"बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार

Submitted by अमेय२८०८०७ on 18 December, 2015 - 23:23

महाराष्ट्रात नसल्याने म्हणा किंवा काय पण बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शनपूर्व वादाचा इतका परिणाम झाला नव्हता. पिंगा बिंगाही एक दोनदा कुतूहल म्हणून यू ट्यूबवर पाहिले होते तितकेच त्यामुळे बघायला जाताना पाटी बऱ्यापैकी कोरी होती.

सिनेमा सुरू झाला आणि रंगीलाच्या आमिरप्रमाणे पहिला विचार मनात आला तो म्हणजे,"खर्चा कियेला है". सिनेमॅटोग्राफरने जबरदस्त काम केले आहे पण इथेच विसंवादी सूर लागायला लागतो. भंसालीला उत्तरेतील राजे किंवा मुघलांची आणि मराठी योद्धयांची जीवनशैली यात असलेला सांस्कृतिक फरक दुर्दैवाने समजलेला नाही त्यामुळे शनिवारवाड्याचा आईनेमहाल (आईने अकबरी नव्हे) करणे, युद्ध जिंकल्यावर, 'वाट लावली', म्हणत बाजीराव सैनिकांसोबत नाचणे आणि रजनीकांतची श्टाईल उधार घेऊन बाजीरावाने घोड्यावर दौड मारता मारता शत्रूचे बाण हातात पकडणे अशा फालतू गोष्टी अगदी चकचकीत होऊन समोर आल्या तरी नकोशा वाटतात.

'राऊ' खूप आधी वाचली असल्याने सर्वज्ञात ढोबळ गोष्टी सोडल्या तर बाजीरावाच्या आयुष्यातील बारकावे मला माहिती नाहीत. हा चित्रपट बघताना एक जाणवले की बाजीरावाच्या काळाचा विचार करता ही एक व्यामिश्र आणि अनेक पातळ्यांवर ताण असलेली वेगवान जीवनकथा आहे. सततची युद्धे, परधर्मीय स्त्रीवर जडलेले प्रेम आणि ते निभावून नेण्याची हिंमत, धर्मसत्तेविरुद्ध उचललेले पाऊल, काशीबाई आणि मस्तानीची घुसमट, राधाबाई आणि इतर आप्तांची मानसिकता यासारखे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कंगोरे असलेली बाजीरावाची कथा आहे. इथे मात्र दिग्दर्शक दर्शनी भव्य दिव्यतेच्या नादात कार्यकारणभावाच्या मुळाकडे जाऊच धजत नाही त्यामुळे होणारा परिणाम फार वरवरचा राहतो.

दिग्दर्शकाने बनवलेले पिच निसरडे असूनही कलाकारांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियांका चोप्रा आणि दीपिका दोघींनीही अनेक प्रसंगात छोटे छोटे बारकावे छान खुलवले आहेत. त्यांना कंबरेच्या खाली नऊवारी नेसवणाऱ्या वेषभूषाकाराला मात्र शनिवारवाड्यावर फटके दिले पाहिजेत.
रणवीर सिंग हा थोडासा वीरेंद्र सेहवागसारखा आहे. सेहवागचा खेळ आवडतो म्हणून त्याच्याकडून कोणी टिप्स घ्यायला गेले तर जसे फारसे हाती लागणार नाही तसेच रणवीरचे आहे. वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. खरेतर प्रत्येक भूमिका समंजसपणे आणि आपल्या मर्यादा नीट ओळखून सादर करणारा हा कलाकार आहे. चित्रपटातील बाजीरावाची बोली ही मला सर्वात आवडलेली गोष्ट. रांगडा लढवय्या जसा वागेल बोलेल तसाच रणवीरचा वावर आहे. मराठी आघात असलेली हिंदी त्याने छान निभावली आहे. एरवी सिनेमात कामवाली बाई, रिक्षावाले नाहीतर साईडव्हीलन यांची मराठीमिश्रीत हिंदी चेष्टेसाठी वापरली जाते पण बाजीरावाच्या बोलीची तशी चेष्टा करावीशी वाटत नाही.

अशा काही जमेच्या बाजू असल्या तरी बाजीरावाच्या आयुष्यातील मूळ ताणच अतिशय उथळपणे चित्रित करून ठेवल्याने माध्यमाची सवलत म्हणून कितीही गोष्टी माफ करून टाकल्या तरी हा चित्रपट, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूतकाळातील एक महत्त्वाची  ऐतिहासिक व्यक्ती म्हणून, बाजीरावाबद्दल कुठल्याही विशेष भावना प्रेक्षकांपर्यन्त पोचवण्यात सपशेल अपयशी झाला आहे असेच वाटत राहिले.

