मायबोली वर्षाविहार आणि मी

Posted
2 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago
Time to
read
1’

माझा मायबोलीवरचा वावर हा १० वर्षापेक्षा अधिक आहे, हळूहळू ती आयुष्याचा अविभाज्य घटक कधी बनली हे मलाही सांगता येणार नाही. इथे नेट वर लिहिताना लोक अतिशय मोकळेपणी बोलतात. पण वर्षाविहाराला येताना त्यांची रोडावलेली संख्या पाहून मला वाईट वाटते. मी ही मधले अनेक ववि मिस केलेत, पण त्यानंतर संयोजन समितीत कधी खेचले गेले कळलंच नाही. फक्त संयोजनाचे काम बदलते,कधी ववी, कधी सांस कधी टिशर्ट. पुण्यातून खंदे असे मयुरेश, योकु, मल्लि आणि मुंबईचे हमखास कलाकार म्हणजे विनय भिडे, घारू, नील, आणि मुग्धा. मुग्धा तर तशी बर्‍यापैकी नविन असल्यापासूनच माबोच्या वविसंयोजनात दाखल झाली.
खास करून पुण्याहून येणार्‍यांची संख्या एका वर्षाविहारालाच मला वाटतंय ३०-३२ होती बाकी वेळेला त्यापेक्षा कमीच. त्याविरूद्ध मुंबईची लोकसंख्या बर्‍यापैकी असते.

वर्षाविहाराला येणं आणि तिथे येण्यातली मजा ह्या फक्त अनुभवायच्या गोष्टी आहेत. काही लोक अत्यंत छोट्या अडचणी मोठ्या मानून या आनंदाला मुकतात. मला नेहमी वाटते की आंतरजालावर आम्ही म्हणजे कट्टेकर, कोपुकर आणि मिक्स असे जेव्हा वविला भेटतो तेव्हाचा आनंद अवर्णनीय असतो. एका दिवसात भरलेलं हे पेट्रोल वर्षभर पुरतं. मी माझ्यापुरती तरी निदान ववीची वाट आतुरतेने पहात असते.

पण तुमच्यापैकी ज्यांनी माबोवर रेग्युलर वावर असुनही ववी एकदा पण अटेंड केला नाहिये त्यांच्या मनात ववीचं नक्की चित्र काय आहे? किंवा त्यांच्या वविला येण्याचा नक्की अडचणी काय आहेत?

मला जाणून घ्यायला आवडेल. सर्वात कॉमन अडचण मी ऐकली आहे ती म्हणजे "मी कधीच कुणाला प्रत्यक्ष भेटले/लो नाहिये, ओळख नसताना कसं येणार?
सर्वात पहिला ववी जो मी अटेंड केला होता त्याचं नाव अंबा (इंग्रजीत AMBA) अखिल मायबोली... पुढे काय होतं विसरले. २ सुमो भरून लोक सिंहगडावर गेलो होतो. त्यातले काही लोक मला आठवतायत मयुरेश, दिनेश, अजय गल्लेवाले, संपदा (डॅफोडिल), सत्यजित इ. माझी सुद्धा कुण्णाशी ओळख नव्हती. आणि मला एक अनामिक भिती सुद्धा होती की बाप रे आपण जातोय खरे...
पण अनुभव प्रचंड वेगळा आणि सुरेख होता. वविच असं नाही पण इथे सुद्धा आंतरजालावर विविध लोकांबरोबर पहिल्यांदा बोलताना कधीच मला परकेपणाची भावना झाली नाही.
असे अनेक लोक आहेत ज्यांना मी अजून भेटले नाहीये, पण त्यांच्याशी रेग्युलर टच मध्ये असते फोन किंवा ईमेल (पैकी एक वेका) कट्टेकर तर माझे जन्माचे सोबती झालेत आता.

एका व्यक्तीचं खास कौतुक करीन इथे - लिंबू.... हा माणूस कितीही अडचणी असल्या तरिही प्रत्येक ववीला हजेरी लावतोच ते ही स्वतः ड्राईव्ह करत.

मनात कोणतीही शंका असेल तर इथे मोकळेपणी बोला, मला तुमची अडचण जाणून घ्यायला आवडेल. ववीला रेग्युलर येणार्‍या लोकांना जो आनंद मिळतो तो आनंद अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचावा असे मनापासून वाटते. पण घोड्याला पाण्यापर्यंत आणणे आपले काम, पिणे पिणे हे त्याचे ....

