सैराट!!!

Submitted by नंदिनी on 29 April, 2016 - 11:24

सैराट ही एक लव्हस्टोरी आहे. हे आतापर्यंत सर्वांनाच माहित झालं असेल. पिस्तुल्या, फॅंड्रीसारखे वेगळे विषय हाताळणार्या नागराजकडून जेव्हा “लव्हस्टोरी”सादर केली जाते तेव्हा ती केवळ गोडगोडुली प्रेमकथा नसते तर वास्तवाचा पक्का पाया घेऊन उभी राहणारी एक सशक्त पटकथा असते. मराठी चित्रपटांच्या इतिहासामध्ये सैराट हा एक मानाचे स्थान पटकावून बसणार आहे हे आता निश्चितच.

बर्लिन सारख्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमीअर असो, वा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये रिंकू राजगुरुला मिळालेले “स्पेशल मेनशन एवॉर्ड” यामुळे सैराटबद्दल आधीच फार उत्सुकता होती. त्यातही झी मराठीने केलेल्या कल्पक मार्केटिंग आणि प्रसिद्धीमुळे सिनेमाबद्दल रीलीजच्या आधीच वलय तयार झालं होतं. अशा “हाईप” केलेल्या सिनेमांना अपेक्षाभंगाचा फार मॊठा धोका असतो, सुदैवाने सैराट सर्व अपेक्षांना पुरून उरतो आणि एक कंप्ल्लीट एंटरटेनमेंट पॅकेज बनतो.

आर्ची आणि परश्या, एका गावामधले अठराएकोणीस वयोगटामधले दोघं. ती मोठ्या पाटलाच्या घरची. तो गरीबाघरचा, खालच्या जातीमधला. त्याला ती आधीपासून आवडते, मग तिलाही तो आवडू लागतो. दोघं प्रेमात पडतात आणि मग हलकल्लोळ उठतो. मध्यंतरापर्यंत हा सिनेमा अक्षरश: भणभणत राहतो. फेअरीटेल रोमान्स भासावा अशी प्रेमकहाणी पडद्यावर दिसत राहते. या प्रेमकहाणीचा अंत पुढे काय होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही पण तरीही त्या अंतापर्यंत पोचेस्तोवर सैराट आर्ची-परश्याच्या नात्याचे अनेक पदर उलगडून दाखवत राहतो. सिनेमा जिथे संपायचा आहे तिथे संपतो, पण संपल्यानंतर खर्या अर्थाने “आर्ची-परश्याची” प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनामध्ये सुरू राहते.

सोशल नेटवर्कवर “जातीव्यवस्थेवर भीषण भाष्य करणारा सिनेमा” वगैरे बिरूदं याला प्राप्त झाली आहेत. मी त्याच्याशी फारशी सहमत नाही. हा सिनेमा जातीव्यवस्थेवर आधारित नाही, जातीव्यवस्थेच्या नादाला लागून समाजाला पोखरणार्या काही किड्यांबद्दलही हा सिनेमा बोलत नाही. हा सिनेमा बोलतो ते जातीच्या पायी कसला तरी वृथा अहंकार बाळगून गमावलेल्या काही आयुष्यांबद्दल. नागराज एकदाही- एकदाही या दोघांची “जात” सांगत नाही. त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीमधला फरक तो अतिशय हुशारीने दाखवत जातो. बाल्कनीमध्ये नाचणारी आर्ची आणि त्या गाण्याच्या ओळी केवळ तिच्याचसाठी आहेत अशा धुंदीत खाली जमीनीवर नाचणारा परश्या, झाडावर चढताना “अजून वर गेलो तर फांदी मोडेल” म्हणणारा परश्या, कॉलेजात “शब्दांच्या जाती” शिकवणारे प्रोफेसर, मगामधलं पाणी गटागट पिणारा परश्या पण तेच पानी एकही घोट न घेणारी आर्ची अशा अनेक रूपकांमधून मंजुळे कथा दाखवत राहतो. खरंतर हा सिनेमा “बघायची” गोष्ट आहे. सैराटमध्ये सर्वात जास्त सैराट काय चाललं असेल तर ते कॅमेरावर्क. करमाळ्यासारख्या एरवी रूक्ष वाटणार्या ठिकाणी काय अजबगजब शॉट्स घेतलेत!! मी आजवर इतके सिनेमा थेटरात पाहिले पण पक्ष्यांच्या उडत्या थव्या्सारख्या अशक्य सुंदर शॉटला मारलेल्या उत्स्फ़ुर्त टाळ्या-शिट्या पहिल्यांदाच पा्हिल्यात.

