सैराट!!!

Submitted by नंदिनी on 29 April, 2016 - 11:24

सैराट ही एक लव्हस्टोरी आहे. हे आतापर्यंत सर्वांनाच माहित झालं असेल. पिस्तुल्या, फॅंड्रीसारखे वेगळे विषय हाताळणार्या नागराजकडून जेव्हा “लव्हस्टोरी”सादर केली जाते तेव्हा ती केवळ गोडगोडुली प्रेमकथा नसते तर वास्तवाचा पक्का पाया घेऊन उभी राहणारी एक सशक्त पटकथा असते. मराठी चित्रपटांच्या इतिहासामध्ये सैराट हा एक मानाचे स्थान पटकावून बसणार आहे हे आता निश्चितच.

बर्लिन सारख्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमीअर असो, वा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये रिंकू राजगुरुला मिळालेले “स्पेशल मेनशन एवॉर्ड” यामुळे सैराटबद्दल आधीच फार उत्सुकता होती. त्यातही झी मराठीने केलेल्या कल्पक मार्केटिंग आणि प्रसिद्धीमुळे सिनेमाबद्दल रीलीजच्या आधीच वलय तयार झालं होतं. अशा “हाईप” केलेल्या सिनेमांना अपेक्षाभंगाचा फार मॊठा धोका असतो, सुदैवाने सैराट सर्व अपेक्षांना पुरून उरतो आणि एक कंप्ल्लीट एंटरटेनमेंट पॅकेज बनतो.

आर्ची आणि परश्या, एका गावामधले अठराएकोणीस वयोगटामधले दोघं. ती मोठ्या पाटलाच्या घरची. तो गरीबाघरचा, खालच्या जातीमधला. त्याला ती आधीपासून आवडते, मग तिलाही तो आवडू लागतो. दोघं प्रेमात पडतात आणि मग हलकल्लोळ उठतो. मध्यंतरापर्यंत हा सिनेमा अक्षरश: भणभणत राहतो. फेअरीटेल रोमान्स भासावा अशी प्रेमकहाणी पडद्यावर दिसत राहते. या प्रेमकहाणीचा अंत पुढे काय होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही पण तरीही त्या अंतापर्यंत पोचेस्तोवर सैराट आर्ची-परश्याच्या नात्याचे अनेक पदर उलगडून दाखवत राहतो. सिनेमा जिथे संपायचा आहे तिथे संपतो, पण संपल्यानंतर खर्या अर्थाने “आर्ची-परश्याची” प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनामध्ये सुरू राहते.

सोशल नेटवर्कवर “जातीव्यवस्थेवर भीषण भाष्य करणारा सिनेमा” वगैरे बिरूदं याला प्राप्त झाली आहेत. मी त्याच्याशी फारशी सहमत नाही. हा सिनेमा जातीव्यवस्थेवर आधारित नाही, जातीव्यवस्थेच्या नादाला लागून समाजाला पोखरणार्या काही किड्यांबद्दलही हा सिनेमा बोलत नाही. हा सिनेमा बोलतो ते जातीच्या पायी कसला तरी वृथा अहंकार बाळगून गमावलेल्या काही आयुष्यांबद्दल. नागराज एकदाही- एकदाही या दोघांची “जात” सांगत नाही. त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीमधला फरक तो अतिशय हुशारीने दाखवत जातो. बाल्कनीमध्ये नाचणारी आर्ची आणि त्या गाण्याच्या ओळी केवळ तिच्याचसाठी आहेत अशा धुंदीत खाली जमीनीवर नाचणारा परश्या, झाडावर चढताना “अजून वर गेलो तर फांदी मोडेल” म्हणणारा परश्या, कॉलेजात “शब्दांच्या जाती” शिकवणारे प्रोफेसर, मगामधलं पाणी गटागट पिणारा परश्या पण तेच पानी एकही घोट न घेणारी आर्ची अशा अनेक रूपकांमधून मंजुळे कथा दाखवत राहतो. खरंतर हा सिनेमा “बघायची” गोष्ट आहे. सैराटमध्ये सर्वात जास्त सैराट काय चाललं असेल तर ते कॅमेरावर्क. करमाळ्यासारख्या एरवी रूक्ष वाटणार्या ठिकाणी काय अजबगजब शॉट्स घेतलेत!! मी आजवर इतके सिनेमा थेटरात पाहिले पण पक्ष्यांच्या उडत्या थव्या्सारख्या अशक्य सुंदर शॉटला मारलेल्या उत्स्फ़ुर्त टाळ्या-शिट्या पहिल्यांदाच पा्हिल्यात.

