सैराट!!!

Submitted by नंदिनी on 29 April, 2016 - 11:24

सैराट ही एक लव्हस्टोरी आहे. हे आतापर्यंत सर्वांनाच माहित झालं असेल. पिस्तुल्या, फॅंड्रीसारखे वेगळे विषय हाताळणार्या नागराजकडून जेव्हा “लव्हस्टोरी”सादर केली जाते तेव्हा ती केवळ गोडगोडुली प्रेमकथा नसते तर वास्तवाचा पक्का पाया घेऊन उभी राहणारी एक सशक्त पटकथा असते. मराठी चित्रपटांच्या इतिहासामध्ये सैराट हा एक मानाचे स्थान पटकावून बसणार आहे हे आता निश्चितच.

बर्लिन सारख्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमीअर असो, वा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये रिंकू राजगुरुला मिळालेले “स्पेशल मेनशन एवॉर्ड” यामुळे सैराटबद्दल आधीच फार उत्सुकता होती. त्यातही झी मराठीने केलेल्या कल्पक मार्केटिंग आणि प्रसिद्धीमुळे सिनेमाबद्दल रीलीजच्या आधीच वलय तयार झालं होतं. अशा “हाईप” केलेल्या सिनेमांना अपेक्षाभंगाचा फार मॊठा धोका असतो, सुदैवाने सैराट सर्व अपेक्षांना पुरून उरतो आणि एक कंप्ल्लीट एंटरटेनमेंट पॅकेज बनतो.

आर्ची आणि परश्या, एका गावामधले अठराएकोणीस वयोगटामधले दोघं. ती मोठ्या पाटलाच्या घरची. तो गरीबाघरचा, खालच्या जातीमधला. त्याला ती आधीपासून आवडते, मग तिलाही तो आवडू लागतो. दोघं प्रेमात पडतात आणि मग हलकल्लोळ उठतो. मध्यंतरापर्यंत हा सिनेमा अक्षरश: भणभणत राहतो. फेअरीटेल रोमान्स भासावा अशी प्रेमकहाणी पडद्यावर दिसत राहते. या प्रेमकहाणीचा अंत पुढे काय होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही पण तरीही त्या अंतापर्यंत पोचेस्तोवर सैराट आर्ची-परश्याच्या नात्याचे अनेक पदर उलगडून दाखवत राहतो. सिनेमा जिथे संपायचा आहे तिथे संपतो, पण संपल्यानंतर खर्या अर्थाने “आर्ची-परश्याची” प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनामध्ये सुरू राहते.

सोशल नेटवर्कवर “जातीव्यवस्थेवर भीषण भाष्य करणारा सिनेमा” वगैरे बिरूदं याला प्राप्त झाली आहेत. मी त्याच्याशी फारशी सहमत नाही. हा सिनेमा जातीव्यवस्थेवर आधारित नाही, जातीव्यवस्थेच्या नादाला लागून समाजाला पोखरणार्या काही किड्यांबद्दलही हा सिनेमा बोलत नाही. हा सिनेमा बोलतो ते जातीच्या पायी कसला तरी वृथा अहंकार बाळगून गमावलेल्या काही आयुष्यांबद्दल. नागराज एकदाही- एकदाही या दोघांची “जात” सांगत नाही. त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीमधला फरक तो अतिशय हुशारीने दाखवत जातो. बाल्कनीमध्ये नाचणारी आर्ची आणि त्या गाण्याच्या ओळी केवळ तिच्याचसाठी आहेत अशा धुंदीत खाली जमीनीवर नाचणारा परश्या, झाडावर चढताना “अजून वर गेलो तर फांदी मोडेल” म्हणणारा परश्या, कॉलेजात “शब्दांच्या जाती” शिकवणारे प्रोफेसर, मगामधलं पाणी गटागट पिणारा परश्या पण तेच पानी एकही घोट न घेणारी आर्ची अशा अनेक रूपकांमधून मंजुळे कथा दाखवत राहतो. खरंतर हा सिनेमा “बघायची” गोष्ट आहे. सैराटमध्ये सर्वात जास्त सैराट काय चाललं असेल तर ते कॅमेरावर्क. करमाळ्यासारख्या एरवी रूक्ष वाटणार्या ठिकाणी काय अजबगजब शॉट्स घेतलेत!! मी आजवर इतके सिनेमा थेटरात पाहिले पण पक्ष्यांच्या उडत्या थव्या्सारख्या अशक्य सुंदर शॉटला मारलेल्या उत्स्फ़ुर्त टाळ्या-शिट्या पहिल्यांदाच पा्हिल्यात.

