सैराट!!!

Submitted by नंदिनी on 29 April, 2016 - 11:24

सैराट ही एक लव्हस्टोरी आहे. हे आतापर्यंत सर्वांनाच माहित झालं असेल. पिस्तुल्या, फॅंड्रीसारखे वेगळे विषय हाताळणार्या नागराजकडून जेव्हा “लव्हस्टोरी”सादर केली जाते तेव्हा ती केवळ गोडगोडुली प्रेमकथा नसते तर वास्तवाचा पक्का पाया घेऊन उभी राहणारी एक सशक्त पटकथा असते. मराठी चित्रपटांच्या इतिहासामध्ये सैराट हा एक मानाचे स्थान पटकावून बसणार आहे हे आता निश्चितच.

बर्लिन सारख्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमीअर असो, वा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये रिंकू राजगुरुला मिळालेले “स्पेशल मेनशन एवॉर्ड” यामुळे सैराटबद्दल आधीच फार उत्सुकता होती. त्यातही झी मराठीने केलेल्या कल्पक मार्केटिंग आणि प्रसिद्धीमुळे सिनेमाबद्दल रीलीजच्या आधीच वलय तयार झालं होतं. अशा “हाईप” केलेल्या सिनेमांना अपेक्षाभंगाचा फार मॊठा धोका असतो, सुदैवाने सैराट सर्व अपेक्षांना पुरून उरतो आणि एक कंप्ल्लीट एंटरटेनमेंट पॅकेज बनतो.

आर्ची आणि परश्या, एका गावामधले अठराएकोणीस वयोगटामधले दोघं. ती मोठ्या पाटलाच्या घरची. तो गरीबाघरचा, खालच्या जातीमधला. त्याला ती आधीपासून आवडते, मग तिलाही तो आवडू लागतो. दोघं प्रेमात पडतात आणि मग हलकल्लोळ उठतो. मध्यंतरापर्यंत हा सिनेमा अक्षरश: भणभणत राहतो. फेअरीटेल रोमान्स भासावा अशी प्रेमकहाणी पडद्यावर दिसत राहते. या प्रेमकहाणीचा अंत पुढे काय होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही पण तरीही त्या अंतापर्यंत पोचेस्तोवर सैराट आर्ची-परश्याच्या नात्याचे अनेक पदर उलगडून दाखवत राहतो. सिनेमा जिथे संपायचा आहे तिथे संपतो, पण संपल्यानंतर खर्या अर्थाने “आर्ची-परश्याची” प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनामध्ये सुरू राहते.

सोशल नेटवर्कवर “जातीव्यवस्थेवर भीषण भाष्य करणारा सिनेमा” वगैरे बिरूदं याला प्राप्त झाली आहेत. मी त्याच्याशी फारशी सहमत नाही. हा सिनेमा जातीव्यवस्थेवर आधारित नाही, जातीव्यवस्थेच्या नादाला लागून समाजाला पोखरणार्या काही किड्यांबद्दलही हा सिनेमा बोलत नाही. हा सिनेमा बोलतो ते जातीच्या पायी कसला तरी वृथा अहंकार बाळगून गमावलेल्या काही आयुष्यांबद्दल. नागराज एकदाही- एकदाही या दोघांची “जात” सांगत नाही. त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीमधला फरक तो अतिशय हुशारीने दाखवत जातो. बाल्कनीमध्ये नाचणारी आर्ची आणि त्या गाण्याच्या ओळी केवळ तिच्याचसाठी आहेत अशा धुंदीत खाली जमीनीवर नाचणारा परश्या, झाडावर चढताना “अजून वर गेलो तर फांदी मोडेल” म्हणणारा परश्या, कॉलेजात “शब्दांच्या जाती” शिकवणारे प्रोफेसर, मगामधलं पाणी गटागट पिणारा परश्या पण तेच पानी एकही घोट न घेणारी आर्ची अशा अनेक रूपकांमधून मंजुळे कथा दाखवत राहतो. खरंतर हा सिनेमा “बघायची” गोष्ट आहे. सैराटमध्ये सर्वात जास्त सैराट काय चाललं असेल तर ते कॅमेरावर्क. करमाळ्यासारख्या एरवी रूक्ष वाटणार्या ठिकाणी काय अजबगजब शॉट्स घेतलेत!! मी आजवर इतके सिनेमा थेटरात पाहिले पण पक्ष्यांच्या उडत्या थव्या्सारख्या अशक्य सुंदर शॉटला मारलेल्या उत्स्फ़ुर्त टाळ्या-शिट्या पहिल्यांदाच पा्हिल्यात.

