सैराट ही एक लव्हस्टोरी आहे. हे आतापर्यंत सर्वांनाच माहित झालं असेल. पिस्तुल्या, फॅंड्रीसारखे वेगळे विषय हाताळणार्या नागराजकडून जेव्हा “लव्हस्टोरी”सादर केली जाते तेव्हा ती केवळ गोडगोडुली प्रेमकथा नसते तर वास्तवाचा पक्का पाया घेऊन उभी राहणारी एक सशक्त पटकथा असते. मराठी चित्रपटांच्या इतिहासामध्ये सैराट हा एक मानाचे स्थान पटकावून बसणार आहे हे आता निश्चितच.
बर्लिन सारख्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमीअर असो, वा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये रिंकू राजगुरुला मिळालेले “स्पेशल मेनशन एवॉर्ड” यामुळे सैराटबद्दल आधीच फार उत्सुकता होती. त्यातही झी मराठीने केलेल्या कल्पक मार्केटिंग आणि प्रसिद्धीमुळे सिनेमाबद्दल रीलीजच्या आधीच वलय तयार झालं होतं. अशा “हाईप” केलेल्या सिनेमांना अपेक्षाभंगाचा फार मॊठा धोका असतो, सुदैवाने सैराट सर्व अपेक्षांना पुरून उरतो आणि एक कंप्ल्लीट एंटरटेनमेंट पॅकेज बनतो.
आर्ची आणि परश्या, एका गावामधले अठराएकोणीस वयोगटामधले दोघं. ती मोठ्या पाटलाच्या घरची. तो गरीबाघरचा, खालच्या जातीमधला. त्याला ती आधीपासून आवडते, मग तिलाही तो आवडू लागतो. दोघं प्रेमात पडतात आणि मग हलकल्लोळ उठतो. मध्यंतरापर्यंत हा सिनेमा अक्षरश: भणभणत राहतो. फेअरीटेल रोमान्स भासावा अशी प्रेमकहाणी पडद्यावर दिसत राहते. या प्रेमकहाणीचा अंत पुढे काय होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही पण तरीही त्या अंतापर्यंत पोचेस्तोवर सैराट आर्ची-परश्याच्या नात्याचे अनेक पदर उलगडून दाखवत राहतो. सिनेमा जिथे संपायचा आहे तिथे संपतो, पण संपल्यानंतर खर्या अर्थाने “आर्ची-परश्याची” प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनामध्ये सुरू राहते.
सोशल नेटवर्कवर “जातीव्यवस्थेवर भीषण भाष्य करणारा सिनेमा” वगैरे बिरूदं याला प्राप्त झाली आहेत. मी त्याच्याशी फारशी सहमत नाही. हा सिनेमा जातीव्यवस्थेवर आधारित नाही, जातीव्यवस्थेच्या नादाला लागून समाजाला पोखरणार्या काही किड्यांबद्दलही हा सिनेमा बोलत नाही. हा सिनेमा बोलतो ते जातीच्या पायी कसला तरी वृथा अहंकार बाळगून गमावलेल्या काही आयुष्यांबद्दल. नागराज एकदाही- एकदाही या दोघांची “जात” सांगत नाही. त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीमधला फरक तो अतिशय हुशारीने दाखवत जातो. बाल्कनीमध्ये नाचणारी आर्ची आणि त्या गाण्याच्या ओळी केवळ तिच्याचसाठी आहेत अशा धुंदीत खाली जमीनीवर नाचणारा परश्या, झाडावर चढताना “अजून वर गेलो तर फांदी मोडेल” म्हणणारा परश्या, कॉलेजात “शब्दांच्या जाती” शिकवणारे प्रोफेसर, मगामधलं पाणी गटागट पिणारा परश्या पण तेच पानी एकही घोट न घेणारी आर्ची अशा अनेक रूपकांमधून मंजुळे कथा दाखवत राहतो. खरंतर हा सिनेमा “बघायची” गोष्ट आहे. सैराटमध्ये सर्वात जास्त सैराट काय चाललं असेल तर ते कॅमेरावर्क. करमाळ्यासारख्या एरवी रूक्ष वाटणार्या ठिकाणी काय अजबगजब शॉट्स घेतलेत!! मी आजवर इतके सिनेमा थेटरात पाहिले पण पक्ष्यांच्या उडत्या थव्या्सारख्या अशक्य सुंदर शॉटला मारलेल्या उत्स्फ़ुर्त टाळ्या-शिट्या पहिल्यांदाच पा्हिल्यात.