कॅमेरावर्कखालोखाल कौतुक आहे ते रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या दोन नवकलाकारांचं. दोघंही इतके नवखे असूनही अप्रतिम अभिनय करतात, किंबहुना ते अभिनय करतात असं वाटतच नाही इतके सच्चे वाटतात. रिंकूच्या वाटयाला आलेली भूमिका ही जास्त जटिल आहे, लाडावलेली मुलगी ते एक जबाबदार व्यक्ती हा भलामोठा पल्ला तिच्या भूमिकेमध्ये ती फारच सशक्त रीत्या दाखवते. तिच्या कॉस्च्युममधला सूक्ष्म पण जाणवणारा बदल पाहता तिच्या भूमिकेसाठी एकंदरीत टीमनेच किती मेहनत घेतली आहे ते समजतं. आकाश ठोसरने खूप समजूतदारपणे काम केलेलं आहे, रिंकूसमोर तो जरा फिका पडला तरी त्याचे काही खास प्रसंग आहेत ज्यात तो खूप उठून दिसतो. खासकरून ती निघून गेल्यावर गळ्याभोवती फास घेऊन रडतानाचा प्रसंग. हो! हा एक स्टीरीओटाईप मंजुळेंनी मोडला आहे, हीरो रडतो चांगला हुंदके देऊन देऊन रडतो. शिवाय, हीरो मार खाताना हीरॉइन येऊन त्याला वाचवते.

सिनेमाचा अजून एक प्लस पॉइण्ट म्हणजे त्याचे संवाद. पूर्ण मराठवाडी शैलीमध्ये असणारे संवाद कुठूनही कृत्रिम वाटत नाहीत. उलट, ल्येका, यती, करती सारखे अस्सल शब्दप्रयोग योग्य ठिकाणी वापरून मजा येत राहते. सल्याच्या घरच्यांशी बोलतानाचा मराठी-हिंदी ठेका तर महान जमलाय. आर्चीच्या वडलांची स्टेजवरून भाषण करायची पद्धत आणि घरी आलेल्या प्राचार्याशी बोलायची पद्धत यातून सिनेमाबद्दल बरंच काही समजत राहतं. छोट्यातली छॊटीपात्रंदेखील आपला पूर्ण ठसा उमटवून जातात.

अजय अतुलच्या संगीताबद्दल बरंच बोलून झालंय, म्हणून आता इतकंच म्हणेन की सिनेमामध्ये असलेली चारही गाणी अतिशय चपखल आहेत आणि कूठेही खटकत नाहीत. याड लागलंचं पिक्चरायझेशन गाण्याइतकंच अप्रतिम आहे.

या सिनेमाचा टेम्प्लेट थोडासा तमिळ सिनेमांसारखा आहे, बहुतेक तमिळ लव्हस्टोरी अशाच असतात. सिनेमाच्या पहिल्या भागावर तर मणीरत्नमची छाप जाणवत राहते. नदीमधली दृश्यं, ऊसाच्या शेतामधले काही शॉट्स, मित्राच्या प्रेमकहाणीसाठी मार खाणारे दोस्तलोक्स, गाण्यांमधून पुढे जाणारी लव्ह्स्टोरी. गावाच्या राजकीय उतरंडीचे दर्शन घडवणारी दृश्यं असोत वा खेड्यांचं अस्सल आधुनिक वर्णन करणारे प्रसंग असोत दाक्षिणात्य सिनेमा अधूनमधून झळकत राहतात. तरीही मंजुळेंची प्रेमकथा मराठी मातीशी शंभर टक्के इमान राखून आहे. फेसबूकवर शोधाशोध करणारे टीनेजर हीरो आणि कॉलेजात शेतात फिरायला ट्रॅक्टर आणि बुलेट चालवणारी नायिका असो, ही प्रेमकथा फार गोजिरी वाटत राहते. अर्थात सर्व काही आलबेल नसतंच. प्रेमकहाणीमध्ये यायचे ते खलनायक एम्ट्री करतातच आणि करायचा तो राडा करतातच. यादरम्यान, घरातून पळून जाणारे नायक-नायिका पाहताना खरोखर ताण येऊ लागतो. आता या प्रेमकथेचा दुर्दैवी अंत होणार, आता.. आता की आता… असं म्हणत म्हणत मध्यंतर येतो आणि प्रेक्षक म्हणून मी सुटकेचा श्वास टाकला. सिनेमाच्या दुसर्या भागात ही प्रेमकहाणी गावामधून बाहेर येते, एका अनोळखी शहरामध्ये हे दोन प्रेमी जीव “आशियाना” बनवतात आणि सुखानं संसार करू लागतात… पण सर्व काही आलबेल होतच नाही आणि सिनेमा संपता संपता मीच सुन्न होऊन जाते.

