एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी?

Submitted by मामी on 11 August, 2015 - 09:24

रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्‍याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.

पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?

या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अ‍ॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...

HeForShe : KEY MESSAGES

* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world

* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality

* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.

ABOUT THE CAMPAIGN

HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.

अधिक माहिती :

https://en.wikipedia.org/wiki/HeForShe

http://www.heforshe.org/

***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी

पुरूषांची सामाजिक जबाबदारी -

१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.

२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.

३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.

४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.

५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.

६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.

७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.

८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.

९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.

***********************************************************************************************************

अंजली

बर्‍याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.

१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?

एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येकाला फक्त स्वताचा मुद्दा प्रिय आहे आणि त्याला दुजोरा न देणार्या सगळ्यांकडे एक तु.क. टाकला जातोय
आणि या सगळ्या नादात आधीच फसलेला धागा वाटेल तसा भरकटत चाललाय .... चालू द्या!

>>>>> एक पुरूष म्हणून, एक पिता, भाऊ, मित्र, नवरा या सर्व नात्यांमधेय तुमची सामाजिक जबाबदारी काय आहे ते जरा सविस्तर लिहा. <<<<<<
एक पुरुष म्हणुन काही लिहू पाहिले तर स्त्रीपुरुषात समानतेच्या काळात अनेक प्रकारे स्त्रीपुरुषातील विषमता दर्शविल्यासारखे होते या दोषाला गृहित धरुन, तरीही...

१) एक पुरुष म्हणूनः
मूळात मी एक "नर"पशू आहे व भिन्नलिंगी व्यक्तिकडे आकर्षित होण्याची स्वाभाविक/नैसर्गिक वृत्ती जगातील अन्य प्रत्येक पुरुषाप्रमाणे माझ्यातही आहे हे मला ज्ञात आहे, व व्यक्ति म्हणुनची ही मूलभूत जडणघडण कशी ते आईने समजावले आहे, अन त्याचबरोबर, याच नैसर्गिक वृत्तीचे दमन करुन कुटुंबात/समाजात वावरणे म्हणजेही "एक धर्मच" व तो पाळणे अत्यावश्यक ही शिकवणही आईकडून असल्याने, एखादीच काय, तर असंख्य भिन्नलिंगी व्यक्ति आवडल्या, तरी त्या "आपल्यालाच" हव्यात असा हव्यास त्यागण्याचा संस्कार झालेला आहे, व तो इमानेइतबारे मुलावरही जमेल तितका करतो आहे. अर्थातच त्यामुळेच, समुहात वा एकांतात माझे सहवासात आलेल्या कोणत्याही भिन्नलिंगी व्यक्तिस माझेपासुन धोका आहे असे कणभरही जाणवत नाही, व त्यांचा माझेवरचा विश्वास सार्थच ठरत आला आहे, ठरेल.
२) एक पिता म्हणुनः
मला दोन मुली. मूळात बहुतेक स्त्रीयांना ठराविक वयात आल्यानंतर परपुरुषाची शारिरीक अभिलाषेची नजर /इरादा अत्यंत चटकन समजतो/जाणवतो व त्या सावध होतात, फार कमी केसेस मधे अपवादात्मक परिस्थिती/भोळसट पणा पहावयास मिळू शकतो. स्त्रीयांन्ना जन्मजात हा सिक्स्थ सेन्स असला तरीही निव्वळ त्यावर अवलंबुन न रहाता, बाह्य जगात, घराच्या कुंपणाबाहेर पाऊल टाकल्यावर कुणावरही सहजपणे विश्वास न टाकता, कुठे काय कसे वागावे व काय वागू नये याचे भान मुलिंना शिकवले आहे, जे कदाचित "स्त्रीमुक्तिच्या (आचरट) कल्पनांविरुद्ध" असेल.