तेव्हा घोडे हो... आपलं लोकहो, जरा पाऊल पुढे टाका, अडचणी सांगा, आमच्या ताकदीत असेल तर त्यांचं निवारण करून आपल्याला ववी मध्ये सहभागी करून घ्यायला अत्यंत आनंद होईल.

विषय: 
प्रकार: 

मला संशय होताच मल्ली, आता खात्री झाल्ये.
दक्षिणेच्या दहशतीमुळेच खूप जण येत नसणार Wink Light 1

मी पण हेच कारण सांगावं झालं Proud

मजा जाऊद्या पण एकदा देखिल न येता ववि म्हणजे मस्ती, ववि म्हणजे धमाल,
ववि म्हणजे शाळकरी वयात परत घेऊन जाणारी सहल,
याल तर वेडे व्हाल न याल तर पस्तावाल
अशीच प्रतिमा आहे.

न येण्याचे प्रमुख कारण म्हणजे मी भाग घेत असलेल्या मॅरॅथॉनादी स्पर्धा. त्याच्या लाँग रन्स ज्या साधारण २५किमीच्या आसपास आलेल्या असतात जुलै मधे त्या रविवारीच असतात त्या चुकवून चालत नाहीत. त्यामुळे मनात अढी वगैरे नसूनही येता येत नाही.

तर लोकहो वविला जा, आयडीमागचे चेहरे पहा, मस्त मजा करा.

हिम्या, ३१ ला स्पर्धा नाहीच्चे पण ट्रेनिंग मिस होतं. Sad
पण या वेळेस बघू कामशेतला आहे म्हणजे अगदी पळत नाही तरी सायकलवर येता येईल. पण माझ्या परतीच्या सायकलसकटच्या प्रवासाचा पत्कर घेणारं कोणी मिळालं बरं पडेल.
बघू निघेल काहीतरी मार्ग Happy

दक्षिणेच्या दहशतीमुळेच खूप जण येत नसणार >>> हर्पेन जगासमोर कोण बरं "मुस्काट फोडून घेणार?" Wink (अजिबात दिवा, मुंब्रा, कळवा ठाणे देणार नाही ) Lol

८ वर्ष झाले मी मायबोली वर येते. पण जास्त करून वाचक म्हणूनच वावर असतो.
आधी तर ईथे पडीक असायचे, जुनी मायबोली ते नवी मायबोलीवरील सगळे धागे वाचायचे.
कोणताही विषय असो ईथे त्यावर उपाय सापडतोच, छान चर्चाही झालेली असते. त्यामुळे कोणाशी विशेष काही विचारायची/बोलायची वेळ नाही आली. त्यामुळे ओळखही नाही झाली.

ईथे गटगला जायचा विचार मनात खूप वेळा आला, पण आपण कोणालाच ओळखत नाही तर जाऊन करणार काय?
किंवा आपण तिथे जाऊन एकटे पडू असे वाटते.

आता हा धागा वाचून वाटते कि वविच्या वेळी मी पुण्यात असेल तर एकदा जाऊन बघायला हवे.
धन्यवाद दक्षिणा Happy

दक्षिणा, तू अगदी बाफ काढून विचारते आहेस म्हणून ही पोस्ट.

मी मायबोलीवर यायला लागल्यापासून अमेरिकेत होतो आणि वविच्या काळात भारतात कधीच नव्हतो. दरम्यान अमेरिकेत आणि भारतात अनेक गटगांना हजेरी लावली. इथे अगदी फ्लाईटची तिकिटं काढून वगैरे गटगांना गेलो. वविचे बाफ दरवेळी वाचायचो आणि जेव्हा भारतात असेन तेव्हा जमवू असं ठरवायचो. दरम्यानच्या काळात कुठल्यातरी एका वविचे फोटो मायबोलीवर प्रकाशित झाले होते. मी याधी अनेक पावसाळी सहलींना गेलो आहे, पाऊस, पाणी, रेनडान्स, ओली-उघडी लोकं, दंगामस्ती ह्याच्याशी काहीही वावडं नाही. पण ते फोटो अगदीच अव्यवस्थित (मागे वाहत्याबाफावरच्या चर्चेत कोणीतरी 'ओंगळ' हा शब्द वापरला होता. त्यातला 'किळस' हा अर्थ वगळून काहीसं तसचं..) वाटले होते. त्या मुडमध्ये किंवा वातावरणात काही वाटलं नसतं. पण खरं सांगायचं तर ते फोटो पाहून ववि हा प्रकार मनातून उतरला. म्हणजे मजा येत असेल खूप पण हे "छान" नाहीये आणि आपल्याला आवडेल असं वाटत नाही असं काहीतरी डोक्यात बसलं.