कॅमेरावर्कखालोखाल कौतुक आहे ते रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या दोन नवकलाकारांचं. दोघंही इतके नवखे असूनही अप्रतिम अभिनय करतात, किंबहुना ते अभिनय करतात असं वाटतच नाही इतके सच्चे वाटतात. रिंकूच्या वाटयाला आलेली भूमिका ही जास्त जटिल आहे, लाडावलेली मुलगी ते एक जबाबदार व्यक्ती हा भलामोठा पल्ला तिच्या भूमिकेमध्ये ती फारच सशक्त रीत्या दाखवते. तिच्या कॉस्च्युममधला सूक्ष्म पण जाणवणारा बदल पाहता तिच्या भूमिकेसाठी एकंदरीत टीमनेच किती मेहनत घेतली आहे ते समजतं. आकाश ठोसरने खूप समजूतदारपणे काम केलेलं आहे, रिंकूसमोर तो जरा फिका पडला तरी त्याचे काही खास प्रसंग आहेत ज्यात तो खूप उठून दिसतो. खासकरून ती निघून गेल्यावर गळ्याभोवती फास घेऊन रडतानाचा प्रसंग. हो! हा एक स्टीरीओटाईप मंजुळेंनी मोडला आहे, हीरो रडतो चांगला हुंदके देऊन देऊन रडतो. शिवाय, हीरो मार खाताना हीरॉइन येऊन त्याला वाचवते.

सिनेमाचा अजून एक प्लस पॉइण्ट म्हणजे त्याचे संवाद. पूर्ण मराठवाडी शैलीमध्ये असणारे संवाद कुठूनही कृत्रिम वाटत नाहीत. उलट, ल्येका, यती, करती सारखे अस्सल शब्दप्रयोग योग्य ठिकाणी वापरून मजा येत राहते. सल्याच्या घरच्यांशी बोलतानाचा मराठी-हिंदी ठेका तर महान जमलाय. आर्चीच्या वडलांची स्टेजवरून भाषण करायची पद्धत आणि घरी आलेल्या प्राचार्याशी बोलायची पद्धत यातून सिनेमाबद्दल बरंच काही समजत राहतं. छोट्यातली छॊटीपात्रंदेखील आपला पूर्ण ठसा उमटवून जातात.

अजय अतुलच्या संगीताबद्दल बरंच बोलून झालंय, म्हणून आता इतकंच म्हणेन की सिनेमामध्ये असलेली चारही गाणी अतिशय चपखल आहेत आणि कूठेही खटकत नाहीत. याड लागलंचं पिक्चरायझेशन गाण्याइतकंच अप्रतिम आहे.

या सिनेमाचा टेम्प्लेट थोडासा तमिळ सिनेमांसारखा आहे, बहुतेक तमिळ लव्हस्टोरी अशाच असतात. सिनेमाच्या पहिल्या भागावर तर मणीरत्नमची छाप जाणवत राहते. नदीमधली दृश्यं, ऊसाच्या शेतामधले काही शॉट्स, मित्राच्या प्रेमकहाणीसाठी मार खाणारे दोस्तलोक्स, गाण्यांमधून पुढे जाणारी लव्ह्स्टोरी. गावाच्या राजकीय उतरंडीचे दर्शन घडवणारी दृश्यं असोत वा खेड्यांचं अस्सल आधुनिक वर्णन करणारे प्रसंग असोत दाक्षिणात्य सिनेमा अधूनमधून झळकत राहतात. तरीही मंजुळेंची प्रेमकथा मराठी मातीशी शंभर टक्के इमान राखून आहे. फेसबूकवर शोधाशोध करणारे टीनेजर हीरो आणि कॉलेजात शेतात फिरायला ट्रॅक्टर आणि बुलेट चालवणारी नायिका असो, ही प्रेमकथा फार गोजिरी वाटत राहते. अर्थात सर्व काही आलबेल नसतंच. प्रेमकहाणीमध्ये यायचे ते खलनायक एम्ट्री करतातच आणि करायचा तो राडा करतातच. यादरम्यान, घरातून पळून जाणारे नायक-नायिका पाहताना खरोखर ताण येऊ लागतो. आता या प्रेमकथेचा दुर्दैवी अंत होणार, आता.. आता की आता… असं म्हणत म्हणत मध्यंतर येतो आणि प्रेक्षक म्हणून मी सुटकेचा श्वास टाकला. सिनेमाच्या दुसर्या भागात ही प्रेमकहाणी गावामधून बाहेर येते, एका अनोळखी शहरामध्ये हे दोन प्रेमी जीव “आशियाना” बनवतात आणि सुखानं संसार करू लागतात… पण सर्व काही आलबेल होतच नाही आणि सिनेमा संपता संपता मीच सुन्न होऊन जाते.