कॅमेरावर्कखालोखाल कौतुक आहे ते रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या दोन नवकलाकारांचं. दोघंही इतके नवखे असूनही अप्रतिम अभिनय करतात, किंबहुना ते अभिनय करतात असं वाटतच नाही इतके सच्चे वाटतात. रिंकूच्या वाटयाला आलेली भूमिका ही जास्त जटिल आहे, लाडावलेली मुलगी ते एक जबाबदार व्यक्ती हा भलामोठा पल्ला तिच्या भूमिकेमध्ये ती फारच सशक्त रीत्या दाखवते. तिच्या कॉस्च्युममधला सूक्ष्म पण जाणवणारा बदल पाहता तिच्या भूमिकेसाठी एकंदरीत टीमनेच किती मेहनत घेतली आहे ते समजतं. आकाश ठोसरने खूप समजूतदारपणे काम केलेलं आहे, रिंकूसमोर तो जरा फिका पडला तरी त्याचे काही खास प्रसंग आहेत ज्यात तो खूप उठून दिसतो. खासकरून ती निघून गेल्यावर गळ्याभोवती फास घेऊन रडतानाचा प्रसंग. हो! हा एक स्टीरीओटाईप मंजुळेंनी मोडला आहे, हीरो रडतो चांगला हुंदके देऊन देऊन रडतो. शिवाय, हीरो मार खाताना हीरॉइन येऊन त्याला वाचवते.
सिनेमाचा अजून एक प्लस पॉइण्ट म्हणजे त्याचे संवाद. पूर्ण मराठवाडी शैलीमध्ये असणारे संवाद कुठूनही कृत्रिम वाटत नाहीत. उलट, ल्येका, यती, करती सारखे अस्सल शब्दप्रयोग योग्य ठिकाणी वापरून मजा येत राहते. सल्याच्या घरच्यांशी बोलतानाचा मराठी-हिंदी ठेका तर महान जमलाय. आर्चीच्या वडलांची स्टेजवरून भाषण करायची पद्धत आणि घरी आलेल्या प्राचार्याशी बोलायची पद्धत यातून सिनेमाबद्दल बरंच काही समजत राहतं. छोट्यातली छॊटीपात्रंदेखील आपला पूर्ण ठसा उमटवून जातात.
अजय अतुलच्या संगीताबद्दल बरंच बोलून झालंय, म्हणून आता इतकंच म्हणेन की सिनेमामध्ये असलेली चारही गाणी अतिशय चपखल आहेत आणि कूठेही खटकत नाहीत. याड लागलंचं पिक्चरायझेशन गाण्याइतकंच अप्रतिम आहे.
