"बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार

Submitted by अमेय२८०८०७ on 18 December, 2015 - 23:23

महाराष्ट्रात नसल्याने म्हणा किंवा काय पण बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शनपूर्व वादाचा इतका परिणाम झाला नव्हता. पिंगा बिंगाही एक दोनदा कुतूहल म्हणून यू ट्यूबवर पाहिले होते तितकेच त्यामुळे बघायला जाताना पाटी बऱ्यापैकी कोरी होती.

सिनेमा सुरू झाला आणि रंगीलाच्या आमिरप्रमाणे पहिला विचार मनात आला तो म्हणजे,"खर्चा कियेला है". सिनेमॅटोग्राफरने जबरदस्त काम केले आहे पण इथेच विसंवादी सूर लागायला लागतो. भंसालीला उत्तरेतील राजे किंवा मुघलांची आणि मराठी योद्धयांची जीवनशैली यात असलेला सांस्कृतिक फरक दुर्दैवाने समजलेला नाही त्यामुळे शनिवारवाड्याचा आईनेमहाल (आईने अकबरी नव्हे) करणे, युद्ध जिंकल्यावर, 'वाट लावली', म्हणत बाजीराव सैनिकांसोबत नाचणे आणि रजनीकांतची श्टाईल उधार घेऊन बाजीरावाने घोड्यावर दौड मारता मारता शत्रूचे बाण हातात पकडणे अशा फालतू गोष्टी अगदी चकचकीत होऊन समोर आल्या तरी नकोशा वाटतात.

'राऊ' खूप आधी वाचली असल्याने सर्वज्ञात ढोबळ गोष्टी सोडल्या तर बाजीरावाच्या आयुष्यातील बारकावे मला माहिती नाहीत. हा चित्रपट बघताना एक जाणवले की बाजीरावाच्या काळाचा विचार करता ही एक व्यामिश्र आणि अनेक पातळ्यांवर ताण असलेली वेगवान जीवनकथा आहे. सततची युद्धे, परधर्मीय स्त्रीवर जडलेले प्रेम आणि ते निभावून नेण्याची हिंमत, धर्मसत्तेविरुद्ध उचललेले पाऊल, काशीबाई आणि मस्तानीची घुसमट, राधाबाई आणि इतर आप्तांची मानसिकता यासारखे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कंगोरे असलेली बाजीरावाची कथा आहे. इथे मात्र दिग्दर्शक दर्शनी भव्य दिव्यतेच्या नादात कार्यकारणभावाच्या मुळाकडे जाऊच धजत नाही त्यामुळे होणारा परिणाम फार वरवरचा राहतो.

दिग्दर्शकाने बनवलेले पिच निसरडे असूनही कलाकारांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियांका चोप्रा आणि दीपिका दोघींनीही अनेक प्रसंगात छोटे छोटे बारकावे छान खुलवले आहेत. त्यांना कंबरेच्या खाली नऊवारी नेसवणाऱ्या वेषभूषाकाराला मात्र शनिवारवाड्यावर फटके दिले पाहिजेत.
रणवीर सिंग हा थोडासा वीरेंद्र सेहवागसारखा आहे. सेहवागचा खेळ आवडतो म्हणून त्याच्याकडून कोणी टिप्स घ्यायला गेले तर जसे फारसे हाती लागणार नाही तसेच रणवीरचे आहे. वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. खरेतर प्रत्येक भूमिका समंजसपणे आणि आपल्या मर्यादा नीट ओळखून सादर करणारा हा कलाकार आहे. चित्रपटातील बाजीरावाची बोली ही मला सर्वात आवडलेली गोष्ट. रांगडा लढवय्या जसा वागेल बोलेल तसाच रणवीरचा वावर आहे. मराठी आघात असलेली हिंदी त्याने छान निभावली आहे. एरवी सिनेमात कामवाली बाई, रिक्षावाले नाहीतर साईडव्हीलन यांची मराठीमिश्रीत हिंदी चेष्टेसाठी वापरली जाते पण बाजीरावाच्या बोलीची तशी चेष्टा करावीशी वाटत नाही.

