सैराट!!!

Submitted by नंदिनी on 29 April, 2016 - 11:24

सैराट ही एक लव्हस्टोरी आहे. हे आतापर्यंत सर्वांनाच माहित झालं असेल. पिस्तुल्या, फॅंड्रीसारखे वेगळे विषय हाताळणार्या नागराजकडून जेव्हा “लव्हस्टोरी”सादर केली जाते तेव्हा ती केवळ गोडगोडुली प्रेमकथा नसते तर वास्तवाचा पक्का पाया घेऊन उभी राहणारी एक सशक्त पटकथा असते. मराठी चित्रपटांच्या इतिहासामध्ये सैराट हा एक मानाचे स्थान पटकावून बसणार आहे हे आता निश्चितच.

बर्लिन सारख्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमीअर असो, वा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये रिंकू राजगुरुला मिळालेले “स्पेशल मेनशन एवॉर्ड” यामुळे सैराटबद्दल आधीच फार उत्सुकता होती. त्यातही झी मराठीने केलेल्या कल्पक मार्केटिंग आणि प्रसिद्धीमुळे सिनेमाबद्दल रीलीजच्या आधीच वलय तयार झालं होतं. अशा “हाईप” केलेल्या सिनेमांना अपेक्षाभंगाचा फार मॊठा धोका असतो, सुदैवाने सैराट सर्व अपेक्षांना पुरून उरतो आणि एक कंप्ल्लीट एंटरटेनमेंट पॅकेज बनतो.

आर्ची आणि परश्या, एका गावामधले अठराएकोणीस वयोगटामधले दोघं. ती मोठ्या पाटलाच्या घरची. तो गरीबाघरचा, खालच्या जातीमधला. त्याला ती आधीपासून आवडते, मग तिलाही तो आवडू लागतो. दोघं प्रेमात पडतात आणि मग हलकल्लोळ उठतो. मध्यंतरापर्यंत हा सिनेमा अक्षरश: भणभणत राहतो. फेअरीटेल रोमान्स भासावा अशी प्रेमकहाणी पडद्यावर दिसत राहते. या प्रेमकहाणीचा अंत पुढे काय होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही पण तरीही त्या अंतापर्यंत पोचेस्तोवर सैराट आर्ची-परश्याच्या नात्याचे अनेक पदर उलगडून दाखवत राहतो. सिनेमा जिथे संपायचा आहे तिथे संपतो, पण संपल्यानंतर खर्या अर्थाने “आर्ची-परश्याची” प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनामध्ये सुरू राहते.

सोशल नेटवर्कवर “जातीव्यवस्थेवर भीषण भाष्य करणारा सिनेमा” वगैरे बिरूदं याला प्राप्त झाली आहेत. मी त्याच्याशी फारशी सहमत नाही. हा सिनेमा जातीव्यवस्थेवर आधारित नाही, जातीव्यवस्थेच्या नादाला लागून समाजाला पोखरणार्या काही किड्यांबद्दलही हा सिनेमा बोलत नाही. हा सिनेमा बोलतो ते जातीच्या पायी कसला तरी वृथा अहंकार बाळगून गमावलेल्या काही आयुष्यांबद्दल. नागराज एकदाही- एकदाही या दोघांची “जात” सांगत नाही. त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीमधला फरक तो अतिशय हुशारीने दाखवत जातो. बाल्कनीमध्ये नाचणारी आर्ची आणि त्या गाण्याच्या ओळी केवळ तिच्याचसाठी आहेत अशा धुंदीत खाली जमीनीवर नाचणारा परश्या, झाडावर चढताना “अजून वर गेलो तर फांदी मोडेल” म्हणणारा परश्या, कॉलेजात “शब्दांच्या जाती” शिकवणारे प्रोफेसर, मगामधलं पाणी गटागट पिणारा परश्या पण तेच पानी एकही घोट न घेणारी आर्ची अशा अनेक रूपकांमधून मंजुळे कथा दाखवत राहतो. खरंतर हा सिनेमा “बघायची” गोष्ट आहे. सैराटमध्ये सर्वात जास्त सैराट काय चाललं असेल तर ते कॅमेरावर्क. करमाळ्यासारख्या एरवी रूक्ष वाटणार्या ठिकाणी काय अजबगजब शॉट्स घेतलेत!! मी आजवर इतके सिनेमा थेटरात पाहिले पण पक्ष्यांच्या उडत्या थव्या्सारख्या अशक्य सुंदर शॉटला मारलेल्या उत्स्फ़ुर्त टाळ्या-शिट्या पहिल्यांदाच पा्हिल्यात.

