"बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार

Submitted by अमेय२८०८०७ on 18 December, 2015 - 23:23

महाराष्ट्रात नसल्याने म्हणा किंवा काय पण बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शनपूर्व वादाचा इतका परिणाम झाला नव्हता. पिंगा बिंगाही एक दोनदा कुतूहल म्हणून यू ट्यूबवर पाहिले होते तितकेच त्यामुळे बघायला जाताना पाटी बऱ्यापैकी कोरी होती.

सिनेमा सुरू झाला आणि रंगीलाच्या आमिरप्रमाणे पहिला विचार मनात आला तो म्हणजे,"खर्चा कियेला है". सिनेमॅटोग्राफरने जबरदस्त काम केले आहे पण इथेच विसंवादी सूर लागायला लागतो. भंसालीला उत्तरेतील राजे किंवा मुघलांची आणि मराठी योद्धयांची जीवनशैली यात असलेला सांस्कृतिक फरक दुर्दैवाने समजलेला नाही त्यामुळे शनिवारवाड्याचा आईनेमहाल (आईने अकबरी नव्हे) करणे, युद्ध जिंकल्यावर, 'वाट लावली', म्हणत बाजीराव सैनिकांसोबत नाचणे आणि रजनीकांतची श्टाईल उधार घेऊन बाजीरावाने घोड्यावर दौड मारता मारता शत्रूचे बाण हातात पकडणे अशा फालतू गोष्टी अगदी चकचकीत होऊन समोर आल्या तरी नकोशा वाटतात.

'राऊ' खूप आधी वाचली असल्याने सर्वज्ञात ढोबळ गोष्टी सोडल्या तर बाजीरावाच्या आयुष्यातील बारकावे मला माहिती नाहीत. हा चित्रपट बघताना एक जाणवले की बाजीरावाच्या काळाचा विचार करता ही एक व्यामिश्र आणि अनेक पातळ्यांवर ताण असलेली वेगवान जीवनकथा आहे. सततची युद्धे, परधर्मीय स्त्रीवर जडलेले प्रेम आणि ते निभावून नेण्याची हिंमत, धर्मसत्तेविरुद्ध उचललेले पाऊल, काशीबाई आणि मस्तानीची घुसमट, राधाबाई आणि इतर आप्तांची मानसिकता यासारखे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कंगोरे असलेली बाजीरावाची कथा आहे. इथे मात्र दिग्दर्शक दर्शनी भव्य दिव्यतेच्या नादात कार्यकारणभावाच्या मुळाकडे जाऊच धजत नाही त्यामुळे होणारा परिणाम फार वरवरचा राहतो.

दिग्दर्शकाने बनवलेले पिच निसरडे असूनही कलाकारांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियांका चोप्रा आणि दीपिका दोघींनीही अनेक प्रसंगात छोटे छोटे बारकावे छान खुलवले आहेत. त्यांना कंबरेच्या खाली नऊवारी नेसवणाऱ्या वेषभूषाकाराला मात्र शनिवारवाड्यावर फटके दिले पाहिजेत.
रणवीर सिंग हा थोडासा वीरेंद्र सेहवागसारखा आहे. सेहवागचा खेळ आवडतो म्हणून त्याच्याकडून कोणी टिप्स घ्यायला गेले तर जसे फारसे हाती लागणार नाही तसेच रणवीरचे आहे. वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. खरेतर प्रत्येक भूमिका समंजसपणे आणि आपल्या मर्यादा नीट ओळखून सादर करणारा हा कलाकार आहे. चित्रपटातील बाजीरावाची बोली ही मला सर्वात आवडलेली गोष्ट. रांगडा लढवय्या जसा वागेल बोलेल तसाच रणवीरचा वावर आहे. मराठी आघात असलेली हिंदी त्याने छान निभावली आहे. एरवी सिनेमात कामवाली बाई, रिक्षावाले नाहीतर साईडव्हीलन यांची मराठीमिश्रीत हिंदी चेष्टेसाठी वापरली जाते पण बाजीरावाच्या बोलीची तशी चेष्टा करावीशी वाटत नाही.