मध्यंतरी दोन वर्षे भारतात होतो त्यातल्या पहिल्या वर्षी शक्य नव्हतं. पण नंतरच्या वर्षी मात्र यावसं वाटलं नाही.
हिम्या, श्यामली, मयुरेश, मंजिरी वगैरे मंडळींनी का येत नाहीस वगैरे विचारलं होतं पण तेव्हा त्यांना काही सांगितलं नाही. ही अडचण नाहीये, संयोजन समितीने करण्यासारखं निराकरण वगैरेही नाहीये. उगीच काहीतरी डोक्यात बसलं असंही असू शकेल, पण हेच कारण आहे.

काही लोक अत्यंत छोट्या अडचणी मोठ्या मानून या आनंदाला मुकतात. >>>> ह्या वाक्याचं प्रयोजन कळलं नाही. अडचणी छोट्या की मोठ्या हे ज्याचं त्याला ठरवू द्यात ना. आपल्याला प्रत्येकाची सगळी परिस्थिती थोडीच माहीत असते.

काही लोक अत्यंत छोट्या अडचणी मोठ्या मानून या आनंदाला मुकतात. >>>> ह्या वाक्याचं प्रयोजन कळलं नाही. अडचणी छोट्या की मोठ्या हे ज्याचं त्याला ठरवू द्यात ना.
>> पराग, पहिल्यांदा या गोष्टीचं उत्तर देते. अत्यंत छोट्या अडचणी म्हणजे, मी नवखा आहे, कुणाला ओळखत नाही, गृपिझम झालं तर? मला कुणी सामावून घेतलं नाही तर? या अडचणींना मी छोट्या असून मोठं मानणं असं लिहिलं आहे. बाकी कोणत्याही अडचणी ह्या ज्याच्या त्याच्या आहेत आणि त्या मोठ्या का छोट्या हे ठरवणं माझं काम नक्कीच नाही.
या बाफचा उद्देश लोकांच्या मनात इथल्या काही गोष्टींबद्दल (वर नमूद केलेल्या) भिती किंवा अढी घालवणे व त्यांना वविला येण्यास प्रोत्साहित करणे इतकाच आहे,

दुसरी गोष्ट.. वविच्या फोटोजची. कोणत्या वविचे फोटो तु पाहिलेस आणि त्यात ओंगळ असं काय वाटलं हे मला माहित नाही, शेवटी प्रत्येकाची दृष्टी आणि दृष्टिकोन निरनिराळा असतो.
माझ्या आठवणीप्रमाणे वविला कोणतेही ओंगळ किंवा भोंगळ प्रकार होत नाहीत ( या बाबतीत मी ठाम आहे.) त्या शिवाय काही वर्षापासून प्रत्येक वविला संयोजक प्रत्येक सभासदाकडून त्याचा/तिचा कन्सेन्ट घेतात फोटो प्रकाशित करण्या बाबत.
आणि सार्वजनिक बाफवर फक्त खाण्याचे, बस चे, स्विमिंगपुलचे आणि रिसॉर्टचे इतकेच फोटो प्रकाशित केले जातात. असो... हे स्पष्टिकरण नाही, फक्त मी जे अनुभवत आले आहे ते इथे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. उलट तुझ्या फोटोबद्दलच्या प्रतिक्रियेवरून अजून एक गोष्ट आणखिनच अभिमानाने सांगु ईच्छिते की इतके पुरूष, आणि इतक्या स्त्रिया वविला असतात पण आजतागायत कधीही एक छोटासा सुद्धा प्रसंग ज्याची निंदा करावा असा .. घडलेला नाही.

बाकी एकदाही वविला न येता, फक्त फोटो पाहून त्याबद्दल मनात नकारार्थी प्रतिमा बनवून घेणं हे हास्यास्पद आहे. असो.....

फक्त फोटो पाहून त्याबद्दल मनात नकारार्थी प्रतिमा बनवून घेणं हे हास्यास्पद आहे. >>>>> कारणं सांगा म्हणून बाफ काढायचा, सांगितलं तर त्याला हास्यास्पद म्हणायचं? Happy (पटत नसेल तर तसं म्हण, कारण ते अगदीच शक्य आहे.)

