सैराट ही एक लव्हस्टोरी आहे. हे आतापर्यंत सर्वांनाच माहित झालं असेल. पिस्तुल्या, फॅंड्रीसारखे वेगळे विषय हाताळणार्या नागराजकडून जेव्हा “लव्हस्टोरी”सादर केली जाते तेव्हा ती केवळ गोडगोडुली प्रेमकथा नसते तर वास्तवाचा पक्का पाया घेऊन उभी राहणारी एक सशक्त पटकथा असते. मराठी चित्रपटांच्या इतिहासामध्ये सैराट हा एक मानाचे स्थान पटकावून बसणार आहे हे आता निश्चितच.
बर्लिन सारख्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमीअर असो, वा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये रिंकू राजगुरुला मिळालेले “स्पेशल मेनशन एवॉर्ड” यामुळे सैराटबद्दल आधीच फार उत्सुकता होती. त्यातही झी मराठीने केलेल्या कल्पक मार्केटिंग आणि प्रसिद्धीमुळे सिनेमाबद्दल रीलीजच्या आधीच वलय तयार झालं होतं. अशा “हाईप” केलेल्या सिनेमांना अपेक्षाभंगाचा फार मॊठा धोका असतो, सुदैवाने सैराट सर्व अपेक्षांना पुरून उरतो आणि एक कंप्ल्लीट एंटरटेनमेंट पॅकेज बनतो.
आर्ची आणि परश्या, एका गावामधले अठराएकोणीस वयोगटामधले दोघं. ती मोठ्या पाटलाच्या घरची. तो गरीबाघरचा, खालच्या जातीमधला. त्याला ती आधीपासून आवडते, मग तिलाही तो आवडू लागतो. दोघं प्रेमात पडतात आणि मग हलकल्लोळ उठतो. मध्यंतरापर्यंत हा सिनेमा अक्षरश: भणभणत राहतो. फेअरीटेल रोमान्स भासावा अशी प्रेमकहाणी पडद्यावर दिसत राहते. या प्रेमकहाणीचा अंत पुढे काय होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही पण तरीही त्या अंतापर्यंत पोचेस्तोवर सैराट आर्ची-परश्याच्या नात्याचे अनेक पदर उलगडून दाखवत राहतो. सिनेमा जिथे संपायचा आहे तिथे संपतो, पण संपल्यानंतर खर्या अर्थाने “आर्ची-परश्याची” प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनामध्ये सुरू राहते.
सोशल नेटवर्कवर “जातीव्यवस्थेवर भीषण भाष्य करणारा सिनेमा” वगैरे बिरूदं याला प्राप्त झाली आहेत. मी त्याच्याशी फारशी सहमत नाही. हा सिनेमा जातीव्यवस्थेवर आधारित नाही, जातीव्यवस्थेच्या नादाला लागून समाजाला पोखरणार्या काही किड्यांबद्दलही हा सिनेमा बोलत नाही. हा सिनेमा बोलतो ते जातीच्या पायी कसला तरी वृथा अहंकार बाळगून गमावलेल्या काही आयुष्यांबद्दल. नागराज एकदाही- एकदाही या दोघांची “जात” सांगत नाही. त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीमधला फरक तो अतिशय हुशारीने दाखवत जातो. बाल्कनीमध्ये नाचणारी आर्ची आणि त्या गाण्याच्या ओळी केवळ तिच्याचसाठी आहेत अशा धुंदीत खाली जमीनीवर नाचणारा परश्या, झाडावर चढताना “अजून वर गेलो तर फांदी मोडेल” म्हणणारा परश्या, कॉलेजात “शब्दांच्या जाती” शिकवणारे प्रोफेसर, मगामधलं पाणी गटागट पिणारा परश्या पण तेच पानी एकही घोट न घेणारी आर्ची अशा अनेक रूपकांमधून मंजुळे कथा दाखवत राहतो. खरंतर हा सिनेमा “बघायची” गोष्ट आहे. सैराटमध्ये सर्वात जास्त सैराट काय चाललं असेल तर ते कॅमेरावर्क. करमाळ्यासारख्या एरवी रूक्ष वाटणार्या ठिकाणी काय अजबगजब शॉट्स घेतलेत!! मी आजवर इतके सिनेमा थेटरात पाहिले पण पक्ष्यांच्या उडत्या थव्या्सारख्या अशक्य सुंदर शॉटला मारलेल्या उत्स्फ़ुर्त टाळ्या-शिट्या पहिल्यांदाच पा्हिल्यात.