कॅमेरावर्कखालोखाल कौतुक आहे ते रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या दोन नवकलाकारांचं. दोघंही इतके नवखे असूनही अप्रतिम अभिनय करतात, किंबहुना ते अभिनय करतात असं वाटतच नाही इतके सच्चे वाटतात. रिंकूच्या वाटयाला आलेली भूमिका ही जास्त जटिल आहे, लाडावलेली मुलगी ते एक जबाबदार व्यक्ती हा भलामोठा पल्ला तिच्या भूमिकेमध्ये ती फारच सशक्त रीत्या दाखवते. तिच्या कॉस्च्युममधला सूक्ष्म पण जाणवणारा बदल पाहता तिच्या भूमिकेसाठी एकंदरीत टीमनेच किती मेहनत घेतली आहे ते समजतं. आकाश ठोसरने खूप समजूतदारपणे काम केलेलं आहे, रिंकूसमोर तो जरा फिका पडला तरी त्याचे काही खास प्रसंग आहेत ज्यात तो खूप उठून दिसतो. खासकरून ती निघून गेल्यावर गळ्याभोवती फास घेऊन रडतानाचा प्रसंग. हो! हा एक स्टीरीओटाईप मंजुळेंनी मोडला आहे, हीरो रडतो चांगला हुंदके देऊन देऊन रडतो. शिवाय, हीरो मार खाताना हीरॉइन येऊन त्याला वाचवते.

सिनेमाचा अजून एक प्लस पॉइण्ट म्हणजे त्याचे संवाद. पूर्ण मराठवाडी शैलीमध्ये असणारे संवाद कुठूनही कृत्रिम वाटत नाहीत. उलट, ल्येका, यती, करती सारखे अस्सल शब्दप्रयोग योग्य ठिकाणी वापरून मजा येत राहते. सल्याच्या घरच्यांशी बोलतानाचा मराठी-हिंदी ठेका तर महान जमलाय. आर्चीच्या वडलांची स्टेजवरून भाषण करायची पद्धत आणि घरी आलेल्या प्राचार्याशी बोलायची पद्धत यातून सिनेमाबद्दल बरंच काही समजत राहतं. छोट्यातली छॊटीपात्रंदेखील आपला पूर्ण ठसा उमटवून जातात.

अजय अतुलच्या संगीताबद्दल बरंच बोलून झालंय, म्हणून आता इतकंच म्हणेन की सिनेमामध्ये असलेली चारही गाणी अतिशय चपखल आहेत आणि कूठेही खटकत नाहीत. याड लागलंचं पिक्चरायझेशन गाण्याइतकंच अप्रतिम आहे.

या सिनेमाचा टेम्प्लेट थोडासा तमिळ सिनेमांसारखा आहे, बहुतेक तमिळ लव्हस्टोरी अशाच असतात. सिनेमाच्या पहिल्या भागावर तर मणीरत्नमची छाप जाणवत राहते. नदीमधली दृश्यं, ऊसाच्या शेतामधले काही शॉट्स, मित्राच्या प्रेमकहाणीसाठी मार खाणारे दोस्तलोक्स, गाण्यांमधून पुढे जाणारी लव्ह्स्टोरी. गावाच्या राजकीय उतरंडीचे दर्शन घडवणारी दृश्यं असोत वा खेड्यांचं अस्सल आधुनिक वर्णन करणारे प्रसंग असोत दाक्षिणात्य सिनेमा अधूनमधून झळकत राहतात. तरीही मंजुळेंची प्रेमकथा मराठी मातीशी शंभर टक्के इमान राखून आहे. फेसबूकवर शोधाशोध करणारे टीनेजर हीरो आणि कॉलेजात शेतात फिरायला ट्रॅक्टर आणि बुलेट चालवणारी नायिका असो, ही प्रेमकथा फार गोजिरी वाटत राहते. अर्थात सर्व काही आलबेल नसतंच. प्रेमकहाणीमध्ये यायचे ते खलनायक एम्ट्री करतातच आणि करायचा तो राडा करतातच. यादरम्यान, घरातून पळून जाणारे नायक-नायिका पाहताना खरोखर ताण येऊ लागतो. आता या प्रेमकथेचा दुर्दैवी अंत होणार, आता.. आता की आता… असं म्हणत म्हणत मध्यंतर येतो आणि प्रेक्षक म्हणून मी सुटकेचा श्वास टाकला. सिनेमाच्या दुसर्या भागात ही प्रेमकहाणी गावामधून बाहेर येते, एका अनोळखी शहरामध्ये हे दोन प्रेमी जीव “आशियाना” बनवतात आणि सुखानं संसार करू लागतात… पण सर्व काही आलबेल होतच नाही आणि सिनेमा संपता संपता मीच सुन्न होऊन जाते.

