आधुनिक स्त्रियांचा स्त्रीवाद

Submitted by सुमुक्ता on 20 February, 2015 - 03:29

जागतिक महिला दिन जवळ आला आहे त्यानिमित्ताने काहीतरी लिहू असे वाटत होते!! म्हणून स्त्रीवाद म्हणजे फ़ेमिनिझम वर काहीतरी लिहावे असे ठरवले. विषयाला अनुसरून निरीक्षण करायला मी चालू केले आणि प्रश्न पडला की स्त्रीवादाचा झेंडा मिरविणाऱ्या आम्ही शहरी आधुनिक स्त्रिया खरोखरच स्त्रीवादी आहोत का? आम्ही खूप खूप शिकलो, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला लागलो, पुरुषांना मिळणारे स्वातंत्र्य थोड्याफार प्रमाणामध्ये आम्हालाही मिळायला लागले (हॉटेलात जेवणे, दारू पिणे, सिगरेट ओढणे, रात्रीच्या पार्ट्यांना जाणे, डिस्कोमध्ये नाचणे, इत्यादी), पारंपारिक साडी किंवा पंजाबी ड्रेस बासनात गुंडाळून आम्ही जीन्स-टीशर्ट, स्कर्ट वैगेरे घालायला लागलो. पुष्कळ घरातील पुरुषसुद्धा घरगुती कामामध्ये मदत करायला लागले. झालो की आम्ही स्त्रीवादी!!! काय राहिले अजून?………………… खरेच?

"घरीच बसलेली असते ती. तिला काय उद्योग आहे!!"
"किती जाड आहे ना ती!!"
"दिसायला यथातथाच आहे"
"लग्न होऊन एवढी वर्षे झाली तरी अजून मूल नाही"
"लग्न जमतच नाहीये तिचे एवढे वर्ष"
"शिक्षण कमीच आहे तसे"
"अगदी काकूबाई आहे ती!!"
"कसे कपडे घालते ती!!"

अशी आणि अजून कितीतरी उपहासात्मक वाक्ये अगदी आपल्यासारख्याच शहरी आधुनिक स्त्रियांच्या तोंडी मी सर्रास ऐकली आहेत. पुष्कळ वेळा स्त्रिया बोलत नाहीत पण त्यांच्या वागण्यातून आणि देहबोलीमधून भेदभाव सतत जाणवत राहतो. ह्यातील काही वाक्ये मीसुद्धा बोललेली आहेतच. कितीतरी वेळा मीसुद्धा जजमेंटल झालेच आहे. मग मी खरेच स्त्रीवादी आहे का? मला स्त्रीवादाचा खरा अर्थ कळला आहे का? मी खूप शिकलेली आहे, मी काम करून पैसे कमावते, मी उत्तम स्वयंपाक करते, मी आधुनिक आहे, मी स्वतंत्र आहे, हे म्हणताना इतर स्त्रिया कमी आहेत असे का म्हणावेसे वाटते? स्वत:च्या कर्तुत्वाचा अभिमान बाळगताना इतर स्त्रिया कशा कर्तुत्ववान नाहीत हे सिद्ध का करावेसे वाटते? ह्याचा अर्थ आत्मविश्वासाची कमी असा घ्यावा की अहंकारी वृत्ती असा घ्यावा?

प्रत्येक स्त्री ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिला तिचे आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. काय शिकावे, नोकरी करावी की नाही, लग्न करावे की नाही आणि केले तर कोणाशी करावे, मूल होऊ द्यावे की नाही आणि कधी होऊ द्यावे, काय खावे, काय प्यावे, कोणते कपडे घालावे, हे सगळे प्रश्न तिचे वैयक्तिक प्रश्न नाहीत का? मग त्यावर टीकाटिप्पणी करण्याचा कोणालाच काय अधिकार आहे? तिच्याकडे असलेल्या किंवा नसलेल्या गोष्टींवरून तिच्याशी भेदभावाने वागण्याचा काय अधिकार आहे? ज्याप्रमाणे वैयक्तिक निर्णय घायचा प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे त्याप्रमाणे तिचे अनेक प्रश्नसुद्धा आहेत. त्या प्रश्नांशी कदाचित ती एकटीच लढा देत असेल. तिचे प्रश्न माहित नसतानाच जजमेंटल होण्याचा तरी कोणाला काय अधिकार आहे?

स्त्रियांनीच स्त्रियांना जर असे कमी लेखले तर मग खरा स्त्रीवाद कधीच रुजणार नाही. मग पुरुषांकडून तरी स्त्रियांनी का म्हणून अपेक्षा ठेवायची? सर्व स्त्रिया समान आहेत मग त्यांचे गुण-अवगुण तितकेसे महत्वाचे नाहीत ही भावना जेव्हा प्रत्येक स्त्रीच्या मनात रुजेल तेव्हाच स्त्रीवादाचे खरे सौंदर्य कळायला मदत होईल. स्त्रीवादाची व्याख्या केवळ स्त्री-पुरुष भेदभाव न बाळगता मिळालेल्या/दिलेल्या संधीच नव्हे तर स्त्रियांनी(आणि पुरुषांनीसुद्धा) स्त्रीत्वाचा आणि इतर स्त्रियांचा केलेला सन्मानसुद्धा ह्या व्याख्येमध्ये अध्यारुत असायला हवा.

करण्यासारखे खूप काही आहे.ज्या स्त्रियांपर्यंत स्त्रीमुक्ती चळवळ पोहोचालेलीच नाही अशा स्त्रियांना मदत करणे हे तर आहेच. पण ते खूप मोठे काम आहे. आपल्या आजूबाजूच्या इतर स्त्रियांचा (नातेवाईक, शेजारपाजारच्या आणि इतरही ओळखी-अनोळखीच्या) अनादर होणार नाही असे वागणेबोलणे जमले तरीही आपण खूप काही साध्य करू शकतो. पुरुषांशी स्पर्धा करण्यापेक्षा आपापसातली ही स्पर्धा आणि तेढ मिटविणे अधिक गरजेचे आहे. स्त्री हिच स्त्रीची शत्रू असते हे वाक्य खोटे करून दाखवायला हवे.

