"बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार

Submitted by अमेय२८०८०७ on 18 December, 2015 - 23:23

महाराष्ट्रात नसल्याने म्हणा किंवा काय पण बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शनपूर्व वादाचा इतका परिणाम झाला नव्हता. पिंगा बिंगाही एक दोनदा कुतूहल म्हणून यू ट्यूबवर पाहिले होते तितकेच त्यामुळे बघायला जाताना पाटी बऱ्यापैकी कोरी होती.

सिनेमा सुरू झाला आणि रंगीलाच्या आमिरप्रमाणे पहिला विचार मनात आला तो म्हणजे,"खर्चा कियेला है". सिनेमॅटोग्राफरने जबरदस्त काम केले आहे पण इथेच विसंवादी सूर लागायला लागतो. भंसालीला उत्तरेतील राजे किंवा मुघलांची आणि मराठी योद्धयांची जीवनशैली यात असलेला सांस्कृतिक फरक दुर्दैवाने समजलेला नाही त्यामुळे शनिवारवाड्याचा आईनेमहाल (आईने अकबरी नव्हे) करणे, युद्ध जिंकल्यावर, 'वाट लावली', म्हणत बाजीराव सैनिकांसोबत नाचणे आणि रजनीकांतची श्टाईल उधार घेऊन बाजीरावाने घोड्यावर दौड मारता मारता शत्रूचे बाण हातात पकडणे अशा फालतू गोष्टी अगदी चकचकीत होऊन समोर आल्या तरी नकोशा वाटतात.

'राऊ' खूप आधी वाचली असल्याने सर्वज्ञात ढोबळ गोष्टी सोडल्या तर बाजीरावाच्या आयुष्यातील बारकावे मला माहिती नाहीत. हा चित्रपट बघताना एक जाणवले की बाजीरावाच्या काळाचा विचार करता ही एक व्यामिश्र आणि अनेक पातळ्यांवर ताण असलेली वेगवान जीवनकथा आहे. सततची युद्धे, परधर्मीय स्त्रीवर जडलेले प्रेम आणि ते निभावून नेण्याची हिंमत, धर्मसत्तेविरुद्ध उचललेले पाऊल, काशीबाई आणि मस्तानीची घुसमट, राधाबाई आणि इतर आप्तांची मानसिकता यासारखे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कंगोरे असलेली बाजीरावाची कथा आहे. इथे मात्र दिग्दर्शक दर्शनी भव्य दिव्यतेच्या नादात कार्यकारणभावाच्या मुळाकडे जाऊच धजत नाही त्यामुळे होणारा परिणाम फार वरवरचा राहतो.

दिग्दर्शकाने बनवलेले पिच निसरडे असूनही कलाकारांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियांका चोप्रा आणि दीपिका दोघींनीही अनेक प्रसंगात छोटे छोटे बारकावे छान खुलवले आहेत. त्यांना कंबरेच्या खाली नऊवारी नेसवणाऱ्या वेषभूषाकाराला मात्र शनिवारवाड्यावर फटके दिले पाहिजेत.
रणवीर सिंग हा थोडासा वीरेंद्र सेहवागसारखा आहे. सेहवागचा खेळ आवडतो म्हणून त्याच्याकडून कोणी टिप्स घ्यायला गेले तर जसे फारसे हाती लागणार नाही तसेच रणवीरचे आहे. वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. खरेतर प्रत्येक भूमिका समंजसपणे आणि आपल्या मर्यादा नीट ओळखून सादर करणारा हा कलाकार आहे. चित्रपटातील बाजीरावाची बोली ही मला सर्वात आवडलेली गोष्ट. रांगडा लढवय्या जसा वागेल बोलेल तसाच रणवीरचा वावर आहे. मराठी आघात असलेली हिंदी त्याने छान निभावली आहे. एरवी सिनेमात कामवाली बाई, रिक्षावाले नाहीतर साईडव्हीलन यांची मराठीमिश्रीत हिंदी चेष्टेसाठी वापरली जाते पण बाजीरावाच्या बोलीची तशी चेष्टा करावीशी वाटत नाही.