या सिनेमाचा टेम्प्लेट थोडासा तमिळ सिनेमांसारखा आहे, बहुतेक तमिळ लव्हस्टोरी अशाच असतात. सिनेमाच्या पहिल्या भागावर तर मणीरत्नमची छाप जाणवत राहते. नदीमधली दृश्यं, ऊसाच्या शेतामधले काही शॉट्स, मित्राच्या प्रेमकहाणीसाठी मार खाणारे दोस्तलोक्स, गाण्यांमधून पुढे जाणारी लव्ह्स्टोरी. गावाच्या राजकीय उतरंडीचे दर्शन घडवणारी दृश्यं असोत वा खेड्यांचं अस्सल आधुनिक वर्णन करणारे प्रसंग असोत दाक्षिणात्य सिनेमा अधूनमधून झळकत राहतात. तरीही मंजुळेंची प्रेमकथा मराठी मातीशी शंभर टक्के इमान राखून आहे. फेसबूकवर शोधाशोध करणारे टीनेजर हीरो आणि कॉलेजात शेतात फिरायला ट्रॅक्टर आणि बुलेट चालवणारी नायिका असो, ही प्रेमकथा फार गोजिरी वाटत राहते. अर्थात सर्व काही आलबेल नसतंच. प्रेमकहाणीमध्ये यायचे ते खलनायक एम्ट्री करतातच आणि करायचा तो राडा करतातच. यादरम्यान, घरातून पळून जाणारे नायक-नायिका पाहताना खरोखर ताण येऊ लागतो. आता या प्रेमकथेचा दुर्दैवी अंत होणार, आता.. आता की आता… असं म्हणत म्हणत मध्यंतर येतो आणि प्रेक्षक म्हणून मी सुटकेचा श्वास टाकला. सिनेमाच्या दुसर्या भागात ही प्रेमकहाणी गावामधून बाहेर येते, एका अनोळखी शहरामध्ये हे दोन प्रेमी जीव “आशियाना” बनवतात आणि सुखानं संसार करू लागतात… पण सर्व काही आलबेल होतच नाही आणि सिनेमा संपता संपता मीच सुन्न होऊन जाते.
फॅंड्रीमध्ये जब्यानं कॅमेराला भिरकावलेला दगड हा त्या सिनेमाचा हायपॉइंट होता, सैराटचा शेवटचा शॉटही तसाच हायपॉइंट आहे, त्याबद्दल मला बरंच काही लिहायचं आहे, पण सध्या सिनेमा थेटरामध्ये असेपर्यंत मी त्यावर लिहिणार नाही. केवळ इतक्ंच सांगेन, की इतर सिनेमा जेव्हा संपतात तेव्हा त्यांची कहाणी संपते, पण सैराटची कहाणी मात्र प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये भिरभिरतच राहते. जब्याचा तो दगड तेव्हाही सरळ येऊन घप्पकन बसला होता, याहीवेळी तसाच बसतो.
सिनेमा प्रोड्यूस करायला पैसा
सिनेमा प्रोड्यूस करायला पैसा लागतोच त्याच्या शिवाय सिनेमा प्रोड्यूस कसा करणार ? पण तो एकाच दिग्दर्शकाच्या त्याच त्याच पठडीतल्या कथानकावर का लावताहेत ? आणि त्यात काय कैच्याकै आपलं ( हि कोमेंट पुढच्या प्रतिसादकर्त्या करता आहे )
त्याच पठडीतल्या कथानकावर का
त्याच पठडीतल्या कथानकावर का लावताहेत ?>> तो त्यांचा पैसा आहे. त्यांना ठरवू देत ना काय करायचं ते. तुम्हाला बघायचं की नाही तुम्ही ठरवा
हा का ना का
बालवाडी? मग बरंच आहे की!
बालवाडी? मग बरंच आहे की! पाळण्यातली लग्नं लागायची ना आपल्या महान संस्क्रुतीत?
टाईमपास नापास झाला का? पण अजून शाळाचा उल्लेख का नाही आला? बाकीच्या आक्षेपार्ह शिनुमांत आणि शाळात काही वेगळं आहे का?
>>महेश | 3 May, 2016 - 09:06
>>महेश | 3 May, 2016 - 09:06 नवीन
हरकत नाही, आस्ते आस्ते हा वयोगट अजुन कमी होत जाऊन प्राथमिक, बालवाडी, इ. प्रकरणांचे चित्रपट देखील येऊ लागतील. तसेही प्रत्यक्षात हे चालू झालेले आहेच, हे कितिकांना माहीत आहे ?>> कैच्याकै महेश.