याबाबत एक प्रत्यक्ष घडलेले पण किरकोळ प्रसंगाचे उदाहरण आहे.
मुलगी रोज गल्लीतील दुसर्‍या मित्राबरोबर देवळात आरतीला जात असे, परत येताना वाटेत थांबुन गप्पा मारित बसत. माझ्या दृष्टीने त्यात गैर काहीच नव्हते, व अमुक भिन्नलिंगी व्यक्तिबरोबर जास्त वेळ काढला तर तुमच्यात "तसले काही शिजत आहे का" अशी शंका लगेच घेण्याची गरजही नव्हती, वा शंका आल्यास हा प्रश्न मोकळे पणी विचारुन, त्यास तितक्याच मोकळेपणी उत्तर मिळविण्याइतपत घरातील वातावरण मोकळेढाकळे व चर्चेला पोषक आहे. तसेच मुलिंनी वैयक्तिक आवडीनिवडी व्यतिरिक्तही व्यावहारिक दृष्ट्या "काय निवडावे" याचे शिक्षण लिंबी व मी दोहोंनी दिल्याने तशी शंका घेण्याचे कारणही नव्हते.
माझ्या दृष्टीने दिवसभरच्या धामधुमीनंतर त्यांना तितकाच निवांत वेळ मिळू शकत होता, व कदाचित त्या व्यक्तिबरोबर संवादाचा सूर जुळत असल्याने प्रत्यक्ष गप्पा/चॅट होत होत्या, अन तरीही, मग रस्त्यात का या प्रश्नाचे मी शोधलेले उत्तर होते की परत गल्लीत आल्यावर एकतर लोकांच्या "गैरनजरा व त्यातुन होणारे गैरसमज" टाळणे, शिवाय परत आल्यावर परत घरात बोलावुन कामाला / अभ्यासाला जुंपविले जाणे इत्यादी अनेक कारणे असू शकत होती, व त्यावर माझा विश्वास होता.
प्रत्यक्षात ते जिथे उभे रहायचे तेथे बांधकाम सुरु असलेल्या बिल्डिंगच्या एका "मागास व दारुड्या" वॉचमनने त्यांना हटकले व इथे थांबायचे नाही असा दम भरला. मुलिने व मित्राने हे गल्लीतल्या इतर मित्रांना सांगितले, तसेच ते मलाही सांगत आल्यावर मी त्या वॉचमनला जाऊन हग्या दम भरला की माझी मुलगी जेव्हा मी "घराबाहेर पाठवतोय" तेव्हा ती काय करते वा नाही करत यावर माझे लक्ष आहे, ती पोलिसगिरी तुम्हाला करण्याची गरज नाहीच, शिवाय पोरीला काही झाले, कुणी केले तर त्याचे "निर्दाळण" कोणत्या पद्धतीने करायचे हे मला ठाऊक आहे. असा दम भरण्यामागे कारण हेच होते की ज्या परिसरात मी रहातो तिथे इतक्या कमी वयातील स्त्रीपुरुषही मुक्तपणे वावरु शकत नसतील, भेटू बोलू शकत नसतील, त्यावर इतरजण निव्वळ संशय घेत बेछुटपणे नियम लादत असतील तर ते मला चालणार नाही. मी सुशिक्षित वस्तीत रहातोय, व तेथिल वातावरणही मला तितकेच मोकळेढाकळे हवे.

तरीही, घरी आल्यावर मात्र, मुलगी व मुलाला झापलेच, की तुम्हाला दुसर्‍या गल्लीत दुसर्‍या परिसरात, लोकांच्या नजरेस येईल अशा प्रकारे वागण्याचे काय कारण होते? आपले घर, अंगण, गल्ली नाहीये? तुम्हाला बोलण्याची मनाई केलीये? अन मी हे बंधन घालतोय की घराच्या परिसराबाहेर, आमच्या नजरेबाहेर, संपर्कक्षेत्राबाहेर एकेकट्यानेदुकट्याने जाऊन टाईमपास करायचा नाही, घर सोडले, की उंबरठ्याबाहेरचे जग अत्यंत नालायक व नरपशुंनी भरलेले आहे, असे नरपशू, जे तुमच्याकडे निव्वळ मादी म्हणूनच बघतील व तिथे जवळ आईबाप नसतील तर तुमचे संरक्षणास कोणीही पुढे होईल याचि आशा बाळगु नका. अन यास " (फक्त) स्त्रीयांवरीलच बंधने" वगैरे समजायचे असले, तर जरुर समजा.

३) एक भाऊ म्हणुनः
सख्खी बहिण नसल्याने याबाबत काही बोलणे अवघड.
४) एक मित्र म्हणुनः
मला एकही सख्खी "मैत्रीण" नाही, ओळखीपाळखीच्या खूप आहेत. पण त्यांचेबरोबर वावरणे होत नाही. सबब त्यावर भाष्य नाही. (या उत्तरामागे प्रश्नात "एका स्त्रीचा मित्र म्हणुन काय" असे गृहित धरले आहे )
एकतर मला असे कोणतेही मित्र नाहीत जे माझ्याबरोबर भिन्नलिंगी व्यक्तिबाबत गलिच्छ् बोलू/चर्चा करु शकतिल. माझे सर्व मित्र धर्मशास्त्र/अध्यात्मात पारंगत असलेले आहेत.
त्यातुनही ओळखीचे/ऑफिसमधिल सहकारी वगैरे कोणी माझ्यापुढे मर्यादा सोडुन परस्त्रीबद्दल अचकटविचकट बोलू लागलेच तर त्यांची गत काय होते, ते त्यांनी अनुभवले आहे. त्याचा तपशील इथे देण्यात अर्थ नाही.