अशा काही जमेच्या बाजू असल्या तरी बाजीरावाच्या आयुष्यातील मूळ ताणच अतिशय उथळपणे चित्रित करून ठेवल्याने माध्यमाची सवलत म्हणून कितीही गोष्टी माफ करून टाकल्या तरी हा चित्रपट, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूतकाळातील एक महत्त्वाची  ऐतिहासिक व्यक्ती म्हणून, बाजीरावाबद्दल कुठल्याही विशेष भावना प्रेक्षकांपर्यन्त पोचवण्यात सपशेल अपयशी झाला आहे असेच वाटत राहिले.

 त्यातल्या त्यात, हौसेने 'दिलवाले' बघून आलेल्या आणि अंतू बर्व्याच्या भाषेत 'गणित सपशेल चुकलेल्या पोरासारखे' भाव घेऊन क्रुद्ध चेहऱ्याने सकाळी झाडांना पाणी घालत असलेल्या शेजाऱ्याइतके फ्रस्ट्रेशन देणारा हा चित्रपट नव्हता, हेच समाधान. शेजाऱ्याने आस्थेने दिलेले दिलवाले पाहण्याचे निमन्त्रण नाकारून फारशी चूक केली नाही, हे येथील आणि इतरत्र येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाजीराव म्हणून मला हृतिक चालला असता >>> तो नसता शोभला बाजीराव म्हणुन... मला हुडासुद्धा नाही पटते, पण हे बोलुन कुठे स्वतःची अक्कल निष्कारण काढुन घ्या म्हणुन गप्प बसले होते... या सिनेमातले तिघेही लीड कलाकार मराठी दिसत नाहीत हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे हे माझ मत.

मराठी हवा असेल तर तो बाजीराव मस्तानी सिरीयल चा अंगद म्हसकर च परफेक्ट आहे.
सुबोध भावे खूपच गट्टू आणि गुळगुळीत वाटेल.
नवा कीडा देते: स्वप्निल जोशी बाजीराव, संतोष जुवेकर चिमाजी आप्पा आणि अशोक शिंदे मिलींद सोमण Happy

नवा कीडा देते: स्वप्निल जोशी बाजीराव >>> हा घोड्यावर बसला तर घोडा खाली बसेल. ४० लढाया कश्या होणार मग? आणि बाजीराव योद्धा होता हे लक्षात घ्या हो तो नुसताच मस्तानीच्या मागे घिरट्या नव्हता घालत.

मराठी हवा असेल तर तो बाजीराव मस्तानी सिरीयल चा अंगद म्हसकर च परफेक्ट आहे. >>> करेक्ट..

सुबोध खूपच कडक शिस्तीचा वै वै वाटतो लोकमान्य केल्याने.. त्यात का रे दुरावा मधल्या रोलमुळे तर तो खडुस वाटायला लागलाय.

अजितदादा पवारांना घेऊन करायचा का सिनेमा ? चेह-यावरची ती तुच्छता, शत्रूला गाडून टाकण्याची दुर्दम्य इच्छा आणि स्वकीयांचा बंदोबस्त करण्याचा धूर्तपणा हे भाव सध्याचे मराठी कलाकार नीटसे दाखवू शकणार नाहीत असं वाटतं.

आता अजितदादांचं नाव का घेतलं तर राठा का नको असं माबोधर्माला जागून विचारलं जाईलच. पण बाजीराव पहाटे उठत होते असा इतिहास आहे. दुपारी एक वाजता बाजीराव झोपेतून उठले असं दाखवलं तर चितळेंच्या वेळा बदलाव्या लागतील.

रा. गां. बाजीराव(का? का?? का???? असं विचारु नका, जरा बरा दिसतो म्हणून फक्त Happy ), दे.फ. चिमाजी आप्पा, नि.ग. मिलींद सोमण, सो.गां. तन्वी आझमी.

अय्यो... नै ग कळते... सांग की ग उस्कटुन

मी रा गां ला बाजीरावाच्या वेशात इमॅजिनतेय ना त्यामुळे डोके बधीर व्हायची वेळ आलीय..