आलाय, शाळा चा उल्लेख आलाय
आलाय, शाळा चा उल्लेख आलाय वरती कुठेतरी
ती बालिकावधू नामक मध्ययुगीन
ती बालिकावधू नामक मध्ययुगीन मानसिकतेची मालिका दाखवत टीव्ही वर तेव्हा नाही तो कुणी इथे, आणखी कुठे प्रतिवाद केला ते.... तेव्हा नाही वाटलं की इतक्या गुंगून जाऊन पहाणारे प्रेक्षक हे समाजासाठी धोकादायक आहे म्हणून.. आणि आता फक्त सैराट ने नीतीमूल्य वगैरे धोक्यात येणारेत का काय?
महेश एवढा विचार न करता देवदास
महेश एवढा विचार न करता देवदास ते ऊंबरठा, प्यासा ते फुंटरू हे जसे 'कुण्या एकाची xxxगाथा' असे चित्रपट होते तसेच हाही चित्रपट बघा. (xxx - यशो, वीर, दु:ख, संघर्ष वगैरे वगैरे) . कुण्या दोघांची प्रेमगाथा म्हणून बघा, दोन मिनिटं हसा, नाचा, रडा आणि सोडून द्या व आपल्या कामाला लागा.(म्हणजे माबोवर सिनेमाबद्दल बोंब मारणे नव्हे)
). गांधी बघून कोणी गांधी होत नाही, रामायण बघून रामासारखा वागत नाही. हा तर एकंच सिनेमा आहे, एका बैठकीत महाभारत बघून कोणी अर्जून सोडा दुर्योधन सुद्धा बनत नाही तर ते सोडा.
अगदीच आदर्शवादाचा डोस पाहिजे असेल तर 'मनाचे श्लोक' म्हणा पण काही करून 'चिंता करितो विश्वाची' वगैरे म्हणू नका (ती मोदीनांच करू द्यात
सिनेमा म्हणा, पुस्तक म्हणा किंवा पेपरमधली एखादी बातमी म्हणा ज्याच्या डोक्यामध्ये जसा केमिकल लोचा आहे ती गोष्टं त्याला बरोबर अपील होणार आणि त्या बरहुकूम ती व्यक्ती वागणार आपण ठेविले अनंते तैसेचि रहावे.
एकुणात काय तर वडीलधार्यना
एकुणात काय तर वडीलधार्यना वाटत नाही तोपर्यंत प्रेमात पडायचे नाही. प्रेमपट पाहायचे नाहीत. वर्गातल्या मुला-मुलींकडे चोरून पहायचं नाही.
मनातल्या सगळ्या नैसर्गिक भावना दडपून टाकायच्या. वयात आल्यावर आई वडील म्हणतील त्या व्यक्तीच्या गळ्यात हार घालून मोकळे व्हावं. पुढे यथावकाश पोरं जन्माला घालावीत आणि त्यांनी आपण कसे नियमांनी वागलो याचा दाखला देत आपली उज्जवल गौरवशाली परंपरा जागृत ठेवयाची
सगळ्या चर्चेचा रोख फक्त
सगळ्या चर्चेचा रोख फक्त चित्रपटावरच केंद्रित झालेला दिसतोय. असा चित्रपट आला किंवा गेला, अल्लड वयातल्या मुंलांची मने गुंतणार नाहीत असे थोडेच आहे ?
जरी ते गुंतले, तरी आपण एक समाज म्हणून ते नीट कधी हाताळणार? नव्याची नवलाई चार दिवस टिकते, मनातला भावनांचा पूर हळूहळू ओसरला की वास्तवाचा तळ दिसू लागतो. पण वास्तवाची जाणीव होईल इतपत वेळ तर त्यांना द्यायला हवा. आपल्या पैकी किती जण असा वेळ आणि समजूतदारपणा दाखवतात?