५) एक नवरा म्हणुनः
याबाबत मी काही सांगण्यापेक्षा मी कसा ते लिंबीच अधिक चांगल्याप्रकारे सांगू शकेल, नै का?

अन अशाप्रकारे प्रश्नांना "खरी" ती उत्तरे देताना आपण एखाद्याची अत्यंत "खाजगी" बाबही पब्लिक फोरममधे विचारीत आहोत असे नाही का वाटत? कारण उदाहरणाशिवायची/अनुभवावीण नुस्ती पोकळ शब्दरचना की याँव व्हायला हवे नी ट्याँव व्हायला हवे हे निरर्थक आहे हे माझे ठाम मत आहे.
अन उदाहरणे द्यायची तर खाजगी जीवन / विचारप्रणाली उघडी करावी लागते जे करणे धोकादायक ठरू शकते. शिवाय, पुरुष म्हणून मी कसा "सज्जन/सोज्वळ वगैरे आहे" याच्या स्वस्तुतीचा दोषही लागू शकतोच शिवाय इथे लिहीले म्हणजे ते तसेच वास्तव असेल, याबाबतही शंका घेणारे घेऊ शकतातच. म्हणूनच मी म्हणले की धाग्याचा उद्देश स्तुत्य असला तरी मांडणी व पुरुष म्हणुन काय करता असे एकतर्फी विचारणे मला अयोग्य वाटले.
हां, एकवेळ "नर" मानव म्हणुन तुम्ही काय वागता असे विचारले असते तर चालुन गेले असते. असो.

माझी पोस्ट इग्नोर करण्याची पूर्ण मुभा वाचकांना आहेच्च. (करताय ना? करालच्च!) [बाबु, हे वाक्य तुझ्याकरता नाही]

मानव मूलतः एक पशूच आहे, व या सस्तन प्राण्यात नर व मादी असा भेद आहे, व त्या अनुषंगाने येणारे पशुंचे सर्व गुणविशेष त्यात सूप्त वा उघड रुपाने अस्तित्वात आहेत हेच नाकारुन चालणार नाही.
या मूलतः पशू असलेल्या प्राण्याने "मानव" म्हणून जगण्यात सुधारणा करताना, जगण्याचे जे काही नितीनियम प्रदीर्घ अनुभवांती निरनिराळ्या प्रदेशात बनविले, ते ते एकगठ्ठा नितीनियम म्हणजे त्या त्या प्रांतात निर्माण झालेला "धर्म" होय.
हिंदुस्थानपुरता याचा अधिक शोध घेता मला जाणवलेले/आकळलेले काही म्हणजे, त्या त्या वेळच्या/काळच्या प्राप्त परिस्थितीनुसार, तेव्हा तेव्हा या जगण्याची नितीनियमात बदल होत गेले, काही वेळेस सुधारणा तर काही वेळेस अधिकची बंधने.
माझ्या मते उदाहरणार्थ,
सूर्यमंदीर वा अन्य ठिकाणी असलेल्या मूर्ति बघितल्यावर येथिल पूर्वीची मोकळीढाकळी संस्कृतीस नंतर मात्र पार घुंगट/बुरख्या पर्यंत नेऊन पोहोचवले ते गेल्या दीड हजार व त्या आधी दोन हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या दोन परधर्मांच्या अतिरेकी धोकादायक संसर्गामुळेच. समुद्रबंदी देखिल याच मुळे झाली असे माझे ठाम मत आहे. इतकेच कशाला, आजही, अरबी समुद्रात विशिष्ट प्रदेशात "समुद्री चाचेगिरीमुळे" व्यापारी जहाजांना संरक्षण घेऊनच जावे लागते, अन्यथा त्यांचि गच्छंती निश्चित असते.
असो.
रेल्वेतुन जाताना " खिसेकापू" असतातच हे गृहित धरुन मी माझे पाकीट अंगाशी कपड्यांच्या आत नीट सांभाळून झाकून धरले तर तो माझा सुविद्यपणा ठरतो, पण तेच मी माझ्या स्त्री नातेवाईकांना सांगितले की बाहेर असंस्कारीत/निर्बंध नसलेले "नरपशू" असतातच, व ते तुमच्याकडे मादी म्हणूनच बघतात तेव्हा तुमचे शरिर नीटपणे कपड्यांच्या आत झाकून, सांभाळून ठेवा, नरपशू आकर्षित होतिल वासनेने चाळवतील इतके उघडे टा़कू नका, तर तसे सांगणे मात्र "बंधनकारक वा अतिमागास " व स्त्रीमुक्तिच्या विरुद्धचे ठरविले जाते, ही विचारसरणि, यातिल विरोधाभास विपरित नव्हे काय?