कॅमेरावर्कखालोखाल कौतुक आहे ते रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या दोन नवकलाकारांचं. दोघंही इतके नवखे असूनही अप्रतिम अभिनय करतात, किंबहुना ते अभिनय करतात असं वाटतच नाही इतके सच्चे वाटतात. रिंकूच्या वाटयाला आलेली भूमिका ही जास्त जटिल आहे, लाडावलेली मुलगी ते एक जबाबदार व्यक्ती हा भलामोठा पल्ला तिच्या भूमिकेमध्ये ती फारच सशक्त रीत्या दाखवते. तिच्या कॉस्च्युममधला सूक्ष्म पण जाणवणारा बदल पाहता तिच्या भूमिकेसाठी एकंदरीत टीमनेच किती मेहनत घेतली आहे ते समजतं. आकाश ठोसरने खूप समजूतदारपणे काम केलेलं आहे, रिंकूसमोर तो जरा फिका पडला तरी त्याचे काही खास प्रसंग आहेत ज्यात तो खूप उठून दिसतो. खासकरून ती निघून गेल्यावर गळ्याभोवती फास घेऊन रडतानाचा प्रसंग. हो! हा एक स्टीरीओटाईप मंजुळेंनी मोडला आहे, हीरो रडतो चांगला हुंदके देऊन देऊन रडतो. शिवाय, हीरो मार खाताना हीरॉइन येऊन त्याला वाचवते.
सिनेमाचा अजून एक प्लस पॉइण्ट म्हणजे त्याचे संवाद. पूर्ण मराठवाडी शैलीमध्ये असणारे संवाद कुठूनही कृत्रिम वाटत नाहीत. उलट, ल्येका, यती, करती सारखे अस्सल शब्दप्रयोग योग्य ठिकाणी वापरून मजा येत राहते. सल्याच्या घरच्यांशी बोलतानाचा मराठी-हिंदी ठेका तर महान जमलाय. आर्चीच्या वडलांची स्टेजवरून भाषण करायची पद्धत आणि घरी आलेल्या प्राचार्याशी बोलायची पद्धत यातून सिनेमाबद्दल बरंच काही समजत राहतं. छोट्यातली छॊटीपात्रंदेखील आपला पूर्ण ठसा उमटवून जातात.
अजय अतुलच्या संगीताबद्दल बरंच बोलून झालंय, म्हणून आता इतकंच म्हणेन की सिनेमामध्ये असलेली चारही गाणी अतिशय चपखल आहेत आणि कूठेही खटकत नाहीत. याड लागलंचं पिक्चरायझेशन गाण्याइतकंच अप्रतिम आहे.
या सिनेमाचा टेम्प्लेट थोडासा तमिळ सिनेमांसारखा आहे, बहुतेक तमिळ लव्हस्टोरी अशाच असतात. सिनेमाच्या पहिल्या भागावर तर मणीरत्नमची छाप जाणवत राहते. नदीमधली दृश्यं, ऊसाच्या शेतामधले काही शॉट्स, मित्राच्या प्रेमकहाणीसाठी मार खाणारे दोस्तलोक्स, गाण्यांमधून पुढे जाणारी लव्ह्स्टोरी. गावाच्या राजकीय उतरंडीचे दर्शन घडवणारी दृश्यं असोत वा खेड्यांचं अस्सल आधुनिक वर्णन करणारे प्रसंग असोत दाक्षिणात्य सिनेमा अधूनमधून झळकत राहतात. तरीही मंजुळेंची प्रेमकथा मराठी मातीशी शंभर टक्के इमान राखून आहे. फेसबूकवर शोधाशोध करणारे टीनेजर हीरो आणि कॉलेजात शेतात फिरायला ट्रॅक्टर आणि बुलेट चालवणारी नायिका असो, ही प्रेमकथा फार गोजिरी वाटत राहते. अर्थात सर्व काही आलबेल नसतंच. प्रेमकहाणीमध्ये यायचे ते खलनायक एम्ट्री करतातच आणि करायचा तो राडा करतातच. यादरम्यान, घरातून पळून जाणारे नायक-नायिका पाहताना खरोखर ताण येऊ लागतो. आता या प्रेमकथेचा दुर्दैवी अंत होणार, आता.. आता की आता… असं म्हणत म्हणत मध्यंतर येतो आणि प्रेक्षक म्हणून मी सुटकेचा श्वास टाकला. सिनेमाच्या दुसर्या भागात ही प्रेमकहाणी गावामधून बाहेर येते, एका अनोळखी शहरामध्ये हे दोन प्रेमी जीव “आशियाना” बनवतात आणि सुखानं संसार करू लागतात… पण सर्व काही आलबेल होतच नाही आणि सिनेमा संपता संपता मीच सुन्न होऊन जाते.