केवळ विरोध करून प्रश्न सुटेल का ? असे अजून चित्रपट येतील आणि जातील. फार फार तर एखादा चित्रपट पाहून प्रेमाची अभिव्यक्ती कशी करायची, याचे धडे घेईल. पण मनातली भावना तर निघणार नाही ना? ती योग्यपणे हाताळण्यास आपण सक्षम आहोत का?
विलभ - यु सेड इट
विलभ - यु सेड इट
पालथ्या घड्यांचा अक्षरशः
पालथ्या घड्यांचा अक्षरशः कंटाळा आलेला आहे. पेशन्स संपलेले असल्याने नो कमेण्ट्स.
आता काही लिहीले तर आयडीला सद्गती प्राप्त होईल यात शंका नाही.
कमी शिकलेले , अशिक्षित वगैरे आपली पायरी ओळखून चांगले सांगितलेले ऐकतात. पण सुशिक्षित म्हणवून घेणा-यांना इतकं समजावून सांगण्यासाठी दोन मुलांचा बाप असूनही पुरेसा टॉलरन्स नाही हे कबूल करावं लागतंय. पण कधी कधी उघडपणे विरोध करणारे परवडले असं म्हणण्याची पाळी यावी अशा काही कमेट्स अतिहुषारीच्या असतात. तर असो.
झी कडे वळूयात.
आम्ही ठरवणारच आम्ही बघणार
आम्ही ठरवणारच आम्ही बघणार का नाहीं ते. ते दुसर कोण ठरवणार ? हाय काय अन नाय काय
याचा पुढचा भाग ( पार्ट थ्री काढावा ) बेस स्टोरी लाईन तीच. उच्च नीच जातीतले शाळकरी मुलगा मुलगी प्रेमात पडतात लग्न करतात पण पालकांची सुरवातीला अमान्यता आणि नंतर मान्यता. आणि चवथा भाग पण असाच काढावा .
बेस स्टोरी लाईन तीच. उच्च नीच जातीतले शाळकरी मुलगा मुलगी प्रेमात पडतात लग्न करतात . पालकांची मान्यता आहेच . पण शाळकरी वयात लग्न झाल्याने शिक्षण नाहीं मग सरकार त्यांच्या अक्क्या कुटुंबाची जबाबदारी घेत. ( जेवणा खाण्याची ) का बर? कारण त्यांनी उच्च नीच जातीत लग्न करून भेदभाव नष्ट केला आहे या महान कामगिरीबद्दल
वरदा +१ लोकांना रोजच्या रोज
वरदा +१
लोकांना रोजच्या रोज आबालवॄद्धां सोबत बसुन टीव्हीवर बालिकावधु बघायला हरकत नाही, पण सैराट नको?? हिप्पोक्रसीची हद्द आहे.
सैराट विरोधकांचे एकापेक्षा एक बालवाडी लेव्हलचे प्रतिवाद वाचून करमणुक होतेय काही दिवसापासून. चीडही येतेय.
सारखं शाळकरी, शाळकरी काय लावलंय यार? बारावी पास झालेले कॉलेजातले पोरं आहेत. जणु काही हा पहिलाच सिनेमा आहे ह्या वयोगटावर. आणि ह्या वयोगटात "असं" काही नसतंच म्हणणं तर लैच मजेदार. असो.
मला सिनेमा अतिच आवडलाय. गाणी तर त्याहून जास्त.
अजय अतुलनी इतकं लेयर्ड/ टेक्शचर्ड ( textured) म्युझिक दिलंय जे आतापर्यंत तरी कधीच मराठीत ऐकलं नव्हतं. चित्रपट जसा "दिसतो", तेही अप्रतिम. अभिनय टॉप क्लास. डायरेक्शन एक नंबर. जरा दहा-पंधरा मिनिटं कमी चालला असता, एवढंच. मी पुन्हा बघणार. तिकीट मिळायला हवे
सध्या महाराष्ट्रातलं मनोरंजन
सध्या महाराष्ट्रातलं मनोरंजन झी च्या हाती आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. अॅवॉर्डस, अजय अतुल नाईट यांचा धडाका सुरू झाला. याला निर्मिती खर्च कमी येतो. दर आठवड्याला कुठला नवा सिनेमा दाखवायचा याचे गणित यामुळे सुटले.