मामी, मस्त बातमी!
रॅदर मी जे म्हणतेय त्याला दुजोरा देणारी बातमीच!

नंदिनी, वेल डन! आमच्याकडे घडलेल्या प्रसंगातही हे करता आलं असतं पण बाबांनी आधीच आवाज दिला असल्याने त्यामुलाचा आमच्यावर संशय येणं स्वाभाविक होतं. इतर कोणीही कंप्लेंट केली असती तरीही आम्ही लटकण्याची शक्यता पण जास्त होतीच.
आता एसटिडी नसल्याने काय करावं हा प्रश्न आहेच! पण हा मार्ग अवलंबता येईल.

मायबोलीवरील प्रत्येक आयडी एका एका जमावाचा भाग झाला तर अश्या प्रसंगात मुलीला (किंबहुना कोणाही पिडिताला) साथ देणार्‍यांची संख्या सहज वाढेल.

>>रेल्वेतुन जाताना " खिसेकापू" असतातच हे गृहित धरुन मी माझे पाकीट अंगाशी कपड्यांच्या आत नीट सांभाळून झाकून धरले तर तो माझा सुविद्यपणा ठरतो, पण तेच मी माझ्या स्त्री नातेवाईकांना सांगितले की बाहेर असंस्कारीत/निर्बंध नसलेले "नरपशू" असतातच, व ते तुमच्याकडे मादी म्हणूनच बघतात तेव्हा तुमचे शरिर नीटपणे कपड्यांच्या आत झाकून, सांभाळून ठेवा, नरपशू आकर्षित होतिल वासनेने चाळवतील इतके उघडे टा़कू नका, तर तसे सांगणे मात्र "बंधनकारक वा अतिमागास " व स्त्रीमुक्तिच्या विरुद्धचे ठरविले जाते, ही विचारसरणि, यातिल विरोधाभास विपरित नव्हे काय?>>
पाकिट आणि स्त्रीचा देह हे सारखे का? पाकिट, पर्स वगैरे गोष्टी सगळेच सांभाळतात प्रवासात. पाकिट सुरक्षित ठेवणे सोपे पण अंगभर कपडे घातलेला देह सुरक्षित नाही ही परीस्थिती. अंगभर कपडे घालूनही पर्सनल स्पेसवर आक्रमण होते. माझ्या आईच्या पिढीतल्या स्त्रीया तर दोन खांद्यावर पदर, कोपरा पर्यंत बाह्यांचे ब्लाऊज वगैरे तरीही त्रास व्हायचाच. 'वासना चाळवतील असे कपडे' हा मुद्दा परत पिडीत व्यक्तीलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करतो.
बस, रेल्वे त जेव्हा वाईट स्पर्श होतात तेव्हा चोरटे सुख मिळवणे असते पण त्याजोडीला 'मी तुझ्या पर्सनल स्पेसमधे सहज अतिक्रमण करु शकतो आणि तू त्याबाबत अंग चोरुन घेण्यापलिकडे काहीही करु शकत नाहीस' अशा एक उद्दामपणा असतो या वागण्यात.

लिंबु जी..सहमत!
'एक पिता म्हणुन' यातिल आपल्या लेकीच्या- प्रसंगा सारखा एक प्रसंग---इथे स्त्री म्हणुन मी हरले :(.. झाले असे-
कॉलनीतील एक मुलगी (वय वर्षे १६-१७) व तिचे त्याच वयाचे क्लासमेट्स असणारे मित्र यांच्या गप्पां रंगल्या होत्या. मला खात्री आहे की सगळे निखळ च असणार. तर एक तिथेच राहणारे काका (वय७५) त्यांना रागावले. हा प्रसंग माझे साबुवा घरी सांगत होते. बराचसा रोख मुले व मुली यांनी असे वागावे का असा होता. त्या रागवणार्‍या काकांचा ही तोच राग होता. मला थोडीशी चीडचीड झाली. मी बोलले की 'अश्याच' नजरेने का बघता? केवळ मित्र असे समजा ना? यावर उत्तर आले साबाईंन कडुन... बरोबर आहे त्या काकांचे. माहितीतली मुलगी आहे. असा आळा घातलाच पाहिजे. उद्या काहीही करतील. इ. इ.
मी समजवण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ. ते दोघेही ठाम होते.
हा प्रसंग डोळे उघडाणारा होता. त्या मुलीच्या जागी माझी मुलगी असती तर? सगळ्यात आधी मला तीला 'या' विचारांन्चे शिक्षण द्यावे लागेल. कोणी काहिही म्हणले तरी माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे हा विश्वास आधी द्यायला हवा.
(इथे साबुवा व साबाई---या प्रातिनिधीक असे घ्यावे. मी तक्रार करतीये या अर्थाने नाही. मागील पीढी या अर्थाने.)
लिम्बुजी तुमच्या प्रसंगात तो वॉचमन हा बाहेरचा होता-- इथे माझी कसरत घरातुन चा सुरु होतेय.
नवर्‍याचे म्हणणे समतोल वाटले- तो म्हणाला 'संरक्षण या अर्थाने काकांनी लक्ष ठेवायला हरकत नाही. सरसकट मुल-मुली अस म्हणुन रागवायला नको होते. उद्या ते दुसरी कडे इथे रागावतात म्हणुन कमी गर्दिच्या ठिकाणी असेच उभे राहतील आणि तिथे काही वेगळे झाले तर किती वाईट.'