कॅमेरावर्कखालोखाल कौतुक आहे ते रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या दोन नवकलाकारांचं. दोघंही इतके नवखे असूनही अप्रतिम अभिनय करतात, किंबहुना ते अभिनय करतात असं वाटतच नाही इतके सच्चे वाटतात. रिंकूच्या वाटयाला आलेली भूमिका ही जास्त जटिल आहे, लाडावलेली मुलगी ते एक जबाबदार व्यक्ती हा भलामोठा पल्ला तिच्या भूमिकेमध्ये ती फारच सशक्त रीत्या दाखवते. तिच्या कॉस्च्युममधला सूक्ष्म पण जाणवणारा बदल पाहता तिच्या भूमिकेसाठी एकंदरीत टीमनेच किती मेहनत घेतली आहे ते समजतं. आकाश ठोसरने खूप समजूतदारपणे काम केलेलं आहे, रिंकूसमोर तो जरा फिका पडला तरी त्याचे काही खास प्रसंग आहेत ज्यात तो खूप उठून दिसतो. खासकरून ती निघून गेल्यावर गळ्याभोवती फास घेऊन रडतानाचा प्रसंग. हो! हा एक स्टीरीओटाईप मंजुळेंनी मोडला आहे, हीरो रडतो चांगला हुंदके देऊन देऊन रडतो. शिवाय, हीरो मार खाताना हीरॉइन येऊन त्याला वाचवते.

सिनेमाचा अजून एक प्लस पॉइण्ट म्हणजे त्याचे संवाद. पूर्ण मराठवाडी शैलीमध्ये असणारे संवाद कुठूनही कृत्रिम वाटत नाहीत. उलट, ल्येका, यती, करती सारखे अस्सल शब्दप्रयोग योग्य ठिकाणी वापरून मजा येत राहते. सल्याच्या घरच्यांशी बोलतानाचा मराठी-हिंदी ठेका तर महान जमलाय. आर्चीच्या वडलांची स्टेजवरून भाषण करायची पद्धत आणि घरी आलेल्या प्राचार्याशी बोलायची पद्धत यातून सिनेमाबद्दल बरंच काही समजत राहतं. छोट्यातली छॊटीपात्रंदेखील आपला पूर्ण ठसा उमटवून जातात.

अजय अतुलच्या संगीताबद्दल बरंच बोलून झालंय, म्हणून आता इतकंच म्हणेन की सिनेमामध्ये असलेली चारही गाणी अतिशय चपखल आहेत आणि कूठेही खटकत नाहीत. याड लागलंचं पिक्चरायझेशन गाण्याइतकंच अप्रतिम आहे.

या सिनेमाचा टेम्प्लेट थोडासा तमिळ सिनेमांसारखा आहे, बहुतेक तमिळ लव्हस्टोरी अशाच असतात. सिनेमाच्या पहिल्या भागावर तर मणीरत्नमची छाप जाणवत राहते. नदीमधली दृश्यं, ऊसाच्या शेतामधले काही शॉट्स, मित्राच्या प्रेमकहाणीसाठी मार खाणारे दोस्तलोक्स, गाण्यांमधून पुढे जाणारी लव्ह्स्टोरी. गावाच्या राजकीय उतरंडीचे दर्शन घडवणारी दृश्यं असोत वा खेड्यांचं अस्सल आधुनिक वर्णन करणारे प्रसंग असोत दाक्षिणात्य सिनेमा अधूनमधून झळकत राहतात. तरीही मंजुळेंची प्रेमकथा मराठी मातीशी शंभर टक्के इमान राखून आहे. फेसबूकवर शोधाशोध करणारे टीनेजर हीरो आणि कॉलेजात शेतात फिरायला ट्रॅक्टर आणि बुलेट चालवणारी नायिका असो, ही प्रेमकथा फार गोजिरी वाटत राहते. अर्थात सर्व काही आलबेल नसतंच. प्रेमकहाणीमध्ये यायचे ते खलनायक एम्ट्री करतातच आणि करायचा तो राडा करतातच. यादरम्यान, घरातून पळून जाणारे नायक-नायिका पाहताना खरोखर ताण येऊ लागतो. आता या प्रेमकथेचा दुर्दैवी अंत होणार, आता.. आता की आता… असं म्हणत म्हणत मध्यंतर येतो आणि प्रेक्षक म्हणून मी सुटकेचा श्वास टाकला. सिनेमाच्या दुसर्या भागात ही प्रेमकहाणी गावामधून बाहेर येते, एका अनोळखी शहरामध्ये हे दोन प्रेमी जीव “आशियाना” बनवतात आणि सुखानं संसार करू लागतात… पण सर्व काही आलबेल होतच नाही आणि सिनेमा संपता संपता मीच सुन्न होऊन जाते.

