग आभासी नसून एकदम रियल आहे याची खात्री पटेल.

शिवाय माबोवर पडिक असणारी मी पण एक आहे बरं का. हापिसात आलं की आऊटलूक सोबत पहिलं काय उघडत असेन तर माबो. दोन्ही खिडक्या दिवसभर सुरूच असतात.

अजुन एक ठासून सांगु ईच्छिते की, हे इथले लोक इथे ऑनलाईन जितका धिर देतात किंवा सांभाळून घेतात, त्याच्या कितीतरी पट प्रत्यक्षात धीर देतात किंवा सांभाळून घेतात.

मी अतिशय अभिमानाने सांगू ईच्छिते की आजतागायत मी जितके ववि अटेंड केले, त्यात कधीही एक छोटा वाद, भांडण झालेलं पाहिलं नाहिये. नॉर्मली एका विशिष्ट वयोगटातले लोक असले की काही ना काही कारणावरून ग्रुप मध्ये तणाव निर्माण होतो हे मी पाहिलं आहे, पण वविला तसं कधीच झालेलं पाहिलं नाहिये. (टच वूड) किंवा त्यानंतर कधीच कुणाची निगेटिव्ह अशी टिपण्णी ऐकली नाहिये वविबद्दल किंवा लोकांबद्दल. उलट एकदा आलेले लोक पुन्हा येण्याची ईच्छा प्रदर्शित करतात आणि जमेल तितके ववि अटेंड करतातच.

दुसरी गोष्ट ग्रुपिझम....वविला सगळेच ग्रुप आपले असतात. इथे नाही का आपण कोणत्याही धाग्यावर घुसून प्रतिक्रिया देत? तसंच तिथे पण कुठेही घुसून गप्पा मारायच्या. मला आठवतंय यु केज च्या एका वविला मी ब्रेकफास्ट सुरू केला तेव्हा एका टेबलावर आणि नंतर पुन्हा दुसरी फेरी घेउन आले आणि तिसर्‍याच टेबलावर जाऊन बसले होते.

हे सगळं सांगून कळणार नाही, अनुभव घेणंच इष्ट. Happy

दक्षे, छान आहे धागा. Happy
मी ३-४ वविला आलो होतो. एका वविला तर मी संयोजन समितीत पण होतो (हे बहुतेक कुणाला माहीत नसेल) Happy

ज्या ज्या वेळी मी वविला आलो, त्या त्या वेळी खुप एंजॉय केले. खुप ओळखी झाल्या. ज्या आयडी वाचत होतो त्यांना प्रत्यक्ष भेटलो.
पण नंतर कामामुळे जमले नाही. क्धी ऑफीसची तर कधी घरची कामे यात व्यस्त होतो.
नंतर बराच काळ (३ - ४ वर्षे) मी माबोवर पण नव्ह्तो त्यामुळे ववि कधी आला अन गेला हे पण कळले नव्हते.
आज सहज म्हणुन माबोवर आलो आणि वविची चर्चा वाचुन परत वविला जावे का असा विचार आला.
आत्ता माहीत नाही पण येत्या ७-८ दिवसात नक्की करेन यायचे की नाही ते.
सध्या थोडा हेल्थ प्रॉब्लेम आहे पण १५ दिवसात ठीक होईल असे वाटतेय Happy

मी आलो तर ठीकच आणि नाही आलो तर तुम्ही एंजॉय करा. मी वृतांत वाचेन Happy

>>>> सध्या थोडा हेल्थ प्रॉब्लेम आहे पण १५ दिवसात ठीक होईल असे वाटतेय <<<<
अब्बे, हेल्थ प्रॉब्लेम "ठीकठाक" करायलाच वविला ये.... Happy तुला बशीतुन फुलासारखे जपुन आणुनेऊ !

दक्षिणा, मल्लीनाथ, रीया, लंबुजी, तुम्हा सगळ्यांच्याच प्रतिक्रिया वाचुन आता ओढ लागली आहे वविला येण्याची Happy
शक्यतो जमवतेच यंदा.

रीया, गेल्या वविच्या वृतांतात तु केलेली धमाल वाचली आहे, त्यामुळे यंदाही जमवचं.

दक्षिणा, माझे नक्की झालं तर तुला त्रास देणार बरं का मी Wink सोबत काय काय घ्यायचे त्यासाठी. पहिलटकरीण असणार आहे ना मी, त्यामुळे जरा नवलाई Lol

किंवा एखादा धागा काढ ज्यात जे येणार आहेत त्यांच्यासाठी. सोबत घेऊन येणार्‍या वस्तुंबद्दल मग त्यात कपडे, लहान मुलांची औषधे, खाऊ सगळचं आलं Happy

मी अतिशय अभिमानाने सांगू ईच्छिते की आजतागायत मी जितके ववि अटेंड केले, त्यात कधीही एक छोटा वाद, भांडण झालेलं पाहिलं नाहिये.
अरे ही चक्क खोटं बोलतेय. Proud दर वर्षी माझ्या जिवावर उठलेली अस्तेस की. मी जोरात पळु शकतो म्हणुन नशीब माझं. Wink

Pages