जागतिक महिला दिन खऱ्या अर्थानी साजरा करायचा असेल तर महिलांनी महिलांनाच कमी लेखून भेदभाव करणे सोडून द्यायला हवे. स्वत:ला आधुनिक स्त्रीवादी म्हणविणाऱ्या माझ्यासारख्या सर्वच स्त्रियांनी आत्मपरीक्षण करायला हवे. आपल्या बोलाण्यातून आणि वागण्यातूनसुद्धा चुकून किंवा मुद्दामून आपण इतर स्त्रियांचा उपहास तर करत नाही ना, आपल्यासारख्या नसणाऱ्या (मग ते कोणत्याही बाबतीत असो) स्त्रियांना जज करून भेदभावाची वागणूक तर देत नाही न हे वारंवार तपासायला हवे. मी ठरविले आहे…मी प्रयत्न करणार आहे.

======

तळटीपः जजमेंटल साठी मराठी शब्द माहित नाहीत म्हणून इंग्रजी शब्दच वापरला आहे. कोणाला माहित असेल तर कृपया सांगवा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते चूक की बरोबर' हे बाजूला न ठेवता, विचारात घेणं आवश्यक आहे.
>> विचारात घेउ नका असं म्हणत नाहिये. ते वेगळं डिस्कशन आहे. सर्वायल ऑफ द फिटेस्ट वगैरे. दुसरीकडे करु.

स्वीकारण्या नाकारण्याचा प्रश्नच येऊ नये>> बरोबर. पण अशा उपदेशातून नाकारलंच जातंय ना. म्हणून तो स्वीकारा शब्द. पण त्याहून बरोबर सिंडी म्हणाली तसं - असु द्या. लेट हर बी.

तोच तर मुद्दा आहे नताशा. पॉवर जरूर मिळवावी, पण त्या पॉवरचा उपयोग कसा करता हे मह्त्वाचं. आणि आज ही पॉवर स्त्रीला आहे / मिळू पाहतोय/ त्यासाठी ती जागरुक प्रत्नशील नक्कीच आहे. म्हणूनच विचार्पूर्वक चॉईस करणं आवश्यक आहे.

उरलेले निम्मे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला शील आणि कौमार्य यात शिरावे लागेल. याच्याशी निगडीत काही बांबतीत व्हाई शूड बॉईज हॅव ऑल द फन असे स्त्रियांनी म्हणण्यात अर्थ नाही. >>

Happy ह्या धाग्यावरचा वेळ सार्थकी लागला. नक्की काय म्हणायचे आहे ते स्पष्ट कर प्लिज!! लैंगिक दृष्ट्या स्त्रीने काही 'फन' अनुभवू नये?

रार, तू म्हणतेस ते लिहा-वाचायला बरं वाटतं पण प्रत्यक्षात तसं वागणं फा-र थोड्या व्यक्तींना शक्य होतं. विनोदानं का होइना पण सुपर्बोलच्या दिवशी हळदीकुंकू ठेवणार्‍या बायांबद्दल टिपण्णी तू बेकरीत केलीस. एखाद्या विशिष्ठ इंटरेस्ट असलेल्या समुहात तुला इंटरेस्ट नाही म्हणून त्यांना नम्रपणे नकार देउन आपल्या आवडीची गोष्ट करण्यात गुंतणं सहज सोपं होतं. पण मायबोलीसारख्या फोरमवर गप्पांच्या पानावर याचा उल्लेख करण्याचा मोह नाहीच आवरता आला. शिवाय वाचणारा आपल्या टोनमध्ये वाचत असतो त्यामुळे तुझी पोस्ट कुणाला हळदीकुंकू करणार्‍या बायकांची खिल्ली उडवणारी वाटली तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही.

त्यामुळे नताशा म्हणते तसं या सगळ्या ह्युमन इमोशन्स आहेत. इट्स ओके Happy

पॉवर जरूर मिळवावी, पण त्या पॉवरचा उपयोग कसा करता हे मह्त्वाचं. >>
घुमफिरके फिर वही पहुंच रहे है.
रार, हे जे सांगतेय्स तू ते त्रिकालाबाधित, सर्वकाळसंमत वगैरे सत्य आहे. न्युक्लीअर पॉवर पासून मोदींपर्यंत कुठेही वापरु शकता. मग तो उपदेश सतत स्त्रियांना"च" कशाला?

इथे खूप लिहावे असे वाटत होते सकाळपासून पण आत्ता वेळ मिळाला आहे!
मला नताशाचे म्हणणे पटले पण सीमंतिनी आणि रार ह्या दोघींनी मांडलेल्या काही मुद्द्यांशी मी सहमत. मला वाटते आपण फक्त वेगवेगळी मतं मांडत आहोत आणि ती विरुद्ध मते नाहीचेत! त्यामुळे हे माझे मत!
judgemental होणे चुकीचे असले तरी ती माणसाची सहज प्रवृत्ती आहे! पण judgement pass करताना ती व्यक्ती स्त्री/पुरुष आहे म्हणून जेव्हा judgement pass केले जाते त्यावेळी ते खटकते! मग ते स्त्रीचे करियरसाठी बाहेर राहणे असो किंवा पुरुषाचे इमोशनल होऊन रडणे असो.