 त्यातल्या त्यात, हौसेने 'दिलवाले' बघून आलेल्या आणि अंतू बर्व्याच्या भाषेत 'गणित सपशेल चुकलेल्या पोरासारखे' भाव घेऊन क्रुद्ध चेहऱ्याने सकाळी झाडांना पाणी घालत असलेल्या शेजाऱ्याइतके फ्रस्ट्रेशन देणारा हा चित्रपट नव्हता, हेच समाधान. शेजाऱ्याने आस्थेने दिलेले दिलवाले पाहण्याचे निमन्त्रण नाकारून फारशी चूक केली नाही, हे येथील आणि इतरत्र येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादा चा सी॑क्वेन्स नं. कसा काय कळतो बुवा?>> इथे कळून घेतयं कोण Happy

धाग्याचे नाव चित्रपट विचार आहे ना. मग प्रत्येक घटनेवर विचारविमर्श करणे चालू आहे

पिंगा ऐवजी दुसरे एक भन्नाट गाणे घेता आले असते. त्याची पार्श्वभूमी.

पटकथालेखक : कापोचे, वय वर्षे ७० +

बाजीराने मस्तानीस पुण्यास आणून ठेवले आणि तिला महालही बांधून दिला. तिच्यासाठीदिवेघाटात तलाव बांधला. बारामतीस जाऊन सल्लामसलत करून जाण्या येण्याच्या रस्त्यावर हे ठिकाण असल्याने त्यास ते सोयीस्कर पडत होते. त्याजकडे दीड अश्वशक्तीचे टू सीटर वाहन होते. परंतु बारामतीकडून बाहेरून पाठिंबा घेणे महागात पडेल असे मत बागपूरहून आल्याने बाजीरावाचे जाणे येणे थांबले. येणेकारणाने मस्तानी एकटीच मेण्यात बसून आंघोळी साठी दिवेघाटास जाऊ लागली. आता बाजीरावाची गांठ या निमित्ताने ही पडेनाशी झाली. तेव्हां स्त्री प्रती असलेली आवश्यक ती कर्तव्ये बाजीराव स्वतःहून बजावत नसल्याने त्यास त्याचे स्मरण करून देणे आवश्यक झाले. कुमारी किरण वैराळेचा कुमारी होण्यास काही शतकांचा अवधी असल्याने तिच्याकडे विश्वासू सखी देखील नव्हती. त्यामुळे बाजीरावाच्या कानावर हे गा-हाणे कसे घालावे याचा तीस प्रश्न पडला.

बाजी जमिनीस समांतर अवस्थेत मंचकावर पहुडलेला असे आणि तख्तपोशीच्या नक्षीकडे पाहत पळे , घटीका मोजीत असे. परंतु त्याच्या मनातील खळबळ चार भिंतींच्या पलिकडे पोहोचली तरी कुणास काय त्याचे ? सा-याच्या सा-या एकता कपूरच्या मालिकेतील पात्रांप्रमाणे व्यवहार करीत होत्या.

या सर्वांचा त्यास वीट येऊन त्याने आरसेमहालातल्या एका महालावर वीट आला हे शब्द काजळाने लिहीले. परंतु एकताच्या एका पात्राने वेलांटी पुसल्याने वाट आला असा शब्द तयार झाला. तो व्याकरणदृष्ट्या बाजीसही रुचला नाही आणि फडणवीसांनाही. मग फडणवीसांनी चिटणीसांच्या परवानगीने झाला ऐवजी लागली असे लिहीले. यावरून वाट लागली हा वाकप्रचार जन्मास आला. मग वाकनिसांनी त्याला चाल लावली आणि बाजीचे मन रिझवण्याचा प्रयत्न केला. परंतु बाजी उदास असल्याचे पाहून पोतनिसांनी मस्तानीस गुप्तपणे आणण्याची योजना आखली.

मस्तानीच्या आगमनानंतर बाजीची कळी खुलली. परंतु ताणामुळे त्याने काय करावयाचे आहे याचे त्यास स्मरण होईना आणि त्या काळच्या प्रथेप्रमाणे मस्तानीस स्वतः कथन करणे प्रशस्त वाटेना. त्यामुळे सर्व नीस लोकांना बाहेर घालवून मस्तानीने नृत्याची तयारी सुरू केली. बाजी लोड घेऊन (बैठकीचे) आसनस्थ बसला...