फॅंड्रीमध्ये जब्यानं कॅमेराला भिरकावलेला दगड हा त्या सिनेमाचा हायपॉइंट होता, सैराटचा शेवटचा शॉटही तसाच हायपॉइंट आहे, त्याबद्दल मला बरंच काही लिहायचं आहे, पण सध्या सिनेमा थेटरामध्ये असेपर्यंत मी त्यावर लिहिणार नाही. केवळ इतक्ंच सांगेन, की इतर सिनेमा जेव्हा संपतात तेव्हा त्यांची कहाणी संपते, पण सैराटची कहाणी मात्र प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये भिरभिरतच राहते. जब्याचा तो दगड तेव्हाही सरळ येऊन घप्पकन बसला होता, याहीवेळी तसाच बसतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान नंदीनी,परिक्षण आवडले.पिक्चर हाउसफुल असल्याने टीकीट मिळाले नाही ,पण् पाहणार नक्कीच.सर्वांनी पहा असा चित्रपट आहे.
हा चित्रपट पाहून टीन एजर मुलांवर भलताच परिणाम होईल अशी आवई उठवणार्या काही महाभागांनी आपल्या मुलांच्या मोबाईलच्या वेब ब्राउझरची हिस्ट्री एकदा चेक करुन बघावी.

MT
Tithe nakki yeil, amachyakade 8th la aahe , miss honar pan!

सही नंदिनी. अपेक्षांना पुरून उरतो हे वाचूनच जीव भांड्यात पडला. नागराजकडून इतक्या अपेक्षा ठेवताना आपण ऊस गोड लागला.. प्रकारे तर करत नाहीओत ना असं वाटत होतं. पण या ऊसाला कस्तुरीचा सुवास आहे!
बाकीचं सिनेमा पाहिल्यावर!

छान लिहिलेत!! बाकी स्पॉयलर अलर्ट मिळालेत हो ...

टीन एजर मुलांवर भलताच परिणाम होईल अशी आवई उठवणार्या
>>
भलते परिणाम झाले असतील की ... म्हणूनतर ओरडताहेत Wink मम्मी पप्पांच्या पैशांवर शिकणाऱ्या पोरांनी प्रेमा बिमाच्या फंदात पडून स्वतःच्या शिक्षणाचा बोऱ्या वाजवून घेऊ नये हे माझ वैयक्तिक मत Happy

इथे आला तर नक्कि बघणार, मला सगळच आवडल्य सो फार..
छान लिहलयस! (मुख्य म्हणजे "सैराट "विषयीच लिहलयस smiley2.gif)

शेवट लांबल्याच्या तक्रारी आहे . खखोदेजा.

बघायचा मात्र नक्कीच आहे.

स्पॉयलरच्या भितीने धागा पूर्ण वाचला नाही.

बाकी नंतर !!