फॅंड्रीमध्ये जब्यानं कॅमेराला भिरकावलेला दगड हा त्या सिनेमाचा हायपॉइंट होता, सैराटचा शेवटचा शॉटही तसाच हायपॉइंट आहे, त्याबद्दल मला बरंच काही लिहायचं आहे, पण सध्या सिनेमा थेटरामध्ये असेपर्यंत मी त्यावर लिहिणार नाही. केवळ इतक्ंच सांगेन, की इतर सिनेमा जेव्हा संपतात तेव्हा त्यांची कहाणी संपते, पण सैराटची कहाणी मात्र प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये भिरभिरतच राहते. जब्याचा तो दगड तेव्हाही सरळ येऊन घप्पकन बसला होता, याहीवेळी तसाच बसतो.
जबरीच आहे ते गाणे.. मी आताही
जबरीच आहे ते गाणे.. मी आताही तेच ऐकतोय..
याला पहला नशा म्हटले तर झिंगाट ला ईट्स टाईम टू डिस्को म्हणावे लागेल.. त्याची सुरुवातीचे म्युजिक मला फुल्लटू डिस्कोच वाटले .. आणि पोरं उड्या मारत बाईकवर टांगा टाकत पबला चाल्लीय असे वाटले
अक्षय खन्ना आणि सोनाली
अक्षय खन्ना आणि सोनाली बेंद्रे यांचा दहक नावाचा सिनेमा पाहिला आहे का कोणी?
थोड्याफार फरकाने तीच कहाणी आहे. इथे जातीभेद तिथे हिंदू आणि मुस्लिम असा आणखीन सेलेबल विषय! अर्थात सैराट मराठी मातीतला असल्याने मराठी माणसाला जास्तं जवळचा वाटतो इतकंच!
नंदिनी, अतिशय सुरेख परीक्षण!
नंदिनी, अतिशय सुरेख परीक्षण! सिनेमाच्या शेवटाबाबत लिहिलेले एकदम खरे.
आजच पाहून आले सैराट.सुरेख सिनेमा आहे.जरूर पहावा असा सिनेमा आहे.
चित्रपट खरेच मस्त आहे.
चित्रपट खरेच मस्त आहे. मंजुळेंचे डिटेलिंग भारी आहे.
शब्दाची जात, ईंग्रजीच्या सरांचा तास, बसस्टॉपवरची women's day ची जाहिरात ई. ई. आणि शेवट..मस्त अनुभव. रिंकू राजगुरुचा अभिनय अप्रतिम..
सैराट मी बघितला नाही त्याचे
सैराट मी बघितला नाही त्याचे कारण -
गेल्या काही वर्षांपासून दर काहीएक मराठी चित्रपटांमागे एखादा तरी चित्रपट फार गाजावाजा करत येतो. त्याच्याविषयी सगळीकडे कसं छान छान छापून येत जातं. वर्तमानपत्रांमध्ये (विशेषतः - महाराष्ट्र टाईम्स मध्ये) सोशल मीडियावर, टीव्ही चॅनेल्सवर. अनेकदा तर असंही वाटायला लागतं की हा चित्रपट पाहणं हे जणू काही राष्ट्रीय कर्तव्य आहे किंवा मतदानाप्रमाणेच नैतिकदृष्ट्या सक्तीचं आहे. प्रतिव्यक्ती अडीचशे-तीनशेचं तिकीट, जाण्यायेण्याकरिता पेट्रोल + पार्किंग, थेटरात महागडे समोसे आणि पॉपकॉर्न + बाटलीबंद पाणी हा सगळा खर्च मिळून हजार बाराशेची खिशाला चाट बसली तरी फारसं समाधान मिळत नाही असंही अनेकदा झालंय. देऊळ, नटरंग, बालगंधर्व, लोकमान्य, हापूस, जयहिंद, एलिझाबेथ एकादशी, किल्ला, सरीवर सरी, पिपाणी, फक्त लढ म्हणा हे आणि असे अनेक चित्रपट पाहताना पैसे खर्चूनही अपेक्षित आनंद न मिळाल्याने फसवणूक झाल्याची भावना मनात निर्माण झाली.
गेल्या कित्येक वर्षांत बर्यापैकी समाधान देणारा एक चित्रपट म्हणजे श्वास. पण त्यातही अमृता सुभाषचं पात्र आक्रस्ताळं, अनाठायी आणि अनावश्यक वाटलं. ते वजा करता चित्रपट छान वाटला. त्याचा यूएसपी म्हणजे त्याचा शेवट. आजोबा नातवाला ऑपरेशनच्या दिवशीच घेऊन हॉस्पिटलमधून निघून जातात. त्याला आंधळा होण्याआधी जितकं दाखवता येईल तेवढं दाखवतात. शेवटी अंध मुलांच्या शाळेत घेऊन जातात तेव्हा तिथली मुले नायकाला स्पर्श करतात तो सीन तर अगदीच अप्रतिम. पण पुन्हा प्रश्न असा पडला की, डोळ्यांतून हमखास पाणी काढणारा सीन टाकून यश मिळवायचं असेल तर माहेरची साडी तरी काय वाईट आहे? कुठल्याही मुलीच्या बापाच्या डोळ्यातून पाणी निघणारच असा शेवट आणि इतर अनेक सीन (जवळपास चित्रपटाचा बहुतांश हिस्सा) माहेरच्या साडीत खच्चून भरले आहेत.