सार्वजनिक बाफवर फक्त खाण्याचे, बस चे, स्विमिंगपुलचे आणि रिसॉर्टचे इतकेच फोटो प्रकाशित केले जातात. >>>> ते फोटो नंतर काढून टाकले असतील तर माहीत नाही. पण मी तरी ते इथेच पाहिले होते.

आजतागायत कधीही एक छोटासा सुद्धा प्रसंग ज्याची निंदा करावा असा .. घडलेला नाही. >>>> मी माझ्या पोष्टीत कुठेही ओंगळ, भोंगळ, निंदनीय प्रकार होतात असं कुठेही म्हटलेलं नाही. मायबोलीचा अधिकृत उपक्रम असल्याने तसं काही होत असेल किंवा होईल अस वाटतही नाही. मी फक्त माझं नकारात्नम मत का तयार झालं तेव्हडच सांगितलं आहे.

रीया, गेल्या वविच्या वृतांतात तु केलेली धमाल वाचली आहे, त्यामुळे यंदाही जमवचं.
>>
यावर्षी दुरदेशी आहे मी Sad गाण्यांची सिडी पाठवून देते. धम्माल करा Happy

मल्ल्या, तूही छळछळ छळतोस मला... दक्षुतैला काय बोलतोस रे Angry

पण ते फोटो अगदीच अव्यवस्थित (मागे वाहत्याबाफावरच्या चर्चेत कोणीतरी 'ओंगळ' हा शब्द वापरला होता. त्यातला 'किळस' हा अर्थ वगळून काहीसं तसचं..) वाटले होते...>>> तू कधी आणि कुठले फोटोज पाहिले होते माहित नाही पग्या.कारण फोटोंच्या बाबतीत आपण खूप काळजी घेत असतो. आणि वविला न येण्याचं हे कारण तर मी पहिल्यांदाच ऐकतोय. Happy

वविला एकदाही न येता तुझं असं विधान करणं मात्र अजिबात पटलं नाही.

शक्य असूनही वविला न येण्याचं कारणच ते होतं ना. Happy जर आलो असतो तर हे सगळे मुद्दे आणि इथे लिहायची वेळच आली नसती. मी वर लिहिलं तसं हा माझ्या डोक्यात बसलेला समज असू शकतो. पण इथे कारणं विचारली गेली (ती ही संयोजनात अनेक वर्ष काम केलेल्या व्यक्तिकडून) म्हणून मी सांगितलं.
असो. जे होतं ते लिहून झालं ह्यापुढे अजून काही लिहीण्यासारखं नाही.

चांगला विचार.

माझा माबो कालवधी बघता नविन माबोकर म्हणायला हरकत नाही. जे वाटतेय ते सांगते.
वाचन हा मुख्य हेतु म्हणुन माबोकर झाले. मुळात स्वभाव नव्या नव्या लोकांशी बोलणे आणि मैत्री करणे हे ही जमते, आवडते.
इथे काही ग्रुप्स मधे सामिल होण्याचा प्रयत्न ही केला, फ़ारसा प्रतिसाद मिळला नाही. एखाद्याला टाळावे कसे व अनुल्लेखाने मारावे कसे हे अनुभवले. थोडी नाराज झाले.
पण 'त्या' बाजुने विचार करता नव्या सुने लाच जमवुन घ्यावे लागते हे पटले. मग परत प्रयत्न केले. पण नाही जमले. मग वाटले की ववि ला यावे (मागच्या ) कदाचीत प्रत्यक्ष ओळख झाल्यावर आपल्याला समावुन घेतील, पण त्याधी एका ग्रुप चे गटग होते..त्या ग्रुप ची मी सदस्य ही होते तिथे जावे वाटले, पण एकट पडण्याची काळजी वाटली, नाही गेले. त्या गटग च्या वृतांत वाचला, एका नविन सदस्याची अनुल्लेखाने चाललेली गंमत वाचली...ती गंमतच असेल कदाचीत पण असे वाटले हे सहन नसते झाले.
मग ठरवले छान छान वाचायचे, आवडले की लगेच आभिप्राय द्यायचा.
असे वाटते की गटग, वविला येण्यासाठी काही एलिजिब्लिटी लागते.
कोणाबद्दल वैयक्तिक आकस नाही. जे वाटले ते मांडले आहे. कोणि दुखावले गेले असाल तर क्षमस्व!
या सगळ्या ला अपवाद 'रांगोळ्या' कंपु.