झीने अनेक चांगले कलाकार आपल्याकडे वळवलेले आहेत. नव्या कलाकारांना आपल्या देखील झी आपल्या कंपूत ओढते. अजय अतुल ला पहिल्यांदा झी ने संधी दिली. नागराज मंजुळे फॅण्ड्री मुळे चर्चेत आल्यानंतर त्याच्या सिनेमाच्या हक्कासहीत सिनेमा रिलीज केल्याने नवा सिनेमा विकत घेण्याचा खर्च वाचला. सैराट ची निर्मिती स्वतःचीच असल्याने सिनेमा चालल्याचे उत्पन्न झीलाच मिळते, शिवाय झी टॉकीजवर रिलीज करण्यासाठी वेगळे पैसे मोजण्याची आवश्यकता नाही. असं हे धंद्याचं गणित आहे. झी टॉकीजचे सिनेमे ब-यापैकी चालतात. इतर मराठी वाहीन्यांची अवस्था वाइट आहे. ईटीव्ही तर कलर्सने विकत घेतले. एकेकाळी ते टॉपला होते.
(सैराटची निर्मिती केली नसती तर नागराज दुसरीकडे गेला असता हे ही बरोबर आहे )
झी-टीवीचे स्टॉक पीच वाटतंय
झी-टीवीचे स्टॉक पीच वाटतंय हे, कापोचे तुम्ही झी चा स्टॉक रिकमेंड करताय का?
सैराट ची निर्मिती स्वतःचीच
सैराट ची निर्मिती स्वतःचीच असल्याने सिनेमा चालल्याचे उत्पन्न झीलाच मिळते, शिवाय झी टॉकीजवर रिलीज करण्यासाठी वेगळे पैसे मोजण्याची आवश्यकता नाही. असं हे धंद्याचं गणित आहे.<<< इतके साधे गणित नाहीये. अधलेमधले वेगळी समीकरणं बरीच आहेत. तो इथला मुद्दा नाही. झीने सैराटवर बराच मॉठा जुगार लावला होता आणि तो यशस्वी ठरला आहे. नागराज ने कमर्शेअल सिनेमा बनवतानासुद्धा आपली "जान" त्यात ओतली आहे.
तुम्ही अद्याप सिनेमा न पाहिल्याने याहून अधिक तुम्हाला सांगू शकणार नाही. उद्या सिनेमा पाहून आल्यावर बोलू
शेवटाबद्दल तर निरनिराळ्या
शेवटाबद्दल तर निरनिराळ्या प्रतिसादांनी उत्सुकता शिगेला पोहोचलीय. मनात वाटतंय की शेवट नक्की रडवणार, पण असे नाजूक क्षण प्रत्येकाच्या वाट्याला केव्हा न केव्हा आलेले असतातच. मग असे चित्रपट आले, की विस्मृतीत पडलेले ते दिवस राहून राहून आठवतात.
म्हणून एकदा तरी मला सैराट पाहायचाय, हरवलेल्या दिवसांच्या उजळणीसाठी.
हरकत नाही, आस्ते आस्ते हा
हरकत नाही, आस्ते आस्ते हा वयोगट अजुन कमी होत जाऊन प्राथमिक, बालवाडी, इ. प्रकरणांचे चित्रपट देखील येऊ लागतील. तसेही प्रत्यक्षात हे चालू झालेले आहेच, हे कितिकांना माहीत आहे ?>>
महेश.. तुम्ही आधी ठरवा बघू की चित्रपट बघून ही मुलं असलं काही शिकतात की न बघताच शिकतात ते..