पुढे ह्या प्रश्नाचं उत्तर देणारा आणि शंभर टक्के चित्रपट पाहिल्याचा आनंद आणि समाधान देणारा चित्रपट पाहिला तो म्हणजे अश्विनि भावे निर्मीत - कदाचित. निळू फुले यांच्या अभिनयाने नटलेला हा शेवटचा चित्रपट. भावनिक नाट्य (मेलोड्रामा) न करता म्हणजेच काळजाला हात न घालता मेंदूला खाद्य पुरविणारा कदाचित हा एकमेव चित्रपट असावा. विशेषतः चित्रपटाच्या शेवटी सचिन खेडेकरने रंगविलेले पात्र आयुष्यभर स्वतःच्या मनात कुठलं रहस्य जपण्याचं ओझं बाळगून जगणार आहे हे कळल्यावर मनावर येणारा ताण प्रेक्षकाला अस्वस्थ करून सोडतो.
त्याचप्रमाणे ध्यासपर्व हादेखील एक परिपूर्ण आनंद देणारा चित्रपट होता. अर्थात हा एक वास्तविक चरित्रपट असल्यामुळे लेखकाचं काम सोपं होतं.
तसेच एक डाव धोबीपछाड, रेगे, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, आजचा दिवस माझा हे चित्रपट देखील काही प्रमाणात आनंद देऊन गेलेत. पण ते हुकूमी यश देणार्या विषयांवर बेतलेले असल्याने ते बघितले तर चांगलंच पण नाही बघितलेत तरी काही नुकसान नाही या कॅटेगरीतले होते.
थोडक्यात गाजावाजा केलेल्या मराठी चित्रपटांपैकी आनंद देणारे कमी आणि डोक्याला शीण आणणारेच संख्येने अधिक होते असा स्वानुभव आहे.
सैराट हा कदाचित आणि ध्यासपर्व प्रमाणेच १०० टक्के उत्तम किंवा श्वासप्रमाणे बर्यापैकी चांगला असूही शकेल पण तो जर फक्त लढ म्हणा किंवा पिपाणी सारखा बंडल चित्रपट निघाला तर अजून एक नुकसान पचवायची माझी तयारी नाही.
हे फक्त मी सैराट का बघणार नाही त्याचं अगदी वैयक्तिक असं कारण आहे. माझा चित्रपटाला अजिबात विरोध नाही किंवा इतरांनाही तो बघू नका असा सल्ला देण्याचा इरादा नाही.
सबब, या प्रतिसादावर कुठलाही वैयक्तिक स्वरूपाचा हल्ला अपेक्षित नाहीये याची कृपयाच नोंद घ्यावी ही विनंती.
सहकार्याकरिता आगाऊ आभार, धन्यवाद, इत्यादी.
सबब, या प्रतिसादावर कुठलाही
सबब, या प्रतिसादावर कुठलाही वैयक्तिक स्वरूपाचा हल्ला अपेक्षित नाहीये याची कृपयाच नोंद घ्यावी ही विनंती.>>>
हे असं नसतं जेव्हा तुम्ही ऑनलाईन काही लिहीता. बाकी चालूद्या.
Movie chan aahe, before
Movie chan aahe, before interval.... after that movie dokyala shot laun jato...
and ending tar tras dayak aahe.... yaar loka enjoyment sathi jatat aani he movie vale dokayala shot lavtat.
already life madhe khupach shot aahet... tyat ajun ek.
बिपिनचंद्र, कदाचित मधे निळु
बिपिनचंद्र, कदाचित मधे निळु फुले नाहीत. सदाशिव अमरापुरकर आहेत.
मी सैराट चा जब्राट फॅन आहे पण
मी सैराट चा जब्राट फॅन आहे पण एक गोष्ट खटकते....ती म्हणजे पाट्लाच्या घरात असलेला छ्त्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि मूर्ति... ते दाखवायची काही गरज मला तरी वाटत नाही....पाटील हे नाव पुरेसे होते वरची जात दाखवण्यासाठी....एक शिवभक्त म्हणून ही खंत मनात राहतेच
सैराट इतका तुफान का चालला?