>>>> पण ते फोटो अगदीच अव्यवस्थित (मागे वाहत्याबाफावरच्या चर्चेत कोणीतरी 'ओंगळ' हा शब्द वापरला होता. त्यातला 'किळस' हा अर्थ वगळून काहीसं तसचं..) वाटले होते. <<<<
कमॉन पराग..... यावर्षी तुला "चिखलात माखलेले" फोटो बघायला मिळू शकतील असे वाटते.... Proud मग काय वाटेल तुला हे "तुझे तुलाच ठरवु" देतोय... Lol
आपल्याला बोवा आवडेल चिखलात माखायला, आयुर्वेदिक मृत्तीका स्नान असे म्हणेन.... जमल्यास अंगावरचा चिखल उन्हात वाळवित बसेन, मग कातडीला ओढा लागेल, तडतडेल, मग स्वच्छ पाण्यात बुचकळून निघुन अंग असे हलके फुलके होऊन जाइल ना की बास्स रे बास... दर वेळेस डिस्कव्हरीवर काझीरंगाच्या गेंड्यांना वा आफ्रिकेतील हत्तींना चिखलात मढवुन घेताना पाहुन त्यांचा हेवा वाटुन घेण्याचे पुरे झाले..... Wink
तर आता मुद्दा असा की, वविच्या किनार्‍यावर बसुन लांबुनच बघुन मत बनवु नकोस, वविमधे उडी मार, ये,. आपण खेळू मस्त पैकी..... Happy
वाढलेल्या वयामुळे आलेला कृत्रिम "ज्येष्ठत्वाचा" सततचा बुरखा थोडा काळ तरी काढुन टाकण्यासाठी, मनाच्या कोपर्‍यात अजुनही चिकटुन अस्तित्व टिकवुन धरुन असलेल्या शैशत्वास जपण्यासाठी, त्यास कुरवाळून पुन्हा मनाच्या सांदीकोपर्‍यात जपुन ठेवण्यासाठी वविला येण्याशिवाय पर्याय नाही. (असे माझे मत).

वाढलेल्या वयामुळे आलेला कृत्रिम "ज्येष्ठत्वाचा" सततचा बुरखा थोडा काळ तरी काढुन टाकण्यासाठी, मनाच्या कोपर्‍यात अजुनही चिकटुन अस्तित्व टिकवुन धरुन असलेल्या शैशत्वास जपण्यासाठी, त्यास कुरवाळून पुन्हा मनाच्या सांदीकोपर्‍यात जपुन ठेवण्यासाठी वविला येण्याशिवाय पर्याय नाही...>>> मस्त...:). तसा तू चिरतरूण आहेस लिंब्या.. Proud

निरा, वविला कंपूबाजी वगैरे प्रकार बाजूला ठेवला जातो. सांस्कृतिक खेळ खेळताना लोकांचे गटच संयोजक अश्या रितीने पाडतात की सगळे लोक्स एकमेकांत मिक्स होतील. अगदी मायबोलीकर नसलेल्या `अहो' आणि `अगं ' ना सुद्धा त्यात सामील करून घेतलं जातं.

बाफवर तुम्हाला आलेला अनुभव आणि वविचा अनुभव हा वेगळा असू शकतो. पण हे तुम्हाला वविला आल्याशिवाय कळ्णार नाही. Happy

निरा, मुळात एखाद्या बीबीवर अनुल्लेख केला म्हणुन त्याच बीबीवरच्या गटगलाही तुमचा अनुल्लेख होईल हेच चुकीचं आहे Happy समोरासमोर बोलायला गेलात तर इथली प्रत्येक व्यक्ती फार चांगली आणि वेगळी आहे Happy

गटगलाही गेलीस तरी कोणीही अनुल्लेख करणार नाही. आपण वृत्तांतात वाचतो ती टिंगल त्या त्या आयडीच्या पर्मिशननेच केली जाते गं, कोणाला वाईट वाटत असेल तर नाही करत कोणीही टिंगल. मी स्वतः बरीच गटग केलीयेत त्यामुळे सांगू शकते ठामपणे.