अल्पवयीन मुलगी लफड्यात पडते तेंव्हा
अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात घेवून लैंगिक शोषण...
अल्पवयीन मुलगी पळून जावून लग्न करते तेंव्हा....
काय अवस्था होते.... बापाची...भावाची बहिणीची ...आईची अन कुटूंबाची..
कल्पना करा.... त्या अल्पवयीन मुलीच्या ठिकाणी आपली मुलगी पहा...
अन मगच करा.... समर्थन सैराट चित्रपटाच.
शाळा... टाईमपास... टाईमपास 2 , फैंड्री तून काय संस्कार करण्यात आले पौगंडावस्थेतील विद्यार्थीदशेतील अल्पवयीन मुला मुलींवर...
सुजाण पालकांनो... भानावर या.
त्यातच सैराट आलाय...
अल्पवयीनांच्या प्रेम प्रकरणांचे प्रतिनिधित्व करायला.
या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शकांना नि कलाकारांना व सर्वच टिमला म्हणे सामाजिक प्रबोधन करायच आहे. या प्रबोधन कार्यासाठी बालकलाकारांची प्रेम प्रकरण दाखवण गरजेच आहे का. ?
अहो... निर्मातेसाहेब... तुम्ही सामाजिक प्रबोधन करताय की समाजात शैक्षणीक प्रवाहात असणा-या कोवळ्या वयातील मुलांमध्ये बालवयातील प्रेमप्रकरणांची विकृती पसरवताय. ?
या चित्रपटांच्या पटकथेचा आदर्श घेवून ग्रामीण तसेच शहरी भागात शालेय विद्यार्थ्यांमध्ये आंबटशौकीनपणा वाढीस लागलाय.
ज्या वयात उज्वल भविष्य घडवायच.. करीअर घडवताना यशोशिखर गाठायची. नाव कमवायच अगदी त्याच वयात... शाळा महाविद्यालयांत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुले मुली त्याच शाळेच्या गार्डनमध्ये... गच्चीवर... ग्रंथालयात, मुतारीत.. शौचालयात जिथ जागा मिळेल तिथ प्रेमाचे चाळे करताना दिसून येतात. हे असच सुरू राहणार असेल तर अल्पवयातील प्रेगन्सीची उदाहरणे ऐकावयास मिळाली तर नवल वाटायला नको.
सध्या सर्वत्र सैराटचे प्रमोशन पहायला मिळतेय... लक्षपुर्वक पहा... हे प्रमोशन
यातील मुख्य भुमिका निभावणारे विद्यार्थी दशेतील मुलं पहा...त्यांचा प्रेमाचा खेळ पहा... शालेय कवायतीतला बेशिस्तपणा, सार्वजनिक ठिकाणात केलेले अश्लिल हावभाव... खुणवाखुणवी.. प्रेमप्रकरणाला प्रोत्साहन देणारे चित्रीकरण पहा....
असा प्रोमो आपल्या घरातील मुलांनी केला तर आपण त्याचे समर्थन कराल का. ?
आपल्या घरातील मुलांची अशी प्रेम प्रकरण आपण खपवून घ्याल का...?
महत्वाच.... राज्यात बालकामगार बंदी आहे. 14 वर्षाच्या आतील बालकामगार जिथे असतील तर तिथ कायदेशीर कारवाई करणेत येते ... मग या ठिकाणी सुट कशासाठी....?
पालकांनो सजग रहा...
आदर्श पालक व्हा..
(टिप : मी चित्रपटाविरोधी नाही पण त्यातल्या मानसिकते च्या विरोधात आहे)
< : © वैदिक हिंदू संस्कृती ग्रूप >

भारी! तुझं परीक्षण वाचून सिनेमा पाहण्याचा निर्णय अजून पक्का झाला आहे.
उडन खटोला, तुम्ही सिनेमा पाहिला आहे का?

१८,१९ वय म्हणजे बालवय? म्हणजे आईवडिलांना आपली मुलं बाळं कॅटेगरीतच वाटत असतात कायम. तरूण वयात कुणाच्या प्रेमात पडणं नवीन आहे का? तसे पिक्चर आले किंवा नाही, तारूण्यसुलभ भावनेने प्रेमात पडणं थांबणार आहे का किंवा थांबवता येणार आहे का?

कै च्या कै लॉजिक आहे ! असे तर कितीतरी सिनेमे इनाप्रोप्रिएट गोष्टी दाखवतात की!
वैदिक संस्कृती ग्रुप ? काहीतरी वेगळाच अजेन्डा दिसतोय मग.