फॅंड्रीमध्ये जब्यानं कॅमेराला भिरकावलेला दगड हा त्या सिनेमाचा हायपॉइंट होता, सैराटचा शेवटचा शॉटही तसाच हायपॉइंट आहे, त्याबद्दल मला बरंच काही लिहायचं आहे, पण सध्या सिनेमा थेटरामध्ये असेपर्यंत मी त्यावर लिहिणार नाही. केवळ इतक्ंच सांगेन, की इतर सिनेमा जेव्हा संपतात तेव्हा त्यांची कहाणी संपते, पण सैराटची कहाणी मात्र प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये भिरभिरतच राहते. जब्याचा तो दगड तेव्हाही सरळ येऊन घप्पकन बसला होता, याहीवेळी तसाच बसतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सशल, गजानन, जेवणावळीत 'घ्या ना, घ्या ना' असा आग्रह होत असेल, म्हणून 'टेक नो, टेक नो' म्हणत असतील. Proud

>> जेवणावळीत 'घ्या ना, घ्या ना' असा आग्रह होत असेल, म्हणून 'टेक नो, टेक नो' म्हणत असतील

Lol

जेवणावळीत की वरातीतच जाम से जाम टकराने के लिये? Happy

(अवांतराबद्दल क्षमस्व :))

नेहमी मुलींच्या नट्टापट्ट्याचं कौतुक काजळ, लाली, पैंजण, बांगड्या इ इ करण्यापेक्षा मुलांच्या नटण्याची परिसीमा - करून दाढी भारी परफ्यूम मारून आलोया - असं थेट केलेले मला जबरदस्त आवडलेले आहे! संगीत आणि गायनापेक्षा जास्त मार्क अजयला ही ओळ लिहील्याबद्दल! रांगडेपणा आणखी वेगळा काय असतो?
सैराटने मोडलेला आणखी एक स्टीरीओटाईप.

परिसीमा - करून दाढी भारी परफ्यूम मारून आलोया - असं थेट केलेले मला जबरदस्त आवडलेले आहे!>>>> + १००
आनि काहीतरी अवघड स्टेप्स न घेता आरश्यासमोर थांबुन आपण जस नाचु किंवा वरातीत नाचु तश्याच स्टेप्स घेतल्या आहेत.

त्या आजीबाईंची स्टेप्सपण आवडली. डोःबिवलीत आगरी हळदी कार्यक्रम नेहमीच अटेंड करीत असल्याने अशी एखादी आजीबाई अंग सोडून दिलखुलास नाचताना दिसतेच.

टेक्नोवरातीवरुन आठ्वले परवाच एक मित्र रत्नागिरीत एका बड्या धेंडाच्या मुलाच्या लग्नाला जाउन आला. वरात जेव्हा आली तेव्हा नवरा मुलगा व त्याचे मित्र २५-३० चकचकीत टु व्हिलरवर आले म्हणे. (Ducati, Harley Davidson etc.. साधारण १५-२० लाख + वाल्या गाड्या) समोरे ढोल ताशाचा आवाज कमी करण्यासाठी या २५ गाड्यांनी रेज केले अ‍ॅक्सीलरेटर. इतका आवाज झाला की एका गाडीचा रेडीएटर फुटला म्हणे. वेडा झालो मी तो व्हिडीओ बघुन.

आता सैराट नंतर आणखीन एका चित्रपटाची प्रतिक्षा. ...निशिकांत कामत व इरफान खान यांचा " मदारी " .....
FB_IMG_1463069257464_1.jpg

मराठी पाऊल पळते. ........

>> नेहमी मुलींच्या नट्टापट्ट्याचं कौतुक काजळ, लाली, पैंजण, बांगड्या इ इ करण्यापेक्षा मुलांच्या नटण्याची परिसीमा - करून दाढी भारी परफ्यूम मारून आलोया - असं थेट केलेले मला जबरदस्त आवडलेले आहे! संगीत आणि गायनापेक्षा जास्त मार्क अजयला ही ओळ लिहील्याबद्दल!