अशा काही जमेच्या बाजू असल्या तरी बाजीरावाच्या आयुष्यातील मूळ ताणच अतिशय उथळपणे चित्रित करून ठेवल्याने माध्यमाची सवलत म्हणून कितीही गोष्टी माफ करून टाकल्या तरी हा चित्रपट, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूतकाळातील एक महत्त्वाची  ऐतिहासिक व्यक्ती म्हणून, बाजीरावाबद्दल कुठल्याही विशेष भावना प्रेक्षकांपर्यन्त पोचवण्यात सपशेल अपयशी झाला आहे असेच वाटत राहिले.

 त्यातल्या त्यात, हौसेने 'दिलवाले' बघून आलेल्या आणि अंतू बर्व्याच्या भाषेत 'गणित सपशेल चुकलेल्या पोरासारखे' भाव घेऊन क्रुद्ध चेहऱ्याने सकाळी झाडांना पाणी घालत असलेल्या शेजाऱ्याइतके फ्रस्ट्रेशन देणारा हा चित्रपट नव्हता, हेच समाधान. शेजाऱ्याने आस्थेने दिलेले दिलवाले पाहण्याचे निमन्त्रण नाकारून फारशी चूक केली नाही, हे येथील आणि इतरत्र येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सातव्या पानापासून काय धमाल केलीयेत लोका़नो, Rofl

गप्पी मासे काय, नर्मदा, तापी, झेलम काय! आणि धास्तानी ! :हहपुवा अगदी:

मराठीतुन मस्तानी म्हणुन शर्वरी जमेनीस घेतली तर पर्फेक्ट कास्टींग होईल. तिच्याकडे आहे ती ग्रेस..>>>
नको नको..शर्वरी चा चेहरा फारच थोराड दिसायला लागलाय हल्ली. देऊळ बंद मध्ये कायच्या काय दिसलीय. Uhoh

शाहू राजे झालेले महेश मांजरेकर अख्ख्या सिनेमात बोदल्यासारखे बसून राहिले होते. एकदाही उठले नाहीत.
आणि
अय्या! कधी उठले होते?>>>>>>>>>>>
आई गं. हसून हसून मेले.

पाडव्याला लढाईला जाताना तुफान पाऊस दाखवलाय. 'मार्चच्या पाडव्यात इतका पाऊस कसा काय' असं वाटतंच .>>
अय्य, योडे. मी अगदी हेच लिहायला इथे आले होते.

ते नुसतीच हळद लावणं पण खटकलंच.

पिंगा गाणे अगदीच अनावश्यक आहे. नंतरचा ब्लॅक आऊटच सांगतोय की कथानकाच्या मांडणीत ह्या गाण्याला नीट जागाच नाहीये.

काशी नि मस्तानी ला एकत्र आणून नाट्यमयता वाढवायचीच होती तर राऊ मधला सीन जसाच्या तसा घालायचा की! काशी बाई चिमाजी अप्पांना सांगून मस्तानीचा एक नाच ठरवतात . ही सुद्धा चिमाजीची आयडीया असते . कारण चार चौघांत काशी नि मस्तानी भेटणे व बोलणे गैर दिसेल म्हणून. इथे चक्क पिंगा????

आणि पिंगा ची सिच्युएशन नक्की काय आहे? मंगळागौर? Uhoh
काशीचा मुलगा नाना चांगला ७-८ वर्शांचा दाखवलाय की. मंगळागौर लग्न झाले की पहिल्या ५ वर्षीच असते.

आदित्य पांचोलीचं पात्र म्हण्जे कोण ?

निजामाचा वाघ किती बिचारा दिसत होता, निजाम बोलताना जांभया देत होता.
रणवीर आवड्ला, मराठी लहेजात बोललेली हिंदी मस्त

Sooooo
Mastani was Bajirao's 2nd wife and he loved her the most.
Mumtaz was Shahjahans 8th wife and he loved her the most.
Apparently, no one loves their 1st wife !!!

Apparently, no one loves their 1st wife !!! >>
अरे अरे, शिवाजी महाराजांना ही हाच रुल लावाल अशाने. Sad

Apparently, no one loves their 1st wife !!!>>>> अरे मग सरळ दुसरीशीच लग्न करायचं ना. Happy

काल पाहिला. चक्क आवडला.
वरच्या बर्‍याच पोस्टिंना मम (त्या कोणत्या पोस्ट्स ते कॉपी पेस्ट वेळ मिळाला कि करते).