स्त्रीला निसर्गाने शारीरीक क्षमता कमी दिली आहे हे स्त्रियांनी मान्य केले आणि स्त्रीला निसर्गाने बौद्धिक क्षमता पुरुषांएवढीच दिली आहे हे पुरुषांनी मान्य केले की निम्मे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.>> हे ऋन्मेऽऽष ने म्हटलेले विधान एक परफेक्ट उदाहरण आहे! शारीरिक क्षमता आणि बौद्धिक क्षमता ह्या आजिबात स्त्री/पुरुष असण्याशी निगडीत नाहीत! एक स्त्री athlete बैठे काम करणाऱ्या पुरुषापेक्षा अधिक वजन उचलेल आणि बुद्धीचा आणि लिंगाचा काहीच संबंध नाही! हे सगळे वर्षानुवर्षाच्या मानसिकतेतून निर्माण झालेले stereotypes आहेत जे खूप घातक आहेत! We need to work on breaking these stereotypes! स्त्रियांना कोणीही (स्वतः त्यांनी स्वतःला, इतर स्त्री/पुरुष/समाजाने त्यांना) कसे वागवावे? तर एक माणूस म्हणून वागवावे! ९९% स्वभाव हे मनुष्य स्वभाव असतात त्यात स्त्री स्वभाव/पुरुष स्वभाव असं काही नसतं (त्या गोष्टी सोशल कंडीशनिंग मधून निर्माण होतात. ज्यादिवशी हा महिला दिन नावाचा दिवस कॅलेन्डरवरून नाहीसा होईल तो सुदिन! कारण त्यावेळी आपण माणूस म्हणून स्त्री-पुरुष समान आहेत हे मान्य केलं असेल!

सत्यमेव जयते च्या शेवटच्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये एक बाई खूप भारी बोलल्या होत्या! she hit the problem with the society bang ON! (http://youtu.be/TRKmyzen0Vw?t=47m8s) The link starts at the desired point in the episode.

सिंडरेला, तु मला भेटली नाहीयेस म्हणून असं म्हणतीयेस, आणि कदाचित बेकरीवरच्या माझ्या बोलण्यामुळे तसं मत होऊ शकतं.
बेकरीवरच्या पोस्टींवरुन माझ्या विचार आणी आचाराबद्दल अजिबात मत बनवायला जाऊ नकोस. तो विनोद निव्वळ 'ओव्हर् टाइम (ओटी) आणि हळकुंकवात भरली जाणारी ओटी - या शब्दांच्या खेळातून केला गेलेला होता. तो विनोद करण्यासाठी तयार केलेला 'सीन' होता. कॅरॅक्टर निर्मीती होती शाब्दीक विनोदासाठी.
मायबोलीवरच्या कोणत्याही ' सीरीयस चर्चेच्या रूपात' / स्वयंपाकापासून ते स्त्रीत्वाच्या चर्चेमधे गेल्या १२ वर्षात मी आजवर असा कोणताही कोणालाही कमी लेखणारा मुद्दा मांडलेला नाही. कारण मी दुसर्‍याच्या विचारांचा आदर करणारी व्यक्ती आहे. कोणालाही कमी लेखून मी मोठी होत नाही, मी मोठी होईन ती माझ्या कर्माने / माझ्या विचारांना ह्या मतप्रणालीतली. जिथे मुद्दे विचरापूर्वक मांडले जातात आणि वाचले जातात अशी अपेक्षा असते तिथे ते आधी स्वतःच्या विचारात आणि आचारात आले आहेत का हे तपासुन पाहणार्‍यातली मी आहे.
कारण माझ्या आयुष्यात मी स्वतःला स्त्रीवादाच्याही पुढे म्हणजे 'व्यक्तीस्वतंत्र्याच्या' आग्रह धरणार्यताली आहे. आणि ते करताना माझ्या वागण्या/बोलण्यात देखील ते आचरण करण्याचा माझा प्रयत्न असतो/ असेल.
कदाचित फ्रीडम बरोबर येणारी हीच जबाबदारी आहे, असं मला वाटतं. आणि माझ्या आयुष्यात ही जबाबदारी मी स्वीकारली आहे आणि त्या बरोबर येणार्‍या चांगल्या-वाईटासकट.
आणी हे असं बोललेलं प्रत्यक्ष आयुष्यात वागणं अवघडच असतं ह्याची मला कल्पना आहे. त्यामुळे एकतर तसं वागून दाखवावं किंवा जोपर्यंत ते जमत नाही तोपर्यंत बोलायला जाऊ नये हे माझं तत्वं आहे.

(माझं हे पोस्ट 'मी कशी आहे' याची टिमकी मिरवायची आहे, म्हणून लिहिलेले नाही. तसा गैरसमज करुन घेऊ नये. इथे मला स्वतःबद्दल काहीही लिहायचे नव्हते पण मला डायरेक्ट माझ्या लिहीणे आणि बोलणे या तफावतीबद्दल प्रश्न विचारला गेला म्हणून हे स्पष्टीकरण /उत्तर लिहायची वेळ आली. शिवाय ही कंसातली टीप कोणाला दुखावण्यासाठी नसून, किंवा प्रश्न विचारणार्‍याबद्दल आकस इ. इ. मधून लिहिलेले नसून - मायबोलीवर अनेकदा 'ज्या संदर्भात पोस्ट लिहिली आहे, ते मूळ पोस्टच डीलीट केले जाते. अश्यावेळी फ्रेम ऑफ रेफरन्स जर काढून घेतली गेली तर 'रार ने काय स्वतःबद्दल इतक्या बढाया मारल्या आहेत' असं कोणाचं भविष्यात ही पोस्ट वाचून मत होऊ नये .. ही खबरदारी म्हणून हा कंस)