वेल सेड Happy

नमस्कार नंदिनी,
सैराट पाहिला, बघायचाच होता.तुमचा review वाचून तर नक्की
बघायच ठरविले .एक सुंदर प्रेम कथा , श्रवणिय संगीत आणि अस्वस्थ करणारा शेवट . बराच वेळ मनाशी रेंगाळला, अजुनही रेंगाळतो आहे ................, विचार करायला भाग पाडले . Hats off to Nagraj Manjule. हे दिग्दर्शकाचे यश. परश्या आरची, त्याचे मित्र , आणि इतर व्यक्तीरेखा ही लक्षात रहातात आणि शेवटची भयाण शांतता लक्षात रहाते .

नागराज मंजुळे यांची दुसरी बाजू काल मीडिया ने समोर आणली. सैराट चा शेवट पाहून जस मन हेलावून गेले तसेच ही बातमी वाचून झाल ....
PicsArt_05-13-01.19.36.jpg

ही पण बातमी वाचा
http://m.maharashtratimes.com/maharashtra/pune-news/sairat-directors-wif...

मला खरेखोटे माहित नाही.
दोन वर्तमानपत्रे पूर्ण वेगळी बातमी देतायत म्हणजे कुणावरही विश्वास ठेवायची गरज नाही इतके मला समजते.
बाकी वैयक्तिक आयुष्यात त्याने काय करावे हा त्याचा प्रश्न. दिग्दर्शक म्हणून तो महत्वाचा ठरतोच.

सैराट -2
आर्चि आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या मुलाला एक मुस्लिम यास्मिन दीदी उचलते आणि त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याला घेवून मुंबईला पळून येते तो मुलगा( अमर ) मोठा होतो आणि मुंबईच्या कॉलेज मध्ये त्याचं एका मुलीवर ( राणी ) प्रेम जड़त आणि ती मुलगी म्हणजे प्रिन्स दादा पाटील यांची एकुलती एक सुकन्या आपल्या घरच्यांचा अपमान झाल्यामुळे आणि वडीलांनी आत्महत्या केल्यामुळे प्रिन्स दादा पाटील पण मुंबईला स्थायिक झालेला असतो
त्याची मुलगी ( राणी ) व परशाचा मुलगा ( अमर ) एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात व 2-3 गाणी पण गातात ( ती सर्व अर्थातच अजय-अतुलचीच) आपल्या मुलीच लफडं एका मुस्लिम मुला बरोबर आहे असे समजताच प्रिन्स दादा पाटीलच्या डोळ्यासमोर आर्चि आणि परशा येतात
त्यांना एकमेकापासून वेगळे करण्यासाठी तिला घेवून बिटरगावाला परत येतो इकडे यास्मिन दिदि अमरला तू माझा मुलगा नसून तुझे आई वडील अर्चना आणि प्रशांत आहेत व तुझ्या आई वडिलांना तू लहान आसताना कुणी तरी मारून गेलं आणि तिथून पुढं तुझा संभाळ आम्ही केला अशी सर्व खरी हकिकत अमरला सांगून टाकते हे ऐकून अमरला धक्का बसतो
Interval
आपल्या आईं वडीलाचा इतिहास जाणून घेण्यासाठी अमर बिटरगावाला येतो तिथंच त्याला त्याची प्रियसी राणी म्हणजेच प्रिन्स दादा पाटील यांची मुलगी पुन्हा भेटते तिला पण बिटरगावाला आल्यावर आर्चि आणि परशा यांच्या प्रेमाविषयी व त्यांचा खुन आपल्याच बापानं केला असल्याचे समजते ती हे अमरला सांगते याच दरम्यान अमरला प्रदिप ( लंगड्या), सलीम आणि आनी (आर्चिची मैत्रीण) भेटतात आणि झालेली हकीकत सांगतात आणि मग अमर आपल्या आई-वडीलांच्या खुनाचा बदला घ्याण्याचे ठरवतो त्याला सर्व बिटरगाव पाठिंबा देतं त्यासाठी अमर हवेली वर जातो आणि मोठ्या चलाखीने व हुशारीने प्रिन्स दादा पाटील याच्या तोंडून त्यांचा गुन्ह्याची कबुली संपूर्ण बिटरगावापुढे देण्यासाठी भाग पाडून त्याला पोलीसांच्या ताब्यात देतो (येथे छोटीशी हाणामारी ) कोर्ट त्याला फाशीची शिक्षा देते. सर्व बिटरगावाचे गावकरी अमर आणि राणीचे मोठ्या थाटात लग्न लावून देतात व त्यांना शुभ आशिर्वाद देतात
The End
( The End ला नावे दाखविताना Background ला हे गाणं )
पैस देन घेण पटत नाही मनाला आणि हुन्डा नको मामा फक्त पोरगी द्या मला
( गायक आणि संगीत अर्थातच अजय गोगावले )
लेखक-
वाचून झाल्यावर ताबडतोब share करा हा पण खुप कमाई करेल