फेसबुकवर एका पेशव्यांनी लिहिलेली पोस्टः

एकंदरित "बाजीराव - मस्तानी" रिलीज होऊन काही दिवस लोटल्यावर, सिनेमाबद्दल अनेकांनी लिहिलेल्या चांगल्या, बऱ्या, वाईट प्रतिक्रिया वाचून, अगदीच सामान्य लोक ज्यांना ना इतिहासाचा गंध ना वादाचा गंध अश्यांच्या प्रतिक्रिया ऐकून, काही अभ्यासकांच्या चष्म्यातून पाहण्यात आलेल्या प्रतिक्रिया तर काही वादाला विरोध करणाऱ्या लोकांच्या खवचट प्रतिक्रिया पाहता मी काढत असलेले हे अनुमान.
ऍकॉर्डिंग टू धिस सिनेमा आय अंडरसाइंड प्रसादराव पेशवे से दॅट,
१. बाजीराव पेशवे आणि भंसाळीचा बाजीराव पेशवा(बाजीरणवीर सिंग) यात फरक आहे.
२. बाजीरणवीर सिंग हा मनुष्य ऍरोगंट आणि आत्मप्रौढी आहे.
३. बाजीरणवीर सिंग हा मनुष्य एक हिंदू धर्मासाठी झटणारा धर्मनिरपेक्ष योद्धा आहे.
४. बाजीरणवीर सिंग याला "हि नाहीतर ती" कुणीतरी हवीच आहे. शेवटी फक्त तीच असे होते.
५. बाजीरणवीर सिंग हा तत्कालीन शेंडीची फॅशन ठेवणारा क्षत्रीय आहे.
६. बाजीरणवीर सिंगच्या खानदानातले अन्य लोक भाऊ आई मुलगा गाव मंडळी इत्यादी हे सर्व मिळून एकाच पक्षाचे आहेत तो म्हणजे विरोधी पक्ष. हे सगळे या जगातले सगळ्यात वाईट लोक असून त्यांच्यामुळे बाजीरणवीर सिंग आणि त्यांची प्रेयसी मस्तानी पदुकोण यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यांच्या जातीचे लोक आजही समाजकंटक आहेत.
७. अचानक कुत्सित हसणारा, अचानक रागीट पण तत्ववेत्ता तसेच समाजसुधारक असा बाजीरणवीर सिंग हा हिरो आहे. पेशवाईची सूत्रे त्याला छत्रपती देतात पण तो अचानक पेशवाईचा "राजीनामा" घरच्यांकडे देऊन दारु पिण्यास जाऊ शकतो. शत्रुने गोदावरी क्रॉस केलेली असल्याचे कळल्यावर नोटिस पिरेडवर असलेल्या एम्प्लोयी सारखा मी आता पेशवा नाही मी काही करू शकत नाही असे म्हणतो.
८. बाजीराव पेशवे राजा नसून सेवक असल्याने राजबिंडा वगैरे दिसण्याची तसेच त्या अदबीने चालण्याची काही एक आवश्यकता नाही असे बाजीरणवीर सिंग यांनी जाणले आहे.
९. बुधवार पेठ हि माधवराव पेशवे यांनी आठवडे बाजराच्या खरेदी विक्रितून कर मिळावा यासाठी स्थापन केलेली नसून, बाजीराव पेशव्यांच्या आधीच कुणीतरी वसवलेला वेश्याबाजार होता आणि तेथे मस्तानी पदुकोण यांना हाकलण्यात आले.
१०. तेव्हाच्या स्त्रीयांमध्ये सासू सून यांचे एकमेकांच्या अंगावर उड्या मारण्याइतके चांगले संबंध असत.
११. मोठ्या पडद्यावर आपण इतिहासकालीन काहीतरी पाहत आहोत असे गुंतवण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे.
१२. तरीही इतिहास बाजूला ठेऊन हा सिनेमा बघावा अशी अपेक्षा आहे.
१३. पिंगा आणि मल्हारी या गाण्यांनी काही एक नुकसान झालेले नाही उलट त्याचा संदर्भ सिनेमात आहे आणि जे काही आहे ते समर्पक
१४. शत्रुला नामोहरम करून लढाई जिंकून सेलिब्रेशन करण्यापेक्षा, तह करणे हे नाचण्यासारखे कारण आहे.
१५. चिमाजी आप्पा पटकन वसईची लढाई जिंकून येतात आणि बाजीराव पेशव्यांच्या अजिंक्य लढाया मोजत बसतात.
१६. बाजीरणवीर सिंग कॅन मॅडली फाइट अलोन ऍण्ड ऍट दी ऍण्ड विन्स मॅच
१७. युद्धशास्त्रा सोबतच बाजीरणवीर सिंग हे गायनॅकोलोजी मध्ये निपुण आहेत.
१८. बाजीरणवीर सिंग विषम ज्वराने आजारी होऊन अचानक भ्रमीष्ट होतात आणि बाकीचे दुरून बघत त्यांना मरून देतात.
१९. तिकडे नजरकैदेतल्या मस्तानी पदुकोण यांना साखळदंडाने बांधतात आणि "एक साथ दिल" रुकतात.
२०. योद्धयाचा मुलगा योद्धयचा दुस्वास करतो व काहीएक पात्रता नसतांना आईला उपदेश देण्यास पात्र आहे
२१. राऊ हे खरे राव आणि बल्लाळ हे खरे बल्लाड असे उच्चारतात.
२२. बाजीरणवीर सिंग यांच्या अप्रतिम अभिनयामुळे मराठ्यांच्या एका विस्मृतीत गेलेल्या योद्धयाची आठवण होते.
२३. फर्स्ट हाफ मध्ये प्रभाव पाडणारा हा सिनेमा नंतर इतका बोर होतो की कधी संपेल असे वाटते
२४. योद्धयाची आई हि अभिनयात सर्वोत्तम असल्याचे प्रमाणपत्र याठिकाणी बघ्यांनी दिल्याचे कळते.
२५. लव्ह स्टोरी ऑफ वॉरीयर असलेला हा सिनेमा अर्धी लव्ह स्टोरी अर्धा वॉरीयर आणि उरलाच तर "राऊ" कादंबरीवर आधारीत आहे.
सर्वात महत्वाचे, मी हा सिनेमा साफ पाहणार नसून मनातले आणि वाचनातले "सगळे पेशवे" आहेत तसेच ठेवण्याचा निर्णय घेत आहे.
(या विषयावर शेवटची पोस्ट लिहिणारा) प्रसादराव पेशवे