आज सैराट पाहिला . चांगला
आज सैराट पाहिला . चांगला चित्रपट आहे . पण एवढा गवगवा केलाय तसा भिडला नाही मनाला . सिनेमॉटोग्राफी उत्तम आहें . दाक्षिणात्य प्रभाव जाणवतो . माझ्याकडून ३*
मजेदार पोस्टी आहेत. झी हे
मजेदार पोस्टी आहेत.
झी हे 'सैराट'चे मूळ निर्माते नव्हते. 'आजोबा' आणि 'सैराट' हे दोन्ही चित्रपट एकाच निर्मात्यानं एकाच वेळी करायला घेतले. 'आजोबा' पूर्ण झाला. मधल्या काळात 'सैराट'चे निर्माते बदलले. नागराज 'फॅण्ड्री'च्या आधी 'झी'मध्येच काम करायचा.
किल्ला, एलिझाबेथ एकादशी, फॅण्ड्री, सैराट असे उत्तम चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल झीचं अभिनंदन करायलाच हवं.
अल्पवयीन कुठे दाखवलेत ते दोघ
अल्पवयीन कुठे दाखवलेत ते दोघ ?
रजिस्टर लग्न केलेलं दाखवलंय , म्हणजे ते सज्ञान असतात
आणि सिनेमे पाहून लोक बदलतात हा तर मोठा विनोदच आहे
'प्रकाश बाबा आमटे ' सिनेमा पाहून किती जण समाजसेवक झाले ?
झी चा मालक कोण आहे? मराठी आहे
झी चा मालक कोण आहे? मराठी आहे की अमराठी? झी च्या कमावण्यावर आक्षेप (असल्यास) नक्की का आहे?
आणि हो, ते प्रेम आणि लग्न करायचे योग्य वय काय हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे, त्याचा इथे सैराट करू नका
महेश, तुम्ही सिनेमा बघून मत
महेश, तुम्ही सिनेमा बघून मत बनवताय की फॉरवर्ड्स वाचून? फॉरवर्ड लिहिणार्यांनी तरी सिनेमा बघितला आहे का? मीही आधी या विरोधी पोस्ट्समुळे प्रतिकूल मत बनवलं होतं. पण जे सोशल मिडिया व इतरत्र चित्रपट बघितलेल्यांकडून ऐकलं आहे त्यावरुन हा चित्रपट मुलांना वाईट वळण लावणारा वगैरे नाहीच आहे. उलट अवघड वयातील आईबाबांनी मुलांसोबत बसून चित्रपट बघावा आणि मोकळेपणाने चर्चा करावी असा चित्रपट आहे.नागराज मंजुळे त्यांच्या नैतिकतेशी प्रचंड प्रामाणिक आहेत. तुम्ही 'बॅन सैराट' किंवा 'बॉयकॉट सैराट' म्हटलं तर मुलं उलट तो बंडखोरी करुन बघणार. आणि बॅन करायचं तालिबानी कल्चर आणायचं आहे का भारतात? उलट मुलांना चित्रपट बघू दे आणि तुम्ही तुमची बाजू, वाटणारी काळजी हार्ट-टू-हार्ट चर्चा करुन व्यक्त करा. आणि चित्रपटाचे नायिका-नायक जर १८-१९ वर्षांची असतील तर 'शाळकरी' म्हणता येणार नाही. या वयाचे कपल्स असंख्य चित्रपटात, सिरीयल्समध्ये असतात.
एक उत्तम दर्जाचा मराठी चित्रपट इतका तुफान डोक्यावर घेतला जात आहे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
.
.
