पारंपारिक बेसन लाडू - besan ladoo

Submitted by मेधा on 2 November, 2010 - 11:21
besan ladoo
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

बेसन, साखर, तूप, दूध, वेलची पूड , केशर, सुका मेवा

क्रमवार पाककृती: 

ही स्वातीने पार्ल्यात टाकलेली कृती

शोनूसाठी बेसनाच्या लाडवांची माझी कृती :

हमखास बेसन लाडू :

प्रमाण - बेसनाच्या (वजनी) अर्ध्या पटीत तूप आणि पाऊण पटीत साखर लागते सहसा.

बेसन थोड्या तुपावर भाजायला घ्यायचं. सगळं तूप एकदम घालायचं नाही, नाहीतर मिश्रण फसफसतं. थोडं थोडं तूप घालत बेसन पूर्ण भिजेल इतकं व्हायला हवं. मग मध्यम आचेवर कंटाळा येईपर्यंत किंवा हात भरून येईपर्यंत (यातलं जे शेवटी होईल ते.) बेसन भाजायचं. रंग अगदी चांगला पालटला पाहिजे आणि खमंग वास सुटला पाहिजे. बेसन जसं भाजू तसं परतायला हाताला हलकं लागायला लागतं.

हे होत असतांनाच एकीकडे थोडंसं दूध तापवायचं. उदा. एक किलो बेसनाला पाऊण कप दूध. थोडं जास्त झालं तरी चालेल, कमी नको.मी या दुधातच केशर घालते म्हणजे छान मिसळतं आणि लाडवांना मस्त रंग येतो. दूध घालतांना जरा जपून कारण बेसन एकदम आनंदाने फुलून येतं. आणि एव्हाना परतायला हलकं लागत असतं ते पुन्हा जड लागायला लागल्यामुळे आपण वैतागतो. पण आता दिल्ली जवळ आलेली असते. (हत्ती भाजून झालेला असतो, शेपूट राहिलेलं असतं - असं म्हणणार होते पण ते कसंतरीच वाटलं लिहितांना!)

मग अजून एक ४-५ मिनिटं परतून गॅस बंद करून टाकायचा. वेलचीची पूड बेसनात नीट मिसळून घ्यायची. आता जितकं बेसन घेतलं होतं त्याच्या पाऊण पट साखर, आणि आवडीनुसार सुकामेवा - बेदाणे, काजू, बदाम वगैरे जे काही घालायचे असतील ते - ही जमवाजमव करायची. बेसन निवलं की त्यात साखर मिसळायची आणि दुखर्‍या हाताचा राग काढल्यासारखं ते मिश्रण मळून घ्यायचं. त्याने हात आणखी भरून येतो, पण निदान राग निघतो. आता मिश्रणातच सुकामेवा मिसळता येतो. पण मग ’मुखी कुणाच्या पडतो काजू.. कुणामुखी बादाम..’ असं होऊ शकतं. हा अन्याय टाळण्यासाठी सुक्या मेव्याच्या वाट्या हाताशी ठेवून प्रत्येक लाडू वळताना त्यात तो सारख्या प्रमाणात घालणं हा एक उपाय मी करते.

लाडू वळून ताटात किंवा परातीत ठेवतांना अगदी चिकटून ठेवायचे नाहीत - जरा सुटे सुटे ठेवायचे. नाहीतर नंतर दुनियाकी कोईभी ताकत उन्हें फोडेबगैरे एक दूसरे से अलग नहीं कर सकती.

कधीकधी परिस्थितीच्या उष्ण झळांनी वळलेले लाडू बसल्याजागी बसतात! असे बसलेले लाडू निरखून पाहिले तर पारंपारिक भारतीय नवर्‍यांप्रमाणे दिसतात असं माझं एक आपलं मत आहे. अशा वेळी दोन पर्याय असतात. टूथपिक्‌ने त्यांच्यावर सोंडबिंड कोरून त्यांची त्या सपाट बुडानिशी देव्हार्‍यात प्रतिष्ठापना करून इहपरलोकी कल्याण करून घेता येऊ शकतं (म्हणजे दुसर्‍या शब्दांत वाढीव काम टाळता येऊ शकतं) किंवा हौस असेल तर ते जन्मजात वळण मोडून डब्यात भरण्याआधी त्यांना पुन्हा आपल्या मनासारखा गोल आकार देता येऊ शकतो. (हा प्रयोग पा.भा. नवर्‍यांच्या बाबतीत करण्यात आलेला नाही. इच्छा जरूर आहे. असो.)

काही तळटिपा :
काहींच्यात लाडवांसाठी सरसरीत बेसन वापरतात. इथेही इन्ग्रोमधे 'लाडू बेसन' म्हणून निराळं मिळतं. पण इतर काहींना बारीक दळलेलं बेसनच आवडतं. ('काही' ही गाळलेली जागा समजून आवडीनुसार भरावी.) बेसन सरसरीत वापरलं तर पिठीसाखर वापरावी. फाइन बेसन वापरलं तर इथली साखर (जी पुळणच असते) तशीच घालते मी, म्हणजे लाडू जरा रवाळ लागतो खातांना. रवाळ लाडू आवडत असेल तर यातच थोडा रवाही तुपावर भाजून मिसळता येतो.