मडळी ही झाली सिच्युएशन. आता चतुर मस्तानी नृत्य करताना बाजीस स्मरण कसे करून देते यासाठी जे गाणे निवडले ते येणेप्रमाणे

लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा
बंगळुरू गोवा अन कश्मिरला
कुटं कुटं जायाचं हनीमूनला
राया कुटं कुटं जायाचं हनीमूनला...

( कोरस ऐकू येतो ... थोडक्यात नीस/वीस लोक गेलेले नसतात )

बाकी कुणाला त्या हत्तीएवढी उडी मारली आणि ज्या पद्धतीने मारली तिथं ३०० आठवला का जेरार्ड बटलर चा ?
मले आटूला बा Wink Lol

ओरिजन्ल सीन आहे. ३०० वाल्यांनी तो बाजीराव वरून ढापलेला आहे. असे माझे वैयक्तिक मत आहे Happy

काल पाहिला बाजीराव मस्तानी. इतिहासाशी संबंध नाही हे अ‍ॅक्सेप्ट केल्यामुळे एकदा (एकदाच फक्त) पाहायला नक्कीच आवडला. रणवीर सिंग बाजीराव म्हणून शोभतो फक्त त्याचे उच्चार अशुद्ध वाटले मला. पर्सनॅलिटीही उथळ वाटते. पण त्याचा वॉर्डरोब मला अतिशय आवडला. मस्तानीचेही ड्रेसेस मस्त आहेत. काशीबाईच्याच पेशवीण बाई म्हणून साड्या सुमार वाटल्या. वेल्वेटचे ब्लाऊज नक्कीच टाळता आले असते. तन्वी आजमीने काही सीन्समध्ये डोकं उघडं टाकलं आहे. त्याकाळात असायचं का तसं?
बाकी आदित्य पंचोली घार्‍या डोळ्यांमुळे शोभलाय त्याच्या भूमिकेत. मिलिंद सोमणही पण त्याला धड बोलता येत नाही असं वाटलं.

सिनेमा पाहीला. भन्साळीने चांगला सिनेमा बनवला आहे. रणवीर चक्क आवडला.

बुंदेलखंडाचं युद्ध अत्यंत परिणामकारक दिसलंय. बाहुबली मधली युद्धं त्यामुळे भव्य पण बालीश वाटली. फक्त हत्तीच्या माथ्यावर उडी मारून चढण्याचा शॉट खटकला. निजामावर चढाई करताना नाजीरावासारखा कसलेला योद्धा हाताशी सैन्य असतांना एकटा चढाई करून जातो तो सीन एरव्ही खटकला असता, पण बाजीरावाच्या मनातलं द्वंद्व त्या लढाईने पोहोचतं म्हणून माफ.

प्रियांका चोप्रा आवडत नाही, पण या सिनेमात छान दिसलीय पेशवीण म्हणून. एक दोनदा (नानासाहेब पेशव्याला आलिंगन देते त्या सीनमधे ) ते विचित्र नाक ठळक दिसतं, दीपिका सुंदर दिसलीय. प्रेमिका आणि रणरागिनी म्हणूनही ती शोभलीय. उच्चारांकडे मात्र अंमळ दुर्लक्षच केलं.

सिनेमॅटीक लिबर्टी घेतलेल्या गोष्टी जाणवतात, त्यांचा प्रभाव पडत नाही. बाजीराव पेशवा हा योद्धा, सेनापती , नायक आणि पेशवा (जवळपास राजाच) म्हणून कसा असावा याबद्दल भन्साळी का काय वाटतं हे मान्य केलं तर सैनिकात मिसळून असणारा , प्रिय असणारा नायक हे मान्य करायला हरकत नाही.

कपट कारस्थानं कंटाळवाणी झाली आहेत. (एकता कपूरचा परिणाम असेल कदाचित).

भन्साळीवर भव्यतेचं भूत सवार आहे. देवदास नंतर भव्य सिनेमा काढण्यासाठी त्याचे हात शिवशिवत असतानाच त्याला बाजीराव मस्तानीची माहीती मिळाली. त्याच वेळी त्याने सलमान ऐश्वयाला घेऊन हा सिनेमा बनवणार असल्याची घोषणा केली होती. नंतरच्या घडामोडींमुळे मस्तानी म्हणून ऐश्वर्या पक्की असेल , नायकाचा शोध चालू आहे असं त्याने म्हटलं होतं. पुढे काहीच ऐकू आलं नाही.