फॅंड्रीमध्ये जब्यानं कॅमेराला भिरकावलेला दगड हा त्या सिनेमाचा हायपॉइंट होता, सैराटचा शेवटचा शॉटही तसाच हायपॉइंट आहे, त्याबद्दल मला बरंच काही लिहायचं आहे, पण सध्या सिनेमा थेटरामध्ये असेपर्यंत मी त्यावर लिहिणार नाही. केवळ इतक्ंच सांगेन, की इतर सिनेमा जेव्हा संपतात तेव्हा त्यांची कहाणी संपते, पण सैराटची कहाणी मात्र प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये भिरभिरतच राहते. जब्याचा तो दगड तेव्हाही सरळ येऊन घप्पकन बसला होता, याहीवेळी तसाच बसतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सैराटचा आणखी एक चांगला पैलू म्हणजे नवे चेहरे. रिंकूची अदाकारी अक्षरशः "याड लावणारी" आहे . संपूर्ण चित्रपटात तिचा वावर आणि सोबतीला रांगडी भाषा, एकदम जबराट combination. एरवी चारचौघात उठून दिसली नसती, पण आता डोळ्यासमोरून हलत नाही. तिने जशी आर्ची उभी केलीये, त्या तोडीची आर्ची साकारणे आजच्या घडीला तरी कोणाही मराठी अभिनेत्रीला शक्य होणार नाही.

केवळ साजूक तुपातल्या चेहेर्यांच्या मागे न लागता नवख्या कलाकारांकडून त्याच तोडीचा, नव्हे त्यापेक्षा सरसच अभिनय करून घेणे ; येरागबाळ्याचे काम नोहे, तेथे पाहिजे जातीचे :डोमा:. मंजुळेंनी असे अनेक स्टीरीओटाईप तोडलेत यात शंकाच नाही. विकिपीडियावर सुद्धा या बाबीचा आवर्जून उल्लेख केलाय.

प्रिंट लीक होणे आणि धंदा बुडणे हे पार्ट ऑफ द बिजनेस म्हणून बघा. हे होतेच.
मात्र माझे असे कैक मित्र आहेत ज्यांनी पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट चक्क दोन वेळा बघितला आहे. वेगवेगळ्या कंपनीबरोबर हा चित्रपट पुन्हा बघावा असा असल्याने याचा बिजनेस लवकर ओसरणार नाही.
हा चित्रपट थिएटरमध्येच बघण्यात मजा हे समजणारे तिथेच बघणार. आणि ज्यांना हे समजत नाही ते तसेही प्रिंट निघायची वाट बघतच बसले असते.

आताच आलो पाहून.

नंदिनीचा रिव्ह्यू पूर्ण वाचलेला नव्हता तो आत्ता वाचला. शेवटाकडून सिनेमा आठवण्याशी शंभर टक्के सहमत आहे. रिव्ह्यू छान लिहीलेला आहे. त्यामुळे पुन्हा लिहीण्याची आवश्यकता नाही.

इतकंच लिहावंसं वाटतं की चित्राची म्हणून जी भाषा असते तिचा दिग्दर्शकाने पुरेपूर वापर केला. सिनेमा कमर्शियल की समांतर याने फारसा फरक पडलेला नाही. जे बोलायचं ते नागराज प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या बोललेला आहे. भयानक हुषार दिग्दर्शक आहे हा. फ्लेक्स बोर्डवरच्या गंमतीजमती सुद्धा टिपल्यात.