कॅमेरावर्कखालोखाल कौतुक आहे ते रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या दोन नवकलाकारांचं. दोघंही इतके नवखे असूनही अप्रतिम अभिनय करतात, किंबहुना ते अभिनय करतात असं वाटतच नाही इतके सच्चे वाटतात. रिंकूच्या वाटयाला आलेली भूमिका ही जास्त जटिल आहे, लाडावलेली मुलगी ते एक जबाबदार व्यक्ती हा भलामोठा पल्ला तिच्या भूमिकेमध्ये ती फारच सशक्त रीत्या दाखवते. तिच्या कॉस्च्युममधला सूक्ष्म पण जाणवणारा बदल पाहता तिच्या भूमिकेसाठी एकंदरीत टीमनेच किती मेहनत घेतली आहे ते समजतं. आकाश ठोसरने खूप समजूतदारपणे काम केलेलं आहे, रिंकूसमोर तो जरा फिका पडला तरी त्याचे काही खास प्रसंग आहेत ज्यात तो खूप उठून दिसतो. खासकरून ती निघून गेल्यावर गळ्याभोवती फास घेऊन रडतानाचा प्रसंग. हो! हा एक स्टीरीओटाईप मंजुळेंनी मोडला आहे, हीरो रडतो चांगला हुंदके देऊन देऊन रडतो. शिवाय, हीरो मार खाताना हीरॉइन येऊन त्याला वाचवते.

सिनेमाचा अजून एक प्लस पॉइण्ट म्हणजे त्याचे संवाद. पूर्ण मराठवाडी शैलीमध्ये असणारे संवाद कुठूनही कृत्रिम वाटत नाहीत. उलट, ल्येका, यती, करती सारखे अस्सल शब्दप्रयोग योग्य ठिकाणी वापरून मजा येत राहते. सल्याच्या घरच्यांशी बोलतानाचा मराठी-हिंदी ठेका तर महान जमलाय. आर्चीच्या वडलांची स्टेजवरून भाषण करायची पद्धत आणि घरी आलेल्या प्राचार्याशी बोलायची पद्धत यातून सिनेमाबद्दल बरंच काही समजत राहतं. छोट्यातली छॊटीपात्रंदेखील आपला पूर्ण ठसा उमटवून जातात.

अजय अतुलच्या संगीताबद्दल बरंच बोलून झालंय, म्हणून आता इतकंच म्हणेन की सिनेमामध्ये असलेली चारही गाणी अतिशय चपखल आहेत आणि कूठेही खटकत नाहीत. याड लागलंचं पिक्चरायझेशन गाण्याइतकंच अप्रतिम आहे.

या सिनेमाचा टेम्प्लेट थोडासा तमिळ सिनेमांसारखा आहे, बहुतेक तमिळ लव्हस्टोरी अशाच असतात. सिनेमाच्या पहिल्या भागावर तर मणीरत्नमची छाप जाणवत राहते. नदीमधली दृश्यं, ऊसाच्या शेतामधले काही शॉट्स, मित्राच्या प्रेमकहाणीसाठी मार खाणारे दोस्तलोक्स, गाण्यांमधून पुढे जाणारी लव्ह्स्टोरी. गावाच्या राजकीय उतरंडीचे दर्शन घडवणारी दृश्यं असोत वा खेड्यांचं अस्सल आधुनिक वर्णन करणारे प्रसंग असोत दाक्षिणात्य सिनेमा अधूनमधून झळकत राहतात. तरीही मंजुळेंची प्रेमकथा मराठी मातीशी शंभर टक्के इमान राखून आहे. फेसबूकवर शोधाशोध करणारे टीनेजर हीरो आणि कॉलेजात शेतात फिरायला ट्रॅक्टर आणि बुलेट चालवणारी नायिका असो, ही प्रेमकथा फार गोजिरी वाटत राहते. अर्थात सर्व काही आलबेल नसतंच. प्रेमकहाणीमध्ये यायचे ते खलनायक एम्ट्री करतातच आणि करायचा तो राडा करतातच. यादरम्यान, घरातून पळून जाणारे नायक-नायिका पाहताना खरोखर ताण येऊ लागतो. आता या प्रेमकथेचा दुर्दैवी अंत होणार, आता.. आता की आता… असं म्हणत म्हणत मध्यंतर येतो आणि प्रेक्षक म्हणून मी सुटकेचा श्वास टाकला. सिनेमाच्या दुसर्या भागात ही प्रेमकहाणी गावामधून बाहेर येते, एका अनोळखी शहरामध्ये हे दोन प्रेमी जीव “आशियाना” बनवतात आणि सुखानं संसार करू लागतात… पण सर्व काही आलबेल होतच नाही आणि सिनेमा संपता संपता मीच सुन्न होऊन जाते.