थोडक्यात शोकांतिका, राजघराणं असल्याने भव्यतेच्या शक्यता यामुळे त्याने या प्रोजेक्टला हात घातला असावा. पण सिनेमातले सेट्स कुठेही खरे वाटत नाहीत. थर्माकोलच्या भिंती वैताग आणतात.महालातल्या पाय-या नशीब दगडी ठेवल्या आहेत ( एकदाच दिसल्यात त्या).

(लहानपणी शनिवारवाड्यात फिरताना जोत्यावर सात मजली महाल होता अशी माहीती मिळायची. मित्राचे घर तिथेच आहे. त्याच्या आजोबांनी दिलेल्या माहीतीनुसार कारंजी होती हे ऐकलं होतं. भुयारांबद्दलही ऐकलं होतं. ही भुयारं सिंहगडावर जातात यावर त्या वेळी विश्वास बसलेला होता. त्यामुळं कारंजी कुठून आली असावीत याबद्दल शंका वाटली नाही. अर्थात ती माहीती ऑथेंटीक नाही हे आहेच).

शाहू महाराजांच्या महालात पाणी दाखवलेलं पाहून "गप्पी मासे पाळा , हिवताप टाळा" अशी पाटी कुठे दिसतेय का असं नकळत शोधत होतो. पाण्यामुळे डेंग्यु झाला तर काय ही शंका पण येऊन गेली. महाराजांचा चेहरा डास चावल्यामुळे की आणखी कशाने सुजलेला वाटत होता हे कळालं नाही.

छत्रसालच्या भूमिकेत ब-याच वर्षांनी बेंजामिन गिलानीचं दर्शन झालं.

सुरूवातीचा हाफ वेगवान आणि प्रभावी आहे, तितकाच नंतरचा कंटाळवाणा. शेवट चटका लावणारा आहे. एकंदरीत सिनेमा आवडला असंही म्हणता येईना आणि नाही आवडला असंही.

शाखा प्रेमाला जागुन दिलवाले ला गेलेले. नेहमी प्रमाणे कदाचित तिकिटं मिळणार नाहीत म्हणुन १ तास आधीच गेलो. तिकिट काधुन आत गेल्यावर तिथे दिलवाले असणार होता तिथे आधीचा शो चालु होता म्हणुन बाजुला बाजीराव चालु होता तेथे गेलो. थिएटर हाउस फुल होत. उभ राहुन १ तास्भर चा पिक्चर बघितला. खुपच आवडला. परत जाउन बघणार आहे आज.
दिलवालेची वे ळ झाल्यावर घाईत परत आलो. चांगली जागा मिळते कि नाही ह्याची धाकदुक लागली होती पण आत येउन बघितल तर होल वावर इस आवर टाईप सगळ थेटरच आमच होत. थिएटर अर्ध रिकामच राहील. बाजीराव अर्ध्यावर सोडल्याच वाईट वाटल.

भुयारांबद्दलही ऐकलं होतं. ही भुयारं सिंहगडावर जातात यावर त्या वेळी विश्वास बसलेला होता.>>>>भुयार सिन्हगडावर नाही तर पर्वतीवर जातात असे ऐकले आहे. ही भुयार ( जर खरच असतील तर) सरकारी बन्दोबस्तात उघडुन लोकाना खुली केली तर लय मज्जा येईल.

रश्मी..
न्कोच ती उघडी करायला.. आजकालच्या लोकांचा पोरांचा काही भरोसा नै.. अंधेरेमे झामझुम म्हणून नंतर परत बंद करतील Lol

त्या भुयारात ( असतील तर ) साप वगैरे काहीही असू शकेल. सिंहगड रस्त्याला पूर्वी विठठलवाडी जवळ लाईन टॉवर नावाने दोन वीटकामाचे दोन तीन शतकं जुने बुरूजासारखे दोन मिनार होते. काही लोकांचं म्हणणं होतं की जमिनीखालून सिंहगडाला गेलेल्या भुयारात वायूवीजन व्हावे म्हणून ती रचना केली गेली होती. महापालिकेने कसलाही मागचा पुढचा विचार न करता रस्ता मोठा करण्यासाठी या पुरातन वास्तू पाडून टाकल्या.