फॅंड्रीमध्ये जब्यानं कॅमेराला भिरकावलेला दगड हा त्या सिनेमाचा हायपॉइंट होता, सैराटचा शेवटचा शॉटही तसाच हायपॉइंट आहे, त्याबद्दल मला बरंच काही लिहायचं आहे, पण सध्या सिनेमा थेटरामध्ये असेपर्यंत मी त्यावर लिहिणार नाही. केवळ इतक्ंच सांगेन, की इतर सिनेमा जेव्हा संपतात तेव्हा त्यांची कहाणी संपते, पण सैराटची कहाणी मात्र प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये भिरभिरतच राहते. जब्याचा तो दगड तेव्हाही सरळ येऊन घप्पकन बसला होता, याहीवेळी तसाच बसतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सैराट ला प्रसिद्धी देण्यामागचा झी वाल्याचा अंतस्थ हेतु लक्षात आल्यामुळे व त्या मागिल हेतु कटकारस्थान कळाल्यामुळे सैराट पाहणे कॅन्सल... >> अर्रे व्वा, सकुरा ताईंचे गुप्तहेर खाते लई भारी दिसतंय. Proud

अरे अंतस्थ हेतू सांगा की पण कोणी! चित्रपटाने गल्ला जमवावा हा अंतस्थ हेतू तर असू शकत नाही, मग काय आहे तरी काय??

अहो तोच अंतस्थ हेतू जो झीच्याच सारेगमप मधे कार्तिकी गायकवाड जिंकल्यावर इथल्या हुशार लोकांना कळला होता, तेंव्हाही आम्ही असेच विचारले तर उत्तर मिळालेच नव्हते, आताही मिळणार नाही.

कालच 'सैराट' चित्रपट पहिला. मी, आई आणि लहान बहिण आम्ही तिघी गेलो होतो ६. ४५ च्या शो ला. इंटरवलच्या आधी अगदी हसून हसून डोळ्यात पाणी आलं होत आणि जसा चित्रपट संपला जागेवरून उठायचंहि भान राहील नाही शेवट अगदीच सुन्न करून गेला. (विशेषत: आईलाही आवडला चित्रपट). मध्यंतरापूर्वी चित्रपटगृहातील जी मुलं मागे बसून टिंगल टवाळी करत होती तिचं मुलं चित्रपट संपल्यावर बाहेर पडताना अक्षरश: थोबाडात मारावी तशी गप्प होती. hats ऑफ तो नागराज मंजुळे & टीम फॉर everything

सैराट झालं जी SSSSSS

आगाऊ अनुमोदन. स्पर्धा सुरु होण्याआधीच त्यांचे विशिष्ठ विनर आधीच ठरलेले असतात. काही करू शकत नाही. नागराज मंजुळे चेच सिनेमे झी मराठी ने प्रोड्युड का केले? आणि ते सुद्धा एकाच पठडीतले.दोन भिन्न जातीतल्या
( उच्च आणि नीच ) लहान मुलांची प्रेमप्रकरण ( किव्वा एकतर्फी प्रेम ) दाखवायची . दुसरा विषयच नाही Happy

आगावा Lol

नागराजच्या काव्यसंग्रहाचे नाव पण उन्हाच्या कटाविरुद्ध असे आहे. कारस्थान कार_स्थान. जीपीएस.

अल्पवयीन मुलगी लफड्यात पडते तेंव्हा
अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात घेवून लैंगिक शोषण...
अल्पवयीन मुलगी पळून जावून लग्न करते तेंव्हा....
काय अवस्था होते.... बापाची...भावाची बहिणीची ...आईची अन कुटूंबाची..
कल्पना करा.... त्या अल्पवयीन मुलीच्या ठिकाणी आपली मुलगी पहा...
अन मगच करा.... समर्थन सैराट चित्रपटाच.
शाळा... टाईमपास... टाईमपास 2 , फैंड्री तून काय संस्कार करण्यात आले पौगंडावस्थेतील विद्यार्थीदशेतील अल्पवयीन मुला मुलींवर...
सुजाण पालकांनो... भानावर या.
त्यातच सैराट आलाय...
अल्पवयीनांच्या प्रेम प्रकरणांचे प्रतिनिधित्व करायला.
या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शकांना नि कलाकारांना व सर्वच टिमला म्हणे सामाजिक प्रबोधन करायच आहे. या प्रबोधन कार्यासाठी बालकलाकारांची प्रेम प्रकरण दाखवण गरजेच आहे का. ?उडण खटोला १००% सहमत

सकुरा यानी नमूद केलेला अंतस्थ हेतू म्हणजे रोहित वेमुला प्रकरणावरून लोकांचे लक्ष उडवणे हाच असणार कारण जगातली प्रत्येक गोष्ट रोहित वेमुला प्रकरणा वरचे लक्ष उडवण्याकरता असते अशी त्यांची थिअरी असते...
जाऊ द्या दुर्लक्ष करा .