तुला माझंच एक उदाहरण सांगते - जेंव्हा मी मायबोली जॉईन केलेली तेंव्हा कित्येकदा अनेक बीबींवरच्या अनेकांशी बोलायचा प्रयत्न केला, त्यांनी रिप्लाय नाही दिला, मी त्यांच्याबद्दल काहीही मत बनवण्याआधीच ववि आला आणि त्यांच्यापैकी अनेकांना भेटले. सहजगत्या जाणवलं की प्रत्येक माणुस सदा सर्वकाळ ऑनलाईन नसतो, आपण नविन असतो म्हणून आपल्याला वाटतं मलाच रिप्लाय देत नाहीयेत पण असं नसतं, कित्येकदा ते ओळखीच्या आयड्यांनाही ओळख देत नाहीत. पण हे आयडी एकमेकांना ओळखत/भेटत असल्याने एकमेकांना ओळखून असतात.. वर्चुअल कम्युनिकेशनचा हा ही एक तोटा आहे.

वविची तर गोष्टच वेगळी आहे. तुम्ही एकमेकांना ओळखत नसताना बसमधे चढता आणि ट्र्स्ट मी उतरताना तुम्ही पुढच्या वविचं प्लॅनिंग करून उतरत असता Happy मायबोली वविची ही खासियत आहे. ववि फिवर बराच काळ टिकतो.

साधंच बघ ना - अनोळखी व्यक्ती बसमधे चढली, ओळ्ख इतकेच कीहीची ही कमेंट मी या बीबीवर वाचलीये. आपण पहिलं काम काय करणार - ओळख काढायचा प्रयत्न, मग चांगली ओळख होईपर्यंत वविचं डेस्टिनेशन येतंय, मग दुसर्‍या बशीतल्या लोकांशी ओळख काढण्याचा प्रयत्न, मग जेवण, मग त्यानंतर खेळ आणि सांका आहेतच
हे एवढं होईपर्यंत संध्याकाळ होतेय, टिंगल आणि कुचाळक्या करायला वेळच केंव्हा मिळणार?

वविओळखी बर्‍याच काळ साथ देतात. मला तर वविने बर्‍याच चांगल्या मैत्रिणी दिल्यात. कित्येक आयडी केवळ वविसाठी इथे उगवतात हे माहीतीये का तुला? Happy जाऊन बघ अगं एकदा! आवडलं नाही तर सांग Happy

त्या आधी स्पेशली वेळ काढून सगळे वृत्तांत वाच. मग तुला वविला जायची इच्छा होईलच, मग जा वविला, तिकडे मला मिस कर परत येऊन वृत्तांत लिही, त्यात आवर्जुन रीयाला मिस केलं अस उल्लेख कर Proud

जस्ट गो अ‍ॅण्ड एंजॉय!

ववित 'ग्रुपिझम'ला फारसा स्कोपच दिला जात नाही. बशीतून येणारे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवर हव्या त्या जागा पटकावतात. बशीत शेवटी शेवटी चढणाऱ्यांना बॅक बेंचर्सचा मान दिला जातो. कोणी (आपापले अर्धांग व चिटकीपिटकी सोडून) इतर कोणासाठी 'जागा पकडून' ठेवत नाही. सबब, बसप्रवासात ग्रुपनुसार बसणे शक्यच नसते. त्यात दंगा सुरू झाला, खाऊच्या पिशव्या बाहेर निघाल्या की संगीतसीटांचा खेळ सुरू होतो. 'सारी बस मेरी'!!

वविच्या ठिकाणी वविसंयोजक लोकांना अशा प्रकारे वेगवेगळे खेळ, कार्यक्रम, मनोरंजन वगैरेत बिझी ठेवतात की हा अमका ग्रुप, हा तमका ग्रुप असे होणेच टळते. राहाता राहिले जेवण, नाश्ता व पाण्यात डुंबाडुंबी... जेवणाचे वेळी कोणी ओळखीच्या लोकांबरोबर बसतही असतील, पण संयोजक टेबल टू टेबल फिरत असतात. नव्या लोकांशी ओळख करून घेतात. डुंबाडुंबी - त्या वेळी जनरली बायकांचा एक ग्रुप होतो व पुरूषांचा एक. काहीजण सहकुटुंब डुंबाडुंबी करणे पसंत करतात.