स्पॉयलर अलर्ट
अनेक जणांनी अप्रत्यक्षरित्या किंबा प्रत्यक्षरित्या शेवट सुचवलेला असल्याने शेवटी जो धक्का बसायला पाहीजे तो बसला नाही. शोकान्तिका वगैरे शब्द वापरल्याने अंदाज आलाच होता. त्यात आज एक फेसबुक पोस्ट ओझरती पाहतना नेमकाच शेवट कळाला. महाभागाने सिनेमा सोडून शेवटाचं वर्णन तपशीलवार केलं होतं. त्यामुळे सिनेमा पाहताना अक्षरशः शेवट जवळ आल्याची चाहूल त्यामुळे लागली. प्रेक्षक सुजाण असायला हवेत. शेवटच्या सीनमधे काही प्रेक्षक त्या लहान बाळावरून कमेण्ट्स करत होते ते अगदीच हिडीस वाटलं.

एक सांगावंसं वाटलं की कथा खूप वेगळी नाही पण ज्यांची कथा आहे ती माणसं उलगडून दाखवलेली आहेत. अगदी प्रोफेसरच्या थोबाडीत मारण्याचा प्रसंग उगाच नाही हे शेवटी कळतं. एका ठिकाणी परश्याचा आपल्याला राग येतो, हे वेगळेपण आहे. आईला केलेला पहिला फोन आणि नंतरच्या संभाषणातला सैलसरपणा पण बारकाईने घेतलेलं आहे. बाकीचं नंतरच बोललेलं बरं.

इतकंच लिहावंसं वाटतं की चित्राची म्हणून जी भाषा असते तिचा दिग्दर्शकाने पुरेपूर वापर केला.<<<+111
बस हेच मंजूळे च काम...प्रभाव जाणवत राहतो...
सगळ्या मराठी दिग्ददर्शकाना ठेऊन पाहिल नागराज ऐवजी...तेव्हा तो चित्रपट फार वेगळा आणि कमर्शियल झाला असता.जे पोहचवायचय ते कमी (म्हणजेच नको त्या जास्त ) प्रमाणात पोचले असते प्रेक्षकांपर्यंत.
सैराट हा मनाची पाटी कोरी करून पहावा,जे मराठी माणसाला फारसे जमत नाही.उगाच जूने चित्रपट , दिग्दर्शक आणि परंपरागत चौकटी यांच्याशी तुलना करण्यात वेळ घालवल्याने मूळ कलाकृतित यांच्या मतांची भेळ होऊन भलताच सिनेमा दिसू लागतो.
(बादवे-चित्रपट समीक्षाकाविषयी अस कुठेतर वाचलेल - A critic is a person who knows about ABC of the Car and technique of but dont know how to drive it. सत्यता पटली)

सुंदर सिनेमा आहे. नंदिनी, उत्तम परीक्षण.शेवटच्या सीनपासून मागे मागे आठवत गेलं की पोटात तुटायला लागतं.मी ज्या थिएटरमध्ये पाहीला तिथ प्रत्येक सीनवर काही तरी पकाऊ कमेंट्स मोठमोठ्याने ओरडणारे दोन ग्रुप्स होते (त्यांना पकडून पोकळ बांबूचे फटके द्यायला हवे होते खरंतर :राग:). अशा थिएटरमध्ये शेवटच्या सीननंतर टाचणी पडली तरी ऐकू येईल अशी शांतता पसरली होती. नागराज मंजुळेला साष्टांग दंडवत आहे!

सैराटचा शेवटचा शॉटही तसाच हायपॉइंट आहे, त्याबद्दल मला बरंच काही लिहायचं आहे, >>>>>>>>> नक्की लिहा Happy

पण सैराटची कहाणी मात्र प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये भिरभिरतच राहते. >>>>> +१

सिनेमा अजुन नाही पाहिला,(ह्या विकांताला पहायचा विचार आहे) पण गाणी आवडलीत.
अजय अतुलचा सोनि मधला लाइव्ह रेकॉर्डिंगचा तुनळी वरचा व्हिडियो पाहिला. इन्स्ट्रुमेंटल ऑर्केस्ट्राचा मी फॅन असल्यामुळे असेल कदाचित पण हा व्हिडियो गाण्यापेक्षाही जास्त आवडला.

शेवटच्या सीन संपुर्ण म्युट ठेवण्यापेक्षा फक्त बाळाच्या रडण्याचा आवाज (विदाऊट बॅकराऊंड म्युझिक) असता तर अजुन इफेक्ट साधला असता असे मलातरी वाटते.