सिनेमा उत्कृष्ट आहे.
बर्याच प्रतिक्रियांतून दांभिकता झळकतेय.
हे पाहिजे,ते पाहिजे,हे नको,ते हवं.
अतिशहाणे त्यांचे बैल रिकामे,
असा सिनेमा कोणी बनवून दाखवणार का????

कापोचे धमाल पोस्टी आहेत Lol

काकासाहेबांना बाजीराव केलं तर ते म्हणतील मस्तानी मला नको तिला राहू दे बुंदेलखंडातच. मग सिनेमात काय दाखवणार? छत्रसालाचं राज्य, मराठयांचं राज्य, दिल्लीतील मुघलांचं राज्य यातली सगळी जमीन एक-एक गुंठा करत काकासाहेबांकडे कधी गेली ते कोणालाच कळलं नाही!

अरे काय संजीवकुमार काय, सुनील दत्त काय , प्रदीप कुमार काय, धर्मु काय कोणालाही बाजीराव बनबताय Proud
रणवीरसिंग सारखा बाजीराव ह्रितिक सुध्दा नसता करु शकला, त्याच्या सारखं कोणीच नाही !
खराखुरा बाजीराव तरी पेशव्यांच्या गेटपमधल्या रणवीर इतका देखणा होता कि नाही कोणास ठाउक Wink

रणवीर छान आहेच, मला त्याचा 'वाट लावली' मधला टिपीकल पंजाबी मुंडा स्टाईल नाच सोडून बाकी सगळीकडे तो आवडलाय. त्याने काजळ नसतं घातलं तर अजून आवडला असता. बाजीराव काजळ घालत होते का?
(अजून उगीच डोक्यात येणारे प्रश्न घालून वाढवायचं तर :मस्तानी डिझायनर लखनवी आणि पलाझ्झो सुटस आणि घेराचे आडव्या लेयर्स शिवलेले हल्लीच्या फॅशन चे अनारकली घालत होती का? काशीबाई नेट च्या/डिझायनर सोनेरी गोळे असलेल्या सिंथेटिक/राजस्थानी वर्क च्या साड्या आणि वेल्वेट चे स्टँड कॉलर ब्लाऊज घालत होती का? :))
मस्तानी मरते त्यावेळ चा अनारकली कसला सुंदर आहे ना? 'दिवानी मस्तानी' च्या सीन ला आणि तिच्या त्यातल्या पेहेरावाला "र्टाईड/रिन/एरियल" ची गरज आहे असं सारखं वाटत राहतंच Happy

मस्तानी वर सिनेमा एक सिनेमा बनतोय

वॉर्डरोब_= तुळशीबाग
कॅमेरा = १३ एमपी मोबाईल कॅमेरा
लोकेशन = विश्रामबाग वाडा, सारस बाग, मुघल गार्डन, वेताळ टेकडी, आगारात पॅलेस आणि वाडेश्वर भुवन

कास्टींग चालू आहे. खर्च आगाऊ विभागून घेतला जाईल. लाभ घ्यावा.

दिवानी मस्तानी' च्या सीन ला आणि तिच्या त्यातल्या पेहेरावाला "र्टाईड/रिन/एरियल" ची गरज आहे असं सारखं वाटत राहतंच >>>> अगदी अगदी..

आगारात पॅलेस >>>>> Lol आगाखान म्हणायचय का?

तशी त्या सीन मध्ये तिच्या केसांना चांगल्या पतंजली/गार्नियर्/लॉरियल च्या कंडिशनर ची पण गरज आहे. Happy
फ्रीजी हेअर? स्प्लिट एन्ड?लॉस्ट शाईन्?टँगल?डल ब्राऊन हेअर? ५ प्रॉब्लेम्स वन सोल्युशन Happy