स्त्रियांनीच स्त्रियांना जर असे कमी लेखले तर मग खरा स्त्रीवाद कधीच रुजणार नाही. मग पुरुषांकडून तरी स्त्रियांनी का म्हणून अपेक्षा ठेवायची? सर्व स्त्रिया समान आहेत मग त्यांचे गुण-अवगुण तितकेसे महत्वाचे नाहीत ही भावना जेव्हा प्रत्येक स्त्रीच्या मनात रुजेल तेव्हाच स्त्रीवादाचे खरे सौंदर्य कळायला मदत होईल. स्त्रीवादाची व्याख्या केवळ स्त्री-पुरुष भेदभाव न बाळगता मिळालेल्या/दिलेल्या संधीच नव्हे तर स्त्रियांनी(आणि पुरुषांनीसुद्धा) स्त्रीत्वाचा आणि इतर स्त्रियांचा केलेला सन्मानसुद्धा ह्या व्याख्येमध्ये अध्यारुत असायला हवा.>>>>>>>>>>>
लेखाचा मुख्य संदेश "स्त्रीयांनी स्त्रीयांना कमी लेखलं नाही पाहिजे " हा एक विचार म्हणून चांगला असला आणि त्याप्रमाणे वागून सुद्धा खरं तसं बघायाला गेलं तर त्यानी स्त्रीयांचा काही स्पेशल उद्धार होणार नाहीये किंवा लेखिकेच्याच शब्दात म्हणायचं तर त्यामुळे स्त्रीवादाचे खरे सौंदर्य कळायला मदत होईल हे पटत नाही आणि म्हणूनच मला नताशाचे विचार बरोबर वाटतात. स्त्रीयांनी स्त्रीयांना "जज" केले काय आणि पुरुषांनी स्त्रीयांना जज केले काय, सरतेशेवटी तो एक मनुष्य स्वभाव आहे (हे ही नताशानी लिहिलेच आहे).

सुमुक्ता,

स्त्रीवाद म्हणजे काय? तसेच पुरूषवाद नामे काही वाद आहे का? जर पुरूषवाद नसेल तर स्त्रीवाद कशाला हवा?

आ.न.,
-गा.पै.

आत्ता मायबोलीवर लॉगीन झाले तेव्हा बर्‍याच प्रतिक्रिया दिसल्या. जमेल तशी उत्तरे द्यायचा प्रयत्न करते.

सर्वप्रथम स्त्रियांनी एकमेकींना जज करु नये म्हणजे पुरुषांनी एकमेकांना जज करावे अस अर्थ अजिबात होत नाही. लेख स्त्रीवादाविषयी आहे म्हणून स्त्रियांबद्दल लिहिले आहे. खरेतर कोणीच कोणाला जज करणे टाळावे कारण समोरच्या व्यक्तिचे आयुष्य काय आहे, तीने काय दु:ख भोगले असेल, तिचा संघर्ष काय असेल ह्याची महिती दरवेळेस आपल्याला असेलच असे नाही. ह्यूमन टेन्डन्सी म्हणून आपण असंवेदनशीलतेला खतपाणी घालत नाही आहोत ना हे एकदा तपासून पहावे.

"स्त्री हीच स्त्रीची शत्रु" हे तर अतिशय भंकस वाक्य आहे. मग पुरुष काय पुरुषांचे शत्रु नसतात? >>>> पुरुष पुरुषांचे शत्रु असतीलही पण लेख स्त्रीवादाबद्दल आहे. आणि पुरुषापेक्षा स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते असा ह्या भंकस वाक्याचा अर्थ आहे!!

श्रेया घोषालनी माझ्यासारख्या गाण्यात औरंगजेब स्त्रीला माझ्या गाण्याच्या सेन्स वरुन कमी लेखु नये? का?
अरुंधती रॉयनी माझ्यासारख्या न-लेखिकेला माझ्या लिखाणाच्या सामान्यपणावरुन जज करु नये? का?
चंदा कोचरनी तिच्या यशाचा अभिमान बाळगू नये आणि इतर सामान्य स्त्री एम्प्लॉयीपेक्षा स्वतःला सुपिरिअर मानू नये? का? >>>>>>>>>> स्वतःच्या कर्तुत्वाचा सार्थ अभिमान असणे ह्यात गैर काहीच नाही पण अहंकार असणे गैरच. श्रेया घोषाल, अरुंधती ,चंदा कोचर किंवा अजून कोणी यशस्वी स्त्रिया असतील त्यांनी इतरांना कमी लेखण्याची गरजच काय. त्या यशस्वी आहेत आणि यशस्वी राह्तील. मग इतर कोणच्या यश-अपयशाने त्यांना फरक पडायला नको. माणूस दुसर्‍याला तेव्हाच कमी लेखतो जेव्हा त्याच्या स्वतःमध्ये आत्मविश्वासाची कमी असते. आणि यश तेव्हाच मिळते जेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास असतो. वर नावे घेतलेल्या स्त्रीया सुप्रीमली कॉन्फिडंट असायला हव्यात तेव्हा त्यांना इतरांना कमी लेखायची गरज पडू नये.

एकमेकींची पाठराखण केली, पॉझिटीव्ह वातावरण ठेवल तर स्त्रीला जास्त संधी मिळतील. <<< धन्यवाद सीमंतिनीं. तुम्ही खरोखरच माझे म्हणणे अतिशय समर्पक व किमान शब्दात लिहिले आहे.

स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये निसर्गाने जो बेसिक फरक बनवला आहे तो नेहमी कायम राहिला पाहिजे, तो संपवायचा प्रयत्न केला की मजा गेली स्त्री-पुरुष या नात्यातील >> स्त्री पुरुष एकमेकांचे स्पर्धक नाहीत एकमेकांना पूरक आहेत हे एकदा कळले की आपोआपच बर्‍याच गोष्टी सोप्या होतील

एकूणच ग्लोबल लेव्हलला स्रीयांच्या हातात शिक्षणाने, जागृतीने, चळवळीने जी काय पॉवर येउ घातली आहे ती द्वेषाच्या मार्गानं न जाता, व्यक्तीस्वातंत्र्याच्या मार्गाने कशी चॅनलाईझ करता येईल हा सध्याच्या स्वतंत्र किंवा स्वातंत्र्याच्या मार्गावर चालू इच्छिणार्‍या प्रत्येक स्रीसाठीचा प्रश्न आहे..... टीपींग पॉइंट ग्लोबल स्केलवर हळूहळू जवळ येत चाललाय, त्या जबाबदार्‍या समर्थपणे पेलण्यासाठी एका स्त्रीला दुसर्‍या स्रीनी समजून घेण्याच्या नितांत गरज आहे...>> धन्यवाद रार

