सैराट!!!

Submitted by नंदिनी on 29 April, 2016 - 11:24

सैराट ही एक लव्हस्टोरी आहे. हे आतापर्यंत सर्वांनाच माहित झालं असेल. पिस्तुल्या, फॅंड्रीसारखे वेगळे विषय हाताळणार्या नागराजकडून जेव्हा “लव्हस्टोरी”सादर केली जाते तेव्हा ती केवळ गोडगोडुली प्रेमकथा नसते तर वास्तवाचा पक्का पाया घेऊन उभी राहणारी एक सशक्त पटकथा असते. मराठी चित्रपटांच्या इतिहासामध्ये सैराट हा एक मानाचे स्थान पटकावून बसणार आहे हे आता निश्चितच.

बर्लिन सारख्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमीअर असो, वा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये रिंकू राजगुरुला मिळालेले “स्पेशल मेनशन एवॉर्ड” यामुळे सैराटबद्दल आधीच फार उत्सुकता होती. त्यातही झी मराठीने केलेल्या कल्पक मार्केटिंग आणि प्रसिद्धीमुळे सिनेमाबद्दल रीलीजच्या आधीच वलय तयार झालं होतं. अशा “हाईप” केलेल्या सिनेमांना अपेक्षाभंगाचा फार मॊठा धोका असतो, सुदैवाने सैराट सर्व अपेक्षांना पुरून उरतो आणि एक कंप्ल्लीट एंटरटेनमेंट पॅकेज बनतो.

आर्ची आणि परश्या, एका गावामधले अठराएकोणीस वयोगटामधले दोघं. ती मोठ्या पाटलाच्या घरची. तो गरीबाघरचा, खालच्या जातीमधला. त्याला ती आधीपासून आवडते, मग तिलाही तो आवडू लागतो. दोघं प्रेमात पडतात आणि मग हलकल्लोळ उठतो. मध्यंतरापर्यंत हा सिनेमा अक्षरश: भणभणत राहतो. फेअरीटेल रोमान्स भासावा अशी प्रेमकहाणी पडद्यावर दिसत राहते. या प्रेमकहाणीचा अंत पुढे काय होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही पण तरीही त्या अंतापर्यंत पोचेस्तोवर सैराट आर्ची-परश्याच्या नात्याचे अनेक पदर उलगडून दाखवत राहतो. सिनेमा जिथे संपायचा आहे तिथे संपतो, पण संपल्यानंतर खर्या अर्थाने “आर्ची-परश्याची” प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनामध्ये सुरू राहते.

सोशल नेटवर्कवर “जातीव्यवस्थेवर भीषण भाष्य करणारा सिनेमा” वगैरे बिरूदं याला प्राप्त झाली आहेत. मी त्याच्याशी फारशी सहमत नाही. हा सिनेमा जातीव्यवस्थेवर आधारित नाही, जातीव्यवस्थेच्या नादाला लागून समाजाला पोखरणार्या काही किड्यांबद्दलही हा सिनेमा बोलत नाही. हा सिनेमा बोलतो ते जातीच्या पायी कसला तरी वृथा अहंकार बाळगून गमावलेल्या काही आयुष्यांबद्दल. नागराज एकदाही- एकदाही या दोघांची “जात” सांगत नाही. त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीमधला फरक तो अतिशय हुशारीने दाखवत जातो. बाल्कनीमध्ये नाचणारी आर्ची आणि त्या गाण्याच्या ओळी केवळ तिच्याचसाठी आहेत अशा धुंदीत खाली जमीनीवर नाचणारा परश्या, झाडावर चढताना “अजून वर गेलो तर फांदी मोडेल” म्हणणारा परश्या, कॉलेजात “शब्दांच्या जाती” शिकवणारे प्रोफेसर, मगामधलं पाणी गटागट पिणारा परश्या पण तेच पानी एकही घोट न घेणारी आर्ची अशा अनेक रूपकांमधून मंजुळे कथा दाखवत राहतो. खरंतर हा सिनेमा “बघायची” गोष्ट आहे. सैराटमध्ये सर्वात जास्त सैराट काय चाललं असेल तर ते कॅमेरावर्क. करमाळ्यासारख्या एरवी रूक्ष वाटणार्या ठिकाणी काय अजबगजब शॉट्स घेतलेत!! मी आजवर इतके सिनेमा थेटरात पाहिले पण पक्ष्यांच्या उडत्या थव्या्सारख्या अशक्य सुंदर शॉटला मारलेल्या उत्स्फ़ुर्त टाळ्या-शिट्या पहिल्यांदाच पा्हिल्यात.