फॅंड्रीमध्ये जब्यानं कॅमेराला भिरकावलेला दगड हा त्या सिनेमाचा हायपॉइंट होता, सैराटचा शेवटचा शॉटही तसाच हायपॉइंट आहे, त्याबद्दल मला बरंच काही लिहायचं आहे, पण सध्या सिनेमा थेटरामध्ये असेपर्यंत मी त्यावर लिहिणार नाही. केवळ इतक्ंच सांगेन, की इतर सिनेमा जेव्हा संपतात तेव्हा त्यांची कहाणी संपते, पण सैराटची कहाणी मात्र प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये भिरभिरतच राहते. जब्याचा तो दगड तेव्हाही सरळ येऊन घप्पकन बसला होता, याहीवेळी तसाच बसतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपटा सारखच परिक्षण पण सुंदर. .....काल पाहिला मस्त, अप्रतिम. व शेवटी बधिर करणारा. चित्रपटात लिड कॅरेक्टर आहे आर्ची. रिंकु अक्षरशा जगली हे कॅरेक्टर ऐवढी ती परफेक्ट जमली. चित्रपटातील एकन एक फ्रेम सुंदर झाली आहे .चित्रपट सुरु होतो आर्ची मुळे व संपतो सुध्दा आर्ची मुळे. ..........आता सात आठ दिवस तरी चित्रपट डोक्यातून जात नाही. ....

काल सैराटला दुसर्‍यांदा गेले होते. मुद्दाम पिक्चर संपण्याआधी पाच मिनिटं बाहेर डोअरकीपरजवळ येऊन उभी राहिले. सिनेमा संपून प्रेक्षक जसा बाहेर येऊ लागतो तसा प्रत्येकाचा चेहरा न्याहाळणं, त्याची प्रतिक्रिया ऐकणं हा वेगळाच अनुभव असतो. सैराटच्या वेळी हा अनुभव मला घेणं आवश्यक वाटलं. सैराटबद्दल प्रॉब्लेम आहे, की यामध्ये दोन स्वतंत्र नॅरेटीव्ह्ज आहेत. पैकी एक नॅरेटीव्ह डोळ्यासमोर चालू आहे आणि दुसरं केवळ एक दोन दृश्यांमधून जाणवतंय पण ते दुसरं नॅरेटीव्ह जास्त परिणामकारक आहे. त्यावर बरंच काही लिहयाचं आहे. नंतर सविस्तर लिहेन.

सध्या इतकंच, केवळ "एक प्रेमकथा" आहे म्हणून हा पिक्चर मिस करू नका. नागराज "तळागाळातला आहे" म्हणून हा चित्रपट पाहू नका. बिग बजेट फिल्म आहे म्हणून बघू नका. सामाजिक सुधारणा म्हणून या सिनेमाकडे तर अजिबात बघू नका. तर एक अतिशय उत्तम आणि ब्रिलियंट सिनेमा आहे म्हणून हा सिनेमा बघा. सिनेमा बघून झाल्यावर शेवटच्या दृश्याकडून सुरूवात करा आणि उलटा सिनेमा आठवत जाप- नागराज मंजुळे काय ताकदीचा दिग्दर्शक आहे हे तुमच्या कदाचित लक्षात येईल... पण त्या आधी मुक्त मनाने आणि मोकळ्या डोळ्यांनी हा सिनेमा बघा.