धाग्यावर मौजमजा चालू आहे, पण धागा चालू लागलाय तर थोडे सीरियस लिहावेसे वाटतेय.
या चित्रपटावर सुरुवातीला झालेली टीका ही मुख्य करून काशीबाईंच्या पेहेरावाबद्दल होती. त्या पेशवीणबाई होत्या म्हणून त्यांचे पोशाक मर्यादशील असायला हवे होते हे ठीक. पण सुमारे अडीजशे वर्षांपूर्वी सामान्य ब्राह्मण स्त्रियांचा पेहेराव कसा होता असेल? एक तर शिलाईचे कपडे वापरणे ही एक वेळखाऊ गोष्ट, म्हणून चैन होती. तसेही कापून जोडलेले कपडे हे दहाव्या शतकानंतर प्रचलित झाले. तत्पूर्वी वस्त्रे सलग ('रोब') असत. एक खांद्यांवर घ्यायचे, एक कंबरेला बांधायचे. शिलाईयंत्र तर आपल्याकडे फारच उशीरा आले. हाताने शिवायचे काम वेळखाऊ. तेव्हा कमीत कमी तुकडे जोडायला लागावेत असे कपडे असत. उदा. बंडी किंवा बाराबंदी. बंद बांधले की झाले. बायकांची चोळी सुद्धा सामान्यपणे पाच तुकड्यांची. समोरून दोन तुकडे, पाठीचा एक आणि हातांचे दोन. समोरचे दोन त्रिकोनी तुकडे गाठीने बांधायचे. नऊ तुकड्यांची कटोरी चोळी शिवणे हे एक कसब होते आणि ते सगळ्यांना जमत नसे. तेव्हढा वेळ नसे. लहान मुलींच्या चोळ्यांमध्ये तर पोट संपूर्ण उघडे असे. येथे कोणी जुना 'रामशास्त्री' चित्रपट बघितला असेल तर कल्पना येईल. (मजजवळ१८७०च्या सुमारचा एक फोटो आहे त्यात लहान मुलीचे हे उघडे पोट स्पष्ट दिसते.)मोठ्या बायका बाहेर वावरताना खांद्यांवरून पदर घेत, पण कष्टाची कामे करताना ओचे आखूड खोचून आणि पदर खोचून वावरत. मंगळागौरीचे खेळ खेळताना दोन्ही खांद्यांवरून पदर घेऊन खेळणे शक्य नसणार. पदर सरसावून खोचला तर गाठीच्या चोळीमुळे पोट उघडे राहाणारच. पदराची एक किनार समोरून लांब घोट्यापर्यंत घेण्याची प्रथा बालगंधर्वांमुळे आली असे म्हणतात. त्यांची उंची कमी होती. त्यांचे नेसण पायघोळ असे. तीच स्टाइल झाली असावी. (पण अर्थात एकोणिसाव्या शतकातल्या जुन्या पोर्ट्रेटस मध्ये सुद्धा असा पारसी पद्धतीचा लांब पदर आढळतो हे खरे.) पाठीमागे अश्या एका बाजूने लांब झालेल्या पदराची कडा उजव्या खांद्यावर घेतल्याने मागून पदर एक टोक लांब एक आखूड असा न दिसता एकसारख्या लांबीचा दिसे. अर्थात सरदारजहागीरदारांच्या स्त्रियांची वेगळी गोष्ट असणार. पण सामान्यतः कष्टकरी बहुजन स्त्रिया आणि गरीब ब्राह्मण स्त्रियांच्या पोशाकात फार फरक नसावा. ओचे खोचणे हे ब्राह्मण स्त्रियांपुरते मर्यादित नाही. अगदी जुन्या कोळी बायकासुद्धा ओचे खोचतात. आणि लावणी किंवा कोल्हाट्यांच्या खेळासाठीचे घट्ट नेसण हीसुद्धा सामान्य स्त्रियांची नेसण्याची पद्धत नव्हती. मराठ्यांच्या, प्रभूंच्या, कासार-सुतार-सोनारांच्या बायका कासोटा घट्ट कसत नाहीत आणि मांड्या-पोटर्‍यांवरही लुगडे सुरवारीसारखे घट्ट आवळलेले नसते.
हे सर्व अवांतर आहे, पण धागा पुन्हा वर आला म्हणून लिहायची संधी साधली इतकेच.