अशा काही जमेच्या बाजू असल्या तरी बाजीरावाच्या आयुष्यातील मूळ ताणच अतिशय उथळपणे चित्रित करून ठेवल्याने माध्यमाची सवलत म्हणून कितीही गोष्टी माफ करून टाकल्या तरी हा चित्रपट, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूतकाळातील एक महत्त्वाची  ऐतिहासिक व्यक्ती म्हणून, बाजीरावाबद्दल कुठल्याही विशेष भावना प्रेक्षकांपर्यन्त पोचवण्यात सपशेल अपयशी झाला आहे असेच वाटत राहिले.

 त्यातल्या त्यात, हौसेने 'दिलवाले' बघून आलेल्या आणि अंतू बर्व्याच्या भाषेत 'गणित सपशेल चुकलेल्या पोरासारखे' भाव घेऊन क्रुद्ध चेहऱ्याने सकाळी झाडांना पाणी घालत असलेल्या शेजाऱ्याइतके फ्रस्ट्रेशन देणारा हा चित्रपट नव्हता, हेच समाधान. शेजाऱ्याने आस्थेने दिलेले दिलवाले पाहण्याचे निमन्त्रण नाकारून फारशी चूक केली नाही, हे येथील आणि इतरत्र येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्सने दिलेल्या लिंकेपेक्षा मला फेसबुकवरील डॉ विश्वभंर चौधरींची पोस्ट अधिक पटलीये.

मीनाक्षी कुलकर्णी , मिसो बाजीराव म्हणून शोभण हे माझं वैयक्तिक मत आहे. ते कुणी पटवून घ्यावच असा माझा आग्रह नाही . डायलॉग डिलिव्हरी एका ठिकाणी रणवीरची मलाही खटकलीये . पण त्यामुळं रणवीरने केलेली बाजीराव भूमिका कमअस्सल आहे अस माझं म्हणणं नाही . ह्या विषयावरील हेमाशेपो

छत्रपती शिवाजी महाराजांवर रितेश देशमुख आणि रवि जाधव चित्रपट बनवत आहे.

आता यात किमान इतिहासाचा मान राखला जाईल ही अपेक्षा

बुंदेलखंडातली लढाई (?) कि निजामशी वाटाघाटी जिंकुन आल्यानंतर बाजीराव मस्तानीला भेटायला जातो आणि कारंज्यात उभा राहातो आणि मस्तानीलाही तिथेच बोलावतो.. तेव्हा मस्तानी उर्फ दिपीका "ये क्या बचपना हैं राऊ/ राव" असं म्हणते तेव्हा दिपीकाचं मस्तानीचं बेअरींग साफ सुटलेलं आहे. तेव्हा ती इतर सर्व शिणुमातली दिपीकाच वाटते. मस्तानी नाही. अजिबातच नाही.

आता यात किमान इतिहासाचा मान राखला जाईल ही अपेक्षा >> श्रीमान योगी पण निव्वळ इतिहास नाही. कादंबरी, सिनेमा आणि इतिहास यात किंचित का होईना फरक असणारच.