नरपशू आकर्षित होतिल वासनेने चाळवतील इतके उघडे टा़कू नका>>>>>>. २-५ वर्षांच्या मुलींवर अत्याचार होतात त्या कुठे असे वागतात.मान्य आहे काही विकृत माणसेच हे करतात.पण त्यासाठी परत स्त्रियांचे कपडे आणि अत्याचार यांची सांगड घालू नका.

स्त्री नातेवाईकांना सांगितले की बाहेर असंस्कारीत/निर्बंध नसलेले "नरपशू" असतातच, व तेतुमच्याकडे मादी म्हणूनच
बघतात तेव्हा तुमचे शरिर नीटपणे कपड्यांच्या आत झाकून, सांभाळून ठेवा, नरपशू आकर्षित होतिल वासनेने
चाळवतील इतके उघडे टा़कू नका, तर तसे सांगणे मात्र "बंधनकारक वा अतिमागास " व स्त्रीमुक्तिच्या विरुद्धचे
ठरविले जाते, ही विचारसरणि, यातिल विरोधाभास विपरित नव्हे काय?>>>> चला , चर्चा नेहमीच्याच् स्त्रियांनी काय कपड़े घालावेत ह्या मुद्द्यावर आली !!! लिंबूकाका तुमची ही पोस्ट अत्यंत अचाट आणि अतर्क्य आहे. या आधीची अंजलीच्या मुद्द्यावर आधरित जी पोस्ट लिहिली होतीत ती थोड़ी सेन्सिबल होती पण ह्या पोस्टिने सगळ मुसळ केरात !!

वर देवकी यांनी लिहिलेच आहे तसे दोन पाच वर्षाच्या मुलीने असे कोणते कपड़े घातले असतात म्हणून त्यांच्यावर अत्याचार होतत ?? एवधच काय 60 वर्षाच्या वृद्ध बाई वरही अत्याचार होतात . तिने असे कोणते अंग उघडे टाकणारे कपड़े घातलेले असतात ?? कैच्याकै पोस्ट आहे

तुमचे शरिर नीटपणे कपड्यांच्या आत
झाकून, सांभाळून ठेवा, >>>> तुमच्या म्हणणयाप्रमाणे मग आता फक्त बुरखाच् घालून बाहेर पडायला हव . हिन्दू धर्मात अस चालेल का ? सीरियसली विचारतेय .

परत एकदा लिंबुकाका , इथे ज्यांनी ज्यांनी वाईट नजरांचा सामना केलाय , बस ट्रेन मध्ये वाईट स्पर्श अनुभवले अस लिहिले आहे त्या सर्व mature आहेत. कोणते कपड़े घालावेत वगैरेच आपसुक ज्ञान त्यांना आहे तरीही त्यांना असले अनुभव आलेत . मग यात दोष कोणाचा आहे ? की स्त्री म्हणून जन्माला यायचाच हा दोष आहे ?

'निदान स्वतःच्या संरक्षणार्थ भरपूर कपडे घालत जा' आणि 'दोन वर्षांची मुलगी आणि सत्तर वर्षांची आजी ह्यांच्यावर का बलात्कार होतात' ह्या(च) वळणावर चर्चा येऊ नये ह्यासाठी भरपूर प्रयत्न झाले. Happy

'लैंगीक अपराधांमध्ये स्त्रियांची चूक कसकशी असते' असा एक आणि 'लैंगीक अपराधांमध्ये पुरुषांची चूक कसकशी असते' असा एक, असे दोन धागे काढून त्या चर्चा स्वतंत्रपणे व एकमेकांत मिसळणार नाहीत ह्या पद्धतीने चालवून दाखवण्याचे काम कोणीतरी हाती घ्यायला हवे आहे.

असे दोन धागे समांतररीत्या चालले तर बहुधा ह्या धाग्याच्या संकल्पनेतील वेगळेपण नेटकेपणाने पुढे येईल.