आज पाहीला , खूप आवडला
थिएटर मधून बाहेर पडल्याबरोबर सैराटच्या उद्याच्या शोची तिकिट काढली, उद्या परत एकदा पाहणार आहे ......

सिनेमा संपून प्रेक्षक जसा बाहेर येऊ लागतो तसा प्रत्येकाचा चेहरा न्याहाळणं, त्याची प्रतिक्रिया ऐकणं हा वेगळाच अनुभव असतो.
>>>>
हे मात्र खरे.
फक्त आम्ही हे कॉलेजात असताना थोडे वेगळ्या पद्धतीने करायचो, आधीचा शो सुटला की लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायचो, चेहरे न्याहाळायचो, काय मग कसा वाटला असे स्वताच विचारायचो आणि त्यानंतर तिकिट काढायची की नाही ठरवायचो .. Happy

सैराट मात्र लवकरात लवकर जमवायलाच हवा, च्यायला बघावे तिकडे चर्चा चालू आहे आणि आपण न बघितल्यामुळे काही स्पेशल कॉमेंट करता येत नाहीये सारखी घुसमट नाही Sad

सैराट ची सुरुवात होते क्रिकेट च्या समालोचना ने ...
पण पडद्यावर आपणास सिनेमा दिसत नाही........ दिसतो फक्त काळा पडदा ... !.. संवाद एकु येत राहतात

आणि शेवट !...

समोर चित्र दिसतंय पण आवा़ज म्युट केलेला !... हा परस्पर विरोधी खेळ सिनेमात भरपूर आहे

आणि त्यासाठी सैराट पाह्य ला हवा !!

आर्चि आणि परश्या हैद्रा बाद ला ट्परिवर खा ता त परश्या मगाने पाणी पितो पण आर्ची साठी पाण्याची बाट्ली विकत घेतो

सिनेमातील एका भागात आर्ची आणि परश्या चे भांड्ण होते ती त्याला सोडुन जाते परश्या इकडे गळफास घेतो पण प्रेमाच्या आठवणी ने तो निर्णय बदलतो या प्रसंगात प्रेक्षक परश्या बाबत भावनिक होतो आणि आर्ची बद्द्ल क मालीचा राग येतो तेवढ्यात आर्ची दार ढ्कलुन येते आणि परश्या ला मिठी मारते

असे अनेक प्रसंग सिनेमात आहेत

--

--

आणि त्यासाठी सैराट पाह्यला हवा !!

छान लिहिलय. नक्की पाहायचाय. टीझर ते प्रोमो मधे दिसलेली अप्रतिम सिनेमाटोग्राफी बघितल्यावर निदान त्यासाठी तर पाहायचाच होता.
'याड लागलयं' गाण्यात साधारण तिसर्‍या मिनिटाला (परशा आणि आर्ची विहिरीच्या पायरीवर असतात त्या प्रसंगी) वाजलेली बासरी अक्षरशः शहारे आणते.

नंदिनी सुरेख परीक्षण लिहीलस. सिनेमा पहाणे सध्या अशक्य आहे. पण परीक्षण वाचल्यावर निदान थोडा तरी पिक्चर पाहील्याचे समाधान झाले.

सैराट पाहिला. चांगला चित्रपट आहे.

कोणतेही ट्रेलर्स न पाहता किंवा समिक्षा वाचण्यापूर्वी पाहिला. काही ठिकाणी चित्रपटाची लांबी जास्त आहे, असे वाचले. मला चित्रपट बघताना तरी ते जाणवले नाही.

नंदिनी, चांगलं लिहिलं आहेस. बहुतांश ठिकाणी सहमत. बरंच बोलण्यासारखं आहे.
वरच्या लेखनात शेवट कसा आहे, यावर काही ठळक हिंटा आल्यात असे मला वाटले नाही.