सैराट इतका तुफान का चालला? शेवट जो आहे तसा न दाखवता वेगळा दाखवला असता तरीही चित्रपट इतकाच चालला असता का? तब्बल पस्तीस वर्षापूर्वी येऊन गेलेला "एक दुजे के लिये" पण त्याकाळी असाच तुफान चालला. कथानकाच्या दृष्टीने त्यात आणि ह्यात काय फरक आहे? तसा फार काही फरक नाही. समाजाला मंजूर नसलेले प्रेम आणि पुढची सगळी ससेहोलपट. म्हणजे पस्तीस वर्षापूर्वी जी सामाजिक मानसिकता होती तशीच ती आजही आहे हे जळजळीत सत्य सैराट ने सिद्ध केले आहे. नाहीतर हा चित्रपट (कथानकाच्या दृष्टीने) "कालबाह्य विषयाचा" ठरून प्रेक्षकांनी पाठ फिरवली असती. नाही का? पण निर्मात्यांच्या सुदैवाने आणि समाजाच्या दुर्दैवाने अजूनही हे विषय कालबाह्य ठरलेले नाहीत.
.
बाकी, संपूर्णपणे नवीन आणि अननुभवी कलाकारांना घेऊन त्यांच्याकडून सहजसुंदर नैसर्गिक अभिनय करवून घेत एक अप्रतिम चित्रपट निर्माण करणे हि अजिबात सोपी गोष्ट नाही. समोर पडद्यावर जे दिसत आहे तो चित्रपट नसून खरोखर घडत असलेल्या घटनेचेच कोणीतरी हळूच चित्रीकरण करून दाखवले आहे असे वाटावे इतका हा चित्रपट वास्तवाच्या जवळ जातो. माझ्या मते कथानकाइतकेच या गोष्टीचेही योगदान चित्रपटाच्या यशात आहे.
सस्मित, दोघेही आहेत कदाचित
सस्मित,
दोघेही आहेत कदाचित मध्ये. मी बरेच वर्षे दोघांसमवेत काम केले आहे त्यामुळे आता वय झाले असली तरी इतकी धडधडीत चूक माझ्याकडून होणार नाही. निळू फुले यांनी घड्याळ दुरुस्ती करणारा कारागीर साकारला आहे तर सदाशिव अमरापूरकर ह्यांनी जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेला नायिकेचा बाप साकारला आहे.
हे पाहा:-
http://www.imdb.com/title/tt1206310/fullcredits?ref_=tt_ov_st_sm
निळू फुले यांनी घड्याळ
निळू फुले यांनी घड्याळ दुरुस्ती करणारा कारागीर साकारला आहे >> हो का? खरंच लक्शात नाही येत आहे आताही.
मला वाटलं तुम्ही चुकुन स आ ना नि फु म्हणत आहात.
सैराट पाहिला. अजिबात आवडला
सैराट पाहिला. अजिबात आवडला नाही. तो चित्रपट का पाहिला ह्याचा पश्चात्ताप झाला अक्षरशः
एका बातमीचा जीव असलेली कथा सिनेमा ह्या माध्यमातून का मांडाविशी वाटली आणि ती लोकांनी एवढी डोक्यावर का घेतली ते समजण्यात मी कमी पडले असावे कदाचित.
सिनेमापेक्षाही नंदिनीने हे इथे लिहिलेलं परीक्षण जास्त छान आहे. आणि लेखात कुठेही तिने शेवट सांगितला नाहीये.
http://misalpav.com/node/3594
http://misalpav.com/node/35943
परशा लग्नानन्तर आपल्या
परशा लग्नानन्तर आपल्या आइवडिलान्शी काही contact ठेवतानाची hint दाखवलाय का??
एक किताबघर में पड़ी गीता और
एक किताबघर में पड़ी गीता और कुरान आपस में कभी नहीं लड़ते,
और जो उनके लिए लड़ते हैं वो कभी उन दोनों को नहीं पढ़ते..."
कापोचे धन्यवाद मिसळपावचा संदर्भ दिल्याबद्दल. तिथे भटकंती हे सदर वाचत असतांना हा लेख सापडला त्यात हे वरील वाक्य होते, ते फार आवडले म्हणून इथे थापले, अन्यथा या कोटचा सैराट शी सबंंध नाही, सॉरी.
http://misalpav.com/node/35462
नंदिनी.... ~ "सैराट"
नंदिनी....