चु भु द्या घ्या

मला सगळ्यांचीच मत पटत आहेत्,पण बर्याचदा थोडे वेगळे(छोटे/trendy/fashionable) कपडे घातलेल्या तरुण मुली रस्त्यावर जाताना दिसल्या तर रोड साइड रोमीओंना भरपुर चेकाळतांना बघीतलय,किंवा "अबे आइट्म देख" असल्या भाषेत कमेंट करतांना अनुभवल आहे/पाहील आहे,बर्याचदा नाइलाजाने अजिबात लक्ष नसल्याचे दाखवुन आपल्या रस्त्याने जावे लागले आहे,त्या अनुशंगाने तर लिम्बु सरांनी असे म्हणले आहे का?

vrushali - अशा घटना घडतात हे नाकारत नाही पण यात दोष कुणाचा आहे ?

मानसिकतेचा का कमी कपड्याचा हा वादाचा मुद्दा आहे.

म्हणजे प्रॉब्लेमचं मूळ विकृत मनोवृत्तीत आहे
<<

बरोबर.

कुणाची "विकृत मनोवृत्ती"?

ही "विकृत मनोवृत्ती" उत्पन्न होण्यापाठी, "पुरुष" म्हणून जन्माला येणे हीच, व एवढी एकच मोठ्ठी चूक आहे, असा सूर या धाग्यात उमटताना मला दिसतो आहे, व मला ते अजिबात मान्य नाही.

अकु सोडल्यास फारसे कुणीही, सामाजिक चालीरीती, तथाकथित संस्कार, ज्यामुळे लैंगिक विकृती निर्माण होण्यास मदत होते, याबद्दल भाष्य केलेले नाही.

मी लिहितो आहे ते कडू वाटेल. पण ही गोळी पण गिळून पहा, अन विचार करा. हा देखिल एक व्ह्यूपॉईंट आहे, इतकेच म्हणतो. माझ्या व्यवसायानिमित्ताने (ज्या डॉक्टरकीचा उल्लेख हूटींगच्या संदर्भात आधी येऊन गेलाच आहे) स्त्री-पुरुष संबंधाबद्दल अभ्यासही आहे, लैंगिक अत्याचारपीडीतांच्या तपासणीचा, त्याबद्दल कोर्टात साक्षी देण्याचा, थोडाफार समुपदेशनाचा अनुभवही आहे. हे सर्वात आधी नमूद करतो. (५-६ वर्षे कॅज्युल्टी मेडिकल ऑफिसर म्हणून शासकीय वैद्यकीय रुग्णालयात काम)

लैंगिकता झाकून ठेवायची, धर्माच्या, अध्यात्माच्या किंवा इतर कशाच्याही नावाखाली तिला दाबून मारायची हे प्रकार जगभर आहेत. ८-९ वर्षांची होत नाही तोच मुलींना 'सर्वच' पुरुषांपासून दूर राहण्याचे शिक्षण देण्यात येऊ लागते. अगदी बाप, भाऊ यांचेपासूनही दूर रहात जा हे पदोपदी कुजबुजून सांगितले जाते. Suppression of female sexuality, is very rampant. So much so, that I have read responses on this thread, deploring males for just LOOKING at females.

अमकी जातच गुन्हेगार असल्या पूर्वग्रहासारखे हे असते. पुरुष ना? वाईटच. (त्यातल्या त्यात भारतीय नं? मग नं.. वगैरे. Wink )

भारतातल्या (हो. अमेरिकेतलं मला ठाऊक नाही. शिवाय "द्वेष"ही आहे Wink ) असंख्य जोडप्यांत शय्यागृहात 'हार्मनी' नाही. लैंगिकतेचे योग्य दमन नाही. सम- म्हणजेच इक्वल; भोग म्हणजे एंजॉयमेंट हेच समजलेले नाही. नवर्‍यालाही मी अंगाला हात लावू देत नाही म्हणजे मी किती मोठ्ठी पुण्यवान असल्या थाटात असंख्य स्त्रीया वागतात. आधीच नॅचरली लिबिडो कमी असते.

त्याचसोबत रतिसुख म्हणजे काय, व ते कसे घ्यावे-द्यावे, याचीही पुसटशी शिकवण मुलग्यांना मिळालेली नसल्याने, समाजमान्य पतीपत्नीच्या नात्यातही पुढाकार पुरुषानेच घ्यायचा, असे ट्रेनिंग असल्याने, अनेकदा ते ओरबाडूनच घ्यावे लागते, अशी परिस्थिती असंख्य (मेजॉरिटी) वेळा असते.

समाजाच्या या असल्या आचाराचा अति आचार उर्फ अत्याचार व्हायला वेळ लागत नाही.