चित्रपट बघितल्यानंतर समिक्षाही वाचल्या. पुणे मिरर मध्ये गणेश मतकरी म्हणतात तसं -

The social network is buzzing about Sairat at the moment and I am very curious about the audience's reaction. What I'm afraid of is the superficial or immediate reaction without grasping the entire nature of the film. Sairat is not an easy film to make or to grasp. While I recommend it, I'd also warn the audience to pause and take a deep breath before passing the judgment, one way or another.

अंतस्थ हेतू कोणाचे कुठे नसतात???

हे दुर्दैवी आहे की एखादी कलाकृती त्या सिस्टीमच्या बाकी एलिमेन्ट्स मुळे सफर करते.

सकुरा
सिनेमा न पाहताच कसे काय ठरवले ? असेल प्रसिद्धीमागे कटकारस्थान.
सिनेमात तसे काही आहे का ? असेल तर कोर्टात जा ना

सकुरा आणि सशल, जरा उलगडून सांगता का ? कुठला अंतस्थ हेतू ?

सिनेमा बघायचा आहेच. पुढच्या आठवड्यातच जमेल बहुतेक. पुण्यात एका थिएटरमध्ये दिवसाला चक्क १६शो सुद्धा लावले आहेत त्यामुळे अजून दोन-तीन आठवडे तरी हा सिनेमा थिएटरमधून जात नाही हे नक्की.

मला उद्या रात्रीची ९.३० ची तिकीटे मिळाली आहेत. पाहील्यानंतर बोलू.
अंतस्थ हेतू असता तर पहिल्याच दिवशी प्रकरण कोर्टात दाखल झालं असतं. विरोधक नेहमी सर्वात पहिला शो पाहत असतात काळजीने.

काहीतरी कटकारस्थान शिजतंय असं सतत वाटत राहील्याने कशाचा म्हणून आनंद घेता येत नाही. सावध असावं, पण सैराट हा सिनेमा नागराज मंजुळे ने झीच्या कॉन्सपरन्सीच्या योजनेचा भाग म्हणून बनवला असावं असं म्हणावं तर त्याला लहानपणी आलेले अनुभव हा देखील त्याच कटाचा भाग म्हणावा लागेल. एकंदर कटाची आखणी व्यापक आणि अनेक वर्षांपासून चाललेली दिसतेय. केव्हढा संयम एका सिनेमासाठी. त्याच वेळी सोशल मीडीया अस्तित्वात येईल असं गृहीत धरलेलं असावं कट कर्त्यांनी.

झी प्र्सिद्दी देणारच ना? अरे झी टॉकिज्/स्टुडियोने निर्मिती केलिय ना सिनेमाची, गमत चालु आहे एकदरित ... मी तरी अजुन सोशल मिडियावर वावगी चर्चा अजुन तरी वाचली नाही.

सकुरा कुठल्या अंतस्थ हेतू बद्दल बोलत आहेत हे त्यानांच माहित. मला फक्त हळहळ वाटली की एकंदर रिव्ह्यूज् वरून जो चांगला वाटणारा पिक्चर आहे तिकडे अशा थातुर मातुर कारणांवरून लोक स्वतः ही बघणार नाही आणि निगेटिव्ह पब्लिसिटी ही करू असं म्हणत आहेत. त्याकरता मी एक जनरल मत मांडलं.

सकुरा ताई नुसत्या हवेत पिचकार्‍या सोडतात. ते पाणी कुठे जाणार आहे याचा त्याना थांगपत्ता नसतो. झी वाल्यानी मार्केटिंग केलय, त्याचा फायदा ते घेणारच. नागराजनी सुद्धा झी नसते तर दुसर्‍या कुणाची मदत ( प्रोड्युस करताना) घेतलीच असती. यात कुठला अंतस्थ हेतू आहे? की चांगले लिहीलेले परीक्षण पहावले गेले नाहीये, म्हणून बाफ भरकटावयाचा आहे? हाच अंतस्थ हेतू नाही ना?

चर्चा करायची नाही म्हणायचे आणी हवेत आधी बुडबुडे सोडायचे.

कापोचे सही बोललात.

नंदिनी, आवडलं लेखन.
गेल्या शनिवारी पाहिला चित्रपट आणि त्यानंतर आलेली अस्वस्थता अजूनही जात नाहिये.

Pages