कॅमेरावर्कखालोखाल कौतुक आहे ते रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या दोन नवकलाकारांचं. दोघंही इतके नवखे असूनही अप्रतिम अभिनय करतात, किंबहुना ते अभिनय करतात असं वाटतच नाही इतके सच्चे वाटतात. रिंकूच्या वाटयाला आलेली भूमिका ही जास्त जटिल आहे, लाडावलेली मुलगी ते एक जबाबदार व्यक्ती हा भलामोठा पल्ला तिच्या भूमिकेमध्ये ती फारच सशक्त रीत्या दाखवते. तिच्या कॉस्च्युममधला सूक्ष्म पण जाणवणारा बदल पाहता तिच्या भूमिकेसाठी एकंदरीत टीमनेच किती मेहनत घेतली आहे ते समजतं. आकाश ठोसरने खूप समजूतदारपणे काम केलेलं आहे, रिंकूसमोर तो जरा फिका पडला तरी त्याचे काही खास प्रसंग आहेत ज्यात तो खूप उठून दिसतो. खासकरून ती निघून गेल्यावर गळ्याभोवती फास घेऊन रडतानाचा प्रसंग. हो! हा एक स्टीरीओटाईप मंजुळेंनी मोडला आहे, हीरो रडतो चांगला हुंदके देऊन देऊन रडतो. शिवाय, हीरो मार खाताना हीरॉइन येऊन त्याला वाचवते.

सिनेमाचा अजून एक प्लस पॉइण्ट म्हणजे त्याचे संवाद. पूर्ण मराठवाडी शैलीमध्ये असणारे संवाद कुठूनही कृत्रिम वाटत नाहीत. उलट, ल्येका, यती, करती सारखे अस्सल शब्दप्रयोग योग्य ठिकाणी वापरून मजा येत राहते. सल्याच्या घरच्यांशी बोलतानाचा मराठी-हिंदी ठेका तर महान जमलाय. आर्चीच्या वडलांची स्टेजवरून भाषण करायची पद्धत आणि घरी आलेल्या प्राचार्याशी बोलायची पद्धत यातून सिनेमाबद्दल बरंच काही समजत राहतं. छोट्यातली छॊटीपात्रंदेखील आपला पूर्ण ठसा उमटवून जातात.

अजय अतुलच्या संगीताबद्दल बरंच बोलून झालंय, म्हणून आता इतकंच म्हणेन की सिनेमामध्ये असलेली चारही गाणी अतिशय चपखल आहेत आणि कूठेही खटकत नाहीत. याड लागलंचं पिक्चरायझेशन गाण्याइतकंच अप्रतिम आहे.