त्या मांजरेकरांनी टपोरी स्टाईल अभिनय केला आहे. त्यांच्या तोंडून संवाद बाहेर पडताना अस वाटत होत कि आता पंताना सांगतील, 'पंत दो चाय बोलो'

सर्वात महत्वाचे, मी हा सिनेमा साफ पाहणार नसून मनातले आणि वाचनातले "सगळे पेशवे" आहेत तसेच ठेवण्याचा निर्णय घेत आहे. > न पाहता २५ पॉइंट कसे लिहिले? Uhoh

......लोकांच्या खवचट प्रतिक्रिया पाहता मी काढत असलेले हे अनुमान.

राऊ हे खरे राव आणि बल्लाळ हे खरे बल्लाड असे उच्चारतात.>>>

अगदी अगदी. मलाही हाच प्रश्न पडलेला की राऊ चा उच्चार राव असा का बरे केला आहे?

बाजीरणवीर सिंग कॅन मॅडली फाइट अलोन ऍण्ड ऍट दी ऍण्ड विन्स मॅच >>>
रजनी इफेक्ट ने वात आणलाय हे खरे आहे. Sad शेवटच्या लढाई मध्ये हाताने बाण अडवणे, हजारो बाणांचा एकट्याने सामना करणे, बंगशाबरोबरच्या लढाई मध्ये हत्तीच्या उंची एव्ह्ढी उडी मारणे.