पियू +१
आत्ताच सिनेमा पाहिला. एका वाक्यात सांगायचं तर गाण्यांनी वाट लावली! एसएलबीने संगीतासाठी दुसऱ्या कोणाला तरी घ्यायला पाहिजे होतं. अजय अतुल किंवा अमित त्रिवेदी किंवा शंकर एहसान लॉय यांनी काय सुंदर मराठी बाजाची गाणी दिली असती! इस्माईल दरबार पण चालला असता. SLB may have an ear for music but he's a very bad music director! पेशवाईच्या काळातल्या पुण्यात आहोत असं वाटत असतानाच अचानक गाणं सुरु होतं आणि आपण २०१५ च्या पुण्याच्या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत तर नाही ना असं वाटायला लागतं. पिंगा बघताना तर वेदना होतात! का? का? बहुदा एसएलबीनी choreography मध्ये देखील लुडबुड केली असावी कारण the damage is done!
आरतीची ताटं घेऊन निघालेल्या बायका, पेशवे लढाई जिंकून परत येत असताना अलबेला सजन हे गाणं, त्यात उगीच भगवा ध्वज घेऊन नाचणारी प्रियांका चोप्रा किंवा वाड्याच्या अंगणातच चौकोन (!) करून जेवायला बसलेले ब्राह्मण, पाडव्याच्या दिवशी धो धो पाऊस अशा इतिहास, common sense आणि general knowledge ह्याच्या चुका जागोजागी खटकत राहतात. शनिवार वाडा काय किंवा बुंदेलखंड कुठेच मानवी वस्तीचे चिन्ह नाही. पेशवाईच्या काळातलं गजबजलेलं पुणं गाव बघायला छान वाटलं असतं. एसएलबीना सुंदर आणि बेगडी (व्हेलवेटचा ब्लाऊज!) यातला फरक कोणीतरी समजावण्याची गरज आहे.
संवादाचे सर्व सीन्स सुरेख झाले आहेत. रणवीर, प्रियांका आणि इतर सर्व कलाकार उत्कृष्ट काम करतात. सगळे छान मराठी बोलले आहेत. त्यामानाने दीपिका इतकी नाही आवडली. सतत अवघडलेली वावरली आहे आणि तिचे नाच पण नाही आवडले. Narration छान आहे. ते थोडे अजून वाढवून खरा इतिहास (उदा. समशेरचे पुढे काय झाले) आणि मधले काही गाळलेले प्रसंग त्याद्वारे सांगितले असते तर अधिक परिणामकारक वाटले असते. कोणीतरी प्लीज एडीट करून ह्या सिनेमाची बिन गाण्यांची एक आवृत्ती काढावी! मी तो एडीटेड सिनेमा पुन्हा नक्की पाहीन!

वाड्याच्या अंगणातच चौकोन (!) करून जेवायला बसलेले ब्राह्मण

>>>> हो ना. बरं चला बसले जेवायला चौकोन करून! पण कसे? तर दोन ओळी करून - एक आत, एक बाहेर. तोंडं एकमेकांकडे. समोरासमोरच्या दोघांची केळीची पानं खेटून. मधून फिरायला जागाच नाही. Uhoh

ब्राह्मण भोजन म्हणजे लिमिटेड थाली वाटली की काय!

शाहू महाराजांच्या दरबारात समोर बसलेले सगळे एकजात मगनलाल ड्रेसवाल्याकडचा ब्राह्मणी पोशाख घालून बसलेले. सेम पगड्या, पांढरे अंगरखे. सगळ्यांना एकजात भिकबाळ्या. मागे उभे असलेले सगळे मावळी पगडी घालून. होलसेलचाच हिशेब.

तो आरसा कम प्रोजेक्टर दाखवताना विज्ञान पारच गुंडाळून ठेवलंय. कोणी उभं राहिलं की प्रकाशझोत पडतो काय, तो पाण्यात ठेवलेल्या आरशात अ‍ॅडजस्ट करून पडद्यावर काय पाडायचा .... देवा देवा ! आयने महाल बनवता येतो तर पडद्याऐवजी डायरेक्ट एक आयनाच ठेवायचा ना. माणसानं कितीवेळ केंद्रात उभं रहायचं त्याला काही सुमार!

पण जाऊ दे. बाजीराव ( बरेच काही प्रसंग सोडले तर) छान दिसलाय आणि छान वावरलाय.