>>महापालिकेने कसलाही मागचा पुढचा विचार न करता रस्ता मोठा करण्यासाठी या पुरातन वास्तू पाडून टाकल्या.<< आव्वरा राव !! महापालिकेच्या कारभाराला किती दा शुन्य मार्क द्यावेत हेच कळेनासे होते....रच्याकने शिवाजीनगर स्टेशन च्या समोर पण एक असे प्राचीन टॉवर सारखे आहे..ते काय असेल/आहे ?

ही भुयारे का उघडी करत नसावीत. पाणीपुरवठ्याची पण एक भुमीगत योजना होती ना ? वाचल्यासारखे वाटतेय त्याबद्दल.
कोल्हापूरला राजवाड्यातली अंबाबाई आहे, तिच्यासमोर पण एक भुयारी मार्ग आहे, पण लहानपणापासून तो बंदच बघतोय मी.

आणि दिलवाले पेक्षा या चित्रपटाबद्दल जास्त चर्चा होतेय, याचा मला खुप आनंद होतोय. भारतात आल्या आल्या बघायचा आहे.

काल एन डी टी व्ही वर आधी प्रियांकाची मुलाखत झाली. मग ( बहुदा सोनीवर ) रणवीर ची पण झाली. दोघेही छान बोलले.

पाणीपुरवठ्याची पण एक भुमीगत योजना होती ना ?
>>

कात्रजच्या तलावातून पाणी आणण्यासाठी भुमिगत पाईपलाईन होती असे मी ऐकले होते.

त्या भुयारी मार्गाला अजुन रुंद करुन भुयारी मेट्रो रेल्वे करा सुरु. Happy

आणि दिलवाले पेक्षा या चित्रपटाबद्दल जास्त चर्चा होतेय, याचा मला खुप आनंद होतोय. भारतात आल्या आल्या बघायचा आहे. >> हो ना..
माझ्या ओळखीत एक व्यक्ती आहे बिजॉय दा म्हणतो आम्ही त्यांना.. ओडीशी आहेत..
चित्रपट पाहण्यात दर्दी.. रणवीर त्यांना आवडतो काही काही चित्रपटांमूळे. पण इतक्या चांगल्या विषयाचा भन्साली भाऊ तीन तेरा वाजवते कि काय अस वाटलं होत त्यांना.. पण ते म्हणाले कि काफी प्रमाणात प्रभाव पाडतोय चित्रपट.. रणवीर ने छान निभावलय पेशवा बाजीराव सारख्या योद्ध्या ला.. म्हणे यापूढं चांगले चित्रपट स्विकारण तुझ्या हाती आहे रे बाबा नै तर ये रे माझ्या मागल्या व्हायच Proud

या चित्रपटाचा एक प्लस पॉईंट हा वाटतो कि कितीही आटापिटा केला तरी हिंदी भाषेत असा भव्यदिव्य चित्रपट मराठी इतिहासाला घेऊन भन्साली ने बनवल्यामूळे तो संपूर्ण भारतात पोहचेल. नाही काही तर माझ्यासारखे उत्सुक लोक ज्यांना त्या विषयाची पार्श्वभूमी, खरा इतिहास जाणून घ्यायला आवडतो त्यांच्या अभ्यासात निदान बाजीरावांच नाव येईल... पूढे चालुन वर कुणाच्या ओळखीच्याने बाजीरावमस्तानी नावाचा एकजण होता असे वाक्य कानावर पडणे बम्द होईल जे मला मोठ्ठ यश वाटतं.. Happy

खरंय टीना, निदान मस्तानी राजकन्या होती./ बाजीराव शूरवीर होता. एवढे तरी कळले लोकांना.

श्याम बेनेगलच्या, भारत एक खोज मधे हा विषय होता का ? आठवत नाही आता. त्या मालिकेत इतिहासातील आणि काव्यातीलही अनेक व्यक्तीरेखांचे यथार्थ चित्रण होते. त्या मालिकेचा हेतूच मुळी भारतीयांना आपल्या संस्कृतीचे भान यावे / रहावे हा होता. दक्षिणेकडील कन्नगी सारख्या व्यक्ती मला तरी याच मालिकेमूळे कळल्या.

चित्रपटाचा हेतू तो नाहीच. त्याने व्यवसाय करावा हीच अपेक्षा असते. तरी पण या विषयावर एवढा भव्य चित्रपट निघाला, हे आनंददायी आहे.