चित्रपट अजून पाहीला नाही. सोशल माध्यमांवर उलट सुलट प्रतिक्रियांचे लोट वाहताहेत..
प्रतिक्रिया चित्रपटावर कमी आणि कथानकाच्या ओघात आलेल्या जातीव्यवस्थेवर जास्त आहेत. मुळात चित्रपटाविषयी लिहीलेल्या या आणि अशा काही परीक्षणांमध्ये ऑनर किलींग या विषयाला हात घातल्याचे आणि कोणा विशिष्ट जातीवर भाष्यही नसल्याचे वाचले.

नंदिनी चित्रपटाचे रसग्रहण अतिशय उत्तम केले आहे. तटस्थ राहून केलेली परीक्षणे नेहमीच आवडतात ज्यात वाचकांना "खुद जान जाओ" चा सल्ला दिलेला असतो. मुळात ऑनर किलींग विषयावर बक्कळ सिनेमे येऊनही याच चित्रपटाला इतके हायलाईट का केले गेले असावे यावर राहून राहून आश्चर्य वाटते.
सिनेमॅटोग्राफी हे या चित्रपटाचे बलस्थान असल्याचे वाचले एका ठिकाणी त्यामुळे, दिग्दर्शनातील काही चांगल्या बाजूंसाठी नक्कीच हा चित्रपट पाहणार.

अतिशय सुंदर लिहले आहेस नंदिनी !
शेवटचा शॉटही तसाच हायपॉइंट आहे, त्याबद्दल मला बरंच काही लिहायचं आहे, - नक्की लिही. वाट बघतीये

नंदिनी, एव्हाना बहुतेकांचा चित्रपट पाहून झाला असावा,तेव्हा आता फार वाट पहावयास लावू नका. शेवटाबद्दल आपले विचार लवकर येऊ द्यात.

एक गोष्ट अगदीच खटकली ती म्हणजे..
गावातल्या अश्या बड्या असामीला गावातल्या इत्यंभूत बातम्या पुरवणारे चमचे असतात. प्लस.. छोट्या गावांमध्ये अश्या गोष्टी अजिबातच लपून राहात नाहीत.

अश्या वेळी गावात इतक्या उघड उघड चालणाऱ्या प्रेमप्रकरणाचा बोभाटा कसा होत नाही? तो तिच्या वडिलांपर्यंत कसा जात नाही? समजा त्यांच्या गावातील दबदबदब्यामूळे त्यांना कोणी सांगायला धजावत नाही पण चमचे लोक तरी?? त्यासाठी प्रिन्सचा वाढदिवस येऊन त्यांनी किस करतांना पकडले जाण्याची वाट का बघावी लागली?

अश्या वेळी गावात इतक्या उघड उघड चालणाऱ्या प्रेमप्रकरणाचा बोभाटा कसा होत नाही? तो तिच्या वडिलांपर्यंत कसा जात नाही? समजा त्यांच्या गावातील दबदबदब्यामूळे त्यांना कोणी सांगायला धजावत नाही पण चमचे लोक तरी?? त्यासाठी प्रिन्सचा वाढदिवस येऊन त्यांनी किस करतांना पकडले जाण्याची वाट का बघावी लागली?
>>

जेव्हा प्रिन्स वर्गात बसलेला दाखवलाय तेव्हा वाटले होते की याला कुणकुण लागली की काय?

आर्ची आणि परश्या यांच्या भेटीगाठी बहुतेक शेतातच होतात. गावात, चारचौघात ते उघडपणे भेटताना, बोलताना दाखवले नाहीत. एकमेकांशी नीट बोलतानाही दाखवले नाही. त्यामुळे इतर लोकांच्या विशेषतः वयस्करांच्या लक्षात आले नसावे.

प्रेमकहाणी तशी फोनवरच पुढे चालू राहते. आर्चीच्या सतत फोनवर असण्याच्या तिच्या आईलाही संशय आलेला असतो. ती दटावते देखील.