वैदिक संस्कृती ग्रुप Lol :रागः
ही कुठली म्हणे संस्कृती? तीच का जिच्यात ६-७ वर्षाच्या अल्पवयीन मुलींची ३५-४० वर्षाच्या प्रौढ माणसांशी जबरदस्तीनं लग्न लावून लैंगिक शोषण केलं जाई?
असो.

@वैदिक हिंदू संस्कृती ग्रूप 

गुरु कुलात शिकणार्‍या कच वर प्रेम करायला देवयानीने कोणता षिणेमा बघितला हुता?

मस्तच लिहिलंयस नंदिनी ! आणि लगेच परीक्षण लिहिल्याबद्दल धन्यवाद. खूप उत्सुकता वाटत होती सकाळपासून.
फक्त कथा थोऽडी कमी सांगितली असतीस तर ... ? ( सेकंड हाफमध्ये काय घडतं त्याबद्दलची दोन वाक्यं ). प्रोमोमध्ये मला नव्हता अंदाज आला ह्याचा. इथे वाचल्यावर आता एक दोन वाक्यं आठवली त्यातली सेकंड हाफ सूचित करणारी.

मी सकाळपासून बुकमायशो वरचे युजर रिव्ह्यूज बघतेय. इतिहास घडवणार असं वाटतंय एकंदरीत.

तामिळ प्रभावाबद्दल लिहिलेलं एकदमच पटलं. मी तुझ्याइतके तामिळ चित्रपट ( इन फॅक्ट तामिळ भाषेतलेच चित्रपट ) नाही पाहिलेत , मात्र हिंदीत डब झालेले / एकाचवेळी हिंदी-तामिळ बनलेले जे पाहिलेत त्यांची आठवण मला प्रोमो बघताना झाली होती.

अजय-अतुलच्या संगीतावर मात्र दाक्षिणात्य सिनेसंगीताचा खूप प्रभाव आहे असं मला पहिल्यापासून वाटत आलंय. त्याच्या गाण्यांमधले जे म्युझिक पीसेस वाजवले जातात त्यांवर ! एक उदा. म्हणजे जोगवातल्या 'जीव रंगला' मधले म्युझिक पीसेस.

इलाईराजा यांना आम्ही कॉपी करतो असे अजय अतुल बिनदिक्कत सांगतात ,नव्हे ईलाईराजा आमचे गुरु आहेत असे ते सांगतात.त्यामुळे त्यांच्या संगीतावर दाक्षिणात्य प्रभाव असणे नैसर्गीक आहे.

चित्रपटाचे प्रोमो पाहून हा दाक्षिणात्य प्रभाव प्रकर्षाने जाणवला. अचूक निरिक्षण नंदिनी.
करमाळा, माळशिरस, बार्शी, कुर्डुवाडी इथले लोक बोलतात ती मराठवाड्यातली भाषा नसावी. किमान मी ऐकलेली तिथल्या मुलांची भाषा तरी अस्सल सोलापुरी असते.

बाकी करमाळ्यात कुणी शुटिंग करेल असे स्वप्नात पण वाटले नव्हते. माझे काही वर्गमित्र सध्या तिथे 'जनतेचे आमदार' कॅटेगरीत आहेत (म्हणजे फ्लेक्सवर आमदारांचे अभिनंदन करत आमदार व्हायचे प्रयत्न करणारे). त्या सर्वांच्या फेसबूक वॉलवर सध्या हा सिनेमा झळकतोय

छान लिहिलंय. पण भाषा मराठावाडी नाही. त्या दोघांचा एक इंटर्व्हू मी पाहिला. रिंकूची भाषाच मुळात तशी आहे.

कारण हे सगळे तिथलेच लोक निवडलेत त्याने, अजय-अतुल तरी एखाद्या मुलाखतित आम्ही अस केल तस केल म्हटल्याच जाणवल, नागराज त्यामानाने फार डाउन टु अर्थ वाटला

मी प्रीव्ह्यू पाहिला परवा यू ट्युबवर. मला तर एकदम इषकझादे मराठीत आला काय असं वाटलं क्षणभर पण नंदिनीचा रोव्ह्यू वाचून तसं वाटत नाही.
कधीतरी मूड आला तर बघणार पण प्रिव्ह्यू पाहून मला सिनेमा बघायची इच्छाच झाली नाही.

Pages