जज करणे आणि स्त्रीवाद- स्त्रीमुक्ती हे मुद्दे मिक्स केलेले काही फारसे पटले नाहीत !
मुळात जज करणे म्हणजे फक्त शेरेबाजी, कमी लेखणे एवढाच अर्थ असतो का Uhoh
कधी कधी जजिंग हे फक्त एवढ्यासाठी असु शकतं कि इफ दॅट पर्सन इज युअर टाइप ऑर नॉट , प्रत्येकाला काय आवडते / कुठल्या गृप मधे रहायला आवडते हा वैयक्तिक चॉइस आहे, त्यासाठी समोरची व्यक्ती माझ्या विचारांशी बर्र्यापैकी काँप्लिमेंटरी आहे कि नाही जे कितीतर्री लोक नकळत जज करतच असणारच ना , एखाद्या बद्दल काहीतरी मत झाल्याशिवाय मैत्री करावीशी वाटेल का ?
एखाद्याचा इंटरनेट - प्रत्यक्ष वावर / व्यक्तीची मतं आणि हो कधीकधी अपिअरन्स वरूनदेखील मत बनतच प्रत्येकाबद्दल , जे ऑबव्हियस आहे , judging is not always to bitch or underestimate anyone !

श्रेया घोषाल, अरुंधती ,चंदा कोचर किंवा अजून कोणी यशस्वी स्त्रिया असतील त्यांनी इतरांना कमी लेखण्याची गरजच काय.>>>>> बरोबर आहे, नाही करायला पाहिजे हे लक्षात आलं पण तसं न केल्यामुळे स्त्रीवादाचं काय चांगलं होणार आहे नेमकं जे आधी होत नव्हतं?
समाजात समान हक्क हा सहसा वर्चस्व असलेल्या लोकांनी समजून घेऊन स्वतःहून समान हक्क देऊ केला असं सहसा होत नाही,तो मागावा लागतो. नाही दिला तर रस्त्यावर उतरुन तो मागायची तयारी दाखवावी लागते हे सगळं आपल्या भारताच्या इतिहासात सुद्धा सापडेल.
सध्याच्या परिस्थितीत म्हणाल तर समान हक्क मिळायला स्त्रीयांनी पुरुषांच्या बरोबरीनी "कंपीट" करायची गरज आहे. कंपीट करायच्या आधी स्वतःला लायक (क्वालिफाईड ह्या अर्थानी) बनवलं पाहिजे. लायक बनायला आधी त्यांनी स्वतः आपण हे करु शकतो हा विश्वास ठेवला पाहिजे आणि प्रत्येक आई वडिलांनी त्यांना लायक बनवायला कुठलाही भेदभाव न ठेवता त्यांना शिक्षण दिले पाहिजे.
आणि हो, हा समान हक्काचा अट्टाहास म्हणजे फक्त पुरुषाला "आम्ही पण कमी नाही" हे दाखवण्यापुरता आजिबात नाहीये. (असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी आधी कमीत कमी स्वतःचे मुलभूत हक्क काय असतात ह्याबद्दल माहिती करुन घेतली पाहिजे!)
फक्त स्त्रीयांनी स्त्रीयांना कमी न लेखून काय होणार आहे?

कमी न लेखल्याने माझ्या मते तरी विश्वास, आपुलकी वाढेल. ह्याचे रूपांतर कशात होवू शकते?? कशातही होवू शकते - जसं सासूच्या पाठींब्याने (त्या म्हणतात मी करून घेईन इतरां कडून कामं) इंग्लिश-विन्ग्लिश मध्ये श्रीदेवीला शिकायची संधी मिळते Happy व्यवहारातही अशा सपोर्टीव्ह जे.ना. आजूबाजूला असतील तर निम्मे जीवन सोपे होते.
करोडोची उलाढाल असलेला लिज्जत पापड उद्योग कसा चालू झाला?? शिक्षण नाही, भांडवल नाही. फक्त ६-७ बायकांची मिळून काम करायची तयारी. एकमेकांना कमी लेखून, जजमेंटल होवून हे सगळ जमल असते काय त्यांना ?? लिस्ट वाढवता येईल.

अहो ते ज्यांची तयारी होती बाहेर जाऊन किंवा घरबसल्या कसली ही भिती न बाळ्गता कामं करायला त्यामुळे यशस्वी झाला तो उद्योग.
सपोर्ट देणं हे प्रो अ‍ॅक्टिव काम आहे जे चांगलच आहे पण त्याला तुम्ही स्त्रीवाद ह्या मुद्द्याबाबत बोलताना फ्रंट अ‍ॅन्ड सेंटर नाही ठेवू शकत. ऑफिस एन्वायर्न्मेंट मध्ये जेव्हा पुरुष कंपीट करतात तेव्हा काय ते इतर पुरुषांना ते पुरुष आहेत म्हणून एक मेका धोत्र्यांना साह्य करू असं म्हणतात तेव्हा थोडीच त्यांची प्रगती होते?
प्रगती स्वतःच्या कामानी, कर्तुत्वानी होते. पुरुष असो की स्त्री. Happy

फक्त स्त्रीयांनी स्त्रीयांना कमी न लेखून काय होणार आहे? >> अनेक नुकत्याच जन्मलेल्या मुलींना जिवंत राहण्याची संधी मिळेल.
अनेकींनी शिक्षणाची संधी मिळेल. निदान कमीत कमी काही स्त्रीयांचा येऊ पहात असलेला जगण्याचा, वावरण्याचा, बोलण्याचा, मत व्यक्त करण्याचा कॉनफीडन्स तरी जाणार नाही. अनेक स्त्रीया इच्छा असलेल्या गोष्टी आणि स्वप्नं पूर्ण करु शकतील. आणि हे पाहून अजून काही स्त्रीया लहानलहान स्टेप्स का होईना पण घेण्याचं थोडसंतरी धाडस करतील.