नागराज मंजुळे चेच सिनेमे झी मराठी ने प्रोड्युड का केले? >>> यावर काय लिहाव ते कळत नाहिये, व्यावसायिक गणित अशी नसतात ओ! झी मराठीला सिनेमा प्रोड्युस करायला काय पैसा लागत नाही की काय?

अहो असं कसं. झी ला आपल्या सगळ्यांच्या मुलामुलींना नादाला लावायचे आहे. त्यांचे लक्ष अभ्यासावरून उडवून, प्रेमप्रकरण करायला लावण्यात झी चे कारस्थान आहे. आपली मुले एकवेळ आपले ऐकणार नाहीत पण सैराट बघितल्या लगेच जाऊन लफडी करतील.
नागराज मंजुळेला म्हणूनच त्यांनी हाताशी धरले आहे. आपली पायरी न बघता चांगल्या घरच्या पोरी कशा पटववयात यावर तो जोर देतो म्हणे

छे काहीतरीच काय. हे फुले, आंबेडकर यांना मानणारे राज्य आहे. ते तसले काहीतरी हरयाणात होत असेल. आम्ही सुजाण सुशिक्षित आहोत

हायला स्वतः ह्याच वयात वासू- सपना, राज- रष्मी बघून वाढलेली ही पिढी आता पोरांना परशा-आर्ची बघायचे तर म्हणे ह्यापोरांना अक्कल नाही ते असं काही तरी बघून वहावतील. कमाल आहे हिप्पोक्रसीची.
आपल्या पालकांचा आप्ल्यावर जास्तं विश्वास होता की राव, शनिवार, रविवारला हे सिनेमे सगळे कुटुंब मिळून बघायचे. काय बिघडंलय नेमकं?

हा.ब. : वासू सपना, राज रश्मी यांचा वयोगट आणि या जोडीचा वयोगट यात काहीच फरक नाही का ?
टाईमपास पण या निकषावर नापास आहे.

काय वयोगट आहे ह्या जोडीचा? १८,१९?
राज रश्मी, वासू सपना नक्की विशी पूर्ण झालेले होते? विशीनंतर प्रेमात पडल्यास योग्य नाहीतर अयोग्य असं कुठे लिहिलंय का?

त्या आधीच्या पिढीला वासू सपना आणि राज रश्मीचा वयोगटातील प्रेम नापसंत होते. नोकरी नाही प्रेमाची थेरं कसली करता?
तरी पण तुमच्या पिढीने केलीच ना ती थेरं?
त्यात तुम्हाला व्यक्तिस्वातंत्रयाचा उद्रेक दिसला होता. आता चष्मा बदलल्यावर थेरं जाणवायला लागलीयेत

अहो पण आक्षेप जे हा चित्रपट बघणार आहेत त्यांच्यावर होणार्‍या परिणामांबद्दल आहे ना?
वासू सपना, राज रश्मी ह्यांना बघणारे तुमच्या आमच्यासारखे सगळे तेव्हा कायद्याने सज्ञान होते असं म्हणताय का?

आणि 'बॉबी' चा वयोगट काय होता हो?
और चाबी खो जाये.... म्हणताना कुणाला प.पू. भारतीय संस्कृतीबद्दल काही वाटलं नसेलच

वयोगटात कसला फरक ? कॉलेजातली प्रेमं अशी कॅटेगरी केली तर हजारो सिनेमे येतील त्यात.
मैने प्यार किया - (संस्कारी बडजात्याचा सिनेमा!), जो जीता, बॉबी, दिल, स्टुडन्ट ऑफ द इयर, झी च्या कितीतरी प्रसिद्ध मालिका, मराठीतले दुनियादारी .लिस्ट लांबलचक होईल. फक्त याच सिनेम्याने जगावेगळे दाखवून मुलांना बिघडवायचा मक्ता घेतलाय का ?

हरकत नाही, आस्ते आस्ते हा वयोगट अजुन कमी होत जाऊन प्राथमिक, बालवाडी, इ. प्रकरणांचे चित्रपट देखील येऊ लागतील. तसेही प्रत्यक्षात हे चालू झालेले आहेच, हे कितिकांना माहीत आहे ?

ठीक आहे. माझ्याकडून नो मोअर प्रतिसाद.

बादवे, क.से.क.त. आणि बॉबी हे चित्रपट देखील फार काही चांगले नव्हतेच. अपवाद ए.दु.के.लि.

Ashu Lol

Pages