या सिनेमाचा टेम्प्लेट थोडासा तमिळ सिनेमांसारखा आहे, बहुतेक तमिळ लव्हस्टोरी अशाच असतात. सिनेमाच्या पहिल्या भागावर तर मणीरत्नमची छाप जाणवत राहते. नदीमधली दृश्यं, ऊसाच्या शेतामधले काही शॉट्स, मित्राच्या प्रेमकहाणीसाठी मार खाणारे दोस्तलोक्स, गाण्यांमधून पुढे जाणारी लव्ह्स्टोरी. गावाच्या राजकीय उतरंडीचे दर्शन घडवणारी दृश्यं असोत वा खेड्यांचं अस्सल आधुनिक वर्णन करणारे प्रसंग असोत दाक्षिणात्य सिनेमा अधूनमधून झळकत राहतात. तरीही मंजुळेंची प्रेमकथा मराठी मातीशी शंभर टक्के इमान राखून आहे. फेसबूकवर शोधाशोध करणारे टीनेजर हीरो आणि कॉलेजात शेतात फिरायला ट्रॅक्टर आणि बुलेट चालवणारी नायिका असो, ही प्रेमकथा फार गोजिरी वाटत राहते. अर्थात सर्व काही आलबेल नसतंच. प्रेमकहाणीमध्ये यायचे ते खलनायक एम्ट्री करतातच आणि करायचा तो राडा करतातच. यादरम्यान, घरातून पळून जाणारे नायक-नायिका पाहताना खरोखर ताण येऊ लागतो. आता या प्रेमकथेचा दुर्दैवी अंत होणार, आता.. आता की आता… असं म्हणत म्हणत मध्यंतर येतो आणि प्रेक्षक म्हणून मी सुटकेचा श्वास टाकला. सिनेमाच्या दुसर्या भागात ही प्रेमकहाणी गावामधून बाहेर येते, एका अनोळखी शहरामध्ये हे दोन प्रेमी जीव “आशियाना” बनवतात आणि सुखानं संसार करू लागतात… पण सर्व काही आलबेल होतच नाही आणि सिनेमा संपता संपता मीच सुन्न होऊन जाते.

फॅंड्रीमध्ये जब्यानं कॅमेराला भिरकावलेला दगड हा त्या सिनेमाचा हायपॉइंट होता, सैराटचा शेवटचा शॉटही तसाच हायपॉइंट आहे, त्याबद्दल मला बरंच काही लिहायचं आहे, पण सध्या सिनेमा थेटरामध्ये असेपर्यंत मी त्यावर लिहिणार नाही. केवळ इतक्ंच सांगेन, की इतर सिनेमा जेव्हा संपतात तेव्हा त्यांची कहाणी संपते, पण सैराटची कहाणी मात्र प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये भिरभिरतच राहते. जब्याचा तो दगड तेव्हाही सरळ येऊन घप्पकन बसला होता, याहीवेळी तसाच बसतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेवढ्य शॉटवरुनही दिग्दर्शकाची ताकद कळावी.
<<

दिग्दर्शक ताकदिचा तर आहेच,
पण ज्या कोणी ह्या सिनेमात कॅमेरा हाताळलाय त्याच्याही कामाला दाद द्यायला हवी इतक अप्रतिम कॅमेरावर्क केलेय.

https://www.youtube.com/watch?v=yo4E0tWGcV4 मुलाखत छान आहे. या गाण्याचा अख्खा व्हिडीओच अंगावर येतो. मला गाण्यात शेवटी पक्षांचा थवा उडतानाचे जे म्युझीक आहे ते अफाट आवडले. वर नंदिनीने लिहील्याप्रमाणे तो सीन जबरी आहे. मला नाही वाटत की आतापर्यंत असे पिक्चरायझेशन कुणी केले असेल. हॅट्स ऑफ टु नागराज मंजुळे आणी अजय-अतुल आणी थॅन्क्स टु झी टु. जबरदस्त !

कॅमेरावर्क तर भारीच. कोणत्या शॉटसाठी कोणता कॅमेरा, लेन्सेस, लाईट, मीटरींग खूप काही विचार करावं लागतं. अनेक चित्रपटात ह्याआधी अशी खेडी, शेतं आलीत पण तीच एकदम आंतरराष्ट्रीय दर्जाचे छायाचित्रण करुन दाखवणे. सलाम.

कॅमेरा - सुधाकर रेड्डीने केलाय. एफटिआयआय चाच आहे.
त्याची डिप्लोमा फिल्म युनोने हातभार लावलेला होता. आणि त्या वर्षीचे शॉर्टचे नॅशनल अ‍ॅवॉर्ड होते त्या फिल्मला. एकाच वर्षी मी कॉश्च्युम केलेल्या दोन फिल्म्सना अ‍ॅवॉर्ड होते त्यातली एक ती शॉर्ट होती. Happy

कॅमेरा - सुधाकर रेड्डीने केलाय. एफटिआयआय चाच आहे.
<<

याचा अर्थ एफटिआयआय मधले सर्वच विद्यार्थी(?) त्या कन्हैया आणि राहुल गांधी यांनी पाठिंबा दिलेल्या आणि वर्षोनुवर्षे एफटिआयआय मध्ये पडिक असणार्‍या विद्यार्थां सारखे नसतात हे कळले.