चांगली माहिती हीरा.तुमचा प्रतीसाद एका वेगळ्या धाग्याचा विषय आणि पोटेन्शियल आहे.
नी ने शर्वरी जमेनीस साठीच्या कॉस्चुम डिझाईन मध्ये गाठीचे कपडे वापरल्याचे आठवते.

तशी त्या सीन मध्ये तिच्या केसांना चांगल्या पतंजली/गार्नियर्/लॉरियल च्या कंडिशनर ची पण गरज आहे>>>

मला तर काशीबाई आणि मस्तानीचे केस त्या काळाशी जास्त सुसंगत आहेत असं वाटलं, त्या काळात काही शांपू, कंडिशनर नव्हते, रिठा, शिकेकाई यांनी केस धुवत असत. त्यामुळे केस थोडे कुरळे, गुंतलेले, राठ दिसणंच अपेक्षित होतं आणि ते भन्सालीने अचूकपणे दाखवले आहे. याउलट जोधा अकबरमधे जोधाबाईचे केस अगदीच सिल्की, कंडिशन्ड दाखवले आहेत जे त्या काळानुसार उचित नाही. निदान याबद्दल तरी भन्सालीला पैकीच्या पैकी मार्क Happy

मस्तानीच ठीक आहे पन त्याकाळी मधे भान्ग पाडुन अगदी चोपुन केस बसवले जात तसे प्रियान्काचे दिसत नाही, अगदी नथही मराठमोळी नसुन डिझायनर आहे,
हिरा ची पोस्ट एक्दम माहितीपुर्ण

हीरा, मला तुमची ही पण पोस्ट आवडली. तुमच्या पोस्टस कायम नवी नवी माहिती देतात. त्या माहितीत पण एक अनौपचारीकता असते. हो, जुने मराठी चित्रपट पाहीले तर तसे आढळते. रामशास्त्री चित्रपटातला थोडासाच भाग मी पाहीला होता. त्यामुळे ते आठवते.

अजीतदादा आणी बाजीराव्?:फिदी: मग ठसकेदार लावण्याच घालाव्या लागतील चित्रपटात.

आणी मस्तानी कोण मग?

नि ग शोभुन दिसतील बाजीराव म्हणून पण घोडा त्यान्च्या वजनाने खालीच बसेल.:फिदी:

हो चीकू खरे आहे.सरळसोट स्ट्रेटन्ड सिल्की केस दाखवले असते तर आणि वाईट दिसले असते. डोळ्यांना ते सिल्की वाले केस बघायची जरा अतीच सवय झाल्याने ते जुन्या काळ वाले केस पटकन जाणवले.
मला जुन्या काळ वाले लांबसडक पण हेअरकट नसलेले आणी नॅचरल केस आठवायचे झाले तर अश्विनी अश्विनी अश्विनी....हेअर ऑईल ची जाहिरात आठवते.आणि आयुर्वेदिक शाम्पू पावडर सिल्केशा(नंतर याचे नाव सिल्केशाईन केले) ची जाहीरात.

पेशवाईतलं जेव्हढं आठवतंय त्यात रिठ्याच्या वृक्षाव्रून शिकेकाई तोडून आणताना पडलो होतो एकदा. थोरल्या वाड्यावरल्या धाकल्या कारभारणीसाठी हमामखान्यातल्या जनाना बेगमने मागवली होती.

ओचे घेण्याची पद्धत ब्राह्मणेतरांमधे केवळ कोकणपट्टीत दिसून येते. देसावर नाही.
अशी माझ्याकडची माहिती. माबोच्या नियमानुसार ती चुकीचीच असणार म्हणा. असो.

असंच सहज आठवलं, बाजीराव पाण्यात उताणा आडवा पडून(ब्रेस्ट स्ट्रोक ला पडतात तसे) मेलाय तसे मरणे आधी पाण्यात भरपूर हातपाय ऑर धडपड केल्याशिवाय शक्य नाही असे वाटते.

आग लागलेले बाण लागुन जखमी होउन पाण्यात बुडुन मरतो.

बहुदा त्याला काठावर परत आणतात . मग न्युमोनियाने तो मरतो.

सिनेम्याटिक लिबर्टी

Pages