तेव्हा ग्रुपिझमला स्कोप नसतोच!
फक्त मुंबईचा ग्रुप परत जाताना मुंबईच्याच बशीतून परत जातो व पुण्याचा ग्रुप पुण्याच्या बशीतून. तरी तिथेही काही बोचकी एका बशीतून दुसऱ्या बशीत अलगद जाऊन बसतात! Lol

अरुंधती, अगदी अगदी....
अन झाले गृप, तर काय बिघडते? आता हेच बघाना.... आमच्या पुरुषात काही गृप पडतात जे लगेच क्यामेरा काढुन इकडे तिकडे क्लिकक्लिकाट करु लागतात... आजुबाजुला निसर्गच तसा असतो. अन मग काही हौशी त्यांच्या क्यामेरासमोर जाउन उभारतात... अन एक शॉट प्लिज करीत आपलेही फोटो पोझेस देत काढुन घेतात..... हा झाला फोटोग्राफीवाल्यांच्या गृप...
तिकडे काही उत्साही नेहेमीचे लोक, कपडे काढुन केव्हाच पाण्यात डुंबायला गेलेले असतात, काही जण किनार्‍यावरुनच, उतरू की नको, या विचारात रेंगाळत असतात, त्यांना उत्साह्यांपैकी काहीजण प्रोत्साहन देतात, अन बहुतेक सर्व पाण्यात उतरतात..... माझ्यासारख्याला अपवाद करतात वयपरत्वे, पण लिंबोटल्याला मात्र उचलुन घेऊन जातात..... मग तिथे कसरती सुरु होतात, आपापली पोहोण्यातिल वैशिष्ट्ये दाखविली जातात..... हा झाला म्हशीसारखा पाण्यात डुंबणार्‍यांचा गृप... म्हशी एकदा का पाण्यात शिरल्या तर बाहेर निघता निघत नाहीत, हाकलुन बाहेर काढावे लागते, तर हा असा डुंबणार्‍यांचा ग्रुप....

काहींना नाही हे पटत, नाकातोंडात पाणी जायची भिती वाटते, पोहता येत नसते, मग ते मस्त गाण्याच्या तालावर शॉवरखाली भिजायला जातात.... तिथे एक मोठा ग्रुप तयार होतो... शॉवरखाली गाण्याच्या तालावर नाचत नाचत भिजणार्‍यांचा......

आतली बात म्हणजे, तिकडे काहि अग्निहोत्रीही असतात, मग त्यांचा एक गृप बनतो विडीकाडीची देवाणघेवाण होते, पण आडबाजु बघुन सार्वजनिक जागेवर काही न करता त्यांचे अग्निहोत्र एका बाजुला सुरु होते... तो एक ग्रुप ......

काही संयोजनाच्या व्यवस्थेत असतात, तर काही ऐनवेळचे (मजसारखे) स्वयंसेवक उगिचच संयोजनात मदत करण्याच्या मिषाने इकडे तिकडे बागडत असतात... त्यांचा एक वेगळाच ग्रुप तयार होतो.

काही जण स्वतःहूनच, आलेल्या लहान मुलांवर दुरुनच लक्ष ठेवुन असतात....

पुरेसे डुंबुन्/न्हाऊन/बागडुन झाले की खरे तर भुका लागलेल्या असतात... पण वर सांगितलय ना? तसे त्या पाण्यात डुंबणार्‍यांना हाकुन हाकुन बाहेर काढुन आणावे लागते, ते करायला एक गृप काम करु लागतो.....

मग होते ते जेवण.... जो तो ज्याच्या त्याच्या आवडिप्रमाणे जेवण घेतो... जिथे जागा मिळेल तिथे बसतो.... मग कुणी कुणाला पाणी आणुन देते, कुणी कुणाला अजुन पदार्थ आणून वाढते, तर कुणी हक्काने सांगते की मला अमुक तमुक आणुन देशिल का प्लिऽऽज..... या प्लिज वर जरा जास्तच जोर पडतो बर्का.....

तिकडे सकाली नाष्ट्यावेळेस सालाबादप्रमाणे नेहेमीच्या यशस्वी गोंधळ्यांकडुन जर कॉफी /पेला सांडला गेला नसेल, तर त्याची भरपाई दुपारच्या चहापर्यंत कोण ना कोण तरी करतच.

माझ्यासारखे (मुळातुनच अनुल्लेखित) एकांडे शिलेदार, एका कोपर्‍यात उभारुन सगळी गंमत बघत असतात.... अन मग आता पाण्यात उतरणारच नाही, रिकामटेकडाच आहे, तर सांभाळ लेका आमचे सामानसुमान असे म्हणत मजसारख्याकडे पाण्यात उतरलेल्यांच्या बर्‍याचश्या वस्तु सांभाळायला जमा होतात.... त्यात अगदि पैशाचे पाकीट, फोन, गळ्यातील सोन्याची चेन्/अंगठी पासुन ते लाठी/काठी पर्यंत काहीही जमा होऊ शकते..... तर असा माझ्यासारखा एकखाम्बी तम्बुचा ग्रुपही बनतो... Lol