'स्त्रीयांनी स्त्रीयांना कमी लेखणं' हा एकच अणि एकमेव फॅक्टर नाहीये हे खरं आहे, पण हा वन ऑफ द मेनी आणि सिगनीफिकंट फॅक्टर्स आहे.

प्रगती स्वतःच्या कामानी, कर्तुत्वानी होते. पुरुष असो की स्त्री >> अगदी मान्य. पण प्रगत होण्यासाठी देण्यात येणार्‍या संधी निदान आपल्या देशात तरी (दुर्दर्वानं) आजही अनेकदा, समाजाच्या वेगवेगळ्या स्तरात, तुम्ही स्त्री आहात का पुरुष यावर ठरते.

ऑफीस एन्व्हायर्नमेंट मध्ये तर बाई हवीच!! ते धोत्र्यांना कंपीट लेस कोऑपरेट मोअर सांगायला Wink आता म्हणाल सी तू असं का म्हून म्हणून रायली. मी नाय म्हणत, सरकार म्हणत -

http://www.state.gov/e/eb/rls/othr/2012/184988.htm

सी, बरोबर आहे. हे सरकारनी घेतलेले प्रो अ‍ॅक्टिव मेझर्स आहेत "आज" वूमन्स सफरेज मुवमेंट होऊन गेल्यावर इतक्या वर्षांनी. पण इथ पर्यंत गाडी आली कशी? स्त्रीयांनी जेव्हा स्वतः ठरवलं आणि काहीतरी "केलं" तेव्हा.
म्ह्णूनच मी म्हणत होतो की हा कमी लेखायचा मुद्दा योग्य आहे पण त्याला क्रुशियल नाही म्हणता येणार.

रार, बरोबर. एका स्त्री नी दुसर्या स्त्रीला प्रोत्साहन देणे, तिच्या करता काहीतरी करणे हे माझ्या लेखी परत काहीतरी ठोस केलं ह्या खाली मोडतं. दुसर्या स्त्रीला कमी न लेखण्यामध्ये असं काहीच ठोस काम नाहीये आणि ते करुन आपण फार स्त्रीवादाबाबत काहीतरी करतोय ह्या आविर्भावात राहून काहीच उपयोग नाही. वरचा लेख फक्त ह्याच एका गोष्टीबद्दल आहे आणि त्यामुळे आजिबात पटण्यासारखा नाही.

>>>'स्त्रीयांनी स्त्रीयांना कमी लेखणं' हा एकच अणि एकमेव फॅक्टर नाहीये हे खरं आहे, पण हा वन ऑफ द मेनी आणि सिगनीफिकंट फॅक्टर्स आहे.<<<

दोन्ही बाजूचे मुद्दे सम प्रमाणात पटण्याचे वळण येण्याचे कारण कोणी ओळखत आहे का? Wink

मूळ लेख लिहिणार्‍या सुमुक्तांचा 'तो' (स्त्रीने स्त्रीला कमी लेखू नये अर्थाचा) मुद्दा त्यांच्या स्वतःपेक्षा सीमंतिनी आणि रारच अधिक व्यवस्थित एक्स्प्लेन करत आहेत. अन्यथा त्या मुद्याचे महत्व विशेष नाही हे लिहिणार्‍यांचा मुद्दा बेसिकली पटण्यासारखच आहे. त्यामुळे दोन्ही बाजू पटणेबल वाटत आहेत.

ह्यासाठी सुमुक्ता, मुद्दे नि:संदिग्धपणे लिहिले जायला हवेत नाही का?

माझा हा पहिला प्रतिसादः

>>>हा विचार स्तुत्य वाटला, पण ह्याचा फक्त स्त्रीवादाशीच संबंध आहे असे वाटत नाही व फक्त ह्याचाच स्त्रीवादाशी संबंध आहे असेही वाटत नाही. सर्व स्त्रियांनी भेदभाव करणे, अपेक्षा / टीका / निंदा / मत्सर / थट्टा करणे सोडले तर अचानक स्त्रीवाद सत्यात उतरेल असे काही नाही, असे वाटते.

एकंदर लेखाचा उद्देश चांगला वाटला पण मुद्दे फार वरवरचे घेतले गेले असे वाटले. <<<

अश्याच अर्थाचे नंतर काही प्रतिसाद आलेले आहेत पण सीमंतिनी आणि रार ह्यांची (त्या प्रतिसादाला उद्देशून असलेली) संयत उत्तरे निदान मला तरी समाधानी करत आहेत. Happy

>>सर्व स्त्रिया समान आहेत मग त्यांचे गुण-अवगुण तितकेसे महत्वाचे नाहीत ही भावना जेव्हा प्रत्येक स्त्रीच्या मनात रुजेल तेव्हाच स्त्रीवादाचे खरे सौंदर्य कळायला मदत होईल. <<
कोण म्हणत सर्व स्त्रिया समान आहेत?सर्व माणस सारखी नसतात यात स्त्रिया पण आल्याच.

सर्व लोक समान हे सोशलिस्ट तत्वज्ञान जगभर फेल गेलेय. आता तरी या गोड गैरसमजातून जितक्या लवकर बाहेर पडाल, तितकी स्वतःची अन पर्यायाने इतरांची प्रगती कराल. स्वतः मानत असाल, ठीक. तुमचं मत. पण उदात्ततेचा मुलामा देऊन गैरसमज पसरवल्याने इतरांचंही नुकसान होतं. स्त्रियांनी लक्षात ठेवायला पाहिजे की प्लॅटरवर काहीच मिळणार नाहिये- हक्क, रिस्पेक्ट, रेकग्निशन, उगी उगी करायला खांदे, काहीही नाही. झगडण्याची तयारी ठेवावीच लागेल. अन माझ्यामते स्त्रियांना हे ऑलरेडी माहितेय. त्याशिवाय इतक्या ऑप्रेशनमधून आप्पोआप वर येत नाहीत स्त्रिया. पण हे "सर्व समान" बेगडी तत्वज्ञान काही स्त्रियांची दिशाभुल नक्कीच करते. आणि यशस्वी स्त्रियांना त्यांच्या कर्तुत्वाचा "गिल्ट" ही देते.