~ "सैराट" पाहिल्याशिवाय परीक्षणांकडे (आणि जालीय चर्चा तसेच रविवारच्या वर्तमानपत्रांच्या आवृत्त्या आदी अनेक ठिकाणी आली आहेत हे तुम्ही जाणताच...शिवाय झाडून सा-या मराठी चॅनेल्सवरून सैराटवर न थकता रतीब चालू असल्याचेही समजले होते...पण तिकडे गेलोच नाही) जायचे नाही असे मनी ठरविले होते. शेवटी काल तो पाहिला. अगदी मनापासून....परश्या आर्ची त्यांचे दोन मित्र एकीकडे तर दोघांची घरे दुसरीकडे. आर्चीच्या हिंमतीला दाद दिलीच पाहिजे. मातब्बर बापाच्या घरी राजकुमारी सारखी राहाणारी, वावरणारी ही पोरगी ज्या तडफेने परश्यासमवेतच जायाचा आणि राहाण्याचा निर्णय घेते ते पाहून उलट ती कर्तबगार मुलगा वाटते, पोलिस स्टेशनवर जाऊन हिंमतीने त्या वर्गमित्रांना सोडले पाहिजे अशी आरडाओरडा करते, घरची माणसे पाठलाग करत आल्यावर त्यांच्यावर पिस्तुल उगारण्यास कचरत नाही.....कसलीही स्थिती आली तरी (विशेषतः हैद्राबादमधील त्यांच्या संसाराचे सुरुवातीचे दिवस) ती आपल्या निर्णयाशी पक्की आहे. आमटीत मीठ किती घालायचे याचेही ज्ञान नसलेली ही पोरगी एका कारखान्यात रात्रंदिवस काम करून आपला संसार पक्का करते....झोपडपट्टीतील एका मोडक्या खोलीपासून त्या मोठ्या शहरात फ्लॅट नोंदणी करण्यापर्यंतच तिचा (आणि त्याचाही) प्रवास तिने छानपैकी पेलला आहे.....खरं तर हा सारा चित्रपट तिचाच आहे. परश्या हैद्राबादमध्ये ती कुठे गेली कुठे हरविली हे तिथे झोपडीत बसूनच रडत रडत बसतो....गळफास लावून घेतो म्हणत राहतो. आर्चीने असे केले नसते.
....आणि देवा !! तो शेवट.....शेजारी बसलेली एक जोडी तर रडूच लागली. त्या एक वर्षाच्या मुलाबद्दल काय लिहायचे ? काहीच लिहू नये. नागराज यानीही त्या प्रसंगी काहीही कसलेही भाष्य वा संगीतही टाळले आहे. पोराच्या तळपायाचे ठसे सारी कहाणी आहे.
तुमचे परीक्षण आत्ताच वाचले (प्रतिक्रियाही वाचल्या...इथल्या) आणि जाणले की खूप सुंदर लिहिले आहे तुम्ही. पूर्ण न्याय दिला आहे तुम्ही निर्मितीला. "..सैराटचा शेवटचा शॉटही तसाच हायपॉइंट आहे, त्याबद्दल मला बरंच काही लिहायचं आहे..." असे एक वाक्य आले आहे लेखात तुमच्या. पण आता शेवट सर्वांनाच कळाला आहे असे विविध प्रतिक्रिया वाचल्यावर समजले आहे. तुम्ही जरूर या शेवटच्या सुन्न करून टाकणार्या प्रसंगाबद्दल लिहा.
पाहिला शेवटी... पण इथे येउन
पाहिला शेवटी...
पण इथे येउन चुक झाली, कोणी गाढवाने ह्या धाग्यात शेवट सांगितला होता, जो धक्का शेवट माहिती नसताना बसला असता तो बसला नाही.
असो..
सिनेमा फार छान आहे, टिका करणारे तर स्वर्गात सुद्धा खुप जास्त सुख आहे म्हणुन टीका करत बसतिल..
सैराट विरुद्ध कॅम्पेन
सैराट विरुद्ध कॅम्पेन उघडलेल्या एका जातीयवादी फेसबुकी ग्रूपवरून साभार..
पाहिला आणि खुप आवडला. इकडे
पाहिला आणि खुप आवडला.
इकडे (अमेरिकेत, बे एरियात) त्यांनीं झिंगाट दोन वेळा वाजवलं. पहिल्यांदा पब्लिक ला झिंगाट होऊन नाचायला येता यावं आणि मग परत एकदा कारण प्रेक्षकांनां पडद्यावर नीट बघता यावं म्हणून. धमाल आली.
दाक्षिणात्य झाक मला जाणवली नाही. फक्त सुरूवातीला (क्रिकेट कॉमेन्टेरी च्या वेळी) सगळे डायलॉग्ज् नीट ऐकूच आले नाहीत :| मग कदाचित कान सरसावले किंवा अजून काही. रिंकू राजगुरू चा रोल टेलर मेड होता पण मला मात्र आकाश ठोसर आणि रिंकू दोघांचंही काम प्रचंड आवडलं. फक्त परश्या लहान दिसला म्हणजे १९ वर्षीयच. जेव्हा "बाप्या" दिसायला हवा होता तेव्हाही लहानच दिसला. आणि वर उलेख आलाय तसे कथेत आलेले दोन-तीन "बॉलीवुडी" योगायोग ही रुचले नाहीत. त्यातल्या एका प्रसंगाच्या वेळी तर बाजूच्यांनीं "आवरा" म्हंटलं.