शिवाय आर्चीची मैत्रीण अनी! जी सतत तिच्याबरोबर असते, अश्या स्कॉलर, सरळमार्गी मित्र- मैत्रिणींवर घरचांचा विश्वास असतो. असा मुलगा/मुलगी माझ्या मुलाबरोबर असेल तर माझं मूल काही वाकडं पाऊल टाकणार नाही. त्यामुळे घरचे निर्धास्त असतात की हा/ही आहे ना सोबत मग काही होणार नाही. अनीच्या बाबतीतदेखील आर्चीच्या घरच्यांचे असेच झाले असावे.

गावातल्या मोठ्या लोकांविषयी, त्यांच्या मुलीविषयी असे काही सांगायला गेले की ते लोक पहिले असे सांगणार्‍याचे गालफाड फोडतात. वर म्हणतात की "माझ्या मुलीविषयी असं बोलतोस! तिला बदनाम करतोस. असं बोलायची हिम्मतच कशी होते तुझी"
अश्या मोठ्या लोकांविषयी कुजबूज जरी केली तरी ते त्याची शहानिशा न करता, त्यालाच बदडून काढतात इतके ते मग्रूर असतात.
कोणी आपल्या भलाईचे बोलतेय हे समजतच नाही त्यांना सत्ता नि पैश्याच्या गुर्मीत!
हे एक कारण असावे म्हणून कोणी काही सांगायचे धाडसच केले नसावे.

आज पाहिला आणि खूप आवडला.
इतर प्रेमकथांमध्ये शेवटी प्रेमकथा लक्षात राहते तर इथे प्रेमी युगुलाचा संघर्ष लक्षात राहतो, जळजळीत वास्तव खुपत राहते. हा संघर्षच तेवढा विस्ताराने दाखवून, तिच्या कुटुंबियांची बाजू त्यामानाने ओझरती येणे हे नक्कीच जाणीवपूर्वक केले आहे.
'बळी तो कान पिळी' ही म्हण आपण सहज वापरतो. रोजच्या आयुष्यात पदोपदी आपल्याला ह्या म्हणीचा प्रत्ययही येत असतो. अगदी प्रत्येक पातळीवर !! समाजातील बळींना ( बलवान लोकांना ) केवळ दुसरी बाजूच तपशीलात बघायला मिळाल्याने कृतीपूर्वी एकदा तरी विचार करायला भाग पाडलं तर बरं.

शेवटाबद्दल टीव्हीवरुन, पेपरमधून इतके थेट तपशील आदळले होते की काय होणार हे माहीत होतं. त्यामुळे जे दाखवलंय ते तसंच का दाखवलं असेल हाच विचार आज शेवट बघताना मनात होता. काहीही थेट न दाखवता नागराज मंजुळ्यांनी ज्याप्रकारे हा शेवट दाखवलाय त्या ट्रीटमेंटला हॅट्स ऑफ ! फक्त माणुसकीला हाक घालून घडलेल्या घटनांबाबत आणि पुढच्या अनेक शक्यतांबाबत डोक्यात प्रश्नचिन्हांचे बधीर मोहोळ उठवणारा शेवट...

..

मुळात सिनेमा पाहणं हे रक्तात असावं लागतं. चांगला वाईट, साधा, भरजरी कसाही असो मी पाहणारच ही उर्मी अंतरंगात असावी लागते. हैद्राबाद हे शहर साधारण पुणे व पिंची मिळून एवढे असावे. पुणे व पिंचित एकूण सिनेमागृहे किती आहेत ? चाळीसच्या वर नसावीत . कमीच असतील.हैद्राबादेत किती आहेत? साडे तीनशे.!
आणि त्यात केवळ तेलुगु सिनेमेच लागतात आणि ती गर्दीने बहुतांश ओसंडून वाहतात. इथे मुळात परीक्षणे वाचून सिनेमाला जायचे की नाही ते ठरवले जाते. अर्धवट शहाण्या पाळीव 'समीक्षका"नी निगेटीव सूर काढला की टीव्ही वर लागल्यावर फुकटात पाहू असा निर्णय परबुद्धीने घेतला जातो. टीव्हीवर पाहिल्यावर 'मी का हा चित्रपट पाहिला? का? का? का? असे विव्हळायला सुरुवात केली जाते . ही इथली रसिकता. बेभान, बेधुंद, सैराट क्षण उपभोगण्याची मानसिकताच नाही.

Pages