ऑन द पर्सनल फ्रंटः मी समाजिक असमानतेविरुद्ध झगडणार्‍या, संघर्ष करुन काही मिळवायला तयार असलेल्या स्त्रियांना मला शक्य तो सर्व सपोर्ट देते. पण संधी असुनही काही न करणार्‍या स्त्रियांविषयी (पुरुषांविषयीही) मला अजिबात सहानुभुती नाही. त्यांना "तू पण त्या झगडून मिळवणार्या व्यक्तीइतकीच महान" असं म्हणून झगडणार्‍या व्यक्तीचे एफर्ट्स मातीमोल करणं मला शक्य नाही.

तळ्टीपः इथे कायद्यापुढे सर्व समान आहेत हा मुद्दा नाहिये. ते मान्यच आहे. पण समाजात एखाद्याची "पत" ठरवताना सर्व समान म्हणून चालत नाही. असं कुठल्या समाजात होत असेल तर मला सांगा.

एका स्त्री नी दुसर्या स्त्रीला प्रोत्साहन देणे, तिच्या करता काहीतरी करणे हे माझ्या लेखी परत काहीतरी ठोस केलं ह्या खाली मोडतं. दुसर्या स्त्रीला कमी न लेखण्यामध्ये असं काहीच ठोस काम नाहीये आणि ते करुन आपण फार स्त्रीवादाबाबत काहीतरी करतोय ह्या आविर्भावात राहून काहीच उपयोग नाही. वरचा लेख फक्त ह्याच एका गोष्टीबद्दल आहे आणि त्यामुळे आजिबात पटण्यासारखा नाही.>> +१००

फक्त स्त्रीयांनी स्त्रीयांना कमी न लेखून काय होणार आहे? >> अनेक नुकत्याच जन्मलेल्या मुलींना जिवंत राहण्याची संधी मिळेल.
अनेकींनी शिक्षणाची संधी मिळेल. निदान कमीत कमी काही स्त्रीयांचा येऊ पहात असलेला जगण्याचा, वावरण्याचा, बोलण्याचा, मत व्यक्त करण्याचा कॉनफीडन्स तरी जाणार नाही. अनेक स्त्रीया इच्छा असलेल्या गोष्टी आणि स्वप्नं पूर्ण करु शकतील. आणि हे पाहून अजून काही स्त्रीया लहानलहान स्टेप्स का होईना पण घेण्याचं थोडसंतरी धाडस करतील. >>> रार, अगेन! इथे स्त्रीनी स्त्रीला कमी लेखण्याचा नव्हे, मनुष्याने मनुष्याला कमी न लेखण्याचा प्रश्न आहे.

रार, सुमुक्ता, सीमंतिनी, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्यानंतर मी पुढचे मुद्दे मांडीन.
प्रत्येकाने मिळून-मिसळून वागावे, एकमेकला मदत करावी, अहंकार नसावा, इतरांना कमी लेखु नये वगैरे वगैरे हे सग्ळ्यांसाठीच लागू आहे. बरोबर? मग स्पेसिफिकली स्त्रियांना हा उपदेश देऊन काय साध्य होतंय? तुम्ही स्त्रियांनाच कॉर्नर करुन डिस्क्रिमिनेट करत नाही आहात?

चर्चा पुढे जात नाही आहे.

'दुसर्‍याला कमी न लेखणे' ह्याचा स्त्रीवादाशी काहीही संबंध नाही असे म्हणणारे आणि 'दुसर्‍याला कमी न लेखणे' अंगी बाणले तर स्त्रीवादाचे वातावरण निर्माण होण्यास थोडेसे सहाय्य होऊ शकेल असे म्हणणारे आपापले मुद्दे रिपीट करत आहेत.

हे सेटल झाले तरच चर्चा पुढे जाईल अशी परिस्थिती काही खास रोचक वाटत नाही.

इतरही काही मुद्दे आहेत लेखात! एक मुद्दा निसटत्या पद्धतीने लिहिलेला दिसत आहे.

आधुनिक विचारसरणीच्या पुरस्कर्त्या असलेल्या स्त्रिया स्वतःच्या तुलनेत मागासलेल्या विचारसरणीच्या स्त्रियांना नांवे ठेवतात असे लिहिलेले दिसत आहे. ह्यातील 'नांवे ठेवणे' ह्या मुद्यावर वर भरपूर चर्चा झालेली आहे. पण आधुनिकता आणि मागासलेपण ह्यावर चर्चा झालेली नाही.

मूळ लेखातील ही विधाने:

>>>"घरीच बसलेली असते ती. तिला काय उद्योग आहे!!"
"किती जाड आहे ना ती!!"
"दिसायला यथातथाच आहे"
"लग्न होऊन एवढी वर्षे झाली तरी अजून मूल नाही"
"लग्न जमतच नाहीये तिचे एवढे वर्ष"
"शिक्षण कमीच आहे तसे"
"अगदी काकूबाई आहे ती!!"
"कसे कपडे घालते ती!!"<<<

ह्यात निव्वळ नांवे ठेवण्यापलीकडे काहीतरी आहे. दुसरीची विचारसरणी (किंवा परिस्थिती) आपल्याला पटणारी नाही हे ठासून सांगणे आहे. ह्याच्यातच 'आपलीच विचारसरणी योग्य आहे' ही भूमिका आहे. मग 'स्त्रीवाद' म्हणजे एखादी स्त्रीने घेण्यालायक भूमिका आहे का जी स्वीकारण्याच्या प्रवासात काही स्त्रिया खूप पुढे व काही खूप मागे आहेत? आणि पुढे असलेल्या स्त्रिया त्यांच्यामते मागे असलेल्यांवर टीका करत आहेत? स्त्रीवाद हे एखादे स्थानक आहे का जिकडे समाजाची गाडी चाललेली आहे? की स्त्रीवाद हे वाहन आहे आणि समानता हे ध्येय आहे? आणि ह्या सगळ्यांत पुरुषांची भूमिका काय असावी, आहे वगैरे?