खुल्या मनाने स्त्री पुरुष दोघांना शरीरसंबंधाबद्दल योग्य माहिती दिली गेली; आहार निद्रा भय मैथुन, या चार बेसिक इन्स्टिंक्ट्स आहेत, हे मान्य करून सर्वच मूळ उर्मीबद्दल समाजाने खुलेपणे वर्तणुक केली, तर मला वाटते बराच फरक पडेल.

***

वरचा प्रतिसाद म्हणजे उत्छृंखल वर्तणुकीस प्रोत्साहन असे इंटरप्रिटेशन करता येईलच.

पण लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त फालतूपणा नव्हे. ते आपण आपल्या पुढच्या पिढीला देवू, त्याच सोबत तितकेच, संपूर्ण जीवनपद्धतीचे मूल्यशिक्षणही देऊच ना? लैंगिक व्यवहारातला आनंद कसा घ्यावा हे शिकवताना, जोडीदाराने नाही म्हटले, तर थांबावे, हेही शिकवले जाईलच, व अंगवळणीही पडेल. माबोवर इतरत्र दिलेल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, बकरीची शेपटीही लाज झाकायला, व नकार दाखवायला पुरे असते. (अपवादात्मक घटना असतातच. २-५ किंवा ६० वर्षांप्रमाणे. त्याचप्रमाणे स्त्रीयांनी केलेला बलात्कार, हीदेखिल अपवादात्मक का होईना, वास्तविकता आहेच.)

***

हे सोडल्यास उरतात ते जेनेटिक विकृत. त्यांना असे वागल्याशिवाय पर्याय नसतो. अशांना उपचारांची गरज आहे, असे संतुलित प्रतिपादन वर (मला वाटते) अकु यांनीच केलेले आहे.

**

आतापर्यंतच्या माझ्या वरील लेखनातल्या टेक्निकॅलिटीज लक्षात घ्याव्या ही विनंती. मायबोलीवर नवा होतो तेव्हा हस्तमैथुनाच्या धाग्यावर मी दिलेल्या टेक्निकल प्रतिक्रिया उडवल्या गेल्या होत्या व धाग्यास टाळे लागले होते, हे आठवते.

वरील प्रतिसाद माबोच्या धोरणांत बसत नसेल तर उडविण्यास, व माझी आयडीही उडविण्यास मा. अ‍ॅडमिन समर्थ आहेतच.

**

माझे दोन(शे) शब्द आपण शांतपणे वाचून घेतलेत त्याबद्दल मी आपला आभारी आहे.

धन्यवाद.

जय हिंद.

जय महाराष्ट्र!

Again, my above response can be interpreted as "blaming the victim"

Which is ok.

Keep venting.

Be happy.

धाग्याच्या विषयाबद्दल प्रत्येकाला जे वाटत आहे ते प्रत्येकाचे मत आहे. ही (एक अभावाने चाललेली 'हेल्दी') चर्चा असल्यामुळे कोणी कोणाला खोडून काढणे बरोबर नाहीच.

लिंबूटिंबूभाऊंच्या मूळ मताशी सहमत की जो पुरुष असतो तो त्याच्यापेक्षा अधिक कलाकारीने रचल्या गेलेल्या सजीवाकडे, स्त्रीकडे पाहतोच पाहतो. पाहण्याचा उद्देशही अगदी थेट तसाच असतो.

पण मग हे सगळे इथे (फक्त एकदा किंवा दोनदा पाहण्यावर) थांबवावे की नाही हा चॉईस पुरुषासमोर नक्कीच असतो. पुरुष असे करताना दिसत नाहीत. मुंबईतील अश्या डब्यात मी डोळ्याने पाहिलेले आहे की एखाद्या म्युझियममध्ये ठेवलेल्या वस्तू असाव्यात असे पुरुष स्त्रियांकडे पाहात असतात. (कसे काय पाहू शकतात? लाज कशी वाटत नाही?). (निदान इतर कोणी आपल्याला ##### समजेल असेही कसे काय वाटन नाही?)

सेफ्टीसाठी ते डबे वेगळे नसून त्यात जाळी असते ही गोष्ट पथ्यावर पडली असे कसे काय समजले जाते?

चर्चाप्रस्ताव पुरुषांच्या त्या मनोवृत्तीवर आहे आणि कदाचित तशी मनोवृत्ती अजिबात नसणार्‍या पुरुषांना हा प्रश्न विचारण्यात आला आहे की तुम्ही काय कराल? ह्यात सगळ्यांना जातीने थर्डक्लास समजले गेलेले नाही असे माझे मत आहे. पण मते मात्र मागवण्यात आलेली आहेत ती सगळ्यांकडूनच!