भुयारं दोन ठिकाणी जात होती म्हणे - पर्वती आणि हुजुरपागा (HHCP HIghschool). पर्वतीवरचं आहे त्याला जाळी लावून ठेवली आहे. शाळेत आहे (ते भुयारच असलं तर. निदान आम्हाला तरी ते भुयार आहे असंच माहिती होतं) त्याला जाळीचं दार आहे कुलूप लावून बंद केलेलं.

पाहिला सिनेमा. मिसो स्टिल लुक्स स्टनिंग ( खास मिसोप्रेमीसाठी डोळा मारा ) हाच सिनेमा काही वर्षांपूर्वी आला असता तर मिसो बाजीरावच्या भूमिकेत जास्त शोभून दिसला असता >>> जाई, दिसण्याबाबत अगदी १०० टक्के अनुमोदन, पण तो मिसो कितीही आवडत असला तरी त्याची डायलॉग डिलीव्हरी खूप खटकते मला, त्यामुळे बाजीराव म्हणून तो नाही शोभणार...
एनीवे, चित्रपट ब-यापैकी आवडला.. अपेक्षा नसतानाही रणवीरचे काम खूप आवडले.. तो वाटतो खूप उथळ, पण अभिनय चांगला करतो, ( दिल धडकने दो आणि लुटेरामध्ये ते दिसलं.. लुटेरा मी पूर्ण पाहिलेला नाही, तर थोड्याफार शॉट्सवरून कळतं ते).. इथे बाजीराव म्हणून हृतिकही चालला असता की रावं..
तन्वी आझमी ही उत्तम अभिनेत्री आहे, हे तर सर्वज्ञात ( आठवा दुश्मन चित्रपट - काजोलने खाल्ला असला तरी तन्वी ची आई व्यवस्थित लक्षत रहाते) ... इथेही तिने तिचं काम उत्तम निभावलयं...
प्रियांका बिलकुल नाही आवडली, पण दिसल्ये मात्र चांगली.
दीपिका ही खरतर एक सुंदर मुलगी आहे, पण इथे तिचं सौंदर्य न दिसता ती अतिशय (sorry for words) कुपोषित, आजारी अशी दिसते. तलवारबाजीचे सीन्स तिने चांगले केलेत.. पण ते तेवढचं.

'पिंगा' हे गाणं पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच खटकलं होतं आणइ चित्रपट पाहून तर मत अजूनच पक्क झालं. या गाण्याच प्रयोजनच कळलं नाहीये मला... दोन मिनिटांपूर्वी जी काशी मस्तानीला एवढं सुनावते, उपवस्त्र म्हणून अपमान करते, तिच्या हृदयातही जिला जागा नाही, अवघ्या २ मिनिटांनी ती काशी त्याच मस्तानीसोबत नाचायला कशी लागते? आणि गाणं संपल्यानंतरही लगेच मोठ्ठा ब्लॅकआऊट.. म्हणजे तिथेही त्याचा काहीच अर्थबोध होत नाही.. फक्त प्रमोशनल साँग म्हणून घेतलय , डोला रे डोला सारखचं..
ओव्हरऑल या चित्रपटात बघण्यासारखा फक्त मिसो Happy Happy Happy आणि रणवीरचा थोडाफार अभिनय आहे... पैसा वसूल तर बिलकूलच नाही.

कात्रज तलावातून पाण्याची व्यवस्था शनिवारवाड्यापर्यंत केलेली होती.. भुयारे होती. आणि मधे मधे पाण्यासाठी उच्छ्वास पण होते.. ते सगळे बंद केले आहेत आता...

ओव्हरऑल या चित्रपटात बघण्यासारखा फक्त मिसो, ओये होये मिसो फॅन खुश मीनाक्षी, ह्या वाक्यावर.

चिनूक्स | 21 December, 2015 - 19:26 नवीन
'कट्यार काळजात घुसली' आणि 'बाजीराव मस्तानी'चे पटकथाकार एकच आहेत.

>>

प्रकाश कापडिया.
त्यांनी 'कट्यार' मधलं 'सूर से सजी संगिनी..' ('ह्या भवनातील..' चा भावानुवाद) सुद्धा लिहिलं होतं. ते समीर सामंतने सुधरवलं. नाही तर त्याचीही मस्त वाट लावली होती.

Pages