माझी गाडी <<<आम्ही खूप खूप शिकलो, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला लागलो, पुरुषांना मिळणारे स्वातंत्र्य थोड्याफार प्रमाणामध्ये आम्हालाही मिळायला लागले (हॉटेलात जेवणे, दारू पिणे, सिगरेट ओढणे, रात्रीच्या पार्ट्यांना जाणे, डिस्कोमध्ये नाचणे, इत्यादी), पारंपारिक साडी किंवा पंजाबी ड्रेस बासनात गुंडाळून आम्ही जीन्स-टीशर्ट, स्कर्ट वैगेरे घालायला लागलो. पुष्कळ घरातील पुरुषसुद्धा घरगुती कामामध्ये मदत करायला लागले. झालो की आम्ही स्त्रीवादी!!! काय राहिले अजून?>>> या परिच्छेदातच अडकलीय. तो समजला तर पुढचे वाचीन म्हणतो.

भरत Proud

मूळ लेख लिहिणार्‍या सुमुक्तांचा 'तो' (स्त्रीने स्त्रीला कमी लेखू नये अर्थाचा) मुद्दा त्यांच्या स्वतःपेक्षा सीमंतिनी आणि रारच अधिक व्यवस्थित एक्स्प्लेन करत आहेत. >>>>> +१

ह्यासाठी सुमुक्ता, मुद्दे नि:संदिग्धपणे लिहिले जायला हवेत नाही का? >>> निश्चितच. मी आपल्या प्रतिसादावर वरती म्हटलेच आहे की लेखावर अधिक काम करून पुन्हा प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेन

प्रत्येकाने मिळून-मिसळून वागावे, एकमेकला मदत करावी, अहंकार नसावा, इतरांना कमी लेखु नये वगैरे वगैरे हे सग्ळ्यांसाठीच लागू आहे. बरोबर? >>> निश्चितच

मग तुम्ही स्त्रियांनाच कॉर्नर करुन डिस्क्रिमिनेट करत नाही आहात? >>> नाही. कॉर्नर करुन डिस्क्रिमिनेट करणे हा हेतू मुळातच नाहिये पण स्वतःला स्त्रीवादी समजणारर्‍या स्त्रियांना इतर स्त्रियांचे प्रश्नच पुष्कळ वेळा समजत नाहीत. ते त्यांनी समजून घ्यावेत आणि आपल्यासारख्या नसलेल्या स्त्रियांना डिस्क्रिमिनेट करू नये, त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून त्यांना मदत करावी ही अपेक्षा आहे. ह्याचा अर्थ पुरुषांना स्त्रियांचे प्रश्न समजू नयेत, पुरुषांना पुरुषांचे प्रश्न समजू नयेत किंवा स्त्रियांना पुरुषांचे प्रश्न समजू नयेत असा अजिबात होत नाही.

दुसर्या स्त्रीला कमी न लेखण्यामध्ये असं काहीच ठोस काम नाहीये आणि ते करुन आपण फार स्त्रीवादाबाबत काहीतरी करतोय ह्या आविर्भावात राहून काहीच उपयोग नाही. >>>> माझ्या लेखात मी म्ह्टले आहे "करण्यासारखे खूप काही आहे.ज्या स्त्रियांपर्यंत स्त्रीमुक्ती चळवळ पोहोचालेलीच नाही अशा स्त्रियांना मदत करणे हे तर आहेच. पण ते खूप मोठे काम आहे." आपण कमीतकमी काय करू शकतो किंवा सुरुवात कशी करू शकतो हे सांगण्याचा माझा हेतू आहे. कदाचित माझ्या "तरीही आपण खूप काही साध्य करू शकतो." ह्या वाक्याने तुम्ही म्हणता आहात तसा अर्थ निघाला.

वर जिज्ञासा ह्यांनी म्ह्ट्ल्याप्रमाणे "हे सगळे वर्षानुवर्षाच्या मानसिकतेतून निर्माण झालेले stereotypes आहेत जे खूप घातक आहेत! We need to work on breaking these stereotypes!" ह्या stereotypes मुळेच एकमे़कांना कमी/जास्त लेखण्याची सुरुवात होते. आपल्यासारखे जे आहेत ते चांगले आणि उरलेले वाइट ही मानसिकता चूकीची नाही का?

माझी गाडी या परिच्छेदातच अडकलीय. तो समजला तर पुढचे वाचीन म्हणतो.>> हे उपहासाने लिहिले आहे. स्त्रीस्वातंत्र्य आणि स्त्रीवाद ह्यांचा मर्यादित अर्थ घेणार्‍यांबद्दल!!

लेख लिहिताना माझ्या मनातले विचार स्पष्टपणे आणि मुद्देसूद्पणे मला मांड्ता आलेले नाहीत. त्यामुळे बराच गोंधळ उडाला असावा. लेखावर अधिक काम करण्याची गरज आहे त्यामुळे ते करून लेख पुन्हा प्रकाशित करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.

बेफिकिर ह्यांच्या प्रतिसादानुसार इतरही खूप महत्वाचे मुद्दे आहेत (लेखात त्या सगळ्या मुद्द्यांचा अंतर्भाव केलेला नाही) की ज्यांवर चर्चा झालेली नाही.

परिस्थितीला दोष देणार्‍या, योग्य वातावरण मिळाले नाही म्हणणार्‍या, दुसर्‍यांनी मला कमी लेखु नये अशी अपेक्षा करणार्‍या पण स्व्तः काही करुन दाखवायला नको असणार्‍या सर्वांनीच हा व्हिडिओ बघा"च" :
https://www.youtube.com/watch?v=Wx9v_J34Fyo

Pages