मी ज्या थिएटरमध्ये पाहिला तिथे काहीजणं थोड्यावेळाने ओरडत होते 'आवाज गेला, प्रिंट खराब आहे'

आता या सिनेमाला मराठा समाजातल्या टीनपॉट संघटना विरोध करत आहेत,काय तर म्हणे मुलगी मराठा दाखवली आहे ,प्रत्यक्षात दिग्दर्शकाने कुणाचीही जात दाखवलेली नाही,तरीही ओढुन ताणुन विरोध चालू आहे.गुढघ्यात मेंदू असेल तर असले विरोध सूचतात.

मी बघेपर्यंत सैराटबद्दलचे काहीही रिव्ह्यूज वाचायचे नाहीत असं ठरवलं होतं. काल रात्री पाह्यल्यावर एकही रिव्ह्यू एवढ्यात तरी वाचायचा नाही हे परत ठरवलंय.
फिल्म मला आवडलीच आहे. अस्वस्थ करणारी आहेच.
दिग्दर्शक म्हणून फॅण्ड्री नंतर यामधे नागराजचा वेगळा फिनेस जाणवतोच.
सर्व पोरांची पदार्पणातली इतकी उत्तम कामं हे ही दिग्दर्शक म्हणून नागराजचेच यश वाटते मला.
काही एकदोन मास्टरस्ट्रोक आहेत दिग्दर्शक म्हणून त्याचे. त्याबद्दल सध्या लिहित नाही. कारण ते स्पॉयलर्स आहेत.

सध्या मी डोक्यात परत परत फिल्म बघतेय.

ज्यांना सैराट मधे लहान वयात प्रेमपकरण दाखवलंय याचा त्रास होतोय त्यांना
’क्या हुआ तेरा वादा’ हे गाणं आणि 'हम किसीसे कम नही’ हा चित्रपट अज्जिबात आवडला नसेल नै? तिथे तर पार ज्या वयात नुकतंच ढुंगण धुता यायला लागलंय त्या वयातलं प्रेम दाखवलंय...

फिल्म न बघता संस्कृती, अभ्यासाचे वय वगैरे उदात्त उदात्त खेळत बसणार्‍यांना झापडं उघडा, फिल्म बघा एवढेच म्हणू शकते.

अश्या विषयांवरच फिल्म का करतात हे हल्लीचे दिग्दर्शक वगैरे म्हणणार्‍यांना कधीतरी वाढदिवस झाल्यास त्याच्या शुभेच्छा!

बरेच जण झी, निर्माते, व्यवसाय, अंतस्थ हेतू याबद्दल फारच मनोरंजक टिप्पण्या करतायत इथे. Lol

याड लागल गाण्यात परश्या पाकिट आणि घड्याळ मित्राच्या आंगावर भिरकावुन विहिरीत उडी मारतो, त्यावेळचे पार्श्वसंगीत इतके अप्रतिम आहे की काय बोलावे.

अन जात दाखवली किंवा नाही, याने काय फरक पडतो ? चित्रपटात नाही दाखवले म्हणून निसर्ग काही आपले काम करायचे थांबत नाही.

याड लागल गाण्यात परश्या पाकिट आणि घड्याळ मित्राच्या आंगावर भिरकावुन विहिरीत उडी मारतो,<<< या अख्ख्या गाण्यात डीटेलिम्ग अप्रतिम आहे. Happy आर्ची परश्याकडे बघते तो अख्खा स्लो मोशनमधला शॉट कस्ला सही घेतलाय

रसग्रहण करणे हे समीक्षा करण्यापेक्षा कधीही चांगले.

आपण सैराटचे रसग्रहण केलेले आहे हे आवडले.

नंदिनी चांगले लिहिलेले आहे. आवडले.
निवडक दहामधे ठेवत आहे.
चित्रपटाच्या एन्ड विषयी लिहिणार आहात. प्रतीक्षेत आहे.

माझे मनोरंजन झाले. त्याबद्दल धन्यवाद. >> काय झाले हे सांगितले तर तरण आदर्श आणि बरेच लोकांना विचारता आले असते इतकेच.

गेम्स ऑफ थ्रोन्स बघत आहोतच त्यामुळे त्याच्या तुलनेत ठिकठाक आहे शेवट. आत्तातरी I am ok. मराठीतल्या गेम्स ऑफ थ्रोन्सची बालवाडी.