बाजीरावांचे पराक्रम, युद्धनीती, राजकारण .. या सर्वात चिमाजी अप्पांची आणि तितकीच तोलामोलाची साथ , होळकर इत्यादी सैनिकांची साथ, हे सर्व कुठेच दिसून आले नाहीय चित्रपटात. Sad

चिमाजी अप्पांच्य प्रथम पत्नी निवर्तून त्यांचे दुसरे लग्न बाजीरावांच्या हयातीत झाले होते. नानासाहेबांचे हे लग्न झाले होते. पण बा. आणि म. ह्यांच्या लव्हस्टोरीवरच सर्व फोकस ठेवायचा असल्याने कदाचित हे तपशील दाखवलेले सुद्धा नाहीत.

आईना महाल असा खरोखरीच होता की ना.सं. इनामदारांच्या मनातून उगम पावलेला कल्पनाविलास आहे?

बंगशाबरोबरच्या लढाई मध्ये हत्तीच्या उंची एव्ह्ढी उडी मारणे. > ओ त्यांनी फक्त उडी मारली त्यांना दोन सैनिकांनी ढाल पकडून उंच ढकलले तेव्हा कुठे त्यांनी हत्ती एवढी उंची गाठली. Happy
हवे तर प्रात्यक्षिक करून बघा Happy

इतिहास बाजुला ठेवुन फक्त 'सिनेमा'च बघितला तर आवडतो बा.म. इतिहासच दिसला पाहीजे असा हट्ट केलात तर सगळंच चुकीचं दिसतंय. १-२ प्रसंग 'राऊ' मधले आहेत खरे.

ढाल पकडून सैनिकांनी उंच ढकलले तरी तुम्हा आम्हाला नाही मारता येणार हो हत्ती एवडी उंच उडी.
तरी गिव्ह इट अ ट्राय म्हणून प्रात्यक्षिक करायला हत्ती आणि दोन सैनिक आणि ढाली कोण पुरवणारय? Happy

अहो बाजीराव म्हणजे काय तुम्ही आणि आम्ही आहोत का? Uhoh
आता टिव्हीवरच्या कार्यक्रमात बरेच लोक अचंभित कृत्ये करताना दिसतात म्हणून काय आपल्याला घरच्या घरी करायला जमेल का? Wink

तुम्हीच म्हणालात ना प्रात्यक्षिक करुन पाहा म्हणून...म्हणून फॉलिंग फ्रुट ऑर्डर घेऊन हत्ती आणि ढाल आणि दोन शिपाई तुम्ही पुरवणार का विचारुन घेतले Happy
ते पुरवून झाल्यावर बघू उडी मारुन पाहायची की नाही ते..

तुम्हीच म्हणालात ना प्रात्यक्षिक करुन पाहा म्हणून.. >> ठिक आहे. तुमच्या अपार्ट्मेंट मधे असलेला जिन्यावर तुम्ही हा प्रयोग करु शकतात. १० - १५ फुटांवरुन पळत या आणि उडी मारून एक पाऊल ५ पायरीवर ठेवा आणि दुसरे पाऊल १० व्या पायरीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला अवघड जाईल ५-७ वेळा आपटणार परंतू नंतर जमेल तुम्हाला. Rofl

पाच आणि दहा ऐवजी तीन आणि सहा पायरी चालेल का?रणवीर पेक्षा उंची ९-१० इंच कमी आहे. त्यामुळे तितला स्पेक्स मध्ये बदल करायलाच हवा Happy

त्यापेक्षा वाढवत जाते ना...आपटून झाल्यावर अंतर कमी करणे हे ऑब्जेक्ट ला नुकसान पोहचवणारं डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आहे. तज्ञ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग ला प्राधान्य देतात.
एक पायरी, दोन पायरी, तीन पायरी,चार पायरी,स्टॉप.. Happy
बाकीचं हत्ती आल्यावर बघून घेऊ.
(आता खरंच थांबते आणि जाते घरी..)

दातांना कॅप लावून करा. ते बॉक्सर लावतात तसे. या हेल्मेट घातल्यास उत्तम
उगाच माझ्या नावाने नंतर शिमगा नको Proud

प्रतिसादा चा सी॑क्वेन्स नं. कसा काय कळतो बुवा? >>> निंबे, या प्रश्नासाठी नविन धाग्याचा स्कोप आहे, इथे हा प्रश्न वाया घालवू नकोस.

Pages