मग येते सांस.... सांस्कृतिक समिती... ते मात्र अनुभवायलाच हवे.... ! बहुधा सांस्कृतिक समितीमधे नर्सरी/बालवाडी ते महाविद्यालय अशा सर्व ठिकाणी अध्यापनाचे काम केले असल्याचा अनुभव असलेलेच घेत असावेत, अन त्यामुळे आलेले माबोकर वय वर्षे पाच ते पन्नासप्लस या दरम्यानचे काहीही मानुन त्यांच्याकडुन विविध खेळ करुन घेतले जातात..... त्यामुळे अनुभव असा की, निव्वळ खेळणार्‍यांचीच नाही, तर रिसॉर्ट वर आलेल्या इतर बघ्या प्रेक्षकांचीही चांगलीच करमणूक होते... Proud

आता इतक्या सगळ्या घडामोडीत असंख्य गृपस तयार होतात, मोडतात, पुन्हा जुळतात.. अन शेवटी सगळे जण परतायला निघतात, ते परत पुढच्या वर्षी यायच्या बोलीवरच.

गृप बनतात, मोडतात... विश्वास नाहि बसत? अहो लहान मुले, त्यांना शीशू लागली, की देखिल, त्यांच्या नवख्या आयाबाप्यांना काय कुठे कसे घेउन जायचे सांगायला, मार्गदर्शन करायला वेळेस लहान मुलास सोबत करायलाही लोक पुढे होतात, अन मग बनतो त्यांच्याही एक ग्रुप... टॉयलेट सर्व्हिस गृप.... Lol

तेव्हा सांगायचा मुद्दा इतकाच, की ग्रुपिझम ची इतकी काहि भिती बाळगावी, बाऊ करावा अशी ती गोष्टच नाहीये.....

अहो, एकाच लोकल ट्रेन/बसमधुन नियमित प्रवास करणार्‍यांचाही नेहेमीच्या तोंडओळखीने "ग्रुप" बनतो, तर वर्षाचे ३६४ दिवस मायबोलीवर नेटमाध्यमातुन वावरणार्‍यांचा एक मोठा व त्यास उप छोटे छोटे ग्रुप का बनु नयेत?

माझा फंडा एकच आहे याबाबतीत.... एक तर समोर असलेल्या विविध गृपमधे सामिल व्हा.... बाहेर पडा, नवा ग्रुप जॉईन करा... हिंडा फिरा, बोला चाला, बघा, ऐका......
अन ते जमले नाहि, तर तुम्ही जिथे उभे आहात, तिथेच तुमचाच एक गृप तयार करा... नव्हे नव्हे, तो देखिल आपोआप होतच जातो... Happy फक्त ते अनुभवण्यास वविला हजर रहावे लागते

लिंब्या.. यंदा जर वविला येणार असशील तर एक स्पेशल वृत्तांत तुझ्याकडून खास यायलाच पाहिजे..

हे वरती तू जे काही ग्रूपचे लिहिले आहेस ते भन्नाट आहे.

हिम्या, नेहेमीप्रमाणेच माझे नक्की नाही, पण प्रयत्न करतोय. Happy

अन आलोच यंदा, तर एक नक्की, की त्या चिखलाच्या कुंडामधे पाचसहा भाग पाडणार,

मग पाचसहा गृप्स त्या भागांमधे वाटुन उभे करणार,

अन मग एकेका भागाला माबोवरच्या एकेका "जागृत" धाग्याचे नाव देणार.... जसे की कट्टा, अड्डा, वाडा, गड इत्यादी......
अन होउन्द्यात सुरु...... डाग अच्छे होते है..... Lol

उगीच काहीतरी डोक्यात बसलं असंही असू शकेल>>>>>>>> बरोब्बर पराग ( ते तसंच आहे), आणि सगळे प्रतिसाद वाचल्यावर एक लक्षात येईल कि जे ववि ला येऊन गेलेत त्यांचा अनुभव चांगलाच आहे, ज्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे त्यांच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाहि.

रिया मॅडम तुम्ही वविचं वर्णन केल्यामुळे वविला यावंस वाटतय .
वविचे रजिस्ट्रेशन कसे करायचे ते पण सांगा आता, मायबोलीचं ऑफिस कुठे आहे? कोणत्या ऑफिसात जाऊन करु रजिस्ट्रेशन?

Pages