ब-याच वर्षांपासून चाळा म्हणून बॉक्सऑफीस हे सदर पूर्वी काही सिनेनियतकालिकांमधून बघत असे. अलीकडे यासाठी वेबसाईट्स आहेत. त्यापुर्वी रेडीफवर माहिती असायची.

यात ओवरसीज बिझनेस, टीव्ही चे हक्क आणि सिनेगृहात केलेला धंदा असे एकूण आकडे दिलेले असतात. काही दिवसांपूर्वी टीव्ही चॅनेल्सवर चालू असलेल्या पुरस्कार सोहळ्यांचे, अजय अतुल सारख्या नाईट्सचे वारंवार प्रक्षेपण होण्यामागे असलेल्या कारणांबद्दलचा एक रिपोर्ट वाचला होता. बरेच होते. त्यातला एक इथे खाली दिलेल्या लिंकवर दिला आहे.

http://www.indiantelevision.com/television/tv-channels/movie-channels/th...

झी मराठी बद्दल असेच वाचले होते. झी टॉकीजने अनेक चांगले सिनेमे प्रोड्युस केले हे खरे आहे. पण स्वतःची निर्मिती असल्याने सिनेमा विकत घेण्याचा खर्च वाचतो असे म्हटलेले होते.
हे रिपोर्ट्स मनोरंजक असतील तर त्याची काही एक कल्पना नाही. कारण माझे ते क्षेत्र नाही.

एक राहीलं....

काही वर्षांपूर्वी (प्रभात चॅनेल असताना आणि नंतरही ) झी मराठी (अल्फा) , ई टीव्ही या वाहीन्यांवरून रविवारी मराठी सिनेमा, नाटक दाखवलं जायचं. झी ने नंतर टॉकीज काढली. पण अनेक दिवसांपासून तेच ते सिनेमे दाखवले जातात. आता स्वतःची निर्मिती असलेले सिनेमे दाखवता येतात. रविवारी आणि प्राईम टाईमला पुरस्कार सोहळे ( तेच तेच) फिनाले , महाएपिसोड्स आणि नाईट्स वगैरे दाखवले जाऊ लागले. आता तर बाळ झालं, लग्न ठरलं अशा कुठल्याही कारणावरून रविवारी महाएपिसोड्स दाखवले जातात. यामुळे रविवारी काय दाखवायचं हा प्रश्नही सुटतो आणि बाहेरच्या सिनेमांना पैसे मोजावे लागत नाहीत.

हा रिपोर्ट पण ऑनलाईन उपलब्ध आहे. आता सापडली नाही लिंक.

एवढे मोठे लोक तुमच्या बैठकीत असताना माझ्याशी का वाद घालताय? तुम्ही एकटेच बोललेला नाहीत.
कुणाच्या बोलण्याने मनोरंजन व्हावे वा होऊ नये असा कायदा नाही.
माझे मनोरंजन झाल्यास त्याबद्दल मी कुणालाही जाब देणे लागत नाही.

मा़झ्या बैठकीत आहेत असे वाक्य आहे काय पोस्ट मधे ?
माझी एकट्याचीच पोस्ट आहे म्हणून क्लिअर केले. तुम्हाला वाद वाटत असेल तर राहीलं. मी फक्त मनोरंजक काय इतकंच विचारलं. उतराचा आग्रह नाही. जेणेकरून बिनदिक्कतपणे काहीही लिहीण्याला आळा घालता येईल इतकाच माफक हेतू होता. असो.

तीन दिवसांपासून ज्यांना सेन्सीबल समजत होतो त्यांच्याकडून एकतर मराठी समजत नसावे किंवा आशय समजत नसावा अशा थाटात आरोप केले जातात आणि खुलासा करायला गेले की जबाबदारी झटकली जाते असे अनुभव येत असल्याने माझे देखील मनोरंजन होऊ लागलेले आहे. कुणाचे नाव घेतलेले नाही त्यामुळे जाब द्याय्ला बांधील नाही.

आर्ची परश्याकडे बघते तो अख्खा स्लो मोशनमधला शॉट कस्ला सही घेतलाय>>> तेवढ्य शॉटवरुनही दिग्दर्शकाची ताकद कळावी. अंगात कसलीशी हुरहुरीची, गुदगुदल्याची भावना जाणवते, पहिल्यांदा प्रेयसीने पाहिलं तेव्हा असंच झालं होतं. Wink

Pages