कोणी उभं राहिलं की प्रकाशझोत पडतो काय, तो पाण्यात ठेवलेल्या आरशात अ‍ॅडजस्ट करून पडद्यावर काय पाडायचा .... देवा देवा ! आयने महाल बनवता येतो तर पडद्याऐवजी डायरेक्ट एक आयनाच ठेवायचा ना. माणसानं कितीवेळ केंद्रात उभं रहायचं त्याला काही सुमार!>>

ती सर्वात मोठी चुक आहे. एक तर मस्तानी बाजीरावला भेटायला येते तेव्हा रात्र झालेली असते अश्यारात्री केंद्रात उभे राहिले तरी प्रकाशझोत येणार कुठून ? मस्तानी बराचवेळ उभी असून सुद्ध्हा प्रकाशझोत काशीबाईच्या खोलीत येत नाही बाजीराव आल्याबरोबर येतो ? Uhoh छोटीशी मशाल घेऊन येतो त्याचा इतका मोठा झोत पडतो की गळ्यात गळे घालून उभे असलेले स्पष्ट दिसते ?
सरळ आरसा लावलेला असता तर एकवेळेस मान्य केले असते की काशीबाई अचानक झोपेतून उठते. खोलीमधे फिरताना सहज नजर आरशावर पडते आणि ते दृश्य तिला दिसते. असा प्रसंग पटू शकतो.

तेच वाटलं की रात्री एवढा प्रकाश कसा पडेल ? Happy

बाकी मस्तानीचं बाजीरावावरचं प्रेम हे प्रेम न वाटता obsessionच जास्त वाटतं. बाजीराव तिच्या लढाईतील धाडसामुळे प्रभावित झालेले दाखवलेत पण कुठेही ते तिच्या प्रेमात पडलेत असं जाणवत नाही. कट्यारीशी लग्नाची त्यांना वार्ताही नसते. तिचा गळेपडूपणा अतीच झाल्याने शेवटी बाजीराव नाईलाजाने तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतात असं वाटतं.

@चीकू, मला असे वाट ते की, भ्न्साली ने तस मुद्दाम दाखवले आहे कारण, बाजीराव
साठी मस्तानी शी विवाह हा एक राजकीय सौदा
होता असे वाचन्यात आले आहे....

बाजीरावसाठी मस्तानीशी विवाह हा एक राजकीय सौदा >>>>>
हे जरी बरोबर असलं तर मग छत्रसालाने ते आधीच स्पष्ट करायला हवं होतं की बाबारे मी तुला मस्तानी देतोय, तिचंही तुझ्यावर प्रेम आहे, आमच्या रिवाजाप्रमाणे तिने तुझ्या कट्यारीचा स्वीकार केला म्हणजेच तुमचा विवाह झाला आहे, तर तिला पत्नीचा दर्जा दे आणि पुण्याला आपल्याबरोबर घेऊन जा. बिचार्‍या बाजीरावाला काहीएक पत्ता नसतो, तो निघून जातो आणि ही बाई शनिवारवाड्यात येऊन थडकते, मी तुमची सून आहे असं राधाबाईला सुनावते आणि बाजीरावाला आपल्या आगमनाची सूचना द्यावी म्हणून त्याला संदेश, पत्र पाठवून गोष्टी स्पष्ट करण्याऐवजी सरळ दरबारात सगळ्यांसमोर नाच करते! हे सगळं खूपच गंडलं आहे Sad

मुळात राऊ कादंबरीत बाजीराव मस्तानी पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे भेटतच नाहीत. त्यामुळे ते गंडणं खपवून घ्यायलाच हवं.

एक तर मस्तानी बाजीरावला भेटायला येते तेव्हा रात्र झालेली असते अश्यारात्री केंद्रात उभे राहिले तरी प्रकाशझोत येणार कुठून ? >> ते केंद्र भारलेलं असतं. तेव्हांचं विज्ञान पावरबाज होतं. त्या केंद्रात उभं राहीलं की आजकालचे गिअर कसे उलटेसुलटे पडतात तसे गिअर पडून पृथ्वी कर कर असा आवाज करीत पुन्हा काही कोनातून उलटी फिरायची आणि तो झोत पडायचा. मग काशीबाईने पडदा सारखा केला की पुन्हा मूळच्या जागी जऊन रात्र आणि दिवस जिथल्या तिथे व्हायचं.