सैराट बघितला, आवडला... जितकी
सैराट बघितला, आवडला... जितकी चर्चा होतिय अगदी तितका नाही आवडला पण तरी नागराज ने अनेक स्टिरोटाइप मोडुन काढत जुनिच कथा घेवुन अगदी नव्या दमाचा पिक्चर दिलाय... म्युझिकने सगळ्याना वेड लावलच आहे (मलाही) सैराट हिट होण्यात अजय-अतुल चा सिहाचा वाटा आहे अस म्हटल तर खोट ठरणार नाही.. रिन्कु च काम मला जास्त आवडल ( जस्टिफाइन्ग हर नॅशनल अॅवार्ड),आकाश ठोसर तितकासा प्र्भावी नाही वाटला पण चित्रपटाचा हिरोच रिन्कु असल्याने लाजरा-बुजरा नायक म्हणून तो सुट होतो.
बटृ,ट्रॅक्टर चालवणारी, आपल्या प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार होणारी डॅशिन्ग हिरोइन म्हणून ती अगदी सुट झालिये.. हिरोची वाट पाहताना त्यालाच दटावणारी, नाजुक साजुक रेखिव गोरी अशा कोणत्याही टिपिकल साच्यात न बसणारी आर्ची आख्का पिक्चर स्वतःभोवती फिरवत ठेवते. ( जेव्हा गुन्ड तिच्यावर हात टाकतात तेव्हाही टिपिकल हिरोइन सारख बचाओ म्हणून हिरोकडे याचना-बिचना न करता फाईट करते)
आता ज्यामुळे चित्रपट माझ्यासाठी खुप न आवडण्याच कारण ते म्हणजे चित्रपटाची लान्बी आणी अनेक वेळकाढु प्र्सन्ग ज्यामुळे चित्रपट सन्थ होतो आणि त्याचा इम्पक्ट डीफ्युज होत राहतो.. किमान अर्धा तासाची लाबी कमी करुन चित्रपट बान्धिव करता आला असता.
मात्र नागराजने अनेक सुचक गोष्टी चित्र्पटातुन मान्डल्यात, ज्या पाहुन त्याचा यावरचा अभ्यास जाणवतोय, शेवट इतका चर्चुन झालाय की तो अपेक्षित पणे येतो त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट कमि झालाय (कुणि महाभागाने फेसबुकवर शेवटाचा फोटो टाकुन हा ब्घुन डोळ्यात पाणी आल तर लाइक करा म्हटलय ...कठीण आहे यान्च)
तरी मन सुन्न होतच.
बघितला. आवडला. शेवट माहित
बघितला. आवडला. शेवट माहित असूनही सुन्न व्हायला झालं.
फक्त सिनेमाची लांबी खूप जास्त आहे. त्यामुळे तब्बल दोन तासाचा फर्स्ट हाफ शेवटी शेवटी कंटाळवाणा झाला. कधी एकदा इंटर्वल होइल असं झालं.
सेकंड हाफ मात्र वेगवान आहे.
प्रिन्सचं काम केलेल्या मुलाचा अभिनय मला जरा फिका वाटला. त्या कॅरॅक्टरचा सणकीपणा, माथेफिरूपणा त्याच्या अभिनयातून नाही जाणवत.
स्पॉयलर अॅलर्ट (सिनेमा बघितला नसेल तर पुढची प्रतिक्रिया वाचू नका)
------------------------------------------------------------------------------------------
शेवट सुन्न करून सोडतो या बाबतीत दुमत नाहीच. तरीपण त्या बाळाची रिअॅक्शन वयाच्या मानाने जास्त मॅच्युअर्ड वाटली. नुसतं समोर उभं राहून इतक्या लहान बाळाला आईबाबा मेलेत हे कसे कळेल. रक्त बघून त्याने रडायला सुरूवात केली म्हणावे तर ते रक्त आहे हे सुद्धा कळायचे त्याचे वय नाहीये. खरतर ते आईबाबांच्या जवळ जाऊन त्यांना हलवेल, उठवायचा प्रयत्न करेल. आणि उठत नाही म्हणल्यावर रडेल.