आपण त्यातले नसतानाही त्यातले काहीजण आपल्यातलेच असतात हे गृहीत धरून उत्तरे देण्यात कमीपणा वाटण्यासारखे काही नसावे. प्रत्यक्षात कोणत्याच एका व्यक्तीवर शरसंधान करण्याचा धाग्याचा हेतू नसावा, नाही असे दिसते.

धाग्यात विचारला गेलेला प्रश्न विचारलाच जाऊ नये असे वाटणे हाच एक मूलभूत प्रश्न वाटत आहे मला तरी.

पुन्हा,

चूक, भूल, द्यावी, घ्यावी.

दीड मायबोलीकर, पोस्ट चांगली आहे. पण हे आधीच का लिहिलं नाहीत? आपल्या चष्म्यातून अमेरिका भारत ह्या असंबद्ध पोस्ट का टाकल्यात?

खुल्या मनाने स्त्री पुरुष दोघांना शरीरसंबंधाबद्दल योग्य माहिती दिली गेली; आहार निद्रा भय मैथुन, या चार बेसिक इन्स्टिंक्ट्स आहेत, हे मान्य करून सर्वच मूळ उर्मीबद्दल समाजाने खुलेपणे वर्तणुक केली, तर मला वाटते बराच फरक पडेल.>>>>>>>> हे सोल्युशन आहे.
बाकी तुम्ही पुरुषांबद्दल लिहिलय (चांगलं लिहिलय Happy ) तो नवा पर्स्पेक्टिव आहे/असावा. कसय, पुरुषांकडून ही घृणास्पद कृत्ये घडत आहेत आणि त्यामुळे ते सुद्धा विक्टिम आहेत ह्या बुरसटलेल्या अवास्तव विचारांचे, पोकळ संसकृतीचे ह्याबाबत विचार करायला कोणाला रस नाही. ह्याचा अर्थं त्यांची कृत्ये क्षम्य आहेत असा आजिबातच नाही. स्त्रीयांना ह्या अशा त्रासातून जाता असताना, पुरुष असं करतात तर का करतात ह्या अनॅलिसिसचे दाखले देणे हे मुर्खपणाचे ठरेल.
इथे ओवरॉल पुरुषांची सामाजिक जबाबदारी काय आहे हे समजून घेताना आधी नेमका प्रॉबलेम कुठे आहे आणि ही मंडळी अशी वागतात तर का वागतात हे समजून घेणं खुप गरजेचं आहे.
परत एकदा, चांगलं लिहिलय दी मा. Happy

सायो,
माझ्या घुमवून फिरवून बोलण्याचा अनुभव आपणास आहेच Proud
प्लस, त्या अमेरिकेबद्द्लचा माझा पहिला प्रतिसाद वाचला, अन त्यानंतर एस्केलेट झालेली गम्मत वाचलीत तर त्याला गमतीपल्याड जास्त किम्मत नाही, हे ध्याने येईलच.

आधी नेमका प्रॉबलेम कुठे आहे आणि ही मंडळी अशी वागतात तर का वागतात हे समजून घेणं खुप गरजेचं आहे.
<<
एक्झॅक्टली बुवा. हेच मी लिहिलंय.

जाई,

>> चला , चर्चा नेहमीच्याच् स्त्रियांनी काय कपड़े घालावेत ह्या मुद्द्यावर आली !!!
>> लिंबूकाका तुमची ही पोस्ट अत्यंत अचाट आणि अतर्क्य आहे.

लिंबूटिंबूंचा तो संदेश मुलीने आणि तिच्या आप्तेष्टांनी स्वत: काय करावं, या संदर्भात आहे. बलात्कारांचा कार्यकारणभाव स्पष्ट करण्यासाठी नाहीये. Happy

आ.न.,
-गा.पै.

दीमा,

तुमच्या दोन(शे) शब्दांच्या संदेशाशी सहमत. 'लैंगिक शिक्षण हे समग्र मूल्यशिक्षणाच्या चौकटीत बसवलेले असले पाहिजे' असा जो अर्थ सूचित होतो आहे त्याच्याशी तर विशेषकरून सहमत. Happy

आ.न.,
-गा.पै.

आपण धागा कशासाठी काढलाय ते केवळ धागाकर्ती ला नीट माहीत असल्याने कृपया धागाकर्ती ने आतापर्यंतच्या चर्चेचे फलित संक्षेपात सांगावे अशी प्रामाणिक विनंती. काही चांगली सजेशन्स असतील तर वाचायला आवडेल.

खरोखरीच इतके प्रतिसाद येतात आणि नक्की चर्चा काय चालली आहे? कुठे चालली आहे? तेच कळेनासे होते.

Pages