धन्यवाद.

प्रसाद, मला भरपूर माजी विद्यार्थी माहितीयेत सुधाकरसारखे.
अनेकांच्याबरोबर काम करण्याचा अनुभवही आहे.
भारतातल्या सर्व फिल्म इंडस्ट्रीजच्या टेकीजमधे एफटिआयआयमधून आलेला विद्यार्थी हा वेल सॉट आफ्टर असा असतो.

मला संपूर्ण चित्रपटावरच दाक्षिणात्य छाप जाणवली पण त्यामागचं कारण दाक्षिणात्य आडनावाचा डीओपी असणं इतकं बाळबोध नक्कीच नसावं. मला डीओपीबद्दल फारशी माहिती नाही त्यामुळे नो कमेंट्स पण कॅमेरावर्क अप्रतिम आहे.

__/|\__

त्या याड लागलं ने एकदम 'पहला नशा, पहला खुमार' ची जबरदस्तं आठवण करून दिली राव. नव्या पिढीचं मराठमोळं 'पहला नशा' म्हणायला हरकत नाही त्याला. Happy
स्लो मोशन आहे म्हणूनच नाही पण एकंदर गाण्यातला भावही अगदी तोच पर्फेक्ट पकडला आहे.

सुधाकर रेड्डीने देऊळ आणि हायवे एक सेल्फी या दोन उमेशच्या मराठी सिनेमांसाठी पण छायाचित्रण केले आहे. त्यात दाक्षिणात्य छाप जाणवली होती का?

सोनाली कुलकर्णी आणि अविनाश नारकर यांच्या " मुक्ता" या सिनेमाची अजून कुणी आठवण काढली नाही याचे नवल वाटले.सेम स्टोरी आणि थिम आहे.त्यात ऑनर किलिंग नसले तरी नायकावर हल्ला होतोच.

>> देऊळ आणि हायवे एक सेल्फी

ह्या दोन्हींवर दाक्षिणात्य छाप नाही वाटली. पण पारंपारीक मराठी पेक्षा वेगळे नक्कीच वाटले.

अजिबातच सेम स्टोरी वा थीम नाहीये.
वासरूप्रेम नव्हतं मुक्तामधे.
जातींचा स्पष्ट उल्लेख होता. इथले दलित, तिथले दलित असेही एक पॅरलल होते. जातसमस्येला धरून भरपूर चर्चा आणि वादंगही होता.
इथे फोकस पूर्ण वेगळा आहे.

Courtesy WHATSAPP
सैराट बघुन आल्या पासुन

लव्ह मँरेज केलेला माझा मित्र

सासुरवाडी वरून फोन आला तरी घाबरतोय .

आयला
आज प्रत्येकाला विचारलं....
तुला सैराटचं ticket मिळाल काय.....
जो तो म्हणतोय :-
काय सांगायचं राव लई गर्दी होती....
उद्याच पण मिळणार नाही...

Sorry

Sorry

सैराट मुळे आज खुप वर्षांनी थियटरला गर्दी पहायला मिळाली. मग ते मल्टीप्लेक्स असो की सिंगल स्क्रीन सगळीकडे गर्दी. तिकीट काढण्यासाठी तास न तास रांगेत उभे राहणे, तिकीट न मिळाल्याने घरी जाणारे उदास चेहरे व सगळीकडे एकच चर्चा सैराट पहिला का. ? ......हे सर्व आज खुप वर्षांनी सैराट मुळे अनुभवता आल ..

>> नव्या पिढीचं मराठमोळं 'पहला नशा' म्हणायला हरकत नाही त्याला

मी कालच पहिल्यांदा बघितला ह्याचा व्हिडीयो. गाण्यातला भाव नक्कीच तसाच आहे पण हे मला पूर्णपणे मराठमोळं वाटलं. "पहला नशा" चकचकीत वाटतं. Happy

Pages