तर अशा रीतीने ही बेसनाच्या लाडवांची पाचा उत्तरांची कहाणी साठा उत्तरांत सुफळ संपूर्ण!

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यांवर अवलंबून
अधिक टिपा: 

ही स्वातीची कृती , तिने पार्ल्यात टाकलेली. वाहून जाऊ नये म्हणून अन या कृतीने लाडू केल्यावर फोटो काढून इथे लावता येतील म्हणून हा प्रपंच
besan ladoo recipe in marathi

माहितीचा स्रोत: 
लाडवाक्का :-)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

besan_ladu.jpg

मस्तं आहेत सगळ्यांची लाडु व्हर्जन्स !
स्वातीचे बे.ला. हसतायेत किंवा चन्द्रकोर टिकली लावली आहे Happy
डीडी,
मस्तं सजावट, बायकोला जोरदार सरप्राइज का ?

स्वातीचे बे.ला. हसतायेत किंवा चन्द्रकोर टिकली लावली आहे >> डीजे! पणत्या आहेत बहुधा, अर्थात तु लिहलेले पण अप्लाय होतेच आहे

हिमट्या/ हेमट्या हा टिपिकल नगरी शब्द आहे आणि काही लोक मुंबई पुण्यात तळले , अमेरिकेत घोळले तरी आपली मूळ श्रीरामपुरीय संस्कृती विसरत नाहीत::फिदी:

त्या शब्द्दचा अथ आहे कंजूष , कमी देण्याची सवय असलेला/ली

असं काय करतोय हिमट्यावानी वगैरे वगैरे...

मैत्रेयी, मस्त झालेत लाडू. दुध आणि केशर किती घेतलास इतका लाडवांसाठी? मला वाटत एक किलो असेल बेसन.

मै, मस्त दिसताहेत लाडू.

रॉहु, अहो श्रीरामपुरीय संस्कृती भरभरून देण्याची आहे. लाडू बेसन मागा ना, गोणी आणून टाकतो दारात. साखर मागा, कारखान्याहून परस्पर पोच करतो. पण लाडु-बिडू करायचे म्हटलं की हात हेमटा होतो बघा Proud

सर्वांचे फोटू भारी आहेत! डीडी, काय XX - आय मीन आकर्षक दिसतायत लाडू! Happy

रॉहू, कस्चं कस्चं. Proud

मला पाकाचे करता येतात, हे जमत नाहीत.. ह्या वेळी करून बघितले. आधी तूप कमी पडले असावे, कारण सगळे कोरडे झाले, लाडू वळेनात. मग वरती सिंड्रेला ने म्हटल्याप्रमाणे थोडे जास्त दूध्,तूप घालून एक चटका दिला. सगळे लाडू मस्त वळल्या गेले, आता मला सांगा, दूध असल्यामुळे हे लाडू फ्रीज मधे ठेवायचे, की बाहेर? बाहेर किती दिवस टिकतील?

सिं-ड-रे-ला Happy पाळीव प्राणी ऐका ना Proud

दिवाळीशिवाय लाडवांना हात न लावायचा मनाइ हुकूम असेल तर फ्रीजमध्येच ठेवा Happy मी जे काही चार-दोन लाडू करते ते नेहमीच फ्रिझमध्ये ठेवते आणि खाताना धा सेकंद मावेमध्ये गरम करून त्यावर थेंबभर तूप घालून खाते. भारी लागतात.

बे ला, बुं ला, र ला, र + बे ला, ऑलमोस्ट कुठलाही लाडू प्रकार मावेत गरम करूनच खावा. अप्रतिम चव येते. एक माणून तीन तीन खाऊन जातो गरम लाडू.. Happy

आज लाडू केले. मी तुपात अजिबात चिकडूपणा करत नाही. मस्त सतेज सोनेरी दिसतायत आमचे लाडू. Happy फोटो काढलेला नाही. जमला तर काढीन. केशर नाही घातलं.

अर्धा किलो बेसनाला, अर्धा किलो लोण्याचं जेवढं होईल त्यापेक्षा कमी तूप लागलं. म्हणजे बहुतेक पाव किलो तूप लागलं असावं. साखर मी आधी अंदाजाने आणि मग चव बघूनच घालते कारण चिट्ट गोड मला आवडत नाहीत त्यामुळे ती मोजली नाही. २४ लाडू झाले मोठ्या आकाराचे.

मला घाट घालून पाहायचाच आहे बे लां चा, येत्या विकांताला करून पाहू बहुतेक मी अने बायडी.

ए भा प्र - दूध घातल्यानी नक्की काय होईल?
आई, आजीला कधी दूध घालतांना पाहीलं नाहीये बेसनांच्या लाडवात..

"उचलली जीभ नि लावली टाळ्याला" वालं टाळु हो हे! Proud

आमच्याकडे ही वरची म्हण सोडली तर "आटाळ्याला चिकटला लाडू" असा उल्लेख असतो. असो. खमंग लाडवांवर एकदम टाळू काय! Wink

Pages