पन काशीबाईने पडदाच जाळून टाकला आणि पुण्यातला मध्यरात्रीचा सूर्य हा चमत्कार इतिहासजमा झाला. त्या काळचे लोक तुडूंब भोजन झाल्याने डाराडूर झोपले असल्याकारणाने मध्यरात्री सूर्य उगवला तरी कुणाला काही कळत नसे. म्हणूनच कुठल्याही बखरीत याचा उल्लेख नाही.

अजून एक मोठ्ठी चूक म्हणजे पहिल्याच दृश्यात शाहूमहाराजांच्या दरबारात बाजीराव बोडक्या डोक्यानं वावरताना दाखवलेत! दरबारचा प्रोटोकॉल कुठे गेला? तसंही त्याकाळी उघडं डोकं ठेऊन सार्वजनिक वावर होत नसे.

इतक्या ढळढळीत चुका होतातच कशा?

कालच पाहिला. आभाळमाया मालिकेत बालकलाकार म्हणून काम केलेल्या स्वरांगी मराठेने यात झुमरीची (मस्तानीच्या दासीची) भूमिका छान केली आहे.

हो ना. बरं चला बसले जेवायला चौकोन करून! पण कसे? तर दोन ओळी करून - एक आत, एक बाहेर. तोंडं एकमेकांकडे. समोरासमोरच्या दोघांची केळीची पानं खेटून. मधून फिरायला जागाच नाही >>

हो ना ...मला अगदी सेम प्रश्ण पडला होता...की आता या ब्राम्हणांना वाढणार तरी कसं....
तसही काशीबाईंना टुणकन उडी मारायची प्रक्टीस आहे...( सासु च्या मांडीत बसतात तो प्रसंग )
तर अता ईथेही त्या ट्णाट्णा उड्या मारत वाढतात की काय.....

ब्राम्हणांना वाढणार तरी कसं.... मधून फिरायला जागाच नाही
पानं वाढतानाच त्यांना सांगण्यात आलं असेल, "लाजू नका, परत मागू नका"

"लाजू नका, परत मागू नका">>>>:फिदी: नाहीतर आपल्या ताटातले जे जास्त झालेय, आणी उष्टे नाही केले ते समोरच्या व्यक्तीला वाढा.:स्मित:

काल चित्रपट पाहिला.
संजय लीला भन्साली चे चित्रपट असतात तसा भव्य दिव्य आहे.
मला सर्वात आवडलेली गोष्ट रणवीर सिंग. बाजीरावाची पर्सनॅलिटी(मायनस मांजर डोळे), मराठी लहेज्यात हिंदी बोलणे, त्याचे मराठी शब्द, एकंदर स्टाईल सर्वच एकदम फिदा आवडले.नितीश भारद्वाज कृष्ण म्हणून डोळ्यासमोर येतो तसा माझ्या डोळ्यासमोर बाजीराव म्हणून रणवीर येईल. (वैम. बरेच लोक असहमत असतील.) आदित्य पंचोली, यतीन कार्येकर, मिलिंद सोमण, मिलींद सोमण बरोबर नेहमी उभा असतो तो कलाकार (बहुतेक चिमाजीअप्पा, रणवीर कडे पाहण्यात बाकी तपशीलात दुर्लक्ष झाले Happy ),तन्वी आझमी, रणवीर, दिपीका,मस्तानीची दासी ही सर्व पात्र अभिनयात चोख.
प्रियांका चोप्रा मध्ये मध्ये पंजाबाळलेलं हिंदी बोलतेय असं वाटलं. तिचा पण इंटरव्हल नंतर चा अभिनय मस्त. प्रियंकाच्या लो वेस्ट नेसलेल्या साड्या, कंबरेची चेन आणि साड्यांचं (कापड आणि नक्षीकाम)टोट्टल अमराठी/मारवाडी दिसणं, वेल्वेट चे स्ट्रेच ब्लाउज, मध्ये मध्ये प्रियंकाचे दागिने मराठीपणा सोडून एकदम राजस्थानी/मीनाकारी/कुंदन वगैरे स्टाईल कडे गेलेले दागिने पाहून जरा डोकं आपटावंसं वाटलं. पिंगा गाण्यात दोघींना पैठणी नऊवारी कसल्या झकास दिसल्या असत्या. वाट लावली गाण्याचे शब्द आणि रणवीर च्या डान्स स्टेप एकदम पंजाबी किंवा तत्तड तत्तड ची आठवण देऊन गेल्या. 'वाट लावली' हे शब्द किंवा त्या डान्स स्टेप यापैकी काहीतरी एक मराठी काँपॅटिबल असतं तर जरा गाणं सहन झालं असतं. दोन्ही गंडलंय. दिपीका ला साखळ्यांनी बांधणं वगैरे जरा अनारकली स्टाईल वाटलं. ते मूळ कादंबरीत नसावं. सारखं गुडघाभर पाण्यात प्रियंका, बाजीराव, मस्तानी ने भारी भारी ड्रायक्लीन चे कपडे घालून फतक फतक चालत जाणं माझ्या मनाला कपड्यांच्या काळजीने कळवळवून गेलं.
बाकी रणवीर चा अभिनय, युद्धात लढणं, शेवटचा डेलिरीयस अभिनय सगळं जबरदस्त आवडलं. शेवटचे सीन्स अजून डोळ्यासमोर आहेत.
दिपीका ची तलवार बाजी पण मस्त. ती तिच्या वर हल्ला होत असताना लढते ते जबरदस्त. शेवटी समशेर ला घेउन जाण्याचा सीन इथे सगळे म्हणतात तसा सोयीस्कर पणे अँबिग्युअस आहे. त्याला मारणार की ठेवणार हे क्लीअर होत नाही.
मला चित्रपट खूप आवडला. आय होप दॅट तो पाहिलेले आणि यात मूळ इतिहासापेक्षा व्हेरियेशन्स आहेत माहिती नसलेले लोक त्यातल्या गोष्टी कम्युनल हेट साठी पार्श्वभूमी किंवा रेफरन्स म्हणून वापरणार नाहीत.

एकदा पहाणेबल आहे...

काही अ. आणि अ. गोष्टी बाजूला ठेवल्यास चित्रपट कलाकृती म्हणून बघायला चांगला वाटला. टिपीकल भंसाळी 'देखावा' आहेच...

रणवीर बरेच ठिकाणि अनावश्यक 'ऊथळ' अभिनय व देहबोली करतो... अन्यथा त्याचे पडद्यावरील काम छान झाले आहे.

गाणी व संगीत म्हणजे एकूणात देवदास रीपॅकेज केल्याचा भास होत रहातो. स्वतः संगीत द्यायचे असे भंसाळी साहेबांनी ठरविले असल्याचा परिणाम बहुतेक!

या निमित्ताने पेशवा बाजीराव चा इतीहास पुन्हा एकदा समजून व तपासून घेण्याची ईच्छा निर्माण होते हेच या चित्रपटाचे यश म्हणता येईल.?

रच्याकाने: रणवीर च्या जागी दुसरा कुणी अधिक शोभला, जमला असता का याचे ऊत्त्तर मला तरी सापडत नाही... सल्लू नाही हे मात्र फारच बरे झाले. असो. may be we are running out of options when it comes to historical characters...!

अजूनही पाहीला नाही, पण आता मात्र ठाम मत बनले आहे की बाजीराव म्हणून रणवीरच शोभलाय. ( काही पुरानकालीन व्यक्तीचित्रे पहाण्यात आली, रणवीर तसाच दिसतो)

Pages