--------------------------------------------------------------------------------------------
मस्त लिहिले आहेस नन्दिनी , ती
मस्त लिहिले आहेस नन्दिनी , ती घरी असताना तिच्या घरातील लोकांची परिस्थिती आणि ती फोनवर आईशी संवाद साधताना , सुरवातीला ब्लेंक कॉल करताना परिस्थितीत दाखवलेला बदल पुढील अघटीत प्रसंगाची थोडीशी कल्पना द्यायला पुरक होता असेही वाटून गेले. मुख्यतः आई आणि वडिलांची बॉडी लेंग्वेज आणि राहणीमानात झालेला फरक वगैरे !
नंदिनी....तुमचे परीक्षण
नंदिनी....तुमचे परीक्षण आत्ताच वाचले… खूप छान लिहिले आहे.
मी आजवर इतके सिनेमा थेटरात पाहिले पण पक्ष्यांच्या उडत्या थव्या्सारख्या अशक्य सुंदर शॉटला मारलेल्या उत्स्फ़ुर्त टाळ्या-शिट्या पहिल्यांदाच पा्हिल्यात.>>>>>सहमत (३-४) ठिकाणी आहेत पक्षांचे थवे ....
नागराज एकदाही- एकदाही या दोघांची “जात” सांगत नाही. >>> गरज नाही वाटत.
शेवट त्या दोघांना का मारले ? >>त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून प्रिन्स दादा चा राग उफाळून आला आणि त्याने त्या दोघांना मारले ……असा माझा समाज होता
जातीव्यवस्थे मुळे त्या दोघांचा जीव गेला हे नंतर लक्षात आले…
डोळ्यांवर जसा चष्मा आहे तसेच बघणारे लोक असतात
- काहीजण आर्ची - परश्या सारखे प्रेम करायला शिकतील
- काहीजण सल्या- प्रदीप सारखी मैत्री करतील (निभावतील)
- काहीजण आलेल्या संकटाला घाबरून न जाता मार्ग काढायला शिकतील
ऑनर किलिंग मधे त्या दोघांना
ऑनर किलिंग मधे त्या दोघांना संपवून टाकले जाते.
पण अनेकदा संबंध तोडून जे ऑनर किलिंग केले जाते ते कितीतरी त्रासदायक असते...त्याचे काय हो...त्या मानसिकतेमुळे जीवंतपणी होणाऱ्या त्रासाचे काय??
जातीव्यवस्थे मुळे त्या
जातीव्यवस्थे मुळे त्या दोघांचा जीव गेला हे नंतर लक्षात आले…>>> या संपूर्ण चित्रपटात पुरूषप्रधान व्यवस्थेवर कोरडे ओढलेले आहेत. बहीण, बायको यांच्यावर आपली सत्ता असते. त्यांच्यामुळे इज्जत जाते, नाक कापलं जातं हा राग आधी, त्यानंतर आंतरजातीय असल्याचा दुप्पट राग आणि जर खालच्या जातीचा असेल तर तिप्पट राग.
अर्थात काही केसेस मधे शांतपणे विवाह लावून देण्यात आलेले आहेत. त्यांचं प्रमाण लक्षात येण्यासारखं वाढायला काहींनी वस्तुस्थिती मान्य करावी , एव्हढं झालं तरी खूप.
वर कोणीतरी 'टेक्नो वरात' चा
वर कोणीतरी 'टेक्नो वरात' चा उल्लेख केलेला आठवला. त्याचा काय अर्थ?
गजानन, केदार नीट सांगू शकेल.
गजानन, केदार नीट सांगू शकेल. त्याने बे एरिया वर लिहीलं होतं त्यातलं मला आठवतंय त्याप्रमाणे:
लग्न, इतर समारंभात (गणपती इत्यादी) ही वरात असते ज्यात स्पीकर्स च्या "भिंती" असतात. नाचायला, झिंगाट व्हायला अनुरूप म्युझिक आणि त्याबरोबर पारंपारीक बॅण्ड पथक (ढोल ताशे) असतात. रात्रीच्या वेळी असेल तर वरातीत, मिरवणूकीत नाचणार्यांवर डिस्को लाईट्स सोडतात(?)/मारतात. त्या झिंगाट गाण्यात दाखवलंय तसं. पुण्याच्या आसपासच्या काही गावांची नावं दिली होती त्याने जिकडे हा प्रकार खूप पॉप्युलर आहे. आणि ह्याचा आवाज एक/दीड किलोमीटर एव्हढा ऐकू येऊ शकतो.
सशल, अच्छा डिस्को आणि
सशल, अच्छा डिस्को आणि डॉल्ब्या इ. म्हणून टेक्नो होय?
बहुतेक. मला आधी वाटलं विजू
बहुतेक. मला आधी वाटलं विजू शाह टाईप गाणी असतील म्हणून "टेक्नो" तर तसं काही म्हणाला नाही केदार.
Pages