सनव, अगदी सहमत. जातीचा एक पदर
सनव, अगदी सहमत. जातीचा एक पदर चित्रपटात असला, तरी स्वप्न आणि वास्तव यातला फरक हेच मुख्य सूत्र असावं. परजातीतल्या मुलावर/मुलीवर प्रेम यामुळे हटकून विरोध होतोच, पण लहान वयातले प्रेम हे अजूनही योग्य प्रकारे हाताळले जात नाही. दोघे स्वजातीत असूनही केवळ तोलामोलाचे घराणे, मान-पानासारख्या छुल्लक कारणांवरून प्रेमाला विरोध करण्याची बरीच उदाहरणे गावात अजूनही मिळतात .
नमस्कार लोक्स, हिरीरीने बाजु
नमस्कार लोक्स,
हिरीरीने बाजु मांडण्यापेक्षा दोन्ही बाजुकडील किती जणांनी हा चित्रपट कोरी पाटी घेउन पाहीला ते प्रामाणिकपणे सांगितले पाहीजे...
सैराट..... Love marriage केलेल्या सगळ्यांना जुने दिवस विषेशतः "प्रेम" हे "प्रकरण" असण्याच्या दिवसांची आठवण नक्कीच करुन देइल..... बाकी जातीभेद,वर्गभेद हा वैयक्तिक अनुभव आणि कुठल्या विचारांचे चश्मे लावुन आपण वावरतो त्यावर अवलंबून असणार...
घारुअण्णा, छान
घारुअण्णा, छान पोस्ट.
ऑर्कुटवर येईपर्यंत माझी पाटी कोरीच होती. तिथे आधी चांगला वेळ गेला पण नंतर गांगरून जावं असे विषय, हल्ले पहायला मिळाले. सुरूवातीला खूप दुखावला जायचो. नंतर सवय झाली. आता टणक होत चाललोय.
कधी कधी असं वाटतं या विषयांवर न बोलल्याने कोंडी फुटत नाही. बोलून मोकळं झालं की मान्य करा नका करू आपापल्या चुका नक्की कळतात. काही वर्षांनी का होईना रिअलाईझ होतं. माझ्या बाबतीत पण असं झालेलं आहे. काही गोष्टी तेव्हां मान्य न केलेल्या काही दिवसांनी, महीन्यांनी पटल्या.
त्यामुळं होऊदे खर्च !
चिनूक्स
ही आतली माहिती नव्हती. बाकी किल्ला बद्दल सहमत. असा विषय हाताळायला कुणीही पुढे आले नसते.
[साभारः WhatsApp ] शाळेतील
[साभारः WhatsApp ]
शाळेतील पोरं बिघडतील म्हणुन सैराटला विरोध करणा-यांनी...
..
..
..
..
..
मास्तर बिघडतील म्हणुन "पिंजरा"ला विरोध का केला नाही........
एक संतप्त १०वी "ड" मधील पोरगं
चित्रपट पाहिला. मग
चित्रपट पाहिला.
मग बर्याचशा प्रतिक्रीया वाचल्या.
चित्रपटाची कथा, लहान वयातलं प्रेमप्रकरण, उच्चनीचता आणि गाणी यापेक्षाही मंजुळे आणि फक्त मंजुळेंच्या दिग्दर्शनासाठी पुन्हापुन्हा पहावा असा सिनेमा आहे.
चित्रपटाच्या क्षेत्रातले जाणकार त्याबद्दल लिहितीलच , पण अगदी माझ्यासारख्या चित्रपट क्षेत्रातलं काहीच कळणारीची झोपही त्या दिग्दर्शनाच्या जादूने उडवून लावलीय.
वर बिविजयकुमार यांनी काही उदाहरणे दिली आहेतच.
सगळ्यांनी सिनेमा पाहून झाला की या दिग्दर्शनाच्या जादूवर पुन्हा एकदा चर्चा करूया.
खरंच अप्रतिम चित्रपट आहे.
बाकी गाण्यांपैकी मला एकही अपिल झालं नाही हा कदाचित माबुदो असावा.
मास्तर बिघडतील म्हणुन
मास्तर बिघडतील म्हणुन "पिंजरा"ला विरोध का केला नाही........>>>>>>:हहगलो:
Pages